मंगळवार, ६ मे, २०२५

1900. चायपे चर्चा

 " मृणाल... कसा वाटला मुलगा? "  
 "ताई... एकदम कसे सांगू? दिसायला तर चांगला आहे काळासावळा असला तरी.पण फारसा बोलला नाही."
"अग दडपण असेल त्याच्यावर. तुही कुठे बोलली फार"?
", हो गं ताई. एकदा असा अनुभव आल्यावर मलाही दडपण होतेच."
" झाले ते झाले. विसरून जायचे. तुझी काहीच चुकी नाही त्यात. ज्याच्याशी आधी ठरले  तो मुलगा चांगला it तला. भक्कम पगार.. दिसायला चांगला. सगळे छान होते.पण ..."
"हो गं. मलाही छान वाटले सगळे. पण तो अगदीच निरुत्साही... अबोल. कोण जाणे त्याच्या मनाविरुद्ध लग्न ठरले की काय? त्याला वीकएंड ला संध्याकाळी भेटायला बोलवावे तर अगदी नाईलाजाने आल्यासारखा यायचा. मी एकटीच बडबड करायची. तो ढिम्म.
        वाटायचे छान त्यांच्यासोबत भेळपुरी, पाणीपुरी खावी. Icecream खात खात मस्त रस्त्यावर फिरावे. हातात हात घेऊन भविष्याची स्वप्ने पाहावी. पण कसचे काय. याला कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही. सुरुवातीला वाटले असतो एखाद्याचा स्वभाव. नसेल बोलत. पण  ..
       इकडे तिकडे बघायची. लग्न ठरलेली जोडपी... किती उत्साही प्रफुलीत. मग अगदी ठरवून विचारले त्याला. मी पसंत नाही का? जबरदस्ती लग्न करायला करायला लावतायेत का? अगदी भांडली त्याच्याशी. पण तो तरीही थंडच.  मग ठरवलेच. नको अश्या माणसाशी लग्न. ह्याला काही भावभावनांचं नाही. आयुष्य कसे रेटणार अख्ख?"
"हो गं.  साखरपुडा झालेला असतांना लग्न मोडले म्हणजे कुजबूज होतेच. त्यामुळेच तर काही महिने स्थळ यायचेच बंद झाले होते. आले ते बिजवर, घटस्फोटीत.
अरे? माझी सुंदर, हुशार कुमारिका बहीण मी अशी कशी कोणाला देणार.?
पण मृणाल .. हा मुलगा चांगला आहे म्हणतात. कष्टाळू, धडपडया, पार्टनरशिपमध्ये एजन्सी घेतली आहे खतांची.आर्थिक परिस्थिती  चांगली आहेच पण अजूनही  प्रगती करेल तो...
तरीही घाईघाईत निर्णय नकोच.मी त्यांनाही हेच सांगितलं. 
तुम्ही दोघे स्वतंत्र भेटा कॉफीशॉप मध्ये. व्यवस्थित बोला आणि मगच निर्णय घ्या."
***--
आणि ते भेटले. ठरल्याप्रमाणे
 तिने हलका मेकअप केलेला, चेहऱ्यावर आत्मविश्वास.
"तुम्हांला ताईने सांगितले आहे ना सगळे? तुमचे , तुमच्या नातेवाईकांचे काही म्हणणे नाही ना?"
"नाही. नातेवाईक आहेतच किती? वडील लहानपणीच वारले. आईनेच सांभाळले. आत्या आणि तिच्या घरच्या लोकांनी साथ दिली. त्यामुळे बाकीच्या नातेवाईकांशी आणि त्यांच्या मतांशी काही घेणेदेणें नाही.आणि जे झाले त्यात तुमची काहीच चूक नाही. "
वेटर ऑर्डर घ्यायला येतो.
"कॉफी?" ती विचारते.
तो हसतो. "तुम्हांला माहित असेल तरी पुन्हा सांगतो. मी गावाकडे वाढलेला रांगडा माणूस. थोडी शेती आहे अजूनही तिथे. शहरात स्थायिक झालो असलो तरी खते व बी बियाण्याचे मार्केटिंग करतो. त्यामुळे दिवसभर खेड्यापाड्यात, शेतात फिरावे लागते. तिथे कुठली कॉफी? दिवसातून 8-10 कप चहाच होतो. भरपूर साखर असलेला. त्यामुळे कॉफी पितच नाही. तुम्हांला आवडेल का नाही माहित नाही अगदी कामावरून आलो की कपड्याला खतांचा वास येतो बऱ्याचदा. अर्थात मी आल्या आल्या अंघोळ करतोच.."
ती खुदकनं हसते. तोही हसतो.
"सांगायचे तात्पर्य.. मला तुमच्यापासून काही लपवायचे नाही. कारण त्या गोष्टीमुळेही एक दोन मुलींनी मला नकार दिला आहे.आणि अर्थातच नौकरी नसल्याने लवकर मुली सांगून आल्याचं नाही. आता त्यांना कोण समजवेल की मी नोकरी करणाऱ्यांपेक्षा जास्त कमावतो. थोडे स्पष्ट बोलतो, मला तुम्ही आवडलात. तुम्ही तुमचा निर्णय घ्या. होकार, नकार. अगदी आज आत्ताच सांगा असे नाही, take your own time."
ती त्याच्या डोळ्यात बघते. त्यात एक अधीरता.. अस्वस्थता. जणू ते म्हणतायेत त्याला तिला गमवायचे नाहीये.
ती अगदी सहजतेने पटकन म्हणते 
"मलाही तुम्ही आवडलात. आणि तुमचा प्रामाणिकपणाही.
वेटर दोन चहा आण. बादशाही.विलायची टाकून मलई मारून....."
"आणि भरपूर साखर " तो म्हणतो 
दोघेही मोकळेपणाने हसतात. 
दोघांनाही जाणवलेले असते की आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळालेला आहे.....आणि तो छान आहे....

 ©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार..    ✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...