शनिवार, ३१ मे, २०२५

1931. दूधभात

        घरात स्मशान शांतता पसरली होती. ओट्यावर कोपऱ्यात बसलेल्या अमोलचें मुसमुसणे तेवढे ऐकू येत होते. त्याचे आजोबा आराम खुर्चीत बसून अधूनमधून "श्रीराम श्रीराम 'म्हणत होते. आतल्या खोलीतून अमोलच्या आईचा भांडी धुण्याचा आवाज तेवढा आवाज अधूनमधून ऐकू येत होता, बाकी सारे शांत.
ही शांतता मोडत आई पदराला हात पुसत बाहेर आली आणि कोपऱ्यात मुसमुसणाऱ्या अमोलकडे पहात म्हणाली
"अम्या, हयाच्या पुढे गोठ्यात वासरू, रेडकू आणू नको हां, तुका सांगन ठेवतंय, माका आता झेपणा नाय तेंचा शेण मूत काढुक, माजा पण आता वय झाला '.
"पण आई, देवान असा काय केला, आमचो गोठो रिकामो केलो, चार महिन्यात चार गाई, दोन वासरा मारून टाकल्यानं '
तेवढ्यात आजोबा उदगारले " देवाक दोष देव नको रे, एकदा गळती सुरु झाली की झाली, रोग पसारलो काय थांबणा नाय, तिठ्या वरच्या मांजरेकराच्या गोठ्यात पण हीच तरा, तेची पण चार गुरा मेली चार महिन्यात.
"पण आमचा मैना काय हुशार होता हो, काळो रंग, तोंडार पांढरा बिस्कीटसारखो डाग, कान नुसते आवाज ऐकत, माजो आवाज इलो काय काय मागचे खूर जमिनीत घुसवी आणि दाव्यावर हिसके मारी '.
तेवढ्यात आई म्हणाली " खरंच मैना म्हणजे अस्सल गाय, अशी गाय या गोठ्यात कधीच दिसाक नाय '.
आजोबा -तेका दृष्ट लागली त्या सावतीनीची, जाता येता तेच्या पाठीर थापटा मारी, माका पण अशी गाय होई म्हणून सांगत रवा.
अमोल - पण आजोबा, सहा महिन्यात आमचो भरलेलो गोठो रिकामो झालो हो, बाबा व्हते तेवा बारा गुरा होती. बाबा गेले आणि वर्षात सहा वर आकडो इलो. मी किती काळजी घेय सगळ्यांची.
आजोबा - होय बाबा, रमेश गेलो तरी तू त्याचाच सारखी काळजी घेस, डॉक्टरक बोलावून कसली कसली इंजेकशन देस तेंका, शेतात मको लावलास, गुरंका हिरव्या खाऊक होया म्हणून, तेंका ओढ्यार नेऊन आंघोळ घालीस, कुंडो पेंड कसलीच कमी नाय केलंस, पण इतक्या करून..
अमोल -बाबा काय म्हणतीत,? हय माझ्या झिलाक गुरंका सांभाळूक जमला नाय, हो पण इतर मुलांसारखो मोबाईल बघित बसलो.
आजोबा -नाय बाबा नाय, तुझी काय चूक नाय, आता नवीन पोरा बघुचे तेवा मोबाईल मधी असतात पण तू गोठ्यात गुरा भोवती.
आई - म्हणून मी सांगताय, तू अभ्यासर लक्ष दी, खायतरी नोकरीक लाग, हय गाई गुरंचा वेड बरा नाय बाबा, तुज्या बाबान पण ह्याच केलान, आजोबानी ह्याच केल्यानी. शेती बागायती आणि गाई म्हशी.
आजोबा - म्हणून या घरात भरपूर दूधदुभाता कायम होता, माझी मुला, नातू हय गाईचा दूध पिऊन मोठे झाले.
अमोलच्या आजोबांना गुरांची आवड, गोठ्यात नेहेमी गाई, म्हशी, त्त्यांची वासरे असायची, मात्र गाईने किंवा म्हशीने पाडा जन्माला घातला तर तो त्याचे आईचे दूध पिणे थांबले की कुणातरी शेतकऱ्याला देऊन टाकीत, त्याचे पैसे कधी घेत नसतं, फक्त तो शेतकरी त्याचे खाण्याचे हाल करणार नाही, अशालाच तो देत.
त्यांची ही गाई गुरांची आवड त्यांच्या मुलात म्हणजे अमोलच्या बाबांना पण लागली. ते विदयुत खात्यात नोकरीं करत आणि आपली गाईम्हशीची आवड पण सांभाळत. अमोलची आई बालवाडी शिक्षिका होती, गावातल्या गावात नोकरीं होती.
अमोल त्त्यांचा एकच मुलगा, अभ्यासात हुशार पण इतर त्याच्या वयाच्या मुलांसारखा टी व्ही, मोबाईल मध्ये अडकला नाही, तर गोठ्यात रमला, वेळ मिळेल तेंव्हा तो गाईच्या वासरा बरोबर खेळत राहायचा, त्याना मळ्यात फिरवून आणायचा,चारा घालायचा, त्यांना ओढ्यावर नेऊन धुवून काढायचा.
अमोलचे बाबा स्कुटर अपघातात गेले आणि कुटुंबाला मोठा झटका बसला. आता कुटुंबात आजोबा, अमोलची आई आणि अमोल ही माणसे राहिली.
   गोठ्यात बारा गुरे होती, आजोबानी त्यातली सहा गुरे कमी केली म्हणजे आपल्या लांबच्या नातेवाईकांना देऊन टाकली. आता दोन दुभत्या गाई आणि त्यांची चार वासरे. रोज दूध काढावे लागे, अमोलचे बाबा एवढी वर्षे दूध काढायचे. आता अमोलची आई आणि अमोल दूध काढायला शिकले.
  रोज सहा सात लिटर दूध येत होते, आपल्याला ठेऊन बाकी डेअरीला देत होते. शाळेतून आल्यावर अमोल मळ्यात भाजी लावू लागला, विहीर होतीच, त्या पाण्यावर वाली, मुळा, लाल भाजी, वांगी पिकवून तिठावरच्या हरमालकराच्या दुकानात ठेऊ लागला, भाजी हातोहत खपत होती.
पण गेले सहा महिने साडेसाती हात धुऊन मागे लागली होती, एक एक गाय नाहीतर तिचे वासरू मरू लागले, अमोलने कुडाळच्या सरकारी गुरांच्या डॉक्टर ना बोलावून आणले., त्याचे कडून उपचार करून घेतले, डॉक्टर नी सलाईन लावले, एन्टीबीओटीक दिली, इंजेकशन दिली पण काही उपयोग झाला नाही, शेवटी आज शेवटची गाय मेली आणि गोठा उजाड झाला.
अमोलचे घर शांत होते, पण अमोलच्या डोक्यात विचार सुरु होते, काही झाले तरी गोठा रिकामा ठेवायचा नाही, तसा ठेवला तर बाबा क्षमा करणार नाहीत, पण आईने निर्वाणीचे सांगितले आहें, गोठ्यात यापुढे गुरे नकोत... पण आजोबा आपल्याला साथ देतील, त्याना सुद्धा रिकामा गोठा पाहवणार नाही, अमोलच्या मनात आले,, आईने कितीही विरोध केला तरी पुन्हा गोठ्यात गाय आणायचीच, आई सुरवातीला चिडेल, शिव्या देईल पण तिला पण गोठा भरलेला पाहायचा आहें.
दुसऱ्या दिवशी अमोल सायकल घेऊन गोंधळ्यात पोहोचला. तेथे त्याच्या बाबाचा मित्र अहमद चाचाचें घर होते, अहमद चाचाचा गाई, बैल, म्हशी खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. कुठे दिसतील तेथून गुरे खरेदी करायची आणि गुरांच्या बाजारात विकायची. एखादे गोरू खपले नाही तर मडगावच्या खाटीक खान्यात विकायचे. अमोलचे बाबा बऱ्याच वेळा अमोलला घेऊन अहमद कडे येत, त्याच्याकडील गाई, म्हशी पहात, त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांचा अंदाज घेत. अमोलचे बाबा गेले तेंव्हा अहमदचाचा धाय मोकलून रडला होता.
आज जवळजवळ दोन वर्षांनी अमोल अहमदचाचा कडे आला होता. अहमदचाचा गुरांना पाणी पाजत होते. त्यांना गवत घालत होते. अमोलला पहाताच त्यांना आनंद झाला.
अहमदचाचा -आरे मेरे दोस्त का बच्चा आया, बडा हो गया रे तू? कितनी में पढताहौ?
अमोल - बारावी मध्ये.
अहमदचाचा - माँ कैसी है 'तेरी, और आजोबा?
अमोल - वो ठीक है मगर...
अहमदचाचा - मगर क्या रे?कुछ ताखालीप है क्या?
अमोल - चाचा, मेरे साब गाय, वासरू साब मर गये, कुछ भी राहा नयी
अहमदचाचा -ये बहुत बुरी खबर है,, मगर ऐसा कभी कभी होता है,, जो हो गया सॊ हो गया, अभी मेरे पास जो गाय, भैस है, उसमेसे तुम्हे जो चाहोये वो लके जावं, पैसा नाही देणेका
अमोल - चाचा, मैं ले जाऊंगा मगर थोडे दिन बात, मगर फुकटका नहीं, पैसे देके ले जाऊंगा.
अहमदचाचा - आरे मेरे दोस् का बच्चा ना तू, तेरेसे कैसे पैसा लू? तोबा तोबा...
अमोल - ते त्यावेळी बघूया हो.
अमोल अहमदचाच्या गुरात मिसळला एक एक गाय, वासरू निरखून पाहू लागला, अहमदचाचा त्याचाकडे कौतुकाने पाहत होते, मनात म्हणत होते 'रमेशसे उस्का बच्चा जादा हुशार है.
अमोल सर्व गुरांना निरखीत होता, त्याला एक गाभण जर्सी गाय दिसली, त्या बरोबर अमोल म्हणाला
अमोल - चाचा, ये तो गाभण गाय है ना, इसको किसीने लिया नाही..
अहमदचाचा - वो बुढी हो गयी ना इसलिये कोई लेता नही..
अमोल - मगर चाचा, ये तो गाभण है ना, इसको क त्त ल खानेमे देनेका नही हा..
अहमदचाचा - ठीक है, तेरे खातीर नहीं दूंगा..
अमोल - यदी इसको पाडी हुई तो मैं ले जाऊंगा..... मगर दो मैना बाद, अभी मेरी परीक्षा है, किसीको देना नही.
अहमदचाचा -हा रे बच्चा mai किसीको नही दूंगा.
अमोल अभ्यासाला लागला, तो तसा हुशार पण गोठ्यात गाई म्हशी नाहीत याची त्याला आणि त्याच्या आजोबांना खन्त वाटतं होती, कित्येक वर्षा नंतर दुसऱ्या कडून दूध आणावे लागत होत.
दोन महिने अमोलने चांगला अभ्यास केला, शेवटचा पेपर दिला आणि त्याच दिवशी तो अहमदचाचाकडे गेला.
चाचा बाहेर चालले होते, त्याला पहाताच ते मागे आले आणि त्या म्हाताऱ्या जर्सी गाईच्या शेजारी उभ्या असलेल्या पाडी कडे त्यांनी बोट दाखवले, अमोल धावत त्या पाडीकडे गेला आणि त्याने त्या पाडीला उचलून घेतले.
अमोल - चाचा, मै इसको लेके जाता हू, कितना पैसा बोलो.
चाचा - तू तो रमेशका बेटा, तुमसे क्या लेनेका..
अमोल -चाचा, ऐसा नहीं, पैसा तो लेनाही पडेगा, नहीं तो मै नहीं लेके जाता.
चाचा - तुमसे क्या बताऊं, जो चाहे वो देना..
ठीक आहें, म्हणत सायकल वळवून अमोल आजोबा कडे गेला आणि एक हजार रुपये घेऊन आला.
दोन्ही हाताने त्या वासराचे चारही पाय पकडून छातीकडे धरून अमोलने वासराला घरी आणले. आजोबा ना कल्पना होतीच, त्यामुळे ते खळ्यात उभे राहून वाट पहात होते.
छातीकडे धरून आणलेले ते वासरू आजोबानी चाचपून पाहिले.चांगल्या जातींचे वासरू असल्याने त्यांनी खुशीने मान हालवली.
आई शाळेत गेली होती, ती चिडणार हें अमोलला माहित होते, त्याने त्या वासराला ओट्यावर ठेवले, घरातून बाटलीतून पाणी आणून त्या वासराची मान दोन्ही मांड्यामध्ये पकडून त्याला पाणी पाजले.
आजोबानी वासरासाठी चांगले गाईच्या दुधाचा रतीब लावायला सांगितला.सुधा गावंडे कडे जाऊन रोज दोन लिटर दुधाची व्यवस्था अमोलने केली.पाण्यासारखे दूध पण तो बाटलीने पाजू लागला.
  हळूहळू वासरू मोठ होऊ लागलं, आता सर्वाना त्याचा लळा लागला, सुरवातीला चिडलेली आई सुद्धा त्याला खेळवू लागली. आता वासरू अमोलचा, आजोबांचा, आईचा आवाज ओळखु लागलं.
वासरू दिढ वर्षाचं झाल, तस अमोल तिला इतर गुरा मध्ये मिसळू लागला, ते आता इतर गुराबरोबर खेळू लागलं. 
    दोन वर्षात वासराची गाय झाली, जर्सी जातीची गाय असल्याने भली उंच झाली, देखणी दिसायला लागली, रोज हिरवा चारा, पेंड आणि व्हिटॅमिन्स च्या गोळया अमोल तिला घालीत होता.
आणि गाय गाभण राहिली, अमोलच्या आईचे लक्ष होतेच, आजोबा तिच्या खाण्याकडे लक्ष ठेऊन होते.
अमोलचे सकाळचे कॉलेज असे, त्यामुळे गाईने आपण घरी असताना व्यावे अशी त्याची इच्छा होती. एका शनिवारी गाय सकाळपासून कणहत होती.
अमोलची आई लगबगिने घरी आली, तेव्हड्यात गोठ्यातील गाय हंबरू लागली, आईने अमोलला फोन करून बोलावून घेतले, अमोलची सायकल खळ्यात आली एव्हड्यात गाईला वासरू झाले, आई, अमोल पुढे झाले.
     अमोलने अंदाज घेतला, गाईने पाडी घातली होती, त्याने ओरडून आजोबांना ही बातमी सांगितली, आजोबा काठी टेकत टेकत गोठ्याकडे आले आणि त्या वजनदार वासराकडे पहात राहिले.
आजोबानी तोंडाने " श्रीराम श्रीराम 'म्हणत देवाला हात जोडले, आई आंनदीत झाली, पाडी झाली म्हणजे गोठ्यात अजून भर पडणार होती. अमोलला आता वेळ नव्हता, त्याने नवीन चाकू केंव्हा पासून आणून ठेवला होता, त्याने चाकूने गायीची नाळ तोडली. वासराला अलग केल आणि त्याला जुनी चादर घालून झोपवलं. तो पर्यत आईने कढत पाणी तयार ठेवले होते, त्या पाण्याने तिने अमोलच्या मदतीने गाईला आंघोळ घातली.
सायंकाळी अमोलने वासराला दुधाला सोडल. वासराचे पूर्ण पोट भरून सुद्धा गाईच्या आचलातून दूध ठिबकत होत.
  रात्री अमोलने पाडीला बाटलीने तिची मान दोन्ही मांड्यात घेऊन पाणी पाजलं.
दुसऱ्या दिवशी आई शाळेत गेली तसा अमोल गाईच्या आचलाजवळ बसला, सोबत मोठा तांब्या घेतला, अचळाच्या एका बोंबाला हात लाऊन त्याने तो पाण्याने धुऊन घेतला आणि तो दूध काढू लागला, एका मिनिटात त्याचा तांब्या दुधाने भरला, तो घरात गेला आणि मोठी पातेली आणली आणि त्याने तो दूध काढायला बसला, एक बोंब ओढता ओढता त्याची पातेली भरली. परत तो घरात गेला, जाताना आजोबांना बोलावून घेतले, आता त्याने परत तोच बोंब ओढू लागला, दोन बोंब ओढून झाले नाहीत तो पर्यत बादली दुधाने भरली.
आजोबा कौतुकाने दुधाकडे पहात होते, त्यानी खूण केली तशी अमोलने दूध काढायचे थाम्बवले आणि पाडीला दुधाला सोडले.
एवढे बदलीभर दूध दोन वर्षानंतर घरात येत होते, त्या दुधाचा खरवस अख्या वाडीतल्या प्रत्येक घराने खाल्ला.
अमोलच्या घरात आता दुधाचा महापूर आला असे म्हंटले तर चुकीचे ठरू नये, ती जर्सी गाय दोन वेळेस मिळून सतरा अठरा लिटर दूध देत होती. तरी अमोल किंवा त्याची आई आचलतला एक बोंब वासरासाठी ठेवत होते.
  दोन वर्षांनी ते वासरू गाय झाली आणि एकाच वेळी एक महिन्याच्या अंतराने दोन्ही व्यायल्या. योगायोग म्हणजे दोघानीं पाड्या घातल्या. आणि दोन वर्षांनी त्या गोठ्यात चार जर्सी गायी झाल्या.
आता सतत अमोलच्या घरात दूधदुभते असे, रोज कमीतकमी 20 ते 25 लिटर दूध डेअरी ला जात होते. मध्ये मध्ये पाडा पण जन्मत होता, पण अमोल पाडा कुणातरी शेतकऱ्याला देत असे.
अमोल ग्रॅज्युएट झाला, B. Ed झाला आणि पाच किलोमीटर वरील शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागला. आजोबा आता खूपच म्हातारे झाले होते, त्यामुळे जास्त वेळ झोपून असत. अमोलच्या आईने नोकरीं सोडली होती, त्यामुळे ती घरी राहून गाईंची काळजी घेत होती.
       आता अमोलच्या लग्नाचा विषय घरात बोलला जाऊ लागला होता, विशेषतः आजोबा आल्या गेल्याला अमोलसाठी मुलगी पहायला सांगत होते, अमोलची अट होती, मुलगी शेतकऱ्याची मुलगी हवी, तिला गाई गुरांची आवड हवी, गाईचे शेण काढायला तिला लाज वाटता नये.
    सुदैवाने खानोलीच्या प्रभू ची मुलगी हवी तशी होती, मुलगी बारावी शिकलेली होतीच शिवाय माड बागायती वाल्याची मुलगी होती, त्यांच्या घरात गाई बैल होते.
 नोव्हेंबर मध्ये अमोलचे लग्न झाले, दूध काढण्यासाठी अजून एक घरातली बाई मिळाली. आता गोठ्यात आठ गाई आणि दोन वासरे होती. रोज भरपूर दूध घरात येत होते, घरात दूधची रेलचेल होऊन डेअरी ला जात होते.
आजोबा आता अगदीच थकले होते, एक वेळ थोडा दूधभात खात होते, आता त्यांना पणतु बघायची घाई झाली होती.
आणि अपेक्षित बातमी आलीच, अमोलच्या पत्नीला दिवस गेले. तिला मुलगा झाला, आजोबा आंनदीत झाले. आता थोडे थोडे उठून बसू लागले, परत "श्रीराम श्रीराम ' म्हणु लागले.
अमोलचा मुलगा घरच्या गाईचे दूध पितो याचा आनंद त्यांना होता. अमोलचा मुलगा हळूहळू वळत होता, काही दिवसांनी ढोपराने पुढे जायला लागला.
अचानक आजोबांची तब्येत बिघडली, सकाळी ते उठेनात. कुडाळच्या डॉ सवदात्तीना अमोलने आणले. डॉ आले, त्यानी तपासले, ब्लड प्रेशर खाली आले होते. डॉ नी इंजेकशन दिले, सलाईन लावले. दोन तासानंतर आजोबा शुद्धीवर आले. डॉ सवदात्ती बसूनच होते. आजोबांचे हें डॉक्टर नेहेमीचे. डॉ आजोबांना हसत हसत म्हणाले
"आजोबा, गोळया चुकवू नका, नशीब मला वेळेत कळलं, नाहीतर वर जाण्याची वेळ आलेली '.
आजोबा डॉक्टर ना म्हणाले " डॉक्टर काळजी करू नका, जो पर्यत माझो पणतु घरच्या गाईचो दूधभात खाना नाय, तो पर्यत मी वर जायचंय नाय '. डॉक्टर हसत हसत निघून गेले.
  औषधं घेऊन आजोबा थोडे थोडे सावरत होते.
एक दिवस अमोलच्या आई च्या मनात आले, नातवाला दूधभात भरवूया. जेवतो काय पाहूया. तिने नुकतेच काढलेले दूध गरम गरम भातात मिसळले आणि नातवंच्या तोंडात घास भरवला आणि नातवाने तो गिळला सुद्धा. आजीला खुप आनंद झाला तिने आजोबांना ओरडून सांगितलं
"अहो आज बाळ दूधभात जेवलो, अगदी सगळो भात संपवल्यानं.''
आजोबानी ते ऐकले आणि "श्रीराम श्रीराम'' म्हणत समाधानाने प्राण सोडला.
                
प्रदीप केळुस्कर 9422381299/9307521152

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...