शुक्रवार, ३० मे, २०२५

1930. युद्ध संपलं होतं

 युद्धभूमीवरून शोधून आणलेल्या बाणांची, त्यांच्या लोखंडी आणि तांब्याच्या टोकांची रास कमरेपेक्षा उंच झाली होती. इतस्ततः पडलेले, मातीत मिसळलेले बाण सैनिक उचलून आणत होते. त्यांच्या लाकडी दांड्या उपसून काढत होते आणि पिसांच्या शेपट्या असल्याच तर एका पिशवीत भरून ठेवत होते. जर मृत योध्याच्या शरीरात शिरलेला बाण खरंच मौल्यवान असेल तर त्याची पारखही ह्याच पिसांच्या शेपटीवरून होत होती आणि तोही उपसून काढून आणला जात होता. त्याचं रक्त पुसून त्या ढिगात टाकला जात होता. ते रक्त कधी जेत्याच्या सैनिकांचे होते, कधी पराजिताच्या.
ते रक्त ज्याला पुसले जात होते त्या सुतळी कापडाला त्याची पर्वा नव्हती, जो पुसत होता त्या सैनिकालाही त्याची जाण नव्हती. दोघंही फक्त आपले काम करत होते.
लोहयुगाची आत्ताशी सुरवात झाली होती. तांब्यापेक्षा दणकट आणि कठीण असलेलं लोह मौल्यवान होतं, दुर्मिळ होतं. बाणांच्या माथ्यावर लावलेले लोखंडी टोक सहजपणे परत वापरता येणार होतं. स्वतः अर्जुन त्या ढिगाऱ्याच्या शेजारी बसला होता, एकेका अस्त्रमुखाला जोखत होता. त्याची धार, त्याचे वजन, त्याचा आकार, तोल.. आवडलेले शर अर्जुन बाजूला काढत होता. त्याचाही एक छोटा गंज लागला होता. 
अर्जुनाने वर पाहिलं तेंव्हा युगंधर आपल्या घोड्यांच्या डोळ्यात काहीतरी वाचत होता. ते अश्वही आपल्या सारथ्याच्या डोळ्यांत कसलीतरी पावती शोधत होते. त्यांची क्लांत शरीरं त्या कमळासारख्या डोळ्यांत सैलावत होती. शब्दांवाचून चाललेला तो संवाद अर्जुन बघत होता, आपल्या हातात असलेल्या बाणाच्या धारेवर सावकाश तर्जनी फिरवत होता.
“पार्था, पुढच्या लढाईची तयारी करतो आहेस?”
घोड्याच्या डोळ्यांतली नजर न काढताच मधुसूदन बोलले. त्यांच्या ओठांच्या कडेवर एक खोडकर आणि खेळकर हसू होतं.
अर्जुन चपापला. मागचे अठरा दिवस चाललेला भीषण संगर त्याला आठवला. पाठीच्या मणक्यातून एक शिरशिरी गेली. बाणांची टोकं बाजूला ठेवतांना हा विचार त्याने केला नव्हता. श्रीकृष्णाचा प्रश्न जणू त्याच्या मनात खोल रुतला. एक विवश भाव त्याच्या चेहऱ्यावर साचून आला. अर्जुन निरुत्तर होता पण भगवंतालाही उत्तर नकोच होते. तो प्रश्न जिथे लागायचा तिथे लागला होता. तो प्रश्न नव्हता, एक शंखनाद होता.
“युद्ध खरंच संपलं का?” अर्जुनाचा प्रश्न स्वतःलाही होता आणि कृष्णालाही होता.
“युद्ध कधी संपतं का?” कृष्णाच्या प्रश्नातच उत्तर होते. अर्जुनाच्या हातातील धारदार शरअग्रावर त्याची नजर होती. घोड्यांच्या कपाळावर हात फिरवून तो गोपाळ पार्थाच्या समोर येऊन बसला. अर्जुन सैलावला.
“तू करतो आहेस ते बरोबरच आहे कुंतीपुत्रा. युद्ध कधीही संपत नसतं. कुठलंच युद्ध शेवटचं नसतं. जय आणि पराजय अंतिम नसतो. राजकारणाच्या एका सांध्यावर युद्ध होतं आणि तो सांधा बदलतो. राजकारण तसंच पुढे चालू राहतं. युद्ध म्हणजे राजकारणाचा कुरकुरलेला सांधा.. तो सांधा बदलताना झालेला खडखडाट. युद्ध हा राजकारणाचा पर्याय नाही, युद्ध हे अंतिम राजकारणही नाही पण तरीही युद्ध अनावश्यक नाही.”
आपली दोन्ही कोपरं आपल्या गुढग्यांवर टेकवत, दोन्ही हातांच्या ओंजळीत आपला चेहरा ठेवत अर्जुन ऐकत राहिला. श्रीकृष्ण बोलत राहिले.
“हे काही शेवटचं युद्ध नाही आणि हे काही पहिलं युद्ध नव्हतं, हे पहिलं महायुद्धही नव्हतं. सहस्त्र वर्षांपूर्वी दशराज्ञ युद्धात तुझे पूर्वज पराभूत झाले आणि कुरुजंगलातून अजून पलीकडे निघून गेले. ज्यांनी हा पराभव केला त्या सुदासाचे वंशज काल ह्या युद्धात, कुरुक्षेत्रावर लढत होते.. कौरव काय नी पांडव काय, त्यांच्यासाठी तर ते कुरुवंशीच ना? दशराज्ञ युद्ध शेवटचं नव्हतं आणि हे कुरुक्षेत्रावरच युद्धही शेवटचं नसणार. राजकारणाचा सांधा बदलला, कुरकुरला की हिंसा होणार, युद्ध होणार आणि मग परत वरवर दिसणारी शांतता असणार. पावसाळ्यानंतर पाणी पाझरत राहते तशी रक्त वाहू न देणारी हिंसा पाझरत राहणार. शोषण होणार, अन्याय होणार, अपमान होणार. माणसांचे हट्ट आणि माणसांचेच नकार एकमेकांना भिडणार. जमीन पुन्हा पुन्हा तापणार आणि लाव्हा पुन्हा पुन्हा उकळणार..
कौरव संपले असतील पण त्यांच्या बाजूने लढलेले शेकडो राजे, त्यांचे वंशज, त्यांची प्रजा.. सगळे आजही जिवंत आहेत. ते युद्धातून निघून गेलेत पण ते कधीतरी परतून येतील. तुझ्या बाजूने लढले तेही परतून येतील. कदाचित त्यांचे पक्ष बदलतील कारण त्यांच्या लढायांची कारणं बदलतील. जग बदलेल, लोकं बदलतील पण युद्ध संपणार नाही, कायमचं थांबणार नाही.
म्हणून अर्जुना, बाणांची टोकं शोधून ठेव, घासून ठेव. लोकांना कळू दे की तुझ्या भात्यात अजूनही ब्रम्हास्त्र आहेत, शत्रूला आणि मित्रांनाही ठाऊक असू दे की तुझी तपश्चर्या अजून सुरूच आहे. ज्या जमिनीत लाव्हा असतो तिथे कोणी नांगर चालवत नाही, ज्वालामुखीच्या तोंडात कोणी भुयार खोदत नाही. तुझ्या पोटातला लाव्हा अजून विझला नाही हे जगाला ठाऊक असू दे,
पण त्याच बरोबर सतत ज्वालामुखीचे स्फोट घडवून स्वतःची राख करू नकोस. लोक म्हणतील युद्ध कर तेंव्हा कधीही लढू नकोस. युद्ध आणि शांतता, दोन्ही नेहमी तुझ्या अटींवर असू दे, शत्रूच्या नाही आणि मित्रांच्याही नाही. शत्रूचे प्रत्येक आव्हान स्वीकारायचे नसते आणि मित्रांच्या प्रत्येक ललकारीत आवाज द्यायचा नसतो. रण आणि रणांगण आपल्या सोयीचे आपल्या आवडीचे असावे. लढण्याची लालसा नसावी आणि भीतीही नसावी. शक्यतो आपल्याशी लढण्याची कुणाची हिंमतच होणार नाही इतकी तयारी कर. 
अजून एक कर, माझ्या द्वारकेसारखा ह्या हस्तिनापुरातून दशदिशांना व्यापार कर, जगाचा पैसा सांभाळण्यासाठी, वाढवण्यासाठी तुझ्या तिजोरीत येऊ दे. तुझा पैसा जगभर लोकांच्या कामी पडू दे. एकवेळ एकाच वंशाचे रक्त एकमेकांविरुद्ध उभे राहिल, पण एकाच रंगाचा पैसा कधीही एकमेकांशी लढत नाही. असा पैसा वाढव. त्यातून चतुरंग सेना घडव. लक्ष्मीच्या हातात तराजू असू दे आणि मागे गजांत सेनाही असू दे. अर्जुना, युद्धाची सज्जता ठेव आणि तितकीच प्रामाणिक, तितकीच अस्सल युद्ध टाळण्याची इच्छाही ठेव.
युद्ध कर, क्षमाही कर कारण तुझ्याकडे फारसा पर्याय नाही, पार्था हे जग जितकं न्याय केल्याने पुढे जातं त्यापेक्षा जास्त सहन करण्यामुळे टिकून राहतं, अनेकदा सहन करून जिंकलेली शांतता लढून मिळवलेल्या न्यायापेक्षा सोयीस्कर असते, मानवी असते. ”
पार्थाच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून श्रीकृष्ण उठत होते तेंव्हा त्यांचे लक्ष दूर, फार दूर असलेल्या एका प्रचंड वृक्षाच्या बुंध्याशी गेले. खांदे पडलेला एक योद्धा तिथे कसलातरी विधी करत होता. त्याच्या हालचालीत एक अधीर निश्चय होता, त्याच्या चालण्यात एक बेपर्वा सूड होता.
बहुदा तो अश्वत्थामा होता.

-शैलेंद्र कवाडे.
Photo Credit - Meta AI


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...