शुक्रवार, २३ मे, २०२५

1917. पुरोहित नवरा नको गं बाई

      एक आई आणि तिच्या मुलीमधील संवाद - " अगं ऐक ना..एक अतिशय छान स्थळ आहे, मुलगा दिसायला नेटका आहे. मिळकत छान आहे,स्वतःचे घर आहे, गाडी आहे, संस्कारित आहे,निर्व्यसनी आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याच गावातला आहे."  आईच्या ह्या वाक्यावर मुलगी खुश होऊन म्हणाली.. " हो का!! बघू बघू..छान आहे माहिती..अगदी आपल्याला हवं तसं स्थळ.. मला बघू माहिती.. "  असे म्हणत आईच्या हातातील मोबाईल ओढून घेत ती 30 वर्षीय मुलगी (बाई) स्थळाची माहिती वाचू लागली.. आणि वाचता वाचता लगेच हिरमुसली.. "आई.. तुला कसं कळत नाही गं ..तू नीट वाचत नाहीस का माहिती.. अगं हा मुलगा "पुरोहित" आहे..हे स्थळ तू मला कसं काय सुचवतेस.. !!!! ".......
       असे संवाद गेली अनेक वर्षं अनेक ब्राह्मण कुटुंबात घडले असतील..घडत असतील.. घडतील.. का नकोय मुलींना पुरोहित नवरा ??? पौरोहित्य हा व्यवसाय त्यांना कमी दर्जाचा वाटतोय का ? ? पुरोहिताशी लग्न म्हणजे खूप बंधनं, पोशाखाची बंधनं, बाहेर हॉटेल मध्ये खाण्याची बंधनं,घरचे धार्मिक वातावरण, वीकेंडला आउटिंग नाही, कॉफी प्यायला जाणं नाही, सिनेमा तरी बघत असतील का?, नॉर्मल टीशर्ट,शर्ट घालत असतील का? आपली काही हौसमौज होईल का? असे अनेक विचार मुलींच्या मनात येत असतील .. 
        त्या सगळ्या मैत्रिणींसाठी हे लिहायचा प्रपंच आहे..मुलींनो एक लक्षात घ्या की पुरोहित हा एक "मनुष्य प्राणी" आहे.. त्यालाही भूक, तहान, हौसमौज, करमणूक, विरंगुळा हे सगळे विषय इतरांप्रमाणेच आहेत .. पूर्वीसारखा "कर्मठ ब्राह्मण" आता राहिला नाही.. 'सदाचरण, धर्माचरण..पण तेही काळाला अनुसरून..' हे सध्याच्या पुरोहिताचे तत्त्व आहे.. "पुरोहीताशी लग्न म्हणजे  बंधनं " या विषयीचे काही मुद्दे -
१) पोशाख - या व्यवसायातील मुलाशी लग्न केले तर आपल्याला मनासारखे कपडे घालता येणार नाहीत असे वाटत असेल.. पण प्रसंगानुरूप योग्य पोशाख करणे हे तुम्ही पुरोहिताची बायको असा किंवा असू नका सर्वांसाठीच आहे असं मला वाटतं..अनेक गुरुजींच्या बायका एरवी पंजाबी ड्रेस घालतात आणि प्रसंगानुरूप साडी, नऊवारी साडी देखील नेसतात.. 
२) धार्मिक वातावरण - पौरोहित्य व्यवसाय स्वीकारल्यानंतर त्या व्यवसायाशी निगडीत वातावरण असणार हे गृहीत आहे.. सामान्य लोकांकडे वर्षातून 4 वेळा धार्मिक कार्यक्रम होत असतील तर पुरोहितांच्या घरी 6 वेळा होत असतील.. त्यात वाईट काय आहे? झाला तर फायदाच .. 
३) परंपरा - धर्मशास्त्रानुसार चालत आलेल्या अनेक परंपरांचे जतन पुरोहितांच्या घरी होते..  तुळशीला पाणी घालणे, परवचा म्हंटणे, दारात रांगोळी काढणे, वैश्वदेव करणे, संध्या करणे या दैनंदिन गोष्टींमध्ये सुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि त्यापासून होणारे अनेक फायदेही आहेत.. हिंदू धर्मातील सण आणि त्या त्या सणांशी निगडीत परंपरांमागे वैज्ञानिक कारणे आहेत.. त्यांचे जतन प्रत्येक घरात होणे आवश्यक आहे खरे.. 
४) हॉटेलिंग - पूर्वी अनेक पुरोहित परान्न घेत नसत.. हॉटेलिंग दूरच.. पण हल्ली तरुण पिढीतील अनेक गुरुजी हॉटेल मध्ये जातात, कॉफी पितात, जेवतात.. काही गुरुजी तर असे बघितले आहेत जे स्वतःची बंधनं असल्यामुळे हॉटेल मध्ये खात नाहीत पण आपल्या बायको, मुलांना घेऊन जातात आणि त्यांना खाऊ घालतात.. 
५) स्वपोशाख - अनेक गुरुजी कायम धोतर - उपरणे हा पोशाख करणारे आहेत..तो पारंपारिक पोशाख छान आहेच..आजकाल लग्न समारंभात वर  हा पोशाख करताना दिसतो.. हल्लीचे तरुण गुरुजी व्यवसाय करताना पारंपरिक पोशाख आणि इतर वेळी शर्ट, पँट, जीन्स, टीशर्ट असाही पोशाख करतात.. 
६) लाज - अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पौरोहित्य व्यवसायाची मुलींना लाज वाटते.. कमीपणा वाटतो.. ते काम कमी दर्जाचे वाटते.. अहो जो मनुष्य तत्त्वज्ञानाचा अभ्यासक आहे, जो परमेश्वराच्या इतक्या जवळ आहे,जो इतकी उच्च प्रतीची धार्मिक अनुष्ठानं समाजासाठी करतोय, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जो सर्व संस्कार समाजासाठी करतोय त्याची, त्याच्या व्यवसायाची लाज वाटावी ?? 
     मी स्वतः एका पुरोहीताची बायको आहे.. मी अतिशय नॉर्मल आयुष्य जगते.. मी फिरायला जाते, मी ट्रीपला जाते, मी कॉफी प्यायला जाते, मी कधी बाहेर जेवायला जाते, मी नोकरी करते, मी गाण्याचे कार्यक्रम करते, मला सण समारंभ साजरे करायला आवडतात, मी माझ्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करते, मी पंजाबी ड्रेस घालते, साडी नेसते, प्रसंगानुरूप नऊवारी नेसते.. नॉर्मल माणसासारखं नॉर्मल आयुष्य मी जगते.. काय फरक पडला मग नवरा पुरोहित असल्याचा ????  
       पडला... जेव्हा ९० वर्षांचे आजोबा मला " गुरुजींची बायको" म्हणून नमस्कार करतात ना तेव्हा फरक पडतो... तेव्हा त्या पदाचा, प्रतिष्ठेचा खरा अर्थ कळतो..  लाखोंचे पॅकेज असलेले नवरे एका बाजूला आणि इतकं आयुष्य सरलेल्या एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद देण्यासाठी आपण पात्र आहोत हा विचार दुसऱ्या बाजूला... ती पात्रता केवळ मी आज एका "पुरोहिताची बायको" असण्याने आली ...... 
      मी आशा करते की अनेक मुलींना या शब्दप्रपंचातून काहीतरी मिळेल.. त्या वेगळा विचार करतील.. मुलगा "पारखून" घ्या पण केवळ तो "पुरोहित" म्हणून नाकारू नका.. परमेश्वराला प्रार्थना आहे की लवकरच असा सुकाळ येईल जिथे मुलगी म्हणेल............
      " पुरोहित नवरा हवा गं बाई "
       
- सौ प्राजक्ता बेडेकर-भिडे, सातारा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...