"साहब एक टिकीट ले लो, बम्पर ड्रॉ है दस लाख मिलेंगे "
"यार किसे चाहिये दस लाख "
"साहब टिकीट लेके तो देखो, नसीब अजमा लो साहब, आप भी इस गरीबको याद
रखोगे "
तो पिच्छाच सोडायला तयार नव्हता, काळी फुलप्यांट, पांढरे शर्ट थोडे मळलेले, इन केलेले, हसरा आणि प्रफुल्लित चेहरा, मोट्ठे कळेभोर केस, विंचूरून मागे वळवलेले, त्यामुळे भांग थोडा फुगीर, एक दोन दिवसाचे वाढलेले दाढीचे केस, मधेच खुंटासारखे पांढरे केस, वय एकेचाळीस बेचाळीस.
" यार टिकीट तो मै ले सकता, मगर एक कंडिशनपे "
आता आपण याच्या माथी टिकीट मारू शकतो या कल्पनेने त्याचा चेहरा फुलून आला, पण कंडिशन म्हटल्यावर लगेच कोमेजला "
"क्या कंडिशन है साहब, जल्दी बताओ धंदेका टाइम है "
"यार मेरेसे बातचीत कर रहे हो, धंदाही तो कर रहे हो "
" पान टपरीवरच्या मुन्नाला त्याच्यासाठी छान पान लावायला सांगितले आणि किंचित पॉज घेऊन त्याला विचारले,
"यार पार्टनर बनोगे"
" क्या साहब मै कुछ समझा नही "
" यार टिकीट कितनेका है "
" साहब दस रुपयेका, कर्नाटक का बम्पर ड्रॉ कल ही खुलेगा, दस लाख मिलेगे"
तो पटपट बोलला, त्याची ती सवयच होती, त्याचे बोलणे, कॅसेट थोडी स्पीड वाढवून लावल्यासारखे वाटायचे.
" तुमको टिकिट पाच रुपयेमे देना पडेगा, जो भी ईनाम मिलेगा उसके आधे पार्टनर तूम रहोगे, टिकीट मेरे पास रहेगा, मै तुमसे कोईभी बेईमानी करुंगा नही, जेन्टलमन प्रॉमिस, बोलो कबूल, तिकिट माझ्यापाशी राहणार, पुन्हा विचार कर मंजूर? "
" काय साहेब गरीबाची मजा घेता, लॉटरीच्या तिकिटा विकतो आणि थोडीफार कमाई करतो, अशीच बक्षीस मिळवून पार्टनरशिप केली असती, तर कशाला दिवसभर भटकून पायपीट केली असती साहेब.
तुम्ही तिकीट घेतली नाही काहीच नाराजी नाही, पण चेष्टा नका करू गरीबाची "
"यार यात चेष्टा कसली "
" जाने दो सर, क्यों धंदेका टाइम -------
माझ्या राहणीमाना कडे बघून त्याने पुढले बोलणे टाळले, आणि झप झप पावले टाकत पुढे निघून गेला.
नंतर तो जेंव्हा जेंव्हा मला भेटायचा तेंव्हा आमचे असेच बोलणे व्हायचे, आधी आधी तो नाराजीने बोलायचा, पण हळूहळू मुन्नाच्या पानाने चमत्कार दाखवला, पान खाल्ल्यावर तो खुलायला लागला, कां पण त्याच्याशी गप्पा मारण्यात मला खुप आनंद मिळायचा, मधे मधे मी त्याची गंमत सुद्धा घ्यायचो.
" क्यों पार्टनर शादी वादी कब करोगे, "
" साहब अपनेको कौन देगा लडकी, और किसी अभागेने दी भी तो लडकिका और मेरा पेट कैसे भरुंगा, अपनाही तो पेट पालनेकी मारामार "
" यार बीबी आनेके बाद सब बराबर हो जाता, उपरवाला सब देखता है "
" साब अपने उपर तो साला सेठ रहता है, सिर्फ महिनेके महिने भाडा लेनेको नीचे आता है,
भाडेसे याद आया साब आज उसे पैसे देना है नही तो बेड बिस्तर रस्ते पे आ जायेगा "
शर्ट पॅन्ट मधे कोंबत कोंबत, हातातली तिकिटाची बॅग काखेत दाबत घाईघाईने निघून जाताना मला त्याचे कौतुक वाटायचे, असेच तीन चार महिने निघून गेले, नवीन वर्ष सुरु होणार होतं, दिवाळी नुकतीच आटोपली होती,
तो मला चित्रा टॉकीज च्या कॉर्नर वर दिसला, आज विशेष खुशीत होती स्वारी, त्यानेच मला पार्टनर म्हणून ओरडून हाक मारली, मी स्कुटर थांबावली, मागे सौ. बसली होती, मी अचानक स्कुटर थांबवली म्हणून ती विचारायला लागली,
मी मुन्नाच्या टपरीवर पानाची ऑर्डर दिली,
" क्यों पार्टनर आज बहोत खुश हो, क्या बात है? "
" सर आज मस्त सेल झाला, आणि तुमच्यासाठी एक तिकीट सुद्धा राखुन ठेवली, नवीन वर्षात तुम्हाला नक्कीच लाभ होणार, फक्त दहा रुपयाची तिकीट आहे "
मी खिशातून पाच रुपये काढले,
" तो पार्टनरशिप कबूल "
" जाने दो ना साहब, एक बार तो मेरा कहा मानो "
" यार नाही कोण म्हणतो पण अट म्हणजे अट"
मी माझा हट्ट सोडायला तयार नव्हतो.
तो सुद्धा आपल्या हट्टाला चिकटून बसला होता, त्याने नाराज न होता खुशी खुशीने माझ्याशी हात मिळवला,
" साहब मुझे सोचने के लिये थोडा वक्त तो दो, आपकोभी मेरे जैसा पार्टनर नाही मिलेगा, पण वेळ आल्यावर होणारी पार्टनरशिप अधिक काळ टिकणारी असते, तुमची इच्छा मी नक्कीच पूर्ण करणार, आप भी याद करोगे सर इस पार्टनरको, अच्छा साहब सलाम "
मी पण तोंडात कोंबले व स्कुटर जवळ आलो, ही वाट बघून कंटाळली होती.
" काहो कुणाशीही एवढी लगट करून गप्पा मारण्याची आपली सवय कधी कमी होणार, काय मिळते तुम्हाला यातून, पुन्हा एखादवेळी हजार दोन हजाराचं नुकसान करून घेणार तुम्ही असल्या लोकांच्या नादी लागून "
"अगं असं नसते ते, तो माझा भावी पार्टनर आहे, आणि झालंही नुकसान तर कोणती जन्मोजन्मीची कमाई लुटून नेणार बिचारा, त्याच्याशी बोलल्यावर त्याला आनंद होतं असेल तर काय बिघडलं."
" हं चला, झालं पुरे आपलं तत्वज्ञान "
ति फणकाऱ्यानं स्कुटर वर बसली.
त्यानंतरही त्याची माझी भेट अनेकदा झाली, या अवधीत त्याने मला कधीही एक पैसा सुद्धा उधार मागितला नाही, मी ऑर्डर केलेले पण खुशीत खाऊन हसत हसत, शर्ट पॅन्ट मधे कोंबत कोंबत, हातातली तिकिटाची बॅग सांभाळत मला सलाम करून निघून जायचा, आणि मला तिकीट घ्यायचा आग्रह कधीही करायचा नाही, उलट माझ्या बाजूला असलेल्या माणसाशी घासाघिस करत त्याच्या माथी दोन तीन तिकिटा मारून, माझ्याकडे विजयी मुद्रेने बघत निघून जायचा.
आज मात्र कहरच झाला, संध्याकाळी शाम चौकातून काही खरेदी आटोपून मी घरी निघालो होतो, तेवढ्यात मला, 'पार्टनर ' अशी परिचित हाक ऐकू आली, मी वळून बघितले,
चित्रा टॉकीजच्या कॉर्नर च्या पान टपरीवर माझा पार्टनर उभा होता, आज त्याचा चेहरा विशेष प्रफुल्लित दिसत होता, कपडे नुकतेच प्रेस केल्यासारखे वाटत होते, कदाचित आजच खरेदी केलेला चामड्याचा बेल्ट बांधलेला होता, त्याला असलेले पितळी बकल व किंमत लिहलेली चिट्ठी दिसत होती. गड्याने लेबल सुद्धा काढलं नव्हतं. मी स्कुटर लॉक करून त्याच्याजवळ आलो,
" यार पार्टनर आज बडे खुश लग रहे हो "
" साहब खुश तो रहनाही है, गममे रहकर किसने क्या कमाया तो मै कमाऊंगा "
" यार बेल्ट बडा मस्त है, बडा जच रहा "
" क्या साहब मजाक कर रहे, साहब आज अपना अग्रीमेंट पक्का, पार्टनरशिप तय कर लेते "
" कां पार्टनर आज काय झालं, स्वप्न वगैरे बघितलं नाही ना "
"सर कल हरियाणा कां बंपर ड्रॉ है, पचास रुपये की टिकिट, बीस लाख मिलेंगे, आपको पचीस रुपये देने पडेंगे, टिकिट आपके पास रहेंगी, इनाम आधा आधा, आपने बेईमानी भी की तो आपको मुबारक l"
तो पटापट पाठ केल्यासारखं बोलायला लागला, त्याला काय झालं हेच कळेना, आता मात्र तिकीट घेण्यावाचून मला पर्याय नव्हता, मी खिश्यातून पंचवीस रुपये काढले, आणि पन्नास रुपयाची तिकीट खिश्यात ठेवली, त्याला पान खिलवून घरी आलो.
तिकीट खिश्यातच राहली, रात्री लक्षात सुद्धा नव्हतं तिकीट घेतल्याचं,
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिस ला जायची तयारी करायला लागलो, बुटाची लेस बांधत बांधत, चहाचे गुटके घेत सकाळचं वर्तमान पत्र वाचत होतो, आणि तिसऱ्या पानावर मला हरियाणा बंपर ड्रॉ चा रिजल्ट दिसला, अचानक मला शर्टच्या खिश्यात असलेल्या तिकिटाची आठवण झाली, मी सहज उठलो, खिश्यातून तिकीट काढले.
व यंत्रवत नंबर ट्यालि करायला लागलो, पहिल्या नंबरच्या तिकिटाशी माझा नंबर जुळत होता, मी घाबरलो, आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे असच मला वाटलं. पुन्हा नंबर जुळवायला लागलो. नंबर जुळला, आता मात्र माझा तिकीट धरलेला हात थरथरायला लागला, मी किंचाळलो,
"रजनी "
मला काय झालं एवढं किंचाळायला म्हणून ती किचन मधून बाहेर आली, माझा चेहरा बघून तिला धक्का बसला.
"अहो एवढं काय झालं ओरडायला, काय लिहलं आहे पेपरमध्ये "
"अगं माझ्या पार्टनरला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं बघ लॉटरीच, "
हिला काहीच अर्थबोध झाला नाही, अजूनही ती माझ्याकडे स्तंभीत होऊन बघत होती, मी तिला तिकीट आणि पेपरमधील नंबर दाखवला, तिच्या चेहऱ्यावर एकाच वेळी अनेक भाव उमटले. मी स्वतःला सांभाळण्यापलीकडे होतो, पटकन स्कुटर काढली आणि माझ्या पार्टनरच्या शोधात निघालो.
"अहो जरा जपून जा, स्कुटर नीट चालवा, तिकीट सांभाळून ठेवा "
पण तिच्या बोलण्याकडे माझे मुळीच लक्ष नव्हते. मी चित्रा टॉकीजच्या कॉर्नरवर आलो. नेहमी खुशीत व हसतमुख असणारा माझा पार्टनर तिथे नव्हता. मी स्कुटर श्याम चौकात पळवली. तो तिथेही नव्हता. केंव्हा केंव्हा त्याला तिकीट दाखवतो असे मला वाटत होते, पुन्हा मुन्नाच्या टपरीवर आलो.
" अरे मुन्ना, आज वो लॉटरी वाला नही दिख रहा, तुने देखा क्या? "
" हाँ साहब अभि अभि वो रेल्वे स्टेशन की तरफ गया, बस पाच दस मिनटही हुए "
मी पान तोंडात कोंबले, स्कुटरला किक मारली आणि रेल्वे स्टेशन कडे निघालो, कॉर्नरवर नुकत्याच बांधलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ मला खुप गर्दी दिसली, जमाव प्रक्षुब्ध झाला होता, जवळच एक महाकाय ट्रक उभा होता, लोकांनी ड्राइवरला खेचून बाहेर काढले होते, आणि त्याची बेदम पिटाई करीत होते, मला ड्राइव्हरची दया आली, मी गर्दीत घुसलो, चार पाच लोकांच्या तावडीतून त्याला सोडवले,
"यार छोड दो, गलती हो गयी होगी बेचारेकी, "
अरे क्या छोड दो साहब, सालेने रॉंग साईड गाडी चलाके एक आदमी को कुचल डाला और आप बोल रहे छोड दो, वो तो बेचारा अपनी जानसे गया l "
प्रसंगाचे गांभिर्य माझ्या लक्षात आले, मी त्या ड्राइव्हरला तसेच सोडून दिले, चिरडल्या गेलेल्या दुर्दैवी माणसाला बघायला ट्रक जवळ गेलो, आणि मला जबरदस्त धक्का बसला. माझा पार्टनर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्याचे कपडे रक्ताने माखून गेले होते, चेहऱ्यावर नेहमीचेच प्रसन्न हास्य होते. कमरेला बांधलेल्या कालच विकत घेतलेल्या बेल्टचे पितळी बकल उन्ह पडल्याने चमकत होते.
मी नकळत खिश्यात हात घातला, लॉटरीचं तिकीट माझ्याकडे बघून मलाच विचारत होतं,
" साहब टिकिट लोंगे "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा