शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

1317. आघात

      पाटील साहेब तीस नोव्हेंबरला रिटायर होणार म्हणून त्यांनी आज सर्व स्टाफसाठी मेजवानी आयोजित केली होती. आत्ता ज्या डिपार्टमेंटला होते तिथली सगळी मंडळी तर होतीच, पण नोकरीला लागल्यापासून ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं, त्या सगळ्यांना आठवणीनं, आवर्जून, बोलावलं होतं त्यांनी. अरविंदही त्यांच्यापैकीच एक. खूप दिवसांनी भेटी घडल्यामुळे मंडळी, एकमेकांची खबरबात घेत होती.
 तेवढ्यात मन्या खाडे, अरविंदला म्हणाला, ''अव्या, आपला एकनाथ गेल्याचं कळलं का तुला?'
'अरे, काय सांगतोस?  काय झालं त्याला? जेमतेम पंचेचाळीसचा असेल ना तो आत्ता?' 
'अरे, त्याचं ते 'आये आये' माहीत होतं ना तुला? तेच विकोपाला गेलं रे ! हे लोकं काय सुधरायला तयार नाहीत बघ. कोण शहाणपणा शिकवणार यांना? तू तुझ्या परीनं खूप केलंस त्यावेळी. पण घरच्यांनी त्याला साथ नाही दिली. एक महिना झाला मला वाटतं त्याला जाऊन. '
अरविंदच्या डोळ्यासमोर, विक्रोळी शाखेतला तरूण एकनाथ दिसत होता.
पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. अरविंद विक्रोळी शाखेत मॅनेजर म्हणून नुकताच बदलून आला होता. असिस्टंट मॅनेजर, खाडे साहेबांनी त्याची सगळ्या स्टाफशी ओळख करून दिली. डिस्पॅच डिपार्टमेंटला  एकनाथ रेकाॅर्ड क्लार्क होता. खाडे साहेबांनी त्याची ओळख करून दिली आणि म्हणाले, 'साहेब, हा पोरगा एकदम हुशार आहे हं. याचं काम एकदम फर्स्टक्लास असतं. प्रत्येक पेपरची नोंद व्यवस्थित असते. इकडे-तिकडे अजिबात होत नाही काही.'
अरविंदनं सहज डिस्पॅच रजिस्टर चाळलं आणि ते सुंदर हस्ताक्षर आणि नीटनेटकं रेकाॅर्ड बघून एकनाथला शाबासकीही दिली. त्यानंतर दहा-बारा दिवस झाले असतील. अरविंद आपल्या केबिनमध्ये फोनवर बोलत होता. तेवढ्यात ' आये आये, आये ग ', अशा आवाजाने तो विचलित झाला आणि फोन ठेवून त्यानं बाहेर नजर टाकली. एकनाथचं दाराजवळचं टेबल त्याला स्पष्ट दिसत होतं. एकनाथ  खुर्चीवर बसून, आपली खुर्ची बसल्या जागीच दाणदाण आपटत होता आणि तोंडाने ' आये आये' बडबडत होता. बाजूच्या टेबलाजवळ बसलेले रघू आणि लखू, हे शिपाई एखादा विनोदी प्रसंग घडत असावा, असे खिदळत होते. बाकीच्या स्टाफलाही, या प्रसंगाशी काही देणंघेणं नव्हतं. ब्रँचमध्ये आलेले कस्टमरही बघ्याची भूमिका बजावत होते. अरविंद झटकन एकनाथच्या टेबलजवळ पोचला. त्याची खुर्ची त्याने हाताने घट्ट पकडली. 
'काय झालं एकनाथ?' तो विचारू लागला. पण एकनाथ जणू शुद्धीवर नव्हताच. डोळे मिटून तो अजून पुटपुटतच होता. साहेबांना  आलेलं पाहून रघू आणि लखूही तिथे आले. रघू म्हणाला,' सायेब, याचं हे नेहमीचंच आहे! आठ-पंधरा दिवस बरे गेले की याचं हे नाटक सुरूच होतं. आणि मग दोन-तीन दिवस दांडी! '
'रघू, लखू आधी त्याला आत लंचरूममध्ये घेऊन चला पाहू. मग काय ते बोलू.'
 दोघांनी एकनाथला आत नेलं आणि त्याला कार्पेटवर झोपवलं. तो डोळे मिटून निपचित पडला होता.
अरविंदनं मग रघू आणि लखूला आपल्या केबिनमध्ये बोलावलं.' काय रे, एकनाथला सावरायचं सोडून खिदळत होतात? आपला सहकारी आहे ना तो? आणि उद्या तुमच्यावर ही वेळ येणार नाही कशावरून? मग इतरांनी असंच वागायचं का तुमच्याशी? तुम्हाला जर माहित आहे की त्याला काही त्रास आहे, तर पटकन आत घेऊन जायचं ना त्याला. लोकांसमोर त्याचं हसं होताना काय आनंद मिळाला का तुम्हाला?'
'सायेब, चूक झाली, पुन्हा नाय होणार बगा असं. 'दोघांनी अरविंदची माफी मागितली. संध्याकाळी एकनाथला सांभाळून घरी न्यायचं दोघांनी मान्य केलं. तिघंही  मुरबाडचेच राहणारे होते.  पुढचे दोन-तीन दिवस एकनाथ कामावर आलाच नाही. नंतर आला तेव्हा काहीसा थकलेला वाटत होता. अरविंदनं त्याला केबिनमध्ये बोलावून विचारपूस केली. 
'लहानपणापास्नं मला वारं येतं असं. मग घरचे जाणत्याकडे /भगताकडे घेऊन जातात. उतारा करायला. त्यो लय मारतो भूताला, मग जातंय निघून दोन दिवसांत.' अरविंदला हे ऐकून कसंतरीच झालं. त्यानं मग एकनाथच्या घरी निरोप पाठवून, त्याच्या घरच्यांना बोलावून घेतलं. मग एकनाथचा मामा आणि एकनाथची बायको आली होती. त्यांना दोघांना त्यानं समजावून सांगितलं की हा मानसिक आजाराचा प्रकार आहे. एकनाथला मानसोपचाराची गरज आहे.त्यांच्या काही ते फारसं पचनी पडलं नाही. पण अरविंदने स्वतः त्याला डाॅक्टरकडे घेऊन जायची तयारी दाखवल्यावर त्यांना काही नाही म्हणता आलं नाही. अरविंद एक दिवस त्याला ठाण्यातील एका  मानसोपचारतज्ञाकडे घेऊन गेला. त्यानंतर  तीन-चार सिटिंग झाली आणि एकनाथच्या मनातलं जाणून घेण्यात डॉक्टरना यश आलं. 
      मुरबाडजवळ वाघेरी पाड्यावर लहानगा एकनाथ आपले आई-वडील आणि  बहिण सखू यांच्या सोबत रहात होता. एकनाथ पाचेक वर्षाचा आणि सखू सात वर्षांची असेल तेव्हा. रात्रीची वेळ होती. दिवटी विझवून झोपडीत एकनाथ एका बाजूला आणि सखू दुसऱ्या बाजूला घेऊन आई झोपली होती. त्याचा बाबा खाटेवर निजला होता.  मध्यरात्रीच्या सुमारास काहीतरी खसपस झाली. एकनाथचा बाबा काठी सरसावत उठून उभा राहिला. झोपडीचं दार  हालतंय म्हणून तो तिकडे बघायला लागला. दोन हिरवे डोळे चमकले आणि बाबा गांगरला. काशे,  वाघरू वाघरू, करून तो ओरडला. तोवर दार तोडून वाघरू आत घुसलं आणि त्यानं सखूचा पाय तोंडात धरून तिला बाहेर खेचत न्यायला सुरूवात केली. एकनाथची आई काशी जिवाच्या आकांताने ओरडत  त्याच्यामागे बाहेर धावली. आपल्या लेकीला वाचवण्यासाठी, दारापाशीच ठेवलेला मोठा धोंडा तिनं नेम धरून वाघाच्या दिशेनं भिरकावला. वाघानं बिचकून सखूला खाली टाकलं आणि त्याच्यावर  पुन्हा दगड भिरकवण्याच्या तयारीत असलेल्या काशीवर हल्ला चढवला. एकनाथच्या बाबानंही आरडा-ओरडा करत वाघावर दगड फेकायला सुरूवात केली. पाड्यावरचे लोक जागे होऊन काठ्या-लाठ्या घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. त्यांची चाहूल लागताच, वाघ वेगानं जंगलाकडे निघाला पण काशीला  फरपटवत. काशी त्याच्या तडाख्यातून वाचू शकली नाही. एकनाथने, आईला, वाघाच्या तोंडात धरून फरपटताना बघितले आणि त्याची बोबडीच वळली. सखूही गंभीररीत्या जखमी झाली होती.  तालुक्याला दवाखान्यात नेईपर्यंत तीही गतप्राण झाली. या घटनेनंतर कित्येक महिने एकनाथ बोलतच नव्हता. झोपेतून दचकून जागा व्हायचा तेव्हा मात्र 'आये, आये ग', असं ओरडायचा आणि रडायचा. एकनाथचा बाबाही वेडापिसा झाला. दारूच्या आहारी गेला.  एकनाथकडे तो काय लक्ष देणार ? 
      एक दिवस एकनाथचा मामा त्याला मुरबाडला आपल्या घरी घेऊन गेला. मामाला मुलबाळ नव्हतं. मामीनंही त्याला लळा लावला. प्रेमानं  बोलतं केलं. शाळेत घातलं. हळूहळू एकनाथ सावरला. एस. एस. सी. होऊन नोकरीलाही लागला. पण मध्येच त्याला असा झटका यायचा. कोवळ्या मनावर झालेला जबरदस्त आघात होता तो! 
अरविंदही हे  सर्व ऐकून हादरून गेला. डाॅक्टरांनी औषधोपचार आणि समुपदेशनाने एकनाथची ही अवस्था दूर होईल असे त्याला आश्वस्त केले. काही औषधेही लिहून दिली. एकनाथनेही औषधं नियमित घेण्याचे मान्य केले आणि काही महिने घेतली देखील. पण प्रत्येक वेळी अरविंदला त्याच्याबरोबर डाॅक्टरकडे जाणे शक्य नव्हते. एकनाथच्या घरच्यांचा फारसा पाठिंबा नव्हताच. त्यामुळे उपचारांत सातत्य राहिले नाही. पुढच्या वर्षी बढती मिळून अरविंदची बदली नाशिकला झाली. तिथून सांगली, नागपूर, औरंगाबाद अशी वेगवेगळी ठिकाणं तो फिरत राहिला आणि मग एकनाथचा काहीच संपर्क राहिला नाही. एकनाथला पुन्हा झटके येऊ लागले. डाॅक्टरकडे जाऊन बरं होणारं हे दुखणं नाहीच असं म्हणत घरच्यांनी परत घूमजाव केलं. अश्याच एकावेळी भगताचा मार वर्मी लागून एकनाथ कोसळला. घरच्यांनी तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात दाखल केलं पण उपयोग झाला नाही आणि एकनाथ नावाचा पर्व संपलं. 
एक होतकरू सहकारी अशा रीतीने गमावल्याचा सल मात्र अरविंदला कायम अस्वस्थ करत राहिला. 
 
© प्रणिता खंडकर.
(अनाहत या माझ्या कथासंग्रहात समाविष्ट)  ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता शेअर करू शकता. 
वाॅटसप संपर्क - 9833479845.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...