शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2341. सिल्वर लायनिंग

    “ताई, मी आज लवकर घरी जाऊ? त्यो मेला कालपास्नं पिऊन पडलाय.. घरातच.. जिता हाय का न्हाई ते तरी बघत्ये एकदा.” 
      गंगूचे शब्द ऐकताच सुचेतानं लॅपटॉप वरचं काम थांबवून तिच्याकडे बघितलं. “गंगू, असं काय बोलतेस? जा बरं घरी पटकन आणि बघ त्याच्याकडे!” सुचेताने गंगूचा पगार तिच्या हातात ठेवला. वर शंभर रूपये जास्त दिले. 
     “अग, ताई काय वाईट बोलल्ये मी? त्याला सांगितलया. भाईर पिऊन रस्त्यावर पडण्यापेक्षा घरीच पी. रस्त्यावर पडतोय कुटतरी अन् मग शोधून घरी आनावं लागतं. आता घरीच पितुया. ते फार चांगलय.” गंगू पगार झाल्यानं खूष झाली होती. 'मटणाचे भाव लई वाढलेत' म्हणत तिनं पैसे तिच्या लाल रंगाच्या चंचीत ठेवले. 
       सुचेता काही बोलली नाही पण बाबांचं व्यसन आई व आपण गंगूसारखं कधीच स्वीकारू शकणार नाही याची तिला परत एकदा जाणीव झाली. बाबा त्यांच्या उच्च वर्तुळातील मिटींग्ज मध्ये पिऊन घरी आले की ती व आई कोमेजून जात असत. दुसऱ्या दिवशी बाबा “परत कधी घेणार नाही” म्हणत, केवळ पुढच्या वेळेपर्यंत ! त्याला काहीच अर्थ नव्हता. पण बाबांना घरी पिऊ द्यावं हे आईला कधीच मानवलं नसतं. आईला रडत बसलेली बघून सुचेताही रडवेली व्हायची.
      गेली पंचवीस वर्षं गंगू सुचेताकडे कामाला होती. दोन मुली व एक मुलगा होता. नवरा असून नसून सारखाच होता. तो दारू पिण्यासाठीच जन्माला आला होता. किराणा मालाच्या दुकानात बरी नोकरी होती पण ती त्याच्या दारूमुळं टिकली नाही.
      “ताई, तो मनानं लई चांगला हाय.. आपण दारू पिणाऱ्यास शिव्या देतो.. पन मानूस का प्यायला लागला ह्ये नाही बघत कधी.. हाल झालेत त्याचे..” गंगू त्याची कुठली चांगुलकी घेऊन सारवासारव करत बसली होती ईश्वराला ठाऊक. ती त्याला अस्सल ठेवणीतल्या शिव्या मोजत असे पण नंतर मटण भाकरी खायला घालत असे. भुगा झालाय शरीराचा म्हणून दूध पाव देऊन त्याला झोपवत असे. 
      गंगूच्या संसाराचं वस्त्र छप्पन ठिगळं लावूनही फाटत आलं होतं. पण तरी ती ते पूर्ण फाटू न देण्याचा तिचा निश्चय कधीच डळमळला नाही. कौशल्यानं ती एकेक नवं ठिगळ जोडत राहिली ! मोठ्या मुलीनं, मीनाने, एका ख्रिश्चन तरूणाबरोबर पळून जाऊन लग्न केलं तेव्हा सुचेतानं गंगूकडील नव्या शिव्यांचा साठा ऐकून कान झाकून घेतले. पण त्यानंतर पोर सासरी गेली. मी तिची नीट पाठवणी केली नाही. म्हणून डोळ्याला पदर लावलेलाही सुचेता बघत होती.
      मीना पळून गेल्याच्या तिसरे दिवशी गंगू कामाला आली ती बदाम वेलदोडा घातलेला शिरा घेऊनच ! “ताई, किरीस्तावाशी लगीन केलं मीनाने एवडं सोडलं तर बाकी समदं उत्तम हाय. प्रामानिक हाय मुलगा. त्याचं हाटेल आहे. भरपूर पैसा मिळिवतो. स्वताचं घर हाय. सासु सासरं न्हाईत मीनाला. काय वाईट हाय? त्यो म्हनं चर्चला घेऊन जातोया मीनाला अन् किरिस्ताची गाणी शिकवतुया ! काय बी वाईट न्हाई. समदे देव सारखचं बघ. समदे चांगल्या गोष्टीच करा म्हनतात आणि दारू न पिनारा मानूस म्हणजे द्येवच की ! छान हाय जावई हाय माजा. ब्येस झालं मीनाचं !”
      दोन दिवसात आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून तिचं तिनं स्वत:साठी जे तत्त्वज्ञान बनवलं ते ऐकून सुचेता चकित झाली होती. धर्म बदलला म्हणून मुलीशी नाळ तोडलेले तिचे काका काकू नातवंड झालं तेव्हा जळाबाहेरील माशासारखे तडफडले होते पण त्यांनी लेकीला माफ केलं नाही की नातू बघितला नाही. सतत पूजा पाठ करणारे काका पारशी माणसाशी लग्न केलेल्या लेकीला कधीच क्षमा करू शकले नाहीत आणि ही अडाणी गंगू.. दोन दिवसात लेकीला माफ करून मीनाचं कसं चांगलं झालं साऱ्यांना ऐकवत होती. नात झाली तेव्हा लेकीचं बाळंतपण मनापासून करत होती. “ताई, अळवाचे लाडू करू का मीनासाठी” विचारून दोन लाडू सुचेतालाही खायला घालत होती.
    गंगूची धाकटी, शलाका, हुशार निघाली. सरकारी कचेरीत कसलीशी नोकरी करत तिनं तिथल्या एका पोलिसाशी लग्न करून गंगूला सुखाचे चार दिवस दाखवले. पण गंगू सुखानं जगायला जन्माला आलीच नव्हती.
      किर्तनाला गेलेला तिचा लेक, सदा, हार्ट अटॅक येऊन जागच्या जागीच गेला अन् गंगू उन्मळून पडली. यातून गंगू सावरणार नाही वाटत असताना मुलाचे दिवस करून कामाला आलेली गंगू सुचेताला म्हणाली, “ताई, बरी हायस नव्हं? डोळ्याखाली लई काळं दिसतया.. भांडलीस की काय सायबांशी?”
 “तापातून उठलेय ग गंगू. तुझा सदा गेला कळलं अन त्याच रात्री एकदम ताप भरला मला. माझ्या जीवाला त्याचं जाणं आणि तुझे हाल झेपले नाहीत.” सुचेता छताकडे बघत होती..
     गंगू खिन्न चेहऱ्यानं हसली. “अगं ताई, मानसाची जन्मायची व जायची येळ ठरलेली असतीया. सदा किरतानाला बसला होता. आवडला विठूरायाला. म्हणाला.. चल रे सदा.. हा तयार झाला. आता इतं राहून तरी कुटलं युध जिंकायचय आपल्याला? चांगलं झालं त्याचं. आपल्याला काय आपलं मानूस हवच असतय. मी कंबर कसून उभी आहे बघ सुनेच्या व नातवाच्या पाठीशी. त्या पोरीचं चांगलं झाल्याशिवाय डोळं मिटनार न्हाई मी. नातू हुशार हाय माजा !"
      गंगू डोळे पुसता पुसता हसत होती. "माजं आयुष लई चांगलं गेलं बघ. दु:ख आलं नशीबी पन ताई परत्येक दु:खात ना कायतरी चांगलं दडलं होतं बघ. ते मी शोधाया शिकले म्हनून समदं चांगलं झालं. नरक नरक मंजे काय दुसरं नाई ताई. जन्माला येऊन दु:खातलं सुख न दिसनं म्हणजे नरक. लई दिलं देवानं ! काय बी तक्रार नाही माझी !”  तिनं हात जोडले. त्या रापलेल्या चेहऱ्यावरून फक्त कृतज्ञता ओघळत होती. देवावर राग नव्हता की नशीबावर राग नव्हता. कुठल्या तोंडानं ती 'तक्रार नाही' म्हणत होती तिचं तिलाच ठाऊक ! 
     महिनाभरात तिच्या कपाळ्यावरच्या अधेली एवढ्या कुंकवाचा धनी पण दारू पिऊन गेला तेव्हा तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला नाही. ती त्याच्या तिरडीजवळ शांत बसली होती. मयताला आलेल्या लोकांकडे बघून म्हणाली, “गेला ते बरं झालं. दारू तरी सुटली. आपल्या समाजाचा या दारूने लई नाश केलाय. किती कुंकवं पुसली. आता तरी शिका आणि सोडा दारू नाहीतर रोज एका मयताला जाऊ आपण सगळे.” तिचा थरथरणाऱा आवाज तेथील स्तब्धता चिरत गेला. रोज दारू पिणारे काही महाभाग मान खाली घालून उभे होते. फारशी आशा न ठेवता गंगू काहीबाही बोलत राहिली आणि बाया बापडे ते ऐकत राहिले.
      सुचेतानं तिच्या लॅपटॅापकडे बघितलं. एक मेसेज फ्लॅश होत होता. बुध्द तत्वज्ञानाच्या एका कोर्ससाठी ती नाव नोंदवत होती. स्क्रीनवर मेसेज होता..
      “बुध्द टिचिंग्ज वर्कशॅाप”
      “Be happy, not because everything is good, but because you see good in everything”
      Register in next 10 mins to save your spot..
      गंगू आतून चहा घेऊन आली. “लई अंधारून आलंय ताई.. चहा घे. काम झालं नव्हं? मुगाची खिचडी टाकू का? खाऊन घे दोन घास!”
      तिनं उठून गंगूला कडकडून मिठी मारली. हे चालतंबोलतं तत्वज्ञान समोर असताना तो कोर्स काय नवीन शिकवणार होता? शाळा न शिकलेली गंगू काय बुध्दाकडे कोर्स करायला गेली होती? संकटांच्या सतत धगीतून व ती रोज गाणाऱ्या अभंगातून हे तत्वज्ञान साकार झालं होतं ! 
      गंगू गोंधळून गेली होती. ताईला आपल्यासाठी वाईट वाटतंय? गंगू सुचेताची पाठ थोपटत होती. “ताई, माज्यासाठी नको वाईट वाटून घेऊ. मी छान हाय. तुज्यासारख्या जीवाभावाच्या, नोकर माणसाला समजून घेणाऱ्या म्याडमकडं मी नोकरी करते. उसनं पैसं मागते. काय खाल्लं काय प्यायलं तू कधी काही विचारत नाहीस.. मला धीर देऊन उभं करतेस..तू आहेस म्हणून बळ येतं पुढचा घाव सोसायला. यापेक्षा काय हवं माणसाला?”
       Every cloud has a silver lining ! ते ज्याला बघता आलं त्यानं सारं काही मिळवलं. कुणाच्या आयुष्यात काळे ढग येत नाहीत? पण त्यामागे लपलेलं इंद्रधनुष्य बघता आलं पाहिजे. ते बघण्याची इच्छा व सामर्थ्य असावं लागतं. ते केवळ आपल्या साधनेतून निर्माण होतं ! सुचेतानं डोळे पुसले. 
       लॅपटॅापवरील बुध्दाच्या कोर्सची विंडो केव्हाच बंद होऊन गेली होती. Expired असा मेसेज दिसत होता. आकाशात काळे ढग दाटून आले होते. कधी कोसळेल माहित नव्हतं. त्या ढगांची चंदेरी कड शोधण्यात सुचेता रमून गेली होती.

©® ज्योती रानडे.
 9325927222

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...