“वन शार्डने प्लीज” कमलाने वेटरला सांगितलं. तो अदबीनं मान लववून गोलाकार वाईन ग्लासमधे तिची शार्डने घेऊन आला. वाईनचे दोन घोट घेतल्यावर मन थोडं रिलॅक्स झालं असं तिला उगीचच वाटलं. काल कामाला जाताना आईनं एक पाकिट दिलं होतं ते तिनं उघडलंही नव्हतं.
..”कमले, माहिती व फोटो बघ तरी !” आईची लग्नासाठी सतत चाललेली भुणभुण हल्ली वाढली होती.
”बत्तीस वर्षाची झाली आहेस. आता उशीर नको !”
“आई, मी उद्या एकाला भेटती आहे ग! बघू त्यानंतर!” आईला म्हणून ती बाहेर पडली होती.
तिने पर्समधून पावडरचा कॅाम्पॅक्ट काढला व चेहऱ्यावर अलगद पावडर लावली. डाळिंबी रंगाचं लिपस्टिक वरच्या ओठावर लावून ते ओठ मुडपून खालच्या ओठावर आणलं. फिक्या गुलाबी टॅापवर छोटी पांढरी फुलं असलेली कुर्ती सरळ करून ती दाराकडे बघू लागली..
डेट ला उशीरा येणं यात काय शहाणपणा आहे का? डेटिंग प्रोफाईल बनवताना तर सगळे गुणांचे पुतळे असतात. तिथं Very punctual लिहायचं आणि आता वीस मिनिटे मी इथे ताटकळत बसलेय. 6 ft tall लिहायचं आणि असायचं 5’8.. खरं आहे ते लिहायला काय जातं?
तेवढ्यात दारातून एक व्हिलचेअर आत आली. त्यात एक तिशीतला तरूण बसला होता. खाकी पॅंट, पांढरा टी शर्ट, व्यवस्थित विंचरलेले केस आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामधे तिला काही वेगळच आकर्षण आहे असं जाणवलं.
तो तिच्याकडे बघत म्हणाला, “सॅारी हं..मला थोडा उशीर झाला.”
“अरे देवा! हा अपंग आहे की काय?” तिला धक्का बसला.
त्याला तिचे विचार समजले असावेत.
तो म्हणाला, ” मी राज! मी अपंग वगैरे नाही. हॅार्स रायडिंग हे माझं पॅशन आहे..हॅार्स रायडिंग करताना महिन्यापूर्वी एक ॲक्सिडेंट झाला म्हणून मला सध्या व्हिलचेअर वापरावी लागते. प्लास्टर निघेपर्यंत! बरं..तुम्ही कुठे काम करता? ॲॅपेक्स इंजिनीअरिंग ना?” त्यानं विचारलं.
“हो ॲपेक्स इंजिनीअरिंग मधे काम करते.. तुमचं स्टार्ट-अप आहे ना?” तो अपंग नाही हे ऐकून तिला बरं वाटलं.
“क्लायमेट क्वालिटी सुधारण्याची कंपनी आहे माझी! देशातलं पोल्युशन कमी केलच पाहिजे ना!”तो म्हणाला.
“हा बघा माझा “ॲालवेज ड्रिमिंग”. त्याने एका देखण्या घोड्याचा फोटो दाखवला..”काठेवाडी घोडा आहे!”
“ॲालवेज ड्रिमिंग”आहे घोड्याचं नाव? तिला मजा वाटली. “मला फक्त अरबी घोडे माहित आहेत.” ती हळूच म्हणाली.
“काठेवाडी हा अरबी घोड्याचाच प्रकार आहे..बरं..तुम्हाला ॲपेक्स आवडते का? खूप चांगली कंपनी आहे असं ऐकलय” तो म्हणाला.
“नाही आवडत विशेष..कारण ॲपेक्सचं वर्क कल्चर मला पटत नाही. कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग नाही. प्रॅाडक्टचा दर्जा सुधारण्यासाठी रिसर्च नाही. आमचा फिडबॅक नको असतो.. असे बरेच मुद्दे आहेत.” तिनं चष्मा काढून टेबलावर ठेवला.
“मला परत हॅार्स रायडिंग केव्हा जमेल याची कल्पना नाही. डॅाक्टर खात्रीने काही सांगत नाहीयेत.” तो म्हणाला.
“तुमच्या घोड्याचं नाव “ॲालवेज ड्रिमिंग”आहे ना? मग तुम्ही पण आपण आपल्या घोड्यावरून रपेट करतो आहोत असं स्वप्न बघत रहा म्हणजे ते प्रत्यक्षात येईल.”
त्याला ते आवडलं. “आपण एकमेकाला अहो जाहो नको म्हणायला.. तो म्हणाला. सर्वोत्कृष्ट अश्व पुरस्कारासाठी “ॲालवेज ड्रिमिंग” ला तयार करतो आहे…
कान,चेहरा,बांधा,पाय आणि वागणूक या निकषांवर घोड्यांचे परीक्षण करतात.. ”
“हो का? फारच इंटरेस्टींग! किती वेगळी हॅाबी आहे ही! पण नेमका हॅार्स शो च्या दिवशी घोडा उधळला वगैरे तर?” तिनं कुतूहलाने विचारलं.
“घोडा हा अत्यंत बुध्दिमान प्राणी आहे. त्याची स्मरणशक्ती उत्तम असते. त्याच्याशी एक जवळचं नातं निर्माण करावं लागतं. त्याचा खरारा करणं, त्याला खायला घालणं, त्याच्याशी गप्पा मारणे..हे सगळं स्वत: केलं की त्याचा मूड, राग, लोभ सगळं समजतं. स्वभाव कळला की मग शो च्या दिवशी त्याला शांत व रिलॅक्सड ठेवता येतं. हेच नातं काय पण कुठलेही नातं बनण्यासाठी वेळ द्यावा लागतो. कष्ट असतात त्यात. नात्याचा प्राजक्त फुलण्यासाठी त्याला प्रेमाचं खत पाणी घालावं लागतं.. राज तिला समजावून सांगत होता.
ती हनुवटीवर हात ठेऊन ऐकतच राहिली..मनात आलं..किती छान बोलतो हा!
“मला बघायला मिळेल का “ॲालवेज ड्रिमिंग”? तिनं उत्सुकतेनं विचारलं.
“नक्कीच”! त्याचा मूड बघतो आणि कळवतो” राजचं बोलणं ऐकून तिला खुदकन् हसू आलं. “डेटिंग नकोसं वाटतं होतं पण बरं झालं आले ते!” वाटून तिचा चेहरा खुलला होता.
“कसा होता गं?” नेहमीप्रमाणे लेकीचे हात पिवळे करण्याची चिंता आईच्या प्रश्नात दिसली..
“ठीक” ती म्हणाली पण तिचा खुललेला चेहरा आईच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही.
आईला वाटायचं आपल्या सुंदर, गुणी, हुशार कमलेला एखादा राजकुमार सफेद घोड्यावरून येऊन उचलून घेऊन जाईल..पण असं काही घडत नव्हतं..
आई बाबांना म्हणाली, ”अहो आपल्या काळात लग्नं किती पटकन ठरायची हो..आता कसली ती डोंबलाची डेटिंग ॲप आणि ते कसलं डेटिंग. आखूडशिंगी बहुदूधी शोधत बसायचं अन मग वय वाढत जातं...सगळं कसं मनासारखं हवं ह्यांना. संसार रथ ओढण्यास प्रेम, विश्वास, सहनशीलता, तडजोड कष्ट असे अश्व जोडावे लागतात.. नाहीतर रथचक्र जमिनीत अडकायला वेळ लागत नाही..
बाबा हसून म्हणाले,”अग, होईल ग! आणि हो..त्या संसाररथाला एक संयम नावाचा सहावा घोडा पण जोड बरं!”आई वैतागून किचन मधे गेली.
कमला राजच्या टेक्स्ट ची वाट बघत होती. आठवडा गेला पण टेक्स्ट आला नाही म्हणून ती हिरमुसली होती. स्वप्न बघू नयेत माणसांनं हेच खरं..तिने How is “Always dreaming” असा टेक्स्ट टाईप केला खरा पण पाठवायचे धाडस झाले नाही..
एका सोमवारी ती ॲाफिसला जाताच प्युन म्हणाला, “मॅडम, सरांनी तुम्हाला लगेच भेटायला बोलावलय.” कमलानं केस नीट केले व ती सरांच्या केबिन मधे गेली.
सरांनी मुद्यालाच हात घातला..
ते म्हणाले,” बस. तुला ॲपेक्सचं वर्क कल्चर आवडत नाही असं कानावर आलं.”
ती गडबडली.. “नाही, नाही सर, असं काही नाही.”
तेवढ्यात राज तिथे चक्क चालत आला. प्लास्टर काढलेलं दिसत होतं.
कमला त्याला पाहून फारच गोंधळली..
सर म्हणाले, “कमला, हा माझा मुलगा राज! ॲपेक्स च्या कामकाजात मला मदत करतो. त्याचं स्वत:चं स्टार्ट अप सुध्दा आहे.”
ती चपापली. “अरे देवा”..नेमकं सरांच्या मुलालाच आपण सांगितलं आपण की तुमची कंपनी मला आवडत नाही. म्हणूनच याचा टेक्स्ट आला नाही. आता गेली नोकरी.
तिचा गोरामोरा चेहरा पाहून सर म्हणाले, “कमला, अगदी मोकळेपणाने सांग काय वाटतं तुला ॲपेक्स बद्दल?”
कमलाने तिला खटकणारे सर्व मुद्दे सांगितले आणि सरांनी शांतपणे ऐकून घेतले..
“सर, माझं कदाचित चूक असेलही पण मी अमेरिकेत MS करत असताना अशाच कंपनीमध्ये इंटर्नशिप केली होती. तिथलं वर्क कल्चर व आपलं यात मला फार फरक वाटला म्हणून मी हे बोलले.” ती म्हणाली.
“ठीक आहे. मी विचार करतो.” सर म्हणाले. राज पण लक्ष देऊन ऐकत होता.
ती केबिन मधून बाहेर पडली. तिला स्वत:चा राग आला होता. राज नेमका सरांचा मुलगा निघावा? आता नवी नोकरी शोधली
पाहिजे. संध्याकाळी घरी येताच तिनं काही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज पाठवण्यास सुरूवात केली.
अशीच एका संध्याकाळी ती निराश होऊन घरी बसली होती. राज भेटल्यापासून कुणाला भेटावंसही वाटत नव्हतं. त्यात आता नोकरीची खात्री नव्हती व राज कडून काही टेक्स्ट येईल असंही वाटतं नव्हतं. तेवढ्यात बेल वाजली म्हणून बाबांनी दार उघडलं. बाहेर कमलाचे बॅास बघून त्यांना खूप आश्चर्य वाटलं..ते गडबडले. त्यांच्याबरोबर एक देखणा तरूण मुलगा व एक बाई पण आल्या होत्या.
“कमला, सर आलेत ग!” बाबांनी हाक मारली. ती घाईनं बाहेर आली आणि राज, सरांना व त्यांच्या पत्नीला बघून एकदम गोरीमोरी झाली.
सर हसत बाबांना म्हणाले, “माफ करा..फोन न करता आलो.. आमच्या युवराजांना चैन पडत नव्हतं म्हणून यावच लागलं”..
आम्ही कमलेला ॲपेक्स इंजीनियरिंगच्या मालकिण बाई करून घेण्यासाठी आलो आहोत. अर्थात तुमची परवानगी असेल तरच!
राजला ती आवडली आहे.. हॅार्स रायडिंग मधे कमलाला खूप इंटरेस्ट आहे हे त्याच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे! तिचा स्पष्टवक्तेपणा त्याला मनापासून आवडला आहे आणि मला तिनं ॲपेक्स इंजीनियरिंग साठी केलेल्या अनेक सूचना खरोखरच आवडल्या आहेत. Excellent feedback!”
कमला लाजून आत पळाली. राज तिच्या बाबांना “ॲालवेज ड्रिमिंग” बद्दल उत्साहाने सांगत होता..आणि आई चकित होऊन कौतुकाने सारे ऐकत होती.
बाहेर काहीतरी फुर्र फुर्र आवाज येत होता म्हणून त्यांनी खिडकीतून बाहेर बघितलं. दाराबाहेर गडद तांबूस रंगाचा एक रूबाबदार घोडा उभा होता व एक माणूस त्याचे लगाम हातात घेऊन उभा होता.
“कमलाला “ॲालवेज ड्रिमिंग” ला भेटायचं होते म्हणून त्यालाही घेऊन आलो.” राज म्हणाला व आई बाबा अवाक होऊन बघू लागले.. कमला कपडे बदलून बाहेर आली.
राज कुजबुजला, “ सुंदर व हुशार मुली त्याला फार आवडतात हं !” ती हसली. ते बाहेर जाऊन “ॲालवेज ड्रिमिंग”ला भेटून आत आले. इतर काही गप्पा होऊन ती लोकं पुढे काय करायचं ठरवून घरी गेली. आई कौतुकाने लाजलेल्या कमलेकडे बघत राहिली. आज खरोखरच घोड्यावर बसून एक राजकुमार तिच्या गुणी, हुशार कमलेला घेऊन जाण्यासाठी आला होता.
“कमला, घोडा सफेद नाही पण तेवढी तडजोड आई नक्की करेल.. नाही का? ” बाबा मिष्कीलपणे हसत लेकीला म्हणाले.
कमला हसली व तिच्या खोलीत पळाली. मनाने ती त्या राजकुमाराची झाली होती ! “ॲालवेज ड्रिमिंग” वर तिला पुढे बसवून तो तिला केव्हाच स्वप्नांच्या राज्यात घेऊन गेला होता !
©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा