गौरीने चार वर्षांच्या प्रियलचा हात पकडला. एक हातात पर्स, दुसऱ्या खांद्यावर प्रियलची दिवस भराच्या खाण्या सामानाची बॅग. छोटीशी स्कुल बॅग प्रियलच्या खांद्यावर अडकवली.
प्रियल सारखी रडत होती. "मी नाही जाणार तिकडे...नको ना ममा तू सोबत ने मला" हात ओढत होती. सिमताईंच्या पळणाघरात एकूण चार मुलगे,तीन मुली होत्या. ती सर्व प्रियल हून लहान होती. ती एकटी चार वर्षांची होती. गौरीला कळेना आज ही असं काय करतेय? गौरीने तिला जवळ ओढले, मायेनं तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिने काळजीने प्रियलकडे पाहिलं. खूप केविलवाणा चेहरा झाला होता, डोळ्यात पाणी बघून गौरीला गलबलून आलं. प्रियल रडता रडता बोलत होती. अचानक तिने गौरीचा हात खेचला. "ममा ममा मला भीती वाटते, नाही जायचं ग मला. सगळे झोपतात. काका मला जवळ घेतात. मला नाही जायचं" गौरीने आधी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. नन्तर ती खाली बसली प्रियल ला जवळ घेतलं. आणि अगदी मायेनं विचारलं."पियू बेटा रडू नको पुन्हा मला सांग."
प्रियल ने आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं, आणि ती आईला बिलगली.
"ममा तिकडे सोनू, परी, राहुल, नितु सगळे झोपतात. मला नाही येत झोप."
"तू काय करते मग?"
"काकू पण झोपते, मी खेळते मग माझ्या चिनू बरोबर.जरावेळ खिडकी जवळ बसते."
"मग त्यात रडायला के झाले?"
"काल मला काकांनी उचलून घेतलं माझे पापे घेतले."
आता गौरीला थोडा थोडा प्रकार ध्यानात येऊ लागला. ती घाबरली. सीमा ताईचा नवरा रिक्षा चालवत होता. दिवसभर तो सीमाताईला मदत करायचा आणि संध्याकाळी रिक्षा वर जात असे. दोन वर्षांपासून ती प्रियलला त्यांच्याकडे ठेवत होती.
गौरी हबकलीच तिला एकदम धक्का बसला. डोकं गरगरायला लागलं. पट्कन तिनं प्रियलला जवळ घेतलं.
"पियू बेटा काय करतात काका? चांगले आहेत ते."
"नको वाईट आहेत ते...मला नाही आवडत."
असं बोलून ती आणखीनच रडायला लागली.
"ठीक आहे. आज मी शाळेत नाही जात आपण घरी जाऊ चालेल?"
प्रियल शांत झाली. दोघी घरी आल्या. महेश सकाळी कामाला गेला होता. तिने घरी आल्यावर प्रियलला जवळ घेऊन पुन्हा विचारले. गौरीची धडधड वाढली होती. नको नको ते विचार मनात येत होते. ती एकटक आपल्या चिमुकल्या लेकीकडे पहात होती. गौरी भानावर आली. पियू बोलत होती. "ममा ते काका माझे कपडे काढतात आणि." ती पुन्हा रडायला लागली. गौरीने तिला शांत केले. पण आता ती चांगलीच हादरली होती. तशीच तिरमिरीने उठली. नाही नाही हादरून चालणार नाही. तिने लगेच महेशला फोन लावला.
"आत्ता लगेच घरी ये." ती रडत होती. गौरीचा आवाज ऐकून तोही घाबरला ."तू घरी ये मग मी तुला सांगते."
"ओके येतो" त्याने हाफ डे रजा टाकली. तडक घरी आला. तिने त्याला सविस्तर सांगितले. प्रियल शांत झोपली होती
"चल, त्याला धडा शिकवलाच पाहिजे. हरामखोर कुठला, बेअक्कल." तो रागाने थरथरत होता.
"नको नको असा धडा शिकवायला आपण पोलिसात जाऊया."
महेशने तसेच प्रियलला उचलून घेतले. जवळच असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये गेले. अगोदर तक्रार लिहून घ्यायलाच कोणी तयार नव्हते. नन्तर तिथल्या महिला पोलिसला काय वाटले कुणास ठाऊक? तिने तक्रार लिहून घेतली.
"आधी तुमच्या मुलीला डॉक्टर कडे घेऊन जा. तपासणी करून रिपोर्ट्स आणून द्या." त्या महिला पोलिसने सांगितले. महेशने फॅमिली डॉक्टरांना फोन लावला. ते क्लिनिक मधेच होते. तशीच रिक्षा करून ते तिथे पोहोचले. प्रियल तपासणी करून देत नव्हती. डॉक्टरने इंजेक्शन देऊन तिला झोपवली. मग तपासणी केली. महेश पुरता संतापला होता. त्याच्या हातात असते तर त्याने क्षणाचाही विचार केला नसता. गौरी तर भकास पणे बघत होती. प्रियलची ती जागा लाल झाली होती. इंटर्नल दुखापत निघाली नाही. पण त्या राक्षसाने प्रयत्न केला होता.
दोन पोलिसांना घेऊन थेट सीमाताईचे घर गाठले. तिचा नवरा घरातच होता. सीमाताईला कळेचना काय प्रकार आहे? पोलिसांच्या पाठोपाठ प्रियलचे आई बाबा आले होते. पोलिसांनी तिच्या नवऱ्याचा हातात बेड्या ठोकल्या, आणि गाडीत कोंबले. झाला प्रकार सिमताईंच्या ध्यानात आलं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मटकन खाली बसून घेतलं. समाजात नाचक्की तर झालीच पण पोट भरण्याचा व्यवसायही गेला. सरकारी हॉस्पिटल मधून
डॉक्टर्सचे रिपोर्ट्स आणि महेशने दिलेला भक्कम आणि हुशार वकील. केसचा निकाल लागला त्या नराधमाला सजा झाली. पण अशा किती प्रियल असतील? अबोध कळ्या? महेश आणि गौरीच्या प्रश्नांची उत्तरं .अनुत्तरित होती.
नलिनी उर्फ भाग्यश्री कुडुक - ठाणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा