ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन बेंगलुरूला जाण्यासाठी दोन तास आधीच आम्ही इंदोरच्या एयरपोर्टवर येऊन पोहोचलो. वाचण्यासाठी म्हणून बॅगेतून पुस्तक काढत होतो, तितक्यात पंचेचाळीसच्या आसपास असलेली एक तरुणी माझ्यासमोर येऊन उभी ठाकली आणि आनंदाश्चर्याने म्हणाली, “सर, तुम्ही? इकडे कसे? ओळखलंत का मला?......” प्रश्नामागून प्रश्न टाकत होती. मी भांबावल्यासारखं पाहत होतो. तिनेच सांगितले, “सर, मी मृण्मयी. मेडिकलसाठी तुम्हीच तर मला...”
मृण्मयी हे आगळं वेगळं नाव ऐकताक्षणी माझी ट्यूब पेटली. माझ्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू पाहताच ती आम्हा उभयतांना नमस्कार करण्यासाठी वाकली. तेवढ्यात एक तरूण मुलांच्यासोबत आला. मग तिने ओळख करून दिली, “सर, हे माझे पति डॉक्टर राम, कॉर्डियालॉजिस्ट आणि ही आमची मुलं.” असं म्हणतच तिने त्यांना नमस्कार करायची खूण केली. मी त्यांना मध्येच थांबवलं.
त्यानंतर तिने गायनाकॉलिजस्टमधे एमडी कसं केलं, राम तिला कसा भेटला आणि आंबेगावला त्यांचं क्लिनिक कसं सुरू केलं याविषयी ती भरभरून बोलत होती. माझ्याशी संपर्क करण्यासाठी तिने काय काय प्रयत्न केले हे ती सांगत होती.
मी तिला मध्येच थांबवून ‘राधाक्का कुठं असते’ असं विचारलं. “सर, आई माझ्याकडेच राहत होती. गेल्यावर्षी ती कोविडमध्ये गेली आणि मी खऱ्या अर्थाने निराधार झाले. मी डॉक्टर असले म्हणून काय झालं? मी खूप प्रयत्न केले. अखेर नियतीपुढे हात टेकावे लागले.”
मी विषय बदलत इंदोरला येण्याचं कारण विचारलं. डॉ. रामच्या कुणा नातेवाईकाच्या घरी लग्न असल्याने ते दोन दिवसासाठी आले होते. पुण्याच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होताच तिनं तिचं व्हिजीटींग कार्ड दिलं आणि ‘पुण्यात आलात तर अवश्य या’ म्हणून पुन्हा पुन्हा आवर्जून सांगत होती.
ती पाठमोरी होताच.... माझ्या डोळ्यांसमोर पंचवीस वर्षापूर्वीचा तो स्मृतीपट अलगद उलगडला गेला.....
संध्याकाळचे सात वाजले होते. जवळजवळ सगळा स्टाफ निघून गेला होता. केबिनवर टकटक करून विसूभाऊ लगबगीने आत आले. त्यांच्यासोबत एक चुणचुणीत मुलगीही होती. त्यांच्या हातात लहानसा पेढ्यांचा बॉक्स होता. "सायेब, ही माझी ल्योक हाय. मृण्मयी. दहावी परीक्षेत पास झालीय. तुम्हास्नी पेढे द्यायला आल्तो."
एक पेढा घेऊन मी त्यांना बसायला सांगून फाईली आवरत होतो. तितक्यात तिने तिची मार्कशीट दाखवली. तिला चक्क ९६% मार्क होते. गणित आणि सायन्समध्ये पैकीच्या पैकी. मी उत्स्फूर्तपणे म्हणालो, "व्वा, खूप छान. अभिनंदन बेटा तुझं. विसूभाऊ, कन्येला खूप चांगले मार्क मिळाले आहेत. विसूभाऊंचे डोळे आनंदाने भरून आले.
मी पटकन पुढचा प्रश्न टाकला,
“अहो, लेकीचं असं एवढी अवघड नाव कसं ठेवलंत?" त्यावर विसूभाऊंची कळी खुलली "त्याचं असं हायं सायेब, आमच्या लग्नाला आठ वरस झाली व्हती. घरात पाळणा हलत नव्हता. मग म्या प्रभू रामचंद्रालाच साकडं घातलं. मुलगा झाला तर रामचंद्र नाव ठेवीन म्हनून. पन रामानं आमच्या पोटी ही ल्येक पाठवली. मंग म्या म्हनलं, राम न्हाई तर न्हाई. लेकीचं नाव सीता ठिवतो. पन हिची आई सीता नावाला कबूल हुईना. का म्हनलं तर तिच्या नशीबी वनवासच यिल म्हून. मग म्या तुमच्यासारख्या एका शिकलेल्या माणसाकडनं सीतेची आनिक कंची नावं हायेत म्हनून इच्यारून घेतलं. त्येनी हे एक नाव सांगितलं. मातीत सापडली म्हनून मृण्मयी. माझ्यावानीच हिची आईबी अडाणी. गुमान बसली.
बरं ते असू द्या सायेब. ही पोरगी सायन्सला जायचं म्हनतीय अन हिची आई पुढं शिकवायलाचं नगं म्हनतीय तवा काय करायचं ते तुम्हास्नी इच्यारायला आल्तो.”
मी तिला सायन्स शाखेत प्रवेश घ्यायला सांगितलं. मृण्मयीचे विलक्षण बोलके डोळे आनंदाने चमकले.
“बराय सायेब, म्या तुमच्या शब्दाभायेर न्हाई” असं म्हणत विसूभाऊ निघून गेले.
विसूभाऊंची आमच्या शाखेच्या जवळच एक चहाची टपरी होती. विसूभाऊ आणि राधाक्का सकाळी नवालाच येऊन स्टोव्ह पेटवून चहाला आधण ठेवायचे. दिवसभर वाफाळत्या चहाचे किती तरी कप भरले जायचे, ते कळायचंच नाही. त्या भागात आलेले लोक हमखास विसूभाऊंच्या चहाचा आस्वाद घेऊनच पुढे जायचे. सगळंच टापटीप आणि स्वच्छ. विसूभाऊ एकदम शिस्तीचा आणि निर्व्यसनी माणूस.
जवळच्याच कॉलनीत एक रिसेल फ्लॅट विकत घेताना त्यांना मी बॅंकेकडून एक लाखाचं कर्ज मंजूर केलं होतं. त्यावेळी वारसदारांची नावं घेताना त्यांना एक मुलगी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कोळशाच्या खाणीत रत्न लाभावं तसं विसूभाऊंना कन्यारत्न लाभलं होतं. धावक जसं लांब लांब ढांगा टाकत पळतो तसं विसूभाऊ दर महिन्याला एकाचवेळी दोन किंवा तीन हप्ते धडाधड भरत होते. आणि एके दिवशी विसूभाऊ कार्डियाक अरेस्टने झोपेतच गेले.
जगरहाटी थांबत नाही. राधाक्का एका मुलाला मदतीला घेऊन त्याच जोमात चहाची टपरी चालवत होत्या आणि त्याच धडाक्यात कर्जाचे हप्ते भरत होत्या.
संध्याकाळचे सहा वाजत होते. “साहेब, राधाक्का त्यांच्या मुलीसोबत तुम्हाला भेटायचं म्हणत होत्या. केव्हा यायला सांगू?” शिपायानं येऊन विचारलं.
“सात वाजता यायला सांग. आणि एक काम कर. एक पुष्पगुच्छ आणि पाव किलो पेढ्याचा बॉक्स घेऊन ये.” असं सांगून त्याच्या हातात पैसे दिले. बारावी सायन्सला मृण्मयीचं नाव मेरिट लिस्टमध्ये आल्याचं मला सकाळीच कळलं होतं.
त्या दोघी सात वाजता केबिनमध्ये आल्या. मेरिटमध्ये पास झालेल्या मृण्मयीचा चेहरा कोमेजून गेला होता. तिचे चमकदार बोलके डोळे विझल्यासारखे वाटत होते.
“सायेब, या मुलीच्या डोक्यात डाकटर व्हायाचं खूळ भरलंय. मी कितीबी राबले तरी डाकटरकीचा खर्च माझ्याच्यानं झेपणार हाये का? म्या तर दहावीलाच बास कर म्हनले हुते. हिच्या बापानं पुढं शिकायला पाठवली. म्या म्हनलं त्यो खर्च आपल्यास्नी झेपायचा नाही. ते बीएस्शी का काय म्हणत्यात ते कर. दिवसभर हिथं कॅंटिन चालवून तुला शिकवीन म्हनलं. हात पिवळे करून कुन्या रामचंद्राच्या हातात सोपवून धुमधडाक्यात तुझं लग्न करून दिईन म्हनलं. पन न्हाई. दिसभर बापाची आठवन काढत रडत बसलीया. तुम्हीच सांगा हिला काईतरी."
"राधाक्का, नवरा जरी राम असला तरी त्या मृण्मयी असलेल्या सीतेच्या नशीबीसुद्धा वनवास आलाच होता ना? त्या सीतेला वाल्मिकी मुनींच्या आश्रमात तरी आश्रय मिळाला होता. हिला कोण आहे? बिचारी बापाविना पोर...." मी नकळत बोलून गेलो, त्यासरशी मृण्मयीचे डोळे पुन्हा भरून आले. आईच्या खांद्यावर डोकं टेकवून तिनं मनसोक्त रडून घेतले. पटकन डोळ्यांतले अश्रू पुसत ती म्हणाली, “सर, मला लग्नाच्या आधी स्वावलंबी व्हायचं आहे. शिकून मोठं व्हायचं आहे. त्यानंतर माझ्या आईसकट मला स्वीकारणारा राम भेटला तरच मी लग्न करेन. तोपर्यंत लग्नाचा विचारही करणार नाही. मला नुसतं पदवीधर व्हायचं नाहीये. मला डॉक्टर व्हायचं आहे. आता तूर्त मला मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी प्रशांत सरांचा कोचिंग क्लास लावायचा आहे. सांगा हिला. मी प्रवेश परीक्षेत मेरिटमध्ये आले नाही तर ती सांगेल ते करीन हा माझा शब्द आहे."
“सायेब, एकीकडे कर्जाचे हप्ते भरतेच आहे. कोचिंग क्लासची फी कुठनं भरू सांगा?”
“राधाक्का, तुमची लाडकी लेक बोर्डात मेरिटमध्ये पास झालीय. तिला तिचा मार्ग शोधू द्या. कोचिंग क्लासच्या फीची तुम्ही काळजी करू नका. मी प्रशांत सरांशी बोलतो. माझं ऐका. तिला आता फक्त क्लासला जाऊ द्या. नंतर काय करायचं ते आपण नंतर ठरवू या.” असं म्हणत मी मृण्मयीच्या हातात पुष्पगुच्छ ठेवला आणि पेढ्यांचा बॉक्सही दिला.
मृण्मयी पटकन उठली आणि मला नमस्कार करायला आली. मी म्हटलं, “घरी जा, देवापुढे दिवा लावून पेढ्यांचा बॉक्स ठेव आणि त्याचे आशिर्वाद घे. काळजी करू नकोस, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल.”
ते दोघे बाहेर पडताच मी प्रशांतला फोन लावला. फोन उचलताच “साहेब, या महिन्याचा कर्जाचा हप्ता आला नाही काय? हाऊसिंग लोन की कार लोन? तुमचा फोन आलाय म्हणून विचारतोय.” प्रशांतनं विचारलं. त्यावर मी हसतच म्हटलं, “अरे काही खात्यांची मी काळजीच करत नसतो, त्यात तुझी कर्जखातीदेखील आहेत. बरं ते जाऊ दे, मी तुला दुसऱ्याच कामासाठी फोन करतोय असं म्हणून मृण्मयीविषयी त्याला सांगितलं. फी मध्ये किती कन्सेशन देता येईल ते सांग.”
क्षणभर थांबून तो म्हणाला, “साहेब, ती मुलगी तुमच्या नात्यातली ना गोत्यातली. तिच्या शिक्षणासाठी तुम्ही इतक्या आपुलकीने आस्था दाखवता आहात तर, मलासुद्धा काहीतरी करायला हवं ना? मग माझ्याकडून शंभर टक्के कन्सेशन. तिला प्रवेश फी म्हणून फक्त पाचशे रूपये भरायला सांगा. आणि हो, ती मेरिटमधे आली तर माझे शंभर टक्के वसूल झाल्यासारखेच ना !” असं म्हणत त्याने आपली व्यावसायिकता शाबित असल्याचं सिद्ध केलं.
मृण्मयीची जिद्द कामी आली. ती प्रवेश परीक्षेत मेरिटमधे आली. फ्लॅट बॅंकेकडे तारण होताच. गवर्नमेंट मेडिकलला अॅडमिशन मिळताच तिचं शैक्षणिक कर्ज मंजूर झालं. मृण्मयीवर चोहीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता.
एका शनिवारी संध्याकाळी तिच्या समाजबांधवांच्याकडून तिचा भव्य सत्कार होता. कार्यक्रमाला मलाही निमंत्रण देण्यासाठी मृण्मयीनं सुचवलं असावं. दोघे संयोजक निमंत्रण देण्यासाठी स्वत: बॅंकेत आले. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता घट्ट पाय रोवून उभे राहतात त्यांच्याविषयी मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे.
मी कार्यक्रम स्थळी वेळेवर पोहोचलो. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हार आणि पुष्पगुच्छ देऊन मृण्मयीचा सत्कार करण्यात आला. आपल्या समाजातील एक कन्या स्वत:च्या हिंमतीवर घवघवीत यश मिळवून मेडिकलला प्रवेश मिळवते ह्याचा समाजबांधवांना कोण कौतुक वाटत होते. प्रत्येकजण आपल्या छोटेखानी भाषणात मृण्मयीवर कौतुकाचे गुलाबपाणी मनसोक्तपणे शिंपडत होता.
शेवटी समाजाचे अध्यक्ष उभे ठाकले. बोलता बोलता ते म्हणाले, ‘आपल्या मुली शिकून पुढे जायला पाहिजेत. एका चहा-टपरी चालवणाऱ्याची कन्या असूनदेखील मृण्मयीने जे यश मिळवले आहे, ते यश म्हणजे आपल्या समाजासाठी भूषणावह आहे. मी माझ्याकडून तिला पाच हजार रूपयांची मदत जाहीर करतो आहे. इतर समाजबांधवांना देखील मी मदतीचे आवाहन करतोय. मदत करणार आहात ना?’ असं म्हणताच सभेतल्या कित्येकांचे होकारार्थी हात उंचावले गेले.
सत्काराचं उत्तर देण्यासाठी मृण्मयी उभी राहिली. “माझ्या शाळेत, कॉलेजात सत्कार झाले. परंतु आपल्या समाजबांधवांकडून मायेपोटी, अभिमानापोटी झालेला हा घरचा सत्कार माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. आताच आपल्या अध्यक्ष महोदयांनी माझा उल्लेख चहा-टपरी चालवणाऱ्याची कन्या असा केला. मला त्यात किंचितही कमीपणा वाटला नाही हे मी आधीच नमूद करते. मुळात प्रामाणिकपणे करता येणाऱ्या कुठल्याही व्यवसायाला कमी लेखताच कामा नये. त्याच व्यवसायावर माझे वडील आजन्म स्वाभिमाने जगले. माझ्या पित्याच्या माघारी माझी आईदेखील तीच टपरी त्याच जोमाने चालवून मला शिकवते आहे. या प्रसंगी अध्यक्ष महोदयांनी माझ्यासाठी मदत तर जाहीर केलीच आहे तसंच तुम्हा सर्वांना सहृदयपणे मदतीचे आवाहन केले आहे. मी आपणा सर्वांना नम्रपणे सांगू इच्छिते की मला फक्त तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि सदिच्छा हव्या आहेत. माझ्या स्वर्गीय पित्याला आणि माझ्या आईलादेखील मी असं कुणाच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेलं आवडणार नाही. माझ्या आईबाबांच्या विश्वासार्हतेमुळे म्हणा, आणि मी उत्तम मार्काने पास झाल्याने बॅंकेने मला शैक्षणिक कर्ज मंजूर केले आहे, ते पुरेसे आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नका. जर तुम्हाला शक्य असेल तर, प्राप्त परिस्थितीमुळे व्यवसायात कोलमडून पडलेल्या आपल्या एखाद्या समाजबांधवाला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी मदत करा, त्यामुळे त्याचे एक अख्खे कुटुंब उभे राहिल. धन्यवाद !!”
कितीतरी वेळ टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. एका विनम्र, मृदुभाषिणी असलेल्या मृण्मयीचा मानिनी अवतार मला पहिल्यांदाच पाहायला मिळाला होता.
बेंगलुरूच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होताच आम्ही झपझप पावलं टाकत बोर्डिंग गेटकडे निघालो.
©® व्यंकटेश देवनपल्ली,
बेंगलोर 9535022112
(आवडल्यास शेअर करताना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा