आज माझी तेरा वर्षाची लेक नेहा माझ्यावर रागवून शाळेत गेली. आज तिच्या शाळेत गॅदरींग आहे. आज तर तिनं किती खुषीत शाळेत जायला हवं होतं पण झालं भलतचं.
“आई, तू फार दुष्ट आहेस. You don't care. You don't understand anything.”
हे नेहाचे गाडीतून उतरताना बोललेले शब्द माझ्या हृदयात अणकुचीदार शस्त्रा सारखे घुसले आहेत. क्षणभर आपण केलं ते बरोबर का चूक हा प्रश्न माझ्या मनात निर्माण करून गेले आहेत. मी खरच फार strict parent आहे का? मी ही परिस्थिती वेगळ्या प्रकारे हाताळली असती तर ती एवढी रागावली असती का? माझे काही चुकलं का? आज मी तिला गॅदरींग साठी आणलेला नवा ड्रेस घालू दिला नव्हता म्हणून ती माझ्यावर रागावली होती. ओरडली, रडली पण मी बधले नाही. आज मी तिला नवा ड्रेस घालू दिला नाही कारण ती घरातील एक नाही तर दोन वडीलधाऱ्या व्यक्तींना वेडेवाकडे बोलली आहे.
रमाबाई आमच्या घरी गेली ४० वर्षे भांडी घासायला व धुणे धुवायला आहेत. स्वतःचे सर्व आयुष्य त्यांनी आमच्यासाठी श्रम करण्यात घालवले आहे. कामाची बाई न राहता त्यांनी घरातील वयस्क व्यक्तीचा मान त्यांच्या कष्टाने, श्रमाने व आमच्याबद्दल त्यांना असणाऱ्या आपुलकीने मिळवला आहे. त्यांच्यावर विश्वासाने घर टाकून आम्ही अगणित गोष्टी केल्या आहेत. माझी मुलं तान्ही असताना त्या रात्र रात्र जागल्या आहेत. अशा घरातील वयस्क व सन्माननीय व्यक्तीला माझी लेक वेडवाकडं बोलली कारण गॅदरिंगचा ड्रेस रमाबाईंच्या हातून बरोबर टाचला गेला नव्हता. त्यांनी टाचल्यावरही तो ड्रेस तिला सैल झाला होता. मी तिचा आरडा ओरडा आणि तिने रमाबाईंना ऐकवलेली वाक्ये ऐकताच मी तिला थांबवले. त्यांना “मी चुकले” म्हणून सांग व नमस्कार कर म्हटल्यावर ती माझ्यावर ओरडली. खोलीत ताडताड निघून गेली दार धाडदिशी आपटून लावून खोलीत बसून राहिली. जोपर्यंत ती रमाबाईंची माफी मागत नाही तोपर्यंत ती नवा ड्रेस घालू शकणार नाही असे मी तिला सांगितले आहे.
"माफी मागण्यासारखे मी काहीही केले नाही. त्यांना कालपासून ड्रेस तयार करून ठेवा म्हणून सांगितले होते." असे नेहाचे मत आहे.
तिच्या तेरा वर्षीय मनाचा अहंकार माझ्यावरच्या प्रेम आणि विश्वासापेक्षा मोठा आहे. माफी मागण्यात तिला कमीपणा वाटत आहे. तिचा अपमान झाला आहे.
मी तिची आई आहे म्हणूनच मला तेरा वर्षाच्या मुलीला गॅदरिंगचा नवा ड्रेस घालायचा नाही सांगताना अनंत यातना झाल्या आहेत.
मी तिची आई आहे म्हणूनच मी तिला वडीलधाऱ्यांच्या आदर करणे शिकवत आहे.
मी तिची आई आहे म्हणूनच तिचा “नोकराला ओरडले तर एवढे काय चुकले” हा विचार मला मान्य नाही.
मी तिची आई आहे म्हणूनच मी तिला परमेश्वराने आपल्याला दिलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ रहायला शिकवते आहे.
मी तिची आई आहे म्हणूनच ती सभ्य, समंजस व विचारी घडावी हा माझा प्रयत्न आहे.
मी तिची आई आहे म्हणूनच तिला रडताना बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे.
मी तिची आई आहे आणि हे जग सोडून जाताना मला एक सुसंस्कारित व उत्तम व्यक्ती मागे ठेऊन जायचे आहे.
आत्ता जरी ती रडत, रागावत, मला नावं ठेवत शाळेत गेली असली तरी तिला उद्या समजणार आहे..सोने तावून सुलाखून निघाल्याशिवाय शुद्ध होत नाही. मुल अशा अनुभवातून गेल्याशिवाय एक उत्तम, सभ्य, समंजस व्यक्ती निर्माण होत नाही.
मी तिची आई आहे म्हणूनच मी चुकलेले नाही याची मला खात्री आहे.
ज्या दिवसापासून त्या पाळण्याची दोरी माझ्या हातात आली त्या दिवसापासून हे शिल्प माझ्या परीने उत्तम घडवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ते घडवताना कधीतरी कठोर व्हावे लागणार आहे.
कारण एक दिवस मी फक्त संस्कार रूपाने तिच्या बरोबर असणार आहे!
©® ज्योती रानडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा