सद्या दहा दिवस देव देवतांच्या आगमनाची धूम असल्याने त्यांच्यासाठी मीठाया बनवून जरा दमल्यासारखे झाले होते. म्हणून पोळ्यावाल्या बाईला म्हटलं, पाहुण्यांसाठी म्हणून थोडा शेव चिवडा बनवून देतेस का? तीने शिंगाड्याची शेव बनवायला घेतली. कशी झाली बघण्यासाठी थोडी तिच्या हातावर ठेवली व एक बोकणा माझ्या तोंडात भरला. तीने खातांना म्हटले बेसनापेक्षा ही शेव छान कुरकुरीत लागते. मुलगी पहिल्या बाळंतपणासाठी आली आहे, तीच्या साठी करीन म्हणते. केवढ्याला येत हो काकु हे पीठ ? मी सहजतेने म्हटलं असेल साठ, सत्तर रु. पाव फक्त. त्यावर ती एकदम म्हणाली बापरे, एवढ महाग असतं? त्यासरशी माझा घास घशातच अडकला.
किती सहजतेने मी फक्त साठ, सत्तर म्हणाली. खरतरं एकेकाळी मी पण अशा खडतर परिस्थितीशी झगडतच वर आलेली. पण हिची कथा अधिक संघर्षमय होती. मोठी बहीण अकालीच वारली म्हणून तिच्या तीन लहान मुलांची आबाळ होऊ नये म्हणून तिच्या जागेवर हीचे लग्न लावून दिले. ते कमी की काय म्हणून अजून दोन मुली तीच्या पदरात टाकून आजाराच निमित्त होऊन पतीही कायमचा सोडून गेला. कधीही घराचा उंबरठा न ओलांड-लेली पोराबाळांसाठी बाहेर पडली. माहेरी म्हातारी आईशिवाय कुणी नाही. कसाबसा तोंडातला घास संपवला व एका डब्यात देवासाठी म्हणून बनवलेले थोडे लाडू, पेढे, अनारसे व थोडी शेव व आलेल्या साड्यातून बऱ्यापैकी एक हिरव्या रंगाची साडी काढून तीच्या हातात ठेवली, म्हटलं घे तुझ्या लेकीला दे माझ्याकडून. त्यासरशी तीला एकदम गलबलून आल. म्हणाली हे काय करताय काकु, देवासाठी बनवलेले मला का देता. पाप लागेल ना मला.
मी-अग देव कुठे खातो का काही. आपलीच श्रद्धा. नंतर कुणाला तरी देणारच कि, त्यापेक्षा मी दोन्ही हाथ जोडून भावपूजाच करेन. तसंही मी फार देव देव करत नाही.
संकोचून तीने घेतले व सहज तीचे लक्ष माझ्या पायाकडे गेले. म्हणाली काय झाले काकु पायाला? मी म्हटलं अग, काही नाही सकाळी फिरायला जातांना अंधारात खड्यात पाय मुरगळला. लेप लावत आहे होईल बरा. त्यासरशी म्हणाली, तेल कुठे आहे, द्या लावून देते. बरे वाटेल जरा. मी म्हटलं अग राहू दे. पण मनातून वाटतच होतं, कुणी चोळलं, तर बर होईल. मग मी पण जास्त आढेवेढे न घेता वाटीत तेल गरम करुन तिच्या पुढे पाय केला. ती हळूवारपणे चोळत होती. त्यासरशी माझ्या शरीरात एक सुखद वेदनेची लहर उमटत होती. मी शांतपणे तीचा आत्मियतेने फिरणारा स्पर्श अनुभवत होते. आणि विचार करीत होते, मुलांकडे गेल्यावर हजारो रुपये देऊनही 'स्पा'मधे ऐवढा आनंद येत नाही, त्यापेक्षा कितीतरी पट आनंद ह्या आपुलकीच्या स्पर्शात आहे.
आमच्यातील हे बोलणं हाँल मधे टि.व्ही. पाहात असलेल्या माझ्या यजमानांनी कधी ऐकला कुणास ठाऊक. संध्याकाळी किराणा सामाना सोबत एक शिंगाडा पीठाची पुडी हातात दीली. मी म्हटले आता तर आणलं होतं, परत कशाला.? तर म्हणाले, दे तीला, खातील तीची मुलं पोटभर.
तीन्ही सांजेला देवाजवळ दिवा लावतांना समई च्या त्या मंद प्रकाशात फोटोतील मूर्ती रोजच्यापेक्षा अधिकच प्रसन्न भासली. जणू म्हणत होती....., अग वेडे, माझ्यापुढे रोज कर्मकांडाची सक्तीची दोन तीन तास कवायत करुन पाय, कंबर दुखावून घेण्यापेक्षा दीन दुबळ्यांमधेच मला शोध आणि बघ खरं समाधान, शांती मीळते की नाही?
यालाच देव भेटणं म्हणत असतील का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा