“आई, कुस्ती जिंकली, मी हरले. मला माफ कर. तुझं स्वप्नं, माझी हिंमत दोन्ही तुटलं आहे. यापेक्षा जास्त ताकद आता माझ्या उरली नाहीये. अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी तुमची सर्वांची ऋणी राहीन.”
तुझे हे शब्द कानात गरम तेलासारखे घुसले आणि ह्रदयात एक कळ उमटली. तुझा संघर्ष आठवला. तू असा निर्णय का घेतला असावास हेही कळून चुकलं. नवव्या वर्षी वडील वारल्यावर आई दया कौर फोगट आणि चुलते महावीर फोगट यांनी तुझा सांभाळ करत कुस्तीसारख्या मुलींसाठी नसणार्या खेळात तुला खेळायला लावलं. तू कठोर मेहनतीच्या जोरावर स्पर्धा जिंकत होती. त्यानंतर जे झालं ते खेळाचा भाग राहिलं नाही. साक्षी मलिक आणि इतर मुलींसोबत तू कुस्ती फेडरेशनचा त्यावेळचा अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाची केस केली आणि तुझ्या एका वेगळया संघर्षाला सुरुवात झाली.
तुला माहिती होतं अन्यायाच्या विरोधात तू उभी राहिल्यावर तुला त्रास होणार. कारण समोरचा अतिशय शक्तीशाली, मुरलेला आणि सत्ताधार्यांच्या निकटचा होता. भारतात लैंगिक शोषणावर स्त्रीनं बोलणंसुद्धा जिथं अवघड आहे, त्या ठिकाणी तू बोललीस आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली. एक खेळाडू म्हणून तुला त्याची किंमत चुकवावी लागेल याची तुला खात्री होती. तरी तू न्यायासाठी जंग जंग पछाडलं. तू, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांना पोलिसांनी अगदी फरफटत नेलं. लाठीचार्ज केला, कित्येक दिवस व्यवस्थेनं, शासनानेदेखील म्हणावी तशी दखल घेतली नाही. ‘आम्ही ऑलिंपिक विजेत्या खेळाडू असल्या तरी त्यांची दखल घेणार नाही,’ असाच एकूण सुर होता. तो सकल भारतीय स्त्रियांना दिलेला एक प्रकारचा इशारा होता. तुम्ही बधले नाहीत. कारवाई होत नाही म्हटल्यावर साक्षीनं थकून यापुढे कुस्ती खेळणार नसल्याचं जाहीर केलं. बजरंग पुनियानंही पद्मश्री परत केलं. (त्याच्यासारखा मित्र असणंही संचित आहे.) एखाद्या खेळाडूनं अशी लढाई लढणं समाजाकडून अपेक्षितही नसतं. कदाचित एक लेखी तक्रार करून पुढे काही होवो अथवा न होवो म्हणून तू विषय संपवून टाकला असता तरी तुला कुणी काही म्हणालं नसतं. मात्र तू ‘ही लढाई फक्त माझी नाही तर सगळ्या खेळाडू, प्रत्येक मुलीची आहे’ असा विचार करून हा लढा सुरू ठेवला, सगळ्या जखमा उराशी घेऊन खेळणं सुरू ठेवलं. तुझ्या चारित्र्यावर, तुझ्या कुटुंबावर अनेक प्रहार झाले, ट्रोल करण्यात आलं, प्रचंड त्रास झाला असणार तुला(लैंगिक शोषणाची तक्रार करणार्या प्रत्येक मुलीला तो होतो). तरी तू ठामपणे पाय रोवून उभी होतीस.
सोपं नसतंय मुलींना!
राखेतून भरारी घेणं
जेव्हा राख असते त्यांच्या स्वप्नांची
देशासाठी खेळणाऱ्या मुली
जेव्हा स्वतःसाठी खेळायला लागतात
तेव्हा त्या अधिक धोकादायक होतात
अशावेळी त्या एकट्या पेटत नसतात
ठिणगी बनून अख्ख्या स्त्री जातीला त्या ज्वाला बनवत असतात
या जिद्दीच्या आगीत भस्म होऊन जाण्याआधी
सावध राहा!
‘आता यापुढे ही कुस्ती नाही खेळू शकणार.’ या उपहासाला प्रत्युत्तर म्हणून तू ऑलिंपिक कोटामध्ये स्वत:ला सिद्ध करत स्थान मिळवलं. ही लढाई आता कुस्तीपुरती मर्यादित राहिलेली नव्हती, हा तुझ्या अस्तित्वाचा मुद्दा बनला होता. तुझी सगळी ताकद तू एकवटली आणि आजवर ८२ सामने खेळून एकही सामना न हरलेल्या जगज्जेत्या खेळाडूला तू हरवलंस यातच सगळं आलं.(हिला या स्पर्धेतील ब्रोंझ मिळालं). जिंकलेल्या क्षणी जेव्हा तू मॅटवर पडून ओरडत होतीस तेव्हा सारा देश तुझ्या अश्रुंच्या मागच्या वेदनेला पाहत होता. तुझ्यासोबत लाखो मुली रडत होत्या. तू स्वत:ला सिद्ध केलं होतस. तू लढाई जिंकली होती. तुझ्या कुवतीवर प्रश्न करणार्यांच्या, तुला देशद्रोही म्हणणार्यांच्या तोंडावर पडलेली ही चपराक होती. तू जगाला आणि खास करून भारतीयांना दाखवून दिलं होतं की तू ऑलिम्पिकमध्ये कुणाच्याही उपकारावर आलेली नव्हती तर तो तुझा हक्क होता, तुझं कर्तृत्व होतं. त्याच दिवशी तू साराला हरवलं जिला तू आधीही हरवलं होतं(हिला गोल्ड मेडल मिळालं) आणि क्युबाच्या लोपेजला तू पहिल्या डियावशही हरवलं जिला सिल्व्हर मेडल मिळालं. एकाच दिवशी तिघींना हरवून तू सिल्व्हर मिळवलं. त्यामुळे तुझं गोल्ड मेडल पक्कं समजायला जागा होती. सगळा देश आनंदला आणि दुपारी बातमी समजली की तुला अपात्र ठरवलं गेलं. सकाळी ४९.९ भरलेलं तुझं वजन रात्री ५२ किलो झालं आणि ते कमी करण्यासाठी तू त्या रात्री तू रात्रभर जागलीस. व्यायाम करत राहिलीस, अन्न पाण्याविना. पण १०० ग्रॅमने घात केला आणि यूनायटेड वर्ड रेसलिंग चॅम्पियनशिपकडून तुला अपात्र ठरवत तुझं सिल्व्हर मेडल पण काढून घेतलं. तू खचून एका जागी बसलीस. साहजिक होतं ते! तू लढ्वय्यी, अपील केलंस. सिल्व्हर मेडलसाठी तू वजनात देखील पात्र होऊन खेळली होतीस म्हणून ते तरी मिळावं ही सगळ्या भारतीयांचीही मागणी आहे. तुझा नेमका वजनी गट कोणता, तुझं वजन दोन किलोंनी कसं वाढलं, त्याला जबाबदार कोण, १०० ग्राह्य धरायला हवं होतं का, एका भारतीय मुलीला मेडल मिळणार नाही हर्षवायू झालेले भारतीय खरे देशप्रेमी की खोटे यावर खल केला जाईल. तुझ्या अपात्रतेला ऑलिंपिक कमिटी जबाबदार, तू लैंगिक शोषणाची केस करून व्यवस्थेविरोधात दंड थोपटले म्हणून त्यात व्यवस्थेचा वाटा आहे की नाही यावरही चर्चा होत राहील. वाईट हे आहे की तुझ्या हक्काचं सिल्व्हर आणि जिंकू शकण्याची शक्यता असलेलं गोल्ड तुला मिळू शकलं नाही. तरी तुला सांगावं वाटतं...
काही लोकांच्या हरलेल्या कहाण्या जिंकलेल्यांपेक्षा मोठ्या असतात. कालपासून देशात, ऑलिंपिकभर तुझीच चर्चा सुरू आहे. तुला किमान सिल्व्हर मिळावं आणि वजनाचे निकष बदलावेत अशी मागणी अमेरिकन खेळाडू जॉर्डनने केली. तुझ्यासोबत जे झालं त्याचं दु:ख सगळ्यांना आहे. तुझी लौकिक अर्थाची हार जिंकल्यापेक्षा मोठी आहे. तुझ्या पाठीशी जगातील ती प्रत्येक मुलगी आहे जिनं पुरुषसत्तेला आव्हान देत, अडचणींशी चिवटपणे झुंज खेळण्याची, जिंकण्याची स्वप्ने पाहिली आहेत, त्या स्वप्नांना पूर्ण केलं आहे आणि त्या अजूनही आपल्या स्वप्नांसाठी लढत आहेत. अशा अनेक मुली तुझ्या सोबत आहेत ज्यांचे पंख तू छाटले आहेत तरी त्या भरारी घेण्यासाठी बळ एकवटत आहेत. लैंगिक अत्याचाराविरोधी लढाई आव्हानांची असली तरी ती लढायला हवी हे बळ तू मुलींना दिलं आहेस. तुझ्यात मुली स्वत:ला पाहतात. हा जगभराचा इतिहास आहे की जे हक्क नाकारले जातात ते अधिक त्वेषानं ते मिळवतात. आज एका विनेशला व्यवस्थेनं हतबल केलं आहे, पण कालपासूनच अनेक विनेशनी जन्म घेतला आहे. साक्षी मलिक म्हणाली तसं विनेश, तू हरली नाहीस, ही संपूर्ण भारत देशाची हार आहे. देश तुझ्यासोबत आहे.
ऑलिंपिक गोल्ड मेडल विजेता अभिनव बिंद्रा याने तुझ्यासाठी खास मेसेज केला. तो म्हणतो, “आपण देत असलेल्या लढ्यामध्ये हार मनाची नाही हे आम्ही तुझ्याकडून शिकलो. तू एक योद्धा काय असतो याला मूर्त रूप दिलस. सर्व विजय सारखे दिसत नाहीत. काही विजय कपाटात सजवले जातात तर काही विजय हे इतरांना प्रेरणा देणारे असतात जे गोष्टींच्या रुपानं पुढच्या पिढ्यान पिढ्या सांगितले जातात. या देशातील प्रत्येक मुलाला कळले की तू चॅम्पियन आहेस. या देशातील प्रत्येक मूल तू दाखवलेल्या चिवटपणाला सामोरं ठेवून आयुष्यातील संकटांना सामोरं जाईल. त्यासाठी तुझे आभार ! ”
आम्हा मुलीच्या वतीनेही तुझे आभार गं. एखाद्या मुलीनं कसं उभं राहावं, कसं लढावं याचा तू पाया घालून दिलास. त्या काळरात्री तू झोपली नव्हतीस असं वाचलं. कशी झोप लागेल तुला? त्या रात्री भारतातील लाखो मुलींच्या डोळ्याला डोळा लागला नाही बघ. आम्हाला एवढा त्रास होत असेल तर तुला किती होत असणार? तू मेडल जिंकल्यानंतर या देशातल्या मुलींनी जल्लोष केला कारण तुझं जिंकणं त्यांची जीत होती. केवळ १०० ग्रॅम वजन कमी भरलं म्हणून जेव्हा तू निराश झालीस तेव्हा तुझ्या डोळ्यातील ओघळणार्या प्रत्येक अश्रूत या देशातल्या प्रत्येक मुलीचा अश्रू मिसळला होतास हे तुला सांगावसं वाटलं. तुझं तो जमिनीवर विषण्ण अवस्थेत बसलेला फोटो पाहिला तेव्हा किती मुलींचं, आई वडिलांचं, तुझ्या समर्थनार्थ लढणार्या पुरुषांचं काळीज चिरलं तुला काय सांगू? त्यावेळी तुला तुझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीची, आईची किती आठवण येत असणार हे समजू शकतो आम्ही. तिच्या कुशीत शिरून आपली वेदना रडून रडून सांगावी वाटत असणार तुला. आम्हा सर्व भारतीयांच्या नजरेत तू आधीच जिंकलेली आहे. तुझी किंमत गोल्ड मेडलपेक्षाही खूप जास्त आहे. आम्हाला कल्पना आहे की यापुढे कुस्ती न खेळण्याचा निर्णय काहीतरी विचार करूनच घेतला असशील. मात्र आमची अगदी मनापासून इच्छा आहे की तू कुस्ती सोडू नये. लढ आणि तुझं, तुझ्या आईचं आणि करोडो देशवासीयांचं सुवर्ण पदकाचं स्वप्न पूर्ण कर. तू एकदा म्हणाली होतीस,” आईचा संघर्ष पाहूनच मी मोठी झाली आहे. तिच्यासारखी अशिक्षित, एकटी आणि आजारी स्त्री जर समाजाशी लढू शकते, स्वत:च्या हिंमतीवर मुलीला कुस्तीपटू बनवू शकते तर आपण का नाही करू शकत! आईपासूनच हिंमत मिळाली आहे आणि तीच माझी प्रेरणा आहे.” तुझ्यातली हिंमत संपू देऊ नकोस !
विनेश, खेळाडू म्हणून तुझं नाव ऑलिंपिकच्या इतिहासात नोंदलच जाईल. त्याहीपेक्षा आजवर ऑलिंपिक पदक जिंकलेल्या खेळाडूंपेक्षाही तुझं नाव एक लढवय्यी म्हणून अजरामर होईल. तुझी नोंद भारताचा इतिहासदेखील घेईल, तू माणूस म्हणून केलेल्या संघर्षाची कहाणी यापुढे भारतातच नव्हे तर जगभरात सांगितली जाईल. तुझी गणती असंख्य लढाऊ स्त्रियांमध्ये आधीच झालेली आहे ज्या हक्कासाठी लढल्या, लढत आहेत.
लढणाऱ्या पोरी !
घाबरत नसतात लढायला
त्या बळ एकवटून लढतात
रोज नाउमेद होऊन पुन्हा झेपावतात
लढणाऱ्या मुली तुकवत नाहीत मान
बलाढ्य सम्राज्यासमोर
त्या उभी करतात जिद्दीची अभेद्य भिंत
कुणाही भणंगाला न ओलांडता येणारी
लढणाऱ्या मुली सोबत घेतात पुरुषांची
त्या एकट्या पडतील म्हणून नव्हे
तर सहवेदनेनेचे भागीदार म्हणून
त्यांच्या खांद्यावर डोके टेकवतात
लढणाऱ्या पोरींनो,
कोणत्याही बाईला चुकली नाही
योनीच्या अवतीभोवती गुरफटलेली
बाईच्या अस्तित्वाची लढाई
ही लढाई दूरची आणि मोठी आहे
तुम्ही थकला आहात मान्यच आहे
तुमचं हतबल होणं
मानव जातीची हार आहे.
तरी लढा पोरीनों!
तुमचा लढा गरजेचा आहे.
तो इतिहास घडवणार आहे.
तुम्ही तोवर लढत राहा
जोवर पुरुषांना त्यांच्या माणूस होण्याची लाज वाटणार नाही.
आणि सत्ताधीशाचा पायउतार होणार नाही!
विनेश, तू लढलीस आणि जिंकलीससुद्धा! तुझ्या यशाने सत्ताधार्यांचा चेहरा झाकोळला गेला आणि तू तेजानं चमकलीस. तुला नेमकं काय हवंय तुला माहिती होतं. तू बजरंग पुनियाला म्हणाली होतीस, “मी कुस्तीच्या पुढच्या पिढ्यांसाठी लढते आहे. स्वत:साठी नाही, माझं करियर झालं आहे आणि हे माझं शेवटचं ऑलिंपिक असेल. मी त्या तरुण कुस्तीगीर मुलींसाठी लढते आहे ज्या येतील आणि स्वत:साठी लढतील जेणे करून त्या सुरक्षित वातावरणात खेळू शकतील. त्यासाठीच मी जंतरमंतरवर होते आणि त्याचसाठी मी इथे आहे.”
तू अर्जुन, खेलरत्न, पद्मश्री असे अनेक पुरस्कार जिंकून, अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके तू मिळवलीस. लोरियस वर्ड स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकन मिळवणारी तू पहिली भारतीय आहेस. तू वाट तयार केली आहेस. यापुढे त्या वाटेवरून अनेक मुली चालणार आहेत. भारताच्या गावागावात विनेश फोगट तयार होत आहेत, होणार आहेत; ज्या व्यवस्थेला पुरून उरणार आहेत. भारताला कुस्तीतील अनेक सुवर्ण देणार आहेत. ज्या दिवशी भारताला सुवर्ण मिळेल त्या दिवशी या देशातील प्रत्येकाला तू आठवशील, तुझा लढा आठवेल आणि ते तुझ्यासमोर नतमस्तक असतील. हा हक्काचा लढा तू सुरू केलास, लढलीस यासाठी केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील आम्ही स्त्रिया, मुलींचे आई बाप, भाऊ, मित्र तुझे कायमचे ऋणी आहेत. तुझ्या साम्राज्याचा, कर्तृत्वाचा जयघोष! तुला आमच्याकडून खूप खूप प्रेम आणि बळ! कुठंतरी वाचलं होतं,
“वा देश की बेटी आज दुखी तो बोहत होगी ,
जो करोड़ों बेटियाँ की प्रेरणा श्रोत होगी
कल्ले आपाँ नहीं केडी भगवान भी उदास है
पक्का किसे मंदिर मैं बुझी कोए ज्योत होगी
पर हिम्मत ना हारिये
तेरी गेल सारा देश है पोहँचना है
मंज़िला पै बाक़ी ईबे रेस है
भीतर तै टूट कै भी मज़बूती तै लड़ी थी
ए भूलिए ना लाडो, तू वाए विनेश है।
विनेश, तुझ्यासारखी झुंजार मुलगी प्रत्येक घरात जन्माला येवो !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा