"ऐ sss शिवा, हे दोन कट्टे ठेव...... साहेबांच्या गाडीत !"
शेठजींनी मारलेली हाक ऐकून दुकानाबाहेर बसून असलेला आपल्या वयाची साठी गाठलेला शिवा "व्हय जी आलो" म्हणत जागेवरचा उठला. दुकानातील पंचवीस किलो कोलम तांदळाचा कट्टा उचलु लागताच अंधारी आल्यासारखे वाटुन त्याचा एकदम तोल गेला. अन् तांदळाचा कट्टा खाली पडला. तो ही पडता पडता वाचला.
"इतक्या वर्षांपासुन हमाली करता करता आयुष्य चाललंय आपलं पण, कधी तोल गेला नाही ? आज आज असं कसं झालं ? शिवाने स्व:तालाच कोसलं !!
"काय रे एवढेही काम आता होत नाही का तुझ्याने? किती वर्षांपासून काम करतोस?" शेठजी ओरडले.
शेठजींना शिवावर ओरडतांना बघून तांदळाचे कट्टा खरेदी केलेले बाजूलाच उभे असलेले सत्तरीचे एक सद्गृहस्थ लगबगीने पुढे झाले आणि शिवाला म्हणाले "थांबा दादा, मी मदत करतो तुम्हाला कट्टा उचललायला." त्यांनी शिवाला कट्टा उचलायला हातभार लावला, आणि म्हणाले, "या दादा इकडे, माझ्या गाडीच्या डिकीत कट्टा ठेवू या."
ते बघताच शेठजी जागेवरून उठत म्हणाले, "अरे साहेब, तुम्ही कशाला त्रास घेतला? त्याचे कामच आहे ते. आता थोडं वय झालं त्याचं. झेपत नाही त्याला आता काम."
"हो ना! कधी कधी शरीर निरोगी असतं, मात्र मन थकले तरी कामाचं ओझं अवजड वाटतं." शिवाकडे बघत 'ते' बोलले!
"बाकी काय म्हणता साहेब?" शेठजीनी त्यांची ख्याली खुशाली विचारली.
"महाराजांच्या कृपेने सर्व उत्तम चाललयं." त्यांचा उत्सव जवळ आला आहे ना. त्याचीच तयारी सुरू आहे. बरं, येतो शेठजी. गडबडीत आहे जरा. या तुम्ही परवा महाराजांच्या दर्शनाला आणि महाप्रसादाचाही लाभ घ्या." शिवा कडे वळून ते म्हणाले, "दादा, तुम्ही पण या !"
आणि ते सद्गृहस्थ गाडीत बसून निघून गेले.
शिवा त्यांच्या कडे बघत राहिला." किती भारदस्त व्यक्तिमत्व आहे यांचे. माझ्यापेक्षा वयानं मोठे असुनही किती आदराने माझ्याशी वागले." अशा व्यक्ती फार कमी अनुभवास येतात. त्याला 'त्या' व्यक्तिबद्दल खूप आदर वाटला. तो पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला.
आजच्या घटनेने त्याच्या मनांत भविष्या बद्दल चिंता निर्माण झाली. काम तर करावंच लागणार आपल्याला. पण आताशी ओझे उचलले जात नाही. दिवसेंदिवस शरीर तर थकत तर चाललंच आहे, पण मनावरही मरगळ यायला लागली आहे. मात्र आयतं बसुन खाणं काही आपल्या नशीबात नाही. कट्टे उचलण्या ऐवजी आपल्या वयाकडे बघून एखादं हलक फुलकं काम शेठजींनी आपल्याला दिलं तर ...!
"आपल्या आयुष्याचे सरते दिवस आले तरी काबाडकष्ट काही संपले नाहीत. लहानपणापासून पोती उचलत आहे, आणि अजूनही तेच काम करत आहे. त्याला त्या सद्गृहस्थांचं बोलणं आठवलं. त्यांच्यासारखीच आपल्यावरही कोणाची तरी कृपा व्हायला पाहिजे होती. आयतं बसून खाता आलं असतं." आणि त्याच्या मनांत 'त्या' महाराजांच्या दर्शनाची आस निर्माण झाली. त्याने शेठजीनां विचारले, "कुठं हायजी थे महाराजांचे मंदिर?"
शेठजींनी त्याला मंदिराचा पत्ता सांगितला व म्हणाले "जा परवा तिथे महाप्रसादाला !"
शिवाने "हो" म्हणून मान डोलावली.
दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला पण थकल्यासारखे वाटत होते. त्याच्याने त्या दिवशी काम होईना. शेठ म्हणाले, "शिवा उद्यापासून तु कामावर येऊ नकोस. आता तुझ्याच्याने काम झेपत नाही. मी दुसरा तरुण व्यक्ती ठेवलाय कामासाठी. उद्या त्या मंदिरात जा. तिकडे काम न करताही कोणी दोन पैसे ठेवेल तुझ्या हातावर!"
अचानकपणे शेठजी बोलले आणि शिवावर जणू डोंगरच कोसळला. "कामच नाही तर, असे एकदम कामावरून काढू नका न शेठजी. एवढ्या वर्षांपासून मी तुमच्याकडे काम करत आहे, छोटे-मोठे कुठलेही काम करेन मी. दोन पैसे कमी दिले तरी चालेल. पण मला कामावर ठेवा. नाहीतर मी माझ्या बायकोचं पोट कसे भरु? आता या वयांत मी कुठं काम शोधु ?" शेठजीनां वारंवार विनवणी करत हात जोडून तो म्हणु लागला.
शेठजींनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. "गण्या, हे पोतं उचल." म्हणून शेठजींनी एका तरुण व्यक्तीला आवाज दिला.
संध्याकाळ पर्यंत दुकानाबाहेर रिकामा बसुन राहून शिवा घरी निघाला. चालतांना त्याचे डोळे भरुन येऊ लागले. आता बायकोला काय सांगणार. तीही दोन वर्षांपूर्वी धुणं-भांडी करायला बाहेर जायची. परंतु कोणीतरी तिला गाडीने ठोस मारली आणि अपंगत्व आले. घरातले सर्व काम ती घुसत घुसतच करायची. पोरांची लग्न लावून त्यांचा वेगळा संसार थाटून दिल्याने आता ती दोघंच एकमेकांना सोबती होती !!काय करावे, त्याला सुचत नव्हते.पोटापुरते कमावण्याच्या नादात आजचं तर झालं. उद्याची चिंता करण्यात कधी मंदिराकडे पाय वळलेच नाहीत. आणि आपलं ओझं दुसऱ्यावर लादणं कधी जमलंच नाही आपल्याला. पण आता उद्या महाराजांच्या मंदिरात महाप्रसाद आहे, तिथे जायला हवं. येतांना बायकोसाठी पण प्रसाद घेऊन येऊ. चला ! उद्याच्या जेवणाची तर चिंता मिटली ! महाराजांचे दर्शन घेऊन हात जोडून त्यांच्या समोर गाऱ्हाणं मांडु आपलं. काहीतरी मार्ग निघेल. या विचारांनीं त्याच्या मनावरचं ओझं थोडं कमी झालं. तो घरी पोहचला आणि जेवण करून शांत मनानं झोपी गेला.
दुसर्या दिवशी सकाळी उठुन आंघोळ वगैरे करून शिवा महाराजांच्या मंदिरात पोहचला. दुरूनच त्याने पाहिले, मंदिराबाहेर, सभामंडपात सगळीकडे भक्तांची गर्दीच गर्दी दिसत होती. गर्दी कमी झाली की आपण आत जाऊन दर्शन घेऊ. म्हणुन तो मंदिराच्याबाहेर झाडाखाली बसला. मंदिराबाहेर भीक मागणाऱ्यांची रांग लागलेली होती. आपल्या अवतारावरून कुणीही आपल्याला याचकच समजेल असे त्याला वाटले, पण असे काम न करता पैसे घेणं त्याच्या मनाला पटणार नव्हतं. त्याचे लक्ष सभामंडपाच्या बाहेर ठेवलेल्या भक्तांच्या पादत्राणांच्या भल्या मोठ्या ढिगाऱ्याकडेे गेले. एवढ्या मोठ्या ढिगार्यात नेमक्या आपल्याच पादत्राणांचा जोड शोधणं भक्तांना कठीण जात होतं.
इतक्यात, कोणीतरी त्याच्या पुढ्यात नाणं टाकलं. शिवाने त्या व्यक्तीकडे बघितलं; "दादा" म्हणून आवाज देऊन थांबवलं आणि खाली वाकून पटकन आपल्या उपरण्याने त्या व्यक्तीचे बुट साफ करु लागला.
"अरे ! हे काय करतोस?" म्हणून त्या व्यक्तीने त्याला हात धरून उठवले आणि म्हणाले, "अरे वेड्या, सेवा करायची तर महाराजांची कर. माझी नको."
"पण साहेब मला अस फुकट पैसे घेणं आवडत नाही. काम करून पैसे कमावणारा आहे मी.
"अरे ठेव ते पैसे. तुझ्या हाताने तू अजून कोणा गरजूला दे तेेे" असे म्हणून ती व्यक्ती पुढे निघून गेली.
त्या व्यक्तीचे बोलणे शिवाला अस्वस्थ करू लागले. काय सेवा करू मी महाराजांची ? माझ्या अवतारावरून मला कोणी मंदिरातही जायलाही मज्जाव करेल. नको,नको. अपमान होण्यापेक्षा आपण बाहेरच थांबावं. गर्दी कमी झाल्यावर आत जाऊ. पण मंदिरात येणाऱ्या भक्तांची वाढती गर्दी बघून तो अचंबित झाला होता. अबब, किती हे भक्तगण !! नक्कीच महाराजांच्या सेवा केल्याने काहीतरी कृपा होत असेल. म्हणून तर एवढे सगळे येतात इथे दर्शनाला. पुन्हा त्याचे लक्ष पादत्राणांच्या ढिगाऱ्याकडे गेले. एक आजोबा केव्हापासून आपले एक पादत्राण हातात धरून दुसरं शोधत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो पटकन उठला आणि त्या आजोबांच्या जवळ जाऊन म्हणाला, "दादा मी शोधून देऊ का तुमच्या पादत्राणांची जोडी, सांगा बरं कशी होती ?" आणि आजोबांनी वर्णनके ल्याप्रमाणे 2-3 पादत्राणे त्याने आजोबांना दाखवली. आजोबांनी त्यांचा मिळालेला जोड घेऊन पायात सरकवला. हात वर करून त्यांनी शिवाला आशीर्वाद दिला. शिवाला मनोमन खूप छान वाटलं. आपण कुणाची तरी मदत शकलो याचे त्याला समाधान वाटले. लहानपणापासून आपल्याला कामासाठी बोलणंच ऐकावं लागतं होतं. पण आज निस्वार्थ भावाने आपण कुणाची तरी मदत केली आणि त्यांनी आपल्याला आशीर्वादासाठी हात वर केला ही गोष्ट शिवाला सुखावून गेली. शिवाचे तो करत असलेले काम बघून बाकी भक्तांना वाटले, हा इथला सेवेकरीच असणार. ते हीे मग त्याला आपल्या पादत्राणांची जोडी शोधून देण्यास सांगू लागले. आणि तोही निस्वार्थ भावाने प्रत्येकाला मदत करू लागला.
मध्यान्ह झाली ! महाप्रसादाला गर्दी होऊ झाली. त्यानेही महाप्रसाद घेतला. आणि पुन्हा तो आपल्या कामाकडे वळला ! घरी जाण्याचेही त्याला भान राहिले नाही. सायंकाळ झाली. रात्रीचे नऊ वाजले. गर्दी ओसरत आली. दिवसभराच्या दगदगीने तो थकला आणि तिथेच मंदिराच्या पायरीवर बसला. त्याची नजर समोर गेली. कुणीतरी त्याला त्याच्याकडे येतांना दिसले. रात्रीच्या वेळेस त्याला चेहरा ओळखता आला नाही. जवळ येतांच त्या व्यक्तीने शिवाला विचारले ... "काय रे शिवा ! थकलास?"
"न्हाई जी" म्हणत तो उठला. त्यांनी आपुलकीनं केलेल्या विचारपुशीने तो सुखावला. तुम्ही कसं ओळखता जी मला? "अरे ,आपण परवा भेटलो नव्हतो कां शेठजीच्या दुकानात? तुझा कट्टा उचलायचा भार कोणी हलका केला होता - विसरलास?"
"न्हाई जी.पण तुम्ही माझी आठवण ठेवली? शिवाच्या शब्दांत आश्चर्य होते. आणि आपोआपच शिवाचे हात त्या व्यक्तीसमोर जोडले गेले.
ते शिवाला म्हणाले, "थकला तर असशीलच. सकाळपासून भक्तांना सेवा देतांना पाहिले आहे मी तुला. निस्वार्थ मनाने तू सेवा देत होतास. त्यांची होणारी गैरसोय नकळतपणे लक्षात आणून दिलीस तु माझ्या. येतोस का इथे उद्यापासून सेवा द्यायला? पादत्राणे ठेवायला लोखंडी स्टँड आणुन ठेवू, म्हणजे व्यवस्थित काम होईल. महिन्याचा पगार मिळेल आणि जेवणाची व्यवस्था पण होईल. येतोस?"
शिवा क्षणभर त्या व्यक्तीकडे बघतच राहिला. त्यांच्या त्या दोन डोळ्यातून असीम कृपेचा वर्षाव होत असल्याचा त्याला भास होऊ लागला. आणि तो स्तब्ध झाला. "दर्शन घेतलेस की नाही अजून?" प्रश्न ऐकून शिवा भानावर आला.
"आता मंदिरात जाउन दर्शन घ्यायची गरज वाटत नाही जी." म्हणत शिवाने पुन्हा एकदा समोरच्या प्रतिभेला नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडले !!
🔹🔹🔹 "आज तरी तु माझ्याकडे 'याचक' म्हणून येशीलच, या अपेक्षेने "मी" आशीर्वादासाठी हात वर करून ठेवला, पण, तु कष्टालाच देव मानलंस, आणि माझा हात तुझ्यासाठी वरच्या वरच राहिला !! 🔹🔹🔹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा