आज्जी अगं कशाला आलीस इतक्या सकाळी सकाळी?... दुपारी आरामात डबा घेऊन यायचं ना?..." मिताली तिच्या आज्जीला म्हणाली. तिच्याशी एक शब्दही न बोलता आज्जीने ICU च्या काचेचं दार ढकलत आत प्रवेश केला. बाजूला उभा असलेल्या मितेशने हे पाहिलं. मिताली अजून काही आज्जीला बोलणार त्याच्या आत त्याने मितालीजवळ जात फक्त बोटाच्या इशाराने तिला शांत बसायला सांगितलं. तिकडे आज्जी सावकाश पावलं टाकत आजोबांच्या बेडपाशी आल्या... एक क्षण त्यांनी ICU च्या बेडवर निपचित पडलेल्या आजोबांकडे पाहिलं, डोळ्यातलं अश्रू पदराने पुसले आणि बेडच्या बाजूच्या स्टुलावर त्या अलगद बसल्या. ICU च्या बाहेरच्या काचेच्या तावदानातून मितेश आणि मिताली हे बघत होते. सकाळी सकाळी आज्जी आल्याने मितालीची जरा चिडचिड चालली होती. मितेश तिला शांत करत म्हणाला.
"अगं बावळट आज आज्जीआजोबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे आज्जी आज लवकर आल्या असतील कशाला उगाचंच चिडचिड करतेस. तू येथे शांत बैस आणि त्यांना जरा बसू देत आतमध्ये एकट्याने. उगाचंच आत जावून आज्जीला काहीबाही बोलू नकोस."
आजोबा गेल्या दहा दिवसांपासून ऍडमिट होते. नात मिताली आणि नात जावई मितेश हे दोघेही डॉक्टर असल्याने आजोबांना त्यांच्याच दवाखान्यात भरती केले होते. अगदी ठणठणीत तब्येत असलेले आजोबा घरात अचानक पाय घसरून पडले आणि डोक्याला मार लागल्याने कोमात गेले होते. आज त्याला दहा दिवस झाले होते. आज्जी रोज दुपारी मितेश मितालीचा डबा घेऊन दवाखान्यात यायची. आजोबांना भेटून संध्याकाळी पुन्हा घरी जायची पण आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने आज्जी सकाळी लवकर उठून, देवळात जावून देवदर्शन करून थेट दवाखान्यात आली होती. मितालीला हे समजल्यावर आपल्याला 'हे माहीत असूनही कसं विसरलो?' या विचाराने तिला उगाचंच अपराधी वाटलं. तिनं जागेवर उठून सहज काचेच्या तावदानातून आत डोकावून पाहिलं. आज्जी आजोबांच्या शेजारी स्टूलवर बसली होती. आज्जी आज काही वेगळ्याच मूडमध्ये दिसत होती. आज्जी आजोबांचा हात आपल्या दोन्ही तळहाताच्या मध्ये घेऊन एकटक आजोबांकडे बघत होती. बराच वेळ गेल्यावर आज्जीने पुन्हा अलगद आपले अश्रू टिपत पुन्हा आजोबांचा हात हातात घेत त्या आजोबांशी बोलू लागल्या.
" अहो असं काय करताय? हे असं वागणं शोभत का तुम्हाला?. संबंध आयुष्यात कधी आजारी पडला नाहीत. कधी साधी एक औषधाची गोळी घेतली नाही की कधी एक इंजेक्शन घेतलं नाही. साधा सर्दी ताप तुम्हाला आलेला मी कधी तुम्हाला पाहिलं नाही. आणि आज हे नाकातोंडात नळ्या घालून बसलाय हे असं वागणं शोभत का तुम्हाला?. बास झालं आता हे. चला घरी."
आज्जी काही वेळ थबकली. गळ्यात आलेला आवंढा गिळत ती पुन्हा आजोबांशी बोलू लागली.
" आज आपल्या लग्नाला इतकी वर्षे झाली. इतक्या साऱ्या वर्षात तुम्ही कधी माझा शब्द खाली पडू दिलात नाहीत, मी म्हणेल ते ऐकलंत. तेंव्हा आजही माझं ऐका आणि घरी चला. आयुष्यभर तुम्ही मला काहीही बोलला नाहीत. मी किती बडबड केली तरी उलट उत्तर कधी दिले नाही की कधी वाद घातला नाही. अहो तुम्हाला साधा चहा देखील करता येत नाही. तुम्हाला सगळं जागेवर आयतं लागायचं. बाहेरचं कधी काही तुम्ही खाल्लं नाही. तुमच्या या सवयीमुळे मला किती त्रास व्हायचा, किती चिडायचे मी. मला दोन चार दिवस घर सोडून कधी जाता यायचं नाही. मी कधी आजारी पडले तर तुम्ही सुट्टी काढून घरात नुसते बसून असायचात पण तुम्हाला साधा वरण भात करता आला नाही. तो ही मलाचं करावा लागायचा. चिडचिड व्हायची माझी. काहीबाही, उलटंपालट बोलायची मी तुम्हाला.पण तुम्ही मात्र शांत. तुमची ती शांतता मला आवडायची हो, पण आज हे तुमचे शांत पडून राहणे बघवत नाही. जीव नुसता पिळवटून निघालाय हो. का करताय असं?." आज्जी कळवळून बोलत होती.
" सगळं आयुष्य तुम्ही आपल्या मनाप्रमाणे जगलात. जगाचा कधी विचार केला नाहीत. चाळीस वर्षे सरकारी नोकरी केलीत. दर एक तारखेला सगळा पगार आणून माझ्या हातावर ठेवला की तुम्ही मोकळे व्हायचा. कधी हिशोब विचारला नाही. तुम्हाला स्वतःला कशाला पैसे लागले, तर माझ्याकडून मागायचात. पण खरं सांगू का? तुमचा हा स्वभाव आवडतो मला. न बोलता काळजी करता. न बोलता मनासारखे करता. कधी काही तक्रार नाही की बोलणे नाही. पण आज हे तुमचे शांत पडून राहणे बघवत नाही. आयुष्यभर माझा शब्द पाळलात ना. मग आजही पाळा. बास झालं आता हे. चला घरी. तुमच्याशिवाय घराला मजा नाही हो. तुम्ही नुसतं आजूबाजूला असता ना. हे सुध्दा मला खूप आहे."
"दरवर्षी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही मला नवी साडी घेऊन देता. मग चला मला, या वर्षीही नवीन साडी घेऊन द्या."
आज्जीला बोलता बोलता पुन्हा आवंढा आला आणि त्या आजोबांच्या हातात हात घेतलेल्या हातावर आपलं डोकं टेकवत रडू लागल्या. बाहेर मितालीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते. बाजूला उभ्या असलेल्या मितेशने तिला आपल्या कवेत घेतले, आणि तिला सावरत आत घेऊन गेला. आज्जी अजूनही आजोबाच्या हातातर डोकं टेकवून होत्या. मिताली आज्जीपाशी गेली. तिनं आज्जीच्या खांद्यावर हात ठेवून तिला हाक मारली.
" आज्जी चल उठ..." पण आज्जीने काही प्रतिसाद दिला नाही, ती काही बोलली नाही. मिताली जरा गडबडली. तिनं मितेशकडे पाहिलं. मितेश लगबगीने आज्जीला बघितलं. क्षणभर तो हादरला. त्याने आजोबांकडे पाहिलं. हात कापले त्याचे. चेहरा पांढराफटक पडला. यंत्र कधीच बंद पडली होती. मितालीने मितेशच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले आणि एक जोराचा हंबरडा फोडत ती मितेशच्या कवेत हमसाहमशी रडू लागली. मितेशने स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुसत आजोबांच्या डोळ्यावरून हात फिरवला. आजोबा कदाचित आज्जीच्या येण्याची वाट पहात थांबले होते.
सगळं सगळं शांत झालं होतं... दोन्ही जीव हातात हात घालून शांतपणे आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले होते..
कुलकर्ण्यांचा " ..... " प्रशांत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा