शांत झोप लागत नाही,’ ही तक्रार घेऊन ती त्याच्या क्लिनिकवर आली.
त्यानं पहिला प्रश्न विचारला, “शांत झोप लागण्याचा अनुभव आधी कधी घेतलाय का?”
ती आठवायला लागली…
उत्तर यायला वेळ लागला म्हटल्यावर तोच म्हणाला, “याचा अर्थ शांत झोपेचं सुख अनुभवून बरेच दिवस झाले!”
तशी ती स्वतःला सावरत म्हणाली, “नाही, तसं नाही! शांत झोप म्हणजे काय मला माहीत नाही. पण आधी त्याचा त्रास कधी जाणवला नाही.”
“मग आता त्रास जाणवतोय?” त्यानं शांतपणे विचारलं
“हो! सकाळी उठताना थकवा जाणवतो. पडून रहावसं वाटतं, झोप लागली तर आपण दहा तास झोपू असं वाटतं.” ती म्हणाली.
तो जरासं हसला. म्हणाला, “खरंच दहा तास झोपलात तर कोणी येऊन उठवणार नाही? ‘का झोपलीस’, असं विचारणार नाही?”
ती वरमल्या आवाजात म्हणाली, “मी एकटीच असते.”
“घरात एकट्या आहात की आयुष्यात?”
“माझं घरच माझं आयुष्य आहे!” ती ठामपणे म्हणाली.
“असं म्हणण्याइतकं तुमचं वय दिसत नाही!”
“वयाचा आयुष्याशी काय संबंध?”
“वयाचा आयुष्याशी काही संबंध नाही?” त्यानं प्रतिप्रश्न केला.
ती निरुत्तर झाली.
“आपण या प्रश्नाचं उत्तर आधी शोधू. म्हणजे शांत झोप लागण्याचा उपाय मिळेल.”
“मला वाटलं होतं तुम्ही झोप येण्यासाठी काही औषध द्याल.”
“विचारांना चालना देणं हे औषधच आहे… औषध देऊन मला तुम्हाला बेशुद्ध होण्याची सवय लावायची नाही, तर खऱ्या शांत झोपेचा सहज सुंदर अनुभव मिळवून द्यायचा आहे. प्लीज सहकार्य करा. तुम्हाला कितीही निरर्थक वाटला तरी माझ्या प्रत्येक प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर द्या. तुम्ही खरंच उत्तर देताय, असं मी गृहीत धरतो…
“तुमचं वय?”
“चाळीस.”
“विवाहित आहात?”
“नाही.”
“का?”
“शक्य नव्हतं… शक्य झालं नाही.”
“का?”
“बाबा अचानक गेले आणि त्या धक्क्यानं आई कोलॅप्स झाली. तिला एकटं सोडणं शक्य नव्हतं.”
“नव्हतं म्हणजे?”
“आई गेली… दोन वर्ष झाली.”
“नोकरी करता?”
“बाबांचा बिझनेस बघते.”
“त्यात किती बिझी असता?”
“दोन-तीन तास… त्याहून जास्त हल्ली मी बसू शकत नाही.”
“हल्ली म्हणजे कधीपासून?”
“सहा महिने झाले. खूप थकवा येतो, डोकं जड होतं, पाठीला रग लागते. एका जागी बसू शकत नाही.”
“मग, आपण बिझनेसकडे लक्ष देऊ शकत नाही, याची बोच मनाला लागलीय का?”
यावर तत्परतेनं ती म्हणाली, “छे, छे… असं काही नाही. माझी जबाबदारी मी नीट पार पाडते. मी डिसीजन घेण्यात प्रॉम्प्ट आहे. आणि तेच माझं मुख्य काम आहे… आणि एखादी जबाबदारी स्विकारली तर मी जास्तीत जास्त जीव ओतून ती पार पाडते आणि इथं तर शंभरच्या वर एम्प्लॉईज आहेत. माझा एक चुकीचा निर्णय त्यांच्या भवितव्यावर परिणाम करू शकतो.”
“मग याचा ताण तुमच्या अंतर्मनावर येतोय का?”
तशी छान हसत म्हणाली, “मी म्हटलं ना, मी माझं काम पूर्ण निष्ठेनं करते. त्यामुळं तसा ताण यायचा प्रश्नच नाही. शिवाय साटम काका आणि गद्रे काका अगदी सुरुवातीपासून आमच्या फर्मसोबत जोडले गेले आहेत. त्यांचे सल्ले मी कधीच डावलत नाही.”
मग जरा विचार करून डाॅक्टर हसून म्हणाले, “एक शक्यता नाकारता येत नाही…”
“कोणती?” तिनं उत्सुकतेनं विचारलं.
“तुम्ही ‘दिसायला खरंच खूप सुंदर आहात’, असं मोकळेपणानं तुम्हाला कुणी सांगितलं नाही का?”
आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणं एक सन्नाटा पसरला आणि म्हणून अवचित आलेला हुंदका वातावरणात घुमला.
ती खूप रडली, खूप रडली आणि त्यानं तिला रडू दिलं. मग दोन ग्लास पाणी पिऊन झाल्यावर ती म्हणाली,
“माझ्या आईला ज्यांची ट्रिटमेंट चालू होती, ते डाॅक्टर उल्हास जाखड मला म्हणाले होते.”
“इतकंच म्हणाले, की आणखी काही म्हणाले होते?”
“त्यानी मला मागणी घातली… पण आईच्या जबाबदारीमुळं मी ती स्विकारू शकले नाही. त्यांचाही नाईलाज होता, कारण त्यांची आई सुद्धा आजारी होती. कुणी घर सांभाळणारं त्यांना अपेक्षित होतं.”
“मग परत बोलणं झालंच नाही?”
“आई गेल्याचं मी त्याना कळवलं… पण फारच औपचारिक मेसेज त्यानी पाठवला.”
“आणि तिथनं तुम्हाला शांत झोप लागणं बंद झालं… टॅली करून बघा!”
“पण मी ते स्विकारलं होतं… स्विकारलं आहे! एक-दीड वर्षात त्यांचं लग्न होणं अगदी स्वाभाविक आहे. उलट आईच्या प्रेमाखातर मी स्वार्थ डावलला, याचा मला आनंदच आहे.”
“असं म्हणून तुम्ही तुमची समजूत काढताहात…”
“म्हणजे?” तिनं अविश्वास दाखवत विचारलं.
“तुमची आई हयात असती, तर तुम्हाला हे जाणवलंही नसतं. कारण तुम्ही म्हणालात तसं ‘स्वार्थ डावलल्याचा आनंद’ ही तुमच्या जगण्याची स्ट्रेंथ होती. त्या जोरावर अजून दहा काय वीस वर्ष मजेत जगला असतात. आपल्याला शांत झोप लागत नाहीये, हे तुमच्या लक्षात ही आलं नसतं. किंवा पुढे करायला ‘आईचं आजारपण’ हे कारण मिळालं असतं.”
क्षणभराचा अवधी घेत तिने विचारलं, “मग आता?”
छानसं हसत डाॅक्टर म्हणाला, “आता काय? ब्रह्मदेवाची मदत घ्या. लग्नाच्या गाठी तो स्वर्गातच बांधतो, असं म्हणून मोकळ्या व्हा आणि त्या जाखडाला ही मोकळं करा!”
तिला हसायलाच आलं.
“मी एकही औषध देणार नाही. पण एक उपाय सुचवतो… आधी शांत झोपायचा प्रयत्न करा. झोप येतेय असं वाटलं की टुणकन उडी मारून बेड गाठा आणि दहा तास झोपायचं ठरवून झोपून टाका.”
“आणि तरीही झोप नाही आली तर?” तिनं विचारलं.
“मग जबाबदारीनं विचार करा… ‘खरंच लग्न आवश्यक आहे का? आहे त्या आयुष्यात आपण सुखी आनंदी आहोत का?’ आणि तरी वाटलं काहीतरी राहून गेलंय, आपण लग्न करायला हवं. कुणाचं तरी होऊन राहण्यात खरा आनंद आहे, तर परत इथंच या.”
“इथं कशाला?” तिनं गोंधळून विचारलं.
“कारण तुम्हाला पाहिल्यावर मलाही लग्न करावसं वाटायला लागलंय! प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या कुणाची जबाबदारी घ्यावीशी वाटायला लागलीय. माझी चौकशी करायची असेल, तर हा माझा घरचा फोन आहे. गणूकाका बोलतील तुमच्याशी. ते कित्येक वर्ष मला धमकी देतायत, ‘लग्न कर नाहीतर मी काम सोडून जातो.’
“तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही गणूकाकांना सांगा– ‘आम्ही लग्न करतो, पण तुम्ही कुठे जाऊ नका…!’”
— चंद्रशेखर गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा