गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

568. शेवटची गणेश मुर्ती...

 त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे  'तो' आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता. 
दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा... बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा...
'कितना को..दिया..गणेशजी?' 
 दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा 
'अंकल...साडे छहसो रुपये...सीक्स हंड्रेड फिप्टी. दे दूं.?'
तिच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी..
'अय्यो....ईतना..?' असे स्वतःशीच म्हणायचा..खिशात हात घालून काही तरी चाचपायचा, व पुन्हा एकदा त्या गणेश मुर्तींकडे डोळे भरुन पाहून, उदासपणे बाहेर पडायचा. 
बाजूच्या चौकात भाजी विकायचा तो..
रात्री गाडी त्या चौकातून  ढकलत, आपल्या एक खोलीच्या घराकडे, आपल्या आठ वर्षाच्या पोराला गाडीवर बसवून तो जायचा.  गाड्यावर उरलेल्या थोड्याफार भाजीचा अजिबात भाव न करता जे गि-हाइक अगदी निघताना येइल त्याला तो ती भाजी विकून टाकायचा. दुस-या दिवशी जी भाजी जवळपास खराबच होणार,  ती कमी किमतीत का होइना, कोणाच्या तरी पोटात जावी, एवढीच त्याची माफक अपेक्षा असायची. 
गणेश चतुर्थीच्या दिवशी दुकानातले सगळे गणपती तर खरेदी होत नाहीत. जसा दिवस पुढे सरकेल तसा त्या मुर्तींचा भाव देखील भाजी प्रमाणे कमी होइल, अशी भाबडी अपेक्षा ठेउन तो त्या गणेश मुर्तींच्या स्टॉल मधे दिवसभर येउन किंमत विचारुन जात होता. 
आता त्याला  जाताना पाहून, दिवसभरात पहिल्यांदाच स्टॉलवर  आलेले दुकान मालक आनंदरावांनी स्टॉलवर विक्री करणा-या त्या मुलाला बोलवून घेतलं व विचारलं..
'रवी..काय रे मुर्ती नाही पसंत पडली त्याला..? तसाच गेला तो..मूर्ती न घेता..' 
'अहो काका..नुसता टाइमपास माणूस आहे..सकाळपासून सहा सात वेळा स्टॉलवर येउन गेलाय.  ती कमलारुढ मुर्ती कितीला हे विचारतो आणि आम्ही किंमत सांगितली की चेहरा बारीक करुन निघून जातो..' 
'अरे मग विचारायचं की..त्याच्याकडे किती पैसे आहेत?' 
'अहो काका..त्याच्या अवतारावरुन वाटतं का तुम्हाला, की त्याच्याकडे साडेसहाशे रुपये असतील म्हणून? फाटका माणूस आहे..उगीच येउन स्टॉल फिरुन, किंमत  विचारुन जातो. मला तर वाटत की चोर बीर तर नसेल ना?' रवी बोलला. 
'नाही रे रवी. जेवढी माणसाची पारख मला आहे त्यावरुन मला वाटतं तो चोर नाही..हां..पण गरीब जरुर आहे..' 
तेवढ्यात काही तरी आठवून आनंदराव बोलले..
'अरे हो ..आता आठवलं..हा माणूस इथेच  वीर बाजी चोकात स्टेट बॅंकेसमोर भाजीचा गाडा लावतो. अरे मागच्या महिन्यात रात्री नउ वाजता मी जेवण करुन रात्री फिरायला चाललो होतो तेंव्हा याच्याकडे थोडी भाजी घेतली.मग फिरुन तिथून माघारी घराकडे  जाताना  याने मला  परत बोलवून त्याच्याकडची सगळी भाजी फक्त दहा रुपयात देउ केली. जवळ जवळ शंभर एक रुपयाची भाजी होती. मी नको म्हंटलं तरी ऐकेना. मग मीच विचार केला की याचे हातावरचे पोट..कशाला त्याचे नुकसान करा..म्हणून मी शंभर रुपये काढून दिले. पण आश्चर्य म्हणजे त्याने दहा रुपयांच्यावर  एक पैसाही घेतला नाही. मला अजूनही आठवतय तो म्हणाला होता.. 'साब..पेट भरने के लिये जितना चाहिए उतना तो आज कमा लिया...बस्स..आपसे जादा पैसा मै लेगा,  तो पाप लगेगा..' 
आनंदराव स्वतःशीच हसले. हा किस्सा ऐकून आचंबित झालेला रवी व दुकानातली बाकी मुले परत स्टॉलवर आलेल्या इतर लोका़कडे वळाली. 
रात्रीचे साडे नउ वाजता गणेश मुर्ती नेणारी शेवटच्या गणेश मंडळाची मुले येउन मूर्ती घेउन गेली व आनंदरावांनी पोरांना आवरायला घ्यायला सांगितले. दुकानाच्या बाहेरघ्या पंडालमधे ठेवलेल्या मुर्ती, रॅक,  टेबल, खुर्च्या, सगळे आत दुकानात आणू लागले. कमलारुढ गणेशाची मुर्तीला आज खूप मागणी होती. तब्बल पन्नास मुर्ती विकल्या गेल्या होत्या. केवळ एक मुर्तीच शिल्लक होती. 
काही सामान न्यायला बाहेर येत आनंदरावांची नजर रस्त्यावर गेली. रस्त्यावर तोच भाजीवाला आपला गाडा व मुलाला घेउन बाहेरुन आत दुकानात पहात होता. आनंदरावांनी त्याला पाहिले तसा तो बावचळला व पोराला पाठीवर हलकीच थाप मारुन चल चल असे म्हणत पुढे निघाला. 
आनंदरावांनी पटकन पुढे होत त्या भाजीवाल्याला हाक दिली..'ओ अण्णा....इथर आओ..' 
अण्णा जागेवरच थांबला. गाडा एका बाजूला लावून भाजीवाला अण्णा आपल्या पोराला हाताशी धरुन त्यांच्या समोर आला.
'आओ,,,अंदर आओ..' असे म्हणत आनंदराव त्या दोघांना आत घेउन आले. 
त्याची नजर भिरभिरत 'त्या' कमलारुढ गणेशाच्या एकमेव मूर्तीवर जाउन थांबली. त्याच्या नजरेत एक वेगळीच भक्ती आनंदरावांना दिसली. 
त्यानी रवीला सांगितले..
'रवी.. 'ती' मुर्ती घेउन ये..' 
रवी ती कमलारुढ गणेशाची दुकानात उरलेली एकमेव मुर्ती  घेउन आला. 
'अरे अण्णा..गणपती के बिना कैसे घर जाओगे..? सात बार मेरे दुकानमे आ के गये..लेकीन मुर्ती नही खरीदी.. ये मुझे नही चलेगा..तुम्हे ये मुर्ती अब खरीदनही पडेगी...बोलो..क्या करते हो..'
भाजीवाला अण्णा घाबरला..असं सारखं दुकानात येउन आपण चूक केली हे त्याला जाणवलं..
'सॉरी सर..गलती हो गया..मेरा पास तो इतना पैसा नही..मतलब.. है..लेकीन कल का माल खरीदने के लिए वो चाहिये ना..? वो मै सब्जी बेचता..तो सुब्बा छे बजे मंडी मे जा के भाजी लेना पडता..सॉरी जाता मै..' असे म्हणून पोराचा हात धरुन अण्णा निघाला. 
पण आनंदरावांनी त्याचा हात पकडला..
'नही..गणपती तो तुमको  घर ले जानाही पडेगा..वरना मै पुलीस को बुलाता देखो..'
पोलीस नाव ऐकताच तो पार गांगरुन गेला..
तो गडबडून म्हणाला..
'नही..मै लेता..ये मूर्ती..मै लेता..कितना देना मूर्तीका..?' 
त्याने खिशात हात घालून आपली दिवसभराची सारी कमाई बाहेर काढली.
आनंदराव हसत त्याला म्हणाले..
'दस रुपये...'
त्या दिवशी घरी जाताना भाजीवाल्या अण्णाच्या चेह-यावर केवळ अवर्णनीय आनंद होता..
अन अण्णाच्या गाड्यावर बसलेल्या त्याच्या मुलाच्या मांडीवर होती, आनंदरावांच्या दुकानातली, त्या दिवशी विकली गेलेली,  प्रसन्न, श्वेतवर्णी अन कमलारुढ, नव्याशार भगव्या  वस्त्रात झाकलेली, अशी ती..  
शेवटची गणेश मुर्ती..

© सुनील गोबुरे

567. दशावतारांच स्पष्टिकरण...

 वासुदेव नुकताच अमेरीकेवरुन घरी आला होता. सकाळच्या वेळी वासुदेव नास्ता करायला बसत होता. आईने कुतूहलाने त्याला विचारले "तु अमेरिकेत नेमका करतोस तरी काय?"
वासुदेव म्हणाला "आई तु डार्विनचं नाव ऐकलस का? नसशिल ऐकललं, मी एक जेनेटिक इंजिनीअर आहे. त्याच डार्विनच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या थेओरीवर मी काम करतोय."
आई त्याच्या जवळ येवून बसली आणी त्याला म्हणाली "अरे डार्विनची उत्क्रांतीची थिअरी तर नवी आहे. तु त्याहुन जुन्या थिअरी वर काम का नाही करत?'
वासु विचारात पडला त्याला प्रश्न पडला की आता त्याहून जुनी थिअरी कुठली?
आई बोलत होती "तुला विष्णुचे दशावतार माहित आहेत का रे?"
वासुदेव ने डोक नाही म्हणून हलवल......
'नाहीना मग आता ऐक" आई म्हणाली.
"पहीला अवतार--मत्स्य--म्हणजे मासा. जीवनाची सुरुवात पाण्यात झाली म्हणून मत्स्य अवतार ओळखला जातो.
दूसरा अवतार कूर्म म्हणजे कासव जे दर्शवत की पाण्यातून सुरु झालेल जीवन जमिनीकडे जातय. यात पाणी आणि जमीन समान राहते"
"तिसरा अवतार वराह म्हणजे डुक्कर ज्याचा अर्थ जमिनीवरील पाळीव प्राणी तसेच मोठ्या आकारचे भुचर जसे डायनासॉर सारखे प्राणी जन्माला आले. यात पाण्यात कमी आणि जमीनवर वावर जास्त'
"चौथा अवतार होता नरसिंहाचा ज्याचा अर्थ अर्धा प्राणी आणी अर्धा मनुष्य म्हणजेच प्राण्यां पासुन मानवाकडे वाटचाल सुरु झाली. यात पाणी पिण्यापुरतंच. मनुष्य हा प्राण्यासारखा पण जास्त बुद्धिमान"
"पाचवा अवतार--वामन जो उंचीने छोटा ब्राम्हण होता पण तो मोठा होउ शकत होता त्याने पूर्ण पृथ्वी व्यापली होती. जुन्या काळातही असेच दोन गट होते Homo Sapiens आणि Homo Erectus असच एकदा त्या दोघांच युद्ध झाल आणि ती लढाई Homo Sapiens नी जिंकली" "का माहीती आहे का जिंकली....?कारण ते उंचीने व बुद्धीने मोठे होते म्हणून जसा वामन होता." 
आई पण कथेत दंग झाली होती. वासुदेव अवाक व स्तब्ध होवून ऐकत होता.
"सहावा अवतार परशुराम जो कुऱ्हाड धारण केलेला जंगलात राहणारा शिघ्रकोपी तपस्वी पुरुष होता जसा अष्मयुगातील जंगलात एकटा राहणारा प्राण्याची कात धारण केलेला मानव होता. जंगलाची कास धरून मानव मोठा होत होता"
"सातवा अवतार राम म्हणजे बुद्धिवंत राजा ज्याने जगाला जगण्याचे कायदे व नात्याचे महत्व सांगितले. तत्सम अष्मयुगीन मानवही कुटुंब परिवार व गट करून राहु लागला होता त्याला सोबत राहण्याच महत्व कळाल होतं"
"आठवा अवतार कृष्ण जो एक उत्तम मित्र, गुरु, मार्गदर्शक, प्रियकर व राजा होता. त्याने जगाशी खेळ खेळून प्रेम व युद्ध याच ज्ञान दिलं. जीवन जगण्याची कला दिली त्यालाच आपण भगवदगीता म्हणतो. तोच मानव शिक्षण घेऊ लागला त्याला शिक्षण म्हणजे काय कळले. वेगवेगळे विद्यापीठ स्थापन झालेत. मनुष्य प्राणी शिकु व शिकवु लागला."
"नववा अवतार बौद्ध जिथे एकीकडे नरसिंहासारखा हिंस्र मानव होता तिथे सत्य, अहींसा, सदाचाराचे संदेश देणारे, जगाला मोक्षाचे महत्व सांगणारे  बौद्ध पण जन्माला आलेत. म्हणजेच ताम्रयुगानंतर थोर संत विचारवंत जन्माला आलेत ज्यांनी जगाच्या चाली रिती बदलल्यात." 
आई एवढ बोलून थांबली.
"आणी दहवा?" वासुदेवने कुतुहलाने विचारले. 
आई हसत म्हणाली "अरे दहावा अवतार म्हणजे कल्कि जो मनुष्याचा जेनेटिक मधे बदल केलेली आवृत्ति आहे ज्यावर तुम्ही अभ्यास करत आहात...."
"हा दृष्टिकोन तू कुठून आणला आई?"
'विज्ञान आणी धर्माला आम्ही अशाच नजरेने बघतो' आई न्याहारी देत हसून म्हणाली.
माणसाने नेहेमी विज्ञानासह अध्यात्मिक तेची कास धरावी. अध्यात्म समजण्यास कठीण आहे पण ते ज्याला समजले त्याने जग जिंकले.

566. आधार...

" चला.. बाहेर व्हा. चालते व्हा माझ्या घरातून... आऊट
कोणाची गरज नाही मला...." एकदम चौधरी काकांच्या आवाजाची पातळी वाढली.. आणि चिरागच्या काळजात भीती उमटली.
     10 ऑक्टोबर होता त्या दिवशी. चिरागच्या मावशी चा वाढदिवस. त्याचे औचित्य साधून तिने आई-बाबांना आणि लाडक्या भाच्याला आपल्या दादरच्या हिंदू कॉलनीतल्या घरी बोलवलं होते. तसं म्हटलं तर मावशीचे हे दुसरं लग्न.   सात महिन्यापूर्वी लग्न झाल्यानंतर प्रथमच तिने आई-वडिलांना आपल्या नव्या घरी बोलवलं होतं. चिराग चे आणि त्याच्या मावस बहिणीचं दिव्याचं चांगलं जमायचं. दोघे जवळजवळ एकाच वयाचे. म्हणूनच मावशीकडे जायचं म्हटल्यावर चिराग सकाळपासूनच आनंदात होता. दिव्याला काहीतरी द्यायचं म्हणून नवा व्यापार चा नवीन सेट पण त्याने खरेदी करून पॅक करून आणला होता.
       पण आता जे काही घडलं ते पाहुण्यांना अनपेक्षित होतं. गेल्या अर्ध्या तासापासून त्यांचं औपचारिक स्वागत करून मावशीचे नवे यजमान जे आत गेले ते बराच वेळ बाहेर आले नव्हते. मग थोड्याच वेळापूर्वी आज स्वयंपाक घराच्या दिशेकडून काहीतरी धुसपुस.. कुरबुर ऐकू येऊ लागली. पण असेल नवरा बायकोचं काहीतरी म्हणून चिरागच्या आजी-आजोबांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
पण आता चिरागच्या या काकांनी चौधरी काकांनी वेगळच रूप धारण केलं होतं. नक्की काय घडलं होतं ते कोणालाच कळलं नव्हतं. पण जे घडतंय ते योग्य होत नाहीये याचा अंदाज सर्वांनाच अगदी लहान चिरागला आणि दिव्याला सुद्धा आलेला होता.
         चिरागच्या मीनल मावशीचे पहिले मिस्टर दिव्याच्या जन्मानंतरच एका रेल्वे अपघातात वारले. बँकेत काम करायचे ते. त्यांच्या मृत्यूनंतर चिरागच्या बाबांनी अनेक खटपटी हेलपाटे घालून मावशीला अनुकंपा तत्त्वावर तिच्या मिस्टरांच्या जागेवर नोकरी मिळवून दिली. मावशी मग माहेरी म्हणजे डोंबिवलीला आई-वडिलांबरोबर आणि लहान दिव्याबरोबरच राहायची. बँकेत नोकरी असल्याने पुढचं सगळं निभावून गेलेले इतके दिवस. मग चौधरी काकांकडून मावशीला लग्नाचा प्रस्ताव आला रीतसर. का त्या आधीच मीनल ने चौधरींबरोबर बाहेरच जमवलं कळायला मार्ग नाही.
           चिरागची मीनल मावशी होतीच तशी. गोऱ्या वर्णाची, उंची ने चांगली, उफाड्या अंगाची आणि नाकी डोळी नीटसं... टीप टॉप राहणारी, अगदी व्यवस्थित. कोणाही पुरुषाला भुरळ पाडेल असेच व्यक्तिमत्व.. कोणी म्हणणार नाही की एका मुलीची आई आहे म्हणून. संतूर गर्ल्स च्या गटात मोडणारी. चौधरींचे स्थळ पण एकदम चांगलं म्हणावं असं. प्रतिष्ठित कंपनीत मॅनेजर पदावर होते चौधरी. मीनल ला शोभेल अशी उंची, दादरचा हिंदू कॉलनी चा मोठा फ्लॅट, झालंच तर दारात कंपनीने दिलेली फोर व्हीलर... आणि अर्थात चांगली वेतन प्राप्तीची हमी होती.
त्यामुळं मीनल च्या आई बाबांनी सुद्धा आनंदाने होकार दिला आणि चांगल्याशा सुमुहूर्तावर मीनल आणि चौधरींचा विवाह रजिस्टर पद्धतीने झाला. अगदीं बोटांवर मोजता येतील अशी नातेवाईक मंडळी दोन्हीकडून आलेली.
      त्यानंतर मात्र दोघांच्या संसारात नेमकं काय घडलं ते तर मावशीला माहीत असेल किंवा आपल्या नव्या घरी राहायला गेलेल्या दिव्याला. सर्वजण तर चला मावशी लग्न होऊन नवीन श्रीमंत घरी राहायला गेली.. सासरी.. सुखातच असणार असं धरून चालले होते.
       आता स्वयंपाक घरातल्या भांडणांचा आवाज चांगलाच तापू लागला होता. तशी चिरागच्या घरात पण आई-बाबांमध्ये भांडण होत. आता नवरा बायको मध्ये भांडण जगाच्या पाठीवर कुठे होत नसतील..?? पण घरात तिसरी व्यक्ती मग ती चिरागच्या आईचा भाऊ ..चिरागचा मामा असेल किंवा मग वडिलांची बहिण रंजू आत्या तिच्यासमोर ही भांडणे कधीच होत नसत. पण इथे तर आतील भांडण आता धक्क्याबुक्क्यांवर येऊन पोहोचलेलं.
इतक्यात फाडकन कोणीतरी कानशिलात मारण्याचा आवाज आला आणि थोडा वेळ सगळंच स्तब्ध शांत झालं. मग थोड्या क्षणातच मीनल लालेलाल झालेल्या डोळ्यांनी स्पुंदत .. डोळ्यात अश्रू घेऊन बाहेर आली आणि म्हणाली.
        " एक क्षण सुद्धा थांबायचं नाही आपण इथे. माझ्या माहेरच्या माणसांचा अपमान करतो हा माणूस..." असं म्हणून तिने बॅग भरायला सुरुवात केली. आजोबांनी पण आपल्या या नव्या जावयाने घातलेला शिमगा स्वतः च्या डोळ्यांनी पाहिलेला होता.
       चौधरी बाहेर आले. थोड्या वेळापूर्वी आजोबांनी दादर च्या डी दामोदर मिठाई वाल्याकडून आणलेली सुतरफेणीची पिशवी त्यांच्या अंगावर भिरकावत चौधरी गुरकावले.
        " चालते व्हा.. माझ्या घरातून.. आताच्या आता...".
 छोटा चिराग आणि दिव्या, आजी आजोबा मीनल ला घेवून बाहेर पडले. झालेला अपमान गिळत कसेबसे डोंबिवलीला परतले. 
     " चौधरींच्या नवीन घरात मला स्वातंत्र्य नव्हतं. सगळं काही ते म्हणतील तसेच व्हायला हवं. जरा मनाविरुद्ध झालं तर असहकार.. मग पुढं माझ्यावर चौधरी ओरडू लागले. नव्या नवलाई चे दिवस संपले आणि नजरेत सलू लागला त्यांचा आक्रस्थळे पणा.. क्वचित प्रसंगी मारझोड सुद्धा.. कदाचित ही दुसरं लग्न केलेली बाई... पुरुषाचा आधार हवी असलेली.. कुठं जाणार आपल्याशिवाय असं गृहीत धरलं असणार त्यांनी.." मावशी सांगत असताना चिराग एकत होता.
       "चौधरींची पहिली बायको या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना सोडून गेली असणार. माझ्या हे लक्षात आलं तोवर फार उशीर झाला होता. " मीनल म्हणाली.
       या नव्या काकाचा राग आला मग चिरागला एकदम. जेमतेम 13.. 14 वर्षाचा होता तो. मोठ्यांच्या गोष्टी त्याला फारशा कळत नसत आणि कळल्या तरी त्यात जास्त नाक खूपसायच नाही अशी त्याच्या आई-बाबांची शिकवण होती.
       खरंतर दिव्या परत आजी-आजोबांकडे आली याचा त्याला त्या नकळत्या वयात आनंदच झालेला. दिवाळी तोंडावर आली होती. सहामाही परीक्षा झाली की मग दिवाळीची सुट्टी सुरू व्हायची आणि मग चिराग से आई बाबा त्याला आजोळी पाठवायचे. इतके दिवस दिव्या आजोळी असल्याने त्याला आजोळ चे विशेष आकर्षण होते.
      मीनल मावशी चा पण चिराग लाडका होता. दिव्याच्या पाठीवर जर मीनल ला मुलगा झाला असता तर आज चिराग एवढा असता. ज्या दिवशी मावशी  दादरच्या चौधरींच्या घराला सोडून आली त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी चिराग - दिव्याला घेवून ती दिवाळीची खरेदी करायला उत्साहानं बाहेर पडली. चिराग ला चांगली नव्या फॅशन ची फुल्ल पँट आणि टी शर्ट... दिव्याला नवीन ड्रेस खरेदी करुन दिला तिने.
       दिवाळीचा पहिला दिवस होता. नरक चतुर्दशी. सकाळी साग्र संगीत अभ्यंगस्नान वगैरे करून बाबांनी घेवून दिलेले मोजके फटाके वाजवून झाल्यावर चिराग डोंबिवलीच्या आपल्या आजोळी अंगणात फराळ खात बसला होता. बाजूलाच नवा ड्रेस घातलेली दिव्या त्याच्याशी गप्पा मारत होती. आजी आजोबा, मीनल सगळेच आनंदात होते.
      इतक्यात दाराशी मारुती सुझुकी गाडी येऊन उभी राहिली. दिव्याने ओळखलंच की ती गाडी तिच्या नव्याने जीवनात आलेल्या  नव्या बाबांची चौधरींची होती. ही गाडी कंपनीने चौधरींना दिलेली. गाडीतून चौधरी उतरले. हातातल्या दोन-तीन मोठ्या पिशव्या सावरत.. ड्रायव्हरला गाडी पार्क करण्याविषयी सूचना देऊन ते गेट उघडून आत आले. आजोबा आजी एकदम गप्प झाले. मगाशी उत्साहात चालू असलेल्या त्यांच्या गप्पा एकदम बंद झाल्या.
        " हॅपी दिवाली... सगळ्यांना ..." चौधरी आत येत म्हणाले.
       " अरे वा चिराग फटाके उडवले का रे...?? हे घे दिवाळीत चार दिवस- रात्र फटाके वाजवले तरी उरतील एवढे फटाके आणलेत तुझ्यासाठी..." एवढे बोलून हातातल्या फटाक्यांची पिशवी त्यांची चिरागला दिली.
        मग दिव्याशी असंच काहीबाही बोलून तिच्याही हातात त्यांनी ड्रेसची पिशवी सोपवली आणि मग ते येताच रागाने तिथून उठून गेलेल्या मीनलच्या पाठून ते आत गेले.
        चिराग ने फटाक्यांच्या पिशवीत न राहवून डोकावले.
          आत भुईनळे, भुईचक्र, फुलबाजे यांचे मो ठ   मोठाले खोके होते. झालं तर लक्ष्मी बॉम्ब, ताजमहाल फटाक्यांच्या मोठयाच्या  मोठ्या लडी त्यात होत्या...प्लास्टिकच्या चकचकित  आवरणात बंद केलेल्या. ते सर्व पाहून चिराग आनंदित झाला. आतापर्यंत त्याच्या बाबांनी आणून दिलेले मोजकेच फटाके तो चार दिवस दिवाळीचे अगदी पुरवून पुरवून वापरायचा.
       आतल्या खोलीत चौधरी मीनल मावशीला विनवत होते. बहुदा पुन्हा घरी चालण्याविषयी.. मीनलचा राग जावा म्हणून कुठल्यातरी सराफा कडून खरेदी केलेला भारी किमतीचा सोन्याचा दागिना सुद्धा देवू केला होता त्यांनी.
           पण मीनल मात्र आपल्या निर्णयावर ठाम दिसत होती.
       " कशाला आलात पुन्हा इथं..?? मी एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतला . " शांत आवाजात मीनल म्हणाली.
        " कमॉन मीनल... तुला माहित आहे.. चार दिवस मी कंपनीच्या टेन्शनमध्ये होतो. त्याभरात मी तुला आणि तुझ्या आई बाबांना नको नको ते बोललो. मला क्षमा कर आणि आता दादरला परत चल." चौधरी गयावया करत होते.
         " अजिबात नाही. झालेला अपमान विसरण्या इतकी मी खुळी नाहीये. बरं झालं.. तुम्ही म्हणत होता तशी माझी बँकेतली नोकरी सोडून बसले नाही. खरंच बाईला एक वेळ नवरा नसला तरी चालेल, पण नोकरी मात्र हवीच." मीनल ने निक्षून सांगितलं.
      " अग नोकरीच तर सांगतो तुला... मला आता मॅनेजर पदावरून संचालक पदावर घेतलंय. प्रमोशन झालंय माझं. जन्मभर तुला आणि दिव्याला सुखात ठेवू शकतो मी." चौधरी यांनी आपली बाजू मांडली.
      " हे बघा चौधरी मी पुन्हा सांगते आणि शेवटचं सांगते. मी तुमच्यावर घरात मारझोड केली.. घरगुती हिंसाचार आणि छळ केला म्हणून तुमच्यावर खटला दाखल करत नाहीये हा मोठा दिलासा समजा. नाहीतर तुमचं नवे मिळालेलं संचालक पद तर सोडाच नोकरी जाऊन घरी बसायची पाळी येईल तुमच्यावर...." मीनल तिच्या निर्णयावर अगदी ठाम होती.
      " तुझा निर्णय अंतिम आहे..??" चौधरींनी निर्वाणीचे विचारलं.
       "अगदी शंभर टक्के. माझं आणि दिव्याचं बघायला मी अगदी समर्थ आहे." मीनल म्हणाली.
       चौधरी पडक्या चेहऱ्याने खोली बाहेर आले. कोणाकडे न पाहता सरळ तरातरा चालत गाडीत जाऊन बसले आणि ड्रायव्हरला गाडी चालू करायला सांगितली.
         आजोबांनी आजीकडे पाहिलं. इतकी वर्ष संसार केल्यामुळे आजीला त्यांना नेमकं काय म्हणायचे ते त्यांची नजर पाहून समजलं. ती लेकीकडे गेली.
         " मिने... तुला खरंच तुझ्या निर्णयाचा फेरविचार करायचा नाहीये..??" आईच्या मायला त्यांनी मीनलला विचारलं.
       " आई... कोणत्या बाईला आपल्या जीवनात स्थैर्य सुरक्षितता हवीशी वाटत नाही?? मलाही वाटली म्हणून तर चौधरींचा विचार केला मी. अर्थात त्यांचं मोठं पद, देखणं रूप , घरदार, श्रीमंती याची भुरळ पडली मला. ती मी अजिबात नाकारत नाही."
       " पण मग लग्नानंतरच्या काही दिवसातच चौधरी नेमके कसे आहेत ते कळू लागलं. अगं रात्री आपला कार्यभाग ओळखून झाल्यावर आपला लंगोट देखील मला उचलायला लावायचा हा. बायको म्हणजे पायपुसणं वाटायचं याला. पैसे मिळवून आणतोय ना... मग मी गुलामा सारखं याच्यासाठी राबावं ही याची अपेक्षा. त्यातूनच पुढे आमचे खटके उडू लागले."
        "पहिले काही दिवस नवीन लग्न आहे ,चौधरींच्या स्वभावाशी जोडून घेतलं पाहिजे म्हणून मी गप्प बसले. पण मग नंतर कधी भाजीच मीठ कमी, बटाटे जास्तच करपले, एखाद्या गोष्टीचा विसर पडला या साध्या गोष्टीवरून सुद्धा मला टोमणे मारू लागले... आईबाप काढू लागले. माणूस मोठा झाला की त्याचा अहंकार पण मोठा होतो का...??"
        " तुम्ही आलात त्या दिवसाआधी चार-पाच दिवसापासून कंपनीतल्या संचालक पदाचा विचार डोक्यात घेऊन बसलेले चौधरी. त्या गडबडीत त्यांचा अहंकार दुखावला गेला मध्येच अशाच बारीकशा कारणावरून आणि आपल्याला घराबाहेर काढण्याचा प्रकार झाला.... पण झालं हे एका अर्थी बरंच झालं. त्याचा निमित्त झालं आणि त्या माणसाला सोडायचं धैर्य माझ्यात आलं."
         " थोड्याच दिवसात माझी बदली होणारे पुण्याला.
दिव्याला घेऊन मी पुण्याला जाईन राहायला.." मीनलने बोलून संपवलं.
        इतक्यात गेटवर "कचराय. SSS.. "असा पुकारा झाला. गेटवर त्यांच्या विभागाचा कचरा नेणारा जितू कचरावाला आला होता. कचऱ्याचा डबा देण्याची जबाबदारी   चिराग आजोळी असताना स्वतःहून घेत असे. 
         आजोबांनी कचरा घेऊन जाणाऱ्या जितूला दिलेली दिवाळी जितूला देताना आपल्याकडे असलेली फटाक्यांची पिशवी जितूच्या बरोबर आलेल्या त्याच्या लहानग्या पोराला दिली.त्या लहानशा पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद चिराग निरखून पाहत होता बराच वेळ.

# योगेश साळवी

564. छत्तीसगडच्या जंगलात त्याने जो अनुभव घेतला...

    छत्तीसगडच्या जंगलात त्याने जो अनुभव घेतला तो सर्वांपर्यंत पोचावा त्यासाठी आहे. तुमच्या जवळचा माणूस जेव्हा घनदाट जंगलात मरणाच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा २००० किलोमीटर लांब तुम्ही किती हताश आणि हतबल अवस्थेत असता हे दाखवण्यासाठी ही पोस्ट आहे. तुमच्या जवळच्या माणसाचा आलेला कॉल हा शेवटचा असू शकतो हे कळल्यानंतर ही एक थंडगार लहर तुमच्या मेंदूत जाते त्यासाठी ही पोस्ट आहे. आयुष्य हे क्षणभंगुर आहे हे पुस्तकात वाचलेले असतं पण प्रत्यक्षात हे दिसतं तेव्हा काय होतं हे सांगण्यासाठी ही पोस्ट आहे.
     रितेश हा सध्या छत्तीसगढ ओडिसा सीमेवरच्या जंगलात आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव नेमकी जागा मी सांगू शकत नाही. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमध्ये तो असिस्टंट कमांडट आहे. कोब्रा कमांडो फक्त ऑपेरशन असतं तेव्हाच मैदानात उतरतात. या तुकडीचे तो नेतृत्व करतो आहे. अतिशय highly trained अशी ही तुकडी असते. अतिशय खडतर, बिकट आणि जिथं सामान्य शहरी माणसं तग धरु शकणार नाही असा परिस्थितीत हे कोब्रा कमांडो कितीही काळ जगू शकतात. कोब्रा कमांडो हे प्रकरण काय हे नंतर कधीतरी. पण २१ सप्टेंबरला मध्यरात्री घडलेली ही घटना आहे. ज्याठिकाणी रस्ता नाही, नेटवर्क नाही असा जंगलात सीआरपीएफचा कॅम्प लागलेला आहे. आजूबाजूला तारेचं तात्पुरता उभं केलेले (बिनकामी) कुंपण, त्यात लागलेले तंबू, चहूबाजूला जंगल, नक्षलवाद्यांनी वेढलेला हा भाग व्याघ्र प्रकल्पात येतो त्यामुळे जंगली प्राण्यांचे असलेले भय ते वेगळं.
     मी मुद्दाम हे वर्णन करत आहे कारण तुमच्या डोळ्यासमोर एक पट उभा राहावा. १७,१८ सप्टेंबरपासूनच या जंगलात ‘दे मार’ पाऊस झोडत होता. साहजिकच जमीन ओली, तंबू ओला, माणसंसुध्दा ओली पण कोब्रा कमांडो जगत होते. २१ सप्टेंबरला रात्री झोपायच्या वेळेनुसार रितेश त्याच्या तंबूत झोपायला गेला. ना लाईट ना काही...बाहेर कोसळणारा पाऊस, बेडच्या खाली ओली जमीन, ओला तंबू, ठिपकणारा पाणी अशा अवस्थेत तो झोपला. या भागात डासांचा प्रादुर्भाव भयानक असल्यामुळे मच्छरदाणी ही सक्तीची आहे. नक्षलवाद्यांच्या भागाविषयी ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती मलेरिया हा या भागात नक्षलवाद्यांपेक्षा घातक आहे. जास्त माणसं मारतो. या मच्छरदाणीच्या आत मध्यरात्री अडीच तीनच्या सुमारास रितेशला जाग आली कारण पायाला खाज आली. खाज आली म्हणजे डासच असणार या शक्यतेने माणूस ज्या निसर्गसुलभ भावनेने पाय खाजवतो तो त्याने खाजवला पण १० मिनिटात त्याला जाणवलं की हा तो डास नव्हे. रितेश उठला रात्रीच्या अंधारात विजेरीच्या प्रकाशात त्याने बघितलं तर अत्यंत कुप्रसिद्ध अशा खुणा त्याला दिसल्या. ट्रेनिंग घेतल्यामुळे एका सेकंदात त्याला कळलं की आपल्याला साप चावला आहे. तो तसाच धडपडत उठला काही काळ शोधाशोध केली पण साप काही दिसला नाही.
      आता अनेक प्रश्न समोर होते..मानवी वस्तीपासून प्रचंड लांब असलेल्य़ा त्या अटिंग्या रानी आता जीवन मरणाचा खेळ सुरु झाला होता. बाहेर पाऊस, जंगल आणि नक्षलग्रस्त भाग आणि एक कोब्रा कमांडो झगडत होता आयुष्याशी. मध्यरात्री कॅम्प जागा झाला आणि पुढचा थरार हा सुरु झाला. कोब्रा कमांडोला कधीही कॅम्प सोडून बाहेर जाता येत नाही. रात्री अपरात्री तर नाहीच नाही. त्यासाठी परवानग्या लागता. रोड ओपनिंग लागतात. बाहेर नक्षलवादी असतात. रस्त्यात बॉम्ब असतात. मुळात रस्तेच नसतात. त्या पाऊस पण त्यावेळेला जीवावर उदार होऊन पाच कमांडो घेऊन रितेश बोलेरोत जाऊन बसला. रस्त्या नसलेल्या त्या जंगलात तुफान पावसात ती बोलेरा लाईट न लावता पळत होती. (ड्रायव्हिग स्कील काय असेल). पण तासाभरातच स्नेक बाईटने त्याचा परिणाम दाखवायला सुरुवात केली. इतका वेळा शुध्दीत असलेल्या रितेशची शुध्द हरपली. बोबडी वळली, दृष्टी गेली..फेफरं भरल्यागत झालं.....यात काळात कदाचित आपली वेळ आल्याची जाणीव त्याला जाणीव झाली असावी कदाचित काही जणांना फिल्मी वाटेल पण तशाची अवस्थेत त्याने घरी कॉल लावला. घडलेली परिस्थिती कशीबशी सांगितल...घरी एकच सन्नाटा आणि सेकंदात सुरु झाली रडारड...त्या माऊलीची हताश हतबल अवस्था आपण फक्त कल्पना करु शकतो. या सगळ्या गोंधळात जवळच्या रुग्णालयात जायला तीन साडेतीन तास लागले. हे अंतर किमान ५० एक किलोमीटर असेल. तोपर्यंच सीआरपीफच्या अधिकाऱ्यांनी अँटीवेनमची व्यवस्था करुन ठेवली होती. बेशुध्दावस्थेतच रितेश तिथे पोचला आणि त्याला उपचार मिळाले आणि ८ तासानंतर त्याने डोळे उघडले. मला तीन फोटो पाठवले आणि मेसेज आला ‘बॉय वाचलो’ फोटो बघून मी हादरलो होतो कारण त्याला चावलेला साप होता पट्टेरी मण्यार उर्फ branded Crait…
-----------------------------------
P.S.
सह्याद्रीमध्ये फिरताना आपल्या मण्यार माहिती असतो, फुरसं, नाग घोणस पण आता सोशल मिडियामुळे सगळ्यांना माहिती झाले आहेत पण पट्टेरी मण्यार हा फक्त गडचिरोली ते ओडिसाच्या पट्ट्यात सापडतो. २ मीटर लांबीच्या या सापाचे विष हे नागापेक्षा १७ पट विषारी असतं असा म्हणतात. ते मुळात neuro toxic असतं त्यामुळे जास्त भयंकर.... मज्जासंस्थेवर परिणाम करतं. १० वर्षापुर्वी आदरणीय प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात हा साप बघितला होता. या सापाचे मुख्य खाद्य फक्त सापच आहे. याच सापाचे खाद्य म्हणून रात्री जंगलात जाऊन साप पकडण्याचे उद्योगही आम्ही प्रकाश आमटे यांच्यासोबत जाऊन केले होते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा साप चावला तर त्याचे अँटी वेन्हम भारतात काही वर्षापुर्वी पर्यंत मिळत नव्हते. नॉर्मल नाग, घोणस चावणे वेगळे, ते पण विषारीच, जीवघेणेच पण हा सापच मुळात अतिदुर्गम भागात सापडतो त्यामुळे त्याचा स्ट्राईक रेटही जास्तच..
-----------------------------------
रितेश जीवंत राहिला कारण 
तंबूत झोपलेल्या रितेशला साप चावला तो पायाला आणि तो पण ब्लँकेटवरुन... ब्लँकेटच्या जाडीमुळे सापाचा दंश हा पुर्ण क्षमतेने होऊ शकला नाही आणि पुर्ण क्षमतेच्या केवळ ४० ट्क्के दंश रितेशला झाला आणि त्यामुळे परिणामकारकता कमी राहिली. पण ब्लँकेट नसतं तर किंवा साप ब्लँकेटच्या आत आला असता तर....? जीवावर उदार होऊन त्या रानातून, खाचखळग्यातून, परिणामांची तमा न बाळगता बोलेरो नेणाऱ्या कमांडोजमुळे रितेश वाचला.... धन्यवाद
आयष्यातली ही कधीही न विसरता येणारी घटना आहे त्याची नोंद राहावी म्हणून हा लेखन प्रपंच...
-----------------------------------
Rohit Harib यांच्या वाॅलवरून

565. कारण मी तिची आई आहे !

        आज माझी तेरा वर्षाची लेक नेहा माझ्यावर रागवून शाळेत गेली. आज तिच्या शाळेत गॅदरींग आहे. आज तर तिनं किती खुषीत शाळेत जायला हवं होतं पण झालं भलतचं.
“आई, तू फार दुष्ट आहेस. You don't care.  You don't understand anything.”
हे नेहाचे गाडीतून उतरताना बोललेले शब्द माझ्या हृदयात अणकुचीदार शस्त्रा सारखे घुसले आहेत. क्षणभर आपण केलं ते बरोबर का चूक हा प्रश्न माझ्या मनात निर्माण करून गेले आहेत. मी खरच फार strict parent आहे का? मी ही परिस्थिती वेगळ्या प्रकारे हाताळली असती तर ती एवढी रागावली असती  का? माझे काही चुकलं का? आज मी तिला गॅदरींग साठी आणलेला नवा ड्रेस घालू दिला नव्हता म्हणून ती माझ्यावर रागावली होती. ओरडली, रडली पण मी बधले नाही.  आज मी तिला नवा ड्रेस घालू दिला नाही कारण ती घरातील एक नाही तर दोन वडीलधाऱ्या व्यक्तींना वेडेवाकडे बोलली आहे.
       रमाबाई आमच्या घरी गेली ४० वर्षे भांडी घासायला व धुणे धुवायला आहेत. स्वतःचे सर्व आयुष्य त्यांनी आमच्यासाठी श्रम करण्यात घालवले आहे. कामाची बाई न राहता त्यांनी घरातील वयस्क व्यक्तीचा मान त्यांच्या कष्टाने, श्रमाने व आमच्याबद्दल त्यांना असणाऱ्या आपुलकीने  मिळवला आहे. त्यांच्यावर विश्वासाने घर टाकून आम्ही अगणित गोष्टी केल्या आहेत. माझी मुलं तान्ही असताना त्या रात्र रात्र जागल्या आहेत. अशा घरातील वयस्क व सन्माननीय व्यक्तीला माझी लेक वेडवाकडं बोलली कारण गॅदरिंगचा ड्रेस रमाबाईंच्या हातून बरोबर टाचला गेला नव्हता. त्यांनी टाचल्यावरही तो ड्रेस तिला सैल झाला होता. मी तिचा आरडा ओरडा आणि तिने रमाबाईंना ऐकवलेली वाक्ये ऐकताच मी तिला थांबवले. त्यांना “मी चुकले” म्हणून सांग व नमस्कार कर म्हटल्यावर ती माझ्यावर ओरडली. खोलीत ताडताड निघून गेली दार धाडदिशी आपटून लावून खोलीत बसून राहिली. जोपर्यंत ती रमाबाईंची माफी मागत नाही तोपर्यंत ती नवा ड्रेस घालू शकणार नाही असे मी तिला सांगितले आहे.
"माफी मागण्यासारखे मी काहीही केले नाही. त्यांना कालपासून ड्रेस तयार करून ठेवा म्हणून सांगितले होते." असे नेहाचे मत आहे.
तिच्या तेरा वर्षीय मनाचा अहंकार माझ्यावरच्या प्रेम आणि विश्वासापेक्षा मोठा आहे. माफी मागण्यात तिला कमीपणा वाटत आहे. तिचा अपमान झाला आहे.
मी तिची आई आहे म्हणूनच मला तेरा वर्षाच्या मुलीला गॅदरिंगचा नवा ड्रेस घालायचा नाही सांगताना अनंत यातना झाल्या आहेत. 
मी तिची आई आहे म्हणूनच मी तिला वडीलधाऱ्यांच्या आदर करणे शिकवत आहे.
मी तिची आई आहे म्हणूनच तिचा “नोकराला ओरडले तर एवढे काय चुकले” हा विचार मला मान्य नाही.  
मी तिची आई आहे म्हणूनच मी तिला परमेश्वराने आपल्याला दिलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ रहायला शिकवते आहे.
मी तिची आई आहे म्हणूनच ती सभ्य, समंजस व विचारी घडावी हा माझा प्रयत्न आहे.
मी तिची आई आहे म्हणूनच तिला रडताना बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे.
मी तिची आई आहे आणि हे जग सोडून जाताना मला एक सुसंस्कारित व उत्तम व्यक्ती मागे ठेऊन जायचे आहे. 
आत्ता जरी ती रडत, रागावत, मला नावं ठेवत शाळेत गेली असली तरी तिला उद्या समजणार आहे..सोने तावून सुलाखून निघाल्याशिवाय शुद्ध होत नाही. मुल अशा अनुभवातून गेल्याशिवाय एक उत्तम, सभ्य, समंजस व्यक्ती निर्माण होत नाही.
मी तिची आई आहे म्हणूनच मी चुकलेले नाही याची मला खात्री आहे.
ज्या दिवसापासून त्या पाळण्याची दोरी माझ्या हातात आली त्या दिवसापासून हे शिल्प माझ्या परीने उत्तम घडवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ते घडवताना कधीतरी कठोर व्हावे लागणार आहे. 
कारण एक दिवस मी फक्त संस्कार रूपाने तिच्या बरोबर असणार आहे!

©® ज्योती रानडे

562. समयसूचकता

आमच्या बिल्डींगमध्ये मध्यंतरी एक कुटुंब राहायला आलं.... 
होतं तसं रेग्युलर मध्यम वर्गीयच. 
पण त्यांचा असा समज होता की, आपण मध्यमवर्गीयांपेक्षा थोडे उच्च कुळातले आहोत....
त्यातल्या त्यात नवरा जो होता, अघळपघळ आणि अस्ताव्यस्त होता, पण नाईलाजाने त्याला सिक्स पॅकेट बर्मुडा आणि जर्सी वगैरे घालून फिरावं लागे. ...
बायकोचं स्टेटस सांभाळायचं म्हटलं, तर इतकं तर अपेक्षित होतंच.
त्यातल्या त्यात बायको भिशीला वगैरे गेली की, हा टॉवेल गुंडाळून बनियन वर दोनेक तास मनासारखं जगून घ्यायचा....
पुन्हा बायको घरी यायची वेळ झाली की, जर्सी बर्मुडा घालून रेडी. ...
वहिनींचा वापर अगदी टापटीप. नवऱ्याला बर्मुडा सुद्धा रोज घडी करून कपाटात ठेवावा लागे. 
सर्वात महत्वाचं म्हणजे, वहिनींची समयसूचकता. 
दैवी वरदानच म्हटलं पाहिजे. कुठल्या ही घटनेचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, हे त्यांना दिव्य दृष्टीने आधीच कळायचे. ...
एक दिवस त्यांच्याकडे एक गेटटूगेदर अरेंज केलं होतं. नुसता बाळबोध वरण -भात -भाजी -पोळी चा बेत केला असता तर इमेज ला धक्का लागला असता. 
मग वहिनींनी युट्यूब वर एक नॉव्हेल आयटम शोधला. "पनीर पिझ्झा विथ बेबी मशरूम टॉपींग्ज.."
बाकीचं साहित्य वहिनींनी स्वतः बाजारांत जाऊन 
हायजेनिक असल्याची खात्री करून आणलं. 
पण बेबी मशरूम त्यांच्या एरियात मिळाले नाहीत.
नवऱ्याला आणायला सांगितलं. नेमकी त्यादिवशी कुठलीतरी क्रिकेट ची फायनल मॅच होती.
नवरा सकाळपासून बिना दाढी-आंघोळीचा मॅच पाहत पसरला होता. विराट कोहलीची बॅटींग सोडून बेबी मशरूम आणायसाठी बाहेर पडण्या इतका बावळट तो नक्कीच नव्हता. 
त्याने बायकोला अफलातून आयडीया दिली.
"अगं, आपल्या मागच्या सर्व्हिस लाईन मध्ये बघ. 
शेकडो डॅडी मशरूम उगवले आहेत. ते घेऊन ये.
मी वाटलंच तर डॅडीचे बेबी करून देतो बसल्याबसल्या मॅच बघत." 
"अहो, पण मी ऐकलंय, ते विषारी असतात म्हणून.." बायकोनं आपलं मेडिकल ज्ञान पाजळलं..
"अगं, मी सुद्धा बारावीपर्यंत बॉटनी शिकलो आहे. 
कांही विषारी-बिषारी नसतात ते. 
शिवाय गावरान गोडवा असतो त्यात.." 
नवऱ्यानं टाईमपास उत्तर दिलं आणि पुन्हा मॅचमध्ये रमला..
बायकोला नाईलाजानं पटलं, 
पण समयसूचकता आडवी आली...
"हे मशरूम विषारी असले तर??" 
पण वहिनींजवळ उत्तर नाही असा प्रश्न अजून तरी जन्माला आला नव्हता. ...
त्यांनी लगेच विषाची परीक्षा पाहायचा निर्णय घेतला.
सर्व्हिस लाईन मधून डॅडी मशरूम घेऊन आल्या आणि नवऱ्याच्या चोरून दोन तीन मशरूम दारांत बांधलेल्या टीप्याला खाऊ घातले. टीप्यानं शिवाम्बु प्यायल्यासारखा वेडावाकडा चेहरा केला.. पण लगेच फ्रेश झाला.
स्वयंपाकाला तीन तास अवकाश होता. 
नवरा मॅच पाहत होताच. 
बायको टीप्याला प्रेमाने पाहत होती. 
मधूनच ती टीप्याच्या पाठीवरून हात फिरवायची. 
टीप्या आनंदाने उड्या मारत मालकीणशी मस्त्या करायचा. 
नवऱ्याने विकेट गेल्यावर टाळ्या वाजवल्या, की बायको सुद्धा, "टीप्या अजून आहे!!" या आनंदात टाळ्या वाजवायची...
तीन तास उलटले. मॅच संपली. टीप्या नाचत बागडत मैत्रिणीला भेटायला बागेत गेला....
मित्र मंडळी आली. पनीर पिझ्झा विथ मशरूम टॉपींग्ज सर्वांनी भरपूर हादडला. 
जेवणं आटोपली.
इतक्यांत..
वहिनींचा पाच वर्षीय मुलगा हमसून हमसून रडत घरी आला....
"आई, आपला टीप्या देवबाप्पाच्या घरी गेला.. तो..."
वहिनींनी समयसुचकपणे मुलाचं तोंड दाबलं. 
आणि.... मटकन खाली बसल्या.
पण वहिनींजवळ उत्तर नाही असा प्रश्न अजून तरी जन्माला आला नव्हता....
त्यांनी फटाफट निर्णय घ्यायला सुरुवात केली....
वीस माणसं म्हणजे किमान दोन अँब्युलन्स. 
डॉक्टरशी बोलून वीस रूम्स बुक केल्या.
फूड पॉईझनिंग ची केस असल्याची कल्पना देऊन ठेवली. डॉक्टर फटाफट तयारीला लागले. 
पंचवीस तीस एरंडेल तेलाच्या बाटल्या आणि एनिमा चे सेट तयार केले.
पाहुण्यांना सोप सुपारी न देताच भराभर अँब्युलन्स मध्ये कोंबण्यात आलं.
तृप्तीचा ढेकर द्यायच्या आतच त्यांना एरंडेल पाजून ढेकर दाबून टाकण्यात आले...
इमर्जन्सी केसेस म्हणून त्यांना एनिमा देऊन खाल्लेलं सगळं बाहेर काढण्यात आलं....
पाहुणे कन्फ्युज होते. 
शेजारच्या खाटेवर झोपलेल्या मित्राला.....
"हे काय सुरु आहे?" असं विचारत होते....
खाटेवरचा मित्र रिकाम्या पोटाने फक्त आकाशात बोट दाखवायचा.
दोन तास हीच धावपळ सुरू होती. 
हॉस्पिटलचं बिल चाळीस हजार झालं होतं.
वहिनी बिल द्यायला काउंटरवर उभ्याच होत्या.
इतक्यांत त्यांचा मुलगा त्यांना मागून बिलगला..
रडणं थोडं कमी झालं होतं. तो आईला सांगायला लागला....
"आई, तू किती दयाळू आहेस.. 
किती काळजी करतेस आपल्या पाहुण्यांची....
जग मात्र फार दुष्ट आहे बघ.....
आपल्या टीप्याला ज्या मोटारीनं चिरडलं, 
तिचा मालक गाडी न थांबवता पळून गेला...
देवबाप्पा त्याला नक्की उकळत्या तेलाच्या कढईत टाकील. तू फक्त बघतच रहा....."
आणि वहिनी...
खरोखर नुसत्या वेड्यासारख्या बघतच राहिल्या...

© Prakash Gosavi

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

563. ऋतू रंग

      आपण जर आंबे पेरले तर त्याला कधीच फणस येणार नाहीत. आपण जी जी कृती करतो त्याचं फळ आपल्याला फिरुन दुप्पट तिप्पट प्रमाणात परत मिळतं.आपले वरीष्ठ आपल्याला नेहमीच सांगतात कायम शुभ बोलावं चांगलं वागावं. पण अस का??? इथं कर्माचा सिद्धांत मला सांगावासा वाटतो. आपण जे जे कर्म करतो मग ते चांगले अथवा वाईट त्याचे फळ हे आपल्याला मिळतेच. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे. 
"मन से कोई बात छुपे ना.... 
  मन के नैन हजार.... 
 तोरा मन दरपन कहेलाये.... "
एखादेवेळी  आपण जगाला फसवू शकू पण आपण आपल्या अंतरात्म्याला नाही फसवू शकत. अगदी साधं उदाहरण घ्यायचे झालं तर आपण एखाद्यावर प्रचंड प्रेम करतो.... त्याची सर्वातपरी काळजी घेतो .... पण ते कधीचं दर्शवत नाही. पण ती नाजुकशी भावना आपण स्वतः पासूनच नव्हे तर त्या व्यक्तीपासून ही कितीही प्रयत्न केला तरी लपवू शकत नाही. 
         आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही स्वार्थासाठीच करायची नसते. आपण एखाद्याला त्याच्याबद्दल कुठलीही माहिती नसताना बेफाटपणे बेलगाम बोलत सुटतो. विचारला नसताना ही फुकट सल्ले देतो.यात प्रथमतः आपले पर्यायाने आपल्या मात्यापित्यांचे आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे असे घराण्याचे संस्कार काढले जातातच शिवाय दुखावलेली ती व्यक्ती आपल्याला मनातून शाप देते त्याला "हाय लागणं " असंही म्हणतात. आणि तुम्ही मान्य करा अगर नका करू पण एखाद्याची लागलेली हाय आपला जन्मोजन्मी पाठलाग करते. तर कधी आपण कुणाचं अगदी कळत न कळत चांगलं केलं तरी त्याचीही दुवा आपल्याला आपल्या वाईट काळात तरून नेते. म्हणून म्हणते तुम्हाला कुणाचं चांगलं करता नाही आलं तर नका करू पण कुणाचं वाईट तर स्वप्नात ही करु नका. कारण तुम्हाला जाणीव ही नसते पण श्वासागणीक आपल्या पापपुण्यांचा हिशोब त्या चित्रगुप्ताच्या वहीत टिपून ठेवला जात असतो.           शरीर बदललं तरी आत्मा तोच असतो त्याची वृत्ती त्याच्या इच्छा आकांक्षा त्याच असतात. कालानुरुप त्या थोड्या बहुत प्रमाणात अनुभवाने बदलतात इतकचं त्या आत्म्यास एक परिपक्वता येते ही, जशी ओली माती हळू हळू सुबक मूर्तीत रूपांतरीत होते,तसा वृत्तीत आचारविचारात फरक पडतो आणि मग कुकर्मांकडून सुकर्मांकडे वाटचाल सुरु होते. म्हणूनच कित्येकदा वाईटाचा जय होतो आणि सीतेला धरणी मातेचाचं आसरा घ्यावा लागतो तिथे आपल्या सारख्या सामान्यांची काय व्यथा?  पण केलेली कुकर्मे आपली पाठ सोडत नाहीत. वळणा वळणांवर मिळालेले शाप आपला पिच्छा पुरवला असतात आणि मग त्याचीच परिणीती म्हणून कृष्णा सारखा दैवी अंश तर पोटी जन्माला येतो परंतू आयुष्यभर कारावास भोगावा लागतो तोही आपल्या भावाकडून.पण अंधाराला कायम प्रकाशाची भिती असतेच म्हणूनचं कुणीही कितीही यत्न केला तरी आपण आपला सन्मार्ग सोडू नये कारण आपण चांगले आहोत.      
           ज्या प्रमाणे रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल दडलेला असतोच त्या समान दुःखांचा अंत होऊन सुखाची वाट नक्कीच सापडते आणि जरी तसे झाले नाही तरी पुंण्याचे हे गाठोडे आपण जेव्हा देहरूपी वस्त्र बदलू तेव्हा आपल्या सोबतच येणार त्यामुळे  साम दाम दंड आणि भेद करण्याऐवजी तुम्ही सचोटीने आपले कर्म करत रहा कारण भले त्या जगज्जेत्याच्या लाठीत आवाज नसतो पण ती जेव्हा पडते तेव्हा भल्याभल्यांची बोबडी वळते. तसेच जेव्हा तो करूणाकर आपल्यावर कृपेची बरसात करतो तेव्हा "घेशील किती करांनी" अशी अवस्था होते हे लक्षात ठेवा.
 
ऋतू

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

561. एक अप्रत्रिम स्फुट

       तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात, जिच्या चपलेचा सोडल् एसयास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते, पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं, आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, 'झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, मुंबैहून यष्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी ? असं म्हणायची.  मला कायम प्रश्न पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते ? तिला विचारलं तर ती धपाटा घालून म्हणाली होती, 'रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेंव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नावं माझं मेलीचं होतं'. आता यातलं कुणीही नाही. काय एकेक आठवणी असतात बघा, आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी. वेडेपणा नुसता सगळा. काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की ती दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची.  आजोबा जानव्याची किल्ली दाखवून लपवलेल्या खाऊची, गमतींची लालूच दाखवायचे आणि खुणेने म्हणायचे, 'ये इकडे, तिचं संपायचं नाही'. सात दिवस हा हा म्हणता सरायचे.  विसर्जनाला जाताना आजी आजोबा नि:शब्द रडायचे. लहानपणी वाटायचं त्यात काय रडण्यासारखं आहे, आता कळतं. 
           आपलाही काळ आता सरत चाललाय, एक दिवस आपल्यावर हीच वेळ, असंच वाटत असावं का ?  आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, 'पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल हो तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या'. मग सगळे भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे. लहानपणी कळायचं नाही एवढं पण तेंव्हाही नदीवरून परत येताना काहीतरी हरवल्यासारखं, विसरून आल्यासारखं वाटायचं. दुसऱ्या दिवशी निघताना आज्जी तोंडावरून हात फिरवायची आणि बोळक्या तोंडानी आवाज करत पापी घ्यायची.आमच्या निघायच्या वेळेला आजोबा उगाच लक्षात नसल्यासारखं अंगणात कामं करत रहायचे. आम्हांला सोडायला पुलावर यायचे गड्यासोबत आणि गाडी सुटली की नदीवरून परत चालल्यासारखे हळू हळू परत जायचे. घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करून सुद्धा खूप काळ लोटलाय आता. त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं. आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्याशिवाय. आता उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं.आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही. माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता. पाटावर बसून मीही तयार आहे. पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. देवाला सुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही, तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा!  प्रत्येकाची 'अनंत चतुर्दशी' ठरलेली आहे. ''कधी''? एवढाच काय तो जीवघेणा प्रश्नं.  चला, आता एकूणच सगळं घाईनी आवरायला हवंय नाहीतर विनायकराव उखडायचे उगाच. जवळ आलेल्या चतुर्दशीला नजरेआड करून, नव्हे तिच्या आगमनाची चाहूल टाळून चतुर्थीचा आभास निर्माण करणाऱ्या, आणि स्वतः "अनंत" असल्याची दिशाभूल करून घेणाऱ्या माझ्या पिढीला समर्पित..

560. सहन कर पण मर्यादेपर्यंत

" सोबत कोण आले मॅडम तुमच्या?..." ...लहान मुलाला प्रश्न विचारावा तसे मला डॉक्टर नी विचारले..
" Husband आलेत...मुलांना घेऊन बाहेर थांबले आहेत...."...मी उत्तरले
" त्यांना बोलावून घ्या...मला बोलायचे आहे त्यांच्याशी...."... त्यांनी सांगितले.. आणि  मी थोडे गोंधळून त्यांच्याकडे गेले...कारण मी तेवढी mature होते की ते काय असेल तर मला सांगू शकतात...म्हणून मनात धाकधूक वाढली, की असे काय झाले मला की डॉक्टरांना माझ्या नवऱ्याशी बोलायचे आहे.... एवढा मोठा आजार झाला की काय मला? या विचाराने चिंतित झाले मी..
    मी त्यांना "मला सांगा" असे बोलले....कारण माझ्यामते काही serious असेल तर माझ्या नवर्याला टेन्शन नको....म्हणून मी request केली. पण तरीही त्यांनी मला सांगण्यास नकार दिला त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना मी  call करून बोलावून घेतले. तर  घडले असे होते....गेला एक महिना माझा उजवा गुडघा ,उजवा खांदा आणि डाव्या हाताची तर्जनी दुखत होती....मी सर्व अंगावर काढले....तसे पण मला तेवढा वेळ खरच नव्हता की मी डॉक्टर कडे जाईन....आणि सुट्टी दिवशी मुलांना घेऊन जाण्याचे टेन्शन....त्यामुळे मी सहन केले...त्यातूनच जॉब,मुल, घर सर्व पाहत होते.       पण गेले दोन दिवस husband आले...त्यांनी माझी अवस्था पाहून मला आज दवाखान्यात घेऊन गेले होते... actually मला चालायला पण त्रास होत होता...पाय वाकवता येत नव्हता....मी मुद्दामून त्यांना मुलांना घेऊन बाहेर जायला सांगितले.....आणि मी एकटीच आत गेले.... पण डॉक्टर पण ऐकायला तयार नाही मग शेवटी ते मुलांना सोबत घेऊन आत आले.
" अच्छा हे कारण आहे तर मॅडम च्या आजाराचे....ही मुलं सांभाळावी लागतात वाटत...."... Husband जसे आले तसे पटकन ते उद्गारले...त्यावर मी उसने हसले....
" हा तर,मला एक सांगा...मॅडम किती टेन्शन घेतात..."... त्यांनी माझ्या नवऱ्याला प्रश्न केला..तसे आम्ही दोघे एकमेकांना पाहू लागलो....
खरतर या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे ही संभ्रमावस्था होती...कारण वरवर पाहता मला कसलेच टेन्शन नव्हते....नवरा बिचारा एकदम छान आहे...आणि सासर चे पण काही tetion नाही....त्यामुळे मी तर एकदम बिनधास्त बोलले...
"नाही हो कसले टेन्शन."...त्याच वेळी same उत्तर माझ्या husband नी दिले....आणि डॉक्टर हसू लागले....
आम्हाला काहीच कळेना...असे काय वागतात हे डॉक्टर असा विचार येऊन गेला माझ्या मनात.पण मी चेहऱ्यावर काहीच दाखवले नाही.....
"नक्की हाडाचे डॉक्टर आहेत ना?.. की मनाचे मी मनाला प्रश्न केला
"मॅडम ना tetion आहे....तुम्ही लाख म्हणा....पण त्यांना मानसिक आणि शारीरिक आरामाची खूप गरज आहे....."...ते हसून बोलले...आणि मला आश्चर्य वाटले...
" नाही हो डॉक्टर....खरच मला कसले टेन्शन नाही..."..मी माझी हार मानायला तयार नव्हते...
वास्तविक पाहता मला दिसताना कसलेच टेन्शन नव्हते....त्यामुळे मी पण एवढ्या ठामपणे सांगत होते....
" कसं आहे ना मॅडम...हल्ली मानसिक ताण इतका नॉर्मल झाला आहे की, तो आपल्याला आहे याचे देखील भान नसते ..... आपण हल्ली त्याशिवाय जगूच नाही असे म्हणायला हरकत नाही.....तसे तुमच्यासोबत तुम्ही रोज वाहत आहात तो मानसिक ताण...."... डॉक्टरांच्या बोलण्याने आम्ही दोघेही भारावलो...खरच का मी टेन्शन खाली वावरते?. असा विचार डोकावून गेला माझ्या मनात.....
       "तुम्ही म्हणता ते खरे असेलही पण मला तसे काहीच नाही.... हा मी मान्य करते ,की मला शारीरिक त्रास खूप आहे...दगदग धावपळ खूप असते माझी रोज... पण या मुलांमधून,नोकरीतून सर्व जबाबदारीतून वेळ मिळेल तसे मी स्वतःला द्यायचं पुरेपूर प्रयत्न करत असते....त्यामुळे मला स्वतःला वेळ नक्कीच देते मी..बदलीची काळजी आहे...पण तिची आशा आहे आता...त्यामुळे काहीच नाही मला मानसिक ताण..(माझ्या अहो कडे बोट दाखवून)यांनाही विचारा..."... मी माझा हेका सोडायला तयार नव्हते...त्यावरही ते उपहासात्मक हसले....
       " अहो मॅडम....शारीरिक त्रास सुरू झाला की आपोआप मानसिक ताण सुरू होतो....कारण आपण शरीराच्या  ,धावपळीतून सुटका कशी आणि कधी होईल याचा विचार करत रात्र घालवतो...कधी कधी या दुखण्याने आपल्याला झोप येत नाही....यामुळेच तर ताण निर्माण होतो ना....मी मान्य करतो, जर तुम्ही म्हणत असाल की काहीच कसलेच टेन्शन नाही तुम्हाला तर यापेक्षा माझ्यासाठी आनंदाची बाब नाही....असेच कायम रहा...कायम हसत....पण मला जाणवले तुम्हाला झोपेची,आरामाची, काळजी घेण्याची आणि टेन्शन कमी करण्याची जास्त गरज आहे...त्यामुळे मी तुमच्या husband ना बोलवायला सांगितले.... "... डॉक्टर शांतपणे समजावत बोलले...मला त्यांचे म्हणणे थोडेफार पटू लागले... आणि थोडी शांत झाले...
" कसे असते ना, स्त्री ही आपल्या वेदना लपवत असते... आता मी फक्त मॅडम ना सांगितले असते तर बाहेर जाऊन तुम्हाला त्यांनी काहीच सांगितले नसते....त्यांनी सर्व मनातच दाबून ठेवले असते.... पण एक जीवनसाथी म्हणून तुम्हाला ही या गोष्टी समजणे आवश्यक आहे....तुम्ही दोघे मिळून यावर उपाय शोधून काढा....जेव्हा मानसिक,शारीरिक ताण कमी होईल,झोप पूर्ण होईल तेव्हाच त्या ठीक होतील...आणि या ठीक राहिल्या तर मुलं चांगली राहतील....नाहीतर याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो....त्यामुळे मी दिलेल्या गोळ्या घेऊन दुखणे कमी होईल पण यावर खरा उपाय तुमचा स्वतः साठी वेळ देणे होय.... आराम करत जा वेळ मिळेल तसा....".... त्यांनी माझ्या नवऱ्याला खूप छान शब्दात समजावून सांगितले आणि मीही प्रभावित झाले त्यांच्या विचाराने.....एक orthopedic असूनही त्यांनी एका मानसोपचार तज्ज्ञ सारखे माझे मन जाणले होते.... धन्य ते डॉक्टर...
    पण तिथून माझ्या विचारांचे चक्र फिरले....मी थोडी मागे वळून पाहू लागले....माझा दिनक्रम,माझे काम,माझी दगदग,माझे जेवण,माझी विश्रांती.... सगळे सगळे....आणि मीही अचंबित झाले....मी एकट्या जीवावर काय काय करत होते...आणि आहे....मी नोकरी, मुलं, त्यांचे मूड,त्यांच्या इच्छा...आयुष्यात होणाऱ्या इतर गोष्टी....सगळे एकटी सांभाळते...आणि यात मी स्वतः कडे दुर्लक्ष केले.....मुलगा झोपला नाही की रात्र जागायची आणि सकाळी उठून पुन्हा कामाची सायकल सुरू....     बापरे...खरच मी शारीरिक त्रास सोबत मानसिक ताण घेऊन फिरते....होणारी चिडचिड.... डोकेदुखी..... अंगदुखी...... कधीतरी ताप येऊन गेलेला पण समजत नाही.... कामावर कधी कधी मेंगळणे...थकवा....या सर्व गोष्टी मी कशा लक्षात घेतले नाही?... याचे आश्चर्य वाटले मला....      एक स्त्री म्हणून येणारे ते दुखरे चार दिवस....कधी matter च नाही केले ....कसं काय?.. आणि केले असले तरी मी सहन केले....     अजुन काय काय सहन केले असेल मी?... विचारच नाही करवत....आठवत पण नाही.....पण आज माझे मला guilt वाटले....की मी माझ्या शरीरावर किती अन्याय करते.... माझ्या मनावर दगड ठेवून.... माझ्या भावनांना,इच्छांना मुरड घालून.....सर्व सहन करून....याचा पश्र्चाताप झाला मला....खरच एक स्त्री म्हणून किती काय करत असतो आपण....पण त्यात जास्तीत जास्त सहन करत असतो....ज्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते....पुरुष पण करतात यात काडीमात्र शंका नाही...पण जेव्हा एखादी स्त्री सहन करते त्याला मर्यादा नसतात....ती जन्माला आल्यापासून सहन करत असते....
काहीलोक मला असे भेटले...."डबा धुतला ना की बायकांना काय काम राहत नाही...त्यामुळे घरी न धुता न्यायचा डबा...."...असे एकजण म्हणाले मला
" काही काय? इथून तुम्ही धुवून नेला म्हणून ती काय धुवायची राहणार आहे का?... ती पुन्हा साबण लावून धूनार...काहीपण विचार करता तुम्ही पुरुष लोक...ती तिचे काम बरोबर करते...तुम्हाला वाटते असे...".... मी उत्तरले...
" अहो...खरच मॅडम...आमच्या बायकांना काय काम असते...नुसत्या झोपत असतात घरात...तुम्ही नोकरी करून करता hats off to you....नाहीतर आमच्या बायका......"...लगेच एकजण उत्तरला....मला त्या कौतूकाचा राग आला....का कुणास ठाऊक.....
" खर आहे sir.... घरात काहीच तर काम नसते....सकाळी उठल्यापासून नुसत्या झोपत असतात 
त्या ...म्हणून तर हा डबा मिळाला तुम्हाला हातात...नाही का?..ती झोपा काढते म्हणून तर आज मुलं तुम्हाला होम वर्क साठी त्रास देत नाहीत....parents meeting साठी तुम्हाला जावे लागत नाही....तुम्हाला इत्रीचे कपडे ज्या त्या ठिकाणी उपलब्ध होते...हो ना..."... मला राग आला आणि मी थोड्या चढ्या आवाजात बोलले...तर ते सर कुत्सित हसले आणि निघून गेले....
पण मला आज सांगावेसे वाटते...कुणासाठी जगताना आपल्यासाठी पण जगा....मी आज तो विचार करते... आजवर मला वाटायचे मी स्वतःला वेळ नक्की देते....या लिखाणातून आनंद मिळतो मला...पण नाही यामुळे अजुनच मानसिक ताण निर्माण होतो....कोणता?
अपेक्षांचे ओझे....खूप भयानक ....यात मी स्वतःला असे झोकून दिले होते ,की यामुळे माझी झोप अपूर्ण होत राहिली.... प्रत्येकाच्या इच्छेचा विचार करू लागले..आणि स्वतःच्या शरीराची मागणी विसरले....त्याला विश्रांती हवी होती ती देऊ नाही शकले....आणि पूर्वी निरोगी असणाऱ्या माझ्या शरीराला व्याधींनी ग्रस्त गेले....माझे वयच ते काय?.. आणि या वयात काय काय करते मी? आणि कुणासाठी?.. स्वतःसाठी? नाही... मुलांसाठी..... माझ्या कुटुंबासाठी....पण जर डॉक्टर म्हणाले तसे ,मीच नाही राहिले तर?...या घराला, कुटुंबाला कुणाचा आधार?.. आईचे छत्र हरपले तर ते कितीही जुळावले तरी गळतेच....त्यात पूर्वी सारखी माया,प्रेम नाही राहत.... मला एकाने खूप छान सांगितले....एकवेळ कारवाई झाली तरी चालेल....पण तू गाडी सावकाश चालव...नाहीतर लवकर निघत जा...एखादे काम राहू दे...खरच मोलाचा उपदेश आणि तो मी पाळतेच...तुम्ही पण पाळा..     मला एवढेच सांगायचे होते...स्त्री जीवन खूप कठीण आणि सहनशीलतेची कसोटी असते....सहन करा पण मर्यादेपर्यंत.....त्या नंतर उठा....स्वतःच्या मनाची,शरीराची साद ऐका...आणि मस्त रहा....जेवढे जमेल तेवढेच करा..त्यातून आपल्यासाठी वेळ काढा....नोकरी,घर हे गरजेचे आहे...आज जगण्यासाठी पैसा नक्कीच गरजेचं आहे.....पण मर्यादित..पैसा जसे सुख देतो..त्यापेक्षा जास्त दुःख देतो....म्हणून नोकरी सोडून घरी बसा असे मी अजिबात म्हणणार नाही...एकाला दोघांनी हातभार लावणे गरजेचे असते...कधी काय प्रसंग येईल सांगता येत नाही.... जर पैसा कमावणारा नवरा नाही राहिला तर आपले घर कशावर चालणार...त्यासाठी स्त्रीने पण कमावते असले पाहिजे...हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे त्यावरून बोलते...स्त्रीने कमावते असले पाहिजे....हातात काहीतरी कौशल्य असावेच...हल्ली पैसा आहे तर सर्व आहे हेही तितकेच खरे आहे.....त्यामुळे सर्व करता करता आपल्या आवडी निवडी जपा...पण त्यात आपला आराम हरवू नका.. माझ्या सारखा....
      मी बघा... काल पोस्ट लिहायला घेतली होती....आज पूर्ण करते....निवांत राहते सध्या...काय करणार.... तन हैं तो मन हैं... मन हैं तो धन हैं....और धन हैं तो सब हैं...शेवटचे वाक्य सगळ्यांना पटेल असे नाही... I know...प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत..माझा खरा अनुभव मी share केला..... जो मला काल आला......त्या डॉक्टरांचे मी शतशः आभार मानते..माझे डोळे उघडण्यासाठी.तिथे मानलेच पण इथेही.
काळजी घ्या...मस्त रहा....खुश रहा....
जीवनात नाती नक्कीच महत्वाची
त्यातील पहिले नाते असावे स्वतःशी
जप सर्व नाती तू, जीव ओवाळूनी
पण तुझे नाते स्वतःशी,घट्ट कर आराम करूनी
तू आहेस तर सर्व नाती आहेत सखी
तुझ्याविना ग राणी, सर्व नाती राहतील सुखी
कर विचार तू जरा,मनाची साद घाल
शरीराला दे विश्रांती, मग निवांत कर धावाधाव

559. आयुष्याची वजाबाकी...

 सहचारिणी असता सोबत....तोपर्यंत "तो" राजा असतो....साथ सुटता तीची "तो" आयुष्यातुन वजा होतो....
1) जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही. आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही. कधी कधी एखादा आजार हा औषधाने बरा होत नाही. तर एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधाराने बरा होतो म्हणून शब्दाला धार नाही तर आधार हवा...!
2) कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे माणूसकी, नम्रता आणि चारित्र्य. म्हणून पैशा पेक्षा जीवाभावाची जीवलग माणसं जोडा आणि जपा. हीच खरी आपली संपत्ती आहे...!
3) ज्याला दु:खाची जाणीव असते, त्याला सुखाची किंमतही असते, म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हतारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुध्दा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. आपल्या माणसासाठी...!
4) आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल. आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाही तर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोकं खूप सराईत आहेत..! स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपले होईल. अपयश असे स्वीकारा की विजेता भारावून जाईल. माणुस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल..!
5) कधीही कुणाला द्यायचाच असेल तर तूमचा वेळ द्या. कारण इतर वस्तू रागात परत केल्या जातात, पण दिलेला चांगला वेळ हा कायमच्या अप्रतीम आठवणी देवून जातो. त्या फेकल्या ही जात नाहीत आणि वाया ही जात नाहीत. पडत्या काळात दिलेली सोबत ही मोठमोठे घाव ही सहज भरुन काढते...!
6) दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे...!
7) एक माणुस वीस-पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही.. पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करु शकतो..!
8) थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणूनच शरीर थकले तरी चालेल, परंतू मनाला कधीही थकू देऊ नका! कितीही कमावून ठेवले, तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते. आपल्या कर्माने साठवलेले पुण्य..!
9) माणूस मातीचा आहे की जातीचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो, हे महत्त्वाचं आहे त्याच प्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे.!
10) दुसर्‍याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. आयुष्यात काही 'सोडून' द्यायचं असेल तर, समोरच्याकडून 'अपेक्षा' करणं सोडून द्या. कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते...!                       
माझ्या समाजातील आपुलकीच्या व जिवाभावाच्या खास  माणसांसाठी समर्पित...!

558. जगण्याची उमेद.!

 भुलीचं इंजेक्शन देऊन मी हातात ब्लेड घेतलं तेव्हा तो म्हणाला, "डॉक्टर, फी कमी करा की थोडी!"
"आधीच एवढी कमी सांगितलीय त्यात आणखी कमी?"
"हो!... आणखी थोडी कमी!"
"म्हणजे किती कमी?"
"वीस टक्के कमी."
"चालेल, तू म्हणशील तसं!... बाय द वे, काय करतोस तू?"
"इंजिनिअरिंगला आहे, तिसऱ्या वर्षाला."
"कुठल्या कॉलेजात?" त्यानं कॉलेजचं नाव सांगितलं.
मी आता माझं काम सुरू केलं होतं. त्याच्या पायावर ब्लेडनं मी एक  छेद घेतला तोपर्यंत त्याचा प्रश्न, "डॉक्टर, ते अमके अमके साहेब तुमच्या ओळखीचे आहेत ना हो?"
"हो आहेत की!.... अगदी जवळचं रिलेशन आहे आमचं."
"तरच..  ते नेहमी तुमच्याविषयी बोलत असतात..आजही त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलंय."
"पण तुझी आणि त्यांची कशी काय ओळख?"
"माझी आई त्यांच्या घरी गेली आठ वर्षे स्वयंपाकाचं काम करते...आणि रोज सकाळी मीही त्यांचा बंगला साफ करायला जात असतो."
"पण तू कॉलेजला आहेस ना?"
"सकाळी लवकर त्यांचा बंगला झाडतो आणि मग कॉलेजला जातो."
"भारी आहेस की!" मी त्याच्या पायातली गाठ काढता काढता म्हटलं.
"सुट्टीदिवशी लग्नात वाढप्याचं काम करायलाही जातो मी.... कधी कधी नवऱ्या मुलीचा मेणाही उचलतो!"
"काय सांगतोस?"
"हो तर!... तेवढेच चारपाचशे रुपये सुटतात."
"आणि तिथं कॉलेजमधली एखादी मुलगी भेटली तर?" मी डोळा मारत त्याला विचारलं.
"भेटली होती मागच्याच रविवारी." तो हसला.
"मग रे? लाज वाटली असेल की तुला!
"छे छे! मीच तिला 'तुझ्या लग्नातही डोली उचलायला मलाच बोलाव गं!' म्हणून मोठ्यांदा आवाज दिला तर तीच लाजली."
"ग्रेट आहेस गड्या तू!"
"काम करायला काय लाजायचं सर?.... तुम्ही तर एवढे मोठे डॉक्टर असून आमच्या कसल्या कसल्या जखमा साफ करताच की!"
मी त्याच्या जखमेवर पट्टी बांधली. धनुर्वाताचं इंजेक्शन दिलं. "निघ आता. बाहेर गर्दी झालीय." सीसी टीव्ही बघत मी म्हटलं.
"डॉक्टर फी?"
मी फी सांगितली.
"निम्मीच?... मी तर तुम्हांला वीस टक्के कमी करायला सांगितली होती..."
"असूदे रे!... शिक्षण घेण्यासाठी तू एवढा धडपडतोयस तर तुझ्या धडपडीत माझ्याही धडपडीची थोडी भर."
असे प्रसंग रोज रोज येत नाहीत. ते असतातही छोटे. पण जगण्याची उमेद देऊन जातात.... आणि कामाचं समाधान.

557. क्षमा..

एका शेठजींनी आपल्या जावयास व्यवसायासाठी ३ लाख रुपये दिले होते. जावयाचा व्यापारात चांगला जम बसला. परंतु त्याने सासऱ्यांनी दिलेले ३ लाख परत केले नाही...
या गोष्टी वरुन दोघांमध्ये भांडण झाले. भांडण एवढं टोकाला पोहचले की दोघांनी एकमेकांकडे जाणे,बघणं एकदम बंद केले. घृणा व द्वेष हे आंतरीक संबंध खूप खोल असतात. शेठजी येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांकडे आपल्या जावयाची बदनामी करत.‌
शेठजी एक चांगले साधक होते. परंतु या गोष्टी मुळे त्यांच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला. ध्यान करताना त्यांना जावयाची चिंता लागून राहायची. मनावर चिंतेचा व्यर्थ ताण पडू लागला. त्यामुळे बेचैनी वाढून ते असमाधानी राहू लागले.
शेवटी ते एकदा गुरूंच्या भेटीला गेले आणि त्यांना आपली सर्व व्यथा सांगितली. 
गुरू त्याला म्हणाले की "मुला तू चिंता करू नकोस, परमेश्वर कृपेने सर्व ठिक होईल. तू काही फळे व मिठाई घेऊन जावया कडे जा आणि तो भेटताच एवढं बोल मुला माझं चुकलं,मला क्षमा कर..."
शेठजी म्हणाले, "गुरुदेव, मी त्याला मदत केली आणि मीच त्याची "क्षमा" पण मागू?"
गुरुदेवांनी नी उत्तर दिले, "कुटूंबात असा कोणताही संघर्ष नाही की ज्यात दोन्ही बाजूंनी चुका होत नाही.जरी एका बाजूने १% ची चूक असली तरी दुस-या बाजूला ती ९९% असते. परंतु चूक ही दोघांचीही असते."
हे ऐकल्यावर शेठजीला काही समजलं नाही. ते म्हणाले "गुरुदेव पण माझं काय चुकलं ?"
गुरुदेव म्हणाले "मुला तू मनातल्या मनात जावयाला वाईट समजलास ही तुझी पहिली चुक ...
तू त्याची प्रत्येकाकडे निंदा- नालस्ती करत होता ही तुझी दुसरी चूक...
रागीट नजरेने त्याला पहात राहिलास ही तुझी तिसरी चूक...
तसेच स्वतःच केलेली निंदा तू तुझ्या कानाने ऐकत राहिलास ही तुझी चौथी चूक...
तसेच जावयाप्रती तुझ्या हृदयात अति राग व तिरस्कार ठेवला ही तुझी शेवटची चूक ....
तुझ्या या चुकांमुळे तू जावयाला दु:ख तर दिलेस पण ते दु:ख किती तरी पटीने तुझ्याकडे फिरून आले. या तुझ्या चुकांमुळे तू त्याची "क्षमा" माग. नाही तर तुला शांतता लाभणार नाही. क्षमा मागणे ही खूप मोठी साधना आहे आणि तू तर एक चांगला साधक आहेस...."
हे सर्व ऐकून शेठजींचे डोळे उघडले. ते गुरुदेवांना नमस्कार करून जावयाच्या घरी गेले. तिथे सर्व लोक जेवणाच्या गडबडीत होते. शेठजींनी दरवाजा वाजवला. दरवाजा त्यांच्या नातवाने उघडला. आजोबांना बघून तो आश्चर्याने त्यांच्या कडे पहात आनंदाने ओरडू लागला. "आई,बाबा बघा कोण आलंय ते,आजोबा आले आहेत."
मुलीने व जावयाने दरवाजाकडे बघितले व विचार करु लागले की आपण स्वप्न तर पहात नाही ना? मुलगी आनंदी झाली. १५ वर्षांनी तिचे वडील घरी आले होते. ती त्यांना जाऊन भेटली. कंठ दाटून आल्याने काही बोलू शकली नाही. शेठजीने फळ व मिठाई टेबलावर ठेवली आणि दोन्ही हात जोडून जावयाला म्हणाले "मुला, सर्व चूक माझी आहे. मला क्षमा कर. "
"क्षमा" शब्द उच्चारताच त्यांच्या हृदयातून प्रेमाश्रु वाहू लागले. जावई त्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्या चुकीची रडून क्षमा मागू लागला. शेठजींचे अश्रू त्याच्या पाठीवर तर जावयाचे पश्चात्तापाचे व प्रेमाचे अश्रू त्यांच्या चरणांवर पडू लागले.
वडिल आपल्या मुलीची व मुलगी आपल्या वडिलांची क्षमा मागत होते. क्षमा व प्रेमाचा अथांग सागर फुटला. सर्व जण शांत,स्तब्ध,अश्रू भरीत अवस्थेत थोडा वेळ होते. जावई उठले व त्यांनी आतून सर्व रूपये आणून सासऱ्यांच्या समोर ठेवले.
सासरे त्याला म्हणाले "मुला, आज मी हे घ्यायला नाही आलो. मी माझी चुक सुधारण्यासाठी आलो होतो. माझ्या साधनेला जिवंत करण्यासाठी आणि मनातून द्वेषाचा नाश करण्यासाठी प्रेमाची गंगा वाहवण्या करीता आलो. माझं येणं सफल झाले. माझं दुःख मिटले. मला खूप आनंद झाला आहे."
जावई त्यांना बोलला बाबा तुम्ही जर हे पैसे नाही घेतले तर माझ्या हृदयातील आग विझणार नाही. कृपया तुम्ही हे पैसे ठेवा. शेठजींनी ते पैसे घेऊन आपल्या मर्जीने मुलीला व नातवांना वाटले. सर्व जण आनंदाने गाडीत बसून घरी आले...
१५ वर्षांनंतर त्या रात्री जेव्हा आई-मुलगी, भाऊ-बहीण, नणंद-वहिनी व सर्व मुले आपापसात भेटली तर जणू प्रेम नवीन शरीर धारण करून तिथे भेटत होते, सर्व कुटुंब अथांग प्रेम सागरात मस्त होते. 
एका क्षमा या शब्दाने शेठजींचे सर्व दु:ख, चिंता, ताण, भिती, निराशा, मानसिक रोग मुळा पासून संपले आणि त्यांची साधना परत जीवंत झाली.....
तात्पर्य हेच की, आपण सुद्धा आपल्या हृदयात क्षमा ठेवली पाहिजे. कुणीही छोटा,  मोठा असो त्याच्या समोर आपण चुकीचे असलो तर क्षमा मागून सर्व भांडणे संपवून टाकावी हेच जीवनाचे संतुलन आहे......!
चूक झाली नसली तरी ही क्षमा मागितली. ती एक साधना आहे......!

556. हाताला धरून नशीब बदलवणारा दाढीवाला...

       आण्णा, आज लोकांना दिल्ली मॉडलेचं देखावा करणारं शिक्षण भारी वाटतं. पण आपली रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था आहे हे त्यातल्या कुणालाच माहिती नाही. आज एखादं कॉलेज उघडून लाखोंच्या गाडीत फिरणारे संस्था चालक पाहिले की हजारो शाळा काढूनही तुम्ही अनवाणी चालत होतात याची आठवण येते. लाखोंची फी परवडत नाही म्हणून पोरं कोर्स सोडून देतात तेव्हा आठवतं बायकोचं मंगळसूत्र सुद्धा विकून संस्था चालवणारे तुम्ही. शिक्षण सोडून काम धंदा करणारे बघून बहुजनांची पोरं खांद्यावर उचलून शाळेत नेणारे आण्णा आठवतात. तुम्ही शाहू महाराजांचे अस्सल वारस होतात. पण दृदैव हे आहे की आज इतक्या मॉडर्न शाळांत शिकणाऱ्या, कोचिंग क्लासेस ला जाणाऱ्या पोरांना कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव सुद्धा माहिती नाही. कदाचित म्हणूनच कॉलेजच्या शेजारी गुटखा-दारू-सिगरेट मिळू लागली. तुम्ही म्हणयचात ज्या पोराच्या हातावर कष्टाचे घट्टे जास्त तोच पुढं जातो. ज्या माझ्यासारख्याना तुम्ही कळलात त्यांनी ते घट्टे अभिमानाने मिरवले. ज्यांच्यापर्यंत तुम्ही पोहचला नाहीत त्यांनी हातात सिगारेटी धरल्या. मला अभिमान वाटतो तुम्ही अगदी बालवयात मला पुस्तकातून भेटलात. तुमचा जितका आदर आहे तितका धाक सुद्धा आहे. म्हणून कधी चुकीचं वागायची, बोलायची चुकीचं खायचं भीती वाटत आली. आण्णा तुमच्यामुळं अडाण्याच्या कुळाचा बिमोड होऊन घराघरात शिक्षणाची चंद्रभागा वाहिली. गोरगरिबांची आणि बहुजनांची पोरं शिकू लागली. गावखेड्यात शिक्षण पोहचलं...
   अण्णांसारखा कर्मवीर जन्मला म्हणून कित्येक गरीब आईबापाची पोरं मास्तर झाली, डॉक्टर झाली, तलाठ्यापासून कलेक्टर झाली. ज्या गावात लाईट नव्हती तिथं लाल दिवा आला. ज्या घरात दोन वेळची चूल पेटत नव्हती त्या घरातल्या कित्येक लेकरांनी आईबापांच पांग फेडलं. मराठीत आलेली तार वाचण्यासाठी जो बाप पाच पाच मैल चालत जायचा त्याची पोरं खडखडीत इंग्रजी वाचू बोलू लागली ही तुमची पुण्याई. कमवा आणि शिका योजनेत हजारो लेकरं शिकली. घडली. खिशाला पेन लावून फिरायला लागली. आण्णा हुत म्हणून तर चाढ्यावर मूठ धरलेल्या बापाची लेकरं साहेब झाली. रोजंदारीवर खुरपायला जाणाऱ्या मायमावल्यांची लेकरं चारी चाकी गाडीत आली. आण्णांनी स्वावलंबी शिक्षण दिलं म्हणून लेकरांना लवकरच दुनिया कळली. जगाशी भिडायची प्रगल्भता आली. शिक्षण घेतलं म्हणून आपलही कर्म बदलू शकतं हा आशावाद आला. आपुन गरीब आहोत तरी आपलं पोरगं कलेक्टर हू शकतं हे स्वप्न रानात रात दिवस खपणारा बाप बघू शकला कारण कर्मवीरांनी उभा केलेली रयत शिक्षण संस्था...गरिबांची पहिली पिढी दहावी नंतरच शिक्षण परगावी जाऊन घेऊ शकली ती आण्णांमुळं....हाताला धरून नशीब बदलवणारा दाढीवाला ह्या मातीत होऊन गेला. हे ह्या मातीचं भाग्य...
कर्मवीर आण्णा तुम्हाला विनम्र अभिवादन....
.......
Adv Tejas Gaikwad                               

555. कीर्ती आणि मुल्य

        आजच व्हॉटसअप वरती एक पोस्ट वाचनात आली. इस्राएल चा चोवीस वर्षीय युवा गिर्यारोहक नदाव बन येहूदा ह्याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट अर्थात सागरमाथा सर करायला फक्त तीनशे मीटर बाकी राहीले असताना देखील शिखर सर करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि तरीही आज जगात ही बातमी वाचलेल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय तो बनून राहिला असेल हे नि:संशय.  कारण नदाव ने दुसऱ्या एका गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक विक्रम, कीर्ती, उपलब्धि ह्या गोष्टीना दुय्यम स्थान देत मूल्य आणि मूल्य संस्कार ह्याना श्रेष्ठ मानत "योग्य" गोष्ट केली.
      त्याच्याच शब्दात सांगायचे तर "एव्हरेस्ट वरील माझ्या चढाई च्या मार्गात मला दोन मृतदेह दिसले की जे गिर्यारोहक नुकतेच मृत झाले असावेत. मी ज्या दोराच्या आधाराने चढत होतो त्यालाच ते लटकलेले होते. अंगातील त्राण संपल्यामुळे आहे तिथेच स्वतःला anchor करून ते तिथे थांबले आणि कदाचित कोमात जाऊन मृत झाले. त्यांना पार करून सर्व पुढे जात होते. आणि नंतर मला तो दिसला - तुर्कस्तानचा आयदिन इरमाक. आम्ही खाली कॅम्प मध्ये भेटलो होतो आणि आता तो हेल्मेट नाही, ऑक्सिजन मास्क नाही, ग्लोव्हज नाहीत अशा परिस्थितीत शेवट होण्याची वाट पहात होता. इतर काही गिर्यारोहक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. मात्र मी दुर्लक्ष करू शकलो नाही, आणि मी वैयक्तिक विक्रम आणि दुसऱ्या एका मनुष्याचे प्राण ह्यात दुसऱ्या गोष्टीची निवड केली." 
        नदावने हा निर्णय घेतला खरा; पण तो अमलात आणणे हे तितकेच कठीण काम होते. बेशुद्ध पडलेल्या आयदिन ला उचलून खाली आणणे कर्मकठीण होते कारण त्याचे आणि स्वत:चे दोघांचे ओझे सांभाळत उतरायचे होते. आयदिन बेशुद्ध असल्यामुळे जास्त भारी वजनाचा भासत होता. अधून मधून त्याला शुद्ध यायची पण त्यात तो वेदना असह्य होऊन ओरडायचा. अशा परिस्थितीत खाली येताना नदाव चा स्वतः चा ऑक्सिजन मास्क फाटला. ग्लोव्हज काढावे लागले. त्यामुळे त्याला स्वतः ला बोटाना हिमदंश झाला. वाटेत त्याला अजून एक मलेशियन गिर्यारोहक भेटला की जो सुद्धा मरण्याच्या मार्गावर होता. वर जाणाऱ्या काही climbers कडून नदाव ने त्या दोन अत्यवस्थ climbers साठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवली आणि नऊ तासांच्या भगीरथ यत्नानंतर त्या दोघांना घेऊन कॅम्प पर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडू येथे नेऊन इस्पितळात दाखल केले आणि उपचार सुरू झाले. दोन जीव वाचवण्यात नदाव यशस्वी झाला.
        जीवनात काही असे परीक्षेचे क्षण येतात जिथे तुम्ही कशा प्रकारचे मनुष्य आहात, तुमची मूल्य व्यवस्था कशी आहे आणि त्या मूल्यांसाठी तुम्ही किती मोठा त्याग करू शकता वा किंमत देऊ शकता हे स्वतः शीच नक्की करावं लागतं. अशा परीक्षेच्या क्षणी नदाव ने, एव्हरेस्ट सर करणारा सर्वात कमी वयाचा इस्रायली गिर्यारोहक ह्या सन्मान व कीर्तीचा त्याग करत मानवतेच्या सर्वोच्च मूल्याला प्राथमिकता दिली आणि जगासाठी एक धडा दिला. गिर्यारोहणाच्या धाडसी खेळातील अत्युच्च मूल्य ओळखून त्याप्रमाणे वागत एक अनोखे धैर्य दाखवले. 
          एकीकडे मानसन्मान, वैयक्तिक महत्वाकांक्षेची पूर्तता, सर्वोच्च शिखर सर करण्याची वैयक्तिक स्वप्नपूर्ती हे सारे आणि दुसरीकडे दुसऱ्या मनुष्याचा जीव वाचवण्याचा अशक्यप्राय प्रयत्न ज्यात वरील मानसन्मान, कीर्ती, स्वप्नपूर्ती, महत्त्वाकांक्षा पूर्ती ह्या गोष्टींच्या त्यागावरोबरच एक अजून भयंकर शक्यता होती आणि ती म्हणजे स्वतः चा जीव गमावण्याची. पण नदाव नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या अती कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि with flying colors he passed. आज भले नदावला सागरमाथा सर करता आला असेल. भविष्यात तो हे लक्ष्य गाठेल किंवा नाही गाठू शकणार. मात्र तो कायम स्वतः ला ताठ मानेने आरशात बघू शकेल, त्याच्या कुटुंबीयांना, मित्रांना डोळ्याला डोळा भिडवून भेटू शकेल आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे जे अलौकिक समाधान आहे ते कायम त्याच्या उराशी असेल. आज सागरमाथा सर न करता सुद्धा, नदाव बन येहुदा सर्व जगातील लोकांच्या मनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला असेल ह्यात शंका नाही.
---- मनीष मोहिले

554. बल्लू...!

बल्लू..! शेजारच्या अपार्टमेंटमध्ये राहणारा माझ्या मित्राचा मुलगा..नव्या जनरेशनचा 'मॉड' प्रतिनिधी..पण भाविकही तेवढाचं.. चौकातल्या 'नवशा गणपती'चा  परम भक्त..!!
सकाळचे आठ साडेआठ झाले असतील..!
मी 'मॉर्निंग वॉक'ला जाऊन परत येत होतो आणि सोसायटीच्या गेटसमोर असताना बल्लू (मूळनाव बलभीम पण गर्लफ्रेंडसनी शॉर्ट केलेलं..!) माझ्याकडे आला..
आपली बाईक माझ्याजवळ थांबवत आणि डोळ्यावरचा गॉगल कपाळावर चढवत  म्हणाला "अंकल..तुम्हाला डिस्टर्ब करतोय पण मला चटईच्या  बैठका आणि 'अथर्वशीर्षा'ची पुस्तकं कुठे मिळेल ते प्लीज सांगा ना..!"
अरे, पण तुला  त्याची  आज कशी काय आठवण आली.? " 
"अंकल ..यू डोन्ट नो..? अहो.. उद्या गणेश जयंती आहे आणि चौकातल्या गणेश मंदिरात उद्या सकाळी अथर्वशीर्षाच्या पठणाचा कार्यक्रम आहे..
आणि पठणाला बसणाऱ्यांसाठी लागणाऱ्या एकवीस बैठका आणि अथर्वशीर्षाच्या प्रति आणण्याची जबाबदारी माझ्याकडे  आलयं..   आणि हो..उद्या मीसुद्धा  अथर्वशीर्ष पठण शेअर करणार आहे..तुम्ही पण या ना..!"
"अरे अथर्वशीर्षाच्या प्रति तुला कुणाकडेही मिळून जातील पण बैठकांचं मी काहीं सांगू  शकणार नाही..तू एक काम  कर ..समोर कट्टृयावर मोरेकाका बसले आहेत त्यांना विचार.!
त्यांच पुर्वी 'पेठेत'  पुजा साहित्याचं दुकान होतं..!
बल्लूनं आपली बाईक तेथेच पार्क केली आणि तो मोरेकाकांकडे विचारायला गेला..
कुणालाही सरळ उत्तर देतील तर ते मोरेकाका कसले..!!
त्यात पुन्हा 'पेठा'त आयुष्य गेलेलं..! 
"अरे चटयांचीच बैठक कशाला पाहिजे .? तुझ्या घरी सतरंजा असतील ना  त्याच्याच घड्या करुन टाकायच्या.. आहे काय आणि नाही काय.. !"
बल्लू त्यांना काहींतरी सटकावण्याच्या बेतात होता पण  बैठकांच काम महत्त्वाचं असल्यामुळे कसाबसा राग आवरुन तो पेट्रोल पंपावर आला..!
पेट्रोल भरून बाजाराकडे निघणार इतक्यात समोरून 'बुलेट'वरून आलेला त्याचा वर्गमित्र सॅम त्याला दिसला..
सॅम म्हणजे 'खाओ पिओ मजा करो' कल्चरचं प्रॉडक्ट..!
गप्पा मारता मारता बल्लूनं त्याला आपला प्रॉब्लेम सांगितला.
"क्या यार इस उमरमें गणेश पूजन करने बैठता है..आगे बुढापेमें तो वही करना है..'अलका' में 
'गदर'का  शो चालू है. चल शाममें पिक्चर देखने जायेंगे..मै टिकट निकालता हूं..!" सॅमनं बाईकच्या मिररमध्ये स्वतःचा चेहरा बघत बेफिकीरीनं  उत्तर दिलं..
श्रीगणेश म्हणजे बल्लूचं श्रद्धास्थान..जीव की प्राण.! 
चिडलेल्या बल्लूनं त्याचं मनगट धरलं.."गदरच्या तिकिटाचं काय करायचं ते नंतर बघू.. पण पुन्हा गणेशाबद्दल असं काहीं बोललास तर तुझाच 'गदर' करीन.." 
बल्लूचा चौकातला 'दरारा' माहीत असल्यामुळे सॅमनं हळूच तेथून काढता पाय घेतला..!
आधीच वैतागलेल्या बल्लूनं गाडीला किक मारली आणि तो मेन बाजाराकडे  निघाला..!!
आणि त्याला अचानक आठवलं आज एक्साईज वाढीच्या निषेधार्थ व्यापारयांनी बंद पुकारला 
आहे आणि  बाजार बंद आहे..!
आता मात्र बल्लूला टेन्शन आलं. साध्या चटईच्या बैठका आणता आल्या नाही तर
त्याचा चौकातल्या 'वट्' कमी होणार होता..!
अथर्वशीर्षाच्या  प्रति सोसायटीत आणि काहीं मित्रांकडे मिळाल्या  पण इतक्या बैठका कुठेच मिळेनात..!
शेवटी तो वैतागला..
संध्याकाळपर्यंत बैठका आणणं आवश्यक होतं आणि त्याला त्या काहीं केल्या लवकर मिळत नव्हत्या... 
आणि मग बेठकांचा नाद सोडून द्यावा आणि अथर्वशीर्षाच्या कार्यक्रमातून माघार घ्यावी असाही विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला..
शेवटचा उपाय म्हणून त्यानं आपल्या सगळ्या व्हॉटसप गृपवर 
एक मेसेज टाकून दिला.."वैयक्तिक कामासाठी आजच अर्जंट  एकवीस चट्ईच्या बैठका विकत किंवा  तात्पुरत्या स्वरुपात पाहिजेत..कुणाकडे असल्यास किंवा माहित असल्यास कृपया त्वरीत मेसेज करणे..धन्यवाद."
आणि वाट पाहून कंटाळलेल्या आणि निराश झालेल्या बल्लीला अचानक दुपारी  फोनवर एक मेसेज आला..!
तो मेसेज चौकातील गणेश मंदिराच्या मागे एकट्या राहणाऱ्या कानडेसरांचा  होता..!!
नेहमी गणेश मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या आणि कोणत्याही सार्वजनिक आणि सामाजिक कार्यात नेहमी हिरिरीने भाग घेणाऱ्या कानडेसरांच  घर बल्लूला माहित होतं..त्यानं बाईक स्टार्ट केली आणि तो त्यांच्या घराकडे निघाला.
कानडे सरांनी लग्न केलं नव्हतं.. 
    बँकेतून निवृत्त झाल्यानंतर एकटेच रहात असणाऱ्या आणि मुळचा सामाजिक  पिंड असणाऱ्या कानडे सरांनी एका अनाथ विद्यार्थी गृहात संचालक म्हणून काम स्विकारलं होतं..!  दुर्दैवानं त्यांना सहा महिन्यापूर्वी पॅरॅलिसिसचा मोठा अटॅक आला होता आणि संधीवातही असल्यामुळे  ते अंथरुणावरच खिळून होते..! आणि कानडे सरांना तशा त्या अवस्थेत पाहून बल्लूला धक्काच बसला..! बल्लूनं त्यांना कसबसं बेडवरून उठून बसवलं आणि  
विचारलं.."सर.. तुम्ही आजारी आहात हे मला माहीत नव्हतं.. एक फोन करायचा ना..?"
"बल्लू बेटा.. आता हे कायमचं दुखणं आहे.. कुणा कुणाला म्हणून सांगणार..! 
तुझा मेसेज कुणीतरी मला फॉरवर्ड केला तो वाचून मी तुला बोलावलं आहे..!"
अर्धांगवायूमुळं त्यांच बोलणं अस्पष्ट आणि जड झालं होतं..
 "तुला तर माहित आहे बॅंकेतून रिटायर झाल्यावर मी थेऊरजवळच्या एका अनाथ विद्यार्थी गृहात संचालकाचं काम करत होतो.. दुर्दैवाने हा पॅरॅलिसिसचा अटॅक आला.. आणि  असा मी अपंग आणि असहाय होऊन पडलोय.. 
 तुझा मेसेज वाचला.. तुला मी त्या बैठका देण्याची व्यवस्था करू शकतो..! 
 मी संचालक असलेल्या अनाथ विद्यार्थी गृहाकडे मी मुलांच्या जेवण्यासाठी म्हणून भेट दिलेल्या चटया  आहेत पण जेवण्यासाठी टेबल खुर्ची  आल्यापासून त्या आता पडून आहेत.. मी त्यांना फोन करतो.. तू त्यांच्या कडे जाऊन त्या घेऊन जा..!!"
पण माझं एक छोटसं काम करायचं बेटा..
मी आजपर्यंत कुणाला सांगितलं नव्हतं पण आता तुला सांगतोय..!
त्या 'अनाथ विद्यार्थी   गृहाच्या पाच मुलांच्या शिक्षणाचा खर्च मी माझ्या बँकेच्या पेन्शनमधून गेल्या अनेक वर्षापासून करतोय..घरातच पडून असल्यामुळे ह्यावेळी मी 'लाईफ सर्टिफिकेट' वेळेवर देऊ  शकलो नाही त्यामुळे माझं पेन्शन जमा झालेलं  नाही.. आणि नेमकं त्यांच्या 'परीक्षेची फी' भरण्याच्या आज शेवटचा दिवस आहे..!!     माझ्याकडे पाच हजार रूपये शिल्लक आहेत.. तुला माझी एवढीच विनंती आहे की ते पैसे मी तुझ्याकडे देतो.. प्लिज तेवढी फी भरून त्या अनाथ आणि गरीब विद्यार्थ्यांच शैक्षणिक वर्षे वाचव..नाहीतर केवळ परीक्षेची फी भरली नाही म्हणून  त्या  मुलांचा वर्षभरचा अभ्यास आणि मेहनत वाया जाणार आहे..!" करशील ना माझं एवढं काम..?
कानडे सर आपले थरथरते हात जोडून म्हणाले..त्यांच्या स्वरातली व्याकुळता त्याला जाणवत होती..
बल्लूला आता गहिवरून आलं होतं..!
चटयांच्या एका  छोट्याश्या कामासाठी तो सकाळपासून वणवण भटकत होता आणि इथं अंथरुणावर खिळलेला एक असहाय वृद्ध, आपल्या आयुष्याची कमाई खर्च करून अनाथ विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तळमळतं पडला होता..!  बल्लूनं आपल्या डोळ्यात जमा झालेले अश्रू पुसले..कानडे सरांनी दिलेले पैसे  घेऊन तो थेऊरकडे भरधाव निघाला...!  पाच वाजण्यापूर्वी  त्याला पोहोचणं आवश्यक होतं...अर्ध्या तासात तो त्या अनाथ विद्यार्थी गृहात पोहोचला. कानडे सरांनी फोन केल्यामुळे तिथले व्यवस्थापक  परिक्षेची फी शाळेत पाठवून देण्यासाठी त्याची वाटच पहात होते..बल्लूनं फीचे पैसे देऊन पावती घेतली आणि त्यांनी दिलेल्या बैठका घेऊन तो परत निघाला..    त्याला त्या मुलांना पण भेटायचं होतं पण ती शाळेत गेलेली होती..    बल्लूच्या चेहरयावर आता एक वेगळाच सात्विक आनंद आणि समाधान विलसतं होतं.! आणि तो आनंद केवळ बैठका मिळाल्याचा नव्हता तर श्रीगणेशाची सेवा करण्याचा.. भक्ती करण्याचा एक नवा सन्मार्ग सापडल्याचा होता..! कानडे सरांनी त्याला तो मार्ग दाखवून दिला होता..!!
     सत्संगांच्या कार्यक्रमाला न जाताच त्याच्या हातून 'सत्संग' घडला होता..!! बल्लूनं एका अनाथ विद्यार्थ्यांची पुढच्या वर्षाची फी भरण्याचं आता आपल्या मनातल्या मनात ठरवलं होतं..! संध्याकाळ होत आली होती..बल्लू घरी पोहोचला. त्यानं हातपाय धुतले. श्रीगणेशाच्या फोटोसमोर दिवा लावला..आणि हात जोडून मित्रानी दिलेली अथर्वशीर्षाची प्रत  घेऊन तो मोठ्याने  वाचू लागला....    
ओम नमस्ते गणपतये... त्वमेव प्रत्यक्षं
तत्वमसि../ त्वमेव केवलं
कर्तासि../  त्वमेव केवलं
धर्तासि.......

553. पुत्रसुख...!

कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं. आणि सामंतकाका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मुर्ती... कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आंत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली. कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं, " थांबा जरा ..गणपती मुर्ती आहे....!" त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मुर्तीकडं पाहिलं. ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हांत नकळत जोडले गेले.
कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबलबेल दिली. एस.टी.सुरु झाली..! कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला...!
काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मुर्ती असतांना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी. त्याची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, "राहू दे काका. उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मुर्ती ठेऊ. तेव्हा द्या."
थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, "काका एक विचारु? तुमच्या गावात गणेशमुर्ती मिळत असेलच नं? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणं ; ते ही एस.टी. च्या प्रवासाची दगदग करुन? "
सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, "आमच्या गांवात मिळतात मुर्त्या. पण अशी नाही. ही मुर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? जिवंत वाटते. अगदी लहान बाळच..!"
कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हांत जोडले. हलकेच स्पर्शही केला. " आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन थकलो. मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी पंधरा वर्षापूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मुर्ती तिथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणूकाही... तिचे डोळे भरुन वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले "माझं बाळ...! "
हे असं घडल्यापासून. ह्या गांवातून मुर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो "
कंडक्टर हे ऐकून स्तिमीत झाला. थोड्यावेळानं त्यानं विचारलं " पण काका तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावांत .."
" ते ही केलं पण... जास्त मुर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट.. आणि असे भाव येतीलच शाश्वती नाही "
हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, "काका मग विसर्जित करायचीच नाही मुर्ती ..!"
सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले,"विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..! आत्ताही दारात वाट पहात बसली असेल. रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय..! भाकरतुकडा काय.., दृष्ट काढण्यासाठी ..!! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे. छोटा तांब्या भांडं काय..... विचारु नका.. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीए. "
यांवर कुणाचे डोळे पाणावले. कुणी स्मित केले. नंतर मौन राहिलं. काकांचं गांव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मुर्ती हातात घेतली, म्हणाला "काका तुम्ही तिकीट काढा. तोपर्यंत धरतो मी.." काहीजण त्या मुर्तीकडं जवळून पहात राहिले. आता लोकांची नजरच बदललेली....! सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले "दिड तिकिट द्या. एक हाफ आणि एक फुल "
कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं " दिड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? "
काकांनी स्मित केलं, "दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? "
हे ऐकून सगळे एकमेकांकडं पाहू लागले..!
काका म्हणाले, "असे कोड्यात का पडलांत बरें? त्याला नमस्कार केलात. त्याला आपला देव मानता.. व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मुर्ती याच भावाने भजतो; पूजतो.. अगदी पूजा केल्यावरही ...
पण त्याला एकाचीच गरज प्रेमाची.. आपल्या अलिंगनाची .. द्या दिड तिकिट..!'' हे बोलतांना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं दिड तिकीट दिलं..!
सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी. तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हांत जोडले गेले..... अगदी अनाहूतपणे ...!!

552. आधार-सुनेचा

 मी व माझी पत्नी दुपारी  बसून चर्चा करत होतो, तेव्हा माझ्या पत्नीने मला प्रश्न विचारला, " मला सांगा, माणसाची मुलगी की  मुलगा त्याच्या म्हातारपणाचा आधार असतो?" 
मी म्हणालो- हा प्रश्न न विचारलेलाच बरा. पण ती आग्रह करू लागली म्हणून सविस्तर सांगावे लागले.
मी म्हणालो म्हातारपणाचा आधार मुलगा किंवा मुलगी नसून "सून" असते.
           मुलगा किंवा मुलगी ही म्हातारपणाची काठी असते असे आपण अनेकदा लोकांकडून ऐकले आहे, म्हणूनच लोकांना आपल्या आयुष्यात "मुलगा आणि मुलगी" हवी असे वाटत असते. जेणेकरून म्हातारपण चांगले पार पडावे.ही गोष्ट सुद्धा खरी आहे कारण घरात फक्त मुलगाच सून आणतो. सून आल्यानंतर मुलगा आपल्या पत्नीच्या खांद्यावर जवळजवळ सर्व जबाबदारी टाकतो आणि मग सून ही सासू व सासऱ्याच्या म्हातारपणाची काठी बनते. होय! माझा विश्वास आहे की ती सूनच आहे जिच्या पाठिंब्याने वृद्ध सासू आणि सासरे आपले आयुष्य चांगले घालवतात. सुनेला तिच्या सासू आणि सासऱ्यांची संपूर्ण दिनचर्या माहीत असते. कधी आणि कोणता चहा द्यायचा, नाश्त्याला काय द्यायचे, जेवण काय बनवायचे,कोणत्याही परिस्थितीत जेवण रात्री नऊच्या आधी बनवायचे. सायंकाळी झोपताना दूध द्यायचे. पायाला तेल लावायला द्यायचे.सासू-सासरे आजारी पडले तर सून मनापासून  त्यांची काळजी घेत असते.
      सून एक दिवस आजारी पडली किंवा माहेरी निघून गेली तर सगळं घर हादरून जातं. पण मुलगा पंधरा दिवसांच्या प्रवासाला गेला तरी सुनेच्या भरवशावर घर सुरळीत चालते.सून नसताना सासू-सासरे यांना कोणीतरी आपली काठी हिसकावून घेतल्यासारखे वाटते. त्यांना दुसरे कोणी विचारत नसतात. जावई व मुलगी फक्त पाहुणचार करू शकतात. कारण पाहुण्याच्यात येणारे अनुभव वेगळे असतात. सगळे स्वार्थाचे धनी असतात. सूनच खरी जबाबदारी पार पाडत असते.कारण मुलाकडे वेळ नसतो आणि मुलाला वेळ मिळाला तरी तो काहीच करू शकत नाही. कारण त्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आई बाबांना काय द्यावे हेच कळत नाही? मुलगा फक्त आर्थिक जबाबदारी पार पाडू शकतो.
मुलगा फक्त विचारतो.जसे "आई बाबांनी जेवण केले आहे का?" "चहा प्यायला का?" "नाश्ता केला का?" पण ते काय खातात? कोणता चहा पितात हे शोधण्याचा प्रयत्न कधीच करत नाही? ही जवळपास सगळ्या घरांची परिस्थिती आहे.
सासूची मनापासून सेवा करणाऱ्या अशा सूनबाई मी अनेक पाहिल्या आहेत. अशा महिलांना मनापासून धन्यवाद देतो. सून हीच म्हातारपणाची खरी काठी आहे असे मी मानतो. पण अजून एक गोष्ट खरी आहे की तुम्हालासुद्धा समज असायला हवी की सदैव "माझा राजा बेटा!" "माझी राणी मुलगी!"  चा जप सोडा. "माझी चांगली सून!" सुद्धा अंतर्भूत केले पाहिजे.
          म्हणून, आपल्या सुनेमध्ये फक्त दोष शोधू नका, तिच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा. सुनेचा त्याग आणि सेवा ओळखा मुलगा आणि मुलगीच्या आधी सुनेला स्वतःचे समजा आणि "माझी मुलगी - माझा अभिमान" "माझा मुलगा - माझा अभिमान" म्हणणे थांबवा... अभिमानाने म्हणा माझी सून, माझा अभिमान..

551. दृष्टिकोन...

      माणसं जरूर जोडावीत, जपावीत, पण एकमेकांच्या भावना आपल्याला दुखावू शकेल इतके अधिकार कोणाला देऊ नयेत.      
      माणसं कमावण्याची जबरदस्त नशा असते वयाच्या एका टप्प्यापर्यंत. आपल्यापैकी अनेकांना ती असते. माणसं जोडणं ही छानच गोष्ट, अनेकांसाठी ती एक अभिमानाची बाब असते. जरूर असावी. चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या जोरावर अनेक माणसं जोडावीत, जपावीत. पण हे करताना ही जपलेली माणसं आपल्यालाही 'जपत' आहेत ना... हे बघणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटून जातं, अरे बापरे...! ही अमुक इतकी 'भारी' व्यक्ती आपल्यासोबत संपर्क ठेवून आहे. म्हणजे किती छान! त्या संपर्कामागे विशुद्ध भाव आहे ना, की पुढे जाऊन आपला 'स्टेपणी' म्हणून उपयोग केला जाणार आहे, हे बघायला हवं. अशा अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्यामुळे 'हुरळून' जाणं टाळायला हवं. तुम्हाला माणसं जोडावीशी वाटतात हा तुमचा चांगुलपणा असतो, पण त्याला तुमचा भावनिक कमकुवत पणा समजणारे खूप लोक असतात. त्यामुळे आपल्या चांगुलपणाचं इतकंही प्रदर्शन करू नये की, तो संशयास्पद वाटू लागेल. 
      अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याला अत्यंत जवळची, जिवलग वाटत असते, आपली सुख दुःखं आपण तिला सांगत असतो. पण आपल्या वेदनांचा वापर पुढे ती आपलं मन:स्वास्थ्य उद्ध्वस्त करणारा दारुगोळा म्हणून देखील करू शकते. माणसांना इतकंही पोटाशी धरू नये, की ते पुढे आपल्यावर लाडाने दुगाण्या झाडू लागतील. माणसं जोडताना कोणाला कोणत्या पायरीपर्यंत जवळ येऊ द्यावं, हे ठरवून घ्यायला हवं. लायकी नसलेल्या एखाद्या व्यक्तीला फार जवळ केल्याचा अतोनात त्रास आयुष्यभर भोगावा लागू शकतो. लोक तुम्हाला खांदा द्यायला नसतात बसलेले, अनेकदा तुम्ही रडण्यासाठी त्यांचा खांदा जवळ करता, हे त्यांना एंटरटेनिंग वाटू शकतं. दुःखावर बांधावीत अशी माणसं फार विरळा असतात. मन मोठं करून समोरच्याला मदत करणं, त्याचं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करणारी भली माणसं जगात आहेत, नक्कीच आहेत. पण भसाभस माणसं जमवण्याच्या नादात दाण्यांपेक्षा बणग्याच जास्त गोळा होतात. त्यातली एखादी आयुष्यभर कुसळा सारखी टोचत राहते, असह्य वेदना देते. 'भारावून जाणं' ही एक फारच भाबडी गोष्ट आहे. कोणाच्या एवढ्या तेवढ्या गोष्टीने भारावून जाणारी माणसं आपल्यात असतात. फार जवळ जाऊन बघितलं की समोरच्या माणसाचे पायही मातीचे आहेेत हे लक्षात येतं आणि अतोनात निराशा वाट्याला येते. माणसांतलं चांगलं ते जरूर वेचावं, त्याचं कौतुक करावं,जमल्यास आचरणात ही आणावं.
           काही माणसं समोरून फार छान वाटतात, आदर्श वाटतात. आपण त्यांना आपलं मानत राहतो, फॉलो करत राहतो. आणि एका विवक्षित क्षणी कळतं, की काहीही घेणं देणं नसताना ही माणसं आपल्या सोबत किती खोटं, कृतक वागत होती, मागे डावपेच करत होती. मग जीव उबतो, त्या नात्याची शिसारी येऊ लागते. यावर पर्याय काय? 'माणसांच्या फार जवळ न जाणे'. लांबून जे दिसतं त्यात आनंद मानावा. माणसं आपल्या समोर जे वागतात, बोलतात ते आणि तेवढंच खरं मानून पुढे निघावं, फार खोलात जाऊन गोष्टी जाणून घेण्याचा हट्ट करू नये. अपेक्षा भंग वाट्याला येतो. माणसं कमावणं म्हणजे त्यांना आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार देणं नव्हे. काही व्यक्ती आपले पणाच्या हक्काने काही गोष्टी सांगत असतात. त्या नम्रपणे ऐकून घेण्याची क्षमता ठेवावी. चार कटू गोष्टी ऐकाव्या लागल्या, तरी त्यातून पुढे आपला भलंच होणार आहे... हे आपण जाणून असावं. अर्थात आपलं खरोखरच भलं व्हावं म्हणून स्वतःचा वेळ देऊन आपला कान पकडणारं कोण... आणि आपलं भलं पाहून पोटदुखी होणारे कोण... यातला फरक आपल्याला ओळखता यायला हवा. 
         माणसं जरूर जोडावीत, जपावीत, एकमेकांच्या भावना आपल्याला दुखावू शकेल इतके अधिकार कोणाला देऊ नयेत. जगायला माणसं लागतातच, पण 'आतल्या' वर्तुळात कोणती माणसे घ्यायची आणि 'बाहेरच्या' वर्तुळात कोणती माणसं ठेवायची, याचं गणित एकदा जमायला लागलं... की सोपं होतं जगणं.... आणि हेच जमणं आणि जमवणं महत्वाचं असतं.

550. गौराईकडून गृहिणींना पत्र.....

 प्रिय  सखी,
मजेत गेले माझे दिवस..तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घातलास हे मी याची देही याची डोळा पाहिले..मी पाहिले तुझी धडपड आणि अविरत काम करणं..मी येणार म्हणून सोवळ्याचा अट्टाहास...पाळी पुढे ढकलण्याचे सगळे प्रकार....काही वेळा डोळे भरुन आले आणि काही वेळा हसू न आवरण्यासारखे झाले...मग आम्ही दोघीनी ठरवलं की चल आज तुझ्याशीच गप्पा मारू...जसं आम्ही माहेरपणाला येतो तसं तू कुठे गेलीस का गं  , ???? आमच्यासाठी पंचपक्वानं, सोळा भाज्या  केल्यास पण तू एकटी असताना शिळं पाकं खाऊन राहणं कसं जमतं????? आमच्यासाठी खेळ खेळलेस पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का गं? आणि हो आम्हाला जेवढा मान तू देतेस ,तेवढा स्वत:ला मान कधी देतेस का गं??? जाता जाता  एक सांगू ...जेवढं स्वत:ला जपशील तेवढं आम्हाला तू तुझ्यात पाहशील..
कधीही कानांनी अनहेल्दी ऐकू नकोस...तोच तो इडियट बॉक्स सुरू असतो तो आणि  डोळ्यांनी अनहेल्दी पाहू नकोस...स्वतःमध्ये ,.....  जसं पंचपक्वानं जसं तयार करतेस तसंच नविन कला शिकत जा, छंद जोपासत जा , स्वतःला वेळ दे..जगत जननीपण इतकं कॅज्युअली घेऊ नकोस...कारण जिच्यामध्ये जन्म देण्याची क्षमता आहे तिने स्वतःला जपलेच पाहिजे...आणि आवर्जून सांगते आता जिवंत गौरायांनों थोडासा आराम करा...असूया, गॉसिपिंग आणि जग काय म्हणतं याचा विचार न करता ,स्वत:ला नव्याने घडवा...आमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून जसं तुम्ही खुलता तसं तुमच्या   चेहर्‍या वरच्या तेजाने सारं जग बदलू दे...सोवळं नक्की पाळा पण ते तुमच्या विचारांचे ...गोळ्या घेऊन पाळया लांबविण्यापेक्षा आरोग्याचा जागर करा..बाकी पुढच्यावर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखी दिसली पाहिजेस..मानसिक, शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक हेल्दी!!!!
तुझीच  ,
देवी गौरी

549. जगण्याचा इव्हेंट

"नले काय कमाल झाली ग तुझी?? ह्या वयात तू ही त्या पोरांसोबत खुशाल गाण्यावर थिरकलीस काय..
परवा त्या मेहंदीच्या कार्यक्रमात हाताभर मेंदी काढलीस..
शोभतं का आपल्याला ह्या वयात? 
आणि........
काल तर नातू म्हणतोय, " आजी अशी पोज दे " 
तर लगेच त्याच्या मैत्रिणींसोबत काढलास तसा तोंड माकडासारखे करून फोटो! कमालच आहे हं तुझी !
असं म्हणत सुशीने नेहमी प्रमाणे नलीला सुनावलंच,..! 
पण या वेळी नेहमी प्रमाणे नली गप्प नव्हती. 
तीने सुशीला हात धरत कालच्या टेरेसवर नेलं, जिथं काल मेंदी प्रोग्रॅम रंगला होता,...! 
तिथं नलीने लोकरीपासून बनवलेले लटकन सगळीकडे वाऱ्यावर डोलत होते,..त्यात अडकवलेल्या बारीक घंटा वाऱ्याने किणकिण करत होत्या,....
नलीच्या माहेरचं तांब्याचं जड घंगाळ लक्ख करून त्यात दिवे सोडलेले होते पाण्यावरचे,.. भोवती मोगऱ्याची टपोरी फुलं! त्या मिणमिणत्या प्रकाशासोबत मंद सुगंध पसरवत होती,..
नलीने सुशीला त्या घंगाळजवळ बसवलं. आपला थरथरता हात त्यावर फिरवत म्हणाली,..
"तुला आठवतं, हे आईने हट्ट करून मला रुखवंतात दिलं होतं...
काही दिवस ते सासरी मिरवलं! हळूहळू ते काळवंडायला लागलं की, सासुबाई त्याला घासण्यासाठी माझ्या मागे लागायच्या,..! सगळ्यांच्या अंघोळी झाल्या, की एक दिवस त्याला तासभर चिंचमीठ लावून घासत बसावं लागायचं,..
 जीव चिडायचा! वाटायचं,
 कशाला दिलं आईने हे त्रासदायक घंगाळ मला 
पुढं लेकरंबाळं आयुष्यात आली, हळूहळू त्या घंगाळाला माळ्यावर टाकलं. कधी तरी डोळ्यासमोर दिसलं, की वाटायचं, "मोडीत घालू. " 
मग परत आई आठवायची, हट्टाने ते देणारी......! 
मग स्टील, प्लास्टिक असं काय काय घरात येत राहिलं,..तरी त्या घंगाळाचं महत्व मनात होतं कायम! पण त्याच्या स्वच्छतेच्या त्रासापायी त्याला दूरच ठेवलं,..
सुनबाई म्हणाली, " नकोच त्या हमाल्या.." 
"म्हंटलं नको तर राहू दे! आपल्यालाच नाही जमलं, तर ह्यांना कुठे बळजबरी करता!"  
 नलीला मध्येच अडवत सुशी म्हणाली,
"अग मी तुला दोन दिवसांपासून तू इतकी ह्या पिढीसोबत मोकळी ढाकळी वागलीस, त्याबद्दल विचारलं, तर तू हे काय इतिहास सांगत आहेस मला "
नली हसून म्हणाली....
"अग तेच तर सांगतेय.......
 वर्षानुवर्षे माळ्यावर अडगळ होऊन पडलेलं घंगाळ ती इव्हेंट मॅनेजमेंट वाली पोरगी,
 घेऊ का ?" म्हणून मला विचारायला आली.
मी "हो" म्हणताच ते खाली काढून तिने त्याला स्वच्छ करून नकली फुलांची माळ गुंडाळली. त्यात पाणी भरलं आणि हे कमळाचे दिवे, ही मोगऱ्याची फुलं........ 
मला म्हणाली,"आजी, घंगाळं जुनं असलं तरी  त्याला नव्याने जगू देऊ या......!" 
माझ्या टेबलावर पडलेल्या लोकरीच्या फुलांची माळ तिने ह्या रिकाम्या कागदाच्या ग्लासात अडकवली....
मला म्हणाली," जगणं तेच! 
 फक्त त्याला लूक नवा द्यायचा, म्हणजे आंनद मिळतो..!
मी सहज ते सगळे लटकन बघितले, तर खरंच माझीच लोकरीची फुलं इतक्या दिवसांपासून त्या कोपऱ्यात पडून राहिलेली, आज मस्त वाऱ्यावर डुलत होती! जणू मोकळा श्वासच घेत होती.
हे हल्ली इव्हेंट इव्हेंट म्हणतात ते फार काही दुसरं नाही ग! 
तर आहे तो कार्यक्रम आनंदाने साजरा करणं! त्यासाठी ही सजावट पडीत वस्तूतूनही किती छान करता येते हे त्या मॅनेजमेंट वालीने  मला दाखवलं. 
आणि मग मनात वाटलं...
आपण सुद्धा आपल्या आयुष्याचा इव्हेंट करायला हवा आनंदी मॅनेजमेंटने..! 
आपण नाही वापरलं ते घंगाळ,.. ती लोकरीची फुलंही तशीच  तर किती वर्षं  पडून आहेत,.....! 
मनातल्या उत्साहाची फुलं देखील तशीच पडू दिली आपण! नाही वाऱ्यावर डोललो कधी मोकळेपणाने ! आणि आता  अजूनही नाही डोलायचं तर मग कधी????
आयुष्य तर असंच गंजून जाईल त्या माळ्यावर पडलेल्या घंगाळा सारखं!" कोणी येईल आणि लख्ख करेल याची वाट कशाला बघायची ?
आपल्या आयुष्याचा इव्हेंट  आपणच मॅनेज करावा हे नाही आलं आजपर्यंत लक्षात! 
पण ही पिढी शिकवतीये ना? 
मग घेऊ या शिकून,..! 
त्याक्षणी जगून घेणं आणि तो क्षण आठवणीत राहील असा साजरा करणं !
    सुशे, तुला आपल्या वेळची लग्नकार्य , त्यातली भांडणं आणि रुसण्या शिवाय काय आठवतं ग?? 
ह्या उलट.........
 काल आमच्या मेंदीत लेक आणि सून मला मध्ये घेऊन फोटोसाठी उभे राहिले, तेंव्हा नातू म्हणाला,
" आजीला जवळ घ्या बाबा " आणि.....
 लेकांनं मला जवळ घेतलं, तेंव्हा काय सांगू ? अगदी भरून आलं बघ! 
एरवी आपल्याशी बोलायला वेळ नसणारी माणसं ह्या इव्हेंट ने एकमेकांना स्पर्श करताहेत ग,..!
सुनेनी, नातवानी जवळ घेऊन भरपूर फोटो काढले, तेंव्हा वाटलं, " आपणही कधीच आपल्या सासूला असा हात लावला नव्हता,..लेकीने तरी कुठे ग असे गळ्यात प्रेमाने हात टाकले,..?
फक्त 'आदर आदर' ह्याच्या नावाखाली हे एकमेकांना प्रेमानं जवळ घेणं आपण विसरायला लागलो ते ह्या इव्हेंट मध्ये सापडलं ग मला ह्या लख्ख झालेल्या घंगाळा सारखं आणि मग मनातही मोगरा फुलला ! 
"प्रत्येक क्षण जगून घ्यावा" हा विचार आतमध्ये ह्या कमळाच्या पाकळ्यांसारखा उमलत गेला,..! 
म्हणून मी आता ठरवलंय.....
 "आयुष्य इव्हेंट करून जगायचं अगदी सुंदर आणि आंनदी.."
सुशी नुसतीच हसली. कारण..............
नलीच्या वाक्यावर वर लटकणारी फुलंच डोलत, आपल्या किणकिण घंट्या वाजवत ह्या सगळ्या बोलण्याला दुजोरा देत होती...

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...