अरुणाकाकी किचनमध्ये नाश्ता बनवत होत्या आणि सुरेशकाका नेहेमीप्रमाणे नारळीच्या झाडांना पाणी देत होते... मध्येच मोगरीच्या वेलाला भर देत होते, जाई फुलली होती. तिच्या कळ्या काढत होते..परडीत जास्वंदाची फुले पूजेसाठी तयार होती.
एवढ्यात गेट वाजले म्हणून अरुणाकाकीनी किचनच्या खिडकीतून बाहेर पाहिले.. विनया आत येत होती. तिला पहाताच त्या लगबगीने बाहेर आल्या.. विनया तोपर्यत बागेत काम करणाऱ्या सुरेशकाकाजवळ पोचली होती.
"बाबा.. जाईला खुप कळ्या आल्यात..रोज काढता ना?
"काढतो.. पण करणार काय एवढ्या फुलांचं? तू होतीस तेंव्हा गजरा करायचीस.. तू इथून गेलीस आणि ..
एवढ्यात अरुणाकाकी तिच्याजवळ आल्या..
"अग आज सकाळीच.. शाळेत नाही गेलीस..
"नाही.. आज रजा घेतली..
"का? सहजच ना?
"नाही आई.. आज माझ्या आणि अजितच्या लग्नाचा वाढदिवस ना?
म्हणूंन रजा घेतली आणि तुम्हाला भेटायला आले..
अरुणाकाकी खजिल झाल्या.. सुरेश काका पण गप्प झाले..
"हो ग.. कशी विसरले मी? माझ्या मुलाच्या लग्नाचा वाढदिवस विसरले?
आज पंधरा मे.. याच दिवशी तू अजितची बायको म्हणून या घरात आली होतीस.. अजित अकस्मात गेला आणि...
काकूंना रडू फुटले... अजितच्या आठवणीने त्या कासावीस झाल्या.. काका पण डोळे पुसू लागले... विनयाच्या हाताला धरून त्यानी तिला जवळ घेतले..
"वय झाल विनया.. माझ्या एकूलत्या एक मुलाच्या लग्नाची तारीख आम्ही विसरलो.
"आठवण रोजच असते ग.. अजित ऍक्सिडेंटमध्ये गेला तेंव्हाच आम्ही पांगळी झालो पण तू खरं तर सून आमची पण सुनेपेक्षा मुलगी जास्त.. तू आपलं दुःख बाजूला ठेऊन आम्हाला सांभाळस.. तुझ्याकडे पाहून आम्ही सावरलो..
"पण तुम्हीच माझं समीरशी लग्न ठरवलंत आई बाबा.. नाहीतर मी तुम्हाला सोडून गेलेच नसते..
अरुणाकाकूंनी विनयाच्या हाताला धरून आत घेतले.. घरात येता येता विनया बागेतील बागेतील झाडांकडे पहात होती.. घरात शिरल्या शिरल्या ती काकांना म्हणाली "बाबा.. गेल्या आठवड्यात मी आणि समीर एका नर्सरीत गेलो होतो.. छान छान रोपे होती हो तिथे.. मला तुमची आठवण झाली.. मी म्हंटल समीरला.. अजितच्या बाबांना ही रोपे फार आवडतील... समीर म्हणाला परत इकडे येऊ तेंव्हा त्या घरासाठी रोपे घेऊ..
"समीर बरा आहे ना ग.. तुझ्याशी बरा वागतो ना..
"होय बाबा.. खरच चांगला आहे तो.. त्याला तुमच्या दोघांची पण काळजी वाटतं असते.. तो म्हणत असतो जसे माझे आईबाबा तसेच अजितचे आईबाबा..
"बर झाल.. माझी पण जबाबदारी.. शेवटी तू नाही म्हणत असताना मी तुझं समीरशी लग्न लाऊन दिल.. तुझं आयुष्य आहे.. तू विधवा होऊन रहाणं आम्हाला नाही आवडायचं.. आमचा मुलगा अवेळी गेला त्यात तुझा काय दोष,?
अरुणाकाकूंनी पदर डोळ्याला लावला.. विनया किचनमध्ये आली आणि तिने तिच्या बॅगमधून डबा काढला..
"हा खरवस आई.. आमचा दूधवाला चीक आणतो.. माझी सासू आवडीने खरवस करते.. आज त्या म्हणाल्या.. तू त्या घरी जाते आहेस तर खरवस घेऊन जा...बाबांना खरवस आवडतो ना.. म्हणून डब्यात भरला.. तुम्ही काय केलय आज नाश्त्याला?
विनया गॅसजवळ गेली.. पातेलीत उप्पीट केलेलं होत अरुणाकाकूंनी.
"उप्पीट केलय.. असं म्हणून तिने सराईतपणे तीन डिशमध्ये उप्पीट घेतल... बरोबर डबा काढून शेव घेतला आणि तीनही डिशमधील उप्पीटावर पसरला आणि एक एक डिश अरुणाकाकी आणि सुरेशरावांच्या हातात दिली आणि एक आपण घेतली.
उप्पीट आणि खरवस खाताखाता सुरेशराव बोलू लागले "तू तिथे सुखात आहेस हे पाहून बरे वाटते.. नाहीतरी मी जगाविरुद्ध वागलेला.. विधवा सुनेचा हात दुसऱ्या तरुणाच्या हाती दिलेला.. अजूनही हे समाजात अमान्य आहे....तरुण विधवाना हळदीकुंकला बोलवत नाहीत.. पण आम्ही तुझं लग्न समीरशी करून दिलं..आम्ही दोघांनी कन्यादान केल..
पण तू सुखी व्हावंसं म्हणूनच..
मध्येच अरुणाकाकू बोलायला लागल्या,'अजित गेला आणि आम्ही कोसळलो.. पण तू आमची मुलगी झालीस.. तुझी शिक्षिकेची नोकरी संभाललीस आणि आम्हाला पण सावरलीस.. तू नसतीस आमच्यासोबत त्या काळात, तर आमचं काय झाल असत..
"तू होतीस म्हणून घरात जाग होती.
तू शाळेतून आल्यावर आम्हाला शाळेतील गमतीजमती सांगायचीस.. जेवण करून आम्हाला जेवायला घालायचीस..पुस्तके वाचून दाखवायचीस.. थोडक्यात तूच आमची म्हातारपणाची काठी होतीस..
डोळ्यात अश्रू जमा झालेली विनया बोलू लागली", होय बाबा..आई.. तशी मी पोरकी.. माझ्या मामाकडे मी रहात होते.. त्याना जड झाले होते.. आणि बाबा.. तुमच्या शाळेत नोकरीला लागले.. तुम्ही माझे हेडमास्तर.. माझे सासरे नव्हे बाबा झालात.
खरच, तुला शाळेत पाहिलं आणि लक्षात आलं, अशी आपली सून हवी.. अजितला पण आवडलीस तू.. आणि आमची सून झालीस नव्हे मुलगीच
'ते आठ महिने सुंदर होते... आम्ही दोघे आणि अजित आणि तू... आम्ही नातवंडाची वाट पहात होतो आणि.. खुप सोसलं..सहन केल.. तू जणू आमची मुलगी झालीस पण हळदीकुंकू आलं की मला जाणवायचं.. ही तरुण मुलगी आमच्यामुळे अडकलीय... नशिबाने माझा सहकारी जयवंत.. त्याचा मुलगा समीर.. माझ्या शब्दाबाहेर नाही गेला.. खुप चांगल झाल.. अनेकांसाठी हा धडा असेल.. अशीच तरुण विधवा मुलींची लग्ने व्हावीत..
विनयाने डिश उचलल्या आणि आणि तिने धुवायला सुरवात केली. अरुणाकाकी उठल्या
"अग अग थांब.. मी धुईन नंतर..
"काय झाल धुतलं तर? पूर्वी धूत नव्हते का मी?
"अग पूर्वी तू आमची सून होतीस आता त्त्यांची.. समीरची बायको.. अग, आज तुझा आणि अजितच्या लग्नाचा दिवस.. समीरने इकडे यायची परवानगी दिली?
"होय आई, उलट समीर बोलला.. आज अजितच्या आईवडिलांना आठवण येत असेल.. आज रजा घे आणि तिकडं जा.. त्यानेच सकाळी मला इथे सोडल आणि संध्याकाळी न्यायला येतो म्हणाला.. खरच ती सर्व चांगली माणसं आहेत अगदी तुमच्यासारखी.
अरुणा काकींना थोडं खटकलं.. विनयाने आपली तिच्या घरच्याशी तुलना केली... तिच्या घरच्यांना आपल्या एवढीच चांगली म्हंटली तिने.
सुरेशकाका बाजारात जाऊन येतो.. असे म्हणूंन बाहेर पडले आणि या दोघीच उरल्या.
मघापासून अरुणा काकीच लक्ष होत.. विनया पूर्वीपेक्षा जास्त तुकतुकीत दिसत होती.. त्याचं लक्ष तिच्या पोटाकडे होत.. सुरेशकाका बाहेर गेले हे पाहून त्यानी विनयाला विचारलं..
" दिवस गेलेत काय?
", होय..
'कितवा महिना..
'पाचवा..
'वाटलंच मला.. पहिलं बाळंतपण.. डोहाळे कडक लागले असतील..
'होय.. पाणी पोटात टिकतं नव्हतं..
'अग पण कळवायचस.. मी आणलं असत तुला माझ्याकडे.. तुला काय हवं काय नको हे पाहिलं असत.. कशाला अंगावर काढलंस?
'अंगावर नाही काढलं.. समीरच्या आईने म्हणजे माझ्या सासूने खुप केल माझ्यासाठी.. आई आपल्या मुलींसाठी करेल, तस सर्व केल.. अरुणा काकूच्या मनात परत कडवट चव आली.. त्याना वाटल होत.. ती म्हणेल..'तुमची खुप आठवण आली.. मला खुप त्रास झाला.. तुमच्याकडे यावं, असं वाटतं होत.... पण विनया च्या सासूने सर्व केल..जे मी केल असत.
"मग बाळंतपणासाठी इकडे ये.. मी सर्व पहाते..
"नको आई, माझ्या सासूने शेजारच्या हॉस्पिटलमध्ये नाव घातलंय माझं.. दर महिन्याला तपासणी असते ना.. आणि तुमच दोघांचं वय झालेलं.. तिकडे समीर आहे.. म्हणजे त्याची गाडी असते आणि समीरचे बाबा पण गाडी चालवतात.. शिवाय दोन बायका कामाला येतात तिकडे.. त्यामुळे.
"तस मी पण केल असत ग.. अजित च मूल असत तर केल असतंच ना..
'पण नकोच.. आता चार महिने त्याच डॉक्टरकडे जाते आहे ना..तेंव्हा तिकडेच..
"बर बाई.. सर्व काही व्यवस्थित होउदे.. पण काय लागलं तर आम्ही आहोत..
मग विनयाने जेवण करण्याचा ताबा घेतला.. बाबांना आवडते म्हणून बटाट्याची सुकी भाजी केली.. खीर आणि पुऱ्या. सर्वजण जेवली.. दुपारी अरुणाकाकी आणि विनया बाजूबाजूला झोपल्या तेंव्हा काकी तिला बाळंतपणात घायच्या काळजी बद्दल बोलत होत्या.. संध्याकाळी तिने बागेतील झाडें पाहिली.. फुले काढली.. एक गजरा काकींसाठी... एक आपणासाठी एक सासुसाठी.
काळोख पडायला आला आणि समीरच्या गाडीचा हॉर्न वाजायला लागला.. तेंव्हा तिने दोघांना नमस्कार केला आणि गाडीत बसली. ती दोघे तिला पोचवायला गाडीपर्यत गेलेली.
.. विनया गेली आणि अरुणाकाकी गप्पगप्प झाल्या.. कष्टी झाल्या.. काका काकीला म्हणाले
"काय झाल.. विनया गेली म्हणून गप्पगप्प झालीस की काय? एक लक्षात ठेव, आपण तीच लग्न करून दिलाय.. तिच्या भल्यासाठी.. शेवटी तीच आयुष्य आहे पुढे.. आपण तिला किती दिवस पुरणार?
'मी नाराज त्यासाठी नाही झाले.. तीच दुसरं लग्न करुंन दिलं, त्याचवेळी मनाची तयारी करून झाली... पण..
'पण काय?
", विनया गरोदर आहे पाच महिन्याची..
', अरे वा.. छानच.. म्हजे संसारात रमलेली दिसते..
'होय.. चांगलीच रमली ती.. पण त्यापुढे आपली पण आठवण नाही तिला..
'म्हणजे? आज मुद्दाम भेटायला आली.. राहिली पुरा दिवस...
'होय हो.. राहिली पुरा दिवस.. पण तिला तिच्या सासरचे मोठेपण.. समीर आसा आहे.. अशी काळजी घेतो.. सासू अशी.. आई सारखी जपते.. सासरे गाडी चालवतात.. हॉस्पिटल मध्ये न्यायला दोन गाड्या घरात.. वगैरे..
'अग खरं आहे ते.. तिचा सासरा म्हणजे माझा जुना सहकारी नाही का.. प्रेमळ आहे तो आणि हौशी..
'पण त्यामुळे तिला आपली काहीच गरज नाही.. हो.. म्हणून मला वाईट वाटते.. मला वाटतं ना.. सुनेचे लाड करावेत.. तिचे बाळंतपण काढावे.. ती बाळंतणीच आंघोळ.. बाळाची झबली टोपरी.. आपला अजित असता तर... मी केल असत ना सर्व.. आपलं नशीब फुटक.. तरुण मुलगा गेला आपला.. झाल ते झाल.. पण ही विनया.. मी म्हंटल.. माझ्याकडे ये.. मी करीन तुझं बाळंतपण.. तूझ्या आई सारखं.. तर ती म्हणाली... माझ्या सासूने सर्व व्यवस्था केली आहे.. हॉस्पिटल मध्ये नाव घातलं आहे.. आमच्या घरी दोन बायका कामाला आहेत.. शिवाय दोन गाड्या आहेत आमच्या... म्हणजे हिला आपली काहीच गरज नाही..
"अग ते बर नाही का? नाहीतरी तुला झेपतंय का..
अरुणाकाकी ताडकन उठल्या.."मला झेपत नाही? मला झेपणार नाही? माझ्या अजितच्या बायकोचे बाळंतपण मी नसतं केल? त्याच्या मुलाला मी आंघोळ नसती घातली? त्याची शी शु धुतलं नसतं मी?
"होय होय केल असतंस खरं.. पण ती अजितची बायको होती आता समीरची बायको आहे, हे लक्षात घे आणि शांत हो... विनया प्रसूत झाल्याची बातमी कळेल तेंव्हा बाळ बाळंतनीला पाहून ये.. बस.. आता हा विषय पुरे.
त्या दिवसापासून अरुणाकाकी गप्पगप्प असायच्या... फारश्या बोलायच्या नाहीत.. आपली रोजची कामे करायच्या आणि शून्यात पहात राहायच्या. काका रोजची कामे करत होते.. पण ते सुद्धा बायकोच्या काळजीने त्रासले होते..
दिवस जात होते.. जुलै. ऑगस्ट.. गेले..
सप्टेंबर महिन्याची एक सकाळ.. सकाळी सकाळी विनयाच्या सासऱ्यांचा फोन आला.. काकांनी तो घेतला..
"विनयाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे.. काल रात्रीपासून ब्लीडींग होते आहे.... रक्त चढवायचं आहे.. तिचा रक्तगट दुर्मिळ आहे.. त्यामुळे धावपळ..
"कोणता रक्तगट आहे तिचा? काळजीत पडलेल्या काकांनी विचारले..!
"AB +...
'AB+ हा शब्द ऐकताच काकांनी काकूंकडे पाहिलं.. काकू कपाटाकडे धावली.. कपाटातली फाईल बाहेर काढली.. काकूंचा रक्तगट होता AB+.
काकांनी रिक्षा ठरवली.. काकूंना घेऊन रिक्षा गेली रक्तपेढीकडे. पुन्हा एकदा रक्तगट तपासणी. आणि काकूच्या अंगातील एक बाटली रक्त जमा झाले. तीच रिक्षा घेऊन काका काकी हॉस्पिटल मध्ये धावले.. डॉक्टर रक्ताची वाट पहात होते..
दोन तासानंतर काकूंनी दिलेले रक्त हॉस्पिटल मध्ये पोचले.. ते विनयाच्या अंगात चढवले गेले.
दुसऱ्या दिवशी विनयाची प्रसूती झाली आणि मुलगा झाला.
विनयाच्या सासूने अरुणा काकींना घट्ट मिठी मारली. विनयाच्या सासऱ्यांनी सुरेशरावांना अलिंगन दिले.
दुसऱ्या दिवशी विनयाने डोळे उघडले.. तेंव्हा तिचा बाळ तिच्याबाजूला होता.. आणि समोर होता. समीर.. त्याचे आईबाबा आणि अरुणाकाकी आणि काका.
समीर म्हणाला 'विनया.. तुझी तब्येत नाजूक झाली होती आणि तुझा रक्तगट दुर्मिळ.. पण या काकूंनी धावपळ करून आपले रक्त दिले कारण त्त्यांचा आणि तुझा गट एकच होता.. काकूमुळे तू वाचलीस आणि हा बाळ वाचला..
डोळेभरून आलेली विनया बोलू लागली
"तुमचे रक्त माझ्या अंगात आले म्हणजे तुम्ही सासू नव्हे माझ्या आईच.. तुमची इच्छा होती.. माझ बाळंतपण काढावं.. माझ्या बाळाला आंघोळ घालावी.. त्याच्या दुपट्ट्याचा वास घयावा... आई, हॉस्पिटलमधून बाहेर पडून मी तुझ्याचकडे येणार.. तुझ्याकडून आंघोळ घालून घेणार आणि माझा बाळ तूझ्या घरच्या पाळण्यात झोपणार...
'हो ग हो... ये ये... मी वाट पहाते तुझी विनया आणि तूझ्या बाळाची.. माझ्या अंगात किती ताकत आली बघ..
विनयाला आणि बाळाला जवळ घेत अरुणाकाकी म्हणाली आणि बाकी सर्वजण डोळे पुसू लागले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा