डोळे उघडले तेच एका अतीव वेदनेने! कळेच ना, ही वेदना मनाची की शरीराची? नि या वेदनेच्या मुळातून वाऱ्याच्या झुळकेसारखी एक नर्स पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळलेलं माझं जग माझ्यापुढे धरून म्हणाली, "ही बघा, तुमची मुलगी!".
माझं ते इवलंसं अस्तित्व पाहून सगळ्या व्यथा-वेदना भरून निघाल्या. मी तो कापसाचा गोळा घट्ट हृदयाशी धरला. माझं पिल्लू रडायला लागलं.
"ना ऽ राणी! मला कुणी नसलं, तरी तुला मी आहे. तू रडायचं नाही बाळा." माझं माझ्या मुलीशी असं हितगुज सुरू असतानाच डॉक्टर आत आल्या.
"काय म्हणतंय् बाळ?"
त्यांना पाहताक्षणीच मला आठवलं- मी काल त्यांच्याच गाडीसमोर चक्कर येऊन पडले होते."थॅ॑क्यू डॉक्टर! काल तुम्ही नसतात, तर माझं काय झालं असतं?"
"मी नसते, तर दुसऱ्या कुणीतरी तुला दवाखान्यात आणलं असतं. बरं तुझ्या आई-बाबांना कळवावं लागेल. त्यांचा नंबर देतेस का?"
"मला आई-वडील नाहीत."
"ओह सॉरी! मग तुझ्या सासरचा नंबर दे."
मी किंचित नजर चोरून म्हणाले, "माझं लग्न व्हायचंय्."
डॉक्टर कमालीच्या दचकल्या. मला आता लोकांच्या अशा प्रतिक्रियांची सवय झाली होती. "तुला कळतंय का पोरी, तू काय बोलतेयस ते? लोक याला काय म्हणतील?"
"हं! म्हणून झालंय् डॉक्टर, पाप, व्यभिचार! नि तरी तू या मुलीला जन्म दिलास!"
"म्हणजे मी जन्म दिला नसता; कुठेतरी अंधाऱ्या आडोशाला यातून गुपचूप मोकळी झाले असते, तर पुण्यवान ठरले असते? हो, समाजात उजळ माथ्याने फिरले असते, जसा तो फिरतोय! केलेल्या कृत्याचा कुठलाही पुरावा त्याच्याजवळ नाही, म्हणून तो पुण्यवान? नि माझं पोट वर येऊन सांगत होतं मी काय केलंय ते, म्हणून मी पापी? हेच मुल माझ्या डोक्यावर अक्षता पडल्यावर झालं असतं, तर योग्य? माझं आईपणही समाजमान्यतेवर असावं का? आणि समाजमान्यतेनंतरही समजा मला मुलच झालं नाही, तर मी वांझ! सगळं माझ्याच बाबतीत ठरणार, का?" मी हे सगळं एका दमात बोलून गेले नि मला जोरात हुंदका आला.
डॉक्टर मला थोपटत म्हणाल्या, "पोरी, बाईपणाचं हेच फलित आहे. सगळे प्रश्न तिलाच विचारले जातात नि तिच्या बाबतीतली सगळी उत्तरं मात्र टाळली जातात. फार गोड आहे तुझी मुलगी. हिचा बाप होणं नाकारणाऱ्याचं नाव कळेल का मला?"
"फार मोठं नाव आहे ते, पंडित गुरुराज!" "काय!" डॉक्टर ओरडल्याच.
"तुमचं चकित होणं स्वाभाविक आहे डॉक्टर. मी त्यांच्याकडे संगीत शिकत होते. गाण्याच्या नि प्रेमाच्या प्रवाहात कधी वाहात गेले, ते कळलंच नाही.
शुद्ध आली, तेव्हा माझ्यात हा जीव विश्वासानं श्वास घेत होता."
"गार्गी, तू गुरुराजला याची कल्पना दिलीस का?"
"हो, सगळ्यात आधी त्यांनाच सांगितलं, सप्तसुरांतला एक सूर माझ्यात जागा होतोय ते! पण त्यांचं प्रतिष्ठित घराणं. एका अनाथ, बेवारस मुलीला कसं स्वीकारणार?"
"जो विश्वासाचा होता, त्यानंच धुडकावलं. अशा वेळी लोक टोचा मारून मारून घायाळ करतील, याची भीती नाही वाटली तुला? "डॉक्टर, मीही माणूस आहे. मलाही भीती वाटली. एकदा खूप दूरवर निघून गेले, जीव द्यायच्या इराद्याने नि थकून एका खडकावर बसून मी माझ्या कुशीतल्या बाळाला म्हणाले, "मला माफ कर बाळा! तुझी आई फार एकटी पडलीय् रे, तिचं कुणी कुणी नाही, नि अचानक असं वाटलं, माझ्या प्रत्येक शब्दागणिक कुणीतरी मला आतून हुंकारून प्रतिसाद देतय्...!
तो आवाज मला विचारांच्या कोलाहलतही मनःशांती देत होता, लढण्याची उर्मी देत होता, जगणं शिकवीत होता! इतक्या अतीव एकटेपणातही मी जगले. आतातर माझी मुलगी आहे सोबत. मला जगायला हवं आता."
माझं सगळं बोलणं झाल्यावर डॉक्टर म्हणाल्या, "आता पुढे काय करणार आहेस?"
"आता शेवटचं एकदाच माझ्या मुलीसाठी गुरुराजला भेटणार."
"हं! ठिक आहे आणि कसली मदत लागली, तर सांगशील मला." असं म्हणून डॉक्टर निघून गेल्या.
मला डिस्चार्ज मिळाला आणि मी गुरुराजकडे गेले.
"का आलीस पुन्हा?"
"गुरुराज, मी आता फक्त आपल्या मुलीसाठी आलेय्.
मला नाही स्वीकारलं, तरी चालेल, पण तुमच्या मुलीला स्वीकारा."
"गार्गी, तू डोक्याने विचार करत नाहीयेस."
"स्वतःच्या मुलाला स्वीकारण्यासाठी डोकं नाही गुरुराज, मन-भावना लागतात."
"हं! हे यशाचं शिखर गाठायला, नाव नि पैसा मिळवायला खूपदा भावना तुडवाव्याही लागतात गार्गी!"
"शिखराच्या मोहापायी, तुम्ही अगदी पाताळाला गेलात गुरुराज. शीऽ..!'
"तुलाही पडलाय की या शिखराचा, माझ्या नावाचा मोह, म्हणूनच हे पाप माझ्या."
"गुरुराज!" मी विजेसारखी कडाडले.
"तुम्ही मला व्यभिचारी ठरवताय्" मी आणखी आग ओकणार होते, पण मला जाणीव झाली की, मी याचक होते नि याचकाला मान नसतो. मनातला लाव्हा दाबून मी शांतपणे म्हणाले, "कितीही व्यभिचारी असली तरी कोणतीही स्त्री इतकं जरूर सांगू शकते गुरुराज, की तिच्या मुलाचा बाप कोण आहे! मला लाथाडलत तरी चालेल, पण तुमच्या मुलीला."
"बस्स्! खूप तमाशा झाला. या मुलीला मी आपली मानत नाही, तरी तुला काही अर्थीक मदत हवी असेल, तर मी जरूर करेन" असं म्हणून ते निघून गेले. मी अश्रू पुसले नि तिथून बाहेर पडले, माझा नि माझ्या 'मुक्ता'चा लढा लढायला! नवल वाटलं, सुरांच्या संगतीतला माणूस इतका बेसूर कसा!
विचारांच्या तंद्रीतच मी घरी आले. शेजारी-पाजारी टपूनच होते. "हे बघ गार्गी, तू काय केलंस किंवा तुझ्यासोबत काय झालं, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही, पण तुझं या अनौरस मुलीला घेऊन इथं राहाणं आम्हाला चालणार नाही."
"काका, मी तुमच्या वयाचा मान ठेवतेय म्हणून तुम्हाला हाकलत नाहीये. पण खबरदार! पुन्हा माझ्या मुलाला अनौरस म्हणालात तर! मी तिची जन्मदाती आई स्वीकारतेय् तिला. फक्त तिच्या भ्याड बापानं नाकारलं, म्हणून ती अनौरस? नि मला प्रश्न विचारण्यापेक्षा हिम्मत असेल, तर या पोरीच्या बापाला विचाराना, का स्वीकारलं नाही म्हणून!" मी मोठ्या हिमतीनं जगाला तोंड देत होते, पण मुक्ता कशी देईल? नि ती तोंड देऊही शकली, तरी तिच्या प्रश्नांना मी कशी उत्तरे देऊ? हताशपणे मुक्ताला कुरवाळत म्हटलं,
"अशीच लहान राहा राणी, म्हणजे जगाचे प्रश्न तुला नि तुझे प्रश्न मला भेडसावणार नाहीत."
असेच दिवस फरफटत सरत होते. मला डॉक्टरांनी दिलेला मदतीचा शब्द पाळला. त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये मी नोकरीला लागले. माझ्या एकाकी बोटाच्या आसऱ्यानं मुक्ता मोठी होत होती.
तिला शाळेत टाकायला गेले आणि पुन्हा त्याच प्रश्नाने डोकं वर काढलं. बापाच्या नावावर अडून बसलेल्या प्राचार्यांवर मी जाम भडकले.
"कमाल आहे! जन्म द्यायला आई, पण लावायला तिचं नाव चालत नाही? मला सांगा, हिच्या बापानं हिचं पालकत्व नाकारलं, म्हणून तुम्ही हिच्या शिक्षणाचा अधिकार नाकारणार आहात का?"
माझा तो अवतार पाहून प्राचार्यांनी तिचं नाव दाखल करून घेतलं, 'मुक्ता गार्गी पांडे'.माझ्या मुक्ताच्या जडणघडणीला आता सुरुवात झाली होती.
गुरुराजनं मुक्ताला नाकारलं, तेव्हा मला अतीव दुःख झालं होतं. मी मुक्ताच्या दुःखाची कल्पनाच करू शकत नव्हते. एकटी असले, तरी मला माझ्या वडिलांच्या नावाचा आधार होता. तिला तर ते नावच नाकारण्यात आलं होतं. आपला जन्मच कुणालातरी कलंक वाटावा, या दु:खाला कसली जातकुळीच नाही! तो लहानगा जीव वाढत होता, कधी लोकांचं बोलणं उडवून लावत तर कधी ते वार झेलून पुन्हा पुढे जात होता. थोडी समज आल्यानंतर फक्त एकदाच मुक्तानं मला तिच्या बापाबद्दल विचारलं. मी सगळं सांगताच ती माझ्या कुशीत शिरली, त्यावेळी तिच्यात सुरू असलेल्या अस्तित्वयुद्धाची मला जाणीव झाली. मग मात्र, ती या सगळ्यातून मुक्त झाली.
शाळा, मित्र, खेळ, गाणं या सगळ्यांत ती समरसून रमायला लागली. सुरांचा जन्मजात वारसा तिला लाभला होता.
नाकारलेली असली, तरी एका गायकाची मुलगी होती ती! मीही माझ्यातले अर्धवट राहून गेलेले सूर तिच्या गळ्यात उतरवत होते नि तिच्या गळ्यातून ते पुर्णत्वाने उमलून येत होते. तिच्या गायनकलेला एक वेगळीच झळाळी येत होती.
सर्वत्र तिचं कौतुक होत होतं. शाळा, महाविद्यालयात परीक्षा असो वा कुठलाही कार्यक्रम, ती आपली चुणूक दाखवूनच घरी परतायची. नेहमी अव्वलच रहाण्याचं जणू तिला व्यसनच जडलं. लोकांकडून तिचं भरभरून कौतुक ऐकताना मी मनोमन अभिमानाने मोहरून यायचे. माझी मुक्ता अशी मोठी होत होती. जे जग तिला अनौरस म्हणून हिणवत होतं, तेच जग आता तिला डोक्यावर घेत होतं!
नि एक दिवस मुक्ताला अखिल भारतीय संगीत महोत्सवाचं निमंत्रण आलं. माझ्यातल्या आनंद नि आश्चर्य या भावनांनी एकमेकांवर कुरघोडी करावी, अशीच ही घटना होती. मुक्ताची ही झेप तशी मला अनपेक्षितच! अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत गायची संधी मिळणं, हाच मुक्ताचा मोठा सन्मान होता!
सवयीप्रमाणे इथेही ती अव्वलच ठरली. ज्या गुरुराजनं तिला नाकारलं, त्या गुरुराजला मागे टाकून तिने यावर्षीच्या 'कलाभूषण' पुरस्कारावर स्वतःच्या नावाची मोहर उठवली. एका विशेष समारोहात महामहिमांच्या हस्ते तो तिला बहाल करण्यात येणार होता.
सगळीकडून कौतुक नि आश्चर्य व्यक्त होत होतं. प्रतिष्ठित, नामवंत गुरुराज नि ही आताआताची गायिका! गुरुराजचा अहंकार डिवचला गेला, पण त्यांनी मोठेपणाचा शेला पांघरून मुक्ताचं अभिनंदन केलं! खास पत्र लिहून मुक्ताला भेटायची इच्छा व्यक्त केली. ते पत्र माझ्याच हाती पडलं. गुरुराजच्या घरून मुक्तासह शेवटचं बाहेर पडताना जे दुःख उरात होतं, त्याहून कितीतरी पटीने मी आज सुखावले होते!
ठरल्याप्रमाणे ते आले, नोकरांनी त्यांना बसवलं.
मी समोर जाताच ते चमकले, "तू ? इथे ?"
"हो, हे माझं घर आहे."
"म्हणजे मुक्ता? माझी मुलगी आहे? "अह्ं...! सांभाळून गुरुराज! पापाशी बापाचं नातं जोडताय् तुम्ही. मुक्ता माझी मुलगी आहे."
"गार्गी, प्लिज! मला अजून डागण्या देऊ नकोस. तुला कसं सांगू, मला किती पश्चात्ताप होतोय्! माझी दोन्ही मुलं घराण्याचं नाव मातीत मिसळताहेत, पण मुक्तानं मात्र नाव राखलं हं! मला डावलून नवख्या मुलीला 'कलाभूषण' मिळतोय म्हटल्यावर नाराज झालो होतो, पण आता अगदी खुश आहे माझ्या मुलीची प्रगती पाहून! तू घाबरू नकोस गार्गी. या सोहळ्यातच मी जाहीरपणे सांगणार, की मुक्ता माझी मुलगी आहे."
"बस्स! गुरुराज, तुमच्या डळमळीत झालेल्या नि कुठल्याही क्षणी ढासळणाऱ्या, दुबळ्या नावाच्या कुबड्यांची आता माझ्या मुक्ताला गरज नाही. ती स्वयंसिद्धा आहे."
ते त्याच अहंकारात म्हणाले, "गार्गी, हा निर्णय तू न घेतलेलाच बरा. मी तिचा बाप आहे, हे कळल्यावर ती आनंदाने वेडी होईल बघ."
तितक्यात मुक्ताच समोर आली. तिनं त्यांच्या पायांना स्पर्श केला, "प्रणाम पंडितजी!" "बाबा म्हण बेटा. तुला या बाईनं सांगितलं की नाही, कोण जाणे! मी तुझा बाप आहे पोरी!"
ती शांतपणे म्हणाली, "तुम्हाला या बाईने सांगितलं होतं ना, तुम्हाला मुलगी आहे ते?"
"मला माफ कर बेटा! मी घाबरलो होतो तेव्हा समाजाला, बदनामीला, म्हणून मी तुला नाकारलं!"
"मलाही माफ करा पंडितजी! श्रेष्ठ गायक म्हणून मीही तुमच्या नावाचा आदरच करते, पण माझ्या बापाच्या जागी मला ते नाव नकोय. एका पळपुट्या माणसाची मुलगी म्हणवून घेण्यात मला स्वारस्य नाही. तुम्ही जाऊ शकता!"
ज्या पोरीला 'पाप' म्हणून झिडकारलं, त्या पोरीची ही चपराक होती त्या माणसाला! तो ऐरावत आज हरून जात होता माझ्या दारातून. मुक्ता माझ्या भरून आलेल्या उराशी बिलगली. खऱ्या अर्थाने शांत नि मुक्त वाटली आज ती मला!
"चल मॉ॑, रेडी हो, पुरस्कार तुलाच घ्यायचाय् तुझ्या तपाचं फळ आहे ते..."
त्या दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार घेण्यासाठी नाव पुकारण्यात आलं - 'कलाभूषण मुक्ता गार्गी पांडे'!
स्वतः मोठं होता होता माझ्या बछडीनं माझंही नाव मोठं केलं!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा