सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

1375. नशीबवान आहात तुम्ही

 तो : राहूद्या काकू, मी वरती ठेवतो बॅग.
त्या : खुप जड आहे.
तो : असू द्या.
त्या : अगदी देवासारखा धावून आलास बघ.
तो : माझी आई असती, तरी मी हेच केलं असतं.
त्या : इथे जागा आहे शेजारी, बस इथेच.
तो : धन्यवाद!
त्या : माझा मुलगाही तुझ्याच वयाचा आहे.
तो : काय करतो तो?
त्या : तो पुण्याला मल्टी नॅशनल आयटी कंपनीत जॉब करतो.
तो : भारीच...
त्या : भारी तर त्याचं सगळंच आहे.
तो : म्हणजे?
त्या : तुला दहावीला किती टक्के होते?
तो : ५६%
त्या : माझ्या मुलाला ९२% होते.
तो : हुशार आहे.
त्या : तू किती शिकलाय?
तो : माझं बी. कॉम. झालंय.
त्या : माझा मुलगा आयटी इंजिनियर आहे.
तो : छानच...
त्या : तुला पगार किती आहे?
तो : २० हजार रुपये.
त्या : त्याला अडीच लाख रुपये पगार आहे.
तो : बाप रे..
त्या : तुझी बायको काय करते?
तो : ती गृहिणी आहे.
त्या : माझ्या सूनेलाही दीड लाख रुपये पगार आहे.
तो : अगदी कौतुकास्पद आहे.
त्या : तू मोबाईल कोणता वापरतो?
तो : सॅमसंग कंपनीचा आहे. 
त्या : किती हजाराचा?
तो : १२ हजारचा. 
त्या : माझा मुलगा तर दीड लाखाचा आयफोन वापरतो.
तो : नवीन टेक्नॉलॉजी.
त्या : तुझ्याकडे कार आहे?
तो : नाही. म्हणून तर मी बसने प्रवास करतो.
त्या : माझ्या मुलाकडे इम्पोर्टेड कार आहे.
तो : क्या बात!
त्या : अरे आणि त्याने दीड करोडचा फ्लॅट...
तो : दोन मिनिट काकू, माझ्या आईचा कॉल येतोय.
त्या : बोल बोल...
तो : गाडीत आहे आई... तुझ्या चष्म्याची काच फुटली होता ना, ती बदलली. त्यानंतर पप्पांसाठी बनियन घ्यायला गेलो. तुझ्या सूनबाईची चप्पल तुटलेली, मग तिच्यासाठीही नवीन चप्पल घेतली. बाजारातून निघताना तुझ्या आणि पप्पांच्या गोळ्या घेतल्या. अखेरीस मिठाईवाल्याकडून तुझ्या आवडीची जिलेबी, तुझ्या सूनबाईच्या आवडीचे पेढे आणि पप्पांच्या आवडीचे लाडू खरेदी केल्यावर धावतपळत बसस्टँडवर पोहचलो. चल आता काळजी करत बसू नको. अर्धा तासात घरी येतोय. तुझ्या सुनेला आणि पप्पांना काही सांगू नको. त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. चल ठेवतो...
त्या : आई होती?
तो : हो. मी घरी पोहोचेपर्यंत, उंबाऱ्यातच वाट बघत बसलेली असते.
त्या : नशीबवान आहे. 
तो : कोण?
त्या : तुम्ही सर्वजण.
तो : का बरं?
त्या : माझ्याही चष्म्याची काच मागच्या आठवड्यात फुटली.
तो : मग?
त्या : चष्मा दुरुस्त करायला, माझ्या मुलाला वेळ मिळत नाही.
तो : अरे...
त्या : त्याच्या वडिलांनाही लाडू खूप आवडतात.
तो : मग?
त्या : जॉबमुळे माझ्या मुलाला शक्य होत नाही.
तो : समजू शकतो.
त्या : माझ्याही डायबिटीसच्या गोळ्या संपल्यात.
तो : मग?
त्या : वयोमानाने मीही बऱ्याच गोष्टी विसरते.
तो : साहजिकच आहे.
त्या : तुझी आई वाट बघत उंबाऱ्यात बसलेली असते.
तो : हो.
त्या : कारण आईला तुझ्या येण्याची खात्री आहे.
तो : म्हणजे?
त्या : माझ्या मुलाला आमच्याकडे येण्यासाठी वेळ काढावा लागतो.
तो : असं का?
त्या : कारण म्हाताऱ्या आई-बापापेक्षा त्याच्या आयुष्यात इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
तो : जगात आपली माणसं सर्वात महत्त्वाची असतात.
त्या : म्हणूनच तर मी म्हणाले.
तो : काय?
त्या : नशीबवान आहात तुम्ही.

©️अक्षय भिंगारदिवे
११ ऑगस्ट २०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...