सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

1370. प्रारब्ध

      माझ्या बिल्डिंग समोरच एक बैठी चाळ आहे. मी पहिल्या मजल्यावर रहातो. त्यामुळे माझ्या अगदी घरुनच मला, त्या चाळीतील पहिली दोनेक बिर्‍हाडं. अगदी व्यवस्थित दिसतात. आता ही दोन्ही घरं गेली बरीच वर्ष बंद होती. पण गेल्याच महिन्यात त्यातील पहिल्या घरात, एक कुटूंब रहायला आलं. दुपारभर स्तब्ध उभं असलेल्या झाडाची. उन्ह कलताना थोडीशी सळसळ होते, तसं वाटलं मला. जराशी जाग आली होती, त्या तेवढ्या भागाला. दोन खोल्यांचं घर. नी पुढे एक पेटी (मोठ्ठा लाकडी खोका ज्याच्या आत सामान ठेऊन, तो वरुन बंद करता येतो) आणि पाण्याचं एक मोठ पिंप राहू शकेल ईतकी ओसरी. तर त्या पेटीवर मला तो दिसे बसलेला. वय साधारण पंचेचाळीसच्या आसपास. चांगला उंचापुरा. भक्कम बांध्याचा. कष्टाचं अंग आहे हे कळून येणारा. सहाच्या दरम्यान तो कामावरुन घरी येई. साधीशी पँट, त्यावर न खोचलेला साधासाच शर्ट, पायात चपला आणि हातात एक कुठल्याशा गारमेंट्सच्या दुकानाची पिशवी. ती ही ईतकी वापरलेली की, त्यावरच्या दुकानाच्या नावाची अक्षरं पार पुसट झालेली. त्या पिशवीत जेवणाचा डबा असावा. पण एकंदरच पिशवीच्या आकारावरुन कल्पना यावी की, डब्यातून फक्त भाजी नी पोळ्या पेपरात गुंडाळून घेतल्या असाव्यात. एकंदरीत नोकरी. काम अन पगार यांची योग्य सांगड घालणारी नसावी, हे समजून येत होतं. कामावरुन आल्यावर हात - पाय - तोंड धुवून अर्ध्या तासाच्या आत, हा जो त्या पेटीवर येऊन बसे ते थेट जेवायलाच आत जाई. साधारण साडेनऊच्या सुमारास. मग पुन्हा दहाच्या दरम्यान बाहेर बसे पेटीवर, ते अकरा वाजता झोपायला आत जाई. बाहेर बसल्या बसल्याच मग वाकून, TV ही बघत असे तो. त्याचे म्हातारे आई - बाप, कधीतरी दिसत आत - बाहेर करतांना. दोघेही सत्तरी पार केलेले आणि पिचलेले, पिकलेले, परिस्थितीने गांजलेले. आणिक एक जण दिसे त्या घरातून वावरतांना. दिसायला साधारण त्याच्या सारखाच. अंगकाठीनेही तसाच. पण सदानकदा एक खाकी मळकट चड्डी, आणि हातवाल्या बनियानवर. कधी अंगण झाड, कधी पेटी पूस, कधी पिंपात पाणी भर, तर कधी बाबांसोबत पिशव्या उचलण्यासाठी बाहेर जा. असं सगळं करे तो. बरं बाहेर जातांनाही. बनियानवर फक्त एक शर्ट चढवे तो, ज्याची बटणंही बर्‍याचदा उघडीच असत. पण ह्या चारजणां व्यतिरीक्त आणि कोणी नसावं घरात असं वाटे. म्हणजे दिसलं तरी नाही कधीच कोणी. प्रश्न पडत असे की, ईतक्या वयस्कर अशा दोन पुरुषांची लग्न झाली नसावीत? आणि त्यामुळे आणिकच कुतुहल वाढत होतं माझं, त्या कुटुंबाबद्दल. 
     एकदा माझ्या सवयीनुसार मी थोडंस धान्य मुठीत घेऊन, आमच्या गॅलरीच्या जाळीवर एक प्लाय जो टाकलाय. त्यावर ठेवत होतो. एक वाटी पाणी ही ठेवलं होतं. कबुतरं, चिमण्या येऊन धान्य टिपत आणि पाणी ही पित असत. मला ते करतांना पाहून तो जो चड्डी - बनियानवाला पुरुष होता, त्याने मला विचारलं. "काका काका हे तुम्ही काय करता?". पहिली - दुसरीतल्या मुलाप्रमाणे टोन होता त्याचा. मी जरा बिचकलोच होतो. पण तरी त्याला सांगितलं मी, ते ठेवण्या मागचं कारण समजावून. त्यावर त्याने चक्क उड्या मारत, टाळ्या वाजवल्या. मला साधारण कल्पना आली प्रकरण जरा वेगळं असल्याची. मग मी उगिचच त्याच्या त्या नोकरी करणार्‍या भावातही, अशी काही लक्षणं दिसतात का ते बघू लागलो. खरंतर शोधू लागलो. पण तो नाॅर्मलच वाटला होता मला. अशा तर्‍हेने कामाच्या धबडग्यातून. कधीतरी निवांत वेळ मिळाला की, माझं लक्ष जाई त्या घराकडे नी घरातील माणसांकडेही. 
      तर अगदी मागच्याच आठवड्यातील गोष्ट. मी जेऊन, जराशी शतपावली वैगरे घालून. साधारण दहाच्या सुमारास आमच्या गॅलरीत येऊन उभा राहिलो. आणि तितक्यात त्याच समोरच्या घरातून, अंगावर काटा आणणारा आरडा ओरडा ऐकू येऊ लागला. मी गॅलरीत होतोच. पण पटापट ईतरही घरांतील गॅलर्‍यांचे दिवे लागले, नी लोकं बाहेर येऊन पाहू लागली इथेतीथे. माझंही कुटूंब धावतच गॅलरीत आलं. तेवढ्यात तो गतीमंद भाऊ ओरडतच बाहेर आला. नी तो नाॅर्मल भाऊ आला धावतच त्याच्या पाठोपाठ, हातात एक फळकूट घेऊन. बेदम झोडत होता तो आपल्या भावाला, त्या फळकूटाने. आणि तो तिथल्यातीथेच फिरत होता. मार खात होता. टाहो फोडत होता. पण एकदाही त्याने, कणभरही प्रतिकार केला नव्हता भावाला. अखेर लांबूनच बघणारे त्याचे आई - बाबा मध्ये आले. बाबांनी त्या मारणार्‍याला थोपवलं. तर आई त्या मार खाणार्‍याला घरात घेऊन गेली. सगळे बघे गॅलरीचे दिवे बंद करुन, आत निघून गेले. मी मात्र तसाच उभा होतो गॅलरीत सुन्न होऊन. त्या दिवशीचा उड्या मारत, टाळ्या पिटणारा तोच येत होता सारखा डोळ्यांसमोर. त्या रात्री डोळाही मुश्किलीनेच लागला माझा. अन् सकाळीही अंमळ लवकरच जाग आली. मी ठरवलं होतं पण की आज त्या फळकूट घेऊन मारणार्‍या भावाला, विचारायचंच की काय प्रकार आहे एकंदर. फारतर काय. नाही सांगणार काही, हुज्जत घालेल. पण तरिही आपण प्रयत्न करायचाच. 
     प्रातर्वीधी वैगरे सगळे आटोपून, मी आठच्या सुमारासच आमच्या गेटवर जाऊन उभा राहिलो. साधारण सव्वाआठच्या सुमारास तो कामावर जाण्यासाठी बाहेर पडत असे. म्हणजे जास्तीत जास्त आणिक विसेक मिनिटांत, तो आमच्या गेटपाशी पोहोचणं अपेक्षीत होतं. पण तो आलाच नाही. पावणे नऊ वाजले तरीही. मला आता जाम चैन पडेना. काय करावं सुचेना. पण शेवटी ठरवलं जे होईल ते होईल. घरीच जाऊयात सरळ. कुलस्वामीनीचं नाव घेत हात जोडले आणि जाऊन सरळ कडीच वाजवली त्यांच्या घराची. म्हातार्‍या वडिलांनी दरवाजा उघडला आणि अगदी ओळख असल्यासारखं त्यांनी मला आत बोलावलं. आत शिरताच मला दिसला तो. खाली बसलेला पाय चेपत त्याच्या भावाचे, ज्याला काल कूटला होता त्याने. मला बघताच तो उठला. त्याने हात जोडून नमस्कार केला मला. आणि आतल्या खोलीत जाऊन दारामागे अडकवलेला शर्ट चढवून, बाहेर आला तो. तोपर्यंत माझ्याबरोबर बसलेले त्याचे बाबा, उठून आत गेले. भाऊ झोपला होता म्हणून, जरा हळू आवाजातच बोलायला सुरुवात केली त्याने.
"नमस्कार. आम्ही ओळखतो तुम्हाला. ह्या माझ्या धाकट्या भावानेच आम्हा सगळ्यांना सांगितलं होतं तुमच्याबद्दल. त्याला फारच अप्रुप आहे तुमच्या त्या पक्षांसाठी दाणे नी पाणी ठेवण्याचं. अगदी लहान मुलासारखं. लहानच तर आहे तो. वयाने बेचाळीस पण डोक्याने चार अधिक दोन सहा वर्षांचाच. त्यामुळेच जगही खूप मर्यादीत आहे त्याचं. आई - बाबा - दादा - आणि चिमणीवाले काका म्हणजेच तुम्ही. हे नावही त्यानेच दिलेलं बरं का तुम्हाला. माझ्यापेक्षा अवघ्या दोन वर्षांनी लहान".
"पण हे असं... आय मीन... हा बुध्यांक कमी... म्हणजे हे जन्मापासूनच की?"
"नाही. ग्रॅज्युएट आहे हा. डिस्टिंक्शनमध्ये. लास्ट ईयरला अकौन्ट्समध्ये काॅलेजमधून हाईयेस्ट. ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या एका मोठ्ठ्या लाॅ फर्म मध्ये, अकाऊंटंट म्हणून लागला. LLB करण्याचा विचार होता त्याचा. सगळी चौकशीही केली होती. लाॅ फर्म मध्येच कामाला असल्याने, त्याच्या बाॅसेसचाही सपोर्ट होता त्याला. लाडका झाला होता तो त्यांचा चार महिन्यांतच, त्याच्या सिन्सिअॅरीटीमुळे".
"पण मग... हे असं... म्हणजे कसं काय?"
"सगळं छान चालू होतं ह्याचं. माझंच टेन्शन असायचं आई - बाबांना. शिकायचा कंटाळा त्यामुळे बारावीत नापास झाल्यावर, मी काॅलेज सोडलं होतं. मग असाच वायरमॅन आणि मोटर रिवाईंडींगचा कोर्स केला आणि लागलो एका कंपनीत. पण तिथेही कामापेक्षा माझं लक्ष असे, आमच्या युनिअनच्या भानगडींमध्येच. मुळातच बेडर स्वभाव आणि समोर कोणीही आला तरी, डोळ्याला डोळा भिडवायची सवय. त्यामुळे मला लगेच उचलला आमच्या युनिअनच्या लिडरने. मग तर पुर्णवेळ मी वाहूनच घेतलं होतं मला, त्या चववळीत. एका वर्षी बोनस देण्यावरुन, मॅनेजमेंट आणि युनिअनमध्ये वाजलं. वाद पराकोटीला गेले. आम्ही टाळेबंदी पुकारली. खूप भांडणं झाली. अगदी मार्‍यामार्‍याही झाल्या आणि प्रत्येकवेळी मी आघाडीवर होतो. आई - बाबा - भाऊ मला समजावून थकले. पण माझ्यातली रग काही कमी व्हायचं नाव घेईना. एकदा असाच कामासाठी, आमच्या लिडरबरोबर वापीला गेलेलो आणि ईथे मॅनेजमेंटने माझ्यासाठी फिल्डिंग लावली होती. सुपारी घेतलेल्यांचा गैरसमज झाला आणि साधारण माझ्यासारख्याच दिसणार्‍या ह्या माझ्या भावाला त्याचे परिणाम भोगावे लागले. मी तीघा - चौघांना सहज लोळवेन हे माहिती असल्याने सात जण उभे होते दबा धरुन. नोकरीवर चाललेला माझा भाऊ, त्यांच्या टप्प्यात आला आणि सातहीजण तुटून पडले त्याच्यावर. त्याला मरेस्तोवर मारला. काठ्या, हाॅकी स्टीक्स, सायकलची चेन, लाथा - बुक्क्याने मार मार मारलं भावाला. बेशुद्ध पडलेल्या त्याला, तो मेला असं समजून पळून गेले ते. सकाळी रस्त्यावरील तुरळक गर्दीपैकीच कोणीतरी, भावाला हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट केलं. पाच दिवस कोमामध्ये होता माझा भाऊ आणि सहाव्या दिवशी उठला तेच, सहा वर्षांच्या मुलाचं डोकं घेऊन. पर्मनंट डॅमेज झालाय ब्रेनचा, इर्रिकव्हरेबल असं सांगितलं डाॅॅक्टरनी आम्हाला. आयुष्यात पहिल्यांदा मी मुळापासून हादरलो. आयुष्यात पहिल्यांदाच मी, खोल आतून रडलो. बदला बिदला ह्या भावनेपुढे मला, माझ्या आई - बाबांना यापुढे सांभाळणं आणि गतीमंद भावाला जपणं. जास्त महत्वाचं वाटलं, नी आम्ही आमचं शहर सोडून मुंबईला आलो. परळला काकांची एक खोली होती. तिथेच रहात होतो गेली पंधराहून जास्त वर्ष. चुलत भावाचं लग्न झालं गेल्या महिन्यात, म्हणून ती खोली सोडून महिन्याभरापुर्वी ईथे आलो."
"आणि मग तुमचं लग्न?"
"नाही करणार कधीच हे त्याचवेळी ठरवलं होतं. जेव्हा आपल्या अशा भावाचं आपल्याला सगळं करायचंय, हे ठरलं होतं त्या दिवशी जर मी वापीला गेलो नसतो तर ह्याच्याजागी मी असतो आणि माझ्याजागी हा. इन शाॅर्ट आत्ता आम्ही दोघं आपापलं नाही तर एकमेकांचं आयुष्य जगतोय. एकमेकांचं 'प्रारब्ध' भोगतोय. कुठली बाई सासरी येऊन वयाने इतक्या मोठ्या, पण बुद्धीने एवढ्या छोट्या दिराचं करेल? म्हणून मग फंदातच पडलो नाही. त्या मुली वैगरे बघण्याच्या आणि वेळही नाही मिळाला खरंतर. आता टाळी एका हाताने तर वाजत नाही. माझा लहान भाऊ माझं आयुष्य जगतोय म्हंटल्यावर, मलाही त्याचं आयुष्य जगणं भाग आहे. मग प्रचंड मेहनत केली मी. जिवाचं रान केलं. आणि आधी बारावी. मग ग्रॅज्युएशन आणि नंतर LLB ही पुर्ण केलं. भाऊ ज्या फर्ममध्ये नोकरीला होता त्यांच्याच मुंबईच्या ब्रँचमध्ये सब-स्टाफ म्हणून कामाला लागलो होतो मी. आता तिथे सिनिअर अकौटंट आहे. दॅट्स हाऊ आय अॅम लिव्हिंग माय ब्रदर्स लाईफ नाऊ, विच वाॅज सपोज्ड टू बी इन हिज डेस्टनी."
"पण मग ते कालचं त्याला इतकं मारणं?"
"होतो कधीतरी सहनशीलतेचा अंत. नाही जमत पेशन्स राखायला कधीकधी. मग मारतो मी त्याला ह्याने".
"अरेच्चा...लांबून तर मला हे लाकडी फळकूट वाटलं होतं. हे तर प्लास्टिक. पण मग इतकं ओरडणं?"
"होणारा आघात नी उठणारी वेदना, ह्यांची तरी कूठे सांगड घालता येतेय ह्या सहा वर्षांच्या मेंदूला. म्हणून ओरडतो वाट्टेल तसा. पण तरीही इतका ओबिडिअन्ट आहे म्हणून सांगू. बाहेर एकट्याने पाय ठेवायचा नाही सांगितलंय त्याला. म्हणूनच मार पडत असतांनाही, ही ओसरी ओलांडून जात नाही तो बाहेर."
"आणि तुमच्या हातावर हे असे काळे डाग कसले पडलेत? आणि हा एक तर अगदी लाल आहे."
"हा पाचवा डाग उदबत्तीचा मी मला स्वतःला दिलेला. माझ्या भावावर मी हात उचलला म्हणून. पण खरंच नाही जमत हो कधीकधी संयम ठेवणं. माझ्यातल्या मूळ मला मी प्रयत्नपुर्वक मारुन टाकलंय. त्याचा उरलेला अंश असा वर येतो कधीतरी. ज्याची शिक्षा तेव्हाच्या त्याला, आत्ताचा मी देत असतो. उदबत्तीचा डाग देऊन".
इतकं बोलून तो उठला आणि अंथरुणात चुळबुळ करणार्‍या त्याच्या भावाशेजारी जाऊन बसला तो. त्याचे पाय चेपत. मी मात्र तसाच बसून होतो तिथे पुन्हा एकदा सुन्न होऊन.

सचिन देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...