शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

546. जग काय म्हणेल, इकडे लक्ष देऊ तर....????

     एक साधू कुठल्याश्या एका नदीच्या पाणवठ्यावर गेला आणि नदीचं पाणी पिऊन त्यानं आपली तहान भागवली. नंतर नदीच्या काठावरच एका दगडावर डोकं टेकून तो झोपी गेला. पाणवठा म्हटला की पाणी भरण्यासाठी बायका तिथं येणारच. आल्याही. तर त्यातीलच एक दुसरीला बोलली, - 
"पहा! साधु झाला, तरी डोक्याखाली ऊशी घ्यायचा मोह कांही सुटला नाही बघ याचा.
दगडाची का असेना, पण ऊशाला दगड तर घेतलाच ना!"
तिचं ते बोलणं साधूच्या कानावर पडलं तसं त्यानं लगेच डोक्याखालचा दगड फेकून दिला.
आता दुसरी बोलली-
"साधु झाला, पण चीड नाही गेली.. 
अजूनही राग नाही गेला याचा, रागानं पहा ऊशी कशी फेकून दिली." 
तेव्हा साधू विचार करू लागला, की आता काय करावं ?
तितक्यात तीसरी बोलली-
"बाबा! हा तर पाणवठा आहे, इथं तर आमच्यासारख्या पाणी भरणाऱ्या बायका तर येतच राहणार, बोलतच  राहणार, त्यांच्या बोलण्यावर तुम्ही वारंवार आपलं वागणं बदलत रहाल तर तुम्ही तुमची साधना केव्हा कराल?"
परंतु चौथीनं फारच सुंदर आणि एक मोठी अद्भुत गोष्ट साधूला विचारली. ती म्हणाली,
"क्षमा करा, पण मला वाटतंय, तुम्ही सर्व कांही सोडलं परंतु तुम्ही अजून मनावर ताबा  नाही मिळवलाय, ते अजूनही पहिल्यासारखंच वहावत जातंय. जगानं ढोंगी म्हटलं तर खुशाल म्हणू द्या, तुम्ही काहीही झालं तरी, हरिनाम घेत रहा."खरं तर हेच आहे, की नावं ठेवणं हे तर जगाचं कामच आहे.
तुम्ही वर मान करून चाललात तर म्हणतील... 
"गर्विष्ठ झालाय"
खाली पाहून चालाल तर म्हणतील... 
"बघा कुणाकडेच बघत नाही. समोर तर लक्षच नसतं"
डोळे बंद करून चालाल तर म्हणतील ... 
"ध्यानाचं फक्त नाटक करतोय "
चारही बाजूला बघाल तर म्हणतील... 
"बघा कसा सगळीकडे नजर भिरभिरून पाहात चाललाय. सगळीकडे नजर फिरतेय याची."
आणि मग वैतागून तुम्ही डोळे फोडून घेतले तर हेच जग म्हणेल...
"जे कर्म केलं त्याची फळं तर भोगावीच लागणार!"
एक वेळ ईश्वराला प्रसन्न करून घेणं सोपं असतं,
पण जगाला प्रसन्न करणं अशक्य असतं....
जग काय म्हणेल, इकडे लक्ष देऊ तर....???? आपण आपलं ध्यान नाही लावू शकणार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...