एकदा अकबर बादशहाने बिरबल कडे एक कोंबडा दिला, आणि सांगितले, "हा कोंबडा तू घेऊन जा. एक महिना सांभाळ. आणि एका महिन्याने हा कोंबडा परत घेऊन ये. जेव्हा तू हा कोंबडा आणशील, तेव्हा या कोंबड्याची झुंज दरबारातील शाही कोंबड्याशी होणार आहे. यात तुझा कोंबडा हरला नाही पाहिजे. पण अट मात्र एकाच गोष्टीची आहे, झुंज शिकण्यासाठी या कोंबड्याच्या संपर्कात कोणताही कोंबडा किंवा कोंबडी येऊ द्यायची नाही."
हे खूप अवघड काम होतं. कोणताही कोंबडा किंवा कोंबडी या कोंबड्याच्या संपर्कात न येऊ देता त्याला झुंज शिकवणे. बिरबलाने त्या कोंबड्याला घेतले. आणि आपल्या घरी नेले. एका महिन्याने तो आपल्या कोंबड्याला घेऊन आला. आता झुंज होणार होती. सर्व लोक ही झुंज पाहण्यासाठी दरबारात जमा झाले होते.
बिरबलचा कोंबडा आणि अकबरचा कोंबडा अशी झुंज सुरू झाली. बिरबलचा कोंबडा अकबरच्या कोंबड्या बरोबर असा काही झुंज देत होता की, अकबरचा कोंबडा खूपच कमी पडला. बिरबलच्या कोंबड्याचा प्रत्येक घाव शाही कोंबड्यावर असा काही लागत होता की, तो कोंबडा पूर्णपणे गडबडून गेला. परंतु बिरबलचा कोंबडा एवढी चांगली झुंज कशी काय देऊ शकतो? हा प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात येत होता. कारण झुंज शिकण्यासाठी कोणताही कोंबडा किंवा कोंबडी त्या कोंबड्याच्या संपर्कात नव्हती, तरी देखील एवढी चांगली झुंज तो कसा काय शिकला. अखेरीस बिरबलचा कोंबडा हा वरचढ ठरला, त्यामुळे बिरबलचा कोंबडा झुंजी मध्ये जिंकला आणि अकबरचा कोंबडा रक्तबंबाळ होऊन पळून गेला.
त्यानंतर अकबराने बिरबलला विचारले, "बिरबल हा कोंबडा कोणताही कोंबडा किंवा कोंबडी यांच्या संपर्कात न येता, एवढी तरबेज झुंज कसा काय शिकला?"
बिरबल म्हणाला, "महाराज तुम्ही मला कोंबडा दिला आणि सांगितलेत की या कोंबड्याच्या संपर्कात कोणताही कोंबडा किंवा कोंबडी येऊ न येता झुंज शिकला पाहिजे. मी या कोंबड्याला घरी नेले, आणि एका खोलीत कोंडून ठेवले, आणि त्या खोलीला चारी बाजूने आरसे बसवून घेतले. या कोंबड्याने आपल्या स्वतःचे प्रतिबिंब त्या आरशात पाहिले, तेव्हा तो खवळून उठला आणि झुंज शिकला. तो स्वतःशी झुंजत होता. पण त्याला वाटायचे, तो दुसऱ्या कोंबड्या बरोबर झुंजत आहे. रक्तबंबाळ होई पर्यंत तो स्वतःच्या प्रतिमेशी रोजच झुंजत होता. आणि आज हे त्याचेच प्रतीक आहे, तो इतका चांगला झुंज खेळला."
आयुष्यात जो स्वतःशीश स्पर्धा करतो तो नेहमी यशस्वी होतो. आपली स्पर्धा ही खरं आपल्याशीच असते. गेल्या वर्षी माझ्याकडे किती ज्ञान होतं आणि यावर्षी त्या ज्ञानात किती भर पडली, या प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा आपण आपल्या मनात करायला पाहिजे. माझ्याकडे कोणते गुण आहेत, आणखी कोणते गुण कमी आहेत, ते अंगीकार करणे आणि कोणते दुर्गुण आहेत, ते दूर करणे, हे झुंज स्वतः माणूस स्वतःशीच करून आपली प्रगती करू शकतो. आणि तोच खरा माणूस असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा