नानींची टॅक्सी गेटबाहेर गेली आणि त्यांना निरोप देणारे लहानमोठे आम्ही सर्वजण ओक्सबोक्शी रडू लागलो. इतके दिवस डोळ्यांत जबरदस्तीनं कोंडून ठेवलेले अश्रू फुटलेल्या धरणासारखे हाहाकार माजवत डोळ्यांतून ओसंडून वाहायला लागले. आजच्या ह्या शेवटाची सुरुवात झाली ते आमच्या चाळीच्या पुनर्बांधणीचा निर्णय झाला तेव्हा. चाळ जुनी झाली होती. जागा अपुरी पडत होती. पाण्याचा प्रश्न होता कायमचा. ह्या साऱ्यातून सुटका होईल म्हणून एका बिल्डरनं आमच्या समोर एक सुंदर प्रस्ताव ठेवला होता.
सध्या आहे त्याच्या दुप्पट जागा चारचार मजली इमारतीत तो देणार होता. स्वतंत्र फ्लॅट. २४ तास पाणी. शिवाय मासिक देखभालीच्या खर्चापोटी सर्व सभासदांना घसघशीत रक्कम मिळणार होती. एकटे नाना सोडले तर ह्या प्रस्तावाला सर्वांची संमती होती. पण नानांच्या विरोधाची कारणं ऐकून आम्हा सर्वांचं मन गलबलून गेलं होतं. नाना वय वर्षं ८८ आणि नानी ८३. नानांना दोन मुलं. एक परदेशात तर एक इथंच मुंबईत. पण दोघंही घरापासून कैक वर्षं दुरावलेले. हा दुरावाच नानांच्या विरोधाचा मूळ होता. चाळीतल्या खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांना आधार देत नाना-नानी जगत होते. नाना पोष्टातून निवृत्त झाले होते, तर नानी सचिवालयातून. दोघांना मिळणाऱ्या पेन्शनमधून ते आनंदानं राहत होते. इतके दिवस फक्त दुरावलेली मनं होती त्यांच्या मुलांची, पण पुनर्बांधणीनंतर चाळीचं स्वरूप बदलून कदाचित फ्लॅट मध्ये राहणाऱ्यांची मनही दुरावलेली आणि दुभंगलेली होतील, ह्याची नानांना सतत भीती होती. मी नानाच्या शेजारच्या खोलीतच राहायचो. मी शेखर अन् संदीप बरोबर एकत्र खेळून लहानाचा मोठा झालो होतो. नाना-नानी मला त्यांचा तिसरा मुलगाच मानायचे, अगदी हक्कानं. आमच्या चाळीतले सर्वात वयानं आणि अनुभवानं मोठे म्हणून नाना-नानींना मान आणि आदर होता. सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरीरीने भाग घ्यायचे. अभ्यासात चांगले मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालेल्या सगळ्यांना ते कौतुकानं बक्षिसं द्यायचे. आमची चाळ म्हणजे एकत्र कुटुंबच होतं. एकाला लागून एक अश्या वीस खोल्या खाली आणि वीस खोल्या वर अशी एकूण चाळीस बिऱ्हाडे होती, आमच्या एक मजली चाळीत. अश्या तीन चाळी तीन बाजूंनी होत्या आणि मधोमध मोकळं मैदान. सगळे सणवार एकत्रितपणे साजरे व्हायचे इथं. एका खोलीत खुट्ट झालेलं शेवटच्या खोलीत क्षणार्धात समजायचं. वाढदिवस, बारसं, डोहाळजेवण, लग्न म्हणजे चाळीत आनंदोत्सव असायचा. सगळे मदतीला असायचे, त्यामुळं यजमान घराला खूप मदत असायची. कुणी आजारी पडलं तर आख्खी चाळ मदतीला धावून यायची.
नानांची दोन्ही मुलं, शेखर आणि संदीप ह्याच चाळीत लहानाची मोठी झाली. दोघंही जात्याच मोठी हुशार आणि बुद्धिमान ! मोठा शेखर आय आय टी मधून पदवीधर झाला आणि परदेशी शिकायची स्वप्नं बघू लागला. नानांनी कर्ज काढून त्याला परदेशी पाठवला. पण तो तिथंच रमला आणि तिथल्या श्रीमंती वातावरणाचा एक भाग बनला. एका परदेशी मुलीशी संसार थाटून कायमचा तिथे राहण्याचा निर्णय त्याने नानांना कळवला आणि नाना-नांनींना पहिला मोठा धक्का बसला ! सुरुवाती-सुरुवातीला त्याची पत्रं यायची, पण नंतर दोन पत्रांतलं अंतर वाढलं आणि कालांतरानं सर्वच संपलं. नोकरीत असताना इतरांना वेळेवर पत्रं मिळावीत म्हणून इमानेइतबारे चोख काम करणाऱ्या नानांना गेली तीस वर्षं शेखरच्या पत्रांनी हुलकावणीच दिली होती. आजच्या घडीला फोन, इमेल, वेब कॅम इत्यादी संदेशवहनाची आधुनिक व्यवस्था असून देखील नाना-नानींना शेखरचा चेहरा पण दिसत नव्हता. धाकटा संदीप मुसलमान मुलीच्या प्रेमात पडून घराबाहेर पडून ठाण्याला वेगळं बिऱ्हाड करून राहत होता. दोन कमावती मुलं असून देखील नाना-नानी खऱ्या अर्थानं एकटेच होते आणि मुला-नातवंडांच्या प्रेमाला मुकले होते. आमची पुनर्बांधणीची शेवटची बैठक झाली, ज्यात सर्व ठरलं. साधारण ४-५ महिन्यानंतर आम्हाला आमच्या खोल्या रिकाम्या करून देण्याचं नक्की झालं.
हा निर्णय होऊन २-३ महिने लोटले नाहीत, तर अचानक नाना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वारले ! खोली रिकामी करून दुसऱ्या जागेत कुणाच्या आधाराविना राहावं लागणार ह्या काळजीनं बहुधा त्यांचा बळी घेतला. नानांचं दिवसकार्य आम्हीच केलं आणि एक दिवस नानींनी आमच्या चाळीतील सर्वांना बोलावून माझ्या हातात नानांचं एक पत्र वाचायला दिलं. मी थरथरत्या हातानं ते वाचायला लागलो.
‘आपल्या चाळीच्या जागी नवीन इमारत उभी राहणार, ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे. पण मला मात्र ती दुःखाची वाटते ! आज आमची मुलं आमच्या पासून वेगळी राहत असली, तरी तुम्हा सर्वांच्या आधारानं मी आणि नानी आनंदाने राहत होतो. पण हे सुख पुढच्या काही महिन्यात कायमचं हिरावलं जाणार, म्हणून मी आणि नानी हादरून गेलो आहोत. जवळ जवळ दोन वर्षं भाड्याच्या घरात एकटं राहणं आम्हाला कितपत शक्य होईल, ह्याबद्दल आम्ही साशंक आहोत. म्हणून आम्ही दोघांनी एक निर्णय नाईलाजानं घेतला आहे. ‘आमच्याकडे साठवलेली पुंजी आणि नानींचे सोन्याचे दागिने विकून आलेले पैसे आम्ही एका वृद्धाश्रमात भरत आहोत. तिथं आमची मरेपर्यंत राहण्याखाण्याची आणि औषधपाण्याची सोय होणार आहे. आमची खोली आम्ही स्वखुशीनं श्रीधरच्या नावानं करायचं ठरवलं आहे आणि त्या दृष्टीनं वकिलामार्फत कागदपत्र करून ती आमच्या कपाटात हिरव्या लखोट्यात ठेवली आहेत.
‘जर का आमच्यापैकी एकानं चाळ रिकामी करायच्या आधीच ह्या जगाचा निरोप घेतला, तर श्रीधरनं वृद्धाश्रमात फोन करून तिथली मोटार बोलावून उरलेल्याला त्या वृद्धाश्रमात पोहोचवायचं काम करावं. पण कुणीही सोबत म्हणून जाऊ नये, कारण जो कुणी सोडायला येईल, त्याचा निरोप घेणं आमच्यापैकी जो जिवंत असेल त्याला जमणार नाही. ‘इथले पाश इथंच सोडून जाण्याचं आम्ही ठरवलौ आहे. जरी ही खोली श्रीधरच्या नावावर आम्ही करत असलो, तरी ही खोली सर्व चाळीसाठी असून गरजूंनी त्याचा योग्य वापर करावा अशी आमची इच्छा आहे. त्या दृष्टीनं सर्व तजवीज माझ्या मृत्युपत्रात करून ठेवली आहे. ज्या खोलीत बसून आम्ही दोघांनी आमच्या दुरावलेल्या मुलांची डोळ्यांच्या खाचा करत वाट बघितली, त्या कटू आठवणी घेऊन नवीन घरात आणि बंद दारात जगणं आम्हाला अशक्य आहे. म्हणून नाईलाजानं आम्ही लांब आणि शांत जागी असलेल्या वृद्धाश्रमाची निवड केली आहे, जेणेकरून अखेरच्या क्षणी श्वास सोडताना तरी पुत्र वियोगाचे वारे आमच्या अवतीभवती वाहणार नाहीत.’
नानांनी अजून बरंच काही लिहिलं होतं. त्यांची खोली कशी आणि कुणी कुणी, कशा रीतीनं वापरावी वगैरे. पण इथवर वाचन झाल्यावर माझ्या हातातून नानांचं पत्रच गळून पडलं. नानींनी मला जवळ घेऊन माझं सांत्वन केलं आणि अजून २-३ दिवसांनी चाळ सोडून जाण्याचं जाहीर केलं. नानींची टॅक्सी नजरेआड झाली आणि जड अंतःकरणानं आम्ही आपापल्या घरात गेलो. त्या रात्री मला जेवण देखील गेलं नाही .
आज नाना-नानींवर आलेली वेळ उद्या आणखी कुणावर देखील येऊ शकते, ह्या विचारांनीच मन सुन्न होऊन जातं ! ‘भय इथले संपत नाही’, हेच खरं. मग तो खोलीत राहणार असो की बंगल्यात ! शेवटी ज्याच्या त्याच्या प्राक्तनात जे वाढून ठेवलंय, त्याला सामोरं जाण्यावाचून आपल्या हाती काहीच नसतं आणि ते मनाला पटवून देण्याचं कठीण काम प्रत्येकाला दुर्दैवानं करावंच लागतं !
-- सतीश बर्वे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा