मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

1416. विवाह एक भीषण परीस्थिती

       पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुणतरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीच न झाल्याने वृद्धाश्रमामध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य कंठण्याची वेळ येणार यात शंका वाटत नाही. अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी ही पिढी स्वतःबरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंतांना जन्म देत आहे कारण मुलामुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्तीच्या आयुष्याचे नियोजन करू शकतात. आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे. फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही. कौटुंबिक आयुष्यात बऱी वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे. शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीनजुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे याचा दुराग्रह, हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे. तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे तेही आपणच आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे. 
     खरं तर बायोडाटा बघून किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करून विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल याचा विवाहेच्छुक तरुणतरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा. ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारच आहेत पण सामाजिक संतुलन बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा ह्या बाबी मारक ठरत आहेत. स्त्री - पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते.
आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत. आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आहे.
लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपानसारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे एवढे करून पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याच नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले efforts आणि वाढलेल्या वयाचे काय?
कृपया संवादाचे पुल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल यासाठी काय पावले उचलावीत लागतील याचा मुळापासून विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. 
आज अपेक्षेचे ओझे वाढवून  
नाहक मुला मुलींचे  वय निघून जात आहे याची खंत ना मुलांना ना पालकांना.
आजचा काळ ,आजची परिस्थिती  काही वर्षांनी तशीच राहील हे सांगता येत नाही.आजचा पैसा,सुख,ऐश्वर्य, आरोग्य  काही वर्षांनी तसेच राहील हे सांगता येत नाही.
पालकांनो आणि मुला मुलींनो भविष्याचा विचार करून आजच निर्णय घ्या.
अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजदारीने निर्णय घ्या.योग्य वेळेत,योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या.काळ निष्ठुर आहे,चुकीला त्याच्याकडे माफी नाही.
आणि नंतरच्या पश्र्चातापाला अर्थ नाही.
        किमान आज ज्या मुला मुलींचे वय 35 किंवा 40 झाले आहे त्यांनी तरी पुढील पिढींना ज्यांचे वय 30 च्या आत आहे या लग्न योग्य मुला-मुलींना सांगावे की सर्वच अपेक्षा पूर्ण होणार नाहीत काही आपल्याला स्व कष्टातून पूर्ण कराव्या लागतील. आम्ही खूप अपेक्षा घेऊन लग्न करावयाच्या विचारात होतो पण त्यापेक्षा कधीच पूर्ण झाल्या नाहीत. एकीकडे बंगला आहे तर शेती कमी आहे तर दुसरीकडे नोकरी आहे पण जमीन कमी आहे. जमीन खूप आहे पण नोकरी करत नाही  ( ज्या मुलाला सात किंवा आठ एकरापेक्षा जास्त जमीन आहे तो मुलगा नोकरी करू शकत नाही, कारण एका नोकरदारा एवढे उत्पन्न एवढ्या शेतीतून निघते मग त्याला वाटते की मी नोकरी का करावी.) या सर्वात खूप मोठी जबाबदारी मुलांच्या आणि मुलींच्या आई-वडिलांवर आहे त्यांनी आपल्या मुलांना योग्य जोडीदार बघून लग्न करण्याची मानसिकता तयार करावी.  शेवटी आपण लग्न करतोय का डील ( व्यवहार) करतोय याचाही विचार करावा कारण खूप पैसा बंगला गाडी म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही लग्न पैशाशी करताय का माणसाशी कारण मुलांकडच्या मंडळीला वाटते की मुलगी छान संस्कारी असावी. मुलींकडल्या मंडळींना वाटते की खूप पैसा बंगला गाडी नोकर चाकर या सर्व गोष्टी असाव्यात . मग ठरवा आपण लग्न कोणाशी करतोय एका व्यक्तीशी का प्रॉपर्टी शी ज्यांनी लग्न करतेवेळी आपल्या अटींमध्ये शिथिलता आणली नाही आणि आज ज्या मुला मुलींचे वय 35 किंवा 40 आहे अशांना विचारा ते सांगतील की योग्य वेळी चांगली  स्थळ आली होती आणि आम्ही थोडसं ऍडजेस्ट केलं नाही म्हणून आज हे दिवस येतात. शेवट संसार करत असताना अनेक गोष्टी तुम्हाला अड्जस्ट कराव्या लागतात शंभर टक्के गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतच नसतात.  काही हरकत आहे.
      पालकांनो जरा विचार करा आणि आपण आपल्या मागच्या आयुष्यात डोकावून पहावं आणि विचार करावा की आपल्या मनासारख्या आजपर्यंत 50% तरी गोष्टी झालेल्या आहेत का, निश्चित नाहीत आणि तरीसुद्धा आज आपण एक यशस्वी जीवन जगत आहोत. मग स्थळ पाहतानाच आम्हाला असं असं स्थळ पाहिजे, नंतर करतील हे आम्हाला नको, ऑलरेडी सगळं रेडीमेड पाहिजे.  आपण विचार करत असलेले स्थळ फक्त काल्पनिकच आहे वास्तवात अस स्थळ नसतच मग आपण मृगजळाच्या मागे तर धावत नाही ना याचा थोडासा विचार करावा.  आता थोडसं पाठीमागे पाहिलं तर लक्षात येईल की वीस वर्षांपूर्वी वय 30 होण्या अगोदर मुलींना दोन मुलं असत आणि त्या मुलीचं वय वर्ष35 व्या वर्षी ती मुलं नववी दहावीला असत. आणि आता मुलीचं वय 30-35 झालं तरीसुद्धा  लग्न स्थळ बघणं  चालू आहे. 
 
 एक भीषण वास्तव

1415. कडुलिंबाची फांदी

  "हे घे अमृता" म्हणत त्यांनी लोणच्याची वाटी त्या भगदाड पडलेल्या भिंतीवरून दिली. हसत त्या अमृताला म्हणाल्या, "काय ग, वर्ष झालं असेल नाही का आपल्या मैत्रीला?"
   अमृता म्हणाली, "नाही, वर्ष नाही झालं. पण होत आलं असेल. मागच्या लॉकडाऊन नंतर त्या तुफान पावसात पडलेली ही भिंत आणि मग दिसणारे आपले चेहरे."
     काकु म्हणाल्या," कधी मन एकरूप होत गेले कळलंच नाही. पण बरं त्या कोरोनाच्या दुष्ट काळात जरा सोबत असल्यासारखं वाटलं. गप्पांमुळे मन मोकळं होत राहीलं ना. एकतर सगळेच घाबरत होते एकमेकांकडे जायला आणि फोनवर पण तोच विषय. कोरोनाचा. त्यापेक्षा आपलं मस्तच जमलं. दुपारी दासबोध काय, संध्याकाळी रामरक्षा, आणि तू ही तुळस इथे ठेवलीस हे बरं केलंस. तुझं माझं अंगण जोडलं ना तिने. पण परत तुझं ऑफिस, मग भेटी कमी झाल्या पण ओढ कायम हं."
       त्यांचं वाक्य तोडत अमृता म्हणाली, "आणि ह्या खाऊने तर अजूनच लज्जत वाढवली जगण्याची. किती चव आहे काकु तुमच्या हाताला. मला एकदा घरी येऊन गरमगरम पोटभर जेवायचं आहे तुमच्या हातचं. पण अजून घरी येण्याचे काही योग दिसत नाहीत. तुमच्या त्या रस्त्याचं काम किती रखडलं आहे. तुम्ही कसं करता काही लागलं तर?"
      काकु म्हणाल्या, "अग लागतंच किती दोघांना, आणि फोनवर मागवतो किराणा, भाजीपाला, दूध. आम्ही कुठे जात नाही आणि इथून तुझं घर मला बऱ्यापैकी दिसतं. माझंच ह्या भिंतीआड असल्याने लक्षात येत नसेल तुझ्या. थोडं खोलवर पण आहे ना आमचं घर. जाऊ दे आपले चेहरे दिसतात हेच खूप आहे..."
    "हो ना काकु, आणि माझे डोहाळे तुम्ही ह्या चार महिन्यात हा खाऊ देऊन पुरवत आहात, मला तर आईच्या रुपात भेटल्या तुम्ही."
        हे असं सगळं चालु होतं आणि पाडव्याची चाहूल लागली. पलीकडची काकूंच्या घराची  योजना नेमकी लक्षात येत नव्हती, पण एक कडुलिंबाची फांदी काकूंच्या डोक्यावर होती. अमृताने आदल्या दिवशीच सांगुन ठेवलं, "काकू, उद्या ती फुलं असलेली फांदी मला द्या हं तोडून." काकूंनी फक्त फांदीकडे बघितलं आणि काहीच बोलल्या नाहीत.
      सकाळी सकाळी अमृताने सुंदर रांगोळी काढली, सुंदर जरीची साडी नेसली. नवरोबा सुद्धा तयार झाले. मंद मोगऱ्याचा गजरा केला. गुढी उभारताना सुंदर जरीच्या साडीवर गाठी, गजरा सगळं घातलं आणि कडुलिंब राहिला की ! अमृताच्या लक्षात आलं तशी तिने भिंतीकडे हाक मारली, "अहो काकू, मला तेवढी कडुलिंबाची डगळी द्या ना. माझी गुढी उभारणं थांबली आहे."   
     काकूने, "नाही जमणार गं .." असं उत्तर दिलं आणि अमृताला संताप आला, "अरे काय कमाल आहे ह्या काकूंची. ह्यांना आवडतात म्हणून मोगऱ्याची फुलं रोज देते मी ह्यांना. तुळस त्यांना प्रसन्न करते म्हणून मी ती दोघींच्या मधल्या भिंतीवर ठेवली आणि ह्या एवढी छोटी गोष्ट का देत नाहीत."
       तिची ही बडबड ऐकून नवरा तिला म्हणाला, "अगं, तू जरा शांत हो. नसेल जमत तोडायला त्यांना. म्हणून लगेच, तू केलेल्या उपकारांची लिस्ट काय वाचतेस तू. त्या मोठ्या आहेत वयाने. तुझे तर किती लाड करतात, आणि तू एवढ्या छोट्या गोष्टीवरून लगेच त्यांना वाईट ठरवतेस?? बघू,मी शोधून आणतो."
     अमृता म्हणाली, "नाही. तू थांब. अरे आपल्या कॉलनीत झाडच नाही आहे कडुलिंबाचे. माझं सर्व सर्च करून झालं आहे दोन दिवसांपासून, मॉर्निंगवॉकला गेले होते तेंव्हा. म्हणून तर ह्यांना सांगून मोकळी झाले. चांगल्या ठसठशीत तर दिसतात. एक लांब कडी घेऊन जरा टाचा वर केल्या कि तोडू शकतील त्या फांदी."
     नवरा म्हणाला, "वाद नको, आणि ह्या छोट्या गोष्टीवरून संबंध सुद्धा खराब करू नकोस. जोडायला वेळ लागतो, तोडायला नाही. चल काही बिघडत नाही कडुलिंब नसेल तर. गाठी आणि आंब्याची पानं आहेत ना. तीच बांधू."
    अमृता दिवसभर डोक्यात राग घेऊन होती. आज खरंतर काकु तिला बासुंदी पुरी देणार होत्या. त्यांनी हाक मारली पण अमृताने दारच उघडलं नाही. तिच्या नवऱ्याला मात्र हे वागणं पटलं नाही, आणि काकुंचंही कारण कळेना. खरंच थोड्या उंचीवर ती फांदी होती. दुपारी जेवण आटोपल्यावर त्याने अमृताला बळेच बाहेर काढलं आणि तो काकूंच्या कॉलनीकडे वळला. रस्त्याच्या कामामुळे तसं चालणं अवघड होतं, पण त्याला भीती होती सोक्षमोक्ष जर झाला नाही तर गैरसमजाच्या जाळ्यात हे नातं अडकून संपून जाईल. अंदाज घेत ते त्या जुन्या इमारतीत शिरले. अमृता म्हणाली "कशाला जायचं पण आपण. त्यांनी कधी बोलवलं नाही आपल्याला." 
 त्यावर तो म्हणाला, "अमृता, अगं खाल्ल्या मिठाला तरी जाग. ज्या काकू तुला घासातला घास देतात त्या काकु एका छोट्या गोष्टीला तुला नाही म्हटल्या तर तू इतकी विरोधात गेली त्यांच्या. असा स्वभाव जर राहिला तर आयुष्यात आपण माणसं जोडू शकणार नाही गं. माझ्या आईने मला सांगितलंय कि कोण्या माणसाचा कधी राग आला तर त्याने आपल्यासाठी जे चांगलं केलं ते आठवायचं." 
      बोलत बोलत ते वरच्या मजल्यावर गेले. जरा पडका जुना जिना होता. जुनं कुजलेलं लाकूड असलेली बाल्कनी, त्यात प्लास्टिकच्या डब्यात हिरवागार मरवा सजला होता. दाराशी रांगोळी नव्हती. 'एवढा सण पण साधी रांगोळी काढली नाही. नुसतं आपल्याला शहाणपण शिकवतात ह्या' असं अमृताच्या मनात पण आलं. 
      "काकू" म्हणत दोघांनी हाक मारली. दरवाजा बंद होता. कडी वाजवली तरी बराच वेळ लागला दरवाजा उघडायला. दरवाजा उघडला पण समोर कोणी दिसलं नाही. 
      एकदम खालून आवाज आला, "या या. अहो, लेक आणि जावई आलेत." म्हणत त्यांनी बाजेवर पडलेल्या काकांना हाक मारली आणि त्या खरकत खरकत बाजेकडे गेल्या. अमृता आणि तिचा नवरा सुन्न होऊन बघत होते. काकूंना गुढग्यापासुन पायच नव्हते. काका खूप आजारी दिसत होते पण खोलीत प्रसन्नता होती. छोटयाशा देवघरात छोटी गुढी उभी होती. लहानसा दिवा तेवत होता. अमृताला रडूच आलं आणि ती काकूंच्या गळ्यात पडून रडायला लागली. काकूंनी तिला रडू दिलं. डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, 
"दोन वर्षांपूर्वी पोरगी गरोदर राहिली. तिला डोहाळ जेवणाला आणण्यासाठी मी गेले आणि येताना अपघातात माझे पाय गेले आणि माझी पोटूशी पोरगी जागेवरच गेली गं. ह्यांच दुखणं खूप जुनं. त्यात मी अशी झाले. निराशेचे ढग दाटले, पण पालवी फुटावी तशी तू जीवणात आली. कदाचित देवाची मर्जी. तुला हे सगळं सांगावसं वाटत होतं. पण ओळखीनंतर तू काही दिवसात गोड बातमी दिलीस. मग वाटलं आता काही सांगितलं तर तू दयाळू नजरेने बघशील. काही दिला खाऊ तर तो तुला मला होणारा त्रासच वाटेल. कदाचित तू जसं हक्काने सांगत होतीस 'मला हे खावं वाटतंय' तसं तू बोलली नसतीस. मला माझी लेक दिसते ग तुझ्यात. हे काय तुझ्या डोहळजेवणाची हळूहळू तयारी करतेय." म्हणत काकूंनी पुठ्ठ्याचे हरिण बनवलेले दाखवले. "बघ हरणाच्या गाडीत बसवते तुला." 
   आता तर अमृताच्या नवऱ्यालाही रडू आलं. काका निपचित पडून होते पण ते तोडके मोडके शब्द जोडत बोललेच, "आयुष्यात कितीही संकटं आली तरी हिच्या आनंदाची, उत्साहाची, चैतन्याची गुढी कायम उंच असते. म्हणून तर कठीण काळातही ती छान जगते."
       काकूंनी पटकन दोन वाट्यात बासुंदी दिली. काकूंचं ते पाय नसतानाही सहजतेने जगणं अमृता आणि तिच्या नवऱ्याला पुढच्या जगण्यासाठी खूप काही शिकवून गेलं होतं. "काकू, आज खरा गुढी उभारण्याचा अर्थ कळला हो. खरंच आभार तुमचे."
       काकू म्हणाल्या, "आपल्यातील आत्मविश्वास असा उंच ठेवायचा. स्वतःच्या मनाला असं आनंदाचं रेशीम वस्त्र गुंडाळत रहायचं. आपल्या ऊर्जेची गुढी मग लहरत राहाते."
       दोघे निघाले. काकू निरोपासाठी  दरवाज्याकडे येणार तेंव्हा अमृता म्हणाली, "मागूनच या आपल्याच जागी. दासबोधाची वेळ झाली ना. 
       "हो ना!" म्हणत काकू खरंच मागच्या दरवाज्यात गेल्या. दगड रचून केलेल्या खुर्चीवर अश्या जाऊन बसल्या. अमृताला वाटलं आपण फक्त तो हसरा चेहरा बघत होतो. आता कळलं, हि गुढी किती अवघड मार्गातून तिथे सज्ज असते. तिने काकूंच्या देवघरातील गुढीकडे बघितलं. कुठलाही थाटमाट नसताना गुढी छोटीशी पण प्रसन्न आणि आंनदी दिसत होती. अमृताने दिलेलं छोटंसं मोगऱ्याचं फुल सगळा आसमंत दरवळून टाकत होतं. अमृताला जणू सांगत होतं, तू ही आता ह्यांचं आयुष्य दरवळून टाक. 
      
©स्वप्ना मुळे (मायी), औरंगाबाद.

1414. ॲालवेज ड्रिमिंग

 “वन शार्डने प्लीज” कमलाने वेटरला सांगितलं. तो अदबीनं मान लववून गोलाकार वाईन ग्लासमधे तिची शार्डने घेऊन आला. वाईनचे दोन घोट घेतल्यावर मन थोडं रिलॅक्स झालं असं तिला उगीचच वाटलं. काल कामाला जाताना आईनं एक पाकिट दिलं होतं ते तिनं उघडलंही नव्हतं.
..”कमले, माहिती व फोटो बघ तरी !” आईची लग्नासाठी सतत चाललेली भुणभुण हल्ली वाढली होती.
”बत्तीस वर्षाची झाली आहेस. आता उशीर नको !”
“आई, मी उद्या एकाला भेटती आहे ग! बघू त्यानंतर!” आईला म्हणून ती बाहेर पडली होती.
तिने पर्समधून पावडरचा कॅाम्पॅक्ट काढला व चेहऱ्यावर अलगद पावडर लावली. डाळिंबी रंगाचं लिपस्टिक वरच्या ओठावर लावून ते ओठ मुडपून खालच्या ओठावर आणलं. फिक्या गुलाबी टॅापवर छोटी पांढरी फुलं असलेली कुर्ती सरळ करून ती दाराकडे बघू लागली..
डेट ला उशीरा येणं यात काय शहाणपणा आहे का? डेटिंग प्रोफाईल बनवताना तर सगळे गुणांचे पुतळे असतात. तिथं Very punctual लिहायचं आणि आता वीस मिनिटे मी इथे ताटकळत बसलेय. 6 ft tall लिहायचं आणि असायचं 5’8.. खरं आहे ते लिहायला काय जातं? 
तेवढ्यात दारातून एक व्हिलचेअर आत आली. त्यात एक तिशीतला तरूण बसला होता. खाकी पॅंट, पांढरा टी शर्ट, व्यवस्थित विंचरलेले केस आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामधे तिला काही वेगळच आकर्षण आहे असं जाणवलं.
तो तिच्याकडे बघत म्हणाला, “सॅारी हं..मला थोडा उशीर झाला.”
“अरे देवा! हा अपंग आहे की काय?” तिला धक्का बसला.
त्याला तिचे विचार समजले असावेत.
तो म्हणाला, ” मी राज! मी अपंग वगैरे नाही. हॅार्स रायडिंग हे माझं पॅशन आहे..हॅार्स रायडिंग करताना महिन्यापूर्वी एक ॲक्सिडेंट झाला म्हणून मला सध्या व्हिलचेअर वापरावी लागते.  प्लास्टर निघेपर्यंत! बरं..तुम्ही कुठे काम करता? ॲॅपेक्स इंजिनीअरिंग ना?” त्यानं विचारलं.
“हो ॲपेक्स इंजिनीअरिंग मधे काम करते.. तुमचं स्टार्ट-अप आहे ना?” तो अपंग नाही हे ऐकून तिला बरं वाटलं.
“क्लायमेट क्वालिटी सुधारण्याची कंपनी आहे माझी! देशातलं पोल्युशन कमी केलच पाहिजे ना!”तो म्हणाला.
“हा बघा माझा “ॲालवेज ड्रिमिंग”. त्याने एका देखण्या घोड्याचा फोटो दाखवला..”काठेवाडी घोडा आहे!”
“ॲालवेज ड्रिमिंग”आहे घोड्याचं नाव? तिला मजा वाटली. “मला फक्त अरबी घोडे माहित आहेत.” ती हळूच म्हणाली. 
“काठेवाडी हा अरबी घोड्याचाच प्रकार आहे..बरं..तुम्हाला ॲपेक्स आवडते का? खूप चांगली कंपनी आहे असं ऐकलय” तो म्हणाला.
“नाही आवडत विशेष..कारण ॲपेक्सचं वर्क कल्चर मला पटत नाही. कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग नाही. प्रॅाडक्टचा दर्जा सुधारण्यासाठी रिसर्च नाही. आमचा फिडबॅक नको असतो.. असे बरेच मुद्दे आहेत.” तिनं चष्मा काढून टेबलावर ठेवला.
“मला परत हॅार्स रायडिंग केव्हा जमेल याची कल्पना नाही. डॅाक्टर खात्रीने काही  सांगत नाहीयेत.” तो म्हणाला.
“तुमच्या घोड्याचं नाव “ॲालवेज ड्रिमिंग”आहे ना? मग तुम्ही पण आपण आपल्या घोड्यावरून रपेट करतो आहोत असं स्वप्न बघत रहा म्हणजे ते प्रत्यक्षात येईल.”
त्याला ते आवडलं. “आपण एकमेकाला अहो जाहो नको म्हणायला.. तो म्हणाला. सर्वोत्कृष्ट अश्व पुरस्कारासाठी “ॲालवेज ड्रिमिंग” ला तयार करतो आहे…
कान,चेहरा,बांधा,पाय आणि वागणूक या निकषांवर घोड्यांचे परीक्षण करतात.. ”
“हो का? फारच इंटरेस्टींग! किती वेगळी हॅाबी आहे ही! पण नेमका हॅार्स शो च्या दिवशी घोडा उधळला वगैरे तर?” तिनं कुतूहलाने विचारलं. 
“घोडा हा अत्यंत बुध्दिमान प्राणी आहे. त्याची स्मरणशक्ती उत्तम असते. त्याच्याशी एक जवळचं नातं निर्माण करावं लागतं. त्याचा खरारा करणं, त्याला खायला घालणं, त्याच्याशी गप्पा मारणे..हे सगळं स्वत: केलं की त्याचा मूड, राग, लोभ सगळं समजतं. स्वभाव कळला की मग शो च्या दिवशी त्याला शांत व रिलॅक्सड ठेवता येतं. हेच नातं काय पण कुठलेही नातं बनण्यासाठी वेळ द्यावा लागतो. कष्ट असतात त्यात. नात्याचा प्राजक्त फुलण्यासाठी त्याला प्रेमाचं खत पाणी घालावं लागतं.. राज तिला समजावून सांगत होता. 
ती हनुवटीवर हात ठेऊन ऐकतच राहिली..मनात आलं..किती छान बोलतो हा! 
“मला बघायला मिळेल का “ॲालवेज ड्रिमिंग”? तिनं उत्सुकतेनं विचारलं. 
“नक्कीच”!  त्याचा मूड बघतो आणि कळवतो” राजचं बोलणं ऐकून तिला खुदकन् हसू आलं. “डेटिंग नकोसं वाटतं होतं पण बरं झालं आले ते!” वाटून तिचा चेहरा खुलला होता. 
“कसा होता गं?” नेहमीप्रमाणे लेकीचे हात पिवळे करण्याची चिंता आईच्या प्रश्नात दिसली..
“ठीक” ती म्हणाली पण तिचा खुललेला चेहरा आईच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही. 
आईला वाटायचं आपल्या सुंदर, गुणी, हुशार कमलेला एखादा राजकुमार सफेद घोड्यावरून येऊन उचलून घेऊन जाईल..पण असं काही घडत नव्हतं..
आई बाबांना म्हणाली, ”अहो आपल्या काळात लग्नं किती पटकन ठरायची हो..आता कसली ती डोंबलाची डेटिंग ॲप आणि ते कसलं डेटिंग. आखूडशिंगी बहुदूधी शोधत बसायचं अन मग वय वाढत जातं...सगळं कसं मनासारखं हवं ह्यांना. संसार रथ ओढण्यास प्रेम, विश्वास, सहनशीलता, तडजोड कष्ट असे अश्व जोडावे लागतात.. नाहीतर रथचक्र जमिनीत अडकायला वेळ लागत नाही..
बाबा हसून म्हणाले,”अग, होईल ग! आणि हो..त्या संसाररथाला एक संयम नावाचा सहावा घोडा पण जोड बरं!”आई वैतागून किचन मधे गेली.
कमला राजच्या टेक्स्ट ची वाट बघत होती. आठवडा गेला पण टेक्स्ट आला नाही म्हणून ती हिरमुसली होती. स्वप्न बघू नयेत माणसांनं हेच खरं..तिने How is “Always dreaming” असा टेक्स्ट टाईप केला खरा पण पाठवायचे धाडस झाले नाही.. 
एका सोमवारी ती ॲाफिसला जाताच प्युन म्हणाला, “मॅडम, सरांनी तुम्हाला लगेच भेटायला बोलावलय.” कमलानं केस नीट केले व ती सरांच्या केबिन मधे गेली.  
सरांनी मुद्यालाच हात घातला..
ते म्हणाले,” बस. तुला ॲपेक्सचं वर्क कल्चर आवडत नाही असं कानावर आलं.”
ती गडबडली.. “नाही, नाही सर, असं काही नाही.”
तेवढ्यात राज तिथे चक्क चालत आला. प्लास्टर काढलेलं दिसत होतं.
कमला त्याला पाहून फारच गोंधळली..
सर म्हणाले, “कमला, हा माझा मुलगा राज! ॲपेक्स च्या कामकाजात मला मदत करतो.  त्याचं स्वत:चं स्टार्ट अप सुध्दा आहे.”
ती चपापली. “अरे देवा”..नेमकं सरांच्या मुलालाच आपण सांगितलं आपण की तुमची कंपनी मला आवडत नाही. म्हणूनच याचा टेक्स्ट आला नाही. आता गेली नोकरी.
तिचा गोरामोरा चेहरा पाहून सर म्हणाले, “कमला, अगदी मोकळेपणाने सांग काय वाटतं तुला ॲपेक्स बद्दल?”
कमलाने तिला खटकणारे सर्व मुद्दे सांगितले आणि सरांनी शांतपणे ऐकून घेतले..
“सर, माझं कदाचित चूक असेलही पण मी अमेरिकेत MS करत असताना अशाच कंपनीमध्ये इंटर्नशिप केली होती. तिथलं वर्क कल्चर व आपलं यात मला फार फरक वाटला म्हणून मी हे बोलले.” ती म्हणाली. 
“ठीक आहे. मी विचार करतो.” सर म्हणाले. राज पण लक्ष देऊन ऐकत होता. 
ती केबिन मधून बाहेर पडली. तिला स्वत:चा राग आला होता. राज नेमका सरांचा मुलगा निघावा? आता नवी नोकरी शोधली
पाहिजे. संध्याकाळी घरी येताच तिनं काही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज पाठवण्यास सुरूवात केली.  
अशीच एका संध्याकाळी ती निराश होऊन घरी बसली होती. राज भेटल्यापासून कुणाला भेटावंसही वाटत नव्हतं. त्यात आता नोकरीची खात्री नव्हती व राज कडून काही टेक्स्ट येईल असंही वाटतं नव्हतं. तेवढ्यात बेल वाजली म्हणून बाबांनी दार उघडलं. बाहेर कमलाचे बॅास बघून त्यांना खूप आश्चर्य वाटलं..ते गडबडले. त्यांच्याबरोबर एक देखणा तरूण मुलगा व एक बाई पण आल्या होत्या. 
“कमला, सर आलेत ग!” बाबांनी हाक मारली. ती घाईनं बाहेर आली आणि राज, सरांना व त्यांच्या पत्नीला बघून एकदम गोरीमोरी झाली.
सर हसत बाबांना म्हणाले, “माफ करा..फोन न करता आलो.. आमच्या युवराजांना चैन पडत नव्हतं म्हणून यावच लागलं”..
आम्ही कमलेला ॲपेक्स इंजीनियरिंगच्या मालकिण बाई करून घेण्यासाठी आलो आहोत. अर्थात तुमची परवानगी असेल तरच! 
राजला ती आवडली आहे.. हॅार्स रायडिंग मधे कमलाला खूप इंटरेस्ट आहे हे त्याच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे! तिचा स्पष्टवक्तेपणा त्याला मनापासून आवडला आहे आणि मला तिनं ॲपेक्स इंजीनियरिंग साठी केलेल्या अनेक सूचना खरोखरच आवडल्या आहेत. Excellent feedback!”
कमला लाजून आत पळाली. राज तिच्या बाबांना “ॲालवेज ड्रिमिंग” बद्दल उत्साहाने सांगत होता..आणि आई चकित होऊन कौतुकाने सारे ऐकत होती. 
बाहेर काहीतरी फुर्र फुर्र आवाज येत होता म्हणून त्यांनी खिडकीतून बाहेर बघितलं. दाराबाहेर गडद तांबूस रंगाचा एक रूबाबदार घोडा उभा होता व एक माणूस त्याचे लगाम हातात घेऊन उभा होता. 
“कमलाला “ॲालवेज ड्रिमिंग” ला भेटायचं होते म्हणून त्यालाही घेऊन आलो.” राज म्हणाला व आई बाबा अवाक होऊन बघू लागले.. कमला कपडे बदलून बाहेर आली. 
राज कुजबुजला, “ सुंदर व हुशार मुली त्याला फार आवडतात हं !” ती हसली.  ते बाहेर जाऊन “ॲालवेज ड्रिमिंग”ला भेटून आत आले. इतर काही गप्पा होऊन ती लोकं पुढे काय करायचं ठरवून घरी गेली. आई कौतुकाने लाजलेल्या कमलेकडे बघत राहिली. आज खरोखरच घोड्यावर बसून एक राजकुमार तिच्या गुणी, हुशार कमलेला घेऊन जाण्यासाठी आला होता.
“कमला, घोडा सफेद नाही पण तेवढी तडजोड आई नक्की करेल.. नाही का? ” बाबा मिष्कीलपणे हसत लेकीला म्हणाले.
    कमला हसली व तिच्या खोलीत पळाली. मनाने ती  त्या राजकुमाराची झाली होती ! “ॲालवेज ड्रिमिंग” वर तिला पुढे बसवून तो तिला केव्हाच स्वप्नांच्या राज्यात घेऊन गेला होता !

©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.

1413. मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी

      काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला. एका नव्याकोऱ्या, अलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता. आतुन बाहेरुन, ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, डिझाईनवर, आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते. पण एक प्रयोग म्हणुन ह्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी ठरवले. त्यांच्या सांगण्यावरुन हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी, अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहुन बाजुला काढुन ठेवण्यात आली.  
     आता एक वेगळीच गंमत सुरु झाली. हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहुन हरखुन गेला खरा. पण आल्याबरोबर काही क्षणात त्याचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले. शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली. त्याच्यावर चर्चा केली. ही टाईल बसवायची राहीली का? का ती बाजुला गळुन पडली? ह्यावर तावातावाने वादविवाद झडु लागले. हॉटेल मालकाच्या ह्या एका निष्काळजीपणामुळे हॉटेलच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे, असेही शेकडो जणांनी बोलुन दाखवले. एवढेच नाही, त्या हॉटेलमध्ये आल्यावर पाहुण्यांना कसे वाटले. ह्याविषयी पाहुण्यांना फिडबॅक भरुन द्यायचा होता. त्यामध्ये बहुतांश जणांनी अगदी थोडक्यात हॉटेलची डिझाईन, तिथले इंटेरीअर, तिथले लॅंडस्केपींग आणि तिथल्या महागड्या कलाकुसरीच्या वस्तु ह्याविषयी अगदी थोडक्यात लिहले. आणि मिसिंग टाईल बद्द्ल अगदी भरभरुन लिहले. त्या हॉटेलमध्ये जागोजागी, एकाहुन एक देखणी, आकर्षक शिल्प ठेवण्यात आली होती. पाहतच राहाव्यात अशा सुंदर सुंदर पेंटींग्ज होत्या. आकर्षक रंगसंगती असलेल्या अनेक भिंती होत्या. मानसशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरुन एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर मात्र दोन काळे डाग जाणुनबुजुन ठेवण्यात आले होते. खरेतर ते डाग इतके छोटे होते की एकुण भिंतीच्या दहा टक्के सुद्धा त्यांचा आकार नव्हता.  पण मिसींग टाईल प्रमाणे ह्या डागांकडेही लोकांचे चटकन लक्ष जाऊ लागले. लोक एकमेकांना उत्साहाने ते डाग दाखवु लागले. सगळे काही इतके छान बनवले, पण हे दोन डाग मात्र तसेच राहीले ह्याबद्द्ल आश्चर्य व्यक्त करु लागले. काही काही अतिउत्साही लोक तर फक्त बांधकामातल्या फक्त चुकाच शोधु लागले. एकमेकांना टाळ्या देऊन हॉटेलमधल्या उणीवा सेलेब्रेट करु लागले. शेवटी हॉटेलच्या उदघटनाच्या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगाविषयी खुलासा केला.
      आल्याबरोबर लॉबीमध्ये दिसणारी मिसींग टाईल जाणुन बुजुन काढुन ठेवण्यात आली होती. मोठ्या पांढऱ्याशुभ्र पडद्यावर दोन डाग मुद्दाम उमटवण्यात आले होते आणि माणसांचे ह्या दोन्ही गोष्टींवरचे प्रतिसाद जाणुन घ्यायचे होते. आणि रिझल्ट धक्कादायक म्हणावा असाच होता. हॉटेलमध्ये स्तुती कराव्यात अशा शेकडो, हजारो गोष्टी मांडुन ठेवण्यात आलेल्या असतानाही बहुतांश लोकांनी फिडबॅक फॉर्ममध्ये मिसींग टाईल आणि डागांचाच उल्लेख केला होता. कमतरता शोधणं, पाहताक्षणी चुका काढणं,  दोष काढुन नावं ठेवणं, ही माणसाची वृत्ती जन्मतः असते का? नाही. पण जसजसे आपण मोठे होतो, आपल्याला कमतरता आणि उणीवा शोधण्याची सवय लागते. मग कधी आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात असलेल्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवतो. त्यावर चर्चा करतो. तर कधी आपण स्वतःच्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स मोजत बसण्यात आपली बहुमुल्य उर्जा आणि बहुमुल्य वेळ खर्च करतो.
-------------------------------------------
"मला योग्य ते शिक्षणच मिळाले नाही."
"माझा जन्म गरीब घरात झाला."
"माझा जन्म अशा जातीत झाला, जिथे मला संधीच उपलब्ध नाही."
"माझे आई वडील शिकलेले नव्हते."
"माझ्याजवळ खानदानी संपत्ती नाही, जमीन नाही."
"माझ्या वडीलांनी माझ्यासाठी कसलेच बॅकअप तयार केले नाही, मला भांडवल दिले नाही."
"माझ्याजवळ बुद्धी नाही."
"माझ्याजवळ डिग्री नाही."
"घरच्या परिस्थितीमुळे मी मनासारखे शिक्षण घेऊ शकलो नाही."
"मी दिसायला तितकी सुंदर नाही."
"माझा जोडीदार मला हवा तसा मिळाला नाही, म्हणुन माझी प्रगती शक्य नाही."
ह्या आणि अशा कित्येक मिसिंग टाईल्स शोधणं आणि त्यावर चर्चा करणं, हा मुर्खपणा आहे असं तुम्हाला वाटत नाही का? 
ज्याला आयुष्यात काही मिळवायचे आहे तो आजुबाजुला लपलेल्या संधीकडे पाहणे शोधतो.
ज्याला आयुष्यात काही करायचेच नाही, तो मात्र फक्त काम न करण्याचेच बहाणे शोधतो.

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

1412. डोंगरातला झरा

      टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. उभं राहून अभिवादन करणारी गर्दी खाली बसत नव्हती. निवेदक वारंवार विनंती करीत होता, पण गर्दी अनावर झाली होती. विशेष म्हणजे सगळं व्यासपीठ उभं राहून टाळ्या वाजवत होतं. आणि निओफ्लाय व्हीलचेअरवर बसलेला अभिराम भांबावून गेला होता. भांबावल्या नजरेनं तो सर्वांकडे पहात होता, आणि कौतुकभरल्या नजरेनं सगळे त्याच्याकडे पहात होते. हे सगळं कशासाठी चाललंय. हेच त्याला कळत नव्हतं. अशा सत्काराची , कौतुकाची खरंतर गरज नव्हती. फार मोठं काही केलंय , मोठा डोंगर पालथा घातलाय असंही काही नव्हतं. मग हे सगळं का? कशासाठी? हाच भुंगा त्याचं डोकं कुरतडत होता. सैन्यात जाण्याचं आकर्षण अगदी लहानपणापासून होतं. आणि जाणत्या वयात त्या आकर्षणाला ध्यास लागला तो निरीक्षणाचा, तयारीचा. मिलट्री स्कूल, एन सी सी कॅम्प, पोलीस परेड ग्राऊंडवरच्या परेड, सव्वीस जानेवारीचं दिल्लीतील संचलन. सगळं सगळं डोळे भरून पाहायचा तो. स्वतःला त्या जागी कल्पून परेड करायचा. दहा बाय दहाच्या घरात. भिंती त्याला हसायच्या. फाटके कपडे हसायचे. मोलमजुरी करणारे आई बाबा हसायचे. पण तो सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचा. सगळ्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या नादात, एके दिवशी रस्त्यावरून चालताना फोर व्हीलरने त्याला उडवलं आणि हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळताना त्याच्या लक्षात आलं, आता आपण कायम व्हीलचेअरवर असणार आहोत. आपलं करिअर कायम व्हीलचेअरवर.
       नंतरचे त्याचे दिवस पडझडीचे होते. खंत, नैराश्य, परावलंबनाच्या जाणिवेचा मनाला लागलेला भुंगा. म्हाताऱ्या आईवडिलांचे कष्ट. अस्वस्थता , त्यातून येणारी पोकळी, आणि जगण्याचा निरर्थकपणा. व्हीलचेअरवर बसल्यावर खोलीच्या दारातून दिसणारा आकाशाचा तुकडा आणि आईच्या डोळ्यातून ठिबकणाऱ्या आसवात भिजलेला भाकरीचा तुकडा. त्याला त्या दोन तुकड्यांची सांगड कशी घालावी. हेच उमगत नव्हतं, पण भाकरीच्या तुकड्यासाठी आकाशाची हाक ऐकायला हवी असं त्याला मनोमन वाटत होतं. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचं निरीक्षण करणं हा त्याचा आता छंदच झाला होता. कोण काय करतं, जगण्यासाठी कोण कसं धडपडत या सगळ्याचं निरीक्षण करता करता त्याला अचानक जाणीव झाली. आपण व्हीलचेअर वरून सकाळी, संध्याकाळी घरोघरी पेपर टाकू शकतो, किंवा व्हीलचेअर वरून चहा विकू शकतो. किंवा शाळेच्या गेटबाहेर, किंवा गार्डनच्या गेटबाहेर गोळ्या, बिस्किट्स विकू शकतो, किंवा मिनरल वॉटर च्या बाटल्या विकू शकतो, किंवा हे सगळं वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी. आता त्याला कमालीचा उत्साह आला. आकाशाचा तुकडा हाती आल्याचा भास झाला, पण पुढच्याच क्षणी तो दाणकन जमिनीवर आला. हे सगळं करायचं तर हाताशी थोडं तरी भांडवल हवं. वस्तू ठेवता येतील अशी  व्हीलचेअर हवी. तिला इंजिन हवं. जरा तरी चांगले कपडे हवेत. कोण देणार हे ? मग त्याची फिरंती सुरू झाली. चौकशीसाठी, मदतीसाठी. बँका, दिव्यांगासाठी साठी असणाऱ्या यंत्रणा. आपापले राजकीय झेंडे आणि कॅमेरे घेऊन काही राजकीय पक्षसुद्धा पुढे आले. त्यांचा राजकीय अजेंडा राबवायला सोयीचा माणूस दिसतोय म्हणून पण त्याने त्यांना नम्रपणे नकार दिला. पंधरा वीस दिवस तो वेड लागल्यासारखा फिरत होता. मग्रूर नोकरशाही , नियमांची बेडी पुढं करून त्याला मदत नाकारणाऱ्या आस्थापना, फिदीफिदी हसणारे समवयस्क आणि खच्चीकरण करणाऱ्या समाजातील नारोशंकराच्या नकारघंटा. स्वाभिमान, बाणेदारपणा यांची पदोपदी कसोटी पाहणारा काळ.
      अभिराम पुन्हा हताश झाला.‌ हतबल झाला. कोलमडून पडलेला अभिराम उदास होऊन झाडाच्या सावलीत व्हीलचेअर वर बसलेला असताना देवदूत धावून यावा तसा ' तो ' आला. ' त्या ' च्या हाती पाण्याची बाटली होती. व्हीलचेअर वरच्या तरुणाला तहान लागली असेल म्हणून  ' तो ' कार मधून उतरून आला होता. अभिरामने नकार दिला, पण ' तो ' जिद्दी होता, ' त्याने ' चौकशी केली , बोलतं केलं. अभिरामनं सगळं सांगून टाकलं.
"हे बघ मित्रा...मी फार मोठा पैसेवाला नाही. पण तू उभा रहावास म्हणून मी तुला नक्कीच मदत करीन. देवाच्या कृपेनं तेवढा पैसा आहे माझ्याकडे. तुला हवी तशी व्हीलचेअर, कपडे, विक्रीसाठी प्रारंभिक वस्तू सगळं देईन मी, पण एका अटीवर. मी तुला मदत करतो आहे हे कुणाला सांगायचं नाही. माझी जाहिरात करायची नाही आणि दिलेल्या मदतीची परतफेड करायची नाही. आपली ओळख नाही पण तरीही मित्र म्हणून आपण आजपासून नवं नातं सुरू करू या, हे माझं कार्ड, उद्या आपण भेटू ."
' तो ' निघून गेला आणि अभिराम बघत राहिला. पुढच्या काही दिवसात त्याला हवी तशी निओफ्लाय व्हीलचेअर मिळाली. आणि अभिराम चं नवं आयुष्य सुरू झालं. महिन्याभरानं अभिराम ' त्याच्या ' ऑफिसात पोहोचला आणि एक हजार रुपये त्याच्या पुढ्यात ठेवले.
' तो ' बघत बसला.
" हे काय ? हे पैसे मी घेणार नाही. मी मदत केली होती. कर्जाऊ रक्कम दिली नव्हती. मैत्री माणुसकी म्हणून काही आहे की नाही?"
अभिरामनं त्याला थांबवलं. " तुम्ही दिलेल्या मदतीचा मी अपमान करत नाही. ही रक्कम परतफेड म्हणूनही आणली नाही. माझ्या आई बाबांच्या शिकवणुकीचा हा भाग आहे. डोंगरावर पडणारा पाऊस, डोंगर साठवून घेतो आणि मग केव्हातरी झऱ्याच्या रूपाने पाणी बाहेर येतं. ते अनेकांची तहान भागवत असतं. झरा वाहता होतो . पुढे त्याला अनेक झरे येऊन मिळतात. मग त्याची नदी होते. आणि असंख्याना जगवू लागते. मला हेच म्हणायचं आहे. मी आता स्थिरावेन. पण माझ्यासारखे अन्य कुणी असतील त्यांना मदतीची गरज असेल. त्यावेळी तुम्ही त्यांना हे पैसे देऊ शकाल. म्हणून घ्या...नाही म्हणू नका. झरा वाहू लागला आहे. तो असाच पुढं जाऊ द्या. मी दरमहा तुम्हाला पैसे आणून देत जाईन माझ्या कुवतीप्रमाणे."
' त्याला ' काही कळायच्या आत अभिराम निघून गेला.
' त्याच्या ' ऑफिस मधल्या लोकांनी हे सगळं ऐकलं होतं. ते सोशल मीडियावर कुणीतरी टाकलं. ते खूप व्हायरल झालं, आणि संवेदनशील संस्था एकत्र येऊन त्यांनी अभिरामच्या सत्काराचा घाट घातला, निःस्वार्थी मदत करणाऱ्या ' त्याच्याच ' हस्ते. अभिराम अजूनही भांबावलेल्या स्थितीत होता. कुणीतरी त्याच्या हाती माईक आणून दिला. आणि मनोगत व्यक्त करण्याची आग्रहपूर्वक विनंती केली.
".मला बोलता येतं नाही. पण झरा मात्र माझा आदर्श आहे इतकंच सांगतो. शक्य असेल तर  डोंगरातल्या पाण्याचा आदर्श घ्यायला हवा. आपण कृतीतून झरा होऊ या. आपल्याला अनेकजण मदत करतात. मूलभूत गरजा भागवण्यासाठी अनेकजण पुढे येत असतात. समाज, शासन , सेवाभावी संस्था. आपण मात्र आणखी कोण काय काय देतोय याची वाट बघत बसतो. फुकट मिळणारी प्रत्येक गोष्ट आपण स्वीकारत असतो, मग त्याची गरज असो वा नसो. हे चांगल्या माणसाचं लक्षण नाही. त्यापेक्षा मला जेवढं मिळालं आहे, त्यातून गरज भागली की आपण दुसऱ्याची गरज भागवण्यासाठी काहीतरी द्यायला पाहिजे. झरा वाहता असला पाहिजे, म्हणजे सगळ्यांचीच तहान भागेल. मी जे काही केलं ते अत्यंत क्षुल्लक आहे, पण आपण सर्वांनी दखल घेतली यात भरून पावलो मी."
तो बोलत होता. प्रेक्षागृहात शांतता पसरली होती आणि ती शांतता सर्वांना अंतर्मुख करत होती.
( सत्य घटनेवर आधारित )

डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी, ९४२३८७५८०६ 
आवडल्यास अभिप्राय द्यालच नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही. त्यातून समाज जागृती होऊ शकेल.

1411. प्रेमाचा चक्रव्यूह !

      महाभारतात अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आतपर्यंत गेला पण परत येण्याचे ज्ञान नसल्यामुळे कौरवांनी त्याची हत्या केली हे आपल्याला माहित आहेच.म्हणजेच चक्रव्यूह हे हिंसेचे प्रतिक आहे.मग तुम्ही म्हणाल की याचा प्रेमाशी काय संबंध?
     मुळात प्रेम म्हणजे एक अतिशय उदात्त अशी ईश्वर निर्मित प्रक्रिया.अतिशय पवित्र असे हृदयस्पंदन ! पण टीनएजरमधील मुले भिन्नलिंगी व्यक्तीमत्वाकडे आकर्षित होतात आणि दुर्दैवाने त्या आकर्षणालाच प्रेम समजू लागतात. मग त्यांना बाकी जगाचा जवळजवळ विसरच पडतो. ही एक निसर्गदत्त प्रक्रिया आहे. नशीबाने सरकारचा १८/२१ असे वयाचे बंधन असणारा कायदा आहे म्हणून आईवडीलांचे आपल्या पाल्यावर निदान तोपर्यंत तरी नियंत्रण असते. वयात येणारी मुलं -मुली एकमेकांकडे आकर्षित होतात आणि ते केवळ शारीरिक आकर्षण असते. त्यात कोणतेही पावित्र्य, भल्याबुऱ्याचा विचार नसतो. केवळ बाह्य रुपावर भाळून ते केले जाते. कोणतीही उदात्त अशी भावना त्यामागे शक्यतो नसते. उदाहरणच द्यायचे झाले तर एखादा रुपवान मुलगा केवळ शारीरिक सौंदर्य न पाहता मनाने अतिशय सुंदर असणाऱ्या पण शरीराने कुरुप, अपंग असणाऱ्या एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करेल काय?
एकदा एकमेकांच्या प्रेमात पडले की मग चोरून गाठीभेटी सुरू होतात. मग ते तथाकथित प्रेम फुलवायला मोबाईलचा वारेमाप उपयोग सुरू होतो. आपले आद्य कर्तव्य काय याचा विसर पडू लागतो. जग गुलाबी दिसू लागते. आपले 'पिलू 'किंवा 'बेबी'बरोबर प्रेमाच्या आणाभाका सुरू होतात. "तुझ्याविना जगणे केवळ अशक्य" अशा अर्थाची बोलणी सुरू होतात. हळुहळू या गोष्टी दोन्ही घरी समजतात आणि दोन्ही कुटुंबे प्रचंड तणावात येतात. मग आपला पाल्य सरळपणे सांगून समजला तर ठीक नाहीतर शिवीगाळ, मारझोड चालू होते. काही कारणाने जर एखाद्या मुलीने मागे फिरण्याचा निर्णय घेतला तर तिच्या प्रेमवीराचा इगो दुखावतो ! मग 'माझी झाली नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही 'या जिवघेण्या अट्टाहासापायी आपल्या प्रियतमेवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत मजल जाते!मोबाईलच्या गॅलरीत सेव्ह केलेले मटेरीयल दाखवून ब्लॅकमेल केले जाते ! अशाप्रकारे हिंसेचे आगमन होते. दोन्हीकडचे पालक ही गोष्ट समाजात पसरु नये याची काळजी घेतात. पण कुटुंबाची घडी थोडीफार विस्कटतेच! त्यातही जर मुले सज्ञान असतील तर पशचातापाशिवाय पालकांच्या हाती काहीच उरत नाही !
     लग्न हीच जर प्रेमाच्या यशस्वितेची लक्ष्मणरेषा मानली तर लग्नाअगोदर एकमेकांशिवाय एक क्षणही न जगण्याची शपथ घेणारी जोडपी, कायद्याचा आधार घेऊन, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यानंतर, 'नव्याचे' नऊ दिवस संपल्यावर एकमेकांवर खरोखरच पहिल्यासारखे प्रेम करतात का? अर्थात जे करत असतील त्यांचे मनापासून अभिनंदन ! आता सगळेच नातेवाईक दुरावलेले असतात. जगण्यासाठी प्रेम नव्हे तर पैसा लागतो. संसारोपयोगी वस्तू लागतात. राहण्यासाठी भाड्याने का होईना पण सुरक्षित जागा लागते. त्यासाठीही पुन्हा पैसाच लागतो. जगात कुठलाच माणूस पूर्ण चांगला किंवा पूर्ण वाईट नसतो. ज्यावेळी ठरवून लग्न केले जाते त्यावेळी त्याला एक सामाजिक अधिष्ठान प्राप्त होते. दोन्हीकडचे नातेवाईक एकमेकांना जमेल तितके पारखून घेतात. त्यातूनही काही चुकीचे निघाले तर दोन्हीकडून शक्यतो ते मिटवण्याचे, लग्न टिकविण्याचे प्रयत्न होतात पण ज्यावेळी एखादे 'प्रेमाळू' जोडपे सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न करते तेंव्हा ती दोघेच एकमेकांना जबाबदार असतात. आतापर्यंत 'दूरून डोंगर साजरे 'या उक्तीप्रमाणे, गुडी गुडी वातावरण एकमेकांना फारसे खोलात न जाता बघितलेले असते. घर सोडले की अंगण परदेश या अर्थाची एक म्हण आहे. ज्यावेळी हे नवदाम्पत्य खऱ्याखुऱ्या जगात उतरते. आर्थिक ओढाताणीने ग्रस्त होते तेव्हा छोटेमोठे खटके उडायला सुरुवात होते. भांड्याला भांडे लागते. मग एकमेकांचे माहिती नसलेले दुर्गुण हळूहळू डोकावतात आणि मग हळूहळू प्रेम आटत जाते आणि मी हे काय करुन बसलो याची जाणीव व्हायला सुरुवात होते. उसवलेले शिवायला जवळचे कोणीही नसते ! जर कोणीतरी अशा नवदाम्पत्याची साधारण एकदोन वर्षांनंतर काय परिस्थिती आहे याचा सर्व्हे केला तर अतिशय भीषण वास्तव समोर येईल !
nnnnnअगदी मनापासून एकमेकांवर आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत तितकेच प्रेम करणारीही काही जोडपी असतील. त्यांचे अगदी मनापासून अभिनंदन ! माझ्या एका मित्राची मुलगी.रंगाने सावळी तर तीने ज्याच्यावर प्रेम आणि लग्न केले तो मुलगा गोरापान. लग्नाला बारा वर्षे होत आली पण त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही ! मुलांनो, प्रेम करणे ही अतिशय सुंदर आणि उदात्त भावना आहे. फक्त ते योग्य वयात आणि तोलून मापून करता आले पाहिजे. कारण आयुष्यात रिटेक घेता येत नाही. दुर्दैवाने आपण हट्टाने केलेले प्रेम असफल झाले तर त्याचा आपल्या मनावर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो. जीवन नरक बनते. जगणे अशक्य होते. आतापर्यंत दाताच्या कण्या करुन तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला वाढवलेले असते. त्यांचीही काही स्वप्न असतात. अपेक्षा असतात. त्यामुळे आभासी प्रेमापेक्षा जर आपल्या करियरवर लक्ष दिले तर पुढे जाऊन आपल्या पायावर उभे राहता येते. मग उरलेल्या जीवनाचे तुम्हीच स्वामी असता. स्वभावात प्रगल्भता आलेली असते. मग 'कर लो दुनिया मुठ्ठीमे 'अशा अवस्थेत आपण पोहोचतो. आपल्या हट्टापायी आपलेच नव्हे तर घरच्यांचे ही जीवन उध्वस्त होते. (येथे मी कोणत्याही जातीचा उल्लेख केलेला नाही.)
     जीवन अतिशय सुंदर आहे. पण ते कधी चालू होते आणि कधी संपते हे कळत नाही. त्यामुळे आपला जीवनाचा जोडीदार अतिशय पारखून निवडा. प्रेम जरुर करा पण ते जगण्याला उर्जा देणारे असावे. शक्य असेल तर त्यासाठी विश्वासात घेऊन आपल्या आईवडिलांशी बोला. कारण जगातले कोणतेही आईवडील आपल्या पिलाचे वाईट व्हावे असे कधीच चिंतणार नाहीत. त्यांना तुमचा उत्कर्षच हवा असतो. पालकांनीही हे लक्षात घ्यायला हवे की आपला जमाना गेला. येणाऱ्या लाटेला कोणीही थोपवू शकत नाही. त्यामुळे 'खानदान की इज्जत का सवाल'बाजूला ठेवून आपल्या पाल्याशी मनमोकळेपणाने बोलणे, पुढे येणाऱ्या खाचखळग्यांची त्यांना जाणीव करून देणे  गरजेचे आहे. माझ्या मुलग्याने सगळ्यांच्या विरोधात जाऊन तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. आम्ही आमच्या परीने दोघांनाही समजवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला पण आमच्याही विरोधात जाऊन त्यांनी लग्न केले. त्यावेळी तो डीग्रीच्या शेवटच्या वर्षाला होता. या भानगडीत त्याचे दोन विषय गेले. शेवटी डिप्लोमाच्या आधारावरच नोकरी शोधावी लागली. शेवटी मोठ्या मनाने आम्ही त्यांना जवळ केले. एक सुंदर मुलगी झाली. पण आज त्यांच्यातले ते प्रेम आटले आहे. दोघेही एकमेकांना दोष देताहेत. ज्यावेळी तो आमच्यासमोर आपल्या एकेकाळच्या जिवश्चकंठश्च प्रेमिका असणाऱ्या आमच्या सूनबाईला हाडतूड करतो तेव्हा आमच्या जीवाला खूप खूप वेदना होतात कारण आम्ही शेवटी आईबाप आहोत ! मुलग्याचे आणि सूनेचेही !
त्यामुळे माझी आजच्या तरुण पिढीला कळकळीची विनंती आहे की, प्रेम करा पण डोळसपणे ! प्रेमाच्या चक्रव्यूहात शिरताना शंभरदा विचार करा. कारण यातून परतीचा मार्ग नाही !

1410. हृदयस्पर्शी

 रात्रीचे आठ वाजले होते. मी पाटिल हॉस्पिटलमध्ये ओपीडी पाहत होतो. जान्हवीचा फोन आला, 
"अहो, तुमची ओपीडी संपायला अजून किती वेळ आहे? तुमच्या लेबरच्या पेशंटला थिक म्युकोनिअम निघाले आहे. NST वर फिटल हार्ट रेट पण ड्रॉप होतो आहे आणि हेड अजून बरेच वर आहे. लवकर या." 
म्युकोनिअम निघाले म्हणजे बाळाने पोटात शी केली आहे. म्युकोनिअम आणि बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होणे हे बाळाला गर्भाशयात आॕक्सिजन कमी पडत असल्याची लक्षणे असतात. मी हातातील पेशंट संपवला आणि रस्ता ओलांडून पळत मधूकर हॉस्पिटल गाठले. परिस्थितीचा परत रिव्हू घेतला. बाळाची डिलिव्हरी अर्जंटली करणे गरजेचे होते. 
मी जान्हवीला म्हटले, "तु अर्जंटली पाटिल मॕडमना बोलवून घे. मी नातेवाईकांशी बोलतो. हाऊसमन डॉक्टरपैकी कुणीतरी फोलिज कॕथेटर करा आणि एकाने अँटिबायोटीक द्या. सिस्टर सिझरची ट्रॉली लावा." डॉ अंजली पाटिल या आमच्या भुलतज्ञ आहेत. नातेवाईकांना परिस्थितीचे गांभिर्य समजावून सांगितले. बाळाच्या जिवाला धोका आहे म्हटल्यावर त्यांनी सिझरसाठी सह्या दिल्या. पेशंटला operation theatre मध्ये घेऊन बाकी तयारी सुरू झाली. 
पुढील 10 मिनिटात सगळी तयारी झाली. तेवढयात पाटिल मॕडम आल्या. मी वॉश होण्यासाठी थिअटरच्या बाहेर पळालो. वॉश होताना मी केस रिव्हू करू लागलो. 
26 वर्षाच्या सुप्रियाची ही पहिलीच प्रेग्नन्सी. पेशंट आमच्या जोशी हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट विद्याची भाची. माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे पुण्याच्या दुसऱ्या टोकावरून नऊ महिने मला दाखवायला येत. बाळदमा सोडला तर तिला दुसरा जुना कुठला आजार नव्हता. बाळदम्याचा सध्या काही त्रास नव्हता. तरीही "प्रोस्टोडिन (दम्यात न चालणारे इंजेक्शन) द्यायचे नाही" या खाली मी मनात दोनदा अंडरलाईन केली. नऊ महिन्यात तिचे वजन जरा वेगात वाढले होते. पायावर किंचित सुज होती. रक्तदाब बॉर्डरवर पण नॉर्मल होता.  बाकी बाळाची वाढ चांगली होती. बाळाभोवती पाणी चांगले होते. दुसरा कुठला रिस्क फॕक्टर नव्हता. कळा पण बेताच्या होत्या. बाळाला डिस्ट्रेस का झाला असावा हे कळले नाही. 
बाहेर वॉश होऊन थिएटरमध्ये आलो तर सगळे मॉनिटर कडे पाहत होते.  मी पण पाहिले. मॉनिटर तिचे आॕक्सिजन सॕच्युरेशन 88% दाखवत होता. दुसरे मशीन मागवले. त्यावरही तेच. तिने हाताच्या बोटांना मेहंदी आणि नेलपॉलिश लावलेली होती. मी ती खरवडून काढली. तरी आॕक्सिजन सॕच्युरेशन तेवढेच होते. पायाच्या बोटाला पाहिले तरी तसेच. 
"तुला दम लागतोय का?"
"नाही."
मी पाटिल मॕडमकडे पाहत विचारले, "अस्थमिक स्पाझम आहे?"
"नाही रे. व्हिज नाही. पण थोडे क्रेप्टस् आहेत. कोव्हिड तर नसेल?"
"या दिवासात शक्यता नाकारता येत नाही. असे बरेच असिंप्टोमॕटीक पेशंट येत आहेत. माझ्या परिचयाच्या एका पेशंटला फक्त जराशी अंगदुखी होती. सिटी स्कॕनवर न्युमोनिया स्कोर मात्र 25 पैकी 12 होता." मी बोललो.
"आली तेंव्हा आॕक्सिजन सॕच्युरेशन किती होते?" हाऊसमनकडे पाहत मी विचारले.
"96% होते." हाऊसमन डॉक्टर बोलल्या.
आता आमच्यासमोर धर्मसंकट होते. पेशंट संध्याकाळी इमर्जन्सी अॕडमिशनला आल्याने घेतलेला कोविड स्वॕब अजून फ्रिजमध्ये तसाच पडून होता. आईच्या रक्तात आॕक्सिजन कमी पडत असल्याने आत बाळाला आॕक्सिजन कमी पडत होता. त्याला ताबडतोब बाहेर काढणे आवश्यक होते. मधुकर हॉस्पिटल कोव्हिड हॉस्पिटल नाही. तेथे आॕपरेशनचे PPE किट उपलब्ध होते पण ते घालायला भरपुर वेळ लागतो. बाळाला आर्जंटली बाहेर काढणे गरजेचे असल्याने ते शक्य नव्हते. कोविड असताना PPE किट शिवाय आॕपरेशन केले तर आम्हाला पक्का कोविड होणार होता. तसेच अशा संशयीत कोविड पेशंटचे आॕपरेशन केले आणि नंतर तो वाढत गेला तर नातेवाईक सगळा दोष आमच्या आॕपरेशनवरच टाकणार. आॕपरेशन दरम्यानच काही तरी चुक झाली असा बोल लावणार. अशा अवस्थेत तिला कोविड हॉस्पिटलला पाठवायाचे जरी ठरवले तरी त्यात जो वेळ जाईल त्यात बाळ जाणार हे जवळपास नक्की होते. इकडे आड होता तर तिकडे विहिर!
असे प्रसंग आमच्यासमोर वारंवार येतात. त्याचा प्रचंड ताण येतो. आपल्या एका निर्णयावर एक जीव जगणार की मरणार हे ठरणार असते. थोडी रिस्क घेतली तर जीव वाचेल पण प्रयत्न फसला तर सगळा दोष आपल्या माथी येईल. मग नातेवाईकांना तोंड कसे देणार? आज काल मेडिको-लिगला केसेची भीतीही असते. पत्रकारांना टिआरपी वाढवणारी बातमी मिळते आणि आयुष्यभर कणाकणाने जमा केलेले रेप्युटेशन क्षणात नष्ट होण्याची भीती असते. एकीकडे पेशंटचा जीव तर दुसरीकडे आपले करिअर आणि आपला जीव. असा आवघड निर्णय घेताना विचार करायला पुरेसा वेळ घेण्याची मुभाही नसते. पटकन निर्णय घेतला नाही तर फार उशीर होतो. 
"Covid or noncovid, we have to do it now. Lets do it & save this baby. We have no choice." 
या सर्व प्रकारात आणखी पाच मिनिटे गेली होती. मी नातेवाईकांना परत बोलवून सर्व परिस्थिती समजावून सांगितली. सिझर नंतर आईला पाटिल हॉस्पिटलमध्ये आय सी यू ला शिप्ट करावे लागू शकते याची त्यांना कल्पना दिली. नातेवाईकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. एकीकडे करोना आणि दुसरीकडे आय सी यू च्या खर्चाचा विचार करून त्यांचे चेहरे पांढरे फटक पडले. पण आता जास्त वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. त्यांच्या समोर दुसरा काही पर्यायही नव्हता.
मी पटकन परत वॉश व्हायला गेलो. एकदम एक विचार डोक्यात चमकून गेला. हार्ट डिसिज तर नसेल? पण हार्ट डिसिज मध्ये लाँग स्टँडिंग हिस्टरी असते. अशी हिस्टरी नव्हती. तिला हृदयविकाराची कुठले लक्षणेही नव्हती. तिला प्रेग्नन्सीत कधी दम लागला नाही. मी तर प्रत्येक तपासणीला हार्ट तपासतो. हार्ट डिसिजचे वेगळे आवाज (मरमर) लगेच ऐकू आले असते. काय असेल? काय असेल? आॕक्सिजन सॕचुरेशन कमी का असेल? काय असेल? 
मी वॉश होऊन आलो. पाटिल मॕमने पाठीतून भुल दिली. पेंटिग-ड्रेपिंग झाले. मी जेवढ्या लवकर होईल तितक्या लवकर बाळाला बाहेर काढले. बाळ पुर्णपणे शी मध्ये बरबटलेले होते. पटकन नाळ कापून बाळाच्या डॉक्टरांकडे बाळ सुपुर्द केले. मी गर्भाशयाच्या ब्लिडिंग एजेसला पटपट चिमटे लावले. तिकडून होणारा रक्तस्त्राव पुर्णपणे थांबवला. गर्भाशय लवकर आकुंचन पावण्यासाठी या स्टेजला मी भुलतज्ञांना पिटोसिन आणि मिथार्जीन हे दोन्ही औषधे सलाईनमध्ये एकत्रित टाकण्यासाठी आग्रहाने सांगतो. त्यामुळे वार सुटल्यावर गर्भाशयातून होणारा रक्तस्त्राव अगदीच कमी रहातो. तसे आजही सांगणार तेवढ्यात मनात शंकेची पाल परत चुकचुकली. हार्ट डिसिज असेल तर? मिथर्जिन तर तिच्यासाठी जिवघेणे ठरेल. 
"आज फक्त पिटोसीन टाका मॕडम. मिथार्जीन नको. आणि तिला लॕसिक्स पण द्यावे असे मला वाटते." लॕसिक्स हे शरीरातील पाणी कमी करणारे इंजेक्शन असते. रक्ताचे व्हॉल्युम कमी झाले की हृदयावरचा लोड कमी होतो. 
गर्भाशय अकुंचन पावण्याच्या आधी अधीरपणे प्लासेंटा म्हणजे वार ओढून काढला तर धो धो रक्तस्राव होतो. मला या पेशंटच्या हृदयावर वा फुफ्फुसावर कसलाही ताण वाढवायचा नव्हता. गर्भाशय अकुंचन पावून वार बाहेर पडायला बराच वेळ लागला. पण मी हात धरून शांत उभा राहिलो. तेवढ्यात बाहेरून बालरोगतज्ञ आत आल्या. 
"बाळ चांगले आहे. Cried well on stimulation. 3.7 kg Female baby." जीव भांड्यात पडला.
शेवटी 12 मिनीटांनी वार बाहेर पडला. मग मी गर्भाशय शिवून घेतले. सिझर नंतर वार्डात परत गर्भाशय प्रसरण पाऊन रक्तस्राव होऊ नये म्हणून "हेमन्स कॉम्रेशन सुचर" घेऊन गर्भाशय बांधून टाकले. पुढील आॕपरेशन व्यवस्थित पार पडले. 
डॉ पाटिल अतिशय निष्णात भुलतज्ञ आहेत. त्यांनी आॕपरेशन दरम्यान पुर्ण वेळ रक्तदाब वा हृद्याचे ठोके कमी अधिक होऊ दिले नाहीत. आॕक्सिजन लावल्यानंतर आॕक्सिजन सॕच्युरेशनही 94 ते 96% राहत होते. एकंदरीत डॉ पाटिलांनी पेशंटला उत्तम भुल दिली होती. जान्हवीने नेहमीप्रमाणे उत्तम रितीने आॕपरेशन ॲसिस्ट केले होते. सर्व छान पार पडले. 
आॕपरेशन झाल्यावर आम्ही आॕक्सिजन बंद करून किती सॕच्युरेशन राहते हे पाहिले. ते परत 88-90% पर्यंत कमी झाले. काहीतरी गडबड आहे हे नक्की होते. आम्ही तिला पाटिल हॉस्पिटलमध्ये आय सी यु ला शिप्ट करायचा निर्णय घेतला. नातेवाईकांशी बोललो. त्यांना एकामागून एक धक्के बसत होते. आधी नॉर्मलचा प्रयत्न होता होता सिझर, मग कोविडची शक्यता आणि आता आय सी यु ॲडमिशन. तिच्या माहेरच्या लोकांनी डिलिव्हरी पुरते पैसे कसेबसे जमा केले होते. आता आय सी यु च्या खर्चाचा विचार करून ते हादरलेच. पण आमच्यासमोरही पर्याय नव्हता आणि त्यांच्यासमोरही पर्याय नव्हता. पेशंटला रात्रीतून शिप्ट केले. मी सोबतच गेलो. 
घरी पोहाचायला रात्रीचे पावनेबारा झाले होते. आमच्या समोरील पंचवाघ आज्जींचा वाढदिवस होता. अल्पावधीत आमच्यात खुप जिव्हाळा निर्माण झाला होता. मी केक आणतो आणि बारा वाजता सरप्राईज केक कापू असे मी बापू आजोबांना प्रॉमीस केले होते. पण आम्हाला यायला उशीर घालेला पाहून तिकडे सामसूम झालेली होती. केक सोबत होता. पण त्यांना उठवावे की नाही हे कळेना. शेवटी वाजवली बेल. 
"आलो." आतून लगेच बापूंचा ओळखीचा आवाज आला. बहुतेक जागेच होते. दोघे आमच्या घरी आले.
आधी केक कापला. मग जेवलो. मग कॉफी आणि गप्पा झाल्या. सर्वाना झोपायला पार दोन वाजले.
सकाळी उशीरा जाग आली. उठल्या उठल्या आय सी यु मध्ये फोन केला. रात्रभर ती आॕक्सिजनवर स्टेबल होती. मला सकाळी एक आॕपरेशन होते. मी फटाफट उरकून आॕपरेशनला गेलो. तिथून पाटिल हॉस्पिटलला गेलो.
लितिन पाटिल सरांनी तिला पाहिले होते. मी त्यांच्या केबीनमध्ये गेलो. 
"गोपाळ, तिला एकतर कोविड किंवा पल्मनरी इडिमा आहे. मला पल्मनरी इडिमाच वाटतोय. HRCT, CTPA, 2D Echo, कोविड  आणि कोविड लॕब करावी लागेल."
तिला फुफ्फुसाचा आणि फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांचा सिटी स्कॕन आणि हृदयाची सोनोग्राफी करावी लागणार होती. मी मनात बेरीज करायला लागलो.  सर्व मिळून तपासण्यांचाच खर्च विस हजाराच्या वर जाणार होता. पण पर्याय नव्हता. 
"आपण तपासण्या करून घेऊ सर."
"OK. मी कार्डिओलॉगिस्ट ईश्वर झवर सरांशी बोलतो. ते येऊन इको करतील." 
तोपर्यंत माझ्या IVF ओपीडीला पेशंट आले होते. मी तिकडे जाऊन पेशंट पाहू लागलो. थोड्या वेळाने दोन पेशंटच्या मध्ये पेशंटचा भाऊ आणि पाटिल हॉस्पिटलचे हाऊसमन डॉक्टर आत आले. 
"सर, HRCT आणि CTPA ला सतरा हजार लागणार आहेत. नातेवाईकांजवळ पैसे नाहीत. फक्त HRCT करून घेऊ का?"
"पण पाटिल सरांनी दोन्ही तपासणी सांगितल्या आहेत. निदानच झाले नाही तर उपचार कसे करणार." असे म्हणत मी व्हॉलेट बाहेर काढले. पँटच्या खिशात कालच्या एका आॕपरेशनचे पैसेही होते. सगळे मिळून सतरा हजार झाले. तिच्या भावासमोर मी पैसे धरले. 
"नको नको सर, तुम्ही पैसे नका देऊ. मी कुठूनतरी व्यवस्था करतो. मला उद्यापर्यंतचा वेळ द्या." भावाला गहिवरून आले होते.
"अरे, तपासण्या वेळेत होणे गरजेचे आहे. आता फार विचार करू नकोस. घरच्या कुणाला काही बोलू नकोस. आधी तपासण्या करून घे. नंतर बघू." 
तो नाही नाही म्हणत असताना मी जबरदस्ती त्याच्या हातात पैसे दिले आणि मी पुढील पेशंट पाहण्यात परत गढून गेलो. 
दुपारी मी जेवायला घरी आल्यावर मला पाटिल सरांचा फोन आला. 
"गोपाळ, सिटी वर त्यांना कोव्हिड आणि पल्मनरी इडिमा यात फार डिफरंशीट करता येत नाहीये. आपण कोव्हिड पण पाठवलय. इकोसाठी पण डॉ ईश्वर येत आहेत. बघू."
थोड्या वेळाने मला पाटिल हॉस्पिटल आय सी यु मधून फोन आला. 
"सर, डॉ ईश्वर सर बोलतील...(थोड्या शांततेनंतर)...Dr Gopal Dr Ishwar here. I did her Echo. She has congenitally corrected transposition of great vessels. A very rare condition! 1 in 25000 births. Right & left ventricals have exchanged their positions. Right ventrical is weak ventrical. In her, it pumps blood in high pressure systemic circulation. Right ventrical some how managed till date. But it has finally failed due to combined stress of pregnancy & labour. She is lucky to servive this delivery. I have started her on inj lasix. With fluid depletion she should settle down." 
"बाप रे!" मी इतकेच बोलू शकलो. क्षणात मला सर्व देव आठवले. 
प्रेग्नन्सीमध्ये आईच्या हृदयाला दोन जिवांसाठी रक्त पंप करावे लागते. गरजेप्रमाने शुद्ध रक्त पुरवण्यात अयशस्वी ठरलेले की हृदय फेल झाले असे आम्ही म्हणतो. 
हृदयाचे वरचे दोन कप्पे शरीराकडून रक्त जमा करतात आणि खालच्या दोन कप्प्यांकडे पाठवतात. खालचे कप्पे रक्त शरीराकडे पंपिंगचे काम करतात. हृदयाचा खालचा डावा कप्पा (लेफ्ट व्हेंट्रिकल) अतिशय मजबुत असतो. तो फुफ्फुस सोडून सर्व शरीराला महाधमणी(एओर्टा)तून रक्त पंप करतो. हृदयाचा खालचा उजवा कप्पा (राईट व्हेंट्रिकल) कमी मजबुत असतो. कारण त्याला फक्त फुफ्फुसाला रक्त पंप करायचे असते. 
गावाकडील भाषेत सांगायचे झाले तर लेफ्ट व्हेंट्रिकल दहा हॉर्सपावरची मोटार आहे आणि राईट व्हेंट्रिकल पाच हॉर्सपावरची मोटार आहे. हृदयाच्या डाव्या बाजुला जास्त शेत(संपुर्ण शरीर) भिजवायला लागत असल्याने तिथे दहा हॉर्सपावरची मोटारच लागते. कमी शेत (फुफ्फुसे) भिजवायला पाच हॉर्सपावरची मोटार पुरते. या पेशंटमध्ये मात्र जन्मतः या मोटारींची अदलाबदली झालेली होती. निसर्गाकडून चुकून फुफ्फुसाला दहा हॉर्सपावरची मोटार आणि इतर शरीराला पाच हॉर्सपावरची मोटार जोडली होती. पाच हॉर्सपॉवरच्या मोटारीनी आजवर कसेबसे रान भिजवले होते. पण आता प्रेग्नसीत बाळाचे शेत भिजवायची वाढीव जबाबदारी तिच्या अंगावर पडली. ती सुद्धा तिने कशीबशी पार पाडली होती. पण कळा सुरू झाल्यावर रक्तदाब कमी आधिक होतो. तसेच गर्भाशयाच्या स्नायूंचा व्यायाम चालू झाल्याने त्यालाही जास्त रक्त लागते. डिलिव्हरीच्या कळांमधील हा वाढीव लोड मात्र पाचच्या मोटारीला पेलवला नाही. आता आॕक्सिजनयुक्त रक्ताने अपेक्षित रान भिजवायला ती कमी पडू लागली. तिच्या शरीरात आॕक्सिजन कमी पडू लागला. बाळालाही आॕक्सिजन कमी पडल्याने त्याचे ठोकेही कमी झाले आणि त्यामुळेच बाळाने पोटात शी पण केली होती. इतर वेळी हा आजार सहसा कुठली लक्षणे दाखवत नाही. पण हार्ट वर अती ताण पडला की ते फेल होते. 
संध्याकाळी पेशंटचे रक्ताचे रिपोर्ट आल्यावर पाटिल सरांशी परत बोलणे झाले. तिचा डि डायमर(D Dimer) चा रिपोर्ट 10 पटींनी जास्त आला होता. तो कोविडमध्ये वाढत असल्याने कोविडची शक्यताही नाकारता येत नव्हती. हार्ट डिसिज आणि कोविड एकत्र असतील तर तो डेडली काँबो झाला असता. कोविडचा रिपोर्ट अजून आला नव्हता. 
त्या दिवशी आॕपरेशन थिएटर मध्ये हजर असणाऱ्या सर्वांना कोविडच्या रिपोर्टची काळजी लागली होती. आॕपरेशन दरम्यान  आम्हीला कुणालाही PPE किट घालता आले नव्हते. संध्याकाळी उशीरा तिचा कोविडचा रिपोर्ट आला. निगेटीव्ह होता. सर्वांना हायसे वाटले.
आता तीन दिवसात ती ब-यापैकी रिकव्हर झाली. पेशंटची आर्थिक परिस्थिती पाहून पाटिल सरांनी तिला बिलात मोठा डिस्काउंट दिला. तिला मधूकर हॉस्पिटलमध्ये बाळाकडे शिप्ट केले. दोन दिवसांनी ती आता पुर्ण बरी झाली.  इकडेही बिलात तिला भरपुर डिस्काउंट दिला. मी दिलेले 17 हजार तर मी विसरून गेलो होतो. पेशंट वाचली हिच माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट होती.
या केसमध्ये आम्ही पैशाचा विचार केला नाही. ती बरी झाली पाहिजे हा एकच हट्ट केला. देवाने आमचे मागणे ऐकले याचाच प्रचंड आनंद होता. डिसचार्जच्या दिवशी नातेवाईक बिल भरून माझ्यासाठी थांबले होते. मला त्याची कल्पनाच नव्हती. त्या दुपारी मी मधूकरला वर घरात होतो. संध्याकाळी मी ओपीडीला जायला निघालो तर तिचा भाऊ मला मधुकरच्या बाहेर भेटला. 
"सर. एकदा वर तिच्याकडे चला ना?"
"हो. चल की." आम्ही वर आलो.
"कशी आहेस गं? वर जाऊन भोज्याला शिवून परत आलीस. नशीबवान आहेस तु!"
"डॉक्टर तुमचे खुप खुप आभार! माझ्या बहिणीचा जीव वाचवलात तुम्ही!" भाऊ बोलला.
"करता करवता परमेश्वर! आपण केवळ निमित्त!"
भावाने मिठाईचा बॉक्स पुढे धरला. बॉक्स हातात घेताना बॉक्स खाली काही तरी आहे असे जाणवले. भावाने काहीतरी अरेंजमेंट करून तपासणीसाठी दिलेले सतरा हजार बॉक्स खाली धरलेले होते. 
"घ्या सर. प्लिज घ्या. तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही." त्याला अगदी गहीवरून आले होते. 
मी त्या पैशाचा विचार सोडून दिला होता. पण आता मी पैसे घेतले नसते तर त्याच्या आत्मसन्मानाला आयुष्यभरासाठी ठेच लागली असती. मी बॉक्स आणि पैसे घेतले. त्यातील पाच हजार काढून बाळाच्या हातात ठेवले आणि तेथून बाहेर पडलो. मन अगदी हलके झाले होते.
पाटिल हॉस्पिटलमधील संध्याकाळच्या ओपीडीला जाण्यासाठी गाडीत बसलो. यल्लपाने गाडी सुरू केली. बाहेर दुकानांमधील झगमगटात दिवाळीच्या खरेदीची लगबघ चालू होती. खिडकीतून बाहेत पाहताना दृष्टी परत शुन्यात गेली आणि परत सगळा घटनाक्रम एका पुढे एक डोळ्यांसमोर समोर आला.
या सगळ्या घटनाक्रमात देवाने आम्हाला वेळो वेळी सुबुद्धी दिली. त्यामुळे घेतलेले वैद्यकीय निर्णय आई आणि बाळाच्या जिवासाठी वरदान ठरले होते. 
1) पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे करोनाची भीती न बाळगता तिला पुढे पाठवण्याऐवजी पटकन तिचे सिझर केले म्हणून बाळ वाचले. 
2) निष्णात भुलतज्ञ डॉ अंजली पाटिलांनी आॕपरेशन दरम्यान पुर्णवेळ पेशंटचा रक्तदाब आणि हार्ट रेट स्थिर ठेवल्याने हृदयावर आणखी ताण वाढला नाही. 
3) बाळाच्या डिलिव्हरी नंतर रक्तस्राव टाळण्यासाठी नेहमी दिले जाणारे मिथार्जिन हे इंजेक्शन हृदयविकारात जिवघेणे ठरते. हृदयविकारचे निदान झालेले नसतानाही हे इंजेक्शन न देण्याची बुद्धी आम्हाला झाली.
4) डिलिव्हरीनंतर लगेच हृदय फेल होण्याची दाट शक्यता असते. नेमके त्याच वेळी तिला लॕसिक्स हे औषध दिल्याने ते टळले होते. 
5) तिला लगेच डॉ पाटिल सरांच्या देखरेखीखाली पाठवण्याचा निर्णय अतिशय योग्य ठरला होता. त्यांनी आय सी यु मध्ये केलेल्या उपचारांमुळेच ती वाचली. तेथे हृदयरोगतज्ञ डॉ ईश्वर झवर यांनी हृदयाच्या अगदी रेअर आजाराचे अचुक निदान केल्यामुळे पुढील उपचार आणखी सोपे झाले. 
       सुप्रिया या सर्व प्रसंगातून वाचली व आज घरी गेली. तिच्या वाचण्यामध्ये आम्हा सर्व डॉक्टरांचा किती रोल आहे हे माहित नाही. पण दैवी हस्तक्षेप नक्की असावा अशी माझी समजूत आहे. अशा काही केसेस रोलर कोस्टर राईड देत आयुष्यभरासाठी आठवणी मागे ठेवतात. जगणे समृद्ध करतात.

डॉ गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टीलिटी सेंटर
पाटिल हॉस्पिटल
पुणे

1409. मायलेकीचं गुपीत.

 आज अर्पिता आणि अनिकेत यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने त्यांच्या घरी एक छोटा कार्यक्रम आयोजित केला होता. अर्पिताचे आई वडील, अनिकेतचे आई वडील, दोघांचीही भावंडे आणि इतर काही नातेवाईक असे सगळे जमलेले असतात. केक कापल्यानंतर जेवणाची तयारी होईपर्यंत प्रत्येकजण अर्पिता आणि अनिकेत यांच्या सहजीवनाच्या आठवणी सांगायला लागतो. अनिकेतची बहीण आरती, तिचा दादा आणि वहिनीबद्दल बोलते. नंतर अनिकेतची आई उठते. “आजपर्यंत मी कुणाला काही सांगितलं नव्हतं पण आज मी तुम्हाला आम्हा मायलेकींच एक गुपीत सांगणार आहे.” आरती तिच्याकडे आश्चर्याने बघू लागते. आमचं कोणतं गुपीत आई सांगणार आहे. आमचं असं कोणतच गुपीत नाही.
अर्पिता आणि अनिकेत यांचं love marriage. दोघेही कॉलेज पासून ओळखत होते. नंतर नोकरीला पण एकाच कंपनीत. तसं दोघेही एकमेकांना आवडत होते. पण अर्पितानेच पुढाकार घेऊन प्रेमाची कबूली दिली आणि लग्नाबद्दल अनिकेतला विचारलं. त्यानेही तुझ्यावर माझे प्रेम आहे असं म्हणत होकार दिला. साधारण एक वर्षानंतर दोघांनीही आपापल्या घरी एकमेकांबद्दल सांगितले. दोघांच्याही घरी काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण अर्पिता आणि अनिकेत एकमेकांच्या घरी कधी गेले नसले आणि घरच्यांना भेटले नसले तरी त्यांच्या बोलण्यातून बरेचदा उल्लेख व्हायचा त्यामुळे माहित होते. लग्नाला मान्यता मिळाली.
लग्नाची बोलणी करण्याचा कार्यक्रम अनिकेतच्या घरी ठरला. दुपारी चारची वेळ. अर्पिता, तिचे आई बाबा आणि आजी अनिकेतकडे पोहोचले. अनिकेतच्या घरी तो, त्याचे आई बाबा, बहीण आरती आणि त्याचे मोठे काका काकू असे जमले होते. आल्यानंतर अर्पिताने सगळ्या मोठ्यांना वाकून नमस्कार केला. तसेच अनिकेतकडच्या सगळ्या मंडळींनी अर्पिताच्या आजीला नमस्कार केला.
चहा पाणी, खाणं झालं. अर्पिताला आवडतात म्हणून अनिकेतच्या आईने अळूच्या वड्या आणि मुगाचा हालवा केला होता. अनिकेत कडून तीला अर्पिताच्या आवडी निवडी कळल्या होत्या. आता बोलणी. लग्न कधी, देणी घेणी, मानपान ठरवायचे.
बोलणी सुरु करणार तेवढ्यात अर्पिता म्हणाली, “लग्नाआधी माझी एक अट आहे.” तिच्या आई बाबांना टेन्शन. कारण तशी अर्पिता घरात मोकळ्या वातावरणात वाढलेली. प्रत्येकाला आपले विचार मांडायचे पूर्ण स्वातंत्र्य होते त्यांच्या घरात. त्यामुळे आता ही काय बोलेल याचीच काळजी लागून राहिली त्यांना. “बोल ना बाळा. अगदी निःसंकोचपणे बोल.” अनिकेतच्या आईने सांगितले. “काकू I am sorry. मी थोडं स्पष्टच बोलते. मला खोटं बोललेलं आणि लपवाछपवी करणं आवडत नाही. आमच्या घरी पण प्रत्येकाच्या विचारांना स्वातंत्र्य आहे.” तिचे आईबाबा अजून टेन्शन मध्ये.
“काका काकू, मला अनिकेतने तुमच्या बद्दल खूप सांगितले आहे. त्याचं तुमच्यावर आणि तुमचंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. पण लग्नानंतर मला घरात सासू सासरे नकोत. ही एकच माझी अट आहे.” सगळ्यांना मोठा धक्का बसला. तिचे आईवडील तर रागाने लालबुंद झालेले. कारण स्वतंत्र वातावरण होते. पण अशी शिकवण कधीच दिली नव्हती अर्पिताला त्यांनी. “अगं अर्पिता काय बोलती आहेस?”, अर्पिताची आई. “तुला कळतंय कां? तू काय बोलती आहेस ते?”
सगळ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार चालू केला. अनिकेतला पण मोठा शॉक होता तो कारण ज्या अर्पिताला तो ओळखायचा ती अशी नव्हती. अतिशय मनमिळाऊ, प्रेमळ. मग आज तीला अचानक काय झाले होते?
अर्पिताने सगळ्यांना थांबायला सांगीतले. “काकू मला तुमच्याशी थोडं खाजगीत बोलायचं आहे. आपण आत जाऊ या कां?” “हो नक्की. चल ना. आम्ही आलोच.” असं म्हणून त्या दोघी आतल्या खोलीत गेल्या. दार बंद. इकडे बाहेर. राग, संताप, आश्चर्य, उत्सुकता यांच्या गदारोळात फेऱ्या मारणं सुरु.
आतमध्ये, “अर्पिता. बोल आता बाळा. अगदी मोकळेपणाने बोल”, अनिकेतची आई. “काकू, माझी एक अट आहे. लग्नानंतर मला सासू सासरे नको म्हटलं हे खरंय. पण याचा अर्थ तुम्ही नकोत असा नाही. तुम्ही माझे आई बाबा व्हाल? कारण माणसं वाईट नसतात, सासूसासरे आणि सून हे नाते कलंकित आहे. परस्परात दुरावा आणणारे आहे. मी मुलगी होण्याचा मनापासून प्रयत्न करेन. जसं मी माझ्या आई बाबांशी मोकळेपणाने वागते तसंच तुमच्याशी वागायला आवडेल. कारण संसार फक्त आमच्या दोघांचा नाही. तुम्ही पण त्याचा भाग असणार आहात. आपला सगळ्यांचा असणार आहे हा. मी फक्त तुमच्याशी बोलतेय कारण घरात बायकांचा संबंध एकमेकींशी जास्त येतो. घरातले पुरुष अलिप्त राहू शकतात. आणि दोन बायकांमध्ये पुरुष भरडले जातात. मला हे सगळं नको आहे. माफ करा माझं काही चुकलं असेल तर.” अनिकेतची आई कौतुकाने तिच्याकडे बघत होती. दाखवत नसली तरी तीला आधी आलेले टेन्शन आता दूर झाले होते.
“ठीक आहे. मला मान्य आहे. मी लग्नाला परवानगी देईन. पण माझी पण एक अट आहे. ती तुला मान्य असेल तरच हे लग्न होईल.” आता अर्पिता बुचकळ्यात. “माझी एकच अट आहे आणि ती म्हणजे तू आम्हाला काका काकू नाही म्हणायचे तर आई बाबा म्हणायचे आणि मला अहो आई नाही तर ए आई म्हणून हाक मारायची.” अर्पिता खूश झाली आणि नव्या आईच्या गळ्यात पडली.
“अजून एक आपल्यातले हे बोलणे कुणालाच सांगायची गरज नाही. अगदी तुझा नवरा, माझा नवरा आणि इतर नातेवाईक.” आई अर्पिताला म्हणाली. “आणि लग्न होईतोवर काका काकूच कर आम्हाला. नंतर मी तुला आई बाबा म्हणायला सांगेन. या खोलीतलं हे आपलं मायलेकीचं गुपीत आपल्यातच राहू दे. कुणालाही सांगायचं नाही. अर्पितानेही मान्य केलं.
दोघी बाहेर आल्या. आईने आमच्यात सगळं सॉर्ट आऊट झाले आहे असं सांगितलं. लग्नाला मान्यता आहे आमची. तीने अर्पिताच्या आईबाबांना तीला काही बोलू नका याचं वचनही घेतले. कारण ते मायलेकींच गुपीत अर्पिता त्यांनाही सांगणार नव्हती.
लग्नानंतर अर्पिताने आरतीला पण वहिनी वगैरे म्हणू नकोस. नावानेच हाक मार असे सांगितले.
“तेव्हापासून आजपर्यंत अर्पिता सगळं माझ्याशी share केलं. तीला उशीर झाला तर मी तिच्यासाठी जेवायला थांबते. सकाळचा स्वयंपाक ती करते. संध्याकाळी तीला उशीर होतो म्हणून रात्रीचं जेवण मी करते. वर्षातून एकदा फक्त आम्ही दोघीच वीकएंडला बाहेर जातो आणि एन्जॉय करतो. इतकी वर्ष तुम्हा कुणाचा विश्वास बसणार नाही म्हणून आम्ही हे आमच्यातलं गुपीत कुणाला सांगितलं नव्हतं.  आम्हा मायलेकीच्या नात्यातली वीण आता इतकी घट्ट झालीय त्यामुळे आज हे तुम्हाला सगळ्यांना सांगते आहे.
हे सगळं ऐकून अनिकेत, आरती आणि त्यांचे बाबा चाटच पडले. इतकी वर्षं या सगळ्याची त्यांना एकत्र राहूनही काहीच कल्पना नव्हती. अर्पिताच्या आईबाबाना पण आपल्या मुलीबद्दल आज इतक्या वर्षानंतर सार्थ अभिमान वाटत होता. त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू थांबत नव्हते.

- धनंजय खाडिलकर

1408. शेवटचे रक्षाबंधन

    आज मला रक्षाबंधनाच्या दिवशी योगेश ची आठवण आली.  योगेश. माझा भाऊ, दोन वर्षांनी माझ्यापेक्षा लहान होता.  लहानपणापासून अगदी खोडकर पण तितकाच जीव लावणारा..!! आम्हा दोघा बहिणींचा तो लाडका भाऊ. लहानपणी त्याने कोणाला त्रास दिला नाही? आम्हा बहिणींना तो वेड करून सोडायचा. रोज आईवडिलांचा मार खाल्ल्याशिवाय त्याचा दिवस संपत नव्हता. आज त्याच्या सगळ्या गोष्टी आठवल्या.  लहानपणी अभ्यासाला बसलं की त्याला खोड्या काढल्याशिवाय चैन पडत नव्हत. तो अभ्यास करायचा फक्त आई-वडिलांच्या धाकाने, बाकी आम्ही बहिणी मोठ्या असून सुद्धा तो घाबरत नव्हता, त्याला कारणही तसंच होतं, तो आमचा लाडका  होता.  संध्याकाळच्या वेळेस अभ्यासाला बसलं की हळूच वेण्या ओढणारा योगेश मग आई त्याला फटके मारून बाजूला बसवायची.  जसं जसं वय वाढत गेलं, तो खुप शांत झाला, समजदार झाला. 
       मोठी बहीण मीनाच्या लग्ना मध्ये त्याला नोकरीला लागून तीन वर्ष झाली होती. कोणालाही न सांगता तिला एक तोळे सोन्याचं गिफ्ट आणून सर्वांना त्याने आश्चर्याचा धक्का दिला.  त्याला सरप्राईज द्यायला खूप आवडायचं.  तो नेहमी म्हणायचा, सरप्राईज दिल की प्रेम वाढतं.  मीना लग्नानंतर सासरी निघाली तेव्हा त्याचे डोळे भरून आले होते.
 त्या दिवशी तो माझ्याजवळ खूप रडला. भरल्या डोळ्यांनी मला म्हणाला, "तायडे, मिनी गेली ना,आता घर आपल्याला खायला उठणार. बहिणी घरातून सासरसाठी उंबरठा सोडतात ना, तेव्हा घरातील प्रेम, संस्कार, आपुलकी सगळं सगळं त्यांच्याबरोबर जातं. घरातल्या माणसांना त्या परक करून जातात." 
     मीना  निघाली तेव्हा त्याचे डोळे अश्रू अडवू शकले नाही. तिला मिठी मारत तो हुंदके देऊन रडत होता. 
" मीने,  काळजी करू नकोस, हा भाऊ तुझ्या पाठीशी कायम उभा राहील."
 आणि खरोखर तो शेवटपर्यंत आमच्या पाठीशी उभा राहिला. पुढे दोन दिवस तो लग्नाच्या अति कामामुळे आजारी सुध्दा पडला होता.  मीनाच्या लग्नाच्या वेळी दहा दिवस सुट्टी काढून आलेला योगेश त्याने दिवस रात्री एक केल्या होत्या. काही वर्षांपूर्वी मीनाच्या घरी झालेला कुटुंबातील वाद त्याच्या कानापर्यंत गेला.  योगेश कुणालाही न सांगता सरळ तिच्या सासरी पोहोचला.  मीनाला माहीत होतं योगेश खूप हळवा आहे.  तिच्या नवऱ्याला एकांतात योगेशने हात जोडले. 
"दाजी, काही पण करा पण बहिणीची चूक झाली असेल तर तिच्या चुका पदरात घ्या, तिच्याकडून काही चुकलं असेल तर मी तुमची माफी मागतो ".
 आपल्या बहिणीसाठी कोण चूक, कोण बरोबर या वादात पडण्यापेक्षा विचारा  बहिणीसाठी स्वतःहून माफी मागून मोकळा झाला.  असे भाऊ खूप कमी बहिणींच्या नशिबात असतात. तो कमजोर होता असं नाही, पण एखाद्याच्या प्रेमापोटी कमजोर व्हावं लागतं. एखाद्याच्या सुखासाठी हात जोडावे लागतात.  मग ते वडील असो किंवा भाऊ यांचं प्रेमच वेगळं असतं.  पुढे माझं लग्न झालं, पण दुर्दैवाने मलाही सासरची लोक चांगली मिळाली नाही.  एका वर्षामध्ये मला घटस्फोट देऊन माझा नवरा वेगळा झाला. माझ्यासाठी सुद्धा त्याने त्या लोकांचे हात पाय धरले, त्यांना विनवण्या केल्या पण काहीही फायदा झाला नाही. आई वडील आणि मी, आम्हा तिघांची त्याच्यावर जबाबदारी होती.  एक दिवस असंच तो माझ्या शेजारी बसला आणि अचानक मला म्हणाला 
 "तायडे,मी लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय.."  मी तर भांबावून गेले.
 "अरे, असं वेडपटासारखं काही करू नकोस आणि तू आमची काळजी करू नको, मी आहे आई-बाबांना सांभाळायला." मी त्याला समजावले .
 "तसं नाही गं..."
 "पण मला तुम्हा तिघांची पण काळजी आहे."
 पुढे कित्येक दिवस मी,आई-बाबा आणि मीना आम्ही त्याला समजावून सांगितले पण त्याने कधीही आमचे ऐकले नाही.  तो नेहमी त्याने घेतलेल्या निर्णयावर ठाम असायचा.  तो कदाचित विचार करत असेल की माझ्या लग्नानंतर ह्या तिघांचा सांभाळ मी पाहिजे तसा करू शकणार नाही.  मी जर माझ्या संसारात अडकून गेलो तर यांच्याकडे लक्ष कोण देईल?  माझी घरात आलेली पत्नी, आणि या तिघांचं सूत जमेल का?  कारण यांच्यापासून वेगळं होणं ही कल्पनाच मी करू शकत नाही असं त्याला नेहमी वाटत असेल.  माझी मोठी बहीण आणि माझ्या संसारात आलेल्या अडचणी, त्याने बघितलेली आणि अनुभवलेली विक्षिप्त लोक, कदाचित ह्या लोकांना बघून तो या संसाराच्या दृष्टचक्रात पडू शकत नव्हता.  म्हणूनच त्याने स्वतःचा संसार थाटण्यापेक्षा आमच्या सुखाला जास्त महत्व दिलं. 
     मागच्या वर्षीचा ऑगस्ट महिना !!  खूप वाईट दिवस योगेशच्या नशिबात आला होता.  त्याने कित्येक दिवस दुखणं अंगावर काढल होत.  त्याच्या आजाराचं निदान शेवटपर्यंत होऊ शकलं नाही.  पण जेव्हा कळलं तेव्हा मात्र वेळ निघून गेली होती.  त्याचा ब्लड कॅन्सर हा शेवटच्या स्टेजला पोहोचला होता. केवळ आमच्या सुखासाठी सर्व गोष्टी लपवणारा योगेश आज मात्र आमच्यापासून काहीही लपवू शकत नव्हता.  आम्ही सर्वजण हवालदील झालो होतो.  आम्हा सर्वांना धीर देणाऱ्याचा कॅन्सर पुढे तोच धीर खचला होता.
 बेडवर पडलेल्या योगेश ने मला विचारलं ", तायडे, रक्षाबंधन कधी आहे?
 "अरे, परवाच आहे बघ."
 "मिनी ला म्हणावं राख्या घेऊन ये ".
 मीना त्यादिवशी राखी घेऊन हॉस्पिटललाच झाली.
 मीना त्याची अवस्था बघून खूप रडली.
 आमच्यासाठी कष्ट काढणारा, आयुष्य संपवणारा भाऊ आज त्याच्या स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होता.
 मीना आल्या आल्या तिच्याशी हसून बोलला.
 तिला म्हणाला,"मिने, काहीही झालं तरी चालेल, पण रक्षाबंधन झालच पाहिजे.  आम्ही दोघेही बहिणीने त्याला बेडवर राख्या बांधल्या आणि ओवाळला सुद्धा.  आमच्या दोघींच्याही डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नव्हते.  जगात सगळ्या बहिणींना भाऊ मिळावा तर असा !!  खरंच आम्ही खूप नशिबी होतो, परमेश्वर आपल्या सोबत कोणत्या रूपाने वास करतो हे आम्हाला आज समजलं होतं. आमचा भाऊ परमेश्वराचच एक रुप होत.  असं कोणी का कुणासाठी आपला आयुष्य दान करत?   त्यासाठी तुम्हाला असामान्य व्हावं लागतं. तुम्हाला त्या नात्यात समर्पण कराव लागतं. आमच्या आई-वडिलांची तर परिस्थिती विचारायला नको. ते तर निशब्द होते. 
     रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी योगेश ची प्राणज्योत मालवली. कदाचित त्याला त्याच्या मृत्यूची कल्पना आली असणार, त्यामुळेच तर त्याने मला रक्षाबंधन कधी आहे हे विचारलं.  खरोखर माणसाला आपल्या मृत्यूची चाहूल लागत असेल का?  आपल्या इच्छा तो त्याआधी पूर्ण करून घेतो का?  त्याने घेतलेला लग्न न करण्याचा निर्णय खरोखर योग्य होता का?  अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं त्याने खूप आधीच शोधली होती.  आमचं शेवटचं रक्षाबंधन झालं होतं.  परंतु एक भाऊ म्हणून तो आयुष्यभर यापुढे आमच्या स्मरणात राहणार होता.

©® -प्रकाश फासाटे.
       मोरोक्को.
+212661913052

1407. ह्रदयस्पर्शी

       रात्रीचे ९ वाजले होते. महेशला त्याच दुकान बंद करायचं होत. पण तो वाट पाहत होता. एका बाईची, काय बरं नावहोतं तिचं. महेशने कधी तीच नाव विचारलं नाही. काही दिवसांपूर्वीच महेशने एक शॉप सुरु केलं होतं , तसं ते जास्त मोठं नव्हतं. लहानच होतं त्यात फक्त त्याने काही बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती. त्या दिवशी त्याने त्या दुकानचं उद्घाटन केलं आणि पहिलीच गिऱ्हाईक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली. तिच्या कडेवर एक लहान पण खूप गोंडस बाळ होतं. मग तिने एक दुधाची बाटली घेतली आणि महेशला म्हणाली
"दादा ,आता माझ्याजवळ १० च रुपये आहेत रे बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का?" महेशने एकवार
तिच्याकडे पाहिले, गरीब होती बिचारी. कपाळावर कुंकू न्हवतं ना गळ्यात मंगळसूत्र कदाचित तिचानवरा जिवंत नसेल असा अंदाज त्याने लावला. साडीला तर अक्षरश: अनेक ठिकाणी ठीगळं लावलेली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते. मग महेशची नजर तिच्या कडेवरच्या त्यालहान सावळ्याश्या निरागस बाळाकडे गेली. त्याच्या त्या मलूल चेहऱ्यावर पण त्याचं ते निरागस हास्य. किती सुंदर दिसत होतं. हसल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले दोन दात लुकलुकत होते. त्यामुळे ते बाळ आणखीच गोजीरवाणं दिसत होतं. मग
महेश त्या बाईकडे पाहत म्हणाला,
"ताई…काही हरकत नाही, तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील मला " त्या बाईने मोठ्या समाधानाने महेशकडे पहिले, आणि म्हणाली,
"उद्या मी नक्की पैसे देईन तुम्हाला, इथे जवळच राहते मी. समोर जी छोटी घरं आहेत न तिथल्या दुसर्या गल्लीत
एक लहानघर आहे माझं " मग महेश हसत बोलला,
"अहो ताई. काही हरकत नाहीये. माझी तुम्ही या उद्या "आणि मगती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे महेशच्या हातात दिले,महेश ते पैसे तिला परत करत म्हणाला ,
" ताई पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून. काल तुमच्या हातून माझी पहिली बोहनी झाली आणि मला काल १०००
रुपयांचा फायदा झाला ." हे ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला. कारण बर्याच दिवसांनी तिच्या पायगुनाच
कोणीतरी कौतुक करत होतं. नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या मृत्युनंतर तिच्या सासूने तिला "पांढऱ्या पायाची " म्हणून तिला घरातून हाकलून लावलं होतं . ती म्हणाली,
" दादा, रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालूअसत तुमचं ?"  महेश म्हणाल,
"रात्री ८ वाजता दुकान बंद करतो मी ताई " हे ऐकून त्या बाईचा चेहराच उतरला .महेशने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं ,
" काय झालं ताई? काही अडचण आहे का?" ती बाई म्हणाली,
" दादा या बाळासाठी आणि स्व:तासाठी दोन घरची धुणीभांडी आणि मोलमजुरी करते. मी रात्री साडेआठ
वाजतात मला घरी यायला तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात...माझ्या बाळाला तसंच रडत रडत
रात्री उपाशीपोटी झोपावं लागतं.... बोलता येत नाहीनत्याला याचाच गैरफायदा घेते मी.... आणिबोलत बोलता तिचा कंठ दाटून आला नी तिचे डोळे पाणावले. महेशलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं मग तो तिला म्हणाला,
"काही काळजी करू नका ताई. तुम्हाला दुधाची बाटलीदिल्याशिवाय दुकान नाही बंद करणार
मी. पण एक अट आहे" त्या बाईने डोळे पुसत त्याच्याकडेपाहत विचारले,
"काय अट आहे " मग महेश म्हणाला,
"तुम्ही मला दुधाचे पैसेद्यायचे नाहीत "  हे ऐकूनत्या बाईला पुन्हा गहिवरूनआले. पण ह्या वेळी तिच्या डोळ्यातलेअश्रू हे दु:खाचे नसून आनंदाचे होते.आज तिला माणसाच्या रुपात देव भेटल्यासारखे वाटत होते . त्या दिवसापसुन रोज रात्री ती बाई या दुकानात यायची आणि दुधाची बाटलीघेऊन जायची. असे करता करता सहा महिने उलटून गेले होते. पण रोजच्या काबाडकष्टामुळे ती गरीब बाई हळू हळू आजारी पडू लागली होती. हळू हळू तिचे शरीर आणखीनच कृश बनत चालले होते. त्या दिवशीही महेश असाच दुकान आवरून तिच्या येण्याची वाट पाहतहोता , घड्याळात तर ९.३० वाजले होते. इतक्यात ती बाई महेशच्या दुकानात आली. महेशने लगेच फ्रीजउघडून दुधाची एक बाटली काढून तिच्या हातात दिली. आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता. आजारपणामुळे डोळ्यांखालील काळे घेरे खूपच वाढलेले होते. बाटली देवून महेशफ्रीजचे दार बंद करण्यासाठी मागे वळत तिला म्हणाला ,
"काय ताई…. आज खूपच उशीर केला यायला तुम्ही" आणि दर बंद करून त्याने मागे वळून समोर
पहिले तर समोर कोणाच न्हवते , त्याला वाटले आज उशीर झाल्यामुळे घाईगडबडीत लवकर निघून गेली असेल ,
आणि मग त्याने आपले दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला दुसर्या दिवशी ठीक आठ वाजता ती बाई पुन्हा आली आणि येवून फक्त उभी राहिली. मग नेहमीप्रमाणे महेशने तिला फ्रीज मधून दुधाची बाटली काढून टेबलवर
ठेवली. इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली म्हणून ती उचलायला तो खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे
पाहतो तर त्याच्या लक्षात आलं कि दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती पण का कुणास ठाऊक
महेशला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत न्हवता. खूपच अशक्त झाली होती ती बाई. तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई
ठीक ८ वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली. महेशने आजी तिचा चेहरा जर निरखून पहिला तर
तिचा चेहरा पांढराफट् पडला होता. तिच्या चेहर्यावरच तेजतर केव्हाच नाहीसं झाल होतं. महेशला कळून चुकलकि ती बाई खूपच आजारी आणि पैसे नसल्याने ती डॉक्टरकडे गेली नसणार. त्याने लगेच आपल दुकान
बंद केलं आणि घरी निघून आला मग त्याने आपल्या बायकोला त्याबाईबद्दल सर्व हकीकत सांगितली. महेशची बायकोसुद्धा अगदी त्याच्यासारखीच प्रेमळ स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाली ,
"चला आपण तिच्या घरी जाऊन तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ व तिचा उपचार करू " महेशलातिचं बोलणं पटलं आणि तिचा अभिमानही वाटला कारण त्याचीही हीच इच्छा होती. मग तो आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी निघाला तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच लक्षात होता. मग ते दोघेही तिच्या घराजवळ आले तर तिथे आजूबाजूला दूर दूर पर्यंत कुणाचेच घर न्हवते नुसती एक लहानशी गल्ली मात्र तिथे होती मग त्या गल्लीतून पुढे गेले तर तिथे हि बाजूला कोणीच न्हवतं फक्त एक हलकासा घाणेरडा वास तिथे येत होता मग त्यांनी त्या बाईच्या घराचं दार ठोठावलं. पणदारावर थाप मारताच ते दर चटकन आत लोटलं गेलं. मग ते दोघे
आत गेले तसा त्या घाणेरड्या वासाच एक जोराचाभपका त्यांच्या नाकात शिरला. तसा दोघांनीही नाकाला रुमाल लावले. तरीही ते दोघे आणखी आत गेले आतमध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता. महेशने चाचपडत कशीबशी त्या खोलीतली लाईट लावली. तरसमोरचे ते भयानक दृश्य पाहून दोघांचेहीडोळे विस्फारले. दोघांनाहीमोठा धक्का बसला . समोर ती गरीब बाई मरून पडली होती आणि तिचे शरीर हळू हळू सडू लागले होते. तिच्याकडे पाहून वाटत होते कि ३-४ दिवसांपूर्वीच तिने जीव सोडला होता पण तिचे डोळे अजूनही बाजूला खेळत असलेल्या तिच्या लहान बाळालाच पाहत होते. तिचे डोळे एकदम निर्विकार झाले होते,जणू रडून रडून तिच्या डोळ्यातले पाणीच आटून गेले असावे. त्या निर्जीव देहाचे ते निर्जीव डोळेमात्र
सजीव असल्यासारखे त्याबाळाकडे एकटक पाहत होते आणि ते निरागस बाळ मात्र हसून आपल्या आईच्या डोळ्याकडे पाहतखेळत होते. त्या निरागसबाळाला तर हेही कळत न्हवतं कि, त्याच्या आईने केव्हाच आपले प्राण त्यागले आहेत. बाजूलाच ३ रिकाम्यादुधाच्या बाटल्या पडलेल्या होत्या. जणू त्याला असा विश्वास वाटत होता कि त्याच्या आईने मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिले नाही . ते दृश्य पाहून दोघांच्या अंगावर शहारे उभे राहिले . खरोखरच त्यावेळी ते दृश्य अगदी हृद्य हेलावून टाकणारे होते . महेशला तर विश्वासच बसत न्हवत कि गेले २-३ दिवस एका मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडून दुध घेऊनजात होता. मग महेशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं. तिनेही खूप प्रेमाने त्या बाळाला जवळ घेतलं. मग त्या दोघांनीही विधिवतत्याबाईच् या शरीराचे अंत्यसंस्कार केले. आणि त्या बाळाला दोघांनीही दत्तक घेतलं. महेशला आजही ह्या गोष्टीची जाणीव आहे कि त्या बाळाच्या आईचा आत्मा आजही त्याच्या बरोबरच राहतो.

~अनामिक

1406. देवदूत

 वसुधा सकाळपासूनच अस्वस्थ होती. कामात लक्षच न्हवतं तिचं.. त्यामुळंच की काय दूध उतू गेलं, भाजीत मीठ कमी पडलं, तिच्या या धांदलीमुळे उशीर झाला म्हणून सिद्धार्थची झालेली चिडचिड तर तिने ऐकलीच नाही.
    राजस सोसायटी मधलं सिद्धार्थ आणि वसुधा हे एक देखणं, समंजस आणि सधन असं जोडपं होत. सगळ्यांनाच त्यांचा हेवा वाटायचा. दोघांची चांगली नोकरी , सुशिक्षित आणि प्रेमळ आई वडील , स्वतःच्या कमाईच्या जोरावर घेतलेला नवीन फ्लॅट सगळं कसं छान होत पण दुःख म्हणावं तर एकच, लग्नाला पाच वर्षे झाली तरी घरात पाळणा हलला न्हवता. दोघांच्याही आई वडिलांना आजी आजोबा व्हायची घाई होतीच त्यामुळं अडून अडून ते ही विचारायचे याबद्दल.. आणि ते दोघे काहीतरी कारण काढून विषय टाळायचे...पण एकमेकांना ते टाळू शकत न्हवते. एकांतात असले की या एकाच विचाराने वसुधाचे मन खट्टू व्हायचे.  जवळपास  तिच्या सगळ्या मैत्रिणी 'दोनाच्या तीन'झालेल्या होत्या त्यामुळं ती जास्त दुःखी व्हायची. सिद्धार्थ तिला समजवायचा, " होईल गं बाळ, आपलं काही वय नाही झालं अजून". तेवढ्यापुरती ती विसरायची सगळं पण पुन्हा तेच. हळू हळू देव धर्म, डॉक्टरकडच्या फेऱ्या सगळं वाढू लागलं. घरातला आनंद नकळतच नैराश्यात बदलत गेला. तरीही एक गोष्ट मात्र वसुधा नियमाने करायची, ती म्हणजे स्वामींचा जप.. लहानपणापासून तिची स्वामींवर खूप श्रद्धा होती. जमेल तेव्हा ती अक्कलकोटला जाऊन यायची...लग्नाआधी आई बाबांसोबत आणि आता सिद्धार्थला घेऊन. तो फार देवभोळा नसला तरी नास्तिक ही न्हवता. तिच्या श्रद्धेबद्दल त्याला आदर होता. 
      मागच्या वर्षी असेच ते नियमाप्रमाणे स्वामींच्या दर्शनाला गेले असताना एक विचित्र घटना घडली. दोघेही मंदिरात बसले असताना पन्नाशीच्या आसपासची एक बाई त्यांच्या शेजारीच बसली होती, दिसण्यावरून चांगल्या घरातली वाटत होती. या दोघांच बोलणं ऐकून तिने मधेच प्रश्न केला, "कुठून आलात?"
वसुधा :- "पुण्याहून आलोय , दरवर्षी येतो ".
ती बाई :- "स्वामींवर श्रद्धा दिसते तुमची"
वसुधा :- " हो, लहानपणापासून.."
        बऱ्याच गप्पा झाल्यावर सिद्धार्थ वसुधा तिथून निघाले. वाटेत जाताना सिद्धार्थ वसुधाला म्हणाला,"ती बाई जरा जास्तच चौकशा करत होती ना..कोण कुठली काय माहित , आणि तू ही सगळं सांगत बसलीस तिला". वसुधाने सिध्दार्थचे बोलणे फारसे मनावर नाही घेतले. रात्री अन्नछत्रात प्रसादावेळी परत तीच बाई वसुधाच्या समोर जेवायला बसली. वसुधा नुसतीच हसली तिच्याकडे बघून. पण का कुणास ठाऊक त्या बाईचा चेहरा खूप प्रसन्न आणि शांत वाटला तिला. तिथून बाहेर पडल्यावर ती बाई वसुधाला शोधत आली आणि म्हणाली, "पहाटे आरतीला ये बरं का?" वसुधाला मनात वाटून गेलं की, का ही बाई आपल्या मागे मागे करतेय?.. 
      "अगं येतेयस ना?" त्या बाईच्या हाकेने वसुधाला जाग आली, बघते तर आसपास कुणीच नाही,सिद्धार्थ झोपलेला होता. तिला वाटलं काल दिवसभर त्या बाईचा विचार करून स्वप्नात पण तीच दिसली. पण काही केल्या तिला झोप लागेना. काहीतरी मनाशी ठरवून ती उठली,अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेल्यावर बघते तर गरम पाणी अजून आलं न्हवतं. तशीच गार पाण्याने अंघोळ करून तिने आपलं आवरलं. सिध्दार्थला उठवायचा त्रास तिने घेतला नाही कारण तो काही इतक्या पहाटे गार पाण्याने अंघोळ करून देवळात आला नसता. दार लावून घेऊन ती झपझप पावले टाकत देवळाकडे निघाली. भक्त निवास तिथून जवळच  असल्यामुळे कुणाच्या सोबतीची तिला गरज नाही वाटली. बाहेर अंधार होता ती खाली मान घालून रस्त्याचा अंदाज घेत निघाली होती.  तेवढ्यात मागून ,"शुक शुक" केल्याचा आवाज तिला ऐकू आला, जागच्या जागी वसुधा थबकली. तेवढयात ती कालची बाई कुठून तरी आली आणि म्हणाली, "घाबरू नकोस मी आहे".. वसुधाला , हायसे वाटले आणि त्या दोघी काकड आरतीसाठी देवळात निघाल्या. आरती सुरू असताना एक वेगळाच रोमांच तिला वाटला. अंगावर काटा आला, स्वामींच्या उत्सव मूर्तीचे ते प्रसन्न रूप पाहून डोळे भरून आले. आजूबाजूच्या जगाचा जणू तिला विसरच पडला. मागच्या खूप दिवसात इतका आनंद तिला झाल्याचे आठवतच न्हवते. आरती झाली एवढ्यात सिध्दार्थची हाक ऐकून वसुधाने मागे वळून पाहिले. खोलीत ती न दिसल्याने घाबरून तिला शोधत तो मंदिरापर्यंत आलेला. वसुधा न सांगता आल्यामुळे जरा रागातच होता तो,पण तिला पाहताच शांत झाला. 
सिद्धार्थ :- " अगं काय, सांगून तरी यायचं ना, किती घाबरलो मी..एकटीच आलीस ते"
वसुधा :- " अरे एकटी कुठे या काकू होत्या ना सोबत", असे म्हणत वसुधा काकूंच्या दिशेने वळली तर तिथे कुणीच न्हवतं. "अरेच्चा काकू कुठे गेल्या??"
सिद्धार्थ :-" कालपासून ती बाई काही तुझी पाठ सोडत नाहीये. आणि कुठाय आता? ते राहूदे, चल आपल्याला निघायचंय बसची वेळ होईल".
       दोघांनीही स्वामींचे परत एकदा मनोभावे दर्शन घेतले, आपली कूस उजवण्यासाठी मनातल्या मनात वसुधाने गाऱ्हाणं घातलं आणि ते परतीच्या प्रवासाला लागले. आल्यावर नेहमीसारखे दिवस पुढे सरकत होते.  नोकरी, घर रुटीन सुरू होतं. औषधांना कंटाळून डॉक्टरच्या फेऱ्याही तिने बंद केल्या होत्या. देवाच्या मनात असेल तर होईल असे म्हणून तिने तात्पुरता का होईना विषय थांबवला होता.
       त्या दिवशी सकाळी एका अनामिक भितीयुक्त आनंदाची जाणीव तिला झाली. तिची पाळी या महिन्यात चुकली होती म्हणून तिचे लक्ष न्हवते आज जास्त कुठं. उगाचंच वाटून गेलं मनात काहीतरी म्हणून घरातच प्रेग्नन्सी टेस्ट केली , तर काय आश्चर्य!! टेस्ट पॉसिटीव आली, वसुधाचा आनंद गगनात मावेना. तिने पटकन जाऊन देवासमोर साखर ठेवली. पण अजून ही बातमी तिने कोणालाही सांगितली न्हवती. त्या दिवशी ऑफिसला सुट्टी टाकली आणि डॉक्टरची संध्याकाळची अपॉईंटमेंट घेतली , सिद्धार्थला घरी लवकर ये म्हणून कळवले. नेमकं त्याच दिवशी जास्त काम असल्याने तो थोडासा वैतागला खरा पण बायकोची तब्येत बरी नाही म्हणल्यावर तो तयार झाला.
         गायनॅक कडे जायचं असं वसुधाने सांगितल्यावर सिद्धार्थ ला वाटलं पुन्हा एकदा ट्रीटमेंट साठी तयार झाली की काय ही, म्हणून तो ही खुश झाला. फार काही प्रश्न न विचारता दोघे निघाले. इकडे अख्खा दिवस वसुधाने  कसा काढलेला तिचं तीला माहित... इंटरनेट वर माहिती पाहिली, देवाचा कौल घेतला,आईला तरी सांगावं असं वाटून मोबाईल चार वेळा हातात घेतला आणि परत ठेवून दिला. तिला वाटलं एवढी घाई बरी नाही. मुळातच समंजस असल्यामुळे मनाला आवर घातला तिने... तिकडे डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे सिद्धार्थ तर नाचायचाच बाकी होता, एकतर खूप मोठं सरप्राइज होतं हे त्याच्यासाठी ... तो बाबा होणार होता...
      झालं.. घरातलं वातावरण त्यादिवशी पासून एकदम बदललं. वसुधाच्या खाण्या पिण्याची, तब्येतीची सर्वजण खूप काळजी घेऊ लागले. सासूबाई सुनेच्या काळजीपोटी गावाहून तिच्याजवळ राहायला आल्या. तिला काय हवं नको ते त्या जातीने बघायच्या. दिवस सरत होते , वसुधाचे गरोदरपण छान सुरू होते. एके दिवशी मात्र सगळ्याला दृष्ट लागावं असं काहीसं झालं. अचानक वसुधाच्या पोटात दुखायला लागलं, सिद्धार्थने क्षणाचाही विलंब न लावता तिला दवाखान्यात हलवलं. जुलै महिना, तुफान पाऊस त्यात रात्रीची वेळ अशा परिस्थितीत सिद्धार्थ आणि त्याचे आई बाबा वसुधाला घेऊन दवाखान्यात कसेबसे पोहचले. नर्सने चेक केल्यावर कळले की बाळाच्या ह्रदयाचे ठोके कमी झालेत आणि बाळ पोटात आडवं झालंय , लगेच ऑपरेशन करावे लागेल. ताबडतोब वसुधाला त्यांनी ऑपरेशन थेटर मधे नेलं, इकडे दवाखान्याचे सगळे सोपस्कार सिद्धार्थने लगेच पूर्ण केले, पण प्रॉब्लेम हा होता की त्या रात्री पुण्यात खूप पाऊस होता, नदी नाले ओसंडून वाहत होते, अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याने भरून गेले होते. मिळेल तसा प्रत्येक जण घरी सुरक्षित ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करत होता , ट्रॅफिक यंत्रणेने कधीच हात टेकले होते. या गोंधळात वसुधाचे जे डॉक्टर होते त्यांची गाडी याच कारणामुळे रस्त्यात अडकून पडली होती त्यामुळे त्यांना यायला उशीर होत होता. ईकडे वसुधाची तब्येत नाजूक होत चालली होती. तिचे सासू सासरे तर अखंड देवाचा धावा करत होते. अचानक  सासूबाईंना स्वामींची आणि वसुधाच्या स्वामीभक्तीची आठवण झाली, त्यांनी स्वामींचा जप सुरू केला. नर्सच्या ऑपरेशन थेटर मधून  फेऱ्या,दवाखान्याच्या स्टाफची डॉक्टरना फोन करायची गडबड , सिद्धार्थचे हताश होऊन आपल्या बायको आणि बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न हे सगळे वातावरण सुन्न करणारे होते. बाहेरच्या पावसाच्या आवाजात यांचा हा केविलवाणा आवाज कुठेतरी दबला होता.
         थोड्याच वेळात कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागली, सर्वाना वाटलं डॉक्टर आले पण त्या ठिकाणी दुसरीच स्त्री होती, घाईने ती रिसेप्शन जवळ गेली आणि तिथे तिने काहीतरी सांगितले की ज्यामुळे तिथल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडासा उत्साह आला . त्या स्त्रीला त्यांनी पटकन ऑपरेशन थेटर कडे नेले आणि नर्स बाहेर येऊन सिध्दार्थला म्हणाली,
       "काळजी करू नका, डॉक्टरना येणे शक्य नसल्यामुळे त्यांनी त्याच्या एका ओळखीच्या इथे जवळच राहणाऱ्या त्या डॉक्टर मॅडमना ऑपरेशन साठी पाठवले आहे त्यामुळे तुम्ही आता निश्चिन्त राहा". 
          सर्वांचा चेहऱ्यावर एक हुशारी आली. थोड्याच वेळात बाळाच्या रडण्याचा आवाज सगळ्यांनी ऐकला.  तो निरोप देऊन गेलेली नर्स पांढऱ्या स्वच्छ कापडात गुंडाळून गोरी गोरी पान, पिंगट डोळ्याची परी अलगद घेऊन सिद्धार्थच्या समोर येऊन म्हणाली," अभिनंदन, लक्ष्मी आली".... सिध्दार्थच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्याच्या आई बाबांनाही तो जीव पाहून रडू आवरले नाही. तो चिमुकला जीव हातात घेत सिध्दार्थने नर्स ला विचारले, "वसुधा?? माझी वसुधा ठीक आहे ना??".. नर्सने होकारार्थी मान हलवून सांगितले, " हो त्याही ठिक आहेत,थोड्या वेळात शुद्धीवर येतील. डॉक्टर वेळेत आल्या म्हणून सगळं नीट झालं, देवाने तुमचं ऐकलं.." 
सिद्धार्थ :- "नर्स, मला त्या मॅडमना भेटायचं आहे, कुठे आहेत त्या?".. 
नर्स :- "हो आहेत इथेच येतच असतील "असे म्हणून ती आत गेली 
       थोड्या वेळाने नर्सने बाहेर येऊन सिध्दार्थला सांगितले की ,"बहुतेक डॉक्टर मॅडमना काही दुसरे काम निघाले आणि त्या कुणालाही न सांगताच निघून गेल्या गडबडीने." सिद्धार्थ म्हणाला, "काही हरकत नाही , तुम्ही मला त्यांचे नाव सांगा मी उद्या स्वतः जाऊन त्यांचे आभार मानतो". नर्स म्हणाली, "डॉक्टर अष्टपुत्रे"....सिध्दार्थला हे नाव नुकतेच कुठेतरी ऐकल्यासारखे वाटले पण त्यावेळी हा विचार करण्याच्या अवस्थेत तो न्हवता. तो फक्त आणि फक्त आपली बायको आणि बाळ वाचलं या आनंदात होता.
        सकाळ झाली, पावसाचा जोर ओसरला होता पण खूप उलथापालथ झाली होती, गाड्या , जनावरं, माणसे पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले होते. अनेक ठिकाणी तर रस्तेही पाण्याच्या वेगामुळे वाहून गेले होते. दवाखान्यात मात्र वसुधा आणि तिच्या बाळाचा नवीन जन्मच झालेला त्याच आनंदात सगळे होते. एवढ्यात वसुधाचे नेहमीचे डॉक्टर नर्सला घेऊन वसुधाला बघायला आले तेव्हा त्यानी जे सांगितलं ते ऐकून सगळेच अवाक् झाले, ते डॉक्टर म्हणाले, "काल इतका प्रचंड पाऊस होता की माझी गाडी एक खड्ड्यात अडकून बसली आणि ती काढायच्या नादात माझा मोबाईल कुठेतरी पडला त्यामुळे मी कुठेच फोन करू शकलो नाही, दवाखान्यातही नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर अष्टपुत्रे नावाच्या कुठल्याही व्यक्तीला मी ओळखत नाही आणि मी त्यांना इथे पाठवले न्हवते... वसुधा, देवदूतच आलेला तुला आणि तुझ्या बाळाला वाचवायला"...
          वसुधाने बाळाकडे एक क्षण पाहिले , तिच्या डोळ्यात पाणी आले. डॉक्टर गेल्यावर ती म्हणाली, "सगळी स्वामींची कृपा🙏🙏!! तुला आठवतंय सिद्धार्थ, आपल्याला जी बाई आपल्याला स्वामींच्या देवळात भेटलेली तिने त्या दिवशी बोलताना तिचे नाव काय सांगितले होते??...." सिद्धार्थ एकदम चमकला आणि म्हणाला..." मी अष्टपुत्रे... पुण्याहूनच आलेय"...
समाप्त
सौ. शर्वरी कुलकर्णी

