गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

116. आत्महत्येचा प्रयत्न

           आज मी जी कथा सांगतोय ती अशा प्रेमवीरांसाठी आहे ज्यांना प्रेमामध्ये फक्त निराशाच हाती लागली आहे. म्हणून ते मरणाचा विचार करतायत. ही प्रेमकथा एकदा वाचा आणि मगच योग्य तो निर्णय घ्या.
     आज मी टकमक टोकावर आलोय जिथून अनेक प्रेमवीरांनी जीव दिलाय. प्रेमामध्ये मिळत असलेल्या निराशेने मी तर वैतागलोय. मी अशा ठिकाणी उभा आहे जिथून त्या खोल दरीच्या तळाशी माझी नजरही पोहचत नाही. थरथत्या अंगाने मी माझे डोळे झाकले. एक पाऊल जरी पुढं टाकलं तर माझा खेळ खल्लास. पण तेवढ्यात एक हाक माझ्या कानी ऐकू आली. मी मागे पाहिलं तर एक वेडीशी दिसणारी म्हातारी मला हाक मारत होती. मी तिथे गेलो. तिनं बसायला सांगितलं. मी बसलो. ती आजी : जीव देतोस का? मी म्हणालो, होय. आजी म्हणते, का? मी म्हणालो, मी जिच्यावर प्रेम केलं तिला आज मी प्रपोज करायचं ठरवलं, म्हणून मी एक गुलाबाच फुल घेऊन तिच्या घरी गेलो. तेंव्हा तिच्या वडीलांनी तिच्या लग्नाची पत्रिका माझ्या हाती ठेवली. ती पत्रिका पाहताच माझ्या डोळ्यातला एक अश्रू अनाहुतपणे त्या पत्रिकेतील तिच्या नावावर पडला आणि मी तिथून तडख इकडे निघालो जीव देण्यासाठी. आजी म्हणाली, आता मी जे तुला सांगते ते एके आणि मगच तुला हवा तो निर्णय घे.
     आजी म्हणाली, ते झाड दिसतंय? तो म्हणाला, हो दिसतयं. आजी म्हणाली, तिथेच भेटायचे ते दोघे दर संध्याकाळी. पाच वाजता इथेच भेटायचे. तो बावीसचा आणि ती एकोणीसची. एकमेकांवर खूप प्रेम करायचे. रुसायचेबागडायचेकॉलेजमधल्या चांगल्या वाईट गोष्टी एकमेकांसोबत कायम शेअर करायचे. तो कायम तिच्यासाठी गुलाबाचं फूल आणायचा आणि ते जर तिला हवं असेल तर तिच्याकडून गालावर चुंबन घ्यायचा. तिला ही ते आवडायचं. तो तिला कायम म्हणायचा, तू माझ्याकडून काहीही माग पण प्रेमावरचा माझा विश्वास एवढा कधी मागू नकोस. पण त्याच्या या वाक्याचा अर्थ तिला कधी कळालाच नाही. ती तर फक्त त्याच्या सहवासाची मजा लुटत होती. पण तो एक दिवस गुलाबाचं फुल आणायचं विसरला. आणि मग तो तिचा रुसवा काढू लागला. पण ती काही ऐकत नव्हती. तू सांग तुझ्यासाठी काय करु? तो त्या टेकडीच्या कडेला जाऊन उभा राहिला आणि दोन्ही हात मोकळे सोडून तिला म्हणाला, बघ तरआज वारं कसं छान सुटलंय आणि त्याची मजा घ्यायची सोडून तू रुसलीस कसली? ती म्हणाली, तुला जे हवं ते कर, मी नाही येणार. तो म्हणाला, ही दरी बघतेस. तू रुसवा नाही सोडलास तर मी इथून जीव देईन. ती म्हणाली, होतर तर आला मोठा जीव देणारा. तो म्हणाला, मी खरंच जीव देईन. (ती गप्पच राहिली.) जेंव्हा त्याची हाक पुन्हा तिला ऐकू आली नाही तेंव्हा तिनं मागं वळून पाहिलं तर तो तिथे नव्हता. ती खूपच घाबरली आणि त्या टेकडीच्या कडेला जाऊन पाहिलं तर त्याचा रक्तानं बरबटलेला शर्ट एका काटेरी झाडाला लटकत होता. ते बघून ती हबकलेल्या चेहऱ्यानं तीन चार पावलं मागे सरकली. तिच्या छातीत वीज चमकली होती. तिची श्वास गती वाढली होती. तिचे हात पाय गार पडले होते. तिच्यासाठी तर हे आभाळच थांबलं होतं. ती बेशुध्द पडली. जेंव्हा तिला शुध्द आली तेंव्हा ती हॉस्पीटलमध्ये होती. स्थानिकांनी तिला तिथं पोहचवले होते. तिला हे सत्य कळालं की त्याचं मृत प्रेत याच हॉस्पीटलमध्ये आहे.तिला तिथं नेण्यात आलं. ती त्याच्या प्रेताकडे बघून रडू लागली. रडता रडता तिला ते वाक्य आठवलं, तू माझ्याकडून काहीही माग पण  माझ्या प्रेमावरचा विश्वास एवढा कधी मागू नकोस. तिला आता या वाक्याचा अर्थ समजला होता. पण तो समजेपर्यंत खूप उशीर झाला होता.
     आजींनी सांगितलेली ही  गोष्ट ऐकून तर माझी बोलतीच बंद झाली. मी खूप आश्चर्यचकित झालो. आजी मला म्हणाली की, मुला तू त्या मुलीने जी चूक केली तू ती करु नकोस. जा आणि तुझं प्रेम मिळव. आत्महत्या करणेचा विचार तर कधीच माझ्या मनातून उडून गेला होता. याला कारणीभूत होती ती आजी. मी तिथून एका नव्या उमेदीने आणि आशेने निघालो. 
        (दोन आठवड्यानंतर……) आज आम्ही पळून जाऊन लग्न केलं. कौतुक तर हिचं करावं लागेल जिच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या असतानाही तिनं माझा प्रस्ताव स्वीकारला आणि माझ्यासोबत पळून जाऊन लग्न करायला तयार झाली. माझ्यावर आधीपासून तिचं प्रेम होतं हे ती आता सांगतेय मला. या मुलीदेखील ना…… असो, आज मी त्या आजीचा आशिर्वाद घ्यायला जातोय जिनं मला दुसरा जन्म दिला आणि जिच्यामुळे मला माझी जीवनासाथी मिळाली. आशा आहे की ती मला तिथेच भेटेल जिथे आम्ही आधी भेटलो होतो. आजीची आणि आमची भेट झाली. तिला जास्त काही शोधावं लागलं नाही. पण वयोमानानुसार पाहिलं तर तिनं मला ओळखलंच नाही. नंतर सर्व हकीकत सांगितल्यावर मग तिनं मला ओळखलं. आम्ही तिचा आशिर्वाद घेतला. पण आजीने सांगितलेल्या गोष्टीविषयी काही प्रश्न माझ्या मनात होते ते मी तिला विचारलं. आजी त्या मुलीचं पुढं काय झालं? काय तिनं दुसरं लग्न केलयं? ती कोठे असते आता? आजी थोडी शांत झाली आणि म्हणाली, मुला, ती पोरगी मीच आहे जी आता धर्मशाळेत राहते. आणि मी काय करतेय? मी कित्येक वर्षे त्याची इथे वाट पाहतेय. आजपर्यंत मी तुझ्यासारख्या किती जणांचा जीव वाचविलाय. याचं फळ म्हणून का होईना एक ना एक दिवस तो मला त्याच्यासोबत घेऊन जाईल. जिथं मी त्याच्यावर कधीही रुसणार नाही, रागवणार नाही, कधीही फुलाचा हट्ट धरणार नाहीकधीच नाहीकधीच नाही.
     प्रेमसंबंध हे कधीही काहीही मागत नाहीत. ते फक्त देण्यासाठी हात पुढे करतात जसे या गोष्टीमधल्या नायकानं केलं. मागणी करणारा हा फक्त हट्ट असतो जो कधीही आपल्यावर प्रेम करणाऱ्या जोडीदारापेक्षा मोठा नसतो. त्यामुळे राग, हट्ट, अविश्वास, द्वेष, रुसवा हे क्षणभरांचे पाहुणे आहेत. क्षणभर यावेत आणि क्षणभरानंतर निघून जावेत. जर त्यांनी तुमच्या मनावर ताबा मिळविला तर प्रेमसंबंध तर तुटतीलच पण कदाचित वेळप्रसंगी तुम्हाला तुमच्या साथीदाराचा जीवही  गमवावा लागेल. मग हे तुम्हाला चालेल? नाही ना. मग विचार करा आणि कसं वागायचं ते तुम्हीच ठरवा.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...