शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

2369. हाच मुलाचा "बाप"

       सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस वैदेहीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज श्याम उशिराच घरी येणार होता. अन सुशांत त्याच्या मित्राकडेच रहाणार होता अभ्यासासाठी. काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघांना मिळून. म्हणजे रात्री दहा पर्यंत वैदेही एकटीच होती घरी. दुपारपासून कुठे कपाट आवर, कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा बसा काढला होता वैदेहीनं. पण आता फ़ारच कंटाळा यायला लागला होता तिला.स्वैपाक उरकला, डिशवॉशरही लावून झालं, आता मात्र ती पुरतीच वैतागली होती. गरमगरम वाफ़ाळत्या कॉफ़ीचा कप घेऊन ती व्हरांड्यात येऊन बसत नाही तोच बेल वाजली.
'आता या वेळी कोण आलं असेल बरं?'
मनाशी नवल करतच ती उठली. बघते तर दारात सुशांतच उभा होता.
'का रे, काय झालं?'
'अग स्कॉटच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. म्हणून तो अन त्याची आई गेलेत दवाखान्यात त्यांना घेऊन. मग घरीच आलो झालं. बाबाही उशिरा येणार आहेत ना ग?'
'हो ना रे. बरं झालं तू घरीच आलास ते. अगदी बोअर झाले होते बघ मी. ...'
सुशांत हलकेच हसला. गव्हाळ वर्णाचा नि भरपूर उंचीचा लेक असा हसला की वैदेही अगदी निरखून बघत असे त्याच्याकडे. 'मातृमुखी अन सदा सुखी' असं आई म्हणायची त्याची आठवण तिला अशा वेळी हटकून येई.
'ममा, भजी कर ना ग मस्तपैकी. बाबांना खूप आवडतात. अन बघ कशी अगदी 'भज्यांचीच हवा' आहे...'
'अरे लबाडा, बाबांचं नाव कशाला रे सांगतोस? तुला हवीत म्हण ना..'
'एकही बात है मदर इंडिया...'
अन वैदेहीबरोबर तो देखिल खळखळून हसला.
आंघोळ करून सुशांत आला तोवर पाऊस पडायला सुरुवात झाली होती. वैदेहीनं आधी श्यामची आवडती चटणी मिक्सरमधून काढली. भज्यांचं पीठ भिजवणार तोच बेलचा कर्कश्श आवाज पुन्हा घुमला.
'बघ रे राजा जरा... आज तुझे बाबाही लवकर आलेले दिसतात...'
वैदेहीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सुशांतनं दार उघडलंही होतं.
पण दारात श्याम नव्हताच. एक गौरवर्णी,मध्यम वयाचा माणूस उभा होता. डोळ्याला सोनेरी काड्यांचा चष्मा, फ़्रेंच कट दाढी नि किंचितसे घारे डोळे... अंगावरचे कपडे थोडे भिजलेले.
'येस..?'
सुशांतनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं.
अन बाहेर चमकलेल्या विजेच्या लोळाबरोबरच त्याच्या तोंडून सावकाश,कष्टानं आल्यासारखे शब्द आले..,
'यंग मॅन, आय एम युवर डॅडी...'
'सर, यू आर मिस्टेकन..' किन्वा 'यू आर इन द रॉन्ग हाऊस..' असं काहीतरी बोलायच्या विचारात असलेला सुशांत एकदम गप्प झाला.
बाहेर आलेल्या वैदेहीचा चेहरा पांढराफ़टक पडला होता. एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती स्तब्ध उभी होती. कुठल्याही क्षणी खाली कोसळेल अशी.
'आई,...'
गोंधळलेला सुशांत आळीपाळीनं एकदा वैदेहीकडे नि एकदा त्या अपरिचित व्यक्तीकडे बघत होता.
'कोण आहे हा माणूस? खुशाल आपला बाप आहे म्हणून सांगतोय. अन आई त्याला घरातून हाकलून लावायच्या ऐवजी इतकी सैरभैर का बरं झालीय?.'
त्याला काहीच कळत नव्हतं.
या द्विधा मनस्थितीतून त्याची सुटका त्या माणसानेच केली.
'आय एम सॉरी. मी फ़ोन करायला हवा होता आधी. कल्पना द्यायला हवी होती. वैदेहीला फ़ारच धक्का बसलेला दिसतोय माझ्या येण्याचा. निघतो मी...'
डोक्यावरची हॅट तिरकी बसवत तो भर पावसात भिजतच निघून गेला.
त्याच्या मागे धाडकन दार लावून घेत सुशांत वळला. वैदेहीला आधार देऊन त्यानं खुर्चीत बसवलं.
'ममा, काय प्रकरण आहे हे सारं? तू ओळखतेस का त्या माणसाला...?
सतरा अठरा वर्षांच्या, अजून तारुण्य अन बालपण या दोन्हीच्या उंबरठ्यावर घुटमळत असलेल्या मुलाच्या स्वरातली धार वैदेहीला असह्य झाली.
'तू थोडा शांत बस पाहू. मला एकटीला राहू दे जरावेळ.'
सोफ़्यावरची उशी मानेखाली घेत तिनं डोळे मिटून घेतले.सगळ्या शरीरातला उत्साह, ताकद, जणूकाही कोणीतरी काढून घेतलय असं तिला वाटत होतं. सुशांत वर खोलीत निघून गेला अन बसल्या जागी ती आडवीच झाली. काळीज अजूनही धाडधाड उडत होतं तिचं. कोसळणार्‍या पावसाच्या धारांचा आवाज अन मनातलं वादळ या दोन्हींच्या संगतीत ती बराच वेळ पडून होती. दारात लॅच की सरकवल्याचा आवाज आला अन ती उठून बसली. श्याम घरी आला होता.
'हुश्श, दमलो बुवा. आज या पावसानं अगदी कंटाळा आणलाय...'
वैदेहीच्या मुद्रेकडे लक्ष जाताच तो बूट काढता काढता क्षणभर थबकला.
'काय ग? आज उदासशी? अग, आज तर जाम खुश होणार बघ तू. ऑफ़िसमधला सुकुमारन आला परत भारतातून. अम्मानं खास साडी पाठवलीय तुझ्यासाठी..'
हातातलं पॅकेट तिच्याशेजारी ठेवत तो तिच्या बाजूला बसला. नेहेमीच्या तिच्या उत्फ़ुल्ल स्वभावाप्रमाणे ती झडप घालून ते पार्सल उघडेल अन साडी स्वतः भोवती लपेटून आरशात बघेल अशी अपेक्षा होती त्याला. पण वैदेहीचा काही प्रतिसादच येईन तेव्हा तिच्याभोवती हात घालून तिला त्यानं मायेनं जवळ घेतलं.
'मला सांगणार नाहीस?...
दुसर्‍याच क्षणी सारा बांध फ़ुटला तिचा. श्यामच्या खांद्यावर डोकं ठेवून तिनं एक जीवघेणा हुंदका दिला.
'तो...तो आला होता रे आज. श्याम, मला खूप भीती वाटतेय रे....'
'कोण, सुनील?.....'
एकदम धसकून जात श्यामनं विचारलं. जणू वैदेहीचं भावविश्व ढवळून टाकणारी एकच व्यक्ती या जगात आहे हे ठाऊक असल्यासारखं. पण पुढच्याच क्षणी तो शांत, गंभीर झाला.
'काय झालं? काय म्हणाला तो?...'
'लगेच निघून गेला. पण सुशांतला भेटला रे तो. त्यानंच दार उघडलं सुनीलला. अन तो त्याचा डॅडी असल्याचंही बोलला तो...'
'सुशान्त कुठे आहे?...'
श्याम पटकन उठून उभा राहिला.
'त्याला आधी सावरायला हवं राणी. तो किती बावरलेला असेल. तू जेवणाची तयारी कर. मी आलो त्याला घेऊन.'
दोन पायर्‍या एकाच वेळी चढत श्याम वरती गेला. सुशांतशी तो काय बोलला ते वैदेहीचा ऐकू आलं नाही. पण सुशांत मुकाट्यानं त्याच्याबरोबर खाली आला. वैदेहीच्या तोंडाची चवच गेली होती. सुशांतही नुसताच अन्न चिवडत होता. एकटा श्याम मात्र कमालीच्या शांतपणे जेवत होता. जेवणं उरकून तिघं बाहेरच्या खोलीत आले. बाहेरचा पाऊस आता आणखीच तडतडत होता. नेहेमीपेक्षाही नकोसा वाटला तो वैदेहीला.
'बस सुशांत. आम्हाला दोघांनाही तुझ्याशी काही बोलायचंय...'
सुशांतनं एक तीव्र दृष्टीक्षेप वैदेहीकडे टाकला.
'तो कोण होता ते स्पष्ट सांगा मला आधी...इज ही रिअली माय फ़ादर?'
एका दमात, धाप लागल्यासारखा सुशांत बोलला.
'हो, तो खरंच बोलला. ही इज युवर फ़ादर. नीट ऐकून घे. मग त्रागा कर बेटा. आम्हा दोघांचं लग्न व्हायच्या आधी...'
'आईचं प्रेम होतं त्याच्यावर? म्हणजे मी तुमचा मुलगा नाही? मी सुशांत नटराजन नाही? अन हे तुम्ही दोघांनीही लपवलं माझ्यापासून? खोटं बोलली आई माझ्याशी.'
अतीव संतापाने, श्यामचं बोलणं पूर्ण न होऊ देताच तो ओरडला. त्याच्या उंच कपाळावरची शीर थाडथाड उडत होती.
'वॉच युवर माऊथ, सुशांत. यू आर टॉकींग टु युवर मदर...'
श्यामचा आवाज वाढला तसा सुशांत पुन्हा खाली बसला. पण मनातल्या मनात तो धुमसतच होता.
'नीट ऐक आधी आई अन मी सांगतोय ते. अन पूर्ण ऐकल्याशिवाय एक शब्दही बोलू नकोस..'
नेहेमीच्या संयमी आवाजात श्यामनं सुशांतला सारा भूतकाळ सांगायला सुरुवात केली. सुशांत लक्ष देऊन ऐकत होता. पण वैदेहीचं लक्ष तिकडे नव्हतंच. तिच्या डोळ्यांसमोरून पूर्वायुष्याचा चित्रपट सरसर उलगडत होता.
मध्यम परिस्थितीतल्या आईवडिलांची वैदेही एकुलती एक लेक. दिसायला आखीवरेखीव, सावळ्या वर्णाची नि सुरेख केसांची. अभ्यासात जात्याच हुशार. दहावी, बारावी अन इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण करून नामांकित कंपनीत नोकरी पटकावते काय, अन वर्षभरातच कंपनी तिला परदेशी पाठवायचा निर्णय घेते काय, सारंच इतकं भराभर घडत गेलं की मित्रमैत्रिणी, नातेवाईक सारे हेवा करत होते. आईबाबांना तर आपल्या सुविद्य, सुस्वरूप मुलीला कुठे ठेवू नि कुठे नको असं होऊन जात असे.
'आयुष्यात सारंकाही मनासारखं मिळतं बाई तुला...' असं म्हणणार्‍या सगळ्यांना आणखी एक धक्का बसला. दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात आलेल्या वैदेहीचं लग्नही ठरलं ते अगदी पटकन. नात्यातल्याच कुणीतरी सुनीलचं स्थळ सुचवलं. शिकलेला,चांगल्या खानदानी घरातला सुनील अमेरिकेतच नोकरी करीत होता.खरंतर त्याला वैदेहीसारखी करियर गर्ल नको होती. पण त्याच्या घरच्या सार्‍यांनाच वैदेही खूप आवडली, अन त्या दोघांचं लग्न थाटात पार पडलं. सुखाच्या हिंदोळ्यावर झुलतच वैदेही त्याच्या बरोबर विमानात बसली.
टेक्सासला आल्यावर काही दिवस अगदी फ़ुलपाखरासारखे उडून गेले. वैदेहीला तिच्या कंपनीनं आनंदानं तिथल्या प्रोजेक्टवर नेमणूक दिली. अगदी नव्या नवलाईचा दोघांचा संसार सुखाचा चालला होता. पुढे येणार्‍या नशिबाच्या फ़ेर्‍यांची थोडीही कल्पना वैदेहीला नव्हती. सुनील आता मधून मधून वीकएंडला कामासाठी बाहेर रहातो, उशिरा येतो हे तिला कधीकधी खटकायचं पण परत आल्यावर तो इतका गोड वागत असे, की ती अगदी मोहरून जायची. अन एका काळ्याकुट्ट शनिवारी, वैदेहीच्या ध्यानीमनीही नसताना ते घडलं. सकाळी नाश्ता करून, दोघांनीही बाहेर जायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे वैदेही तयार होत होती. सुनील आंघोळीला गेला असताना दारावर टकटक झाली.
वैदेहीनं की होल मधून बघितलं. दारात एक परदेशी स्त्री उभी होती. कडेवर दोन वर्षांचं गुटगुटीत मूल.
'इज सुनील हिअर?'
वैदेही काही बोलणार तोच सुनील खोलीत आला. त्या स्त्रीकडे बघून तो इतका दचकला की वैदेहीच्या मनात एकदम अशुभाची शंका आली. पण त्या स्त्रीनं सुनीलला काही संधीच दिली नाही. एखाद्या चंडिकेसारखी ती त्याच्यावर तुटून पडली.
'यू चीटेड मी. हाऊ कुड यू डू धिस टु मी..?' असं किंचाळत ती एका हातानं त्याला थापडा मारू लागली.
वैदेहीचा अगदी दगड झाला. तिच्या तोंडातून शब्दही फ़ुटेना.
'हिला फ़सवलं म्हणतेय ही, अन माझं काय? माझं तर आयुष्यच उध्वस्त केलं यानं....'
बातमी मिळताच वैदेहीचे आईबाबा अथक प्रयत्न करून, कसाबसा व्हिसा मिळवून अमेरिकेत पोचले. लाडक्या लेकीची अवस्था बघून ते बिचारे पारच खचून गेले.
'पोलिसात देऊ या त्याला. असा सोडणार नाही मी. माझी मुलगी काय रस्त्यावर पडली होती काय?'
बाबांना संताप आवरेना. पण वैदेहीनं अन तिच्या आईनंच त्यांना शांत केलं.
'जे घडायचं ते घडून गेलंय बाबा. एकतर त्याचं एक लग्न आधीच झाल्याने आमचं लग्नही वैध नाही. अन कोर्टानं त्याला करायला भाग पाडला, तरी मला त्या नीच माणसाबरोबर संसार करायचा नाहीय आता. मी माझ्या पायांवर उभी आहे. माझं आयुष्य जगायला समर्थ आहे मी..'
वैदेहीनं निक्षून सांगितलं होतं. सुनील केव्हाच त्याच्या बायकोबरोबर रहायला गेला होता. पण वैदेहीच्या दुर्दैवाचे दशावतार अजून संपले नव्हते. थोड्याच कालावधीत तिला दिवस असल्याचं लक्षात आलं, अन ती मुळापासून कोसळून पडली. तिनं सुनीलला फ़ोन केला. पण अपेक्षेप्रमाणंच त्यानं कुठलीही जबाबदारी घ्यायला नकार दिला. आता वैदेहीसमोर बाळाला जगात येण्याआधीच नाहीसं करणं एवढा एकच उपाय होता.पण आईबाबांनी खूप समजावून सांगितलं, तरी तिचा जीव ते करू धजावत नव्हता. सगळीकडून अंधार दाटून आल्यासारखं तिला वाटत होतं.
अशीच एक दिवस, विमनस्क अवस्थेत ती ऑफ़िसच्या लंच टाईममधे डबा उघडून बसली होती. पहिला घास घेणार तोच समोरच्या टेबलावरून शब्द आले,
'कितने दिन हो गये अम्मा के हाथ की इडली खाये....'
वैदेहीनं दचकून त्या दिशेला बघितलं. श्यामल वर्णाचा, भरपूर उंचीचा एक तरुण तिच्याकडे बघून हसत होता.
'लीजिये ना. मेरी मां ने बनायी है...'
वैदेहीनं डब्याच्या झाकणात दोन इडल्या अन चटणी घालून त्याला दिली. त्यानंही निस्संकोचपणे त्या घेतल्या. वर आपल्या डब्यातला दहीभात तिला देऊ केला. श्याम नटराजन. मूळचा मद्रासचा पण शिक्षणानिमित्ताने अन नोकरीसाठी बराच काळ मुंबईत राहिलेला होता तो. वैदेहीच्या सेक्शनमधे बाकी कोणीच भारतीय नव्हते. आधी ती संकोच अन स्वतः च्या वेदनेच्या कोशात गुरफ़टून गेल्याने श्यामशी मोजकंच बोलत असे. पण दिलखुलास स्वभावाच्या नि अस्खलित मराठी बोलू शकणार्‍या श्यामनं आपल्या स्वभावानं तिची मैत्री अन विश्वास लवकरच संपादन केला. एकदा दोनदा तो वैदेहीला सोडायला घरी सुद्धा आला. थोड्याच दिवसात वैदेही अन श्यामची घनिष्ट मैत्री जमली. श्यामनंही तिचा भूतकाळ समजल्यावर तिच्या मनावर फ़ुंकर घालायचा प्रयत्न केला. पण आपल्या मर्यादा त्यानं कधीच सोडल्या नाहीत. अन महिनाभरातच त्यानं वैदेहीच्या घरी तिच्याशी लग्न करण्याबद्दल विचारलं. घरात आधी सार्‍यांना धक्काच बसला. या मुलात तर काही खोट नाही ना, असंही त्यांना वाटून गेलं. पण श्यामची भावना एकदम प्रामाणिक होती. त्याला वैदेही मनापासून आवडली होती. त्याच्या घरात फ़क्त म्हातारी आई होती. तिचा अर्थातच या लग्नाला तीव्र विरोध होता.
     वैदेहीनं आधी नाहीच म्हटलं त्याला. पण आईबाबा नि स्वत श्यामनं तिची खूप समजूत घातली. तिच्या होणार्‍या मुलाचं पितृत्व स्वीकारायला तो तयार होता. शेवटी श्यामच्या निर्मळ मनाचा विजय झाला होता. एका प्रसन्न दिवशी कोर्ट मॅरेज करून वैदेहीची सौ. वैदेही श्याम नटराजन झाली. सुशांतच्या जन्माच्या वेळी श्याम तिचा हात घट्ट धरून उभा होता. बर्थ सर्टिफ़िकेट वर जेव्हा त्यानं सुशांत श्याम नटराजन लिहिलं तेव्हा वैदेहीचे डोळे भरून आले होते. सहा महिन्यांचा व्हिसा संपून आईबाबा भारतात परत गेले. या सहा महिन्यात वैदेहीच्या जगात केवढी मोठी उलथापालथ झाली होती. पण निदान तिच्या आयुष्याचं तारू श्यामसारख्या मजबूत नावाड्याच्या हाती सुखरूप लागलं याचाच आनंद मानून, डोळे गाळतच ते मायदेशी परतले. सुशांतनंतर वैदेहीला पुन्हा मूल झालंच नाही. पहिल्या बाळंतपणातील काही गुंतागुंतीमुळे तिला मूल होणं शक्यच नाही असा रिपोर्ट आला तेव्हा ती अनिवार रडली होती. पण श्यामनंच तिचं सांत्वन केलं.
'अग वेडे, त्याच्या नि आपल्या प्रेमात वाटेकरी येणार नाही तेच बरंय.' तो हसून म्हणाला होता.
सुशांत जसाजसा मोठा होऊ लागला तसे वैदेहीपेक्षाही श्यामशी त्याचे मायेचे बंध विणल्या जाऊ लागले. श्यामनंही तसंच त्याच्यावर प्रेम केलं. टेक्सास सोडून ते नंतर दुसरीकडे स्थायिक झाले. श्यामनं नोकरीही बदलली. ग्रीन कार्ड आल्यावर वैदेहीनं मात्र नोकरी सोडून पूर्ण वेळ सुशांतच्या संगोपनातच घालवायचं ठरवलं. आयुष्याची विस्कटलेली घडी नीट बसली होती. श्यामच्या आई एकदा येऊन गेल्या, अन सुनेचं सावळं सौंदर्य अन शालीनतेने त्यादेखिल हरखल्या. सारंकाही सुरळीत चाललं होतं, अन सुशांत कॉलेजला जायच्या वेळी सुनीलच्या रूपानं हे सावट पुन्हा तिच्या संसारावर घिरट्या घालू लागलं होतं. श्यामनं सांगितलेलं सारंकाही सुशांतनं नीट ऐकून घेतलं. काही काळ खोलीत जीवघेणी शांतता पसरली.
सुशांतच्या डोळ्याच्या कडांना पाणी साचलं होतं. ते तसंच ओघळू देत, ओठ दाताखाली दाबून तो हलकेच म्हणाला,
'मी बाबांना.... म्हणजे त्या माणसाला भेटलो एकदा तर चालेल का? मला एकदा भेटायचंय त्यांना..'
'बाबा' हे संबोधन सुनीलसाठी ऐकून श्यामला कोणीतरी आपल्या काळजावरून सुरी फ़िरवतय असं वाटलं.
'हो, जरूर. तुला वाटेल तेव्हा भेट तू...' आवाज प्रयत्नपूर्वक काबूत ठेवत तो म्हणाला.
सुशांत पुढे काहीही न बोलता उठून वर गेला. वैदेही अन श्याम कितीतरी वेळ निशब्द बसून होते. पुढे सार्‍या नकोनकोशा वाटणार्‍या घडामोडी अगदी वेगानं आकार घेत गेल्या. सुनीलनंही फ़ोन करून सुशांतला भेटायची इच्छा व्यक्त केली. श्यामनं अगदी हसतमुखानं त्याला होकार दिला. सुशांत तर त्या दिवसापासून वैदेही अन श्यामशी कामापलिकडे बोलतच नव्हता. प्रत्येकाच्या मनात एक काहूर माजलं होतं. घरातली शांतताही कमालीची स्फ़ोटक बनली होती.
     पुढच्या आठवड्यात रविवारी सुनील अन सुशांतची भेट होणार असं ठरलं. वैदेही अन श्याम त्याला हॉटेलमधे सोडून देणार होते. सुनील तिथेच येणार होता. तासा दीड तासानं ते सुशांतला परत न्यायला येणार होते. वैदेहीला सारखं रडू येत होतं. मधूनच ती श्यामला बिलगून रडतही असे. 'तू रडू शकतेस वैदेही. मी पुरुष आहे ग. मला रडताही येत नाही. वर्षानुवर्षं मेहनत करून एखादी सुरेख मूर्ती बनवावी अन कुणा दुसर्‍याच माणसानं ती चोरून न्यावी तसं वाटतंय मला...' तो एकदा खिन्नपणे म्हणाला होता. पण तितक्याच धीरोदात्तपणे त्यानं वैदेहीला समजावलं होतं.
'वैदेही, तुला सुनीलबद्दल कितीही तिरस्कार वाटत असला, तरी त्याचं बीज सुशांतच्या मनात रोवू नकोस. शेवटी तो त्याचा मुलगा आहे. अन सुशांतनं आयुष्यातले सारे निर्णय स्वतः घ्यावे हे मत आहे माझं. त्याच्यावर कुठलीही गोष्ट लादल्या जायला नको...'
'श्याम, तुला भीती नाही वाटत का रे? तो सुनीलच्या जास्त जवळ जाईल अन आपल्याला दुरावेल याची.'
'वाटते कधीकधी. एखाद्या दुबळ्या क्षणी. मी ही माणूसच आहे ग. पण खरं सांगू वैदेही, माझं मन मला सांगतं अशा वेळी. मी फ़क्त त्याला जन्म दिला नाही, बाकी सारं केलंय. तो माझा मुलगा नाही हे कधीच वाटलं नाहीय मला. अगदी तो झाल्याझाल्या त्याला छातीशी धरलं ना, तेव्हापासून तो मला माझाच वाटत आलाय. माझ्या प्रेमात नक्कीच इतकी ताकद आहे ग. तो सुनीलच्या जवळ जाईल की नाही हे नाही मी सांगू शकणार. पण माझ्या दूर जाणार नाही हे नक्की.'
त्याच्या या बोलण्याने वैदेहीला तेवढ्यापुरतं बरं वाटत असे. पण मनातून मात्र ती अस्वस्थच होती. 
रविवार उजाडला. सकाळी अकराची वेळ ठरली होती. सुशांत न बोलताच तयार झाला. ठरल्याप्रमाणे तिघं निघाले. हॉटेलच्या आवारात श्यामनं गाडी थांबवली. बाहेरच्या एका टेबलावर उन्हाच्या छत्रीखाली सुनील बसला होता. मागे वळूनही न बघता सुशांत निघाला.
'सुशू, तासाभरानं येतो आम्ही घ्यायला तुला...' श्यामनं त्याला आवाज दिला.
'नको. माझं झालं की मी फ़ोन करीन. मग या तुम्ही..'
'ओ. के. सेल फ़ोन घेतलायस ना?'
नुसतीच मान हलवून सुशांत चालू लागला. वैदेही नि श्याम घरी आले. टी. व्ही चं कुठलंतरी चॅनेल लावून, दोघं बसून राहिले. त्यांचं लक्ष अर्थातच फ़क्त घड्याळाकडे होतं. संथ पावलं टाकत सुशांत सुनील बसला होता त्या टेबलाकडे गेला. त्याला बघताच सुनील उठून उभा राहिला.
'ये बस सुशांत. काय घेणार तू? ...'
बाबा कधीच हा प्रश्न विचारत नाहीत. सुशांतच्या मनानं नकळत तुलना केली. आपण सगळे हॉटेलमधे गेलो की ते आपला आवडता ज्यूस अन काहीतरी चमचमीत स्टार्टर्स मागवतात. अन मग,
'काय सुशू, ती कोण पोरगी होती काल सॉकर फ़ील्डवर?...' असं काहीसं मिष्कील बोलून आधी हसवतात आईला नि आपल्याला. पण पुढच्याच क्षणी तो विचार त्यानं एखाद्या जळमटासारखा झटकून टाकला.
'यांना अजून आपली काहीच तर माहिती नाहीय. मग कसं बरं कळणार त्यांना?...'
'अं, नको मला काहीच. नुसत्या गप्पाच मारू या....'
'अरे असं कसं? थांब मी कॉफ़ी मागवतो. मला या वेळी कॉफ़ीशिवाय होत नाही....'
सुशांतला खरं म्हणजे कॉफ़ी अजिबात आवडत नसे. पण आयुष्यात बर्‍याच नावडत्या गोष्टी असतात. हं...
एक सुस्कारा सोडून तो सावरून बसला. कॉफ़ी येईपर्यंत सुनील स्वत बद्दल बरंच काही बोलत होता. सवयी, आवडीनिवडी. सुशांतला जरासा कंटाळाच यायला लागला मग.
'पण हे सुद्धा माहीत हवंच की आपल्याला. आता यापुढे हे 'बाबा' देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहेत.'
कॉफ़ी आली, तरी सुनील बोलतच होता. सुशांत हळूहळू कॉफ़ीचे घुटके घेत त्याचं बोलणं ऐकत होता. पण त्याचं लक्ष त्या बोलण्याकडे फ़ारसं नव्हतंच. तोंडातल्या कडवट कॉफ़ीच्या चवीसारखाच,मनात घोळत असणारा तो कडवट प्रश्न शेवटी धाडकन विचारून मोकळा झालाच तो.
'आज, इतक्या वर्षांनी मला भेटायला कसे आलात तुम्ही? याआधी कधीच यावसं नाही वाटलं तुम्हाला?..'
सुशांतच्या स्वरातल्या धारेनं सुनील एक क्षणभरच चपापला. पण दुसर्‍याच क्षणी त्याच्या घार्‍या डोळ्यात काहीशी गुर्मीची, काहीशी रागाची छटा उमटली.
'ते खरंच इतकं महत्वाचं आहे का सुशांत? मी आलो, आपली भेट झाली, हे महत्वाचं नाही का?
'महत्वाचं कसं नाही? या प्रश्नांची उत्तरं माझ्या दृष्टीनं खूप महत्वाची आहेत. इतकी वर्षं तुम्हाला आपल्याला कोणी मुलगा आहे याची आठवणही झाली नाही. अन अचानक एखाद्या वादळासारखे तुम्ही माझ्या आयुष्यात येता काय. हे सारं इतकं सहज वाटतंय तुम्हाला?..'
'सुशांत, मी तुझा राग समजू शकतोय. पण तिला जेनीला तुमच्याशी कुठलेही संबंध ठेवलेले चालणार नव्हते. तिनं तसं वचनच घेतलं होतं माझ्याकडून....'
'वचन? हं...'
सुशांतला आता संताप आवरेना. आईशी केलेलं लग्न, तिच्याबरोबर काढलेले सहा महिने इतक्या सहज विसरला हा माणूस. अन बाकी सारी वचनं पाळणं जमलं याला..'
एक प्रकारचा सुन्नपणा आला होता सुशांतच्या मनाला.' कशाला आलो आपण यांना भेटायला? काय गरज होती?...'
'अन मग आताच इतक्या वर्षांनी का आलात?..' कुतुहलानं रागावर विजय मिळवला होता.
'अं..म्हणजे काय आहे की... जेनीचा नि माझा घटस्फ़ोट झाला गेल्या दोन महिन्यांपूर्वी. मुलांचा ताबाही तिच्याकडे गेला.. तेव्हा खूप वाटायला लागलं या दोन महिन्यात की.......'
'की आपला अजून एक मुलगा आहे. आपल्या मनात आलं तसा आपण त्याला टाकून दिलाय. आता मनात येईल तेव्हा आपण त्याला जाऊन भेटू शकतो. आपल्या 'बाप' असण्याचा हक्क गाजवायला....'
भावनातिरेकानं सुशांतचा आवाज इतका चढला की त्याला धाप लागली. आजूबाजूचे लोक विचित्रपणानं आपल्याकडे बघताहेत ही जाणीव झाली तसा तो पुन्हा खाली बसला.
'आज, आयुष्याच्या मध्यावर, तुम्ही एकाकी पडलात म्हणून तुम्हाला आठवण आली माझी. कुठे होतात तुम्ही इतकी वर्षं? मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा. माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी. मला मांडीवर बसवून घास भरवताना? तेव्हा माझे बाबा होते माझ्याजवळ. तुम्ही...तुमचा काहीही हक्क नाहीय माझ्यावर. पुन्हा कधीच नका येऊ माझ्याकडे. मी तुम्हाला वडील मानत नाही. मुळीच नाही...'
पालथ्या हाताने डोळ्यात दाटू पाहणारं पाणी पुसत सुशांत उठला. बाहेर येऊन, तिरीमिरीतच त्यानं टॅक्सीचा नंबर डायल केला. बाबा इथवर येईपर्यंतचाही उशीर नको होता त्याला. मघाशी किती निरभ्र होतं आकाश. नि आता ढग पुन्हा दाटायला लागले होते आभाळात. घरी पोचताच, दारावरची बेल जोरजोरात वाजवायला सुरुवात केली त्याने.
'आई, बाबा आहेत की बाहेर गेलेत?....' कमालीचा अस्वस्थ झाला तो या विचारानं.
दार उघडणार्‍या वैदेहीला हातानं बाजूला करूनच तो अधीरतेने  आत शिरला.
'बाबा कुठे आहेत ग?...'
तिच्या उत्तराचीही वाट न बघता तो धाड धाड जिना चढून वर गेला. खोलीच्या खिडकीशी श्याम उभा होता. त्याचे रुंद खांदे केवढेतरी झुकलेले वाटले सुशांतला.
'बाबा..'
अन पुढे काही बोलताच येईना त्याला. आवेगानं तो श्यामच्या मिठीत शिरला.
'बाबा.. मी फ़क्त तुमचाच मुलगा आहे. फ़क्त तुमचाच. आय डोंट नो एनिबडी एल्स....'
मागून आलेली वैदेही ओल्या डोळ्यांनी हे सारं बघत होती. त्याचं हे कोसळणं सुद्धा फ़ार फ़ार सुखावून गेलं तिला. हलक्या पावलांनी ती जिना उतरायला लागली. मध्यावर पोचत नाही तोच श्यामचा आवाज आला,
'वैदेही, भजी राहिलीयत हं. तू सुरुवात कर, आम्ही दोघं आलोच तुझ्या मदतीला...'

