कालच मी निवृत्त झालो, जवळ जवळ अडतीस वर्षे शिक्षण खात्यात गेली, शिक्षणात आणि अकंदरीतच समाजात झालेले बदल पाहिले. पाचशे रुपये पगार असलेला शिक्षक पाहिला आणि काल निवृत्त होताना साठ हजार पगार मिळविणारा आणि तीस चाळीस हजार पेन्शन मिळविणारा शिक्षक पाहिला. सायकल घेण्याची ऐपत नसणारा शिक्षक पाहिला आणि आता सहज चार चाकी गाडी घेऊन फिरणारा शिक्षक पाहिला. खुप बदलले शिक्षणक्षेत्र. ध्येयवादी शिक्षक आता आभावानेच दिसतील. असे विचार येताच सुमारे पस्तीस वर्षांपूर्वीचा मी मलाच दिसायला लागलो. मी आणि गुरुमाऊली..
नोकरीला लागलो तो शिक्षणाधिकारी म्हणून. त्या काळात डबल ग्रॅज्युएट आभावानेच. त्यामुळे एकदम शिक्षणाधिकारी. अनुभव नव्हताच. पण काहीतरी करावे, सगळी सिस्टिम बदलावी असे वाटतं होते. माझी पहिलीच नोकरीं त्या जिल्ह्यात झाली. कलेक्टरना भेटायला गेलो, तेंव्हा ते म्हणाले "या जिल्ह्यात शिक्षणाचा दर्जा अगदीच खाली आहे. गेल्या काही वर्षात एस एस सी रिझल्ट अगदी सुमार लागतोय. स्कॉलरशिप परीक्षेत एकही मूल पास नाही. अशा परिस्थितीत तुमच्यावर जबाबदारी आहे, या जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा वाढवायला हवा. त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. आमच्या ऑफिसची काही मदत लागली तर घ्या."
मी पण ठरविले, या जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे. मग मी शिक्षकांची शिबीरे आयोजित केली. शिक्षक तज्ञाना बोलावून शिक्षकांशी बोलायला लावले. गावा गावात स्कॉलरशिपपरीक्षेसाठी शिक्षकांना वेगळे क्लास घयायला लावले, गावातील मुलांना शहरात आणुन त्याना शहरातील मुला समवेत काही दिवस बसविले इत्यादी.
मग मी ठरविले, सर्व शाळांना विशेष करुंन ग्रामीण भागातील शाळांना अकस्मात भेट द्यायची. त्या शाळेतील वातावरण स्वतः पहायचे. त्यात काही बदल करणे आवश्यक असेल, तर करायला लावायचे. मग मी आठवड्यातील दोन दिवस ग्रामीण भागातील शाळांना भेट दयायला लागलो. बहुतेक भागात कंटाळलेले शिक्षक आणि त्या पेक्षा शाळेला आणि अभ्यासाला त्रासलेली मुले दिसत होती. शिक्षकांना शहरात बदली हवी होती आणि सरकार पगारवाढ करणार काय, यात इंटरेस्ट होता. बहुतेक गावात वर्तमानपत्र येत नव्हतं आणि ते शहरातून मागवावं असं कुणाला वाटतं नव्हतं. रेडिओ सुद्धा अभावानेच होता. शिक्षकांनी टापटीप राहावे अशी अपेक्षा असते पण याही बाबतीत निराशा. मी न कळवता शाळेत धडकयचो, तेंव्हा शिक्षकांची भंबेरी उडायची. मी निराश होतं होतो. उद्याचे भारताचे नागरिक उदास होते, देशात कुणाचे राज्य आहे, कोण विरोधी पक्ष आहे, याची पण फारच थोड्याना कल्पना होती. अशा मनस्थितीत मी असताना माझे या भागाकडे लक्ष गेले. हा गाव काहीसा अलिप्त होता. त्या शाळेचा अहवाल पोस्टाने मिलत होता पण प्रत्यक्ष शिक्षक जिल्हा ऑफिसात आले नव्हते. मी या शाळेत शुक्रवारी नेहेमीप्रमाणे न कळवता धडकायचे ठरविले. मी आमच्या ऑफिस मधील सीताराम पट्टेवाल्याला शुक्रवारी या गावात जाऊया, असे सांगितले, कारण अगदी अडचणीच्या गावात त्याची सोबत व्हायची. या गावाचे नाव ऐकताच तो म्हणू लागला "साहेब, या गावामधी कोन अजून गेलला न्हाई, लई एका बाजूला हाय ते गाव..लई पायतोड करावी लागलं'.
मी म्हंटल "असू दे, पायतोड करत जाऊ शेवटी आपल्या जिल्ह्यातील गाव आहे ना ते. तिथे सुद्धा घरे असतील, माणसे राहतात, शाळा आहे तिथे. एक शिक्षक आहे. त्यांना पण भेटायला पाहिजे, त्यान्च्या अडचणी पण सोडवायला हव्यात आपण. तू सकाळी लवकर ये, जीप कुठपर्यत जाते पाहू, पुढे चालत जाऊ.
सीतारामने मान डोलावली. सीताराम आमचा ड्रायव्हर पण होता. त्यामुळे त्याला सोबत नेणे केंव्हाही बरे पडायचे. शुक्रवारी आम्ही दोघे लवकर जिल्ह्याच्याठिकाण हुन निघालो आणि चार तासानंतर त्या गावाजवळ पोहोचलो. सीताराम म्हणाला, यापुढे जीप जायची नाही. मग आम्ही दोघे चालत निघालो. पुढे चढ होता, डोंगर चढून गेले की परत मोठ्ठा उतार होता, त्या काळी सरकारने रस्ता केला नव्हता. आता कदाचित झाला असेल. मी तरुण असल्याने आणि खेडेगावातील जन्म असल्याने अशा चढ उताराची सवय होती. वाटेत गुर चारणारे गुराखी दिसत होते, पण मला आश्यर्य वाटतं होतं, त्या गुरख्यांच्या हातात एकतर पाटी पेन्सिल होती किंवा छोटे पुस्तक तरी होते. काही गुराखी पेन्सिलने पाटीवर काही लिहीत होते किंवा काहीजण पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होते. मी या जिल्ह्यात असे कुठेच पाहिले नव्हते. आम्ही गावात पोहोचलो तेंव्हा दुपारचे बारा वाजत होतो. छोटी मोठी शंभर दीडशे घरे दिसत होती बहुतेक घर मातीची होती, विचारत आम्ही शाळेजवळ पोहोचलो त्यावेळी लक्षात आले, ही शाळा दगडी होती, चारही बाजूला दगडी कंपाउंड होते.
कंपाउंड च्या मधोमध लोखण्डी गेट होते, आम्ही गेट उघडून आत गेलो, तर एक गृहस्थ बाहेर बसले होते. मी त्यांना नमस्कार केला आणि शिक्षक कोठे आहेत? असा प्रश्न विचारला.
"हाईत, येत्यात इतक्यात '. त्याने उत्तर दिले. तोपर्यत आम्ही शाळेत जाऊन वर्ग पाहू लागलो. सुरवातीचे लहान वर्ग होते -पहिली दुसरी. त्या वर्गावर मोठी मुले त्त्यांचा अभ्यास घेत होती. पुढे गेल्यावर मोठे वर्ग दिसत होते कदाचित पाचवी सहावी असतील, त्या वर्गात मधोमध काही वस्तू ठेवलेल्या दिसत होत्या आणि सभोंवर बसून मुले चित्र काढत होती. कुठे गडबड नाही की काही नाही. आम्ही आश्रयचकित होऊन बाहेर आलो तर एक गृहस्थ लेंगा वर गुंडाळून दोन हातात दोन शेणाच्या बादल्या घेऊन येताना दिसलें. त्या लेंगेवल्याला पहाताच मघाचे म्हातारे गृहस्थ त्यांच्याकडे गेले आणि त्याना काहीतरी सांगू लागले. ते लेंगवाला माणसाने पिंपंतले पाणी घेतले आणि हातपाय धुऊन ते आमच्यकडे आले आणि मला म्हणाले.
"या, तुम्ही या भागातील दिसत नाही, मी जगताप, या शाळेत शिक्षक आहे गेली पंधरा वर्षे '.
मी पहात राहिलो, मघा दोन हातात शेणाच्या बादल्या घेऊन आलेला हा शिक्षक?
मी माझी ओळख करून दिली. जगताप सरांनी मला नमस्कार केला.
"नमस्कार, तुमचे नाव ऐकून होतो पण तुम्ही इथे येणार याची कल्पना नव्हती. आज दुपारी इथे मुलांच्या कबड्डी मॅचेस ठेवल्या आहेत, त्याआधी खेळाचे मैदान शेणाने सरवून घ्यावे म्हणून गावात जाऊन शेण आणले '.
"पण मुलांना पाठवून ते आणता आले असते की? मी म्हणालो.
"ते मला पटत नाही, मुले येथे अभ्यास करायला येतात त्यामुळे त्याना सांगणे योग्य नाही. शिवाय उद्या त्त्यांची चित्रकलेची परीक्षा आहे, तालुक्याच्या गावी, त्यामुळे त्याना सराव पण हवा होता म्हणूंन त्याना सराव करायला सांगितलं '.मला आश्चर्य वाटले, इतर ठिकाणी मुलांना कामाला लाऊन आपण खुर्ची सांभाळणारे शिक्षक मी गेले सहा महिने पहात होतो. मग जगतापसर मोठया वर्गावर गेले आणि मुलांनी काढलेली स्थिर चित्रे पाहू लागले, त्या मुलांना ते म्हणाले "हे आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, प्रथमच कोणी अधिकारी या आपल्या शाळेत आलेत '.
मुलांनी उभे राहून मला "नमस्ते 'केल. मी मुलांची चित्रे पाहिली. बहुतेक मुले चांगली चित्रे काढत होती. मग जगताप सर आम्हाला लहान वर्गावर घेऊन गेले, मला म्हणाले "एक ते सात वर्ग आणि मी एक शिक्षक, त्यामुळे काही वेळा वरच्या वर्गातील मुलांना या वर्गावर पाठवतो.'. मी कौतुकाने सरांकडे पाहिले. मुलांना आकडे, पाढे, अक्षरओळख आहे काय, याचा अंदाज घेतला. खरोखर मुले इतर भागापेक्षा हुशार होती. मग सरांबरोबर ऑफिस मध्ये आलो. ऑफिस, कागदपत्रे व्यवस्थित होती, सर्व मुलांच्या हजेरी रोज लिहिली होती.मी सरांना विचारले "ही मूल याच गावातील की आजूबाजूच्या गावातील?
"सर, थोडी या गावातील पण बरीच आजूबाजच्या गावातील अंदाजे दहा बारा km वरुन चालत येतात.'
"मग उपाशी रहात असतील बिचारी? मी म्हणालो.
"नाही सर, तुम्हांला दाखवतो म्हणून जगताप सर मला शाळेच्या शेवटच्या खोलीत घेऊन गेले.
त्या खोलीत गावातील काही स्त्रिया चुलीवरून भांडी उतरवीत होत्या.
"हे कसे शक्य केले जगतापसर? मी ओरडलो.
"गावातील पालकांच्या सहकार्याने शक्य झाले सर. मी इथे आल्यापासून त्या वेळच्या सरपंचांना भेटून सांगितले, लांबून लांबून चालत मूल येतात, शेतकरी कुटुंबातील मूल ही, यांना शहरातील मुलासारखे डबे कोण देणार? आपण काही तरी दुपारच्या जेवणाची सोय करायला हवी, सरपंचनी आणि पालकांनी ते मान्य केले आणि प्रत्येक वाडीला दोन महिन्यातून एक आठवडा दिला, आता त्या वाडीतली बायका, पुरुष या मुलांच्या मध्यनीचा जेवणाची सोय होते '.
मी आंनदीत झालो, सरांचा हात हातात घेऊन त्त्यांचे कौतुक केले.तोपर्यंत दुपारचा एक वाजत होता. दोन टोले पडले आणि मूल आपल्या दप्तरातील ताटली घेऊन जेवायला बसली. त्या जेवणकरणाऱ्या बायकांनी पटपट प्रत्येकाला जेवण वाढलं. मूल हसतखेळत जेवत होती. मी खूष झालो, असं प्रत्येक शाळेत मुलांना दुपारचे दोन घास मिळाले तर (नंतर काही वर्षांनी सरकारने शाळेत खिचडी देणे सुरु केले.,).
जगताप सर मला म्हणाले "साहेब, तुम्ही येणार याची कल्पना नव्हती, त्यामुळे तुमच्या जेवणाची सोय करता आली नाही '.
मी जगतापसरांना म्हणालो "अहो, याच जेवणातील दोन घास मला आणि सीतारामला वाढलायला सांगा. या मुलांसोबत दोन घास खाऊ आपण '. जगतापसर खूष झाले, मग मी मुलांसमवेत आणि सीताराम बरोबर जेवलो. जगतापसर मागहून जेवले. जेवण झाल्या बरोबर जगताप मला म्हणाले "साहेब, संध्याकाळी कबड्डी खेळ ठेवला आहे, त्यासाठी ग्राउंड करायचे आहे, मी अर्ध्या तासात येतो.
.. मी हो म्हणताच जगतापसर शेणाच्या बादल्या घेऊन मैदानावर गेले आणि खरात्याने शेण काढू लागले. सीताराम माझ्याकडे पहात म्हणाला "साहेब, एव्हड्या शाळा मी फिरलोय, पण असा मास्तर कुठं दिसला न्हाई '. अर्ध्या तासानन्तर जगतापसर पुन्हा आमच्याशी बोलायला आले. मी त्याना विचारले "जगताप, तुम्ही किती वर्षे या गावात आहात?
"सर, पंधरा वर्षे झालीत. परिस्थिती नसल्याने जास्त शिकता आले नाही. वडील लवकर वारले, आईने मोठे केले, ही शिक्षकांची नोकरीं स्वीकारली. या गावात पहिली बदली झाली. या गावात गुरांच्या गोठ्यात शाळा भरत होती, कोण शिक्षक टिकतं नव्हता, पण मी आलो आणि पालकांना विश्वासात घेतल. शिक्षणाच महत्व त्यांना सांगितलं, सरपंचनी आणि इतरांनी पाठिंबा दिला. स्वतः अंगमेहेनत करून ही दगडी इमारत बांधली. कंपाउंड बांधले, सर्व श्रेय पालकांचे. मग मुले वाढू लागली. पहिले चार वर्ग होते ते सात झाले.
मूल शिकू लागली. सातवी चांगल्या मार्कांनी पास झाली, मग दहा किमी वरील हायस्कूल मध्ये जाऊ लागली, नोकरीला लागली. शाळेची भरभराट सुरु आहे.
"मग तुम्ही बदली नाही मागितलीत? मी अनेक ग्रामीण भागात जातो, तेथील शिक्षक शहरात बदली मागतात
"नाही सर, मी या गावात खूष आहे, या गावातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, आणि दुसरे म्हणजे बाहेरील शिक्षक या गावात यायला पण तयार नाहीत. म्हणून गेली पंधरा वर्षे मी एकटाच येथे आहे, दुसरे शिक्षक या गावात येत नाहीत, आज शिक्षणखत्यातील सुद्धा प्रथमच तुम्ही आलात, या आधी फक्त पोस्टाने मला कागदपत्रे येतात, प्रत्यक्ष कुणी येत नव्हतं.
"मग जगतापसर, तुमच्या घरी कोणकोण?
"आई आणि मी या गावात आलो, अशा गावात कोण आपली मुलगी देईना आणि कोण तयार झालं तर कुठली मुलगी येईना, त्यामुळे लग्नाशिवाय राहिलो, आई हल्ली हल्ली पर्यत सोबत होती. दोन वर्षांपूर्वी ती पण गेली. आता शाळा हेच घर आणि शाळा हेच माहेर '
"आणि जेवणं खाण?
"एकवेळ शाळेत मुलासामवेत जेवतो. सायंकाळी खोली आहे जवळच, तेथे पेज करतो '
गप्पा सुरु असताना अचानक सीताराम बोलला "जगतापगुरुजी, मघा आमी दोघ घाटीतून येताना गुराखी दिसत होत्यें, त्ये पाटीवर लिवीत होत्यें, काय लोक पुस्तक वंचित होत्यें? काय त्ये?
जगताप म्हणाले "मी रोज संध्याकाळी प्रौढशिक्षणाचे तास घेतो?
मी ओरडलो "काय?"
"होय, बरेच प्रौढ पुरुष, बायका येतात. त्याना अक्षरओळख नव्हती, आता थोड वाचतात, लिहितात, तुम्ही पहिलात ते गुराखी म्हणजे इथले प्रौढ विध्यार्थीच असणार.आता संध्याकाळी येतील '.
सीताराम मला म्हणाला "साहेब, रातच्याला हिथं थांबूया काय, मोठयानी शिकवतात ते बघूया '
मी म्हंटल "हो थांबू ना, शाळेत झोपू '.
जगतापसर म्हणाले "साहेब, थांबा आजचादिवस, जेवणाची काही तरी व्यवस्था करतो '.
"काही सोय करू नका, आमच्या सीतारामला तुमच्या शाळेतील तांदूळ, डाळ दाखवा, मस्त खिचडी करेल तो आपल्यासाठी '.
मग आम्ही दोघांनी त्या गावात मुक्काम केला. संध्याकाळी मुलांची कबड्डी मॅच झाली ती पाहिली, मुलांना मी बक्षीसे दिली. संध्यकाळ होऊ लागली तशी प्रौढ पुरुष, स्त्रिया जमू लागली.सात वाजेपर्यत दहा पुरुष आणि पाच स्त्रिया जमा झाल्या. सात वाजले तसें सरांनी रेडिओ लावला आणि पुणे केंद्राच्या बातम्या सुरु झाल्या
"आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे आपल्याला बातम्या देत आहेत '
सर्व मंडळी एकाग्रतेने बातम्या ऐकत होती. बातम्या संपल्या आणि जगताप सर त्याच बातम्या व्यवस्थित सांगू लागले. पंत प्रधान काय म्हणाले, विरोधी पक्षनेते काय म्हणाले, शास्त्रणय चंद्रावर गेले, खेळतल्या बातम्या वगैरे. मग मुळाक्षरे, लहान गोष्टी, कविता, म्हणी.. मी भलताच आंनदीत झालो होतो. या गावाने मला प्रभावित केले होते. मी सर्व प्रौढ पालकांना भेटलो, त्याना सुद्धा कोणी साहेब आपल्या शाळेत आल्याने खुप आनंद झाला. रात्री मी आणि सीताराम शाळेत झोपलो. सकाळी सहा वाजता जगताप चहाचा थर्मास घेऊन हजर झाले.
आम्ही चहा घेतला, मी जागताप सरांना म्हणालो "मी आकस्मिक येऊन शिक्षकांना बेसावध असताना व्हिजिट करत आलो, पण गुरुजी तुम्ही मला पराभूत केलेत. असा शिक्षक या गावाला मिळालं हे या गावचे नशीब. तुमच्यासारखे शिक्षक क्वचित. तुम्ही गुरु नव्हे गुरुमाऊली. तुमचा आदर्श मी ज्या गावात जाईन त्या गावात सांगेन. तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा असतील तर सांगा तुम्हाला शहरात बदली हवी तर सांगा.
"नको साहेब, मी या गावात खूष आहे. लोकांना मी हवा आहे. माझी बदली करू नका '.
"तुमच्या इच्छेप्रमाणे गुरुमाऊली. मी जिल्ह्याच्या ऑफिसात असतो. या कधी, निदान पत्र तरी पाठवा '.
मी आणि सीतारामने भरल्या डोळ्यांनी गुरुमाऊलीचा निरोप घेतला. मग मी ज्या गावात जायचो त्या गावात जागताप गुरुमाऊलीबद्दल सांगायचो. त्त्यांचा आदर्श घ्या असे इतर शिक्षकांना सांगायचो. मग जगतापगुरुमाऊली ची पत्रे मला यायची, त्यान्च्या सूचना मी तात्काळ स्वीकारायचो. आठ वर्षे झाली असतील, आता सर्व ऑफिस मध्ये लँडलाईन आले होते. एक दिवस माझ्या टेबलावरील फोनवर तालुकामास्टरांचा फोन आला
"आज पहाटे जगताप सर देवाघरी गेले, साधे घटसर्पचे निमित्त झाले आणि दोन दिवसात गेले '.
मी हादरलो, दोन तीन ठिकाणी फोन करून बातमीच्या खरंपणाची खात्री केली. दुर्दैवाने बातमी खरी होती. मी पाच मिनिटात जीप घेऊन त्या गावाकडे निघालो. आता रस्ते बरे झाले होते, त्यामुळे तीन तासात त्यान्च्या गावात पोहोचलो. सारा गाव शोकाकुल झाला होता. लोक रडत होती आणि अंतविधीची तयारी करत होती. माझी गुरुमाऊली शांत सरणावर होती. मी शासना तर्फे फुलांचा हार वाहिला आणि डोळे पुसत पुसत गाडीत बसलो. आज माझ्या निवृत्तीनंतर आयुष्यात भेटलेल्या गुरुमाऊली ची आठवण झाली आणि मी आदराने त्याना वंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा