शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

1385. समन्वय

      आपणहून आग्रहाने पुण्याला आजी-आजोबांकडे जाऊन चार दिवस राहून आलेल्या आपल्या सतरा वर्षांच्या लेकाबद्दल, कौतुक दाटून आलं होतं त्या दोघांच्याही मनात. तिने लेकाला बरंच काही विचारलं, पण त्याने कशाचंच उत्तर दिलं नव्हतं. त्यानेही लेकाला बोलतं करायचा प्रयत्न केला, पण गप्पच राहिला होता तो. त्या दोघांना नेमकं कळेना की, आपल्या पोराचं नेमकं बिनसलंय तरी काय. ह्याच घालमेलीत दोनेक दिवस उलटले, नी आज त्यांचा लेक येऊन त्या दोघांसमोर उभा राहिला. 
"आई - बाबा... तुम्हाला टेंशन आलेलं ना की ट्वेल्थ सुरु झाली, पण मी अजून काहीच ठरवलेलं नाही माझ्या करीअर बद्दल. Then let me tell u tht, I hv decided now... की मला पुढे काय करायचंय". त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं भुवया उंचावत, नी जिवणी आश्चर्याने वक्र करत. आणि ती म्हणाली... "अरे वा वा... मस्तच... मग काय ठरवलंयस तू नक्की?". लेकाने किंचितसा घसा खाकरत सांगितलं... "मला आॅर्थोपेडीक सर्जन व्हायचंय... thts too specializing in joint replacement". लेकाचं इतकं ठाम मत ऐकून तो आणिकच खुश झाला, पण जरासा साशंकही. आणि तो बोलला... "Thts really nice... and its nt at all difficult for u. U r an extra ordinary student & hv grt prospects for sure. पण डाॅक्टर व्हायचंय ते ही आॅर्थोपेडीक आणि ते सुद्धा जाॅईन्ट्समध्ये स्पेशिअलाईझेशन... हे एवढं स्पेसिफीक का? ब्रान्च कुठलीही मिळो अरे...we can afford all the expenses ok? आपल्याला काहीही कमी नाहीये देवाच्या कृपेने". आपल्या बाबाच्या ह्या शेवटच्या वाक्यावर, लेक किंचितसा हसला. त्या दोघांनाही त्याच्या तशा हसण्याचा अर्थ न उमगून, ते दोघे पुन्हा एकमेकांकडे बघू लागले. लेक पुढे बोलू लागला... 
"पुण्याला आजी - आजोबांसोबत चार दिवस राहून आल्यावरच, माझा हा निर्णय पक्का झालाय. फार वाईट अवस्था आहे दोघांचीही. आजीचे दोन्ही गुडघे कामातून गेलेयत, नी आजोबांचे दोन्ही खांदे. आजीला पाय वर उचलवत नाहीत, तर आजोबांना हात. तुम्हाला माहितीये... आंघोळ आटोपल्यावर आजी आतून दारावर टक-टक करायची, नी मग आजोबा आत जायचे. मी एकदा विचारलं आजोबांना त्याबद्दल. तर आजोबांनी सांगितलं की... ही परकर डोक्याकडून सरकवते, पण स्वतःची स्वतःला साडी मात्र नेसता येत नाही हिला. जरा गोल फिरायचं म्हंटलं तर, मरणाची कळ जाते गुडघ्यांतून हिच्या. मग मीच जमेल तशी साडी नेसवतो हिला. आजोबांचं हे ऐकून, I really got too much upset. मग मला ती आजीची एका बाजूने सुटलेली, पायात येणारी साडी... डोळ्यांतून जास्तच खूपू लागली. एकदा आजोबांच्या शर्टची बटणं खाली वर लागलेली पाहीली मी. मी त्यांना तसं सांगितलं, तर मला म्हणाले... हिला जमेल तशी लावते रे बटणं. अगदीच उघडं बसण्यापेक्षा हे काय वाईट आहे. काही महिन्यांपुर्वी स्वतः शर्ट चढवून, किमान शेवटचं बटण लावता येत असे मला. पण आता तेवढाही हात उचलता येत नाही.
 त्यामुळे सध्या... आम्ही दोघे एकमेकांचे कपडे करतो, असं म्हटलंस तरी चालेल. त्यानंतर मग... मी घालून देतो शर्ट तुम्हाला, नी आजीला साडी नेसवून देतो मी... निदान इथे असेपर्यंत असं म्हंटलं तर, दोघांनीही ठाम नकार दिला मला. आजीने मला एकेदिवशी असंच बोलता बोलता सांगितलं की... एके रात्री झोपण्यापुर्वी मला, पलंगावरुन उठताच येईना. जरा पायावर जोर देत उठायचं म्हटलं, तर देव आठवत होते. मग काय ह्यांनी नुसताच लोटला दरवाजा. पण लॅच डेड करता येईना ह्यांना आतून, की कडीही लावता येईना. दोघेही दिवा चालू ठेऊन, जागत बसलो मग रात्रभर. तीन मजली जुनी बिल्डिंग... वाॅचमन नाही... नी त्यातून मजल्यावरच्या इतर दोन्ही दारांना कुलूप. ह्या वयात फार भिती वाटते रे नाहकच. Hearing all this from them, was very much painful for me... bt was joyful too at the same time, seeing both of them living with each other... jst for each other. आणि बाबा तुम्हीच आत्ता म्हणालात ना की, आपल्याला काहीही कमी नाही. तर अहो हेच तर कमी आहे आपल्याकडे. आजी - आजोबा आपल्याकडे नाहीयेत... एकटेच राहतायत ते, फक्त म्हणायला 'jst a call away'. आणि रोज जोडीने देवासमोर हात जोडून प्रार्थना करतायत ते की... देवा नाही सहन होत आता, तेव्हा मोकळं कर ह्या शरिरातून. आणि ते ऐकूनच मी ठरवलं, आॅर्थोपेडीक सर्जन व्हायचं. कारण आजी - आजोबांच्या वयात जेव्हा आई - बाबा तुम्ही दोघे याल, तेव्हा तुमच्या तोंडून तरी मला हे असलं काही ऐकायचं नाहीये". 
लेकाचं हे सगळं बोलणं ऐकून, धक्काच बसला होता त्या दोघांनाही. जवळपास दिड - पावणे दोन वर्ष आपण पुण्याला गेलेलोच नाही, हे ही प्रकर्षाने जाणवलं त्यांना. फोन भले दिवसाआड होत असले, तरी हे असे तब्येतीतले खाच - खळगे फोनवर कळणं कठीणच. त्याने घड्याळात बघितलं... संध्याकाळचे पावणे सहा झाले होते. "सात, आठ, साडे आठ, मॅक्स टू मॅक्स नऊ". त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याने न सांगताही काही, त्याचा हिशोब तिला करेक्ट कळला होता. आणि तो पटल्याचं तिनेही न बोलताच, त्याला डोळ्यांनी कळवलं. तो किंचितसा हसला नी घाईत आत निघाला. ती ही त्याच्या मागोमाग आत निघाली. आणि त्यांच्या लेकाने त्याचे भरुन आलेले डोळे पुसत, पुण्याला फोन लावला... "हॅलो आजी... आम्ही तिघेही थोड्याच वेळात इथून निघतोय पुण्यासाठी... भेटल्यावर बोलू".
शब्दांविना 'समन्वय' साधला गेला होता तिघांत. कारण लेकालाही बाबाचं कॅल्क्युलेशन... आणि त्यावरचं आईचं आॅथेन्टिकेशन, त्या दोघांनीही अगदी अवाक्षर सुद्धा न काढता करेक्ट कळलं होतं. 

-सचिन श. देशपांडे
कथाविश्व - आपले नात्यांची वीण घट्ट करणारे गोड घरगुती कथांचे अनोखे विश्व🎉

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...