2368. एका स्त्रीचा अपूर्ण श्वास

 रात्रीचे अकरा वाजले होते.
संपूर्ण घर झोपेत बुडालं होतं.
फक्त स्वयंपाकघरातून येणारा मंदसा छन-छन आवाज
त्या शांततेला भेदत होता.
टेबलवर अर्धवट जेवलेले ताट ठेवलेलं होतं.
भाजी थंड झाली होती, पोळी कडक झालेली,
आणि अर्चना त्या ताटाकडे बघत होती.
तिच्या डोळ्यांत झोप नव्हती.
फक्त थकवा आणि ओलसरपणा होता.
दाराच्या पलीकडून कुणीतरी डोकावलं,
पण तिला पाहणारा कोणीच नव्हता.
पहाटे पाच वाजता घरातील सगळे अजूनही निजलेले,
आणि अर्चना झाडू हातात घेऊन स्वयंपाकघरात कामाला लागलेली.
गॅसवर दूध ठेवलेलं, सासूबाईंसाठी चहा तयार होत होता,
मुलांच्या डब्यासाठी आलू पराठे बनवले होते,
आणि नवरा मनोजचा शर्ट प्रेस होत होता.
“इतका उशीर का झाला ? माझा चहा थंड झाला !”
सासूबाईंचा रोजचा ओरडा कानावर पडला.
अर्चना काहीच बोलली नाही.
फक्त मान खाली घालून तिने पुन्हा चहा बनवला -
जणू तिने आपल्या तोंडाला कुलूप लावलं होतं. 
मनोज ऑफिसला जाताना फक्त एवढंच म्हणाला,
“कपडे नीट ठेव, मीटिंग आहे, उशीर होतोय मला.”
ना “निघतो” म्हटला,
ना “काळजी घे.”
फक्त चाव्या टेबलावर आपटल्या आणि निघून गेला.
दुपारपर्यंत घर चमकत होतं,
पण ती स्वतः मात्र फिकी दिसत होती.
सासू त्यांच्या कमरेच्या दुखण्याचं रडगाणं गात होत्या,
सासरे टीव्हीवर बातम्या पाहत होते,
मुलं शाळेत होती..
आणि ती  भिंतीला टेकून बसली होती.
तिच्या बोटांपर्यंत थकवा पोहोचला होता,
तरीही ती सगळ्यांसाठी जेवण बनवत होती.
जेव्हा ती स्वतः जेवायला बसली,
तेव्हा भाजी थंड, पोळी कडक झाली होती.
तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली.
शेजारच्या रत्नाताई आल्या.
“अगं अर्चना , तू दिवसभर या कामातच गुरफटलेली असतेस!
थोडा वेळ स्वतःसाठीही काढ ना!”
अर्चनाने हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली —
ते हसू तोंडावर होतं, मनात नव्हतं.
“वेळ माझ्या वाट्याला फक्त झाडू आणि भांडी घेऊनच आला आहे ताई…”
सायंकाळी मुलं परत आली,
त्यांच्यासाठी दूध, खाऊ, गृहपाठाचा डोंगर तयार होता.
रोहन आला तेव्हा फोनवर कुणाशी तरी बोलत हसत होता.
“आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का?”
अर्चनाने हळूच विचारलं.
तो म्हणाला, “हो, थकलोय,”
आणि थेट टीव्हीसमोर बसला.
अर्चना काही बोलू पाहत होती..
“मीसुद्धा थकलेय, मनोज…”
पण तिचे ओठ बंद झाले.
कारण तिला ठाऊक होतं..
या घरात तिला थकण्याचा हक्क नव्हता.
रात्र गडद झाली.
मुलं झोपली, सासू-सासरे त्यांच्या खोलीत गेले.
अर्चना अजूनही स्वयंपाकघरातच होती —
गॅस बंद करत होती, सिंक पुसत होती, उद्यासाठी भाजी चिरत होती.
अचानक तिचं डोकं गरगरलं,
तिने भिंतीचा आधार घेतला.
डोळे मिटले,
आणि कधी झोप लागली हे कळलंच नाही.
रात्री दोनच्या सुमारास मनोज जागा झाला.
स्वयंपाकघराची लाईट लागलेलीच होती.
तो चिडला, “ही अजून काय करतेय ?”
तो तिथं गेला..अर्चना खुर्चीवर बसलेली,
डोकं खाली, पूर्ण शांत.
“अगं अर्चना , झोपलीस का ?”
कुठलाही प्रतिसाद नाही.
त्याने खांदा हलवला
शरीर गार झालं होतं.
त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला.
तो किंचाळला — “आई! आई!”
सगळं घर धावत आलं.
डॉक्टर आले — पण उशीर झाला होता.
डॉक्टर म्हणाले,
“शरीर पूर्ण थकलं होतं. कदाचित अनेक दिवस तापात होती, पण विश्रांती घेतली नाही.”
मनोजच्या कानात जणू कुणीतरी हातोडा मारला. तो पुटपुटला 
“पण तिने कधी सांगितलंच नाही की ती आजारी आहे…”
डॉक्टर शांतपणे म्हणाले -
“सांगण्यासाठी ऐकणारा तरी हवा ना…”
सकाळ झाली.
सूर्य उगवला, पण त्या घरात काळोख होता.
स्वयंपाकघरात तेच अर्धवट ताट पडलं होतं..
थंड आणि निःशब्द.
सासूबाई चहा बनवत रडत होत्या,
“कधी विचारच केला नाही की ती इतकं सहन करत होती…”
मुलांनी विचारलं “आई कुठे आहे ?”
मनोज काहीच बोलू शकला नाही.
काही दिवस गेले.
घर चालू होतं, पण जीवन थांबलं होतं.
एका संध्याकाळी मनोजला कपाटात एक डायरी सापडली —
वर लिहिलं होतं, 
       "माझं मौन"
पहिलंच पान उघडलं,
आणि डोळ्यातून अश्रू ओघळले —
> “आज ताप आहे, पण काम तर करायचंच आहे मला.
मी थांबले तर हे घर थांबेल.
कुणी विचारेल का की मी ठीक आहे का ? बहुतेक नाही.
मी आता एक मशीन झालेय,
जी सकाळी सुरू होते आणि रात्री बंद होते.”
“मला भीती वाटते की एखाद्या दिवशी मी कोसळेन,
आणि कुणाला कळणारही नाही. कदाचित तेव्हा लक्षात येईल
घर भिंतींनी नाही, एका स्त्रीच्या श्वासांनी चालतं.”
शेवटच्या ओळीवर मनोज थांबला “जर माझ्या जागी कधी दुसरी कुणी आली, तर तिला एवढंच विचार...
‘थकलीस का?’
हे शब्द एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतात.”
मनोजचे हात थरथरू लागले.
त्याचे डोळे पाण्याने भरले.
पहिल्यांदा तो खऱ्या अर्थाने रडला.
त्या दिवसानंतर त्याने स्वयंपाकघरातले ते ताट जपून ठेवले ,
आठवण म्हणून की,
स्त्रीची मेहनत कधीच हलकी नसते,
जरी तिचा आवाज कुणाला ऐकू येत नसला तरीही.
प्रत्येक घरात एक “अर्चना” असते.
जी सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःला विसरते.
ती बोलत नाही, पण तिचे हात, तिचे डोळे,
आणि तिचा थकवा रोज ओरडतो.
कधी तिच्या शेजारी बसून फक्त एवढंच विचारा 
“थकलीस का ?”
कारण हेच शब्द एखाद्याचं जीवन वाचवू शकतात. 💔

2367. वेळ आली होती...पण टळली..!

 ( एका शिक्षकाच्या आयुष्यात घडलेली सत्य घटना )
दिवाळीच्या सत्र सुट्ट्या नुकत्याच परवा संपल्या. कालपासून संध्याकाळच्या वेळी दहावीच्या बॅचेस पुन्हा सुरू झाल्या.
आजची बॅच नेहमीप्रमाणे 7 वाजता संपवून खाली उतरत होतो. पण अचानक छातीत कळा उठल्या, श्वास घुसमटू लागला, आणि डोळ्यासमोर अंधारी दाटून आली.
क्षणभर वाटलं.. “हा शेवटचा श्वास तर नाही ना?” 😱
छाती चोळत खाली आलो. थोडं पाणी प्यायलो, खोकरलो, पण त्रास काही कमी झाला नाही. घरचे सगळे घाबरलेले.
बायकोचा आग्रह “आता लगेच हॉस्पिटलला जाऊयात..!”
मेव्हणा हारूण धावतच बाहेर पडला, ऑटो आणला. बाहेर पाऊस मुसळधार कोसळत होता. हारूणने तत्काळ परतानी हॉस्पिटल येथे कार्यरत आमचे स्नेहीं मित्र डॉ. फेरोज शेख यांना फोन केला.  आम्ही परतानी हॉस्पिटल गाठेपर्यंत डॉक्टर जेवायला गेले होते. पण तेथील कर्मचारी.अर्ध्याहून अधिक माझेच माजी विद्यार्थी..!
तिथं प्रज्ञा वाघमारे भेटली. आमच्या शैक्षणिक परिवारातील गुणी विद्यार्थिनी. तीनें रक्तदाब तपासल्यानंतर लगेच ECG काढून डॉक्टरांकडे धावली. थोड्याच वेळात डॉ. कौस्तुभ परतानी आले. तपासणी केली आणि म्हणाले.
“लक्षणे गंभीर आहेत, 2D-Echo करा.”
रिपोर्ट आल्यानंतर सल्ला दिला  “Angiography करून घ्या.”
मी मात्र अस्वस्थ होतो मनात एकच विचार..
"अजून बरीच कामं बाकी आहेत. हे असं थांबून चालेल का?"
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार दिले. इंजेक्शन झालं, थोडा वेळ विसावलो, आणि थोडं बरं वाटू लागलं.
तेव्हा जाणवलं आज हृदयविकाराचा सौम्य झटका होता.. 
*वेळ आली होती, पण टळली..!*🫣
मी नशिबवान आहे. प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष मित्रांचे सहकार्य, कुटुंबाची साथ, आणि हजारो विद्यार्थ्यांचे आशीर्वाद सोबत होते. मनात पुटपुटत होतो.. “शैक्षणिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रात अजून खूप मोठं काम बाकी आहे. ते इतक्या लवकर कसं आटोपणार? "
तेवढ्यात पुन्हा प्रज्ञा आली आणि म्हणाली,
“सर, आपलं बिल मी भरते.”
मी थोडा दचकून म्हणालो, “ नाही प्रज्ञा… ते मी देतो.”
ती म्हणाली.
“सर, आपणच मला आयुष्यात सक्षम व्हायला शिकवलं…!  
"माझं दहावीचं शिक्षण तुम्हीचं पूर्ण केलं. आज मी इथं आहे, ते तुमच्यामुळेच..!”
त्या क्षणी माझ्या डोळ्यात अश्रू येतं होते. ते मी आवरत होतो.. 😢
माझ्या परिश्रमाचं, शिक्षणसेवेचं हेच खरं बक्षीस होतं.. विद्यार्थिनीने शिक्षकाचं ऋण मान्य करणं..!
प्रज्ञा वाघमारे ही गरीब घरातील मुलगी. वडील ऑटोचालक, आई शेतमजूर. पण शिक्षणाची जिद्द अफाट.!
दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश, पण मेडिकल प्रवेश न मिळाल्याने निराश न होता तिनं GNM (नर्सिंग) निवडलं.
आता ती इथेच, समर्पणाने रुग्णसेवेत समर्पित आहे. तिची बहीण प्रतीक्षाही तिच्या पावलावर पाऊल ठेवून GNM करत आहे..
दोघींनाही पाहून वाटलं  “मेहनतीचा आणि शिक्षणाचा प्रकाश खरोखर अंधार दूर करतो.”
आज माझं हृदय वेदनेने नव्हे, तर कृतज्ञतेने धडधडत होतं. गेल्या 25 वर्षांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रवासात असंख्य अशा प्रज्ञा, प्रतीक्षा निर्माण झाल्या. ज्यांनी माझ्या शिक्षणसेवेचं खरं मोल ठरवलं.
मित्रांनो, जीवन क्षणभंगुर आहे, पण सेवा आणि शिक्षणाचं कार्य अमर आह . हेच आजचा अनुभव सांगून गेला..
"नियती आपल्याला वेळोवेळी थांबवते, आपलं कार्य अजून अपूर्ण आहे हे सांगण्यासाठी...!"
आता पुन्हा सर्व नव्या उमेदीनं, नव्या ध्यासानं सुरू करणार..
“मन, लेखणी आणि कार्य” या त्रिसूत्रीने समाजप्रबोधनाचा दीप अधिक तेजोमय करायचा आहे.!
“प्रत्येक वेदनेत एक नवीन जागृती दडलेली असते.” ह्याची आज अनुभूती आली..

2366. बापाची लाडकी पोर...!

     लग्नाला ७ वर्ष झाली तरी बायकोची कुस काही उजली नव्हती. "बाबा" म्हणून ऐकायला कान हत्तीसारखे झाले होते. डॉक्टर इलाज करून पण हाती निराशाच लागत होती. बाप होता तर नास्तिकच पण शेवटचा उपाय आणि आईच्या इच्छा म्हणून तुळजाभवानीला नवस केला. "तुझ्या आशीर्वादाने जर माझ्या घरात लक्ष्मीची पावल उमटली तर पायी तुला भेटायला येईन' असा नवस केला. बोलात आणि फुलात गाठ पडली. काही महिन्यातच तुम्ही बाप होणार असल्याची बातमी बायकोने दिली. बातमी ऐकून नास्तिक बाप अस्तिक झाला. रोज मनोभावे तुळजाभवानीची पूजा करू लागला. आईचे आणि बायकोचे शेकडो नवस, प्रार्थना, पूजापाठ कामी आले होते.
    बरोबर श्रावणातल्या तिसर्‍या दिवशी पहाटे तिचा जन्म झाला. बापाची लेकीसाठी असलेली,आजीची नातीसाठीची  आस संपली होती.ही आस संपायला सात वर्षांचा काळ लोटला होता.  श्रावणातले ऊन पाहिल्यानंतर तणांचा जसा आकार बदलतो, ज्याप्रमाणे श्रावण चैतन्याचं वातावरण निर्माण करतो. तसाच आकार बापाच्या मनाने बदलला होता, चैतन्याच वातावरण त्याच्या आयुष्यात निर्माण झालं होतं.
     मुलीच्या आनंदात नवस फेडण्यासाठी पायीदेखील चालत गेला. चालून चालून पायाला फोड आले होते. खोलवर काटे रुतले होते, बोटातून रक्त वाहत होते पण ते सगळ मुलगी झाल्याच्या आनंदापुढे फिक होत. लेकीच्या आनंदपुढे वेदना तग धरत नव्हत्या.
पाचीला "ताई तू दीदी च नाव श्रावणीच ठेव बर का" अस आवर्जून मोठ्या बहिणीला सांगितल. त्या श्रावनाणे वातावरणात चैतन्य आणलं होतं तर या श्रावणीने बापाच्या मनात आणि जीवनात. नाव जरी श्रावणी ठेवल असल तरी तो लाडाने दीदीच  म्हणत. दिदीची चेहरेपट्टी आई वर गेली होती पण नाक मात्र बापासारख होत.लांबसडक...! बापाची दीदी हळूहळू घरात लक्ष्मीची पावलं टाकू लागली. तिच्या प्रत्येक पावलाने घरातील वातावरण प्रसन्न होत होत. आई तर दिवसभर ताई ताई म्हणत पकडण्यातच दमून जाई. दीदीला काहीही कमी पडू नये म्हणून बापाने दुसरे अपत्य होत असून देखील जन्म न देण्याचा निर्णय घेतला.
       येणाऱ्या श्रावणात दीदीला पाच वर्ष पूर्ण होणार होती. दीदीचा वाढदिवस मोठा करायचा म्हणून वर्षभरापासून पगारातून काही रक्कम बाजूला काढून ठेवत होता. आयुष्यात एकदाही केकच तोंड न पाहिलेल्या बापाने लेकीसाठी पाच किलोचा केक आणला होता. त्याला निमित्त होतं ते फक्त दीदीला पाच वर्ष पूर्ण झाल्याच. दीदीच्या वाढदिवसाला मी माझ्या दीदीला डाक्टर करणार म्हणून त्याने ठरवून टाकलं. त्यासाठी पुढच्या महिन्यापासून पैसेही शिक्षणासाठी बाजूला काढू लागला. ताईची दिदी आता छोटा शिशुत जाऊ लागली. बाप स्वतः मात्र चड्डीला ठिगळ लावून सरकारी शाळेत गेला होता. पण मुलीला मात्र इंग्लिश मीडियमल घातलं होतं. मुलगी थोडीच बापासारखी होणार आहे ती तर डॉक्टर होणार आहे ना ?  एकदा गावी जाऊन आल्यानंतर पाणी बदल झाल्याने ताप आला म्हणून तो रात्रभर मिठाच्या पट्ट्या बदलत होता. रात्रभर त्याच्या दिदीचा हातात हात घेऊन चोळत होता. त्या रात्री एक मिनिटही त्याला झोप लागली नव्हती.
     या श्रावणात दीदी सात वर्षांची झाली. दिदीला पैंजण करायचे म्हणून बापाने हातातील अंगठी गहाण ठेवली पण मुलीला पैंजण केली. बापाला थोडीच अंगठी शोभून दिसते, शोभून दिसतात तर ती लेकीच्या पायातील पैंजण नाही का.? पैंजण घालून दीदी चालत होती तेव्हा त्यांच्या आवाजाने मात्र बापाचे काम तृप्त होत होते. कोकिळेच्या आवाजाने निसर्ग तृप्त होतो तसा. त्याचा पगार दहा हजार पण मुलीला तीन हजाराचा ड्रेस आवडला म्हणून तोही घेतला. स्वतः दोन वर्षांपूर्वी घेतलेला शर्ट अजूनही अडकवत होता. बापाला कशाला नवीन कपडे पाहिजेत? त्याला कसली हौस. हौस तर मुलीची असते. बापाला कोण बघणार आहे? मुलगी चारचौघात उठून दिसली पाहिजे नाही का? दिदी पाचवी उत्तीर्ण झाली. लेकीच तोडक मोडक इंग्लिश ऐकून त्याला मोठं अप्रूप वाटत हात. अजून मेहनत करण्याची ताकद मिळत होती. तो अजून जोमाने काम करत होता.लेकीच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. लेकही तशी हुशार होती. शाळेत कायम दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असायची. मोठेपणी कोण म्हंटल्यावर तीही "मी डॉक्टर होणार" म्हणूनच उत्तर देत होती.
      नववीत असताना पहिल्यांदाच तिने प्रथम क्रमांक पटकावला. नेहमीप्रमाने शाळेने प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरविल. आपल्या मुलीचा होत असलेला सत्कार पाहून बापाच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. डोळे सभागृहाला ओरडून सांगत होते "माझी लेकय माझी". सत्कार समारंभ झाल्यावर एक दिवस अशीच डाक्टर सायबिन होऊन माझी मान उंचाव असं बजावून सांगितलं. त्यावर तिने "होय बाबा" म्हणत मानही डोलावली. दिदी दहावीला तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली. आनंदाच्या भरात पूर्ण कॉलनीत पेढे वाटले. पेढे वाटताना माझी दीदी डॉक्टर होणार हे सांगायचं विसरला नव्हता. त्याने सगळ्यांना पेढे भरवले पण त्याला कोणीच पेढा नाही भरवला. त्याने काय केले पेढा भरवायला गुण तर दिदिने मिळवलेत नाही का?  त्याला का म्हणून श्रेय द्यायचं.?
     दिदीने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. विद्यालयात जाऊन महिना झाला आणि मोबाइलची मागणी केली. तो ही मोठा टच स्क्रीनचा बर का.. "घेऊ ना आपण तुला लागत आसल ना अभ्यासासाठी...!  त्याच्यामूळ उगाच अभ्यासात खोळंबा नको". बाप म्हणाला. दुसऱ्या दिवशी दुकानात गेल्यावर तिने सरळ सरळ दहा हजाराच्या फोनला हात लावला. लेकीची इच्छा मोडू नये म्हणून तो हळूच दुकानदाराला म्हणाला आता अर्धे देतो बाकीचे पुढच्या महिन्यात देतो. पण दुकानदार ऐकायलाच तयार होईना शेवटी दुकानदाराने हप्त्यावर घेण्यास सांगितले. बापाच्या बटनाच्या फोनला दोन ठिकाणी रबर लावला होता. बॅटरीला मागून कागदाची घडी लावून वापरत होता. पण. त्याला कशाला लागतोय नवीन फोन? त्याला काय करायचय? त्याला काय कळतय? फोन तर लेकीला पाहिजे तोही नवीन आणि मोठा. लेक डॉक्टर होणार आहे ना? मोबाईल वर लेक मध्यरात्रीपर्यंत काही तरी करत असायची. माझी लेक अभ्यास करते म्हणत बापाला वेगळाच अभिमान वाटत होता. अकरावीला म्हणावे तसे गुण पडले नाही. पण पेपर आता अवघड झाले असतील म्हणून बापाने काय विचारलं नाही आणि लेकिनेही काही सांगितलं नाही. बारावीला चांगले गुण मिळवायचे म्हणून क्लास लावला. कॉलेज आणि क्लास करून आठ वाजेपर्यंत दीदी घरात यायची. 
       एकदा दहा वाजून गेले तरी दीदी घरी आली नाही. क्लासमध्ये फोन केल्यावर "श्रावनी आज आलीच नाही". म्हणून सांगितलं. ते ऐकून काय करावं आणि काय नाही त्याला समजतच नव्हतं. बायकोचे डोळे रडून रडून लाल झाले होते. "माझ्या ताईला काही झालं नसेल ना" म्हणून रडत रडत होती. बापाचेही  मन रडू पाहत होतं पण तो रडला तर बायकोला कोण आधार देणार ? आधारस्तंभच जर गळून पडला तर त्याला कोण आधार देणार ?
काही वेळाने तो सहज चालत चालत  टेबलाजवळ गेला त्याला चिठ्ठी दिसली. चिठ्ठीत लिहिलं होत...
"बाबा माझ एका मुलावर जीवापाड प्रेम आहे. तो खूप श्रीमंत आहे. तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य एका छोट्याशा खोलीत काढल. मला माझा आयुष्य अस काढायचं नाही. तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून मीच माझ्या आयुष्याचा जीवनसाथी निवडला आहे. तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि पोलिसातही जाऊ नका तुम्ही मला शोधून परत घेऊन आला तर मी जिव देईन. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत."
                                                                                                                                   तुमची लाडकी,
                                                                                                                                         दिदी.
बापाचे पाणावलेले डोळे पत्र वाचत होते, तर पत्रातले शब्द त्याच्या काळजावर घाव घालीत होते. काल पर्यंत मला नवीन ड्रेस पाहिजे म्हणून हट्ट करणारी माझी दिदी असं कसं करू शकते हे त्याला कळतच नव्हतं.  जे हात दिदिला  डॉक्टर बनवायचे म्हणून झिजून गेले होते ते देवाकडे लेक परत यावी म्हणून विनवणी करत होते.  काट्याकुट्यातून चालणाऱ्या पायांमध्ये तर उभ राहण्याचदेखील बळ उरलं नव्हतं. 
बापाला कळतच नव्हतं चुकलं ते चुकलं काय?
स्वतः फाटक्या कपड्यात राहून लेकीला पाहिजे ते ड्रेस घेऊन देणं चुकलं का?
लेकीच्या आनंदात अनवाणी नवस फेडणं चुकलं का? 
स्वतः फुटका मोबाईल वापरत लेकीला मोठा मोबाईल घेऊन देण चुकलं का ? 
लेकीला डॉक्टर बनवण्याच स्वप्न बघन बापच चुकलं का?  स्वतःच्या संस्कारांवर ठेवलेला विश्वास चुकला का ?
लेकीला स्वतः चा स्वाभिमान समजण चुकलं का?
लेकिवर स्वतः पेक्षा जास्त जीव टाकणं चुकलं का?
बापाला अजून हेच कळत नाही आहे की शेवटी चुकलं ते चुकलं काय ? 
काय देण्यात कसर ठेवली होती म्हणून लेक काही महिन्यापूर्वी भेटलेल्या मुलासाठी  जन्मदात्यांना लाथाडून गेली.

2365. मेहनतीचा आणि बुद्धीचा सन्मान

 एक इंजिनियर मोटारसायकलचं इंजिन उघडून त्याचे पार्ट्स दुरुस्त करत होता. तेवढ्यात एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ त्याच्या गॅरेजमध्ये आले. इंजिनियर म्हणाला, “डॉक्टर, मी ह्या इंजिनचं हृदय उघडतो, व्हॉल्व्ह दुरुस्त करतो आणि पुन्हा लावतो. मग मला एवढा कमी पगार आणि तुम्हाला इतका मोठा मोबदला का?”
डॉक्टर हसले आणि त्याच्या कानात म्हणाले, “हेच करून दाखव, पण इंजिन चालू असताना!”
सगळ्यांनी हसावं असा हा प्रसंग वाटतो, पण त्यात खूप गहन अर्थ आहे — जिवंत शरीरावर शस्त्रक्रिया करणं हे मृत यंत्र दुरुस्त करण्यापेक्षा कितीतरी अवघड काम आहे. डॉक्टरांचा प्रतिसाद बुद्धिमान आणि वास्तव दाखवणारा आहे.
पण इंजिनियरही थोडा कमी नव्हता. तो हसतच डॉक्टरांच्या कानात म्हणाला, “मी कोणतंही मृत इंजिन पुन्हा जिवंत करू शकतो, तुम्ही करू शकता का?”
ही ओळ ऐकून डॉक्टरही थबकले. कारण इंजिनियरने आपल्या कामाचं मूल्य कमी समजून घेतलं नाही. त्याने हे दाखवून दिलं की प्रत्येक क्षेत्रात कौशल्य, परिश्रम आणि ज्ञानाचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं.
हा संवाद म्हणजे केवळ विनोदी प्रसंग नाही, तर दोन वेगवेगळ्या जणांच्या मेहनतीचा आणि बुद्धीचा सन्मान आहे. एक जीवन वाचवतो, तर दुसरा यंत्रांना पुन्हा जीवन देतो. दोघेही आपल्या आपल्या क्षेत्रात देवाचा हात धरून काम करणारे कलाकार आहेत.
खरंच…
Classic and Epic! 🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹

2364. फॅशनच्या नावाखाली धर्म बदनाम होतोय

 फॅशनच्या नावाखाली धर्म बदनाम होतोय. खुप छान मेसेज आहे. नक्की वाचा आणि विचार करा.
एका कुटुंबाला लग्नापूर्वी वराने मागितलेल्या असामान्य मागण्या पाहून धक्का बसला. पण या हुंड्याशी संबंधित मागण्या नव्हत्या - त्या लग्नाच्या परंपरांमध्ये प्रतिष्ठा, साधेपणा आणि आदर परत आणण्याबद्दल होत्या.
वराच्या अटी, ज्याची आता शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे, त्या खालीलप्रमाणे होत्या:
१) लग्नापूर्वीचे कोणतेही शूट(pre wedding shoot )केले जाणार नाही.
२) वधू साडी घालेल, लेहेंगा नाही.
३) लग्नादरम्यान मोठ्या आवाजातील, अश्लील संगीताऐवजी फक्त सुगम वाद्य संगीत वाजवले जाईल.
४) वरमाला (हारांची देवाणघेवाण) दरम्यान, फक्त वधू आणि वर स्टेजवर उपस्थित असतील.
५) वरमाला दरम्यान वधू किंवा वराला उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही समारंभातून बाहेर पडण्यास सांगितले जाईल.
६) एकदा पुजारी लग्नाच्या विधी सुरू केल्यानंतर, कोणीही त्याला अडथळा आणणार नाही.
 ७) छायाचित्रकार/व्हिडिओग्राफर फोटोग्राफीसाठीच्या विधींमध्ये व्यत्यय आणणार नाहीत किंवा थांबवणार नाहीत - फोटो दूरवरून शांतपणे घ्यावेत.
हा पवित्र अग्नीपूर्वीचा पवित्र विवाह आहे, चित्रपट शूट नाही.
८) छायाचित्रकारांनी सांगितल्याप्रमाणे वधू आणि वर कॅमेऱ्यासमोर अनैसर्गिक पोज देणार नाहीत.
९) लग्न समारंभ दिवसा झाला पाहिजे आणि बिदाई (निरोप) संध्याकाळपर्यंत पूर्ण झाली पाहिजे.
यामुळे पाहुण्यांना रात्री उशिरा जेवणामुळे (ज्यामुळे अनेकदा निद्रानाश, आम्लता किंवा अपचन होते) त्रास होणार नाही आणि ते वेळेवर आरामात घरी परतू शकतील याची खात्री होते.
१०) जो कोणी नवविवाहित जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी मिठी मारण्यास किंवा चुंबन घेण्यास सांगेल त्याला ताबडतोब कार्यक्रमस्थळावरून काढून टाकले जाईल.
असे वृत्त आहे की वधूच्या कुटुंबाने या सर्व अटी आनंदाने स्वीकारल्या आहेत!
✨ समाज सुधारण्याच्या दिशेने एक सुंदर पाऊल - खरोखरच सर्वांनी अनुकरण करण्यासारखे आहे.
लग्न हे एक पवित्र मिलन आहे, देखावा नाही.
परंपरेचा आदर करा, प्रतिष्ठा राखा आणि निरर्थक दिखावा टाळा.
 कृपया हे तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा - प्रत्येक उत्सव आनंदी, सुंदर आणि आदरयुक्त होऊ द्या. 🙏

2363. भाऊबीज

       खर तर ऑफीसला दिवाळीच्या सुट्या होत्या. पण एकट्यान घरी राहुन करायच काय म्हणुन तो ऑफिसला येऊन बसला होता. मुग्धा माहेरी गेलेली होती. सासरी फारस रहायला त्याला आवडत नव्हत म्हणुन त्यान तिच्याबरोबर जाण टाळल होत. दुपारपर्यंत ऑफिसमधे काम केल्यानंतर आता निघाव आणि कुठतरी बागेत वगैरे निवांत जाऊन बसाव अस त्याच्या मनात आल.तो गाडीकडे निघाला तस सिक्युरीटी ने मागुन हाक मारली  'सर,काही मिठाई चे बॉक्सेस आले आहेत सप्लायर्स कडुन. टाकुन देऊ का गाडीत?' खर तर त्याला त्या मिठाईच्या बॉक्सेस मधे फारसा इंटरेस्ट ही नव्हता आणि एकट्या माणसाला काय करायचे येवढे बॉक्सेस म्हणुन त्याने सिक्युरीटीला सांगितले 'घेऊन जा तुझ्या घरी, नको मला'  तरीही सिक्युरीटीने दोन मिठाईचे डबे त्याच्या गाडीत टाकलेच.
    तो निघाला. गाडीत बसला. गाडी स्टार्ट केली आणि रस्ता फुटेल तिकडे गाडी चालु लागली. रस्त्यांवर फारशी गर्दी नव्हती. त्याला ही काही घाई नव्हती. संथपणे गाडी चालत होती. डोक्यातही विचारांची गर्दी नव्हती. सिटी गार्डन जवळ गाडी पोहोचली. आज पार्कींगला ही बरीच जागा होती. त्याने गाडी लावली आणि बाहेर पडला. गार्डनकडे वळणारच तेवढ्यात मागुन आवाज आला. 'साहेब खुप छान साड्या आहेत. घेऊन जा तुमच्या बहीणीसाठी. भाऊबीज आहे आज'. त्याने मागे वळुन बघितल तर एक फेरीवाला पाठीवर साड्यांचा गठ्ठा घेऊन उभा होता. त्याला साड्यांशी ही काही देणघेण नव्हत कारण त्याला बहीण ही नव्हती आणि मुग्धाला साडी नेसण फारस आवडत नव्हत. 'साहेब घ्या ना एखादी साडी. सण असुन फारसा काही धंदा नाही. क्रृपा करा गरीबावर' पुन्हा फेरीवाल्याचा आवाज आला. तस तर तो साडी घेणार नव्हता तरीही फेरीवाल्याची आर्जव म्हणा की त्याला असलेला मोकळा वेळ म्हणा त्याने साड्या बघायला सुरवात केली.तो साड्या बघत होता फेरीवाल्याची बडबड ही ऐकत होता. करोनामुळे कसा धंदा बसला आणि दिवाळीत ऑनलाईन वाल्यांच्या सेल, जाहीराती मुळे त्याच्यासारख्या लहान व्यापार्‍यांवर कशी संक्रांत कोसळली वगैरे वगैरे. फेरिवाला सांगत होता.दरम्यान एक निळ्या रंगाची साडी त्याला आवडली. फेरीवाल्याकडुन काहीतरी घ्याव तेवढीच त्याला मदत होईल या भावनेन त्यान ती साडी विकत घेतली आणि गाडीच्या मागच्या सीटवर टाकली.फेरीवाला त्याला धन्यवाद देऊन दुसर्‍या गिर्‍हाइकाच्या शोधात निघुन गेला.
     जवळच एक रेस्टॉरंट होत. तिथे जेवण करुन बागेत शतपावली करुन तिथेच असलेल्या एक बाकडयावर तो विसावला. त्याने साडी का विकत घेतली हा विचार करुन तो ही मनातल्या मनात हसत होता. तासभर विसावल्यानंतर आता निघाव म्हणुन उठला आणि गाडीकडे चालु लागला. तो गाडीच दार उघडणारच येवढ्यात समोर त्याला एक स्त्री दिसली आणि त्याला वाटल हिला कुठेतरी बघितल आहे आणि त्याला आठवलही. ती वेदिका होती. घरोघरी किंवा अॉफिसांमधे डोअर टु डोअर फिरुन शेविंग ब्लेड वगैरे विकणारी सेल्स वुमन. साधारण गरीब परिवारातली. एकदा अॉफिसच्या बाहेर शेविंग ब्लेड विकतांना त्याला भेटली होती. एकदा तिच्याकडुन ब्लेड, क्रीम इ त्याने विकत घेतल होत. त्यानंतर साहेब काही ना काही घेतातच म्हणुन ती नेहमी यायला लागली. गरीबांबद्दल नेहमीच सहानुभूती म्हणुन तो ही तिच्याकडुन काहीतरी विकत घ्यायचाच. वर्ष दोन वर्ष तरी तिच येण चालु होत. त्याने तिला हाक मारली 'मला ब्लेडस विकत घ्यायचेच होते बर झाल तु भेटली' तो हसुन बोलला. मात्र तिच्या चेहर्‍यावर विषण्णता होती. 'नाही साहेब. मी आता ते काम करत नाही. माझी नोकरी गेली'. ती बोलत होती तो ऐकत होता. 'करोनामुळे नवरा गेला. तीन पोरांची जबाबदारी आली माझ्यावर. उदरनिर्वाहासाठी धुणीभांडीच काम सुरु केल. कसतरी करुन घर चालवते आहे. मुलं दिवाळीच्या मिठाईचा हट्ट करत होते म्हणुन आले बघायला मिळेल का काही स्वस्तात. पण नाही मिळाली'. ती पडलेल्या चेहर्‍याने सांगत होती.
     मिठाई? मुलांसाठी? त्याचे डोळे चमकले. त्याला आठवल. मघाशी सिक्युरीटीने त्याच्या गाडीत काही मिठाईचे बॉक्सेस टाकले होते. त्याने गाडीच मागच दार उघडल. मिठाईचे बॉक्स उचलताना त्याला शेजारीच पडलेल साडीच पॅकेटही दिसल. त्याने ते ही उचलल आणि तिच्या हातात मिठाई आणि साडी सोपवली. तिने नकाराचा थोडा प्रयत्न केला पण तो तिच्या गरजेपुढे पुरेसा नव्हता. मिठाई आणि साडी घेऊन ती घराकडे चालु लागली. तो ही गाडीत बसुन घराकडे निघाला. मात्र फेरीवाल्याच ते बोलण त्याच्या कानात घुमत होत. 'साहेब भाऊबीज आहे आज बहीणीसाठी साडी घेऊन जा'. ध्यानीमनी नसताना त्याची भाऊबीज साजरी झाली होती.

झाकीर शेख
९८२३०३०२७३

2362. तारे जमीन पर.

सत्य घटनेवर 100% आधारित        
        "तारे जमीन पर..."
  
        2007 साली तारे जमीन पर. हा अमिरखान चा सिनेमा आला आणि संपूर्ण आई, वडिलांमध्ये आपल्या पाल्याची कुवत पाहून त्यावर अपेक्षांच ओझं टाकायचं हि शिकवणच देऊन गेला. खरतर Dyslexia हा अभ्यासातील एक आजार आहे. हे तो सिनेमा पाहून पहिल्यांदा समजलं.
     वर्षा म्हणाली. हा सिनेमा पहिला तेव्हा प्रत्येक आई अगदी हमसून हमसून रडली. त्या रडण्यात मी सुद्धा होती. कारण माझ्या बहिणीच्या मुलीला हाच आजार होता पण माहित नव्हते. त्यामुळे  तेच ते खूपदा शिकवून पण. उत्तर लिहीता ये नसेल तर संताप व्हायचा आणि आपसूकच मारायला हात पुढे यायचा पण ती रडणारी मी. आई नसून मावशी होते आणि आजही जेव्हा जेव्हा तो सिनेमा पाहते. डोळे आपसूकच गळायला लागतात.
      खरतर आम्ही दोघी बहिणी दोघी जावा. जवजवळ सात, आठ वर्ष एकत्रच राहिलो. मग घर लहान पडायला लागलं आणि वेगळं राहायचा निर्णय घेतला.  माझी ताई विभा. नोकरी करणारी. तिला तीन मुली. मला दोन मुलं. सक्ख चुलत असं. असं आमच्यात काहीच नव्हतं. विभा नोकरी करायची. वर्षा अधे मध्ये जाऊन मुलींचा अभ्यास घ्यायची. मोठ्या दोघी सांगितलेला अभ्यास बरोबर करायच्या. धाकटी मात्र काहीच करत नव्हती. कितीही शिकवले तरी पाटी कोरीच.
     कधी कधी दोघी बहिणी गप्पा मारत बसलो की हमखास धाकटीचा विषय निघायचा. ती म्हणायची. वर्षा कसं होईल ग या पोरीचं? तू अभ्यास घेते. क्लास लावला. वेळ मिळेल तसा मोठया बहिणी पण अभ्यास घेतात. इतकी कशी ढं असेल ग हि मुलगी? 
वर्षा म्हणायची. ताई मला वाटते हि मुदाम असं करत असेल. अग मी आता हिच्याकडून वाचून आणि लिहून घेतले. परत वाचायला लावले तर काहीच वाचता येत नाही ग.   माझं तर डोकचं काम करत नाही. ताई आज तर मी तिला चांगले बदडूनच काढले. काहीच कळत नाही. कसा अभ्यास घ्यावा. 
     वर्षा म्हणाली ताई आपली मातृभाषा मराठी आणि आपण हिला इंग्लिश मिडीयम ला टाकले. कदाचित तिला ते झेपत नसावं. तशी ती वाचतांना कधी बी ला... डी... आणि डी... ला... बी...नेहमीच बोलायची. बरं मराठी वाचायला सागितलं तर काना. मात्रा...वेलांटी...उकार...सगळाच प्रॉब्लेम.
     शेवटी असं ठरवलं. मातृभाषेत तिला शिकवायचं. त्यात तरी प्रगती होईल थोडीफार आणि मग कल्याणच्या कॅप्टन ओक शाळेत भाऊ टीचर त्याच्या वशिल्याने ऍडमिशन घेतली. गणवेश, शूज  सगळं घेतलं. तेव्हा ती सहावीत होती. पण तिथेही सहामाइत नापास. वार्षिक परीक्षेत धक्का देऊन सातवीत गेली. पण हिची अजूनच अधोगती झाली. कारण वर सांगितल्या प्रमाणे...काना, मात्रा, वेलांटी, उकार सगळंच कठीण. त्यात काही शब्द कनफ्युज करणारे...श, स, ष, ळ ,ल तिला वाचायला लावले की...काहीही बोलायची...खूप राग यायचा...आपसूकच एक धपाटा दयायला हात पुढे व्हायचा...
     आणि ती सातवीत जवळ जवळ सर्व विषयात नापास झाली. ओक शाळेच्या प्रिन्सिपॉल बोलल्या.आम्ही हिला शाळेत नाही ठेऊ शकत. खूप प्रयत्न करतोय पण हिला वाचताच येत नाही. लिहिण्यात इतक्या चुका की पेपर तपासणारा पागल होईल. ठीक आहे असं म्हणून तिला शाळेतून काढलं.  मग मोर्चा वळवला मोहिन्दर शिंग काबुल सिंग शाळेकडे. तिथले प्रिन्सिपॉल  बोलले. आम्ही हिला ऍडमिशन नाही देऊ शकत. पण हो एक काम करू शकता. हि रोज शाळेत येऊन बसेल. तिची हजेरी होणार नाही.फक्त परीक्षा घेऊ आणि जे शिकवलं ते तिला थोडंफार तरी कळले. त्यालाही तयार झालो. क्लास. घरी अभ्यास. सगळं जमेल तसं करत होतो. पण पुढे पाठ मागे सपाट. तिथेही नापास झाली. एक वर्ष पुंन्हा आठवीत रिपीट केलं. परिणाम शून्य. पण प्रत्येक जण आपलं नशीब घेऊन येत. तसंच काहीतरी रुचीच्या बाबतीत घडलं. त्यानीं दहावी पर्यंत तिला शाळेत बसू दिले. नंतर म्हणाले. तुम्ही हिचा दहावीचा सतरा नंबर फॉर्म भरा आणि इथे वर्गात रोज बसून अभ्यास करायला सांगा.
      रुचिची मोठी बहीण डेंटिस्ट झाली होती आणि तिचा होणार नवरा पण डेंटिस्ट होता. त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोला म्हणजे दिव्याला हा एक आजार आहे आणि यावर हमखास इलाज सुद्धा आहे. हे एकदा बोलला होता. त्यातच दिव्या ठाकुर्लीला एका ठिकाणी प्रॅक्टिस करत होती. ती प्रॅक्टिस करायला जायची. तिथे एक पेशन्ट तिथल्या डॉक्टर सोबत या बाबत बोलत असताना दिव्या म्हणजे रुचिची मोठी बहिणी हिने ऐकले. तो पेशन्ट  ट्रीटमेंट करून जायला निघाली. दिव्या  excuse me  म्हणून तिथून निघाली. बाहेर येऊन त्या पेशंटला अभ्यासातील या आजारा बद्ल सगळं विचारलं. हा एक प्रकारचा आजार आहे. हा आजार असलेले विद्यार्थी थोडंफार लिहतील. पण वाचतांना शब्द जम्पिंग करतात आणि ते अभ्यास करू शकत नाही. त्यावर एक उपाय आहे. फक्त तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी चालेल.  दिव्या रुचिची मोठी बहीण बोलली. मॅडम काय करावे लागेल ते सांगा? आम्ही नक्की प्रयत्न करू. माझी आई आणि मावशी हिच्या विचाराने खूप टेंशन मध्ये असतात.आई तर रात्र रात्र झोपत नाही. मग त्यानीं सांगितले. तुम्हाला  परेलचा अड्रेस देते तिथे जा. तिथे तिच्या बऱ्याच टेस्ट  होतील.
     त्यानंतर काँसिलिंग.
    जवजवळ दीड पावणेदोन वर्ष ह्या ट्रीटमेंट चालतात. त्यानंतर तिला बॉम्बे कॉर्पोरेशनचे साइन हॉस्पिटल आहे तिथे न्यावे लागेल. तिथे तिच्या बऱ्याच टेस्ट होतील. त्यानीं आधीच सागितलं होत. जवजवळ दोनेक वर्ष तरी जातील..तिथे तज्ञ डॉक्टर तिला बघतील. लिहायला वाचायला लावतील. तिचा नेमका काय प्रॉब्लेम आहे हे सांगतील आणि जर तिला Dyslexia हा आजार असेल तर तिला त्या हॉस्पिटल मधून एक सर्टफिकेट मिळेल. त्याचा फायदा असा होईल की तीने जे काही लिहीलं ते पेपर तपासणाऱ्याने तिला नेमकं काय म्हणायचं आहे हे समजून घ्यायचा आणि मार्क दयायचे. शिवाय त्यानां पेपर साठी प्रत्येक तासाला पंधरा मिनिटं. जास्त वेळ दिल्या जाईल. 
   आणि हो अजून एक महत्त्वाचं. या मुलांचे ठाकुर्लीला वेगळे क्लास असतात. त्यानां तिथे अबकड...पासून abcd परंत सगळं शिकवतात. या मुलांच्या शब्द लक्षात राहत नाही. म्हणून मग विशेष अकॅशन करून सांगतात .त्यामुळे तो शब्द त्याचा पक्का लक्षात राहतो. पण त्याची फी खूप जास्त आहे. दिव्या म्हणाली. मॅडम साधारण किती फी असू शकेल. नक्की आकडा नाही सांगत येणार. पण तीन ते पाच हजार प्रतिमाह फी नक्की असेल. झालं दिव्या घरी आली आईला सगळं सागितलं.नेमके वडील साइन हॉस्पिटलला स्टोअर किपर होते. 
      दिव्या रुचीला घेऊन परेलच्या हॉस्पिटल मध्ये गेली. तिच्या सगळ्या टेस्ट झाल्या. जवजवळ दोन  वर्ष गेली ह्या सगळ्या टेस्ट करण्यात. तोवर तिला ठाकूरलीला क्लास लावला होता.. महिना तीन हजार रुपये. तिला वाचता येत नव्हतं म्हणून दिव्या तिचा अभ्यास घेतांना ती वाचायची आणि रुचीला सांगायची तू लक्ष देऊन एकत राहा. निदान काहीतरी तर लिहिलं पेपरात. इथेही दैवाने रुचीला साथ दिली. तिला Dyslexia हा आजार आहे हे सिद्ध झालं.
     त्या सर्टिफिकेट मध्ये असं लिहिलं होत की ह्या मुलीला Dyslexia हा लिहिण्या आणि वाचण्यातला आजार आहे. त्यामुळे परीक्षकांनी पेपर तपासताना त्या विद्याथ्याला नेमके काय म्हणायचे आहे हे समजून घेऊन मार्क दयावे. त्यान्च्या काना, मात्रा, वेलांटी, उकार..तसेच इंग्लिश चे स्पेलिंग समजून मार्क द्यावे. शिवाय प्रत्येक पेपरला एकतासाला पंधरा मिनिटं जास्त असा वेळ दयाव. कारण त्यानां काना की मात्रा हा विचार करायला फार वेळ जातो.
     झालं रुचीला हे सर्टफिकेट मिळालं. तिथूनच ते यूनिव्हर्सिटीला गेलं. तिथून तिने ज्या शाळेतून फॉर्म भरला. त्या मोहिन्दर शिंगच्या  प्रिन्सिपॉलला...पाठवले. त्यानीं त्याच्या झेरॉक्स काढूनदहावीच्या परीक्षा सेंटरवर पाठवले. वर्गावर जे सर  किंवा मॅडम असतील त्यानां हि झेरॉक्स द्यायला सांगितली आणि  हि झेरॉक्स तिच्या पेपरच्या मागे जोडायला सांगितली. प्रत्येक वेळी ती जोडलीकी नाही हे रुचीला बघायला सांगितले. खरतर रुचीचे नशीब खूप बलवत्तर. दहावीच्या एक महिना आधी हे सर्टफिकेट मिळाले.
      आणि आज तो दिवस आला. दहावी बोर्डाच्या परीक्षेचा. रुचीला उत्तर पाठ असायचे. पण लिहितांना सगळंच जम्पिंग...जम्पिंग..एकदाची परीक्षा सुरु झाली. सेंटर वर सरांना सागितलं तर सुरवातीला सर म्हणाले. असं सर्टिफिकेट कुठे असत का? तुम्ही खोट बोलता. पण जेव्हा त्यानां हे शासकीय पत्र आहे असं समजलं आणि मग त्याची खात्री पटली. नंतर प्रत्येक पेपर ला सर्टफिकेट जोडले गेले. रुची घरी येऊन बऱ्यापैकी उत्तर द्यायची. आता फक्त  ती पास होईल का?  हि धाकधूक होतीच. संपल्या एकदाच्या परीक्षा आणि सगळ्यांनीच सुटकेचा निःस्वास् सोडला. आता जे काय होईल ते तिच्या नशिबाने. सगळीकडे बातम्या. उद्या दहावी चा निकाल. आई शपथ...! रात्रभर झोप लागली नाही. एकदाचे बारा वाजले. Online निकाल जाहीर झाला आणि रुची पास झाली. तुम्हाला आठवत असेल. तेव्हा अमिताभ बच्चनची एक जाहिरात होती. अपना पप्पू पास हो गया. 
    तशीच काहीशी आमची गत  झाली होती...पेढे आणून देवा समोर नैवेद्य ठेवला. म्हटलं देवा अशीच कृपादृष्टी राहू दे या पोरीवर...मग पेढे वाटले...रुचीला चागले 56 % मार्क मिळाले. त्या दिवशी खरं सांगते. आम्ही फटाके उडवले.
लोक विचारत होते.
 अहो तुमची मुलगी मेरिट बिरीट आली की काय..?
 त्यानां म्हणाले..! 
 हो आमच्यासाठी ती मेरिटच आहे..! 
 कारण ती पास होईल हीच आम्हाला शास्वती नव्हती.ती पास झाली..म्हणजे आमच्या साठी मेरिटच.
 रात्री मस्त गोडाच जेवण बनवलं. आता पुढचा प्रवास पाहिजे तितका सोपा नव्हता  आणि मग अकरावी साठी प्रवेश कुठे आणि कसा मिळेल याचा विचार सुरू झाला.  प्रकाश मूथा आमच्या ओळखीचे. त्याचंच मूथा कॉलेज. मग तिथे ऍडमिशन घेतली. सोबत  Dyslexia च सर्टिफिकेट जोडले. अकरावी जशी तशी पास झाली. बारावीला गेली. बारावीचा क्लास. तिचा तो Dyslexia चा वेगळा क्लास. घरी अभ्यास आणि तिची पुढची कसोटी सुरु झाली. आता कॉलेज सुरु झाले तेव्हाच ते Dyslexia   चे सर्टिफिकेट दिले. त्यामुळे अकरावी सुखकर झाली. आता बारावी आणि यावरच पुढचं भविष्य होत. सुरवातीलाच बोर्डाकडे सर्टफिकेट पाठवले.
    आणि पुन्हा परीक्षेच्या वेळेला तिला. दर एक तासाला पंधरा मिनिटं जास्त वेळ आणि चुका समजून घेणे. प्रत्येक answer sheet ला ते सर्टफिकेट जोडले गेले. असं सगळं दहावी सारखंच झालं आणि तो दिवस उजाडला. बारावीचा रिझल्ट  आणि रुची बारावी 62% मार्क घेऊन पास झाली. पुन्हा आमच्या घरी फटाक्यांची आतषबाजी झाली. प्रश्न होता आता पुढे काय? मग कुणीतरी सागितलं ज्वेलरी डिझायनिंग करा. त्यात प्रॅक्टिकल जास्त लिखाण कमी असत.
   झालं SNDT कॉलेजला ऍडमिशन घेतली. त्यानां तिचे सर्टफिकेट दाखवले. ते म्हणाले असं काही नसतं. त्यानीं साइन हॉस्पिटलला फोन लावला आणि त्यानीं त्याबद्दल योग्य मार्गदर्शन केले. SNDT च्या प्रिन्सिपॉलला तिच्या अभ्यासा बद्दल  शंका होती. हिला ईतका अभ्यास झेपेल की नाही. मग त्यांनी ऍडमिशन  झाल्यावर रुचीच्या आई बाबांना बोलावून घेतले. म्हणाले रुचीचे आईबाबा. हा course खूप कठीण आहे. तिला हे झेपेल असं वाटत नाही. त्यामुळे उगाच तुमची 1,50,000 इतकी फी वाया जाईल. बघा आम्ही तुम्हाला सावध करायचा प्रयत्न करतो. कारण इथे लेक्चर घेणारे बाहेरच्या देशातील असतात. तिची आई म्हणाली आम्ही एक वर्ष तिला नक्की देऊ. पेपरात कमी मार्क मिळाले तरी प्रॅक्टिकल आणि ओरल नक्की कव्हर करेल. एकदा फी वाया गेली असं समजू आणि तिला त्याच कॉलेज मध्ये ठेवले आणि काय आश्चर्य ती फर्स्ट क्लास मध्ये पास झाली. सरांना सुद्धाआश्चर्य वाटले.
    आणि तिन्ही वर्ष तिने फर्स्ट क्लास सोडला नाही. आता ती TBZ मध्ये ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करत आहे.
एक बहीण दिव्या डेंटिस्ट, दुसरी सुनिधी फॅशन डिझायनिंग आणि हि रुची. जीची दहावी पास ची अपेक्षा नव्हती ती ज्वेलरी डिझायनिग.
      अश्या प्रकारे आमच्या रुचीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.  पण जेव्हा जेव्हा "तारे जमीन पर..." हा  सिनेमा लागतो. वर्षा, रूचीची  मावशी खूप रडते. कारण तिचा आजार माहित नव्हता. त्यामुळे तिने तिला खूप  खूप मार दिला.
   रुची म्हणते जाऊ दे ग मावशी. माझ्या भल्यासाठीच धडपडत होतीस ना. कदाचीत तुझ्या माराच्या धाकाने मी जास्त अभ्यास केला असेल आणि चागले मार्क्स मिळाले असेल. आता झालं न सगळं तुझ्या मनासारखं...मग आता रडू नको...,डोळे पुस बघू...!
    
समाप्त.     
सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण

2361. बेबी सीटर

       गौरीने चार वर्षांच्या प्रियलचा हात पकडला. एक हातात पर्स, दुसऱ्या खांद्यावर प्रियलची दिवस भराच्या खाण्या सामानाची बॅग. छोटीशी स्कुल बॅग प्रियलच्या खांद्यावर अडकवली.
    प्रियल सारखी रडत होती. "मी नाही जाणार तिकडे...नको ना ममा तू सोबत ने मला" हात ओढत होती. सिमताईंच्या पळणाघरात एकूण चार मुलगे,तीन मुली होत्या. ती सर्व प्रियल हून लहान होती. ती एकटी चार वर्षांची होती. गौरीला कळेना आज ही असं काय करतेय? गौरीने तिला जवळ ओढले, मायेनं तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिने काळजीने प्रियलकडे पाहिलं. खूप केविलवाणा चेहरा झाला होता, डोळ्यात पाणी बघून गौरीला गलबलून आलं. प्रियल रडता रडता बोलत होती. अचानक तिने गौरीचा हात खेचला. "ममा ममा मला भीती वाटते, नाही जायचं ग मला. सगळे झोपतात. काका मला जवळ घेतात. मला नाही जायचं" गौरीने आधी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. नन्तर ती खाली बसली प्रियल ला जवळ घेतलं. आणि अगदी मायेनं विचारलं."पियू बेटा रडू नको पुन्हा मला सांग."
प्रियल ने आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं, आणि ती आईला बिलगली.
"ममा तिकडे सोनू, परी, राहुल, नितु सगळे झोपतात. मला नाही येत झोप."
"तू काय करते मग?"
"काकू पण झोपते, मी खेळते मग माझ्या चिनू बरोबर.जरावेळ खिडकी जवळ बसते."
"मग त्यात रडायला के झाले?"
"काल मला काकांनी उचलून घेतलं माझे पापे घेतले."
   आता गौरीला थोडा थोडा प्रकार ध्यानात येऊ लागला. ती घाबरली. सीमा ताईचा नवरा रिक्षा चालवत होता. दिवसभर तो सीमाताईला मदत करायचा आणि संध्याकाळी रिक्षा वर जात असे. दोन वर्षांपासून ती प्रियलला त्यांच्याकडे ठेवत होती.
   गौरी हबकलीच तिला एकदम धक्का बसला. डोकं गरगरायला लागलं. पट्कन तिनं प्रियलला जवळ घेतलं.
"पियू बेटा काय करतात काका? चांगले आहेत ते." 
 "नको वाईट आहेत ते...मला नाही आवडत."
असं बोलून ती आणखीनच रडायला लागली.
"ठीक आहे. आज मी शाळेत नाही जात आपण घरी जाऊ  चालेल?"
     प्रियल शांत झाली. दोघी घरी आल्या. महेश सकाळी कामाला गेला होता. तिने घरी आल्यावर प्रियलला जवळ  घेऊन पुन्हा विचारले. गौरीची धडधड वाढली होती. नको नको ते विचार मनात येत होते. ती एकटक आपल्या चिमुकल्या लेकीकडे पहात होती. गौरी भानावर आली. पियू बोलत होती. "ममा ते काका माझे कपडे काढतात आणि." ती पुन्हा रडायला लागली. गौरीने तिला शांत केले. पण आता ती चांगलीच हादरली होती. तशीच तिरमिरीने उठली. नाही नाही हादरून चालणार नाही. तिने लगेच महेशला फोन लावला.
"आत्ता लगेच घरी ये." ती रडत होती. गौरीचा आवाज ऐकून तोही घाबरला ."तू घरी ये मग मी तुला  सांगते."
"ओके येतो" त्याने हाफ डे रजा टाकली. तडक घरी आला. तिने त्याला सविस्तर सांगितले. प्रियल शांत झोपली होती
 "चल, त्याला धडा शिकवलाच पाहिजे. हरामखोर कुठला, बेअक्कल." तो रागाने थरथरत होता.
"नको नको असा धडा शिकवायला आपण पोलिसात जाऊया."
      महेशने तसेच प्रियलला उचलून घेतले. जवळच असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये गेले. अगोदर तक्रार लिहून घ्यायलाच कोणी तयार नव्हते. नन्तर तिथल्या महिला पोलिसला काय वाटले कुणास ठाऊक? तिने तक्रार लिहून घेतली.
"आधी तुमच्या मुलीला डॉक्टर कडे घेऊन जा. तपासणी करून रिपोर्ट्स आणून द्या." त्या महिला पोलिसने सांगितले. महेशने फॅमिली डॉक्टरांना फोन लावला. ते क्लिनिक मधेच होते. तशीच रिक्षा करून ते तिथे पोहोचले. प्रियल तपासणी करून देत नव्हती. डॉक्टरने इंजेक्शन देऊन तिला झोपवली. मग तपासणी केली. महेश पुरता संतापला होता. त्याच्या हातात असते तर त्याने क्षणाचाही विचार केला नसता. गौरी तर भकास पणे बघत होती. प्रियलची ती जागा लाल झाली होती. इंटर्नल दुखापत निघाली नाही. पण त्या राक्षसाने प्रयत्न केला होता.
     दोन पोलिसांना घेऊन थेट सीमाताईचे घर गाठले. तिचा नवरा घरातच होता. सीमाताईला कळेचना काय प्रकार आहे? पोलिसांच्या पाठोपाठ प्रियलचे आई बाबा आले होते. पोलिसांनी तिच्या नवऱ्याचा हातात बेड्या ठोकल्या, आणि गाडीत कोंबले. झाला प्रकार सिमताईंच्या ध्यानात आलं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मटकन खाली बसून घेतलं. समाजात नाचक्की तर झालीच पण पोट भरण्याचा व्यवसायही गेला. सरकारी हॉस्पिटल मधून
    डॉक्टर्सचे रिपोर्ट्स आणि महेशने दिलेला भक्कम आणि हुशार वकील. केसचा निकाल लागला त्या नराधमाला सजा झाली. पण अशा किती प्रियल असतील? अबोध कळ्या? महेश आणि गौरीच्या प्रश्नांची उत्तरं .अनुत्तरित होती.

नलिनी उर्फ भाग्यश्री कुडुक - ठाणे.

2360. औषध

   सगळ्यात मोठे कोणते पाप असेल, तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे. त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही. स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला यशापयशा सकट जर कोणी स्वीकारत असेल, तर ते म्हणजे फक्त आपले आई बाबा. नेमके आपण त्यांना आपल्या पासून दूर करण्याचा अपराध करतो. ते त्याचीही खंत करत नाहीत. पिल्लं शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दु:खं सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले, तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी करतात.  अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका.
    एक मेडिकलचे दुकान होते. औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. मेडिकल वाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता. त्याचा सहाय्यकही आपले काम चोखपणे पार पाडत होता. त्याच वेळेस रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती. बहुदा ती मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी. मेडिकल वाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले. तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली. आजीने त्याला पाहिले. तिला खुशाली वाटली. आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातली वाटत होती. मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे, असे विचारले. आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मेडिकलवाला म्हणाला, `काय झाले आजी, औषध घ्यायला पैसे नाहीत कां ?'
आजी म्हणाली, `पैसे आहेत, पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे कां ?'
मेडिकल वाला गोंधळला. त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला. तो आजीकडे नव्हता. आजी म्हणाली, 
`लेका, माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल. तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो,  दर सुटीत मला भेटायला येतो. पण गेली काही वर्षे तो भेटायला तर येत नाहीच, वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो. 
म्हणून मला एकच औषध हवे आहे, मला मूल आहे हे विसरण्याचे...आहे का रे ऽऽऽ तुझ्याकडे तसे औषध ?'
मेडिकलवाला नि:शब्द झाला. कारण, या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे, अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही. खरोखरच असे औषध निर्माण झाले, तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील.
मित्रांनो, सगळ्यात मोठे कोणते पाप असेल, तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे.  त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही. म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही, याची अवश्य काळजी घ्या.

2359. मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन ! ब्रेन डेड

      पुण्‍याच्‍या कोलंबिया एशिया हॉस्‍पिटलला न्‍युरोसर्जरी कन्‍सल्‍टंट म्‍हणून जॉईन होऊन मला एखादाच महिना झाला असेल. मुंबईच्‍या जे. जे. हॉस्‍पिटल मधून न्‍युरोसर्जरीची पदवी संपादन करुन, तिथे केलेल्‍या ५००० पेक्षा अधिक शस्त्रक्रियांचा प्रदीर्घ अनुभव घेऊन मी पुण्‍याला आलो होतो. 
 शनिवारी रात्री पूर्ण परिवारासोबत जेवण चालू होते. तेवढ्यात माझा फोन खणखणला. कोलंबिया एशियाच्‍या इमर्जन्‍सी रुम मधून फोन होता. डॉक्‍टर बोलत होते."सर, एका २० वर्षाच्‍या तरुणाला त्याचे नातेवाईक घेऊन आलेत. तीन तासापूर्वी त्याची गाडी स्‍लीप होऊन तो रस्‍त्‍यावर पडला होता. डोक्‍याला मार लागला आहे. सुरूवातीला त्‍याला जवळच्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये नेले होते. पण त्‍यांना तिथे कळले की, तो  जवळजवळ 'ब्रेन डेड’ आहे. पुढे काही करुन फार उपयोग होणार नाही. त्‍यामुळे ते पेशंटला इकडे घेऊन आलेत." 
 ‘ब्रेन डेड’ म्‍हणजे ज्‍या पेशंटचा श्‍वास बंद झाला असून मेंदूचे कार्य थांबलेले आहे व फक्‍त हृदय चालू आहे असा पेशंट ! मी डॉक्‍टरना विचारले की, "आता काय स्‍टेटस आहे? " त्‍यांनी सांगितले की, "सर त्‍याचा श्‍वास बंद पडलेला होता म्‍हणून आम्‍ही कृत्रिम श्‍वासाची नळी बसवली व व्‍हेंटिलेटरने श्‍वास देतोय. त्‍याचे दोन्‍ही प्‍युपिल्‍स (बुबुळ) डायलेट (पूर्णपणे प्रसरण पावलेले) झालेले आहेत." सहसा नॉर्मल माणसामध्‍ये डोळ्‍यांच्‍या बुबुळावर लाईट पडला की, ती आकुंचन प्रसरण पावतात. (परंतू ब्रेन डेड पेशंटमध्‍ये ती रिअ‍ॅक्‍शन दिसत नाही.) "सर, मी ब्रेन चा सी.टी. स्‍कॅन करून वॉट्सअ‍ॅपवर पाठवला आहे."
 मी स्‍कॅन उघडून पाहिला तर पेशंटच्‍या मेंदूमध्‍ये उजव्‍या बाजूला मोठा रक्‍तस्त्राव झालेला होता व पूर्ण मेंदू डाव्‍या बाजूला सरकला होता. स्‍कॅन बघितला आणि मी हातातला घास तसाच ताटात ठेऊन ताटावरून उठलो. कपडे बदलत बदलतच मी त्‍यांना सूचना दिल्‍या व ताबडतोब पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्‍ये घेण्‍यास सांगितले गाडीची चावी घेऊन पळतच मी घराबाहेर पडलो. तोच पप्‍पा म्‍हणाले "मी येतो सोडायला, तुम्‍ही केसच्‍या नादात गाडी फास्‍ट चालवाल!" सगळेचजणं जेवणावरून उठले. पण मी त्‍यांना सांगितलं, "काळजी करू नका. मी गाडी सावकाश चालवतो." मला १० वाजता फोन आला होता. केवळ ०७ मिनिटातच मी हॉस्‍पिटलमध्‍ये पोहोचलो. गाडी मी इमर्जन्‍सी रूमच्‍या दारापर्यंत नेवून तशीच सोडून दिली. दार उघडे, चावी गाडीलाच आणि मी पळतच हॉस्‍पिटलमध्‍ये घूसलो. सिक्‍युरिटी गार्डनी सांगितले, "सर पेशंट वरती आय.सी.यू. मध्‍ये शिफ्‍ट केलाय." लिफ्‍टसाठी न थांबताच जीना चढून मी पळतच आय.सी.यू. मध्‍ये पोहोचलो. पेशंटला बघितलं तर त्‍याची दोन्‍ही बुबुळं प्रसरण पावलेल्‍या अवस्‍थेत होती. श्‍वास पूर्णपणे बंद पडलेला  होता आणि व्‍हेंटिलेटर द्वारा श्‍वास देण्‍यात येत होता. 
 नातेवाईकांशी बोलणे गरजेचे होते.मी त्‍यांना म्‍हणालो," पेशंट वाचण्‍याचे चान्‍सेस ५% पेक्षा कमी आहेत. तरी देखील ऑपरेशन करावं हा माझा निर्णय आहे. कारण पेशंट तरुण आहे व मार लागून फार वेळ झालेला नाही. पेशंटला जगण्‍याची एक संधी द्यायला हवी. थोडा देखील वेळ वाया घालवला तर पेशंट हाती लागणार नाही.तुम्‍ही ठरवा ! "
 नातेवाईक चांगलेच हडबडले होते.त्यांचा अजूनही विश्‍वास बसत नव्‍हता. तीन तासांमध्‍ये सगळं होत्‍याचं नव्‍हतं झालं होतं ! ते कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नव्हते पण त्‍यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्‍य नव्‍हतं. मी जोरात ओरडलो," पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्‍ये घ्‍या." आजूबाजूला १०-१५ स्‍टाफ उभे होते. सर्वजण माझं ते रुप पाहून हादरले होते. बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटर मध्‍ये शिफ्‍ट केला. १० वा. १० मि. नी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता. 
      जनरली ऑपरेशन करण्‍याआधी इन्‍फेक्‍शन कंट्रोल म्‍हणून पेशंटचं डोकं बिटाडीन आणि सॅव्‍हलॉन ने १० मिनिटं स्‍वच्‍छ धुतलं जातं, तसेच ऑपरेशन करणारे डॉक्‍टर व नर्स देखील ७ मिनिटे वॉश घेतात आणि मगच सर्जरीला सुरूवात होते पण ती १७ मिनिटे सध्‍या मी देऊ शकत नव्‍हतो कारण मेंदूमध्‍ये प्रेशर खूपच वाढत होते आणि अशा अवस्‍थेत एका सेकंदाला हजारो न्‍यरॉन्‍सची (मेंदूच्या पेशी) डेथ होते (मरण पावतात). मेंदूमधील या मेलेल्या पेशी कधीही रिजनरेट (परत तयार ) होत नाहीत. त्‍यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करून झालेला रक्‍तस्त्राव बाहेर काढणे व मेंदूवरील प्रेशर कमी करणे गरजेचे होते. वॉर्डबॉयनी पटकन पेशंटचे केस कापले आणि तोपर्यंत मी वॉश घेऊन आलो. सिस्‍टरना सांगितले, "ऑपरेशनच्‍या साहित्‍याची ट्रॉली लावत बसू नका. सर्व साहित्‍य पसरून ठेवा. लागेल तसे साहित्‍य मी घेतो." ऑपरेशन थिएटर मधील सर्वजण अतिशय वेगाने काम करत होते. जणू काही प्रत्‍येकाला चार चार हात फुटले होते. आता प्रश्‍न होता भूलतज्ञांचा. त्‍यांना यायला ४-५ मिनिटे लागणार होती. आणि ते आल्‍यावरही पूर्ण भूल देण्‍यासाठी १०-१५ मिनिटे वेळ गेलाच असता. त्‍यामुळे मी पूर्ण भूल न देता जागीच भूल देऊन (लोकल अनेस्‍थेशिया) ऑपरेशन सुरू केले. मी कवटी ड्रील करण्‍यास सुरूवात केली आणि तोपर्यंत भूलतज्ञ आले. सहसा भूलतज्ञांनी परवानगी दिल्‍याशिवाय कोणताही पेशंट ऑपरेशन थिएटर मध्‍ये घेतला जात नाही. परंतु इथे सर्वच नियमांचे उल्लंघन झाले होते. पण त्‍यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मला एक शब्‍दही न विचारता पेशंटचा ताबा घेतला. मी कवटी उघडून रक्ताच्या गाठीपर्यंत पोहोचलो. साधारणपणे अर्धा लिटर रक्‍त गोठून रक्‍ताची गाठ तयार झाली होती व मेंदूवर प्रेशर निर्माण करत होती. मी रक्‍ताची गाठ काढून टाकली व मेंदूच्‍या रिस्‍पॉन्‍सची वाट बघू लागलो. पुढच्‍या १-२ मिनिटात दबलेला मेंदू पूर्वास्‍थितीत आला आणि मेंदूचे पल्‍सेशन हालचाल दिसू लागली. आता मी डोके वर काढून घड्याळाकडे पाहिले तर १० वा. २७ मि. झाली होती. म्‍हणजेच मला फोन आल्‍या पासून केवळ २७ मिनिटात ऑपरेशन पूर्ण होऊन त्‍याच्‍या मेंदूवरील प्रेशर काढून घेतले होते. आता मी पूर्ण टीमला रिलॅक्‍स होण्‍यास सांगितले व उर्वरित ऑपरेशन पूर्ण केले. 
     ऑपरेशन पूर्ण झाले होते. परंतु अजूनही मन बैचेन होते. काहीतरी चुकत असल्‍याची जाणीव होत होती. आज माझा सिक्‍स्‍थ सेन्‍स मला सांगत होता की काहीतरी अपूर्ण आहे. म्‍हणून मी लगेचच सीटी स्‍कॅन करून बघायचे ठरवले. पेशंटला ओ. टी. मधून डायरेक्‍ट सी.टी.स्‍कॅन युनिटमध्‍ये शिफ्‍ट करण्‍यात आले. आणि माझा अंदाज खरा ठरला. आता पेशंटच्‍या मेंदूच्‍या दुसर्‍या बाजूला (डाव्‍या बाजूला) रक्ताची तेवढीच मोठी गाठ तयार झाली होती. पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये हा रक्‍तस्त्राव अजिबातच दिसला नव्‍हता. आता दुसरे ऑपरेशन करून तो रक्तस्त्रावही काढणे गरजेचे होते. मी पेशंटचे बुबुळ परत तपासले. त्‍यामध्‍ये कोणतीही रिअ‍ॅक्‍शन दिसत नव्‍हती. आता मला प्रश्‍न पडला की जवळपास ब्रेन डेड झालेल्या अशा पेशंटवर दुसरी सर्जरी करणे योग्‍य आहे का? पण मी घेतलेली जबाबदारी पूर्ण करावयाचे ठरवले. नातेवाईकांना सांगितले की, ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल. पेशंटचे नातेवाईक आधीच भेदरलेले होते.
ते म्‍हणाले, " सर, आम्‍ही आमचा पेशंट गेलाच आहे असे समजत होतो. परंतू तुमची धडपड पाहून आम्‍हाला वाटते की आपणास जो योग्‍य वाटेल तो निर्णय घ्‍या. त्‍याला आमची सहमती आहे." 
      मी लगेचच पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्‍ये हालवले व ऑपरेशनला सुरूवात केली. पण यावेळी आणखीनच मोठा प्रॉब्‍लेम निर्माण झाला होता. एवढ्या सगळ्‍या रस्क्तस्त्रावानंतर पेशंटची रक्त गोठण्‍याची प्रक्रियाच बंद झाली होती. रक्‍त पाण्‍यासारखे वाहू लागले व काहीच करणे शक्‍य होईना. भूलतज्ञानी दुसर्‍या बाजूने त्‍याची लढाई चालू ठेवली. ते पेशंटला रक्‍त चढवत होते. मी कवटी उघडून शक्‍य होईल तेवढी रक्ताची गाठ काढली. पण मला माहित होते की, रक्‍त गोठण्‍याची प्रक्रिया बंद पडल्‍याने तेथे रक्‍तस्त्राव होत राहणार. म्‍हणून मी एक युक्ती केली. जिथे रक्तस्त्राव होत होता तिथे एक ड्रेन ठेवला. (ड्रेन म्‍हणजे एक रबरी नळी असून तिचे एक टोक कवटीमध्‍ये ठेवले जाते व दुसरे टोक बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जाते) या ड्रेनचा हेतू हा असतो की, आत होणारा रक्तस्त्राव तिथेच थांबून मेंदूवर प्रेशर निर्माण करण्‍याऐवजी, रक्‍त बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जावे. ऑपरेशन पूर्ण करून मी पेशंटला आय. सी. यू मध्‍ये शिफ्‍ट केले. परंतु पेशंटच्‍या बुबुळांमध्‍ये अजूनही कोणतीही रिअ‍ॅक्‍शन आली नव्‍हती. 
      आता मात्र मन अत्‍यंत निराश झाले. एवढे करूनही काही फायदा होईल असे वाटेना. मी डॉक्‍टर रूममध्‍ये जायला निघालो, तेवढ्यात एक सिक्‍युरिटी गार्ड पळत आला आणि म्‍हणाला, "सर, तुम्‍ही तुमची गाडी कॅज्‍युअल्‍टिच्‍या दारामध्‍ये तशीच उघडी ठेवली होती, मी ती पाठीमागच्‍या बाजूस पार्किंगमध्‍ये पार्क केली आहे. ही चावी घ्‍या."  मी त्‍याला धन्‍यवाद दिले व डॉक्‍टर रुममध्‍ये जाऊन बसलो. 
     आता माझे सर्व प्रयत्न करून संपले होते. वेळ होती ती परमेश्‍वराला शरण जाण्‍याची ! मी परमेश्‍वराचे नामस्‍मरण  करू लागलो. या सर्व प्रयत्नांना यश येण्‍यासाठी नम्रपणे निवेदन ठेवले. तोच काय तो आधार होता ! साधारण अर्धा तास असाच गेला असेल एवढ्यात इंटेन्‍सिव्‍हीस्ट पळत आले आणि म्‍हणाले," सर, लवकर चला. पेशंटला बघा चला." मी लगेचच जावून पाहिलं तर काय चमत्‍कार ! त्‍याच्‍या दोन्‍ही बुबुळांमध्‍ये आता रिअ‍ॅक्‍शन दिसत होती.  माझ्‍याही जीवात जीव आला. नातेवाईकांनाही तसं समजावलं.
     त्‍यानंतर मी निर्णय घेतला की, पेशंटला पुढचे ४८ तास बेशुद्धच ठेवायचे. कारण मेंदूमधील रक्‍तस्त्राव पूर्णपणे थांबला नव्‍हता. त्‍यानंतर पेशंटला जवळ जवळ १५ बाटल्‍या रक्‍त/पांढर्‍या पेशी दिल्‍या गेल्‍या. पुढचे ४८ तास माझ्‍यासाठी खूपच अवघड होते. त्‍या पेशंटसाठी जवळपास ३०-४० जणांचे फोन आले असतील. सर्वांचीच आशा माझ्‍यावरती होती. "मी प्रयत्न करतो !" या एका शब्‍दावर ते सगळे तग धरून होते. ४८ तास त्‍याचे सर्व नातेवाईक आय. सी. यू. च्‍या दारात बसूनच होते. मी देखील दिवसातून १०-१५ वेळा पेशंटला बघायचो. जर अचानक त्‍याची बुबुळे प्रतिसाद देणे बंद झाले तर पेशंटची तिसरी सर्जरी करावी लागण्‍याची शक्‍यता होती. नातेवाईकांना खूप शंका असायच्‍या. ते म्‍हणायचे डॉक्‍टर, पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये दुसर्‍या बाजूचा रक्तस्त्राव अजिबातच दिसला नाही असे कसे झाले? आणि पहिले ऑपरेशन झाल्‍यानंतर दुसर्‍या बाजूस एवढी मोठी रक्‍ताची गाठ कशी काय तयार झाली? मग मी त्‍यांना सांगितले की, पेशंट ज्‍या वेळी पडला त्‍यावेळी त्‍याला डोक्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला मार लागला असावा त्‍यामुळे दोन्‍ही बाजूला रक्‍तस्त्राव सुरू झाला पण उजव्‍या बाजूला मोठी रक्तवाहीनी फुटल्‍यामुळे थोड्याच वेळात खूप रक्त जमा झाले व त्‍यामुळे मेंदूवर खूप प्रेशर आले. उजव्‍या बाजूने प्रेशर आल्‍याने मेंदू डाव्‍या बाजूस सरकला गेला आणि डाव्‍या बाजूचा रक्तस्त्राव तात्‍पुरता बंद झाला. पण जसे मी उजव्‍या बाजूची रक्ताची गाठ काढुन घेतली तसे मेंदूवरील प्रेशर कमी होऊन मेंदू पूर्वस्‍थितीत आला. त्‍यामुळे डाव्‍या बाजूने थांबलेला रक्‍तस्त्राव पुन्‍हा सुरू झाला. त्‍यामुळेच दुसरे ऑपरेशन करून तीही रक्‍ताची गाठ काढणे आवश्‍यक वाटले. अशा तर्‍हेने त्‍यांच्‍या बहुतेक शंकाचे निरसन मी केले होते. 
      पुढचे ४८ तास मी घरीही बैचैन असायचो माझी तगमग बघून माझ्‍या पप्‍पांनी व माँसाहेबांनी ही देवाला साकडे घातले. सर्व घरच परमेश्‍वर चरणी लीन झाले होते. आणि ४८ तासानंतर माझ्‍या परीक्षेचा दिवस उजाडला पेशंटला स्‍कॅन करण्‍यासाठी शिफ्‍ट केले आणि काय आश्‍चर्य ! मी  केेलेली ती ड्रेनची युक्ती उपयोगी पडली होती. पेशंटचा स्‍कॅन एकदम छान होता. दोन्‍ही बाजूंचा रक्तस्त्राव  पूर्णपणे  निघाला होता. पेशंटला आय. सी. यू. मध्‍ये शिफ्‍ट केले व त्‍याला शुद्धीवर आणण्‍यासाठी प्रयत्न सुरू केले. पेशंटची भूल बंद केली आणि तासाभरात पेशंटने हातपाय हालवण्‍यास व डोळे उघडण्‍यास सुरूवात केली. आय .सी. यू. च्‍या पूर्ण टीमने जल्लोष केला. प्रत्‍येकजण एकमेकांचे अभिनंदन करीत होता. पुढच्या  ३/४ तासात त्‍याचा श्‍वासही चांगला चालू लागला त्‍यामुळे मी व्‍हेंटिलेटरही काढून घेतला.
    आता त्याच्या आईवडीलांना आय.सी.यू.मध्ये बोलाऊन घेतले गेले. ते बिचारे घाबरतच आत आले. काय माहित आपल्या मुलाला कुठल्या अवस्थेत बघावे लागेल? त्याची आई तर अजूनही मुलाला बघण्याआधी डोळे घट्ट मिटून देवाचा धावा करीत होती. मी त्यांना त्यांच्या मुलासमोर घेऊन गेलो आणि काय आश्चर्य ! तो डोळे उघडून आईवडिलांकडे बघून हसत होता. त्याच्या आई वडिलांना खरच सुखद धक्का बसला. मी त्याला विचारले हे कोण आहेत? तू ओळखतोस का यांना? तर तो म्हणाला, " यस दे आर माय मॉम अँण्ड डॅड." आईवडील तर जणू स्तब्धच झाले होते. दोघांच्याही तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मनातल्या साऱ्या भावना डोळ्यांतील अश्रूवाटे बाहेर पडत होत्या. वडिलांनी अजूनही माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. त्यांचा हात माझ्या हातात तसाच ठेऊन मी म्हणालो. "ही इज अ बॉर्न फायटर ! 
तुमचा मुलगा सुखरूप परत आला!"
 आणि आम्‍ही लढाई जिंकली होती ! एक जवळजवळ ब्रेन डेड होणारा  पेशंट जागा होऊन आमच्‍याशी बोलत होता. विशेष म्‍हणजे त्‍याला कोणतेही व्‍यंग (न्‍यूरॉलॉजिकल डेफिसिट) आले नव्‍हते. त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या आनंदाला पारावार राहिला नव्‍हता. डोळ्‍यातून वाहणार्‍या पाण्‍याला सीमा राहिली नव्‍हती. पूर्ण हॉस्‍पिटलमध्‍ये आनंदाचे वातावरण होते. पुढच्या ७-८ दिवसांमध्ये तो पूर्णपणे बरा झाला आणि डिश्चार्ज होऊन घरी जाताना  त्याने मला आश्वासन दिले की, इथून पुढे मला बोनस म्हणून मिळालेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावेन.
 खरेच आयुष्‍यामध्‍ये असे काही अनुभव येतात की, जे तुम्‍हाला त्‍या दैवी शक्‍तीचे सामर्थ्‍य आणि अस्‍तित्‍व मान्‍य करण्‍यासाठी भाग पाडतात !
 
डॉ. प्रवीण सुरवशे.
कन्‍सल्‍टंट न्‍युरोसर्जन
कोलंबिया एशिया हॉस्‍पिटल
पुणे 
फोन : ७७३८१२००६०

2358. आनंद भांडणात नाही

      बऱ्याचदा छोटी कार असेल आणि चुकून जर तिला two-wheeler ने धक्का दिला तर लगेच मारायला अंगावर येतात.. थार किंवा मोठ्या गाडी ला सोडून देतात.
माझी छोटीच गाडी आहे.
असाच एक लोकल भाई
टुव्हीलर वरुन उतरुन भररस्त्यात
माझ्यावर अगदी फिल्मी स्टाईल
धावून आला होता.
मी त्याला माझी चूक नसताना
जवळपास 15 ते 20 वेळा
sorry म्हणालो होतो.
कारण माझी कार नवी होती.
घरी माझे आई-वडील,पत्नी
आणि मुलं वाट पहात होती.
खूप रागातच तो दोन वेळा परत येऊन
परत निघून गेला होता.
त्याला मला मारायचेच होते.
मी तो जाईतोवर भररस्त्यात तसाच थांबलो होतो.
आजुबाजूनी लोकं पाहून निघून जात होती.
गाडीवर बसलेला तो
परत आला आणि म्हणाला...
"कुठे रहातो तू...?"
मी इथेच रहातो असे म्हणालो.
रोज ह्याच रोडवरुन जातो.
तुम्हाला आत्ता मला मारायचेच असेल तर
खुशाल मारा. पण मला रक्त नाही आलं पाहिजे.
कारण मला असे रक्तबंबाळ पाहून
माझे आई- वडील, पत्नी, दोन मुलं
खूप घाबरुन जातील.
असे म्हणून मी शेवटी कार मधून खाली उतरलो.
है सगळं ऐकून तो अगदी नरमून गेला
आणि मला घट्ठ मिठी मारुन
खूपवेळा sorry म्हणाला.
तुला कोणी त्रास दिला तर
आपल्याला काॅल कर. आपलं नाव सांग.
असं मला बोलला.
त्यावर मी त्याला म्हणालो..
माझ्यावर तुला बोलवायची अशी वेळ
येणारच नाही.
कारण अशा प्रसंगात
मी माझी चूक नसतानाही
शेवटपर्यंत sorry.च म्हणतो.
कारण लढायची आणि नडायची वेळ 
तेव्हाच येईल जेव्हा कोणी माझ्या कुटूंबावर
धावून येईल.
हे जे आपल्यात आहे ते क्षणिक आहे.
इथे sorry म्हणून कुटूंब गाठणे
ह्यालाच मी प्राधान्य देतो.
हे ऐकून तो निघून गेला.
जाताना त्याच्या चेहेऱ्यावर एक समाधान
आणि आनंद दिसत होता.

#आनंद भांडणात नाही

2357. दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं.

 पप्पा : कधी आलीस बेटा?
मुलगी : दुपारीच आले.
पप्पा : जावई बापूंना का नाही थांबवलं?
मुलगी : आग्रह करायला तुम्ही नव्हता. तशीही तुम्हाला तर ड्युटी प्रिय आहे माझ्यापेक्षा...
पप्पा : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय...
मुलगी : पप्पा डायलॉगबाजी नको आता.
पप्पा : बरं राहिलं... सॉरी...
मुलगी : यंदाही लिव्ह नाही ना घेतली?
पप्पा : सणासुदीच्या दिवसांमध्ये आमची जबाबदारी वाढते...
मुलगी : रिटायरमेंटला थोडेच महिने शिल्लक आहेत... किमान... आता तरी...
पप्पा : तेवढं सोडून बोल.
मुलगी : तुम्ही ऐकूच नका.
पप्पा : तुझं कसं चाललंय?
मुलगी : स्टेटस बघत नाही तुम्ही?
पप्पा : म्हणजे?
मुलगी : स्टेटसला रोज तिकडचे फोटो टाकत असते ना मी...
पप्पा : स्टेटस राहू दे बाजूला... तू सांग...
मुलगी : पप्पा काळासोबत बदला... टेक्नॉलॉजी शिका... माझ्या मैत्रिणींचे पप्पा बघा कसे मस्त स्टेटस ठेवतात...
पप्पा : आलोच फ्रेश होऊन.
मुलगी : थांबा.
पप्पा : आता काय?
मुलगी : असे कुत्सित हसून पळू नका.
पप्पा : मग काय करू?
मुलगी : Accept the reality...
पप्पा : तुला वास्तव सहन होईल?
मुलगी : म्हणजे?
पप्पा : म्हणजे तू Reality Accept करशील?
मुलगी : काय ते स्पष्ट बोला...
पप्पा : सुप्रियाचा संसार कसा सुरू आहे?
मुलगी : माझी बेस्ट फ्रेंड ना?
पप्पा : हो.
मुलगी : अगदी सुखात आहे ती...
पप्पा : नक्की?
मुलगी : अहो रोज स्टेटस बघते ना मी... 
पप्पा : मग हा व्हिडिओही बघ...
मुलगी : कुणाचा आहे?
पप्पा : तूच ओळख...
मुलगी : हे दोघे... सुप्रिया आणि तिच्या नवऱ्यासारखे दिसत आहेत.
पप्पा : मागच्या आठवड्यात सुप्रियाने Domestic Violence ची केस केली तिच्या नवऱ्यावर...
मुलगी : आई शपथ...
पप्पा : हा मारहाणीचा व्हिडिओ त्यांचाच आहे.
मुलगी : यात तर दोघेही एकमेकांना मारत आहेत.
पप्पा : बघ तूच...
मुलगी : विश्वासच बसत नाहीये.
पप्पा : नाहीच बसणार...
मुलगी : म्हणजे?
पप्पा : हा व्हिडिओ स्टेटसला नव्हता ना.. त्यामुळे तो तुला खरा नाही वाटणार.
मुलगी : पप्पा टोमणे नका मारू...
पप्पा : बरं आणखी एक...
मुलगी : काय?
पप्पा : शांताराम काकांचं काय चाललंय?
मुलगी : त्यांचं तर मस्त चाललंय. रोज देवाचे स्टेटस असतात त्यांचे... साधा सरळ माणूस...
पप्पा : शेवटचं कधी बोलणं झालेलं?
मुलगी : माझं तर नाही, पण आपल्या सोसायटीमधली वर्षा आहे ना...
पप्पा :  तिचं काय?
मुलगी : तिने सांगितलं होतं...
पप्पा : काय?
मुलगी : हेच की, शांताराम काकांकडे भारी फायनान्स स्कीम आहे. शेअर मार्केटमधून बराच प्रॉफिट कमवून देतात ते सर्वांना...
पप्पा : हे बघ जरा...
मुलगी : ९० लाखांची आर्थिक फसवणूक?
पप्पा : खालचं नावही वाच...
मुलगी : निवृत्त बँक कर्मचारी शांताराम...
पप्पा : तुमच्या देवमाणसाने २२ कुटुंबांना देशोधडीला लावलं...
मुलगी : पण ते तर माळकरी...
पप्पा : गळ्यात माळ पोटात काळ....
मुलगी : लोकांवर विश्वास ठेवणं कठीण झालंय...
पप्पा : तुझा तो क्लासमेट...
मुलगी : कोण?
पप्पा : विक्रम...
मुलगी : अहो तो तर फेमस मोटीव्हेशनल स्पीकर झालाय आता... 
पप्पा : खरंच?
मुलगी : त्याचे फोटो आणि व्हिडिओ असतात ना स्टेटसला...
पप्पा : कोणते?
मुलगी : इव्हेंट अन् सत्काराचे...
पप्पा : कर्जामुळे टेन्शनमध्ये होता काय तो?
मुलगी : तो इतरांना डिप्रेशनमधून बाहेर काढतो. टेन्शन तर क्षुल्लक आहे त्याच्यासमोर...
पप्पा : हे बघ जरा...
मुलगी : बाप रे... कधीचा फोटो आहे हा?
पप्पा : अर्धा तासापूर्वीचा...
मुलगी : त्याने आत्महत्या केली?
पप्पा : हो...
मुलगी : कसं शक्य आहे?
पप्पा : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात... काहीही शक्य आहे बेटा...
मुलगी : म्हणजे?
पप्पा : मागे मी तुला कॅमाफ्लाज बद्दल सांगितलेलं...
मुलगी : हो... आठवतंय...
पप्पा : काय सांगितलं होतं?
मुलगी : सरड्याला निसर्गाने वरदान दिलं आहे...
पप्पा : कसलं?
मुलगी : स्वतःचा रंग बदलण्याचं...
पप्पा : त्यामुळे काय होतं?
मुलगी : त्यामुळे तो स्वतःचा बचाव करू शकतो.
पप्पा : म्हणजेच तो इतरांना मुर्खात काढू शकतो...
मुलगी : बरोबर.
पप्पा : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, हा स्टेटसही कॅमाफ्लाजसारखा वापरला जातोय.
मुलगी : म्हणजे?
पप्पा : म्हणजे वास्तव लपवून... आभासी जग दाखवलं जातंय.
मुलगी : पण सगळेच तर...
पप्पा : तेच तर अधिक धोकादायक आहे.
मुलगी : का?
पप्पा : कारण या व्हायरल पोस्ट आणि ट्रेंडच्या भाऊगर्दीत, वास्तव ओळखणं कठीण होऊन बसलंय...
मुलगी : मग काय करायला हवं?
पप्पा : डोळ्यांना दिसणाऱ्या सर्वच गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही.
मुलगी : नेमकं करायचं तरी काय?
पप्पा : खातरजमा करायची...
मुलगी : कशी?
पप्पा : मी केली तशी...
मुलगी : नाही समजलं...
पप्पा : तुझ्याकडे तुझ्या संसाराची चौकशी केली ना मी...
मुलगी : हो.
पप्पा : अशावेळी काय असेल ते स्पष्ट बोलून टाकायचं. 
मुलगी : समजलं.
पप्पा : मी आठवड्यातून एकदा तरी, कॉल करून तुझ्याशी बोलतो...
मुलगी : हो. 
पप्पा : बेटा मी आयुष्याकडून एकच गोष्ट शिकलो...
मुलगी : कोणती?
पप्पा : गर्दीपेक्षा वेगळा विचार करण्याची...
मुलगी : असं का?
पप्पा : तुला माझी फेवरेट म्हण माहीत आहे ना?
मुलगी : हो.
पप्पा : कोणती?
मुलगी : दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं...
पप्पा : ज्जे बात!
©️अक्षय भिंगारदिवे
२३ ऑक्टोबर २०२५
(व्हाट्सएप फॉरवर्ड पोस्ट)

2356. वडिलांची किंमत

      ४५ वर्षांच्या दिवाणाला नुकताच नोकरीवरून काढून टाकला होता. साहेबांनी सगळ्यांसमोर अपमान करून ऑफिसमधून बाहेर हाकलून टाकलं होतं. गेल्या बारा महिन्यांतील ही त्याची तिसरी नोकरी गेली होती. रात्र झाली होती. तो गावाबाहेर झाडाखाली असलेल्या बाकावर बसला होता. घरी जायचा त्याचा अजिबात मूड नव्हता. तो बाकावर बसून सतत मित्रांना फोन करत होता. कोठे काही नोकरीची जागा असेल तर सांग, अशी विनंती करत होता. त्याला तातडीने नोकरीची गरज होती.
     दिवाण आळशी नव्हता. पण वाढत्या संगणकाच्या वापराने तो मागे पडला होता. त्याने संगणक शिकून घेतला होता, पण नव्या मुलांसारखं त्याला नीट हाताळता येत नव्हतं. म्हणून चुका व्हायच्या आणि त्याचा राग साहेबांना यायचा. रात्री दहा वाजता तो निराश होऊन घरी परतला. घरात पाऊल टाकताच बायको ओरडली.
“कुठे होतात एवढा वेळ? कोणत्या बाईसोबत फिरत होता? लाज नाही का वाटत? घरात मोठी मुलगी आणि मुलगा बसलेत. त्यांच्या लग्नाचं वय निघून चाललंय, आणि तून्ही अजूनही बेजबाबदार !”
दिवाण काहीच बोलला नाही. बायकोच्या रोजच्या ओरडण्याला उत्तर देणं त्याने आता सोडून दिलं होतं. तो बाहेर ठेवलेल्या नळाजवळ हात-तोंड धूवत होता, तेवढ्यात मुलगी धावत आली.
“पप्पा, माझा मोबाईल आणलात का?” 
दिवाण गप्प राहिला. मुलीने पुन्हा विचारल -“पप्पा, उत्तर का नाही देत?
सकाळी वचन दिलं होतं ना, संध्याकाळी मोबाईल घेऊन येणार म्हणाला होतात ! ”
पण तो काही बोलला नाही. काय बोलणार? मोबाईलसाठी आगाऊ पैसे मागितल्यामुळेच साहेबांनी त्याला नोकरीवरून काढलं होतं. मुलगी जुना मोबाईल दाखवत म्हणाली -
“पाहा ना पप्पा, खरोखर खराब झाला आहे. ऑन करताच हँग होतो.”
दिवाण काहीच उत्तर देत नव्हता. त्याला माहित होतं, ही बातमी सांगितली तर घरातलेच त्याला दोष देतील. हात-तोंड धुवून तो खोलीत गेला. बायको बेडवर बसून मोबाईलमध्ये गुंतली होती. त्याने पाऊल टाकताच ती ओरडली.
“उत्तर द्या ना ! बहिरे झालात का? मुलीला मोबाईल का नाही आणला?” 
तो हलक्या आवाजात म्हणाला - “पैसे अजून हातात आले नाहीत. आले की आणीन.”
ती म्हणाली - “हातात नव्हते तर उधार घ्या ना ! "
तुम्हाला ठाऊक आहे ती स्पर्धेची तयारी करतीये. मोबाईलशिवाय कशी शिकेल?”
दिवाणकडे उत्तर होतं, पण आता त्याने गप्प राहणं शिकून घेतलं होतं. तो स्वयंपाकघरात गेला. स्वतःची थाळी घेतली आणि जेवायला बसला. मुलगा २४ वर्षांचा आणि मुलगी २२ वर्षांची होती. दोघेही अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत. म्हणून स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं शक्यच नव्हतं. तो जेवत असतानाच मुलगा बाहेरून आला ओठांवर गाणं आणि अंगाला दारूचा वास. वडिलांना पाहताच सरळ आपल्या खोलीत गेला. पहिल्यांदा असं झालं तेव्हा दिवाण त्याला ओरडला होता, पण मुलानेच हात पकडून उलट त्यालाच डोळे दाखवले होते. त्या दिवसानंतर दिवाणने त्याच्याशी बोलणंही बंद केलं. सगळं ऐकून, सगळं सहन करून तो शांतपणे झोपला. सकाळी लवकर तो पुन्हा नोकरीच्या शोधात बाहेर पडला. तो जाणून होता - कामाशिवाय घर, संसार, सगळं कोसळेल. संपूर्ण दिवस भटकत राहिला, काहीच खाल्लं नाही. भुकेमुळे आणि दमल्यामुळे त्याची तब्येत ढासळली. चालता-चालता तो रस्त्यावर आला. आणि एका ट्रकने त्याला चिरडलं. त्याला तडफडायलाही वेळ मिळाला नाही. सगळं संपलं.
      त्याच्या मृत्यूनंतर घरचं सगळं जग बदललं. कर्जदार लोक घराची पायरी झिजवू लागले. नातेवाईकांनी फोन उचलणं बंद झालं. वायफाय बंद, नेट बंद. मुलं-बायको आता जे मिळेल ते खात होते. मुलगा एका कपड्याच्या दुकानात ७ हजार रुपयांनी कामाला लागला. मुलगी एका खाजगी शाळेत ५ हजारावर. बायकोच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, साजशृंगार थांबला, हसणं हरवलं. पूर्वी पतीवर ओरडणारी ती, आता त्याच्या आठवणींनी गप्प राहायची. तो जिवंत असताना सगळे निर्धास्त होते. त्याच्या मृत्यूनंतर सगळं थांबून गेलं. 
   तेव्हा त्यांना उमगलं, तोच त्यांची शांत झोप होता, तोच त्यांची भाजी-भाकरी, आसरा होता. तोच त्यांच्या आयुष्याचा आधार होता. पण त्याची किंमत त्यांना त्याच्या जिवंतपणी कधीच कळली नाही.
     बापाची कदर करा 🙏🏻 तो गेला, की घरात अंधारच अंधार पसरतो. 💔 
💬 तुमच्या वडिलांची कोणती आठवण आजही मनात आहे?

2355. शिक्षक हा कधीच निवृत्त होत नाही

 एक आदरणीय शाळामास्तर नुकतेच निवृत्त झाले होते. 🎓
ते आणि त्यांची पत्नी भोपाळमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होते. 🏠😉
दसऱ्याच्या सुट्टीत त्यांनी आपल्या गावाला जाण्याचा निर्णय घेतला. 💥🔥🔥🔥
जाण्यापूर्वी मास्तरांनी मनात विचार केला.
“आपण नसताना जर चोर घरात शिरला,
तर तो कपाटं फोडून सगळीकडे पसारा करेल,
जरी घरात पैसे नसले तरी!” 😅
मग घराची वाट लावू नये म्हणून
मास्तरांनी टेबलावर ₹1000 ठेवले 💸
आणि त्यासोबत एक चिठ्ठी ठेवली. 📝
---
"प्रिय अज्ञात चोर,
तुम्ही माझं घर फोडण्यासाठी घेतलेला त्रास आणि मेहनतीबद्दल अभिनंदन! 🥰🥰🥰
पण दुर्दैवाने मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे,
पेन्शनवरच जीवन जगतो. 😅
म्हणून घरात काही मौल्यवान वस्तू नाहीत.
मला वाईट वाटतंय की तुमचा वेळ आणि श्रम वाया जातील. 😔
म्हणून तुमच्या प्रयत्नाचा सन्मान म्हणून
ही छोटीशी रक्कम स्वीकारा. 🙏
आणि तुमच्या ‘व्यवसायात’ (चोरीत 😜)
अजून यश मिळावे म्हणून काही सल्ले देत आहे 👇"**

---
मास्तरांचा "सल्ला" पुढीलप्रमाणे होता: 😂👇
८ व्या मजल्यावर – एक भ्रष्ट मंत्री राहतो 💼💰
७ व्या मजल्यावर – एक बेईमान बिल्डर 🏢
६ व्या मजल्यावर – एक सहकारी बँकेचा अध्यक्ष 🏦
५ व्या मजल्यावर – एक मोठा उद्योगपती 🏭
४ थ्या मजल्यावर – एक नामांकित वकील ⚖️
३ र्‍या मजल्यावर – एक भ्रष्ट राजकारणी 😏💍💵
“त्यांच्याकडे पैशाचे आणि सोन्याचे डोंगर आहेत.
तुमच्या ‘व्यवसायातील यशामुळे’ त्यांना काही फरक पडणार नाही!
कारण ते पोलिसांकडे तक्रारही करणार नाहीत!” 😂😂😂

---
दसऱ्यानंतर जेव्हा मास्तर घरी परतले,
तेव्हा टेबलावर एक मोठी पिशवी ठेवलेली होती. 🎒😲
त्यात होते ₹10 लाख रोख पैसे! 💸💸💸
आणि त्यासोबत एक पत्र —

---
**"आदरणीय गुरुजी, 🙏
आपल्या मार्गदर्शन आणि शिक्षणाबद्दल मनःपूर्वक आभार ! 👏👏
मी तुमचा सल्ला मानला आणि माझं मिशन यशस्वी झालं ! 😄
हा थोडासा मोबदला तुमच्या आशीर्वादासाठी ठेवत आहे.
आपले आशीर्वाद आणि ज्ञान
असेच पुढेही मिळत राहो...
आपला शिष्य – चोर 😄😄"**

---
😂😂😂
मास्तरांनी पत्र वाचून मोठ्याने हसत म्हटलं —
“अय्यो ! मी निवृत्त झालो असं वाटलं,
पण दिसतंय की माझं शिकवणं अजूनही सुरू आहे!” 📚🤣💥
😂😂😂😂😂😂😂😂

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...