1405. धर्म

 एका शिकारीने शिकारीवर बाण सोडला. बाणावर सर्वात घातक विष लावलेले होते. पण लक्ष्य चुकले. हरणा ऐवजी एका फळे फुले असलेल्या झाडावर बाण लागला. झाडात विष पसरले. ते झाड सुकू लागले. त्यावर राहणारे सर्व पक्षी एक एक करून ते सोडून गेले. एक धर्माभिमानी पोपट अनेक वर्षे झाडाच्या पोकळीत राहत असे. पोपट झाड सोडून गेला नाही, पण आता तो बहुतेक वेळा झाडावरच राहतो. अन्न व पाणी न मिळाल्याने पोपटही सुकून जात होता. प्रकरण देवराज इंद्रापर्यंत पोहोचले. मरणार्‍या झाडासाठी प्राण देणारा पोपट पाहण्यासाठी इंद्र स्वतः तिथे आले. धर्माभिमानी पोपटाने त्याला प्रथमदर्शनी ओळखले.
इंद्र म्हणाला, हे बघ. या झाडाला ना पाने, ना फुले, ना फळे. आता पुन्हा हिरवे होईल असे कोण म्हणेल, झाड पुन्हा जगण्याची आशा नाही. जंगलात अशी अनेक झाडे आहेत, ज्यांचे मोठे पोकळे पानांनी झाकलेले आहेत. झाडेही फळे आणि फुलांनी भरलेली आहेत. तेथूनही तलाव जवळ आहे. तू या झाडावर काय करतोस, तिथे का जात नाहीस?
पोपट उत्तरला, देवराज, मी यावरच जन्मलो, यावरच वाढलो, त्याची गोड फळे खाल्ली. त्याने मला अनेक वेळा शत्रूंपासून वाचवले. मी त्याचा आनंद लुटला आहे. आज जर यावर वाईट वेळ आली तर मी माझ्या आनंदासाठी ते सोडू का? ज्याच्या सोबत मी सुख उपभोगतो, त्याच्या सोबत मी दु:खही भोगीन, यातच मी आनंदी आहे. तू देव असूनही मला असा वाईट सल्ला का देत आहेस? असे बोलून पोपटाने इंद्राचे बोलणे बंद केले.
पोपटाचे हे बोलणे ऐकून इंद्रदेव प्रसन्न झाले. म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, कोणताही वर माग.
पोपट म्हणाला, माझ्या या सुंदर झाडाला पूर्वीसारखे हिरवे कर. देवराजाने झाडाला फक्त अमृतच नाही तर त्यावर अमृताचा वर्षाव केला. झाडाला नवीन कोंब फुटले. ती पूर्वीसारखी हिरवीगार झाली, त्याला अनेक फळेही लागली. पोपट पुष्कळ दिवस त्यावर राहिला, मृत्यूनंतर देवलोकात गेला.
 ही कथा युधिष्ठिराला सांगितल्यानंतर भीष्म म्हणाले, जो आपल्या आश्रयदात्याचे दु:ख आपले मानतो त्याचे कष्ट दूर करण्यासाठी देव स्वतः येतो. वाईट काळात माणूस भावनिकदृष्ट्या कमकुवत होतो. त्यावेळी जो त्याला आधार देतो त्याच्यासाठी तो आपला जीव पणाला लावतो.
📍तात्पर्य :
कोणाच्या सुखाचा सोबती बना वा न बना पण, दु:खाचा सोबती नक्कीच व्हा. ही धर्मनिती आहे.

1404. द्रौपदीचा कृष्ण

 ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात. जगात फार कमी लोकांमध्ये माणूसकी आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मुंबईच्या ट्रेनमध्येही अशी फार कमी माणसं आहेत ज्यांच्या चांगुलपणामुळे आपण कळत नकळत खूप काही शिकत असतो. मी आज तुम्हाला माझ्यासमोर घडलेल्या घटनेबद्दल सांगणार आहे. अगदी एका छोट्याशा कृतीमधूनही तुम्ही कसा बदल घडवू शकता हे मी त्या अनुभवातून शिकलो. नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी मी वांद्रे स्टेशनला थांबलो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे अर्थातच पूर्ण स्टेशन माणसांशी भरून गेलं होतं. ऑफिसला उतरण्यासाठी मला मधल्या डब्यात बसणं सोयीस्कर असल्यामुळे मी लेडीज डब्याच्या मागे असणाऱ्या डब्याकडे ट्रेनची वाट पाहत उभा होतो. इतक्यात माझ्या बाजूला काही अंतरावर उभ्या असलेल्या एका महिलेचं तान्हं बाळ रडायला लागलं. बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे साहजिकच सगळ्यांचं लक्ष तिकडे गेले. बाळाकडे एक कटाक्ष टाकून सगळेजण आपल्या मोबाइलमध्ये, पेपरमध्ये पाहू लागले. थोड्यावेळाने ते बाळ रडण्याचं काही थांबत नव्हतं. आजूबाजूच्या महिलांनीही त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ते शांत होण्यापेक्षा जास्तच रडत होते. त्या आईची परिस्थिती तर पाहण्यासारखी होती. तिने बॅगेतली दुधाची बाटली काढली आणि बाळाच्या तोंडात दिली. पण ते बाळ दूधही पीत नव्हतं. अखेर तिथल्या महिलांच्या घोळक्यातल्या एका आजीने तिला अंगावरचं दूध पाजायला सांगितलं. तिने सुरुवातीला फक्त हो हो म्हटलं, पण बाळ रडण्याचं शांत होत नाही हे लक्षात येता ती बाळाला घेऊन स्टेशनवरच्याच एका बाकडावर बसली आणि बाळाला पाजू लागली.
अनेकदा सार्वजनिक ठिकाणी महिलेला बाळाला पाजताना पाहिलं की तिला मॅनर्स नाहीत, अशिक्षित आहे. एवढ्या लहान बाळाला ट्रेनमधून फिरवतातच का असे अनेक प्रश्न विचारून हैराण करतात. ही घटना घडेपर्यंत मीही त्यांच्यापैकीच एक होतो. ती महिला शिक्षित होती की अशिक्षित.. सुसंस्कृत होती की नव्हती या नकोत्या प्रश्नात अडकण्यापेक्षा ती एक स्त्री होती आणि पाच ते सहा महिन्याच्या बाळाची आई होती हेच महत्त्वाचं आहे. ती बाकड्याच्या कडेला बसून बाळाला पाजत होती. आता आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी बाळाला पाजायला बसल्यावर जे होतं तेच वांद्र्याच्या स्टेशनवर होत होतं. काही अपवाद वगळता येणारा जाणारा त्या बाईकडे कटाक्ष टाकून जातच होता. माझं त्या महिलेकडे कमी आणि तिच्याकडे पाहणाऱ्या पुरुषांकडे लक्षं जास्त होतं. आपल्या समाजाची मानसिकता कधी बदलणार हाच एक प्रश्न माझ्या मनात राहून राहून येत होता. काहींनी तर तिच्याकडे अश्लिल नजरेने पाहायलाही कमी केलं नाही. आपला देश कधीच सुधारणार नाही या मतावर मी येतच होतो इतक्यात २५ ते २७ वर्षांचा एक मुलगा माझ्या समोर आला. हाही त्यांच्यापैकीच एक असं मला वाटत होतं. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपैकी तो एक वाटत होता. जीन्स, टी-शर्ट, कानात इअरफोन्स आणि पाठीला बॅग लावून तो स्टेशनवर उभा होता. त्याने बॅगमधून पेपर काढला आणि तो अगदी सहजपणे त्या महिलेच्या समोर जाऊन उभा राहिला.
मी त्याच्याकडेच पाहत होतो, तो नक्की काय करतोय हे माझ्या लक्षात येत नव्हतं. तो पेपर महिलेला कव्हर करेल अशा पद्धतीने पूर्ण उघडला आणि तो अगदी सहजपणे पेपर वाचायला लागला. एका क्षणासाठी त्या महिलेलाही कळलं नाही की ही व्यक्ती कोण आणि ती अचानक माझ्या समोर का आली. पण नंतर काही सेकंदांमध्येच तिला त्या मुलाचा हेतू लक्षात आल्यावर ती फार रिलॅक्स झाली. त्याच्या या कृतीने ती बाई आता पटकन कोणाच्या डोळ्यात येत नव्हती आणि तिही शांतपणे आपल्या मुलाला पाजू शकत होती. त्याची ही काही मिनिटांची कृती पाहून मला खरंच धक्का बसला. ही गोष्ट माझ्या का लक्षात आली नाही... मी अशा पद्धतीने का विचार केला नाही. याचाच मला प्रश्न पडला. त्याच्या त्या दोन तीन पावलांच्या कृतीने माझी विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. प्रत्येक द्रौपदीला असा एखादा कृष्ण भेटायलाच हवा!🙏.

1403. उतराई

 अरे बापरे, नऊ वाजले. निघायला हवं..... दिवाकर दवाखाना बंद करून निघण्याच्या तयारीत असतानाच, धनगरवाड्यातील सुषमा अक्षरशः धापा टाकतच दरवाजातून आत आली. तिच्या हातात तिचे आठ महीन्याचे बाळ होते..... डाक्टर मले वाचवा. मले साप डसलाय. ..... कसे बसे, बाळाला बाजुच्या बाकड्यावर ठेवत, डॉक्टरांच्या समोरील खुर्चीवर बसत सुषमा म्हणाली..... कोण चावलं? किती वेळ झालाय?.... दिवाकरने विचारले..... कोन चावले, मले नाही कळलं. पण दोन घंटे झालं डाक्टर ...... दोन वाक्य बोलतानाही तिला धाप लागली होती..... दिवाकरला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते. त्याने पटकन त्याच्याकडील सर्पदंशावरील तात्काळ द्यावयाचे इंजेक्शन सुषमाला दिले. पण तेवढ्याने भागणार नव्हते. तिला अॅडमिट करावे लागणार होते. त्याने लगेचच तिला आपल्या गाडीत नेऊन बसवले. आणि बाळाला तिच्या बाजुच्या सीटवर ठेवले. मग त्याने परत दवाखान्यात जावून लाईट बंद केला आणि कुलुप लावून धावतच तो गाडीत येवून बसला आणि तो जवळच्याच इस्पितळाच्या दिशेने निघाला. वाटेतच त्याने त्या इस्पितळातील, त्याच्या ओळखीच्या डॉक्टर रविकांतला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. 
दिवाकर रानडेला या गावात प्रॅक्टीस सुरु करून साधारण दहा वर्षे झाली होती. गावातील प्रत्येक पेशंटला तो ओळखत असे. गावातील प्रत्येक कुटुंबाचा, तो जणु एक सदस्यच बनला होता. सुषमाच्या नवऱ्याचे सहा महीन्यापुर्वीच एका अक्सिडेंटमध्ये निधन झाले होते. तिला जवळचे दुसरे कोणीच नव्हते. तिला अॅडमिट केल्यावर, बाळाला कुठे ठेवायचे हा प्रश्नच होता. दिवाकरने पटकन रेवतीला म्हणजे त्याच्या बायकोला फोन लावला आणि इस्पितळात येण्यास सांगितले. 
एका खांद्यावर बाळाला घेवूनच त्याने सुषमाला इस्पितळात दाखल करण्यासाठीचे सर्व सोपस्कार पार पाडले आणि तो डॉक्टर रविकांतला त्याने दिलेल्या इंजेक्शन बद्दल सांगुन पुढील ट्रिटमेंटबद्दल डिस्कस करू लागला. 
.... अहो काय झालंय. मला असं घाईघाईत का बोलवले? आणि हे बाळ कोणाचे? ... धावतच आलेल्या रेवतीने विचारले.... सांगतो. सांगतो. आधी या बाळाला घे आणि बाहेर थांब..... त्याने त्याच्याकडील बाळ रेवतीकडे सोपविले आणि तो परत डॉ. रविकांत बरोबर चर्चा करू लागला. सुषमाचे सर्व शरीर निळे पडले होते. तिची शुद्ध हरपायला लागली होती. तिची परिस्थिती गंभीर होत होती. डॉ रविकांतने पुढील ट्रीटमेंट सुरु केली पण तोही थोडा साशंकच होता..... सर तुम्ही जा घरी. मी बघतो पेशंटकडे.... डॉ रविकांत म्हणाला...
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता सुषमा अत्यवस्थ असल्याचा  
इस्पितळातून फोन आला. दिवाकर, पाचचं मिनिटात इस्पितळात पोहचला होता. पाठोपाठच रेवती बाळाला घेवून पोहचली. 
...... डाक्टर या माझ्ये पोराची काळजी घ्या. मले जवळचं कोन नाय हाय. आमच्ये धनगरवाड्याले कोन नाय त्याची काळजी घेणार....... मरणाच्या दारातील सुषमाच्या डोळ्यात आईचं वात्सल्य दाटुन आलं होतं. कदाचित हे सांगण्यासाठीच तिचे प्राण अडकले असावेत..... तु नको काळजी करू. तुला काही होणार नाही .... दिवाकरने, सुषमाचे मरण दारात दिसत असुनही, तिला धीर देण्याचा प्रयत्न केला ...... डाक्टर, माझ्या पोराले सांभाळा ...... असं म्हणतच सुषमाने प्राण सोडला .... दिवाकरला गलबलून आले. मरणपंथाला टेकलेल्यानंतरही, तिच्यातील आईने, दिवाकर आणि रेवती येईपर्यंत मृत्युला थांबवून, आपल्या बाळाच्या पुढील आयुष्याची तजवीज केली होती. डॉक्टर आपल्या बाळाचा नक्की सांभाळ करतील या विश्वासानेच तिने अखेरचा श्वास घेतला होता.
सुषमाचे अंत्यसंस्कारही, दिवाकरनेच इस्पितळातील लोकांच्या मदतीने पार पाडले. 
आज सुषमाला जावून आठ दिवस झाले होते तरीही धनगरवाड्यातुन कोणीच पुढे आले नव्हते. सुषमाचे म्हणणे खरे ठरले होते. 
रेवती, बाळाचे सर्व काही करत होती पण त्यामध्ये वात्सल्याचा अभाव दिसत होता. तिचं मन या बाळाला सांभाळण्यास तितकसं तयार नव्हतं. दिवाकरच्याही ते लक्षात आलं होतं. 
...... रेवती अगं आज आपल्या लग्नाला आठ वर्षे झाली. आपण सर्व डॉक्टर केले तरी आपल्याला मुल नाही झाले. कदाचित म्हणूनच ईश्वराने हे बाळ आपल्या पदरात टाकले असावे .... दिवाकर, रेवतीला समजावण्याचा प्रयत्न करत होता..... हे बाळ आपल्याला नाही सुट करत .... सुट नाही करत? अगं, काय बोलतेयस काय, रेवती? अगं भगवान श्रीकृष्णही सावळाच होता...... अहो पण तरीही..... रेवती अग आपल्या भरवशावरच, या बाळाच्या आईने शेवटचा श्वास घेतलाय. आता आपल्याला माघार नाही घेता येणार. या बाळाला आपल्याला सांभाळावेच लागेल. दिवाकरच्या निग्रहापुढे रेवतीचे काही चालेना. महीनाभरातच त्यांनी बाळाचे बारसे केले आणि त्याचे नाव पराग  ठेवले. जस जसे दिवस पुढे जावु लागले, तसे रेवतीलाही बाळाचा लळा लागला होता. रेवती त्याचे सर्व प्रेमाने करू लागली होती. सुषमाचे बाळ रेवती आणि दिवाकरच्या वात्सल्याने चिंब नाहुन निघत होते. रेवतीमधील हा बदल दिवाकरलाही सुखावणारा होता. 
दोन वर्षांनंतर दिवाकरने शहरामध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. थोड्याच दिवसात त्याचा या शहरातही चांगलाच जम बसला होता. त्याची प्रॅक्टीस चांगलीच चालत होती. 
पराग एव्हाना तीन वर्षाचा झाला होता. लग्नानंतर जवळ जवळ अकरा वर्षांनी रेवतीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. रेवती आणि दिवाकरच्या आनंदाला पारावारच नव्हता. छोटा परागही त्या गोऱ्या गुबऱ्या बाळाला पाहुन हरखुन गेला होता. रेवतीची आई लेकीच्या बाळंतपणासाठी त्यांच्याकडे आली होती. सतत आईच्या पदराला धरून असणाऱ्या परागला पाहून रेवतीच्या आईची म्हणजे सुनंदाबाईंची चांगलीच चरफड होत असे. नेहमी आईच्या कुशीत झोपणाऱ्या परागला आता दिवाकरकडे झोपावे लागत असे. त्याच्या प्रेमाला आता वाटेकरी आला होता. रेवतीच्याही नकळत रेवतीचे परागकडे थोडे दुर्लक्षच होवु लागले होते. पण नवीन बाळाचं सगळं करण्यामुळे तसं होत असावं म्हणून दिवाकरही त्याकडे दुर्लक्ष करत होता. 
महिन्याभरातच नवीन बाळाचे बारसे, अगदी धुमधडाक्यात साजरे झाले होते. रेवती आणि तिच्या आईच्या उत्साहाला नुसते उधाणच आले होते. रेवतीच्या आईनेचं, बाळाचं नाव अमेय ठेवलं होतं. परागच्या पाठोपाठ आलेल्या ह्या बाळाचं नाव, दिवाकरला प्रसाद  ठेवायचं होतं पण रेवती आणि तिच्या आईला ते नको होतं.
अमेय आता दोन वर्षाचा झाला होता. रेवतीची आई मदतीला होती तरीही पराग आणि अमेय दोघांचं करता करता रेवतीची खुपच तारांबळ होत होती. 
...... रेवती अग परागला आता शाळेत अॅडमिशन घ्यायला हवी. हल्ली शाळा डोनेशन शिवाय अॅडमिशन देतचं नाहीत..... नाही हां. अजिबात डोनेशन घ्यायचे नाही. तीन वर्षांनी अमेयची अॅडमिशन आहे. SSC बोर्डाच्या मराठी माध्यमाच्या शाळेत घ्या अॅडमिशन. तिथे नाही लागणार डोनेशन..... अग पणं इंग्लिश मिडीयम घ्यायचं ठरलं होतं ना आपलं..... अहो पण त्याला डोनेशन लागेल ...... डोनेशनच्या विरोधात असलेल्या दिवाकरला रेवतीचं पटलं होतं. शेवटी दिवाकरने मराठी माध्यमाच्या SSC बोर्डाच्या साने गुरुजी शाळेत परागला अॅडमिशन घेतली. 
परागला शाळेत नेणे व शाळेतून आणणे ही जबाबदारी दिवाकरवर आली होती. छोट्या परागला मात्र, शाळेत सोडायला आई हवी असायची. सर्व मुलांच्या आई त्यांना शाळेत सोडायला आणि न्यायला येतात, आणि मला मात्र बाबा. अशी तो नेहमी तक्रार करायचा म्हणुन आज दिवाकरने रेवतीकडे हा विषय काढण्याचे ठरविले. 
.... रेवती अग, अमेय आईंकडे राहील थोडावेळ. तु परागला शाळेत सोडायला तरी जा ना. तो नेहमी निघताना हट्ट करतो. पाहतेस ना तु. अगदी शाळेत पोहचेपर्यंत रडत असतो..... दिवाकर रेवतीला समजावत होता...... नाही हां. मला नाही जमणारं. मला सकाळी खुप कामे असतात. 
...... रेवतीने झुरळं झटकावं तसं दिवाकरची सुचना झटकली होती....... दिवाकरनेही मग वाद वाढवला नव्हता. अमेयच्या जन्मानंतर झालेला, रेवतीच्या वागण्यातला हा बदल दिवाकरला अगदी स्पष्ट दिसत होता. पण तो हतबल होता. छोट्या परागला आताशा, दिवाकरच्या कुशीतच झोपावे लागत असे. त्या निरागस मनाला समजावता समजावता दिवाकरची खुपच तारांबळ उडत होती. रोज रात्री नवनवीन गोष्टी सांगुन तो परागला झोपवत असे.
परागच्या अॅडमिशनच्या वेळी, डोनेशन द्यायला विरोध करणाऱ्या रेवतीने अमेयच्या अॅडमिशनसाठी डोनेशन द्यायला, दिवाकरला भाग पाडले होते. तिने हट्टाने दोन लाख डोनेशन आणि वर्षाला जवळपास लाखभर रुपये फी भरून, ICSE बोर्डाच्या युनिव्हर्सल स्कुल मध्ये अॅडमिशन घेतली होती. 
तिच्या या निर्णयाला दिवाकरने खुप विरोध केला होता, पण रेवतीच्या हट्टापुढे त्याचे काही चालले नव्हते. खरेतर रेवतीच्या या निर्णयाला विरोध केला तर परागची आबाळ होईल, अशी त्याला भीती वाटत होती. म्हणूनच तो रेवतीचे हट्ट पुरवत होता. अमेय आणि परागला आता लहान असल्यामुळे फारसे कळत नव्हते पण उद्या थोडे मोठे झाल्यावर दोघांमध्ये एक दरी निर्माण होण्याची त्याला भीती वाटत होती. 
वर्षामागुन वर्ष जात होती. परागची अभ्यासातील प्रगती वाखाणण्याजोगी होती. त्याने कधीच पहिला नंबर सोडला नव्हता. याउलट अमेयचे होते. त्याची बुद्धीमता सामान्यच होती. त्यामुळे त्याला हा अभ्यासक्रम जरा जडच जात होता. 
शेवटी एक दिवस धीर करून दिवाकरने विषय काढलाच....... रेवती अग आपण अमेयला साने गुरुजी शाळेत घालुया का? त्याला हा अभ्यासक्रम झेपत नाहीये. अग तो हिरा असेल तर तो कुठच्याही शाळेत गेला तरी चमकेलचं ....... नाही हां. त्या तसल्या शाळेत, माझ्या मुलाला मी कधी घालु देणार नाही.... रेवती म्हणाली...... त्या तसल्या शाळेत !! आणि माझ्या मुलाला !! रेवती अगं, तुला काय, झालय काय. तुझ्या या वागण्यामुळे परागच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलास कधी? त्या दोन भावांमध्ये किती भेदभाव करतेयंस तु? जावुदे तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही..... असं म्हणून दिवाकर उठुन झोपायला गेला. पण रेवतीच्या ह्या हट्टापायी अमेयची चांगलीच कुचंबणा होत होती. 
ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला होता. 
पराग दहावीला राज्यात सातवा व बारावीच्या परिक्षेत राज्यात दुसरा आला होता.  NEET परिक्षेतही तो राज्यात पहिला येवून ग्रॅन्ड मेडीकल कॉलेज मधुन एम. बी. बी. एस. करून पुढे तिथेच एम. डी. करून आज आपल्या शहरात एक नामांकीत कार्डिओलॉजिस्ट म्हणून नावारुपाला आला होता. पण अमेय मात्र निटला चार वेळा बसुनही, ती क्लीयर नाही करू शकला होता. शेवटी बी. एसी. करून एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी करत होता. दोघांच्या कर्तृत्वात एवढी तफावत असुनही दोन्ही भावांमध्ये राम लक्ष्मणासारखेच प्रेम होते.  दोघांची जोडगोळी ब्लॅक अँड व्हाईट म्हणून शहरात प्रसिद्ध होती. 
पराग आणि अमेयचे दोघांचेही लग्न होवुन दोघेही आपापल्या व्यवसायात आणि संसारात चांगले रमले होते. परागला आणि अमेयला दोघांनाही एकेक पुत्ररत्न झाले होते. अमेय, आई वडीलांच्या बरोबर, त्यांच्याच फ्लॅटमध्ये रहात होता तर पराग त्याच्या टुमदार बंगल्यात रहात होता. परागचं हॉस्पीटल, आज शहरातील नामांकित हॉस्पीटलमध्ये अव्वल होतं. 
त्याच्या हॉस्पीटलला 'हेल्थ एड' स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाले होते. परागने इथेही पहिला नंबर सोडला नव्हता. त्यानिमित्ताने आज त्याने सर्व मित्रमंडळी आणि कुटुंबियांना आपल्या बंगल्यावरतीच एक जंगी पार्टी दिली होती. 
...... आई, बाबा तुम्ही सगळे आजची रात्र इथेच रहा ना. सहा वर्षापूर्वी वास्तुशांतीच्या वेळी तुम्ही इथे राहीला होता. अमेय अरे तु तरी सांग ना आईंना ..... परागच्या सुरात त्याच्या धर्मपत्नीने म्हणजे प्रियांकानेही सुर मिसळला....... नाही. नको. खुप उशीर झालाय. अमेयला उद्या ऑफीसला जायचेय..... रेवतीने नेहमीप्रमाणेच नकार दिला होता....... आई अग, उद्या रविवार आहे. ऑफिसला सुट्टी आहे ...... अमेयने रहाण्यास आपली काहीच अडचण नाही हे स्पष्ट केले होते....... तरी नको..... रेवती आपल्या निर्णयावर ठाम होती..... मी, अनुजा आणि सोहम थांबतो. तु आणि बाबा जा घरी....... अमेयने आपली बाजु मांडली....... ठीक आहे. चला हो. असं म्हणतं रेवती निघाली....... येतो रे आम्ही. आता जास्त वेळ जागरण करू नका. अकरा वाजलेत....... असं म्हणत पाठोपाठ दिवाकरही निघाला...... बाबा अहो चावी तर घ्या गाडीची...... अमेयने गाडीची चावी दिवाकरकडे दिली. 
...... आजची रात्र राहीलो असतो तिथे तर काय बिघडले असते. कित्येक वेळा पराग आणि प्रियांकाही आपल्याला बोलावते पण तु जात नाहीस. आजच्या पार्टीमध्येही तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालेलाच होता. रेवती तुझी ही परागबद्दलची असुया हल्ली स्पष्ट जाणवु लागलीय. अग तो अमेय बघ. आपल्या भावाच्या यशामध्ये किती आनंदीत असतो. आपल्याला दादासारखे डॉक्टर होता नाही आले म्हणून त्याने कधी भावाचा द्वेष नाही केला. आज आपला भाऊ एक मोठा कार्डीओलॉजिस्ट, एका मोठ्या हॉस्पीटलचा मालक आणि आपण मात्र एका कंपनीत साधीशी नोकरी  करतो, याचा लवलेशही त्याच्या मनात नसतो. राम लक्ष्मणासारखी, अगदी दृष्ट लागेल अशी जोडी आहे त्यांची. त्याला असुया वाटायला हवी गं पण ती तुला वाटते आणि ते आता अगदी नजरेत येवु लागलेय. अमेयच्या जन्मानंतर तुझ्यातील हा बदल त्या छोट्या मुलाला पण समजत होता. पराग मला नेहमी विचारायचा, " बाबा आई मला कुशीत झोपायला का नाही घेत? गोष्टी का नाही सांगत ? शाळेत सोडायला का नाही येत ?" पण प्रत्येक वेळी काहीतरी सांगुन मी वेळ मारून न्यायचो. तुझ्याशीही ह्या विषयावर बोललो. पण तुझ्यात काहीच बदल नाही झाला. वाटले वयोपरत्वे बदलशील पण तुझं आपलं तेच....... दिवाकरने एवढी वर्षे दाबुन ठेवलेली खदखद आज मोकळी केली होती. रेवतीने काहीच प्रतिसाद दिला नव्हता. 
साधारण एक वर्षानंतर.... 
आज रेवतीला अस्वस्थ वाटत होतं. दिवाकरने गोळी दिली होती पण काहीच फरक नव्हता....... रेवती मला वाटतं आपण तुझ्या सगळ्या टेस्ट करून घेवुया. मी परागला फोन करतो..... नको. आपण बाजुच्याच इस्पितळात करूया टेस्ट. एवढ्या लांब परागच्या हॉस्पीटलला जायचे माझ्यात त्राण नाहीये....... बरं तसं करू. 
दिवाकरने मग त्या हॉस्पीटलमध्ये रेवतीच्या सर्व टेस्ट केल्या. दुसऱ्या दिवशी दुपारीच, रिपोर्ट घेवून तो घरी आला. रिपोर्ट वाचुन त्याच्या लक्षात आले होते. 
.... रेवती, तसे घाबरण्याचे काही कारणं नाही आहे पण आपल्याला लवकरात लवकर तुझी अँजिओप्लॅस्टी किंवा बायपास करावी लागेल. आजकाल हे फारच सोपे झालयं. मी मघाशीच परागला रिपोर्टस व्हॉटसअॅप केलेत. तो करेल सर्व व्यवस्था....... कशाला केलेत व्हॉटसअॅप त्याला. मला त्याच्याकडून ऑपरेशन नाही करून घ्यायचे. तसाही त्याचा अनुभव फक्त दहा बारा वर्षांचा आहे. आपण डॉ सहस्रबुद्धेंकडे करू. खुप अनुभवी आहेत ते..... अगं आपल्या घरात दोन दोन डॉक्टर असताना, आपण दुसरीकडे जायचे. आणि तो ही शहरातला नंबर वनचा कार्डीओलॉजिस्ट असताना, दुसरीकडे जायचे म्हणजे...... मी एकदा सांगितलं ना, आपण डॉ सहस्रबुद्धेंकडे ऑपरेशन करायचे. मग फायनल. 
आईच्या काळजीपोटी हॉस्पीटलमधुन, हातातलं काम टाकुन धावत आलेला पराग, आई बाबांचा हा संवाद ऐकुन जागीच थिजून गेला. त्याने उगाचच उघड्या दारावर टकटक केली....... आई कशी आहेस तु. काळजी करू नको. एकदम सोपं असतं हे ऑपरेशन. मी आहे नां..... असं म्हणताना डोळ्यात आलेल्या अश्रुंना मागे सारत, चेहऱ्यावर कसलेही भाव न दाखवता त्याने आईला धीर दिला. थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारून तो निघाला. 
आईवेडा असलेला पराग, एवढी वर्षे, आईचे आपल्याबरोबरचे हात राखुनचे वागणे दुर्लक्ष करीत होता. खरेतरं आईवरच्या प्रेमापोटी त्याला कधी ते जाणवलेही नसावे. पण आज मात्र आई बाबांचा संवाद ऐकुन अचानक त्याला काहीतरी विचित्र वाटु लागले होते. 
पराग आज दुपारीच घरी आला होता. त्याचे मन कशातच लागतं नव्हते. 
.... आज दुपारीच कसे काय. तब्येत बरी नाही का?.... प्रियांकाने विचारले. 
.......नाही सहज. बरी आहे तब्येत......... असं म्हणत तो हॉलमध्येच सोफ्यावर बसला. प्रियांकाने आणुन दिलेलं थंड पाणी प्यायल्यावरही, त्याला स्वस्थ वाटेना. त्याने खिशातून फोन काढून बाबांना फोन लावला..... हॅलो बाबा. .... हा बाळा बोलं...... बाबा तुम्ही आईच्या खोलीतून बाहेर या. मला तुम्हाला काही विचारायचे आहे....... अरे मी हॉलमध्येच आहे. रेवतीचा नुकताच डोळा लागलाय..... बाबा एवढी वर्षे मी नाही विचारले तुम्हाला. पण आज तुम्हाला विचारतोय. बाबा, आई माझ्याशी असं फटकून का वागते. माझ्या कुठच्याच गोष्टीचा तिला आनंद का नाही वाटतं...... तसं काही नाहीये बाळा. तिचा स्वभावच तसा आहे....... असं समजूनच बाबा मी एवढी वर्षे दुर्लक्ष केले. पण आज तुमचा संवाद मी ऐकलाय. सहस्रबुद्धे डॉक्टरांकडे ऑपरेशन करण्याचा आईचा निर्णय मी ऐकलाय. बाबा मला आज तुमच्याकडून सर्व जाणून घ्यायचयं. तुम्ही माझ्यापासुन काहीतरी लपवताय..... परागच्या हट्टापोटी दिवाकरला आज सर्व सांगणे भाग होते. बाळा रेवती तुझी खरी आई नाहीये. त्याने परागला मग सर्व स्पष्टपणे, कसलाही आडपडदा न ठेवता सांगुन टाकले. 
परागने फोन ठेवला, तेव्हा त्याचा शर्ट त्याच्या अश्रुंनी भिजला होता. हजारो पेशंटचे हृदय ठीक करणारा तो आज स्वतःच्या हृदयाला बसलेला हा पीळ मात्र ठीक करू शकत नव्हता. अचानक हातातुन काहीतरी निसटल्याच्या भावनेने तो अक्षरशः लहान मुलासारखा रडत होता. त्याची ती अवस्था बघुन प्रियांकाने त्याला मिठी मारली आणि ती ही रडु लागली. आज एवढ्या वर्षानंतर, आईच्या आपल्याबरोबरच्या फटकून वागण्याचा, त्याला अर्थ लागला होता. ती आपली खरी आई नाही आहे, ह्यापेक्षाही ह्या कारणासाठी ती आपल्याशी असं वागते, हे कळल्यामुळे तो जास्तच अस्वस्थ झाला होता. एवढ्या वर्षांच्या प्रश्नांची, त्याला आज उकल होत होती आणि त्याने तो तिळ तिळ तुटत होता. प्रियांकालाही त्याच्या फोनवरील बोलण्यावरून सर्व अंदाज आला होता. ती आपल्या परीने त्याला समजावत होती. .
आज दुपारी बारा वाजता रेवतीचे ऑपरेशन झाले होते. ऑपरेशन सक्सेसफुल झाले होते. संध्याकाळी साधारण तीन वाजता ती शुद्धीवर आली होती.  ती शुद्धीत येण्याची वाट बघत, तिच्या रुममध्ये दिवाकर थांबला होता. बाकी सर्व बाहेर लॉबीमध्ये बसले होते. त्याने बेल वाजवून नर्सला बोलावले. नर्सबरोबरच परागही आत आला होता. नर्सने ब्लडप्रेशर चेक केले. .... सर एकशे पंचवीस, ऐंशी आहे ...... नर्स तिनशे दोनच्या पेशंटला साडे तीनला ओटी मध्ये घ्या....... पराग नर्सला सुचना देत असतानाच दुसरी नर्स आत आली होती..... सर, बाहेर मिसेस सहस्त्रबुद्धे आल्यात. त्या म्हणतायत, "डॉ सहस्रबुद्धेंचं ऑपरेशन तुम्हीच करा म्हणून"...... त्यांना सांगा मीच करणार आहे. आताच मी यांना तीनशे एक च्या पेशंटला म्हणजेच डॉ सहस्रबुद्धेंना ओटी मध्ये घ्यायला सांगितलेय...
शुद्धीत आलेल्या रेवतीला काहीच कळेना. त्याही स्थितीत तिने दिवाकरकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला. दिवाकरने तिला हातानेच खुणावले..... आई ऑपरेशन एकदम मस्त झालयं. आता थोडे दिवस इथे रहायला लागेल. मग तु एकदम पुर्वीसारखीच ठणठणीत होशील..... आई, बाबा, येतो मी....... पराग नर्सला काही सुचना देवून निघाला. पाठोपाठ नर्सही गेली. 
.... अहो हा काय प्रकार आहे..... रेवतीने विचारले..... रेवती, अग, डॉ सहस्त्रबुद्धेंनी तुझे ऑपरेशन करायला सुरुवात केली, आणि त्यांनाच ॲटॅक आला. ते खाली कोसळले. ज्युनिअर डॉक्टरांनी त्यांना बाजुच्या रुममध्ये नेऊन बेडवर झोपवले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना स्टेबल केले. पण तुझे ऑपरेशन कोण करणार हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा होता. दुसरे कोणी डॉक्टरही अॅव्हेलेबल नव्हते. तुला अनास्थेशिया दिलेला होता. ऑपरेशनला सुरुवातही झालेली होती. अशा पारस्थितीत मग ओटी च्या बाहेर उभ्या असलेल्या परागलाच तुझे ऑपरेशन करावे लागले. 
रेवती अग परमेश्वरानेच तुझ्या पदरात श्रीकृष्णाला घातले. पण तुला काही यशोदा होणे नाही जमले. तु त्याला नेहमीच आश्रितासारखे वागवलेस. मुल आईच्या ऋणातून कधीही उतराई नाही होऊ शकत. पण आश्रिताला आश्रयदात्याच्या ऋणातून मुक्त व्हावेच लागते. कदाचित म्हणून नियतीनेच, तुझ्या ऋणातून उतराई होण्याची संधी त्याला दिली असावी.....
 रघुनंदन.  ✍️

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...