मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

653. सोप्प_नसतं...

 "सोप्प नसतं नवजात अर्भकाला अंगावर पाजण,
त्याच्या पिटुकल्या जिव्हणीत थेंब अमृताचे सोडणं.

सोप्प नसतं इवल्याशा जीवाचं पोट समाधानाने भरणं,
दिवसरात्र जागून त्याचे तृप्त ढेकर काढणं.

एकदा झाली ओळख मायलेकराला एकमेकांची,
की झोपेतही हसवते जिवतीमाय थेंब आपसूक पाजूनी,
तसच अगदी तसंच.

सोप्प नसतं अंगावर पित्या बाळाचं दूध सोडवणं,
दात आल्यावर त्याचं चावून चावून हैराण करणं

दुधाबरोबर रक्तही पिते लेकरू अनावधानाने,
माय ओरडते त्याची हुळहूळणार्या जखमेने.

अन्नाची गोडी लावून लाडेलाडे घास भरवते,
तरीपण लेकराला हुक्की दुधाचीच येते.

तेच असते त्याच्यासाठी जन्मापासूनचे पूर्णान्न,
मग एक दिवस अचानकच आईचे त्याला नाही म्हणणं.

ते बिचारं बावरते प्रश्नार्थक नजरेने विचारू लागते,
कालपर्यंत पटकन देणारी आई आता का नाही म्हणते.

एक सुरक्षिततेची भावना जिच्या कुशीत समजली,
गंध ओळखीचा जाण मायेची तीच का दुरावली.

डोळ्यांत आणून पाणी लेकरू केविलवाणे बघते,
माझ्या हक्काच्या अन्नापासून आई मला का तोडते.

मग सुरू होतो खेळ नवनवीन चवींच्या ओळखीचा,
आंबट खारट तुरट गोड आणि कडू पदार्थांचा.

तरीदेखील लेकराला आईचं हक्काची हवी असते,
दूध लेकराचे तोडतांना पापणी तिची जडावते.

मानसिकरित्या एक खंत सतत छळत राहते,
असूनही हक्काचे दूध का तिला लेकराला तोडावे लागते.

लेकरू रडते बिलगते ओरडून थकून झोपी जाते,
अंगाई गात गात आई मुकाट टिपे अश्रूंची गाळते.

सोप्प नसतं उघड्या डोळ्यांनी लेकराला अर्धपोटी झोपलेलं बघणं,
सोप्प नसतं त्याच झोपेत दचकून आईला बाऊ झाला म्हणणं.

दोघांची ही मानसिकता हळुवार तयार होते,
माय लेकराचे नाते आपसूकच समजदार होते.

जरी ऋण फिटणारे नसतात आईच्या दुधाचे,
तरी जाण असावी लेकराला तिने सोसलेल्या यातनेचे.

दोघांसाठी असतो क्षण हा सर्वात कठीण,
त्यातूनच जन्मते एका गोड नात्याची घट्ट वीण.

652. अडाणी आईवडील

 मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला ... अग... छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..!
 आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, ".. बघुया मला दाखवा...!
 इतक्यात,.. मुलगा पटकन बोलला.
 "बाबा तिला कुठे Result दाखवताय ?... तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!" 
भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली. ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली...! मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले... "हो रे ! ते पण खरच आहे...! 

आमच लग्न झाल तेव्हा तीन महिन्यातच 
तुझी आई गर्भवती राहिली.. 
मी विचार केला लग्नानंतर कुठे फिरलो नाही.. 
व्यवस्थितपणे एकमेकांना समजल पण नाही,. 
तर ह्यावेळी गर्भपात करुन पुढे chance घेउया.. 
पण तुझी आई ठामपणे "नाही" म्हणाली..
 नको ते नंतर वगैरे... फिरण, समजण पण नको... 
आणि तुझा जन्म झाला... 
अशिक्षित होती ना...

तु पोटात असताना 
तिला दुध बिल्कुल आवडत नसताना 
तु सुधृड व्हावास म्हणून 
नऊ महीने ती रोज दुध पित होती. 
अशिक्षित होती ना...

तुला सकाळी सात वाजता 
शाळेत जाव लागायच म्हणजे 
स्वतः सकाळी पाच वाजता उठुन 
तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची.
 अशिक्षित होती ना...

तु रात्री अभ्यास करता करता 
झोपून जायचा तेव्हा 
येउन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन 
तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची.
 अशिक्षित होती ना...

तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास... 
तेव्हा रात्र-रात्र  जागुन ती परत सकाळी 
तिची काम चोख करायची....
अशिक्षित होती ना...
 
तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून 
माझ्या मागे लागायची आणि 
स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची.
अशिक्षित होती ना....

बाळा.... चांगली शिकलेली लोक 
पहिला स्वतःला स्वार्थ आणि मतलब बघतात.. 
पण तुझ्य आईने आजवर कधीच तो बघितला नाही.
अशिक्षित आहे ना ती...

ती जेवण बनवुन आपल्याला 
वाढता वाढता कधी कधी स्वतः 
जेवायच विसरुन जायची...
 म्हणून  मी अभिमानाने सांगतो की 
'तुझी आई अशिक्षित आहे...'

       हे सगळ ऐकुन मुलगा रङत रडत आईला बिलगुन बोलतो.. "आई मी तर फक्त पेपरवर ९०% मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १००% बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि ज्या शिक्षकांची मुल ९०% मार्क मिळवतात.. त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही. आई आज मला ९०% मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PHD च्या पण वरची Degree  आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल.
बोध:.... प्रत्येक मुला- मुलीनी जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात. त्यांनी विचार करावा. त्यांच्यासाठी काय काय सोसलय 

651. सासुरवाशीण

      'स्वीकारणे' हा अमूल्य असा दागिना अंगावर परिधान करुन, ती माप ओलांडून माझ्या घरात आली. अर्थात माझी सौभाग्यवती, बायको. बाबांच्या घरचे सगळे मोहपाश तिने मागे टाकले. आणि घरातील प्रत्येक गोष्ट सहजपणे स्वीकारली, अगदी उणीवांसह. लग्नापूर्वी बोलत असताना कितीतरी वेळा तिच्या तोंडून ऐकायला मिळालं होतं,  'माझ्या बाबांच्या घरी असं आहे, तसं आहे'. अगदी तिच्या सगळ्या नातेवाईकनातेवाईकांविषयी देखील ती भरभरून बोलायची. तिच्या माहेरच्या गोष्टींविषयी 'माझं', 'माझे' या शब्दांचा उल्लेख मी कितीतरी वेळा ऐकला. आणि विशेष करून 'माझे बाबा' तिच्या रोजच्या बोलण्यात एक अनिवार्य भाग. त्याच मुलीच्या लग्नाच्या काही दिवसांतच तिच्या माहेरी पहिल्यांदा तिच्या सोबत गेल्यानंतर, तिच्या बोलण्यात एक वाक्य आलं, ज्याने मला आश्चर्य कमी आणि धक्का अधिक बसला. बोलता, बोलता तिच्या बाबांना ती म्हणाली, 'तुमच्या घरी असं आहे.' मी केवळ तिच्याकडे पाहतच राहिलो. 'माझे बाबा', 'माझं घर', असे म्हणणाऱ्या मुलीने लग्न होऊन सासरी आल्यानंतर अगदी सहजपणे स्वीकारली आणि त्यानुसार ती जगायलाही लागली. किती सहजपणे ती सासरशी 'संलग्नीत' झाली. जिथे जीवनातील वीस-पंचवीस वर्षे घालवली, त्यांना क्षणार्धात 'तुमचं घर' असं संबोधलं, आणि सासुरवाशिण झाली. या सासुरवाशिणीचा अभिमान वाटला, तो हा पहिला प्रसंग होता.
       पण नंतर नंतर तिने अक्षरशः माझ्या घरावर ताबा मिळवला. आता 'माझे घर' केवळ नावापुरतेच राहिले. माझे आई-बाबा तिचे आई-बाबा झाले. माझे नातेवाईक तिचे नातेवाईक झाले. माझी प्रत्येक गोष्ट तिची झाली. ती सहजपणे म्हणायला लागली, 'आपले आई-बाबा'. पण मी प्रयत्न करूनही तिच्या आई-बाबांचा उल्लेख कायमच 'तुझी आई', 'तुझे बाबा' असाच केला. तिच्या इतक्या सहजपणे स्वीकारायला मला जमलेच नाही. जसजसा अनुभव येत होता, तसे तसे घरातील तिचे महत्त्व वाढत जात होते. माझ्या कौतुकाला अक्षरशः ओहटी लागली होती. आई घरातील प्रत्येक गोष्ट तिला विचारून करायला लागली. लग्नकार्य असो, अन्य कोणताही छोटासा कार्यक्रम असो, मला विचारणारी आई सगळं काही तिला विचारायला, सांगायला लागली. अगदीच 'सुनबाई' वगैरे म्हणणं नाही. पण नावानेच का होईना, कायम तिचेच नाव घ्यायला लागली. खुप प्रेमाने मी तिचे नाव लग्नात बदलले होते. तर त्यावरही सगळ्यांनीच अधिकार गाजवला. मी आपला वरवरच्या कामा पुरता राहिलो. मला घरातील गोष्टी कळायला लागल्या, त्या ठरल्यानंतर. साधी सत्यनारायणाची पूजा करायची आहे, हे प्रथम मला कळले, ते पूजेसाठी आणायच्या सामानाची यादी हातात आल्यानंतर. हे प्रकरण इतकं हाताबाहेर गेलं की,  नातेवाईकांमध्येही तिचेच नाव ऐकू यायला लागले. पूर्वी नातेवाईकांकडे एकटा जायचो, प्रसंगी आई-बाबांनाही सोबत असायचे, सगळे कसे अगदी छान माझ्याशी गप्पा मारायचे, माझी चौकशी करायचे. पण बायको आल्यापासून नातेवाईकांकडे गेलो तर, केवळ तिच्याशीच गप्पा. तिचीच चौकशी. आणि ती सोबत नसेल तरीही तिच्याच विषयी विचारणार. बायकोने माझ्यावर जादू केली इथपर्यंत ठाऊक होते. पण सगळ्या नातेवाईकांना होईल, याची मुळीच कल्पना नव्हती. 'आपलेपणा' आणि 'अलिप्तपणा' इतक्या सहजपणे सोबत घेऊन ती आली होती की, मी प्रयत्न करूनही तसे वागू शकत नव्हतो. एकदा तिच्या बाबांच्या विषयी काही सुचवण्याचा, निर्णयाचा विषय निघाला. त्यावर ती ठामपणे तिच्या बाबांना म्हणाली, 'तुमचा निर्णय. तुम्ही घ्या. आता माझ्यापेक्षा दादाचा तुमच्या अधिक अधिकार आहे'. 'सासुरवाशीण' झालेली मुलगी कशी असते, हे मी अनुभवत होतो. आणि समृद्ध होत होतो. आणि कदाचित तिने मला दिलेल्या या नव्या अनुभवामूळे की काय मी केवळ आनंदीच झालो नाही तर व्यापक ही झालो. याच विचारांनी मी आजूबाजूला पाहायला लागलो. तर लक्षात आले की, सगळ्याच सासुरवाशीणी अशाच असतात. ताई, आई, काकू, मावशी, आत्या, आजी अगदी कुणीही असो सगळ्या एकाच जातकुळीच्या. जीवनात पहिल्यांदा वाटले की, पोटच्या पोरां व्यतिरिक्त अभिमान वाटावा आणि मनमोकळेपणाने कौतुक करावं अशी परक्याची एकच मुलगी असते. आणि ती म्हणजे बायको.अन्यथा इतरांच्या मुलांची स्तुती आणि प्रगती मनुष्य सहजपणे पाहू शकत नाही, करू शकत नाही. पण 'सासुरवाशीण' वेगळी असते. आणि कदाचित पूर्वजन्माचे पुण्य आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद म्हणून की काय,  जगातील त्या सगळ्या भाग्यवंतांपैकी मी ही एक झालो, ज्याच्या पोटी देवाने मुलगी दिली.
     आजही तो प्रसंग आठवतो. दवाखान्यात होतो. डिलिव्हरीचा दिवस होता. डॉक्टरांनी आवाज दिला. बोलावून सांगितले 'मुलगी झाली' आहे. पेढे आधीच आणून ठेवले होते. आई बाबांना पेढे दिले. पाया पडलो. आणि वेड्यासारखा व्हरांड्यातील सगळ्यांना पेढे वाटायला लागलो.  आनंदाने सांगत होतो, 'मुलगी झाली आहे', 'मुलगी झाली आहे'. पेढे वाटता वाटता एका आजोबांनी कदाचीत खात्री करण्याच्या उद्देशाने की काय परत विचारले 'मुलगा झाला वाटते. आणि मी अगदी नि:शब्द होऊन उभा राहिलो. आणि मनातल्या वाटून गेले, 'कुणाचेतरी घर संपन्न आणि समृद्ध करण्यासाठी माझ्यापोटी 'सासुरवाशीण' आली आहे '
पण हे सर्व ज्याच्या पोटी मुलगी आहे तेच समजू शकतात.

650. निर्दोषांना शिक्षा

        फार पूर्वी हरिशंकर नावाचा राजा होता. त्याला तीन मुले होते आणि त्याला आपल्या तीन मुलांपैकी एकाला गादी सोपवायची होती. पण कोण? राजाला एक कल्पना सुचली आणि त्याने आपल्या तीन मुलांना बोलावले आणि म्हणाले - जर तुमच्या समोर एखादा गुन्हेगार उभा असेल तर त्याला तुम्ही काय शिक्षा द्याल? पहिल्या राजपुत्राने गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी असे सांगितले तर दुसऱ्याने सांगितले की गुन्हेगाराला अंधारकोठडीत बंद केले पाहिजे. आता तिसऱ्या राजपुत्राची पाळी होती. ती म्हणाली की बाबा, आधी आपण चूक केली आहे की नाही हे तपासायला हवे. यानंतर राजकुमाराने एक गोष्ट सांगितली.
       पूर्वी कोणत्यातरी राज्यात एक राजा होता, त्याच्याकडे एक सुंदर पोपट होता. तो पोपट खूप हुशार होता, त्याच्या गोड बोलण्याने आणि बुद्धिमत्तेमुळे राजा त्याच्यावर खूप खुश होता. एके दिवशी पोपटाने राजाला सांगितले की त्याला त्याच्या आईवडिलांकडे जायचे आहे. तो राजाला जाऊ द्या अशी विनंती करू लागला. तेव्हा राजाने त्याला सांगितले की ठीक आहे पण तुला पाच दिवसात परत यावे लागेल. पोपट जंगलाच्या दिशेने उडून गेला, जंगलात त्याच्या पालकांना भेटला आणि खूप आनंद झाला. बरोबर पाच दिवसांनी तो राजाकडे परत जात असताना राजाला एक सुंदर भेटवस्तू घेण्याचा विचार त्याच्या मनात आला. त्याला राजासाठी अमृत फळ घ्यायचे होते. तो अमृताच्या प्रसादासाठी डोंगरावर पोहोचला तोपर्यंत रात्र झाली होती. त्याने फळ तोडले आणि रात्र तिथेच घालवण्याचा विचार केला. तो झोपला असताना एक साप आला आणि ते फळ खाऊ लागला. ते फळही सापाच्या विषामुळे विषारी झाले होते. सकाळ झाली तेव्हा पोपट राजाकडे उडून गेला आणि म्हणाला - राजा, मी तुझ्यासाठी अमृत फळ आणले आहे. हे फळ खाल्ल्यानंतर तुम्ही कायमचे तरूण आणि अमर व्हाल. तेव्हा मंत्री म्हणाले, महाराज, आधी निकाल बरोबर आहे की नाही ते पहा. राजाने होकार दिला आणि फळाचा तुकडा कुत्र्याला खायला दिला. कुत्रा वेदनेने मेला. राजाला खूप राग आला आणि त्याने आपल्या तलवारीने पोपटाचा शिरच्छेद केला. राजाने ते फळ बाहेर फेकून दिले. काही वेळाने त्याच ठिकाणी एक झाड उगवले. राजाने या झाडाची फळे कोणीही खाऊ नयेत अशी सक्त सूचना दिली कारण ही अमृतयुक्त फळे विषारी आहेत असा राजाला विश्वास होता आणि पोपटाने त्याला हे फळ खाऊ घालून मारण्याचा प्रयत्न केला होता. 
       एके दिवशी एक म्हातारा त्या झाडाखाली आराम करत होता. त्याने एक फळ खाल्ले आणि तो तरुण झाला कारण त्या झाडावर उगवलेली फळे विषारी नव्हती. राजाला हे कळल्यावर त्याला खूप पश्चाताप झाला आणि आपल्या कृत्याची लाज वाटली. तिसर्‍या राजपुत्राकडून ही गोष्ट ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि तिसर्‍या राजपुत्राला आपला योग्य उत्तराधिकारी मानून त्याने त्याला आपल्या राज्याचा राजा म्हणून निवडले.
बोध
या कथेतून आपण शिकतो की, कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा करण्यापूर्वी त्याची चूक आहे की नाही हे तपासावे; तुम्ही चुकूनही निर्दोष व्यक्तीला शिक्षा करणार नाही. निरपराधांना कधीही शिक्षा होऊ नये.

649. कायमचा पत्ता

      आमच्‍या संयुक्‍त कौटुंबिक घरात आम्‍ही ५ ते ९५ वयोगटातील १४ जण राहयचो. आज, माझ्या आईचा रोज वावर असलेली दोन्ही घरे आता निर्वासित आहेत आणि आता त्यांचा व त्यांच्या बागांचा निसर्गाने  ताबा घेतलेला मी पाहतो. जांभूळ, शेवगा, काही अशोक, कडुनिंब आणि पिंपळ टिकून आहेत. परंतु आता असंख्य रंगांची मनमोहक फुलं गेली,एकूणच सर्व सौंदर्य क्षणिक आणि नाजूक आहे आणि एन्ट्रॉपीचा नियम शक्तिशाली आहे, हेच सत्य. माझ्या आईच्या हातातून रोज दाणे टिपणाऱ्या मोराच्या कुटुंबाचे काय झाले असेल हा मला पडलेला एक अगम्य प्रश्न आहे. बुलबुल, चिमण्या, पोपट, स्पॉट फ्लायकॅचर, कोकिळा, माकडांची एक मोठी टोळी जी महिन्यातून एकदातरी त्या ठिकाणाचा विध्वंस करायची - हे सगळे कुठे आहेत. माणसे निघून गेली की वास्तू एक घर बनते. सुरुवातीला मला वास्तू विकाविशी वाटली नाही. पण  आता तेथे जावेसे देखील वाटत नाही. एकतर काळ आमच्या चौदापैकी दहा जणांना घेऊन गेला आहे. मी आमच्या वास्तुच्या आजूबाजूला फिरतो आणि शेजारील वास्तू बघतो. जवळपास माझ्या घरासारखे चित्र मला दिसते. कधी एकेकाळी आयुष्याने भरलेल्या अनेक घरांचे नशीब आता फिरले आहे, बदलले आहे किंवा ते घरच आता पडलेले आहे. आपण घरे बांधण्यासाठी एवढे कष्ट का घेतो?बर्‍याचदा, आपल्या मुलांना त्याची गरज भासणार नाही किंवा त्याहूनही वाईट, ते त्यासाठी भांडणे करतात. हा कोणता मानवी मूर्खपणा आहे,  की या अनिश्चित कार्यकाळ असलेल्या भाडेतत्त्वावरील आपल्या जीवनासाठी आपण  एक कायमस्वरूपी मालकी स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतो. हे आयुष्य आपल्याला मिळाले आहे त्याच्या कालखंडाबद्दल आपल्याला काहीच अधिकार नाही, त्याच्या अटी शर्ती वर आपले नियंत्रण शक्य नाही आणि त्याविरुद्ध कोठेही दाद मागणे शक्य नाही, त्यावर अपील नाही त्यासाठी कुठले न्यायालय  देखील नाही. एक दिवस, आपण प्रेमाने बांधलेले हे सर्व विश्व आणि मासिक हफ्ते भरून  उभ्या केलेल्या वास्तू, एकतर उद्ध्वस्त होईल, किंवा त्यासाठी भांडण केली  जातील,  किंवा ते विकले जाईल किंवा नष्ट होईल. प्रत्येक वेळी मी एखादा फॉर्म भरतो तेव्हा 'कायम पत्ता' विचारणारा रकाना भरतो तेव्हा मला मानवी मूर्खपणाबद्दल हसू येते.
     झेनची एक कथा आहे, एकदा एक वृद्ध भिक्षू एका राजवाड्यात गेला आणि रक्षकाला विचारले की तो या विश्रांती गृहा एक मध्ये रात्र घालवू शकतो का? रक्षकांनी त्यावर त्याला खडसावले, "काय विश्रांती गृह, तुला हा राजवाडा आहे हे दिसत नाही का?". साधू म्हणाला, “मी काही दशकांपूर्वी इथे आलो. तिथे कोणीतरी राज्य करीत होते. काही वर्षांनी, त्याच्याकडून त्याचे राज्य कोणीतरी घेतले, नंतर कोणीतरी. कोणतीही जागा जिथे रहिवासी सतत बदलत राहतो ती जागा एक विश्रांती गृह आहे. जॉर्ज कार्लिन म्हणतात "घर हे फक्त एक ठिकाण आहे जिथे तुम्ही बाहेर जाताना तुम्ही तुमचे सामान ठेवता आणि परत येताना अधिक सामग्री घेऊन येता."जसजशी घरं मोठी होत जातात तसतशी कुटुंबं लहान होत जातात. जेव्हा घरात अनेक  रहिवासी सदस्य असतात, तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो आणि जेव्हा घरटे रिकामे होते, तेव्हा आपल्याला सहवास हवा असतो. आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी जगणे सोडून देणाऱ्या आणि शेवटी, कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून समजलेल्या विश्रांती गृहामधून निघून जाणाऱ्या माणसांवर पक्षी आणि प्राणी नक्कीच हसत असतील. मानवी इच्छेचा वृत्तीचा खरा फोलपणा.

जावेद अख्तर 

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३

648. देवाजवळ दिवा का लावावा? आणि कधी लावावा?

    सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असते. दिवसाला एकूण ०८ प्रहर असतात यात दिवसाला ०४ व रात्रीचे ०४ चे प्रहर असे एकूण ०८ प्रहर असतात. यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो ०४ ते ०७ वाजे पर्यत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. संध्या मध्ये सुर्य अस्ताची वेळ आणि सुर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते. जी सध्या ६.४५ ते ७.३० आहे. दिनमानानुसार ती बदलत जाते जसे की उत्तरायणात सुर्यास्त ऊशीरा होतो तर दक्षिणायणात सुर्यास्त लवकर होतो त्यामूळे संध्या समय वरखाली होतो त्यामूळे दिनमानानुसार कातरवेळ बदलते. 
       काही लोक सांगतात ७.३७ ला दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा दिवा हा ७.३७ लावतात परंतू पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती. गावात वरसकी पद्धती असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याची वरसकी असेल तो सुर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत. दिवा लावल्यावर घंटानाद होत असे. घंटानाद ऐकताच सर्व जण आपआपल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावत. त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मान-पाण होता, ग्रामदेवताची दिवाबत्ती लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे या मागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखणदारा सोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करते. कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रुप धारण करुन जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रुपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातारवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो. संध्याकाळी 6.30 नंतर केव्हाही दिवा लावावा, दिवा लावल्यावर घरातील सुवासींनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून  हातात हळद कुंकू घेऊन थांबावे कारण  लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे. आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन् दिवा यांना नमस्कार करावा.
      सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ, तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधीकालात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल. तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा. सूर्यास्तानंतरच्या संधीकालातही दिवा लावावा. (खरे तर देवाजवळ दिवा २४ घंटे तेवत असायला हवा.)  ‘यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो’, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडेतेलाचा दिवा लावावा.  देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते. देवतेच्या या कृपाकवचामुळे घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होण्यास साहाय्य होते. दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे.
हे लक्षात आले कि मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल. दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर, वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते. यामुळे, जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे  जीव वातावरणात लगेच पसरतात. आणि असे जीव हे अतिसुक्ष्म असल्याने शरिरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरिरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात. स्त्रियांच्या शरिरावरील रंध्रे ही पुरूषांच्या शरिरावरिल रंध्रांपेक्षा मोठी असतात. त्यामुळे स्त्रियांच्या शरिरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटील शरिररचनेनुसार, स्त्रियांना जास्त धोका असतो. त्यामुळेच सातच्या आत घरि असावे असे सांगण्यात आले आहे. वातावरणात सुक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा,  सर्वत्र दिवे लावून मिळवता येते. म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाचीही कमतरता भरुन निघते. सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात. यावेळी प्रचण्ड डिस्टर्बन्स असतो. या काळात ऊर्जेची आवश्यकता असते.त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्रदर्शन होण्याआधी पर्यंत दिवे लावावेत. तसेच हे दिवे तेलाचे किंवा तुपाचेच असावेत. वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूंची वाढ ही,  फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडले जाणार्या लहरींद्वारेच थोपवली जाते. इलेक्ट्रीकल दिव्यांद्वारे निघणार्या लहरींद्वारे थोपवली जाऊ शकत नाही. सायंकाळी संध्या करावी आणि देवाजवळ दिवा लावावा. याच वेळी अंगणात तुळशीजवळही दिवा लावावा. देवाजवळ लावलेला दिवा २४ घंटे तेवत असायला हवा. सायंकाळी दिव्याच्या वातीवर आलेली काजळी काढावी. सध्या बहुतेक जणांच्या घरात २४ घंटे दिवा तेवत ठेवलेला नसतो. त्यामुळे त्यांनी सायंकाळ झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावावा.
       तिन्हीसांजेला घरात अन् तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होणे आणि त्या वेळी वातावरणातील वाईट शक्तींचा त्रास होऊ नये; म्हणून घरी थांबणे ‘तिन्हीसांजेला, म्हणजेच दिवेलागणीच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वातावरणातील वाईट शक्तींच्या संचाराम म्हणून शक्यतो दिवेलागणीच्या वेळेपूर्वी घरी यावे किंवा दिवेलागणीनंतर घरातून बाहेर पडू नये. बर्‍याचदा वाईट शक्तींची त्रास हा तिन्हीसांजेच्या वेळी सर्वांत जास्त प्रमाणात होते. अघोरी विद्येचे उपासक तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणार्‍या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात. म्हणून तिन्हीसांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात, हत्या (खून) होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात. या काळाला ‘कातरवेळ’ म्हणजेच ‘त्रासदायक किंवा विनाशाची वेळ’, असे म्हणतात.’  तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायूमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते. वायूमंडलात कार्यरत असणार्‍या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय (भीती) निर्माण करतात. तिन्हीसांजेच्या वेळी ‘शुभं करोति’ म्हटल्यामुळे देहाभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते. तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने १२ तास सूक्ष्मातून कार्यरत रहातात.  मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते. तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास साहाय्य होते.’  दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात . दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशीर करावी . दिवस लहान होत गेला कि सकाळची पूजा उशीरा आणि सायंकाळची लवकर . या दोन विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टाईमिंग फिक्स ठेवा आणि पूजा , दिवेलागण करा . आता लवकर दिवस मावळायला लागलाय भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो म्हणून दिवेलागण लवकर करावी  फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो. चैत्र वैशाखात तर सायंकाळी सात वाजता ही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवेलागण करावी . देव्हाऱ्यात व तुळशी जवळ पहाटे पासून(दुपारी वगैरे आपोआप विझला तरी हरकत नाही) रात्री ९ वाजेपर्यंत तेवत ठेवणे कारण, 
हिंदू धर्मानुसार रात्री ९ वाजता शेजारती झाल्यानंतर देव विश्राम करतात व तेंव्हा उजेड नसावा. दिवा सुर्योदया आधी आणि सुर्यास्ता नंतर लावावा. कारण ती प्रकाशाची पुजा आहे.. त्या प्रतीचा ऋणानुभाव आहे आणी प्रकाशाची पुजा म्हणजेच देवाची पुजा होय....

647. मनातला पाऊस


 काल रात्री १ वाजेपर्यंत हवेत गारवा होता, आभाळ गच्च भरलेलं, अगदी कुंद वातावरण होतं. पण, दीड वाजता जो पाऊस सुरू झाला, त्यानं पार दैनाच करून टाकली. रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, दुकानाच्या पायऱ्यांवर, थोडक्यात म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं, भर पावसात कुडकुडत बसून राहिलेले वारकरी मी पाहतोय. त्यांना झोपायलासुद्धा जागा उरली नाही. दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच बसून राहिली होती. 
अंथरूण म्हणून एखादं प्लॅस्टिकचं इरलं, उशाला एखादी पिशवी किंवा बोचकं आणि पांघरायला साधी शाल.. त्या प्लॅस्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर कुठलं मावतंय? पण, जागा मिळेल तिथं, कसलीही तक्रार न करता माणसांनी पथाऱ्या टाकलेल्या.. डोकं आणि पाय एकाचवेळी झाकलेच जाऊ शकत नाहीत अशी ती शाल.. त्यामुळे, कित्येकांचे पायांचे तळवे आणि त्यांना पडलेल्या भेगा दिसत होत्या.
पहाटे साडेतीन च्या सुमारास भर पावसातच त्यांची आवरा-आवरीची लगबग सुरू झाली. ज्यांची साठी-पासष्ठी केव्हाच उलटून गेली आहे, अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक नळावर आंघोळ करतात, आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण न बोललेलंच बरं. कारण, मी पाहिलेल्या अशा व्यक्तींपैकी काही जण पंचवीस-पंचवीस एकर शेतीचे मालक होते. त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्याइतकीच मौल्यवान. त्यामुळे, ‘जे आहे ते भगवंताचंच आहे’ अशाच धारणेनं ही माणसं जगतात. (आपण स्वत:ला पांढरपेशे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. मग त्या पेशाचे सगळे गुणावगुण चिकटतातच आपल्याला)
पण, वारकरी होणं सोपं नाही, हे त्यांच्याकडं पाहिलं की, लगेच समजतं. वारी करणं ही गोष्टच निराळी आहे. अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, वारी हे २५ दिवसांचं, ६०० तासांचं काऊन्सेलिंग सेशनच आहे. आणि, मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेकजण केवळ स्वसंवादातून, स्वत:करिता उत्तम वेळ देऊन, स्वत:चे व इतरांचे प्रश्न सोडवतात, हा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे. 
कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी, हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. त्यांना महागड्या वस्तू, ब्रॅंडेड कपडे, प्राॅपर्टी, बॅंक बॅलन्स, खेळता पैसा, दागदागिने, परदेशी सहली यांतल्या एकाही गोष्टीत रस नसतो. दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियांवर सोपवून माणसं निर्धास्तपणे वारीला येतात, म्हणजे त्यांची कुटुंबियांविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवा. “कुणी दिलाच दगा, तर माझा पांडुरंग बघून घेईल” असं अगदी बिनधास्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का? 
काल रात्री एका काकांशी बोलत होतो. घराचा विषय निघाला. 
“आता पुतण्या म्हणाला, काका मी हीच जमीन कसणार. मला द्या. माझाही हक्क आहेच जमिनीवर. माझा वाटा मला द्या.” 
“मग?”
“माझा भाऊ होता तिथंच. पण तो काहीच बोलला नाही.”
“मग तुम्ही काय केलंत?”
“आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं? अंगाखांद्यावर खेळवलेलं पोर. त्याचं मन कशाला मोडायचं? दिली जमीन.”
“मग आता?”
“उरलेली जमीन कमी कसाची आहे. पण, माझा पांडुरंग बघून घेईल सगळं. अहो, जमिनीपायी घर मोडलं तर हातात काय राहणार? त्यापेक्षा हे बरं.”
त्यांच्या घरात जे घडलं, तेच जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यांवरून किती रामायणं-महाभारतं झाली असती, असा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा. पण, त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नव्हतं. 
“एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव अलगद काढून घेता आला पाहिजे” ते म्हणाले. मला काहीच सुचेना. मी अक्षरश: क्लिन बोल्ड झालो होतो. 
ते म्हणाले, “एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे. आपल्याला तेच तर जमत नाही. म्हणूनच, प्रश्न आहे. तुमच्या पिढीला फार पुढं जायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून तुम्ही दिवसरात्र पैसे कमावता. पण, बिल्डींगच्या १५ व्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या माणसाला दारात आलेल्याला पाणी सुद्धा विचारावंसं वाटत नसेल तर, त्या पैशाचा काय उपयोग?”
“मग काय, पैसे कमवू नयेत का?”
“माझं तसं म्हणणं नाही. पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं. पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही.”
“पण माणसं फसवणार नाहीत कशावरून?” मी. 
“ पण, ती फसवतीलच हे कशावरून?”
मी पुन्हा सपशेल आडवा. 
“अरे, तुमच्या वयाच्या पोरांचं इथंच चुकतं. तुम्ही भावाला भाऊ मानत नाही, बहिणीला बहीण मानत नाही, आईवडीलांच्या मनाचा विचार करत नाही. तुम्ही कुणाचाच विचार केला नाहीत तर उद्या तुम्हाला तरी कोण विचारील? तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा-नुकसान बघत बसता. म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशयच येतो. मग कशाला राहतंय तुमचं मन स्वच्छ?”
शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडे इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल, असं मला वाटलंच नव्हतं. 
“राजगिऱ्याचा लाडू खाणार का?” त्यांनी विचारलं. 
मी विचारात पडलो. रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते, पोटात भूक तर उसळ्या मारत होती. पण एकदम हो कसं म्हणायचं, म्हणून मी नको म्हटलं. 
“हे बघा देवा. पुन्हा आहेच तुमच्या मनात संशय.” ते म्हणाले. 
“तुम्हाला वाटणारच, हा कोण कुठला माणूस आहे, हे ठाऊक नसताना याच्याकडून असं काही कसं काय घ्यायचं? आणि तेही रस्त्यावर बसून?” 
“तसं नाही हो.” मी म्हणालो खरा. पण खरोखरच माझ्या मनात तीच शंका आली होती. 
“यामुळेच माणसं कायम अस्वस्थ असतात. ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगतच नाहीत. सगळा लपवालपवीचा कारभार..!”
आता यावर काय बोलणार? लाडू घेतला. लाडू खाऊन त्यांच्याचकडच्या बाटलीतलं पाणी प्यायलो. 
“चला माऊली, निघू का आता? पाऊस कमी झालाय.” मी म्हटलं. 
“थांबा देवा.” काका म्हणाले. पिशवी उघडली, आतून एक तुळशीची माळ काढली, माझ्या गळ्यात घातली. “देवा, पांडुरंगाला सोडू नका, तो तुम्हाला सोडणार नाही. पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका. माऊलींनी सुद्धा तसं कधी केलेलं नाही, स्वत:करता काही मागितलं नाही, हे विसरू नका. मोठं होण्याच्या इतकंही मागं लागू नका की, आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचे म्हणून बोललो, राग मानू नका..”
त्या काकांना नमस्कार करून निघालो. बाहेरचा पाऊस थांबलाय, पण मनातला मात्र सुरू झालाय.. आता तो थांबणं कठीण आहे !

646. रोपटे

 ...आणि आता येतो आहे कुशाग्र कुशलकर'... पायल टीचरने अनाउन्स केलं... 
हातात छोटंसं रोपटं घेऊन कुशाग्र पुढे आला... त्याच्या हातातलं बिनफुलांचं, साध्या पानांचं, रस्त्याकडेच्या कोणत्याही झुडपासारखं दिसणारं रोपटं पाहून टीचर चकित झाल्या... वर्गातला सगळय़ात ब्रिलियंट मुलगा हे असलं रोप घेऊन आलाय?... 
स्पर्धा होती रोप वाढवण्याची... चार महिन्यांपूर्वी जाहीर झालेली... वर्गातल्या सगळय़ा मुलांनी स्वतः घरी एकेक रोप वाढवायचं, त्याची काळजी घ्यायची आणि जागतिक वृक्षदिनाच्या दिवशी ते रोप घेऊन शाळेत यायचं... त्या रोपाबद्दल बोलायचं, अशी ही स्पर्धा होती... वर्गातल्या मुलांनी बोन्सायपासून, गुलाब, मोगरा, विविधरंगी सदाफुली, कढीपत्ता, मिरचीपर्यंत वेगवेगळय़ा प्रकारची रोपं प्रेमाने वाढवली होती... इतर सर्व स्पर्धांप्रमाणे ही स्पर्धाही कुशाग्रच जिंकणार अशी पायल टीचरना खात्री असताना तो मात्र हे मरतुकडं रानटी रोपटं घेऊन आला होता...
``आदरणीय टीचर, पेरेण्ट्स आणि मित्रांनो,'' कुशाग्रने नेहमीच्याच सहज आत्मविश्वासाने सुरुवात केली, ``मी हे जे रोप आणलेलं आहे, त्याचं नाव मला माहिती नाही. त्याच्या पानांची भाजी होत नाही. त्याला छान फुलं येत नाहीत. चविष्ट फळंही येत नाहीत. त्याच्यात कोणतेही औषधी गुणधर्म नाहीत. ते आकर्षकही नाही. त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही...'' कुशाग्रच्या या परखड 
कबुलीने सगळय़ांमध्ये एकदम चुळबूळ सुरू झाली... ``मित्रांनो, मीही तुमच्यासारखंच एखादं छान पानांचं, फुलांचं, फळं देणारं रोप वाढवायचा निर्णय केला होता. चार महिन्यांपूर्वी ही स्पर्धा जाहीर झाली त्या दिवशी शाळेतून आनंदात नाचत घरी चाललो असताना खिशातून काहीतरी पडलं म्हणून खाली वाकलो, तर माझ्या पायाखाली चिरडलं गेलेलं हे रोप दिसलं. तेही माझ्यासारखंच कोवळं होतं, त्याचा काही दोष नसताना माझ्यामुळे त्याची ही अवस्था झाली होती. मी तेच उपटून घरी आणलं आणि त्याची देखभाल केली. नसेना का त्याचा काही उपयोग माझ्यासाठी! तेही निसर्गाचा एक भाग आहे. जगातली प्रत्येक वस्तू आपल्या उपयोगाची कशाला असायला हवी? मला फळ, फूल, पान, भाजी यातलं काही देणार नसेल, तर मी या झाडाचा विचारच करता कामा नये का? हा फार मोठा स्वार्थीपणा होईल नाही का? मला माहिती आहे, मला, माझ्या झाडाला बक्षीस मिळणार नाही. पण, हे झाड मी जगवू शकलो, तेच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे...''
...हुंदक्यांच्या हमसाहमशीत आणि टाळय़ांच्या प्रचंड कडकडाटात विजेता म्हणून कुशाग्र कुशलकरचं नाव जाहीर झालं तेव्हा कोपर्यातून 
त्याची आई आपल्या कुशीतून जन्मलेल्या या रोपटय़ाकडे विस्मयाने पाहात होती... 
...तिच्या मनात आनंदाहून अधिक भयच दाटून आलं होतं... 
``आईशप्पथ, स्पर्धा विसरूनच गेलो गं मॉम! आता काहीतरी आयडिया लढवायला लागणार,'' असं म्हणून आज सकाळीच घराबाहेर जाऊन रस्त्याकडेचं हे रोपटं उपटून घेऊन आलेला कुशाग्र तिला आठवत होता...
संकलक 
प्रा. माधव सावळे

645. बाप लेक......गाढव

 विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, तो स्मशानात गेला आणि झाडावर लटकत असलेल्या वेताळाचे प्रेत खांद्यावर घेऊन चालू लागला....
तद्वतच....
बापाने आपल्या गोठ्यातील गाढव सोडले...
मुलाला आवाज दिला आणि ते दोघे गाढवाला घेऊन  बाजाराकडे निघाले...
पूर्वीच्या काळी एक बापलेक असेच गाढवाला घेऊन बाजाराला निघाले होते तेंव्हा रस्त्यात गावोगावी भेटणारे लोक त्यांची टिंगलटवाळी करत होते...
बापाला वाटले - " आता पुर्वीचा जमाना राहिला नसेल...काळ बदलला आहे... जग गतिमान झाले आहे... लोक सुशिक्षित झाले आहेत...ते इतरांच्या भावनांचा आदर करत असतील... इतरांना नावं ठेऊन हिणवत नसतील कदाचित.."
गाढव पुढे पुढे चालत होते...
मागे मागे बाप आणि मुलगा....
पहिले गाव लागले...
रस्त्याच्या कडेला बरीच मंडळी बसली होती.‌..
ती आपापल्या मोबाईल मध्ये व्यस्त दिसत होती...
गाढव, बाप, मुलगा जाऊ लागले तसं लोकांनी त्यांना फक्त पाहिलं आणि पुन्हा एकदा आपल्या मोबाईलमध्ये घुसले....
एखाद्याने साधी दखल देखील घेतली नाही कमेंट करणं तर दूरच....
(बापाला वाटले - " फरक पडला आहे तर !!... पुर्वी हेच लोक म्हणाले होते - अति शहाणे त्यांचे गाढव रिकामे..")
आता बापाला पुन्हा एकदा प्रयोग करून बघण्याची ईच्छा झाली..
पुढचे गाव आले तसे बापाने मुलाला गाढवाच्या पाठीवर बसवले...
लोकांनी पाहिले पण नो कमेंट्स..
सगळे मोबाईल मध्ये बिझी.....
(पुर्वीच्या वेळी लोक बोलले होते - " काय निर्लज्ज पोरगं आहे... म्हाताऱ्या बापाला चालावं लागतं आहे अन् स्वतः आरामात गाढवावर बसलाय...")
त्याच्या पुढचे गाव आले....
आता बाप गाढवाच्या पाठीवर बसला आणि पोरगा पायी चालू लागला...
लोकांनी पाहिले पण पुन्हा नो कमेंट्स...
सगळे आपापल्या मोबाईल मध्ये दंग....
आता मात्र म्हाताऱ्याला खात्री पटू लागली की जग खूपच बदललं आहे...
आज कोणीच काही बोलत नाही....
( मागच्या वेळी लोक बोलले होते - " काय बेअक्कल म्हातारा आहे... लहान पोराला पायी चालावं लागतं आहे अन् हा मारे बसलाय ऐटीत..." )
चौथे गाव आले...
आता बाप आणि मुलगा दोघे ही गाढवाच्या पाठीवर बसले...
दोघांच्या ओझ्यामुळे गाढव अडखळत चालू लागले तसं म्हाताऱ्याने गाढवाला चाबकाने फटके मारायला सुरुवात केली... गाढव ओरडत होते... म्हातारा मारत होता...
लोकांनी फक्त एकदा त्यांच्याकडे पाहून न पाहिल्या सारखं केलं आणि पुन्हा आपापल्या मोबाईल मध्ये डोळे रोवून बसले....
आता मात्र म्हाताऱ्याला शंका आली...
ईजा बिजा तिजा - ठिक...
पण चौथ्यांदा देखील कोणीच काही बोलत नाही....
हे कसं ?????....
रस्त्यात जवळच म्हाताऱ्याच्या गुरुचा आश्रम होता....
म्हाताऱ्याने ठरवले - जग इतकं कसं बदललं हे कोडं गुरू महाराजांनाच विचारले पाहिजे...तेच सोडवतील हे...
महाराजांनी म्हाताऱ्याचा अनुभव ऐकून घेतला आणि विचारलं - " मला तुझा मोबाईल बघू दे बरं जरा..."
म्हाताऱ्याने आपल्या खिशातला १ इंच रूंद अन् २ इंच लांब चुन्याच्या डबी एवढा मोबाईल काढून महाराजांच्या समोर धरला...
महाराजांनी मोबाईल पाहिला आणि विचारलं - " अजून ही तु २० व्या शतकातच आहेस ??... अरे बाबा हे  २१ वे शतक आहे...स्मार्टफोन वापरत नाहीस का?... इंटरनेट वगैरे ??..."
म्हातारा म्हणाला - " नाही बा... काही कामच नाही पडत, हे बरं आहे आपलं बोलायला..."
महाराजांनी मग आपला आयफोन काढला आणि त्यांवर आलेल्या कमेंट्स दोघा बापलेकांना दाखवल्या .....
फेसबुक, इंस्टाग्राम, what's up नुसतं रिल्स, फोटो, व्हिडिओ वगैरेंनी भरभरून वहात होतं....
कमेंट्स तर हजारो आल्या होत्या आणि येतच होत्या....
पहिली कमेंट -
अति शहाणे त्यांचे गाढव रिकामे..
दुसरी कमेंट -
म्हाताऱ्याला अक्कल आली - गाढव ठेवू नये खाली...
तिसरी कमेंट -
साठी बुद्धी नाठी...
पोरगं चालतं पायी,
बाप गाढवाच्या पाठी...
चौथी कमेंट पाहीली... 
" ही दोन्ही मुर्ख माणसं मुक्या जनावराच्या पाठीवर बसून त्याला फटके मारत आहेत...हा मुक्या प्राण्याचा अमानुष छळ आहे तेंव्हा ह्या दोघांना मनेका गांधींच्या  समोर उभं करा आणि १९६० च्या भारतीय कायद्यानुसार अटक करा... कठोर शिक्षा द्या..."
चौथी कमेंट बघून म्हाताऱ्याच्या डोळ्यांपुढे अंधारी आली...
म्हातारा कळवळून म्हणाला -
" महाराज, मला वाटलं जग सुधारलंय... बदललंय..."
महाराजांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले - " तु तरी कुठं बदललास?...जो पर्यंत माणूस नावाचा प्राणी आहे तोपर्यंत काही ही बदलणार नाही..."
म्हातारा - " मग आम्ही काय गाढव बाजाराला न्यायचं नाही ??.."
महाराज - " वत्सा, सरकार तुझ्या बांधावर यायला तयार असताना तु कशाला वणवण करतो आहेस ??..."
म्हातारा - " महाराज, सरकार तर वादळ वारं आलं, नापिकी झाली तरच बांधावर येतं..."
महाराज - " अरे मग तु स्मार्ट हो ना...OLX वगैरे वर जा... तिथं गाढवाचा फोटो टाक...लोक गाढव न्यायला तुझ्या घरी येतील...आता तुम्ही सोशल मीडियावर झळकला आहात... तुम्ही सेलिब्रिटी झाला आहात... तुझ्याकडे तर रांग लागेल रांग..."
म्हातारा मनात बोलला....
महाराज म्हणतात म्हणजे ते खरं असलं पाहिजे...
आता पहिलं एक स्मार्ट फोन विकत घेऊन फेसबुक , इंस्टाग्राम वगैरे सुरू केलं पाहिजे...OLX वर गेलं पाहिजे म्हणजे झालं...
महाराजांना नमस्कार करून दोघं बापलेक निघाले...
गुरुदक्षिणा द्यावी म्हणून म्हाताऱ्याने बंडीच्या खिशातून एक किरकोळ नोट काढली तसं महाराज म्हणाले -
" असू दे.."
बापलेक बाहेर पडले...
आश्रमाच्या आवारात गाढव दिसेना...
म्हाताऱ्याने महाराजांच्या शिष्याला विचारले - " आमचं गाढव होतं इथं..."
शिष्य बोलला - " असू द्या... गाढव महाराजांनी गुरूदक्षिणा म्हणून ठेऊन घेतले आहे..."
बापलेकांना समजलं -
प्रश्न गाढवाचा नव्हता....
प्रश्न गाढव " असण्याचा "  होता...
बऱ्याच वेळा आपल्याला देखील व्यवस्थेसमोर गाढव कधी बनलो हे समजत नाही.हल्लीचं जग दिखावा आणि कोडगेपनाकडे वेगाने जात आहे.सावध रहा...आभासी जगात तुम्ही सदा सर्वकाळ वावरू शकत नाही. वास्तववादी बना.

644. सात प्रकारच्या विश्रांती..

 दिवसभर खूप दगदगीचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतं, बरोबर ना ?
झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो? आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच नाही. आपण जीवनात विश्रांतीचे महत्व जाणून घेत नाही त्यामुळे आपल्यामध्ये कायम विश्रांतीची कमतरता भासते. आपल्या जीवनात या विश्रांती सम प्रमाणात असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे 7 प्रकार असतात. ते आपण सविस्तरपणे पाहुयात. 
शारीरिक विश्रांती
     आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणलं जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग, स्ट्रेचिंग, मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते.
मानसिक विश्रांती
     दिवसभर दग दग करून आपण काहीसे चिडचीडे आणि विसरभोळे व्हायला सुरुवात होते. रात्री दमून थकून आपण झोपायला जातो तेव्हा पण आपल्या डोक्यात दिवसभर जे काही झालं तेच सुरू असतं. रात्री झोपताना देखील आपण आपले विचार बाजूला ठेवून झोपू शकत नाही. 
८ तास झोपून पण आपल्याला झोप पूर्ण झाली नाही असे वाटत राहतं. बिछान्यावर पडून राहण्याची इच्छा होते. हे आपल्या सोबत कशामुळे होत असेल याचा विचार कधी आपण केला आहे का ?
मानसिक विश्रांतीचा अभाव हे याचे मुख्य कारण आहे. आता या त्रासातून स्वतःला कसे सोडवायचे ? आपली नोकरी किंवा काम सोडून देणं हा मार्ग आपण अवलंबू शकत तर नाही. त्यामुळे आपल्या कामाचे एकूण किती तास आहेत ते पहिले बघा. त्यांचे दोन दोन तासात विभाजन करा. आता प्रत्येक दोन तासांमध्ये एक 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. आणि हा ब्रेक आपण कधी घेणार आहोत याचं नियोजन करा . आपल्याला सुट्टी घेण्याचीही बऱ्याचदा गरज असते. त्यामुळे आपण सुट्टी घेणं आवश्यक आहे.  रात्री झोपताना जवळ एक डायरी घेऊन झोपा म्हणजे ज्या विचारांमुळे झोप येत नाही किंवा घाबरायला होत अशा विचारांची नोंद ठेवा. जेणेकरून त्यावर मात कशी करू शकू ? यावर आपण अभ्यास करू शकतो. 
सेन्सरी विश्रांती
     विश्रांतीचा तिसरा प्रकार आहे, सेन्सरी विश्रांती दिवसभर सतत लॅपटॉप, कॉम्प्युटर यांचा समोर बसून काम करणे,  लाईट्स, आजूबाजूला होणारा आवाज, खूप लोकांशी कामासाठी बोलत राहणे, यामुळे आपल्या संवेदनावर खूप लोड निर्माण होतो. आता तुम्ही म्हणाल, ऑफिसमध्येच फक्त काम केल्याने हे होते का ? कारण सध्या बरेच लोक घरून काम करत आहेत पण ऑनलाइन मिटींग करून ही आपण या त्रासाला सामोरे जात असतो. यासाठी काम करत असताना काही वेळ अगदी एक मिनिट तरी शांत डोळे मिटून बसणं फायदेशीर ठरेल. आपले काम पूर्ण संपल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वतःला इलेक्ट्रॉनिकस् माध्यमातून अनप्लग करून झोपण्यास सुरुवात करा. 
क्रिएटीव्ह विश्रांती
     क्रिएटीव्ह विश्रांतीचे महत्व सातही विश्रांतीमध्ये सगळ्यात जास्त आहे. अश्या प्रकारच्या विश्रांतीमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचण्यास मदत होते. आपण आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या शांत रम्य जागी शेवटचं कधी गेला होतात आणि तिथे निवांत कधी बसला होता ते आठवा. बाहेर असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानंतर आपल्याला क्रिएटीव्ह विश्रांती मिळत असते. आता फक्त निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं म्हणजेच क्रिएटीव्ह विश्रांती नव्हे. तर काम सोडून ज्या गोष्टी, छंद, कला आपल्याला आवडतात ते करणे म्हणजे क्रिएटीव्ह विश्रांतीच. अश्या गोष्टी जिथे आपण व्यक्त होत आहोत असे वाटते, अश्या गोष्टी, छंद जोपासण्यासाठी वेळ देणं याचा समावेश क्रिएटीव्ह विश्रांतीमध्ये होत असतो. आपण आपले आठवड्यातील 40 तास तर गोंधळून विचार करण्यात घालवत असतो. त्यामुळे आपल्याकडून क्रिएटीव्ह काही होत नसल्याचे पाहायला मिळते.
भावनिक विश्रांती
     सतत इतरांना काय वाटेल याच्या चिंतेत असण्याने भावनिक विश्रांतीची गरज वाढते. कुटुंबातील व्यक्ती, मित्र, सहकारी आणि बॉसेस यांच्या लेखी योग्य असे वागण्यात प्रचंड ऊर्जा खर्च होते. 
अशा वेळेस जो आपल्याबद्दल काहीही मत बनवणार नाही, ज्याच्याशी आपण कोणत्याही विषयावर काहीही बोलू शकतो अशा मित्रांना भेटा/फोन करा. तेव्हाच आपल्याला "भावनिक विश्रांती" मिळेल. आपल्या मनातील गोष्टी बोलता येणं आणि ते ऐकणारा माणूस असणं हे परमभाग्याचं लक्षण आहे.  
सामाजिक विश्रांती 
    भावनिक विश्रांती नंतर आता सामाजिक विश्रांती काय असते ते पाहुयात, 
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या अति वापरामुळे नकारात्मकता प्रचंड वाढली आहे. आपल्या आसपास असणारी माणसे आपण बदलू तर शकत नाही मात्र जास्तीत जास्त प्रेरणा देणाऱ्या, उत्साह वाढविणाऱ्या, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सामाजिक विश्रांती. ज्यांच्याशी २ मिनिटे बोलल्यानंतर लगेचच उत्साह दुणावतो अशा लोकांसोबत संपर्कात राहा. 
अध्यात्मिक विश्रांती
     या विश्रांती नंतर अध्यात्मिक विश्रांती समजून घेऊया, प्रेम, आपुलकी, स्वीकार करणे या भावना अगदी शारीरिक व मानसिकतेच्या पलीकडे जाऊन खोलवर समजून घेणं ही अध्यात्मिक विश्रांती.  आता ही विश्रांती आत्मसात करण्यासाठी स्वतःपेक्षा इतरांना उपयोग होईल अशा कामांत स्वतःला गुंतवणे, रोजच्या रोज प्रार्थना, ध्यान कराणे तसेच आपल्या आवडीच्या सामाजिक कार्यासोबत  जोडले जा. 
मित्रहो, लक्षात आलं ना? फक्त झोप पूर्ण करून आपण बाकीच्या विश्रांतीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आता स्वतः साठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा. शारीरिक आणि मानसिक दोन्हीही दृष्ट्या सुदृढ व्हा !‌!!!
डॅा. प्रमोद मराठे

643. तुम्ही अमिताभ व्हा...

 ११ ऑक्टोबरला अमिताभ ८० वर्षांचा झाला. जग एवढं बदललं. नेहरू गेले. मोदी आले. साधी थिएटर गेली. मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला मर्द गेला आणि ओलासह उबेरही आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या 'नमक'चा संदर्भ बदलला. तरीही अमिताभ नावाचा 'सिलसिला' सुरूच आहे. या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं. तरी, नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर! 
आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकुम काम करत असतो. अमिताभचे समकालीन काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत, ते उपकारापुरते उरले. पण, अमिताभ आहेच. कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच 'चिनीकम' करावा वाटतो वा 'पा'मध्ये अमिताभला लहान मूल करावे वाटते. 'मी भूमिकेसाठी अमिताभची निवड नाही केली, तर अमिताभसाठी भूमिका निवडली', असं बाल्की सांगतो. चाळीशीतल्या नागराज मंजुळेला, ऐंशी वर्षांच्या अमिताभनं आपल्या सिनेमात काम नाही केलं, तर आपल्याला 'मोक्ष' मिळणार नाही, असं वाटतं. शूजित सरकारलाही अमिताभ हवा असतो आणि करण जोहरलाही. 
काय आहे हे? 
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अमिताभ संपला नाही. कारण, तो थांबला नाही. तो साचला नाही. "आमच्यावेळी असं होतं!", असं माणसं दिवसातला निम्मा वेळ म्हणू लागली की ती संपतात. आपली मुलं-बाळं रांकेला लागली की आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं जे मानतात, ते अकाली म्हातारे होतात! सकाळी वॉक, दुपारी एक पोळी, रात्री ग्लासभर दूध एवढंच ज्यांचं आयुष्य होतं, ते त्या शेड्यूलचे गुलाम होतात. तेही ८० वर्षे फीट जगतात, पण केंव्हाच संपून गेलेले असतात. 
अमिताभ संपला नाही. कारण, त्याच्या त्या 'ॲंगी यंग मॅन' रूपाप्रमाणेच तो सदैव कार्यरत राहिला. अपघात, आजारपणं, दुखणी त्याच्यामागे कमी नाहीत. कौटुंबिक ताण, पोराबाळांची चिंता नाही, असं नाही. उद्योगधंद्याचं तर पार दिवाळं निघालं. राजकारणात अपयशी ठरला. तरी तो उभा राहिला. धावत राहिला. अमिताभ हा अभिनेता वा माणूस म्हणून थोर आहे, असे माझे मत अजिबात नाही. पण, हे जे आहे ते का आहे? काय आहे? ते नाकारून कसे चालेल? अमिताभचा जादुई आवाज, अमिताभचा करिष्मा, कवीचा मुलगा असलेल्या अमिताभची साहित्याची समज, त्याचा आवाका, त्याची खोली हे कसं नाकारणार? रूढ अर्थानं अमिताभकडं ना चेहरा, ना ॲक्शन हीरोची शरीरसंपदा. पण, अमिताभ हा अमिताभच असतो. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचा चेहरा, त्याची उंची, त्यांचे शरीर असं सुटं सुटं करून चालत नाही. या सगळ्याचा म्हणून जो एकत्रित परिणाम आहे, तो अभूतपूर्व आहे. तो अमिताभ आहे! 
परवा लॉ कॉलेज रस्त्यावरच्या बरिस्तात कॉफी पित होतो. पलिकडच्या टेबलवर एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं. तर, दुस-या टेबलवर काही तरूण मुलं-मुली बसली होती. म्हातारा-म्हातारी पेन्शनपासून टेन्शन आणि मुलीच्या लग्नापासून ते फॉरेन टूरपर्यंत बरंच बोलत होते. तिकडं पोरं एक्झामपासून ते आयपीएलपर्यंत ब-याच गप्पा ठोकत होते. हे म्हातारे कॉलेजात होते, तेव्हा  अमिताभच्या 'आनंद'नं लक्ष वेधून घेतलं. किती उन्हाळे-पावसाळे पाहिले. अमिताभचा सिनेमा पडेल. पण, ते आहेत. 
"सध्या काय करताय?" असं विचारल्यावर पवार परवा एका मुलाखतीत म्हणाले होते- "सेल्फी काढायला शिकतोय!"
हेच ते कारण आहे, ज्यामुळं माणसं ऐंशीव्या वर्षीही कार्यमग्न असतात. बाकी, तुम्हालाही नसतील, अशा व्याधी, अशी आजारपणं, अशा समस्या, असे ताण, असे प्रश्न त्यांच्या वाट्याला आहेत. पण, 'ॲंग्री यंग मॅन'ला डोक्यावर घेणा-यांची नातवंडं कॉलेजात जाऊ लागली, तरीही हा 'यंग मॅन' अमिताभ आहेच. आणि, पवार ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा पवारांविषयी बोलणा-यांना आज त्यांची नातवंडं शरद पवारांविषयी सांगू लागली आहेत! 
हे दोन्ही 'बच्चन' आजही कार्यरत आहेत, पण ते दोघेच नाहीत. तिकडे ८५ व्या वर्षी आमचे भालचंद्र नेमाडे नव्या प्रकल्पावर अहोरात्र काम करताहेत. त्यांच्या लिहिण्याने नव्या मुलांना आजही झपाटून टाकताहेत. त्याच वयाचे रतन टाटाही पहाटे पाचला उठून दिवस सुरू करताहेत. 
शुभ्रा गुप्ता म्हणते ते खरंय. 
अमिताभच्या घरावर एकच पाटी आहे - 
"Work in Progress!"
अमिताभला 'हॅपी बड्डे' म्हणणं म्हणजे अखंड, अविरत, अव्याहत अशा कार्यमग्नतेचं सेलेब्रेशन आहे! अमिताभ एका रात्रीत जन्माला येत नाही. तो अव्याहत कामातून, कार्यमग्नतेतून, अविचल निष्ठेतून 'अमिताभ' होत असतो. 
हे 'अमिताभ'पण लक्षात घ्यायला हवं. 
(फक्त माहिती म्हणून सांगतो - अमिताभ हे महायान पंथातल्या बुद्धांचे एक नाव आहे.)
अविरत चालणं हा अमिताभचा 'पासवर्ड' आहे. 
सो, चालत राहा. 
मुक्काम आणि मोक्षाच्या आशा करू नका. 
पडद्यावर धावणारा अमिताभ आठवा आणि तसेच पॅशनेटली धावत राहा. चालत राहा. अविरत कार्यरत राहा.  
तुम्हीही बच्चन व्हा!

642. मनातल्या घरात ( Self - Introspection )

 आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे कां ???  
एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण, इथे तिथे फिरायला जातोच की !!! मग ती  पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या तरी घरी !!! याच्या त्याच्या घरी, या ना त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी ठरवले, कां नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा ???
हो, हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार !!! आपणच आपल्या मनाच्या  घराला भेट द्यावी म्हंटले, बघावे तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाचे घर !!! कोण, कोण रहातात तिथे ???  कसे स्वागत होत ते ???
ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहचलो. अगदी छोटेसे होते, पण छान होते !!! आत काय असेल, या उत्सुकतेने दार वाजवले, तर आतून आवाज आला, "कोण आहे ???? काय पाहिजे ????" असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती पण खरंच आपण कोण आहोत, हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ???
मी ही सांगितले, "मी स्व आहे रे !!! ज्याचे तू कध्धी ऐकत नाही. ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी !!!"
आतून आवाज आला, " बरं.... बरं...उघडतो दार !!!" दार उघडल्या नंतर आत पाहिले, तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारले, " कां रे एवढा अंधार ???" तेव्हा तो म्हणाला, " तुमच्याच कृपेने !!! मी म्हंटले, " माझ्या कृपेने ??? तर तो म्हणाला, "हो !!! तुझ्याच कृपेने !!! कारण इथे उजेड तेव्हा पडेल, जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील."
मी ही जरा ऐटीतच म्हणालो, "ठीक आहे... ठीक आहे !!! लावतो दिवे" म्हणत, पुढे सरकलो. थोडं पुढे चाचपडत गेलो तर काय !!! तिथं असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होते. मी त्याला पुन्हा विचारले, "काय रे, त्या खोल्यात काय दडलंय ???"
तो पुन्हा म्हणाला, " बघ की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते." मग मी हळूच एका खोलीचे दार उघडले.  आणि...फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावले. तेव्हा तो म्हणाला, " काय झालं ??? दार कां लावले ???" मी म्हंटले, " कसले भयानक होते रे ते !!! " तर तो पुन्हा हसत म्हणाला, " तुम्हीच गोळा केले आहेत ते !!! तुम्ही ज्यांचा ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे ते कळलं कां ??? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती !!!"
हुश्श.....अरे बापरे !!! पुढचं दार उघडायचे धाडसच होईना, पण म्हंटले आता आलोच आहे तर उघडावे. तिथे ज्या काही घटना पहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिस्कीलपणे म्हणाला, " काय, काय झालं... ??? मी म्हंटले, "अरे बाबा, हे काय ??? तो पुन्हा म्हणाला, " तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करीत गेलास, त्याला मी तरी काय करणार ??? आता तर साठवून ठेवायला या खोल्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत."
तिथं अशा किती तरी खोल्या होत्या, ज्यांना उघडायच धाडस माझं झालं नाही. मग त्याने त्या उघडून दाखवल्या, ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्षा, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली अशा अनेक खोल्या पाहिल्या, सर्वच्या सर्व अंगावर येत होते.
आता मात्र माझं डोकं गरगरायला लागले, अस्वस्थता वाढली होती. किती भयावह होत ते सर्व !!! त्यामुळे पुढं काय आहे, हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारं भयाण बघून अंगाला काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता.
मी त्याला म्हंटले, "मी जातो आता. मला काही बघायचं नाही आता." तो म्हणाला, " थोडं...थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा."
थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो....तिथं संपूर्ण जाळ लागलेला होता...मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय....आहा.....हा हा...स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होत, तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान शांती ने भरलेले, अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व काही होते.
मी म्हंटले, "काय रे हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी कां नाही दाखवलं ???" तर तो मिस्कील पणे हसत म्हणाला, " अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे." मग मी म्हणालो, " जे आधी पाहिलं, ते काय होतं ???" तो पुन्हा हसत म्हणाला, " त्या...त्या...तुम्ही अतिक्रमण करत वाढविलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, इर्षा, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी याची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारा पुढे पहारेकरी बनून बसले आहेत, जे तुम्हाला इथं पर्यंत येण्यास अडवत आहेत."
क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख, आनंदाच्या कडे जाणारा रस्ता, या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता पण ठरवलं की, आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख समाधान, शांती कडे जाणारा मार्ग सोपा करायचा. बरं झालं. आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं. मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर, दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची. चला तर मग आपणच आपल्या मनाच्या घराच्या  प्रवेश करून साफ सफाई सुरू करूया .

641. भरपाई....

एल.आय.सी.आँफिसमध्ये हफ्ता भरण्यासाठी रांगेत उभा होतो.माझ्यापुढच्या माणसाचा नंबर आला.कँशियरने त्याला विम्याची रक्कम सागितल्यावर त्याने पैसे दिले.
"सहा रुपये सुटे द्या", कँशियर बोलला.
"नाहीयेत" "माझ्याकडेही नाहीयेत.
घेऊन या मगच हफ्ता भरा"
"अहो आता मी कुठून आणू"
दोघांचा वाद सुरु झाला तसं मी खिशातून सहा रुपये काढून पुढच्या माणसाला दिले.
"अहो पण तुम्ही कशाला देताय आणि तुम्हाला मी कुठून परत देऊ?"
"नका परत करु"मी म्हंटलं.
त्यानं आश्चर्याने माझ्याकडे पाहीलं आणि हफ्ता भरुन काऊंटर सोडलं.
मी हफ्ता भरला आणि आँफिसच्या बाहेर आलो तर तो समोर उभा.
"साहेब खुप खुप धन्यवाद"
"अहो त्यात कसले धन्यवाद"
"नाही नाही असं कसं. साहेब आपलं नाव?
"मी नाव सागितलं"
चला साहेब कुठंतरी चहा घेऊ"
मी नाही म्हंटलं तरी जबरदस्ती घेऊन गेला.
हाँटेलमध्ये गरम समोसे निघत होते त्यानं समोश्याची आँर्डर दिली. खाऊन झाल्यावर चहाही पाजला. वर निघतांना त्यानं सुटे झालेले सहा रुपयेही त्यानं परत केले.
मी एकदम अवघडून गेलो. "अहो इतका चहानाश्ता झाल्यावर परत पैसे कशाला?"
"साहेब तुमच्या सारखी मदत करणारी माणसं या जगात कमी आहेत. तुम्हाला घ्यावेच लागतील पैसे" माझ्या खिशात पैसे टाकून तो निघून गेला.
एके दिवशी सकाळी पाच वाजता रेल्वे स्टेशन वर निघालो होतो. चौकात आलो तर एक म्हातारा रिक्षाची वाट बघत उभा असावा. इतक्या सकाळी इथं रिक्षा नसतात हे त्याला बहुतेक माहीत नसावं. मी त्याच्याजवळ गेलो, चौकशी केली तर त्याला शेगांवला जाण्यासाठी रेल्वेस्टेशनलाच जायचं होतं. मी त्याला गाडीवर घेतलं. म्हातारा सारखा खोकत होता. त्याला म्हणे शेगावच्या गजानन महाराज संस्थानच्या दवाखान्यात उपचारासाठी जायचं होतं. बहुतेक मुलं त्याला विचारत नसावीत.
स्टेशनवर सोडल्यावर सहजच त्याला विचारलं, "बाबा तिकिटाचे पैसे आहेत का?" त्यानं नकारार्थी मान हलवताच मी त्याचं तिकीट काढून दिलं. वरुन त्याला शंभर रुपयेही दिले.
गाडीत बसवतांना एवढा वेळ अबोल असलेला म्हातारा बोलला "बेटा चांगल्या कामाची भरपाई आज नाही तर उद्या मिळतेच. असेच चांगले काम करत रहा"
परवा नाशिकला काम आटोपून मी स्टेशनवर आलो. पहातो तर मुंबईतल्या पावसामुळे जळगांवला जाणाऱ्या काही गाड्या रद्द तर काही खुपच उशीरा धावत होत्या. आता बसने जाण्यापेक्षा रात्रीचा मुक्काम करावा का या विवंचनेत असतांनाच कुणीतरी मला हाक मारली मी चमकून पाहीलं पण मला व्यक्ती ओळखीची वाटेना.
"साहेब कुठं जायचं होतं तुम्हाला?" त्यानं विचारलं.
"मला जळगांवला. पण गाड्या तर रद्द आहेत"
"हो ना या आमच्या मेव्हण्यांनाही भुसावळला जायचंय."
शेजारच्या व्यक्ती कडे बोट दाखवून तो पुढं म्हणाला" यांना मी म्हणतोय की गाडीनं सोडतो पण रात्री कुणी सोबत नाही म्हणून ते नाही म्हणत होते तुम्हांला जर ड्रायव्हिंग येत असेल तर आपण दोघं चालवत जाऊ" मला देवच मदतीला धावून आल्यासारखा वाटला मी लगेच हो म्हंटलं.
गंमत म्हणजे रात्री आम्ही ढाब्यावर जेवलो त्याचे पैसे त्यांनी घेतले नाहीत. विशेष म्हणजे मला ड्रायव्हिंग ही करु दिली नाही. जळगांवला उतरल्यावर मी पाचशेची नोट काढून त्याला दिली त्याने ती घेऊन परत माझ्या खिशात कोंबली. म्हंटला "साहेब माणूसकी सोडली नाही आम्ही अजून.
आणि माझा बाप सांगून गेलाय तुम्ही चांगले काम करत रहा देव त्याची भरपाई केल्याशिवाय राहणार नाही"

640. बेवारस झेंडू आणि आमचा जिद्दी आबा

 आबा तसा आमचा जिद्दी शेतकरी.दोन वर्षे  कोरोनात गेली पण गडी कधी थकला नाही. बापानं करून ठेवलेले सोसायटीचे कर्ज, खाजगी सावकाराचे देणे असूनही गडी कधीच भिला नाही. लॉक डाऊन मध्ये रानात थोडे माळवं-भाजीपाला पिकवायचा आणि सायकलवर तर कधी मोटरसायकल वरून लांब शहरापर्यंत भाजीपाला विकाय जायचा.लॉकडाऊन मध्ये कोणी पकडलं तर त्याला किलो दोन किलो वांगी दोडका देऊन जागेवरच सेटलमेंट पण करायचा.लय जुळलं नाही तर खिशातल्या डायरीतुन माझा मोबाईल नंबर काढून "तेवढं आमच्या वकील साहेबांशी बोला, पुण्याला लय मोठं वकील साहेब हाईत "असं म्हणायचं
    एकदा एकाच पोलिसाला दोन वेळा लॉकडाऊन मध्ये सापडला मग आबाला पोलीस चौकीतच बसवून ठेवला. शेवटी मीच जाऊन चौकीतून बाहेर सोडवून आणला. बापडेपणाने आबा परत वळून चौकीत गेला आणि सगळ्यांना वांगी तंबाटी देऊन हसत हसत बाहेर आला. तिथले पोलीस अधिकारी पण चांगले होते त्यांनी आबाचा भोळेपणा पाहून त्याच्या मालाचे पैसेही दिले असा आमचा भोळा भाबडा वारकरी संप्रदायातला शेतकरी आबा. यंदा मात्र आमचा हा भाबडा शेतकरी आबा रडला-हतबल झाला.दसरा नवरात्रात झेंडू फुलाला चांगली मागणी असते म्हणून आबांनी अगोदरच झेंडूची लागवड केली होती. परवा त्याच्या गावाला घरी गेल्यावर आवर्जून आबाने झेंडूची लागवड केलेली बाग मला दाखवली.शेना मातीत सारवलेले घर, अंथरुणावर पडलेला आजारी बाप, बाजरीचे दळण निवडत बसलेली म्हातारी आई, दोन ठिकाणी शिवलेले फ्रॉक घालून अभ्यास करत बसलेली पोरगी, ठिगळाणी जोडलेले चड्डी घालून अंगणात पोरगा खेळत होता. आबाने मला त्याची झेंडूची बाग फिरवून मोठ्या कौतुकाने दाखवली. तेवढ्यात डोक्यावरचा पदर सावरत आबाच्या बायकोने स्टीलच्या फुलपात्रात गरमागरम कोरा चहा आणून दिला.आबाने पोरीला जवळ करत तिच्या शाळेतल्या वहीतले मोत्यासारखं सुंदर अक्षर मोठ्या कौतुकाने दाखवले.*
निरोप घेताना आबा म्हणाला "यावेळी दसऱ्याला झेंडू विकला की पोरांना चांगली कपडे हडपसर वरून घेऊन येतो. साहेब यावेळी तुमच्या हडपसरच्या ऑफिसा समोर उड्डाण पुलाच्या खाली जागा धरतो झेंडू विकायला. तिथं लय चांगलं पैसं होतील."
        ठरल्याप्रमाणे आदल्या दिवशी आबाच्या सगळ्या कुटुंबाने अगदी आनंदाने झेंडूची फुले तोडली भाड्याने टेम्पो घेतला. म्हातारी आई आणि पोटच्या लेकीला मदतीला घेऊन पहाटे साडेतीनला  हडपसरला माझे ऑफीस समोर उड्डाण पुलाखाली जागा पटकावुन दसऱ्याच्या दिवशी आबाने छान दुकान थाटलं. फुलाचे दोन ढीग करुन एका ढिगावर म्हातारी,पोरगी आणि दुसरे फुलाच्या ढिगावर आबा झेंडू विकाय बसला.मला सकाळी आठला मोठ्या खुशीत फोन केला"त्यावेळी झेंडू घ्या झेंडू जोर जोरात ओरडायचा."
      पण सकाळी नऊ नंतर झेंडू ची आवक मोठ्या प्रमाणात पुलाखाली वाढली.खुप माल घेऊन विक्रेते वाढले. 60,-80 रुपयेचा झेंडू तासा दोन तासात 30 रुपये 20 रुपये वर आला.दुपार नंतर तर एक पण गिराईक आबा आणि म्हातारी कडे येईना.आबानं रडवला चेहरा करत शेवटी प्लास्टीकची क्यारी बैग भरून दहा रुपये  किलो दर केला.घसा बसो पर्यंत झेंडू घ्या झेंडू ओरडायचा .तरी पण गिराईक काय फीरकत न्हवते.शेजारी बसलेली म्हातारी आई उसने अवसान घेऊन आबाला धीर देत होती. पण आबाच्या डोळ्यासमोर पोरांची सनासुदी साठीची नवी कापडं सारखी दिसत होती.समोर लहान मुलांचे कपड्याच्या दुकानावर आबाची सारखी नजर राहुन राहुन जात होती. सोबत आणलेल्या पोरीकडे लक्ष गेले की  आबाच्या डोळ्यात टचकन पाणी येत होते. शेवटी या कोरोनाला न घाबरणारा आमचा आबा संध्याकाळी मात्र हतबल आणि केविलवाना झाला. शेजारचे झेंडू विक्रेते झेंडूची फुले तशीच बेवारस सोडून कधीचीच निघुन गेली होती. मात्र आबाचं तर अजुन टेम्पो चे भाडे पण वसुल झाले न्हवते. मला समोर बघीतल्याव आबा धायमोकलू रडायला लागला. सकाळ पासुन माय लेकराने अन्नाचा घास खाल्ला न्हवता.पोरगी सुधा भुकेली होती.सोडून द्या आबा आता, उठा म्हणत मी त्या तिघांना माझे ऑफिस शेजारच्या हॉटेलात घेवुन गेलो. तिघांच्या पोटाला खायला घातले, चहा ची ऑर्डर देवून मी परत आलो म्हणत *मी समोरच्या कपड्याच्या दुकाना गेलो. आबाच्या पोराला-पोरीला नवीन ड्रेस विकत घेतला.आबाच्या हातावर मी नविन ड्रेस ठेवताच आबा  परत रडायला लागला. धीर देत गाडी भाड्याचे  पैसे मी देऊ लागलो तर भाबडेपणाने नको, हायती थोडं फार जमल्यात म्हणाला.निरोप घेवुन पोरीचा हात पकडत आबा आणि म्हातारीने बेवारस पडलेल्या त्यांच्या सोनेरी झेंडूवर  डबडबलेल्या डोळ्यांनी पुन्हा एक नजर टाकत गावची वाट धरली.कष्टाने पिकवलेल्या झेंडुंच्या फुलांना आखेरचा निरोप देवून एक हतबल राजा परतीच्या वाटेने चालला होता..उद्याच्या संकटाशी पुन्हा दोन हात करायला. 

 लेखक एडवोकेट वैभवराव रामदास धायगुडे पाटील, हडपसर पुणे  9822760659 
ज्यावेळी भाजी खरेदीला मंडईत तुम्ही जाल त्यावेळी फार घासा घिस करू नका..आभाळा एवढी नाहीत पण छोटीशी स्वप्न दडलेली असतात  शेतकऱ्याची
(विनंती -: पोस्ट लेखकाच्या नावासहित फॉरवर्ड करावी)

639. प्रसंगावधान

 आदिती प्रधान, पुण्यात राहणारी एक उच्चशिक्षित, सुंदर २३ वर्षीय तरूणी. आदिती एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत टेक्नॉलॉजी अनॅलिस्ट आहे. सध्या ती एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असल्याने घरी जायला बर्‍याचदा उशीर होतो. पण आज क्लायंट सोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मुळे रात्रीचे अकरा कसे वाजले तिला कळंलं देखील नाही. आदितीने बॅग उचलली, ड्रॉवर उघडून मोबाइल बाहेर काढला. आईचे ५ मिसकॉल दिसत होते. फोन करून आईला तिने तासाभरांत घरी पोहचते असे सांगून मोबाइल वर कंपनीचे कॅब बुकिंग अॅप उघडले आणि कॅब बुक केली. ती बाहेर पडत असतानाच कॅब समोरून येताना दिसली. दार उघडून ती आत बसली. ड्राइवर शिवाय कॅबमधे कोणीही नव्हते. आज तिला फारच उशीर झाला होता. ड्रायव्हर सुद्धा ओळखीचा वाटत नव्हता. कंपनीतील महिला कॅबमधे एकटी असल्यास किंवा तिचा शेवटचा स्टॉप असल्यास सेक्युरीटी गार्ड बरोबर घेण्याची सुविधा होती पण आदिती सहसा गार्ड बरोबर घेण्याचे टाळत असे. हिंजेवडी फेज वन वरून गाडी बाहेर पडली आणि मुंबई बेंगलोर रस्त्याला लागली. पाच दहा मिनिटं झाली असतील ड्रायव्हरने समोर ठेवलेला त्याचा मोबाईल उचलून स्विच अॉफ केला. तिने कारण विचारल्यावर "मोबाइल डिस्चार्ज होतो आहे आणि थोडय़ा वेळाने महत्त्वाचा कॉल करायचा आहे. म्हणून बंद केला." असे त्याने सांगितले. पण त्याच्या उत्तराने आदितीचे समाधान झाले नाही. कंपनीच्या कॅब बुकिंग अॅपला त्याचे लोकेशन ट्रॅक करता येऊ नाही म्हणून त्याने मोबाइल बंद केला हे तिच्या लक्षात आले. 
     तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. तेव्हढ्यात ड्रायव्हरने गाडीचा स्पीड वाढवला. आणखी थोड्या वेळात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाजवळ गाडी येऊन थांबली आणि तो माणूस ड्रायव्हर शेजारचे दार उघडून गाडीत येऊन बसला. पेहरावावरून आणि चेहर्‍यावरून तो माणूस काही सभ्य वाटत नव्हता. दोघांच्या हेतूची तिला पूर्ण कल्पना आली आणि तिची खात्री झाली कि ती फार मोठ्या संकटात सापडली आहे. थंडीचे दिवस असूनही आदितीला घाम फुटला. घशाला कोरड पडली. मोठ्या प्रयत्नाने तिने स्वतःवर ताबा मिळवला आणि शांत डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न करू लागली. अचानक तिला आठवले काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर आलेली एक पोस्ट वाचून तिने 112India अॅप डाउनलोड करून मोबाइलवर इन्स्टॉल करून घेतले होते आणि त्याला टेस्टही केले होते. थरथरत्या हाताने तिने पर्समधून मोबाइल बाहेर काढला. पिन टाकून सुरू करून होमस्क्रीन वरचे 112India अॅप ओपन केले आणि पोलिसांच्या मदतीसाठीचे बटन दाबले. आत्ताच्या परिस्थितीत या अॅपमुळे आपल्याला काही मदत मिळते की नाही या बाबतीत अादिती साशंक होती. 
     एव्हाना गाडीचा वेग कमी होऊन गाडी एका सुनसान रस्त्यावरून धावत होती. ड्रायव्हर शेजारी बसलेला माणूस मागे वळून घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. तिने पुन्हा एकदा 112India अॅपवरचे पोलिस आणि अदर्स हे दोन्ही बटन्स एकामागोमाग एक दाबले. दुसरी कुठलीही मदत मिळेपर्यंत तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे भाग होते. ड्रायव्हरजवळ बसलेल्या माणसाला ती मोबाइलवर कोणाची तरी मदत मिळवण्याचा प्रयत्न करते आहे, याचा संशय आला होता. त्याने मागच्या सीटवर झुकून तिचा मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. आदितीने मोबाइल पटकन पर्समधे टाकला आणि चालत्या गाडीचे दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण गाडी आतून लॉक होती.
      गाडी एका निर्मनुष्य जागी येऊन थांबली. ड्रायव्हर आणि त्याच्याजवळ बसलेला माणूस दोघेही दार उघडून मागे आले. दोघेही गाडीची मागची दोन्ही दारं उघडून तीला घेरून उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता अादिती उजव्या बाजूच्या दारातून ड्रायव्हरला ढकलून बाहेर पडली आणि रस्त्याच्या दिशेने धावत सुटली.  अॅपवरून पोलिसांना सूचना देऊनही दहा मिनिटे उलटली होती. ती जीवाच्या आकांताने पळत होती. त्याचबरोबर पोलिसव्हॅनच्या सायरनचा आवाज येतो का हे ऐकण्याचा प्रयत्न करत होती. दोघेही तिचा पाठलाग करत होते. दोन तीन मिनिटांतच त्यांनी तिला सहज गाठलं असतं.  तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज तिला एेकू आला. तिच्या जीवात जीव आला आणि ती अधिकच जोरात रस्त्याच्या दिशेने धावू लागली. थोड्याच वेळात पोलिस व्हॅन तिच्या दृष्टीस पडली. पाच पोलीस व्हॅनमधून उतरले. त्यात एक महिला पोलीस देखील होती. तिने धावण्याचा वेग कमी केला आणि मागे वळून पाहिले. दोघंही नराधम पोलिसांना पाहून पळून गेले होते. आदिती पोलीस व्हॅनजवळ आली. तिने सगळी घटना पोलीसांना सांगितली. पोलीसांनी आसपासचा परीसर पिंजून काढला पण दोघंही सापडले नाही. पोलीसांनी व्हॅनमधून आदितीला घरी सोडले. 
     आज भारत सरकारनी सुरू केलेल्या 112India अॅपमुळे आदिती एका मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली होती. आदितीने दोघा नराधमां विरुद्ध एफआयआर दाखल केला. तिने सांगितलेल्या गाडीच्या आणि दोघांच्या वर्णनावरून तसेच कंपनीजवळ असलेल्या ड्राइव्हरच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवरून पोलीसांनी सातार जवळच्या एका गावातून दोघांनाही ताब्यात घेतले. 112India अॅप डाउनलोड करून इंस्टॉल केल्यावर, नाव, जन्मतारीख आणि फोन नंबर दिल्यावर ओटीपी येतो. अॅपला कॉन्टॅक्ट्स, लोकेशन, फोनकॉल्स वगैरे ची परवानगी द्यावी लागते. ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे 112India ला अशक्य असते. लगेच स्क्रीनवर अॅप लोकेशन दाखवू लागते. पोलीस, आग, मेडिकल व इतर अशी चार बटन्स दिसायला लागतात.
भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 112 हा नंबर कुठल्याही प्रकारच्या इमर्जंसी मध्ये वापरण्यासाठी खुला केला आहे. आजपर्यंत २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित झालेली आहे, इतर राज्यातही होत आहे.
पोलीस (१००), आग (१०१), आरोग्य (१०८) आणि स्त्री सुरक्षा (१०९०) हे चार नंबर ११२ नंबराखाली आणलेले आहेत. सध्या सगळ्यांजवळ स्मार्टफोन आहेत त्यामुळे अँड्रॉइड व आयफोनसाठी अॅप विकसित केलेले आहे. अॅपवर ४ पॅनिक बटन्स दिलेली आहेत - पोलीस, आग, मेडिकल व इतर. आपल्या गरजेप्रमाणे बटन दाबले तर योग्य ती मदत ६ ते १० मिनिटांत मिळू शकते. आपली क्षमता व इच्छा असल्यास आपण स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंद करू शकतो. आपल्या भागात कुणी मदतीची याचना केल्यास ती आपल्यापर्यंतही पोचून आपण तिथे धाव घेऊन मदत करू शकतो. बर्‍याचदा घरात फक्त वृद्ध व्यक्ती असतात. कुणा एकाच्या बाबतीत मेडिकल इमेरजन्सी उद्भवली तर दुसऱ्याला काय करावे सुचत नाही, हाक मारून बोलावण्याच्या अंतरावर कुणी नसते, मुले दूरदेशी असतात. अशा वेळी हे अॅप वापरून तात्काळ मदत मिळवता येईल. अमेरिकेतील ९११ सारखा याचा वापर व उपयोग व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे. ही योजना केंद्र सरकारने निर्भया फंडमार्फत सुरू केलेली आहे. अॅपचा वापर करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करणे हे तर नक्कीच आपल्या हातात आहे.

साभार - कविता दातार ©
आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत हि स्टोरी तुम्हीच पोहचवा.

638. शेंडी...!

   मी कोल्हापूर जिल्ह्याचा , हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील मांगाचा पोरगा. माझ्या गावात मातंग समाजाची दीड-दोनशे घरे आहेत. तर आमच्या गावात मांगांची एक संतुबाई नावाची देवी आहे,तिचं फार मोठं मंदिर आहे.खरेतर ही देवी कर्नाटकातील कागवाडची. यात्रेच्या दिवशी संतुबाईची पालखी कागवाडला जायची तिथे  यात्रा व्हायची,खर्च खूप व्हायचा. माझे गाव वडगाव  मतदारसंघात येते,त्या मतदार संघांचे तत्कालीन आमदार जयवंतराव आवळे हे होते.आमदार आवाळेंनी सामाजासमोर असा प्रस्ताव मांडला कि,कागवाडला कशाला यात्रा करायला जाता ? मीच तुम्हाला दोन -चार बकरं देतो, इथेच यात्रा करा. समाजाला पटलं. यात्रा गावातच चालू झाली. एक -दोन वर्षे बकरी दिली. पुन्हा आवाळेंनी लक्ष काढून घेतलं. त्यानंतर सगळा खर्च समाजाला करावा लागला. 
        आमच्या मातंग समाजामध्ये एक प्रथा अशी आहे कि,कुटुंबात पहिला मुलगा जन्माला आला कि त्याला शेंडी राखा. म्हणजे केस कापताना डोक्याचे  सगळे केस कापायचे, पण शेंडी म्हणून राखलेल्या केसांना कातर लावायची नाही. मीही माझ्या कुटुंबात जन्मलेला पहिला मुलगा, माझीही  शेंडी राखली. इयत्ता ४थी पर्यंत मला शेंडीचे काय वाटले नाही. पण त्यानंतर मला शेंडीचा त्रास होऊ लागला.  लहानपणापासून शेंडी खूप वाढलेली, अभ्यासाला बसलो कि माझे सवंगडी शिवाजी म्हणायचे व शेंडी ओढायचे.  अभ्यासात अडथळा आला कि मला राग यायचा मग मी त्याला हातात जे सापडेल ते फेकून मारायचो. त्याला जास्त कळ आली कि ते घरी रडत जायचं. मग त्याचे नातलग माझ्या घरी शिव्या देत यायचे. त्यावेळी माझी आई मला धरायची, सगळ्या गावाची कळ काढतोस म्हणून मला मारायची. असे सतत सुरु होते.मी एक दिवस आईला म्हणालो , तुला माझा त्रास होत असेल तर माझी शेंडी काप.त्यावर आई म्हणाली कि,शेंडी कापणं येवढ सोपं नाही. एक बकरं व सर्व समाजाला जेवण दिल्याशिवाय शेंडी काढायला परवानगी नाही. हे न करता शेंडी काढली तर संतुबाई देवी कोपते.मी आईला म्हणालो, एक का दहा बकरी काप पण शेंडी काप.त्यावर आई म्हणाली, एक बकरं मिळेना म्हणून शेंडी राहिल्या. कुठलं बकरं ? माझे वडील टी.बी रोगाने बिछान्यावर पडून असायचे,आम्ही दोन भाऊ व तीन बहिणी. एकटी आई कमावती. मांग समाजाचा धंदा फड्याचा.फड्या पासून वाक,आणि वाका पासून दोरखंड बनवायचा. माझी आई फडे चिरायला जायची.पाच पेंड्या चिरल्या नंतर एक रुपया मिळायचा,माझी आई दिवसा पाच पांचोंदे(पाच पेंड्याचा एक पांचोदा)चिरायची त्याचे काही रुपये मिळायचे. त्यावर आमचं दोन टायमाचं पोट चालायचं. 
      पण पैसं साठत नव्हतं, त्यामुळं बकरं मिळत नव्हतं. शेंडी मात्र वाढतच होती.त्यावेळी मी इयत्ता सातवीत होतो. मी विचार केला, संतुबाईची शेंडी माझ्या डोक्यात म्हणजे संतुबाई देवी माझ्या डोक्यात ! एवढेच नव्हे तर घरात अनेक देवांचा देव्हारा असताना आमच्या वाटयाला हे दारिद्र्य,गरिबी का ? असा विचार करत रस्त्याने जाताना मला रस्त्यावर पडलेलं ब्लेडच अर्ध पान दिसलं.  मी ते हळूच उचललं व एका बाजूला अंधारात जाऊन त्या ब्लेडच्या पानाने हळूच शेंडी उडवली.हा प्रकार आठ दिवसानंतर माझ्या आईच्या लक्षात आला. त्या वेळी आईने घाबरून मला धरला,  आत्ता तुझं कसं व्हायचं म्हणून आई मला मारू लागली.वडिलांनी तिच्या तावडीतून मला सोडवलं   जवळ घेतलं,अंगावरून प्रेमाने हात फिरवत मला म्हणाले, “तू तिच्या देवाची कळ काढलीयंस, तुला तिने खूप मारलं. तू असं कर , मी तुला इचलकरंजीला इयत्ता आठवीला बोर्डिंगला घालतो. त्या ठिकाणी चांगलं,चांगलं खायला मिळतंय,चांगली,चांगली कपडे मिळत्यात. जा, तिथं जाऊन शिक.” चांगल,चांगलं खायला मिळतंय , हे मला भावलं आणि मी बोर्डिंगला जायला तयार झालो.घरात चांगलं खायला मिळायचं नाही,कुठलं मिळणार ? एकटी आई कमावणार, आई कामावरून येईपर्यंत आम्ही भावंड आईची वाट बघत बसायचो. संध्याकाळी आई कामावरून आल्यानंतर वेळानं जेवण मिळायचं. कधी कधी पिठ कमी असायचं. अशा वेळी माझी आई कुर्डूची भाजी गरगरीत शिजवायची,ती भाजी थोडं मीट टाकून पिटात मळायची त्यामुळे चार तिथं आठ भाकऱ्या व्हायच्या. मग आम्ही पोट भरून जेवायचो.
       तर वडिलांचं ऐकून मी शेवटी रत्नदीप हायस्कुल,गंगानगर (इचलकरंजी) येथे इ.आठवीला गेलो. जाताना माझी आई खूप रडत होती. तू जाऊ नको म्हणून प्रेमाने जवळ घेत होती. पण वडिलांनी तिचे काही एक ऐकलं नाही. त्या शाळेच्याच बोर्डिंग मध्ये मी प्रवेश घेतला. शिकलो. शिकत असताना शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचार कळाले. ती प्रेरणा घेऊन मी शिकलो. आज मी प्राध्यापक म्हणून दीड लाख पगार घेत नोकरीतून निवृत्त झालो. आता पन्नास हजार पेन्शन घेतोय. बायको शिक्षिका आहे, मुलगी डॉक्टर तर मुलगा ऍक्टर आहे. आई सुखात आहे. बकरं न कापता मी शेंडी उडवल्यामुळे माझं माझ्या कुटुंबाचं काहीही वाईट झालं नाही. उलट या सांस्कृतिक दहशतीतून व प्रचलीत समाज व्यवस्थेच्या गुलामीतून मी मुक्त झालो.

प्रा.सुकुमार कांबळे, 
कोल्हापूर.
शिक्षण वाघिणीचे दूध आहे हेच सिद्ध होते.

637. आजचा दिवस भरभरून जगा

  काल सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने , "डॉक्टर दीपक" ने एक मेसेज पाठविला.
Stop keeping your cloths & shoes for special occasion , Wear them whenever you can, Now a days being alive is a special occasion !!! 
आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा. सणासुदीला किंवा लग्नसमारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज नुसते कपाटात ठेवून देऊ नका, आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे.  खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका वृद्ध दाम्पत्या कडे व्हिजिट साठी गेलो होतो, दोघेही 80 च्या आसपास असावेत, राहणीमान, कपडालत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे, फी देतानासुद्धा घासाघीस करायचे, औषधे लिहून दिली तरी अर्धीअधिक आणायचे, कसली चैन नाही, कोणी नातेवाईकांच येणं जाणं नाही, कधी चांगलंचुगल खाणं नाही  कि कपडालत्ता नाही, असते एखाद्याची परिस्थिती नाजूक असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो, एक दिवस माझ्या व्हिजिट बॅगमध्ये प्लास्टिकचा एक मोठा बॉक्स होता, रिकामा होत आला होता,  बाबा मला म्हणाले, डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल का ? मी लगेच त्यांना तो देऊन टाकला. कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडं गडबडून गेले पण बायको पटकन बोलून गेली ,  त्यांना 1000 च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे, मी अचंबित,  निघताना पुन्हा म्हणाले, अजून एखादा असेल तरी पुढच्या वेळी द्या मला, यात बसणार नाहीत.  त्यावेळी माझी व्हिजिट फी दहा रुपये होती, ती देण्यास देखील ते नाखुश असायचे, विचारांचं काहूर डोक्यात घोंघावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो. 
      दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडी मध्ये शिरतो न शिरतो तोच कंपाउंडर म्हणाला सर काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होता ते आजोबा सकाळीच गेले. पटकन माझ्यासमोर नोटांनी गच्च भरलेला त्यांचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला,  "ना खुद खाऊंगा ना खाने दुंगा" असं आयुष्य जगत कसलाही उपभोग न घेता नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते. आपण अमर आहोत, किंवा अजून खूप जगणार आहोत, या भ्रमानेच ते गेले. मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झालं. तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या, मोठी बॅग भरली होती. काहींच्या तर घड्या देखील मोडल्या नव्हत्या, परंतु ती नेहमी साध्याच साड्या वापरायची. अर्थात वयोमानाने विरक्ती आल्यामुळे असेल कदाचित परंतु या साड्यां मुळे बायको नीता व तीचा नेहमी वाद व्हायचा, कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅगेत. कुणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई असून कसल्या साड्या घालते वगैरे वगैरे. यावर "मला कोण बघणार आहे?" हे तिचे नेहमीचे उत्तर. नंतर जेवढ्या चांगल्या साड्या होत्या, त्या गरजूंना देऊन टाकल्या, बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे. आपल्या वॉर्डरोब मध्ये अनेक नवीन साड्या ₹, पॅन्ट शर्ट पडून असतात , एवढ्या भारी साड्या, शर्ट, पॅन्ट रोज वापरायला कशाला... म्हणून तशाच पडून असतात, कधीकधी त्या घालायच्या मुहूर्तही उजाडत नाही. आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या, तर त्याची फॅशन आउट डेटेड झालेली असते, त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता. कपड्यांच्या बाबतीतच नव्हे, तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण नंतर वापरू असं म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच अडगळीत लोळत पडतात. आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते, तीच आपल्या मनातील चांगल्या-वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते. बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे  मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह, प्रेम, आपुलकी आपण आपल्या इगो किंवा संकुचित  वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही, मग बरेचदा वेळ निघून जाते,  कारण बोलण्यासाठी ती व्यक्ती उरलेली नसते. संचय वस्तूंचा असो, वा मनातील विचारांचा, त्याचा योग्य विनियोग, वापर झाला नाही, तर त्यांची किंमत शून्य होऊन जाते, उरते ती फक्त अडगळ.      
  आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी occasion असतो,  त्याच्यावरच आपला अधिकार असतो,  म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान वस्तू वा विचार आजच वापरून टाका. त्या अडगळीत जाण्या अगोदर वा आउट डेटेड होण्याअगोदर

II आज  ही जिओ जी भर भर के II

636. कोळसा आणि चंदन

        चौधरी पहेलवान यांचे संपूर्ण आयुष्य गरजूंना मदत करण्यासाठी समर्पित होते. शेवटचे क्षण जवळ आल्यावर त्यांनी मुलाला जवळ बोलावले. मुलगा जवळ आल्यावर त्याला म्हणाला, 'हे बघ बेटा, मी माझे संपूर्ण आयुष्य जगाला शिकवण्यात घालवले आहे. आता माझ्या शेवटच्या क्षणी मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. पण त्याआधी, कृपया थोडा कोळसा आणि चंदनाचा तुकडा घेऊन या. सुरुवातीला मुलाला हे खूप विचित्र वाटले, परंतु त्याला वाटले की हा आपल्या वडिलांचा आदेश असल्याने त्याला हे सर्व आणावे लागेल. त्याने स्वयंपाकघरातून कोळशाचा तुकडा उचलला. योगायोगाने घरात चंदनाच्या लाकडाचा छोटा तुकडाही सापडला. दोघांना घेऊन तो वडिलांकडे पोहोचला.
        त्याला येताना पाहून पैलवान म्हणाला, 'बेटा, आता या दोन गोष्टी खाली फेकून टाक.' मुलाने दोन्ही वस्तू खाली टाकल्या आणि हात धुवायला सुरुवात केली तेव्हा पैलवान म्हणाला, 'बेटा कृपया थांब. मला तुझे हात दाखव.' मुलाने हात दाखवल्यावर तो कोळशाचा हात धरून म्हणाला, 'तुने पाहिलं  का?.' कोळसा धरताच माझा हात काळा झाला. पण फेकून दिल्यावरही काजळ हातावरच राहिली. अशी चुकीची लोकांची संगत असते. त्यांच्यासोबत राहिल्यानेही दुःख होते आणि ते आजूबाजूला नसता नाही त्यांच्यासोबत आयुष्यभर वाईट बदनामी लागते. दुसरीकडे सज्जनांचा सहवास हा या चंदनासारखा असतो, ते एकत्र राहिल्यास सर्व जगाचे ज्ञान होते आणि त्यांचा सहवास सोडल्या नंतरही त्यांच्या विचारांचा सुगंध आयुष्यभर दरवळत असतो. म्हणून नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. तुम्ही स्वतःचा विचार करा - जीवन आमचे आहे आणि चांगल्या आणि वाईट संगतीचा निर्णय देखील आमचा असावा.

635. देवाचा न्याय

 एके दिवशी एक महात्मा आपल्या शिष्यासह प्रवासाला निघाले. गुरुजींना जास्त बोलणे इकड - तिकडच्या गोष्टी आवडत नसे, कमी बोलणे आणि आपले काम शांतपणे करणे त्यांना आवडत असे. पण शिष्य खूप सक्रिय होता, तो नेहमी इकडे तिकडे काहीतरी विचार करत असे, त्याला इतरांच्या संभाषणात खूप आनंद वाटायचा. चालत असताना, तो तलावा   जवळून जात असताना, त्याला एक मच्छीमार नदीत जाळे टाकताना दिसला. हे सर्व पाहून शिष्य उभा राहिला आणि मच्छीमाराला "अहिंसा परमोधर्माचा उपदेश करू लागला. पण मच्छीमाराला काही समजून घेणारा होता, आधी त्याने दिरंगाई करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा प्रकरण वाढले तेव्हा शिष्य आणि मच्छीमार यांच्यात भांडण सुरू झाले. गुरुजी खूप पुढे गेलेले परत आले आणि त्यांनी शिष्याला आपल्यासोबत येण्यास सांगितले आणि शिष्याला घेऊन गेले.
गुरुजी त्यांच्या शिष्याला म्हणाले - "बेटा, आमच्यासारख्या संतांचे कार्य फक्त समजावून सांगणे आहे, परंतु देवाने आम्हाला शिक्षा करण्यासाठी पृथ्वीवर पाठवलेले नाही!" शिष्याने विचारले - महाराजांना ना अनेक शिक्षा माहीत आहेत आणि ना आपल्या राज्याचा राजा अनेकांना शिक्षा करतो. मग त्याला शिक्षा कोण करणार?"
शिष्याच्या या विधानाला उत्तर देताना गुरुजी म्हणाले – “बेटा! तुम्ही निश्चिंत राहू शकता की या जगात एक अलौकिक शक्ती अस्तित्वात आहे जी या व्यक्तीला शिक्षा देते ज्याची पोहोच सर्वत्र आहे… देवाची दृष्टी सर्वत्र आहे आणि तो सर्वत्र पोहोचतो. त्यामुळे तूम्ही आता निघा चला , या लढ्यात(भांडणात )उतरणे (पडणे)चुकीचे ठरेल, म्हणून या भांडणापासून दूर राहा..! गुरुजींचे म्हणणे ऐकून शिष्य समाधानी झाला आणि त्यांच्यासोबत गेला.
तेव्हापासून बरोबर दोन वर्षे झाली होती, एके दिवशी गुरुजी आणि शिष्य दोघेही त्या तलावा पासून जात होते. दोन वर्षांपूर्वीची मच्छीमारची घटनाही शिष्य विसरला होता. त्याच तलावाजवळ त्याने पाहिले की एक साप खूप वेदना (त्रासात)होता आणि त्याला हजारो मुंग्या ओरबाडून खात होत्या. शिष्याने हे दृश्य पाहिले आणि त्याला स्वतःला सावरता आले नाही, त्याचे हृदय दयेने वितळले(पाझरले).
   तो शिष्य सापाला मुंग्यांपासून वाचवायला जाणारच होता तेव्हा गुरुजींनी त्याचा हात धरून त्याला जाण्यास मनाई केली आणि म्हणाले – “बेटा. त्याच्या कर्माचे फळ त्याला भोगावेच लागेल. आता जर तुम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलात तर या बिचाऱ्याला पुढच्या जन्मी पुन्हा हे दुःख भोगावे लागेल कारण त्याच्या कर्माचे फळ त्याला भोगावे लागते.
शिष्याने गुरुजींना विचारले, "गुरुजी, त्यांनी असे कोणते कृत्य केले आहे की ते या संकटात अडकले आहेत?"
गुरू महाराज म्हणाले – “हा तोच मच्छीमार आहे ज्याला तुम्ही मागच्या वर्षी या ठिकाणी मासेमारी न करण्याचा सल्ला दिला होता आणि तो तुमच्याशी भांडण करायला रागावला होता. ते मासे मुंग्या आहेत त्या टोचून टोचून खात आहेत...”
हे ऐकून शिष्य आश्चर्याने म्हणाला - गुरुजी, हा फार विचित्र न्याय आहे.
गुरुजी म्हणाले- “बेटा. स्वर्ग आणि नरकाची सर्व दृश्ये या जगात आहेत, आपण प्रत्येक क्षणी देवाच्या न्यायाची उदाहरणे पाहू शकता. तुमची कृती शुभ असो वा अशुभ, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. म्हणूनच देवाने उपदेश देताना वेदांमध्ये म्हटले आहे - तुम्ही केलेल्या कर्माचे नेहमी स्मरण करा, तुम्ही जे केले आहे त्याचा विचार करत राहा, कारण तेथे तुम्हाला दुःख भोगावे लागेल हे खरे आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे म्हणून तो वाईट कर्माने वाया जाऊ देऊ नका. तुमच्या खात्यात नेहमी तुमच्या चांगल्या कर्मांची संख्या वाढवा. कारण तुमच्या चांगल्या कर्माचे फळ खूप आनंददायी असेल, याच्या उलटही तितकेच खरे आहे, तुमच्या वाईट कर्माचे फळही एक दिवस वाईट पद्धतीने भोगावे लागेल. म्हणून, आपल्या कर्माकडे लक्ष द्या कारण देव नेहमी न्याय करतो.”
गुरुजींचे म्हणणे शिष्याला स्पष्ट समजले होते.

 बोध : आपण यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हे 100% खरे आहे की देव नेहमीच योग्य न्याय करतो. आणि त्यांचा निर्णय थेट आपल्या स्वतःच्या कर्माशी संबंधित आहे. जर आपण आपल्या आयुष्यात खूप चांगली कामे केली असतील किंवा चांगली कर्म करत असतील तर देव आपल्याला त्यानुसार न्याय देईल. आम्हाला हे जीवन या मुळे देण्यात आले आहे की आम्ही अशा गोष्टी करू शकू ज्यामुळे देवाचे डोळे आमच्यावर प्रती प्रेमाने चमकतील छलग उठतील.

634. कुटुंबातील मॅनर्स

 सुई दोरा वापरण्याचा एक नियम पूर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं. पूर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापूर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं. दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरुन वेळ आणि इंधन बचत व्हायचीच पण गैरसोयही टाळता यायची. सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवन शैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही. आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं नीट पुरवणी आत ठेऊन निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो नि शोधाशोध पण करावी लागत नाही. पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीज मध्ये ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही. बेसिन पाशी हँडवाॅश संपत असतं. ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही. पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील. खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे. आपली टर्न आल्यावर संपल्या नि बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.
       घर सगळयांचं असतं. सगळी जवाबदारी गृहिणीची असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात. पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो नि चुकीच्या सवयी लागतात. घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात. तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही. (खरंतर हाॅटेलचे सुध्दा नियम असतातच.) ही एक संधी आहे. घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत, काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर भविष्यात नक्कीच फायदा होईल. आपल्या घरामध्ये कोणाचाही फोन आला तर एकमेकांना त्यांचे निरोप न विसरता देणे. घरातील कोणाकडेही मित्र, मैत्रीण, पाहुणा आल्यास त्यांचे यथोचित स्वागत करणे. घरी येणारी व्यक्ती ही कुटुंबाची मैत्री आहे समजून त्यांचे आदरातिथ्य करूया. घरातील प्रत्येक वस्तूवर व्यक्तींची नावे असलीच पाहिजेत असे नाही. बहुतेक सर्व वस्तू कॉमन असतात. त्याला ही घर पण म्हणतात. तसेच घरातील कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू संपविण्यापूर्वी कोणी खायचे राहिले नाही ना? अशी चौकशी करावी. घरातील प्रत्येकाचे दिवसभराचे काम अंदाजे वेळापत्रक, उद्योगातील आर्थिक व्यवहार एकमेकांना माहिती असण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील माहेरची किंवा सासरची व्यक्ती असो सर्वांचे समान आदरातीथ्य असावे. अशा प्रकारच्या गोष्टींना कुटुंबातील मॅनर्स किंवा संस्कार असे म्हणतात, याचे खूप चांगले परिणाम पुढील पिढीवर होतात. संस्कार संस्कार म्हणजे आणखी वेगळं काही नसतं.

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

633. हजारो मुलींचं आयुष्य...

 तो : गुड मॉर्निंग अक्षय. 
मी : गुड मॉर्निंग. 
तो : एक अनुभव शेअर करायचा होता. 
मी : प्लीज शेअर. 
तो : त्यापूर्वी थोडक्यात माझा परिचय देऊ?
मी : चालेल. 
तो : मी २८ वर्षांचा असून एका प्रायव्हेट बँकमध्ये जॉब करतोय. 
मी : ग्रेट.  
तो : माझे वडील महानगरपालिकेत जॉबला होते आणि आई गृहिणी.   
मी : ओके. 
तो : माझी बहीण २२ वर्षांची असून, ती इंजिनिअरिंग करतेय.     
मी : ओके. 
तो : मी जो अनुभव शेअर करणार आहे..  
मी : त्याचं काय?
तो : तो ऑगस्ट महिन्यातील आहे. 
मी : ओके. 
तो : १३ ऑगस्टला माझ्या वडिलांना अचानक ब्रेन स्ट्रोक आल्याने, त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं.     
मी : ओह.. 
तो : डॉक्टरांनी उपचाराचा खर्च म्हणून ३ लाख रुपये मला जमा करायला सांगितले होते.  
मी : ओके.  
तो : मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने, पैसे जमा करण्यासाठी मी डॉक्टरांकडे २ दिवसांची मुदत मागितली.   
मी : मग?
तो : देवाच्या कृपेने डॉक्टरांनी माझी विनंती मान्य केली. 
मी : बरं झालं. 
तो : मी लगेचच पैसे जमा करण्यासाठी मित्रांकडे मदत मागायला सुरुवात केली. 
मी : साहजिकच. 
तो : मात्र अचानक..    
मी : अचानक काय? 
तो : अर्धा तासापूर्वी घरी गेलेली माझी बहीण, ३ लाख रुपये घेऊन दवाखान्यात हजर झाली.
मी : काय?
तो : हो. तिने अगदी अर्धा तासात ती रक्कम मॅनेज केली होती. 
मी : कशी?
तो : मी तेव्हा तो प्रश्न विचारण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. 
मी : समजू शकतो.  
तो : संध्याकाळी आईने तिच्याकडे चौकशी केल्यावर तिने सांगितलं..  
मी : काय?
तो : मैत्रिणीच्या नवऱ्याने मदत केली. 
मी : मग?
तो : आम्ही दोघांनीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.  
मी : ओके. 
तो : आठवडाभराने पप्पांना डिस्चार्ज मिळाला आणि आमचा जीव भांड्यात पडला. 
मी : पुण्याई.     
तो : त्यानंतर मी पुन्हा एकदा पैसे जमा करण्याच्या कामाला लागलो. 
मी : ओके.. 
तो : मात्र मला एक गोष्ट खटकत होती. 
मी : कोणती?
तो : दरम्यानच्या काळात बहिणीने एकदाही पैश्यांचा विषय काढला नव्हता किंवा पैसे मिळण्यासाठी तगादा लावला नव्हता. 
मी : का?
तो : त्याच प्रश्नाचं उत्तर मी शोधत होतो. 
मी : ओके. 
तो : आठवडाभराने मी ३ लाख रुपये गोळा केले आणि ते बहिणीच्या स्वाधीन केले.  
मी : गुड. 
तो : मात्र आमच्या मनात शंकेची पाल तेव्हा चुकचुकली..   
मी : केव्हा?
तो : जेव्हा २-३ दिवसांनी पैश्यांची बॅग आईला बहिणीच्या कपाटातच नजरेस पडली. 
मी : काय?
तो : आमची अवस्थाही अगदी तुझ्यासारखी झालेली. 
मी : मग?
तो : मग मी बहिणीकडे त्याविषयी चौकशी केली. 
मी : काय समजलं?
तो : तिने सांगितलं की, मैत्रिणीचे मिस्टर ऑफिस ट्रीपला गेल्याने पैसे देता आले नाहीत.   
मी : ओके. 
तो : त्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरु असताना.. 
मी : काय झालं?
तो : माझ्या बहिणीच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी.. 
मी : काय?
तो : मला तिच्या मनगटात ॲपल स्मार्टवॉच नजरेस पडलं.  
मी : आजकाल बऱ्याच कंपन्या ब्रँडचा लूक कॉपी करतात. 
तो : मी खात्री पटवण्यासाठी तिच्याकडे चौकशी केली. 
मी : मग?
तो : तर तिने ते घड्याळ ईएमआयवर घेतल्याचं सांगितलं.    
मी : एवढं महाग स्मार्टवॉच?
तो : हो ना. जवळपास ४४ हजार रुपयांचं.  
मी : बाप रे.. 
तो : ती मागील काही महिन्यांपासून एका कंपनीत जॉब करत असल्याने, मला माहित होतं की तिच्याकडे पैसे असतात.  
मी : इंजिनिअरिंग?
तो : काही विषय राहिलेले.  
मी : इअर डाऊन?
तो : हो. 
मी : मग?
तो : मात्र माझ्या बहिणीच्या उत्तराने माझं समाधान झालं नव्हतं. 
मी : का बरं? 
तो : कारण मागील काही महिन्यांत तिने बरीच शॉपिंग केल्याचं माझ्या निदर्शनास आलं होतं.  
मी : ऑनलाईन शॉपिंग?
तो : ऑनलाईन आणि ऑफलाईन. 
मी : पुढे?
तो : परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मी तिच्या एका जवळच्या मैत्रिणीशी संपर्क साधला. 
मी : ओके. 
तो : मला एक गोष्ट जाणवली होती.  
मी : कोणती?
तो : माझ्या बहिणीची बेस्ट फ्रेंड बऱ्याच दिवसांपासून आमच्या घरी आलेली नव्हती.  
मी : का?
तो : त्या दोघींमध्ये काहीतरी बिनसलं होतं.  
मी : कारण?
तो : तेच कारण जाणून घेण्यासाठी मी तिची भेट घेतली. 
मी : काय समजलं?
तो : भांडणाचं कारण सांगण्याआधी.. 
मी : काय?
तो : तिने मला माझ्या बहिणीचं इंस्टाग्राम अकाउंट तपासायला सांगितलं. 
मी : का?
तो : तिचं म्हणणं होतं की, त्यावरच मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.  
मी : म्हणजे?
तो : अक्षय आपली जनरेशन 'ईमेल, व्हॉट्सॲप आणि फेसबुक' वापरणारी जनरेशन आहे. 
मी : हो.  
तो : आपल्या नंतरची जनरेशन इंस्ट्राग्राम, स्नॅपचॅट आणि किकसारखे ॲप वापरण्यात सराईत आहे.   
मी : करेक्ट. 
तो : आपल्या आईवडिलांसाठी तर सोशल मीडियावरील सर्वकाही अगदी अनोळखी.  
मी : सहमत.  
तो : म्हणूनच आपल्या पिढीची जबाबदारी वाढली.  
मी : कशी काय?
तो : कारण डिजिटल युगात आपलं आयुष्य वेगाने बदलतंय.  
मी : हो.  
तो : आपले पालक मात्र त्याविषयी अगदीच अनभिज्ञ आहेत. 
मी : सच बात. 
तो : बहिणीचं इंस्टाग्राम अकाउंट चेक केल्यानंतर तर मी अवाक झालो.
मी : का?
तो : तिने अगदी एखाद्या मॉडेलसारखे बरेच फोटो अपलोड केले होते. 
मी : प्रोफेशनल फोटोशूट?
तो : हो. 
मी : मग?
तो : विशेष म्हणजे तिला बरेच बिझनेसमन आणि राजकारणी फॉलो करत होते.   
मी : ओके. 
तो : एकंदर प्रकार मला भांबावून सोडणारा होता. 
मी : का?
तो : तिच्या फोटोखालील कमेंट. 
मी : कोणत्या?
तो : बेबी बरेच दिवस झाले भेटली नाहीस. आजकाल वेळ देत नाहीस. वगैरे..  
मी : अरे..
तो : त्यानंतर मी थेट माझ्या बहिणीच्या मैत्रिणीची भेट घेतली.
मी : मग?
तो : मला तिच्याकडून जे काही समजलं, त्यावर तुझा विश्वासच बसणार नाही. 
मी : काय समजलं?
तो : तिने मला सांगितलं की, माझी बहीण खोटं बोलतेय.  
मी : म्हणजे?
तो : म्हणजे ती कुठे जॉबच करत नाही. 
मी : मग?
तो : ती इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करते. त्यामुळे तिच्या मोठ्या बिझनेसमनसोबत ओळखी झाल्या होत्या.   
मी : मग?
तो : त्यातील एकाशी तिचं मागील ३ वर्षांपासून अफेअर सुरु आहे. 
मी : काय?
तो : त्यामुळेच तिचे विषयही राहिले.  
मी : अरे रे.. 
तो : त्याहून धक्कादायक म्हणजे.. 
मी : काय?
तो : तो बिझनेमन विवाहित असून त्याला ४ वर्षांची एक मुलगी आहे. 
मी : च्यामारी. 
तो : पप्पांच्या उपचारासाठी माझ्या बहिणीने त्याच्याकडूनच ३ लाख रुपये घेतलेले. 
मी : OMG. 
तो : बहिणीच्या मैत्रिणीकडून तो घटनाक्रम ऐकल्यानंतर माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. 
मी : जाणारच. 
तो : म्हणून मी लगेचच बहिणीला फोन केला आणि तिला थेट तिच्या मैत्रिणीच्या घरी बोलावलं. 
मी : तिथे का?
तो : कारण घरी आईवडिलांसमोर मला सगळ्या गोष्टी विचारता आल्या नसत्या.  
मी : ओके.  
तो : सुरुवातीला तर तिने टोलवाटोलवी केली..
मी : नंतर?   
तो : मी त्या बिझनेसमनचं नाव उच्चारल्यावर मात्र..  
मी : काय झालं?
तो : एकाएकी तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. 
मी : मग?
तो : त्यानंतर जे घडलं ते माझ्यासाठीही अनपेक्षित होतं.   
मी : का बरं? 
तो : कारण त्यानंतर मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची तिने लागोपाठ उत्तरं दिली.  
मी : अरे..   
तो : अक्षय तिच्या बोलण्यात कुठलाच संकोच किंवा वागण्यात गिल्ट फिलिंग नव्हती.  
मी : का?
तो : जणू काही तिच्यासाठी ते अगदी सामान्य होतं.  
मी : म्हणजे?
तो : मागील ३ वर्षांपासून तिचं त्या बिझनेमनसोबत अफेअर सुरु आहे.  
मी : ओके.
तो : इंस्टाग्रामवरच त्या दोघांची ओळख झाली.  
मी : ओके. 
तो : इंस्टाग्रामवरील त्याच्या फोटोंमध्ये..    
मी : काय?
तो : त्याने गडगंज संपत्ती, आलिशान बंगला आणि महागड्या इम्पोर्टेड गाड्यांचा शो-ऑफ केलेला.
मी : ट्रॅप लावला..
तो : त्यामुळे माझी बहीण इम्प्रेस झाली. 
मी : मग?
तो : त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यावर, इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.   
मी : कशासाठी?
तो : तिचा फायदा घेण्यासाठी..  
मी : कसला फायदा?
तो : मागील ३ वर्षांपासून त्यांच्यात फिजिकल रिलेशन आहेत. 
मी : तुला कुणी सांगितलं?
तो : माझ्या बहिणीनेच.. 
मी : काय?
तो : मी तुला म्हणालो ना..  
मी : काय?
तो : तिच्या वागण्यात आणि बोलण्यात अपराधीपणाची भावनाच नव्हती. 
मी : अरे.. 
तो : तिने तर निर्लज्जपणे त्यांच्या भेटण्याची ठिकाणंही सांगितली.   
मी : कोणती?
तो : ओयो हॉटेल आणि त्या बिझनेसमनच्या मालकीचा एक फ्लॅट आहे. तिथेच ते दोघे भेटायचे.   
मी : डोकं सुन्न झालं.  
तो : अक्षय एवढं सगळं होऊनदेखील..    
मी : काय?
तो : माझी बहीण त्या नीच माणसाची बाजू घेत होती.  
मी : म्हणजे?
तो : म्हणजे तिचं म्हणणं होतं की, तो स्वतःच्या बायकोपेक्षाही माझ्यावर अधिक प्रेम करतो.   
मी : ऐकावं ते नवल.   
तो : म्हणून मलाही जाणीव झाली. 
मी : कसली?  
तो : हेच की, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. 
मी : करेक्ट.  
तो : त्यानंतर मी माझ्या एका राजकारणी मित्राला फोन केला आणि त्याच्याकडे मदत मागितली.
मी : त्याच्याकडे का? 
तो : तो नगरसेवक असल्याने, त्याचे सर्वच क्षेत्रात कॉन्टॅक्ट आहेत.
मी : ओके. 
तो : त्याने २ दिवसांची मुदत मागून घेतली आणि त्या बिझनेसमनची सगळी माहिती काढली. 
मी : मग?
तो : त्यानंतर आम्ही थेट त्या बिझनेसमनचं ऑफिस गाठलं. 
मी : बहिणीला याप्रकाराची माहिती होती?
तो : हो. कदाचित तिने त्याला आधीच सावध केलं होतं.  
मी : मग?
तो : म्हणूनच आम्ही तिथे गेल्यानंतर लगेचच त्याने दरडावून बोलायला सुरुवात केली.  
मी : अरे.. 
तो : मी बहिणीचं सगळं बोलणं रेकॉर्ड केल्यामुळे माझ्याकडे पुरावा होता.   
मी : स्मार्ट मुव्ह. 
तो : ते रेकॉर्डिंग त्याला ऐकवल्यावर तो अगदी पोपटासारखा बोलायला लागला. 
मी : काय सांगितलं?
तो : त्याने सांगितलं की, जे काही झालं ते दोघांच्या इच्छेने झालं. त्याने माझ्या बहिणीवर कुठलाही दबाव टाकला नव्हता.   
मी : सराईत.   
तो : अगदी हुशारीने त्याने माझ्या बहिणीवर खर्च केलेल्या दीड लाख रुपयांचा हिशोबच आमच्यासमोर मांडला. 
मी : बाप रे..  
तो : त्यामळे मीही बॅकफूटवर गेलो. 
मी : मग?
तो : मात्र माझ्या मित्राने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिल्यावर त्याची बोबडी वळली.  
मी : त्यानंतर?
तो : मला भीती होती की, माझ्या बहिणीचे आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ त्याच्याकडे असू शकतात.  
मी : बरोबर. 
तो : म्हणून मग मी त्याच्याकडे मोबाईलची मागणी केली. 
मी : दिला?
तो : सुरुवातीला तर टाळाटाळ केली.. 
मी : मग?
तो : त्याला त्याच्या बायकोचा मोबाईल नंबर दाखवल्यावर, भीतीपोटी लगेच माझ्या हातात त्याने मोबाईल सोपवला.  
मी : पुढे?
तो : अक्षय मी जेव्हा त्याचं इंस्टाग्राम अकाउंट आणि डायरेक्ट मेसेज चेक केले..   
मी : काय दिसलं?
तो : माझ्या पायाखालची जमीनच सरकली. 
मी : का?
तो : तो माझ्या बहिणीच्या वयाच्या ४ मुलींच्या संपर्कात होता.  
मी : वयोगट?
तो : १८ ते २५. 
मी : विवाहित? 
तो : नाही.  
मी : अजबच प्रकार आहे. 
तो : विशेष म्हणजे पॅटर्न सेम. 
मी : कोणता?
तो : इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा. 
मी : म्हणजे?
तो : म्हणजे तो प्रत्येकीसमोर संसाराचं रडगाणं गायचा.      
मी : कोणतं?
तो : बायकोपासून होणाऱ्या त्रासाचं.  
मी : ओह.. 
तो : विशेष म्हणजे त्या मुलींवरही तो वारेमाप पैसे खर्च करत होता. 
मी : ते कसं समजलं?
तो : मेसेजमध्ये स्मार्ट वॉच, लॅपटॉप, मोबाईल आणि मॉलमधील शॉपिंगचा उल्लेख होता. 
मी : ओके. 
तो : मी त्या मेसेजचे स्क्रिनशॉट घेऊन माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवले आणि त्याचा मोबाईल त्याच्या स्वाधीन केला.   
मी : गुड. 
तो : अखेरीस माझ्या मित्राने त्याला त्याच्या भाषेत समज दिली आणि आम्ही तिथून निघालो. 
मी : मग?
तो : घरी आल्यावर माझ्या बहिणीला मी ते स्क्रिनशॉट दाखवले आणि तिला अक्षरशः घाम फुटला. 
मी : डोळे उघडले. 
तो : हो.  
मी : मग?
तो : मागील महिनाभरापासून मी तिच्यावर लक्ष ठेवून आहे. 
मी : काय कळतंय?
तो : तिने त्याच्यापासून संपर्क तर तोडला, मात्र.. 
मी : मात्र काय?
तो : मात्र तिचं इंस्टाग्राम वापरणं कमी झालेलं नाही. 
मी : व्यसन सहजासहजी सुटत नाही. 
तो : तेच तर. 
मी : समजावलं?
तो : हो तिने मला वचन दिलं आहे की, यापुढे ती या चुकीची पुनरावृत्ती होऊ देणार नाही.
मी : देर आए दुरुस्त आए..  
तो : हो, मात्र त्यानंतर..
मी : काय?
तो : बहिणीची चिडचिड वाढली होती. 
मी : का?
तो : आपण वापरले गेलो आहोत, ही भावना अत्यंत क्लेशदायक असते. 
मी : खरं आहे. 
तो : बरेचजण त्यातून सावरतात आणि काही..  
मी : काही?
तो : काहीजण डिप्रेशनच्या विळख्यात अडकतात आणि शेवटी आत्महत्येचा पर्याय.. 
मी : वास्तव. 
तो : सोशल मीडियाचं ज्ञान नसल्याने, सध्याचे पालक हतबल ठरत आहेत.
मी : बदल गरजेचा.
तो : आईवडिलांच्या याच अज्ञानाचा गैरफायदा आजच्या स्मार्ट जनरेशनची मुलं घेतात.  
मी : सर्रास घडतंय. 
तो : म्हणूनच पालकांनीही काळानुरूप बदल स्वीकारायला हवा. 
मी : डिजिटल साक्षरता काळाची गरज.  
तो : डिजिटल क्रांतीमुळे जग झपाट्याने बदलतंय. 
मी : सहमत. 
तो : त्यामुळे सोशल मीडियाचा योग्य वापर होण्यापेक्षा, त्याचा गैरवापर वाढलाय.  
मी : जनजागृती गरजेची.   
तो : म्हणूनच तुझ्याशी बोलायचं ठरवलं. 
मी : मी लिहील याबद्दल.. 
तो : अक्षय एक त्रिकालाबाधित सत्य आहे. 
मी : कोणतं?
तो : सहजासहजी मिळालेली कोणतीही गोष्ट घातक असते. 
मी : उदाहरणार्थ?
तो : पद, पैसा आणि प्रतिष्ठा.  
मी : १००%
तो : माझ्या बहिणीला अगदी सहज पैसे मिळत गेल्याने, तिला मेहनतीचं मोल कळलं नाही. 
मी : शोकांतिका. 
तो : म्हणूनच येणाऱ्या पिढीला तो फरक दाखवायला हवा. 
मी : कोणता?
तो : दैनंदिन आयुष्यात आपल्या आजूबाजूला त्या शेकडो महिला पाहायला मिळतात.  
मी : कोणत्या?
तो : ज्या परिस्थितीशी दोन हात करून स्वाभिमानाने जगत असतात. 
मी : रणरागिणी.   
तो : आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यायला हवा. 
मी : अगदी बरोबर. 
तो : प्रतिकूल परिस्थितीत माणूस अमिषाला सहज बळी पडतो. 
मी : करेक्ट. 
तो : म्हणूनच परिस्थिती कशीही असली, तरी स्वतःचं शील जपायला हवं.  
मी : गरजेचं.  
तो : कारण एका महिलेने जिद्दीने पदर खोचला, तर ती आयुष्यभर सन्मान कमावते. मात्र.. 
मी : मात्र काय?
तो : मात्र तिने पदर खाली टाकला, की ती पद, पैसा अन् प्रतिष्ठा रातोरात कमावते.   
मी : वास्तव. 
तो : तिच्या स्वाभिमानाची शिकार करण्यासाठी समाजातील कित्येक विकृत लांडगे आतुर असतात.  
मी : बरोबर.  
तो : म्हणूनच स्वतःचा स्वाभिमान जपून, विकृतिला ठेचायची धमक तिच्यात निर्माण व्हायला हवी. 
मी : परफेक्ट. 
तो : आपण सर्वांनी पुढाकार घेतला तरच.. 
मी : तरच काय?
तो : तरच माझ्या बहिणीसारख्या हजारो मुलींचं आयुष्य खराब होण्यापासून आपण वाचवू शकतो.   
मी : ज्जे बात! 

©️अक्षय भिंगारदिवे,
२८ ऑक्टोबर २०२३

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...