सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

556. हाताला धरून नशीब बदलवणारा दाढीवाला...

       आण्णा, आज लोकांना दिल्ली मॉडलेचं देखावा करणारं शिक्षण भारी वाटतं. पण आपली रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था आहे हे त्यातल्या कुणालाच माहिती नाही. आज एखादं कॉलेज उघडून लाखोंच्या गाडीत फिरणारे संस्था चालक पाहिले की हजारो शाळा काढूनही तुम्ही अनवाणी चालत होतात याची आठवण येते. लाखोंची फी परवडत नाही म्हणून पोरं कोर्स सोडून देतात तेव्हा आठवतं बायकोचं मंगळसूत्र सुद्धा विकून संस्था चालवणारे तुम्ही. शिक्षण सोडून काम धंदा करणारे बघून बहुजनांची पोरं खांद्यावर उचलून शाळेत नेणारे आण्णा आठवतात. तुम्ही शाहू महाराजांचे अस्सल वारस होतात. पण दृदैव हे आहे की आज इतक्या मॉडर्न शाळांत शिकणाऱ्या, कोचिंग क्लासेस ला जाणाऱ्या पोरांना कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव सुद्धा माहिती नाही. कदाचित म्हणूनच कॉलेजच्या शेजारी गुटखा-दारू-सिगरेट मिळू लागली. तुम्ही म्हणयचात ज्या पोराच्या हातावर कष्टाचे घट्टे जास्त तोच पुढं जातो. ज्या माझ्यासारख्याना तुम्ही कळलात त्यांनी ते घट्टे अभिमानाने मिरवले. ज्यांच्यापर्यंत तुम्ही पोहचला नाहीत त्यांनी हातात सिगारेटी धरल्या. मला अभिमान वाटतो तुम्ही अगदी बालवयात मला पुस्तकातून भेटलात. तुमचा जितका आदर आहे तितका धाक सुद्धा आहे. म्हणून कधी चुकीचं वागायची, बोलायची चुकीचं खायचं भीती वाटत आली. आण्णा तुमच्यामुळं अडाण्याच्या कुळाचा बिमोड होऊन घराघरात शिक्षणाची चंद्रभागा वाहिली. गोरगरिबांची आणि बहुजनांची पोरं शिकू लागली. गावखेड्यात शिक्षण पोहचलं...
   अण्णांसारखा कर्मवीर जन्मला म्हणून कित्येक गरीब आईबापाची पोरं मास्तर झाली, डॉक्टर झाली, तलाठ्यापासून कलेक्टर झाली. ज्या गावात लाईट नव्हती तिथं लाल दिवा आला. ज्या घरात दोन वेळची चूल पेटत नव्हती त्या घरातल्या कित्येक लेकरांनी आईबापांच पांग फेडलं. मराठीत आलेली तार वाचण्यासाठी जो बाप पाच पाच मैल चालत जायचा त्याची पोरं खडखडीत इंग्रजी वाचू बोलू लागली ही तुमची पुण्याई. कमवा आणि शिका योजनेत हजारो लेकरं शिकली. घडली. खिशाला पेन लावून फिरायला लागली. आण्णा हुत म्हणून तर चाढ्यावर मूठ धरलेल्या बापाची लेकरं साहेब झाली. रोजंदारीवर खुरपायला जाणाऱ्या मायमावल्यांची लेकरं चारी चाकी गाडीत आली. आण्णांनी स्वावलंबी शिक्षण दिलं म्हणून लेकरांना लवकरच दुनिया कळली. जगाशी भिडायची प्रगल्भता आली. शिक्षण घेतलं म्हणून आपलही कर्म बदलू शकतं हा आशावाद आला. आपुन गरीब आहोत तरी आपलं पोरगं कलेक्टर हू शकतं हे स्वप्न रानात रात दिवस खपणारा बाप बघू शकला कारण कर्मवीरांनी उभा केलेली रयत शिक्षण संस्था...गरिबांची पहिली पिढी दहावी नंतरच शिक्षण परगावी जाऊन घेऊ शकली ती आण्णांमुळं....हाताला धरून नशीब बदलवणारा दाढीवाला ह्या मातीत होऊन गेला. हे ह्या मातीचं भाग्य...
कर्मवीर आण्णा तुम्हाला विनम्र अभिवादन....
.......
Adv Tejas Gaikwad                               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...