नेहमीच्या सवयीने, अमरसिंग रसूलचाचांच्या बेकरीत डोकावला. पण चाचाजी दिसले नाहीत. त्यांचा मुलगा, शफी, काउंटरच्यामागे बसलेला दिसला. त्याच्याकडे चाचाजींची चौकशी अमरसिंग करणार तेवढ्यात तोच म्हणाला, 'अब्बूकी तबीयत आठ दिनों से ठीक नहीं है |आप आयेंगे तो, मिलने के लिए अंदर बुलाया है |' अमरसिंग बुचकळ्यात पडला. चाचाजी काही फार वयस्कर नव्हते, पंचावन-छप्पन असतील फार तर. तब्येतीनं ठीकच दिसायचे. श्रीनगरमध्ये दल लेकच्या जवळ रसूलचाचांची बेकरी होती आणि त्याला जोडूनच मागे त्यांचं घर होतं . पण त्यांच्या घरात जाण्याची वेळ कधी आली नव्हती. अमरसिंग जेमतेम सत्तावीस वर्षांचा ,सहा फूट उंच, तगडा जवान. मूळचा चंदिगढचा. टायर्स आणि मोटरच्या स्पेअर पार्टसची श्रीनगरमध्ये ने-आण करण्यासाठी तो आपला ट्रक घेऊन यायचा. महिन्यातून दोन तरी फेऱ्या असायच्याच त्याच्या. माल पोचवून झाला की, अधूनमधून तो या बेकरीत डोकवायचा. इथली नानकटाई आणि अखरोटची बिस्कीटं बीजीला-म्हणजे त्याच्या आईला आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडायची. दोन-दोन किलो घेऊन जायचा प्रत्येक वेळी. रसूलचाचा पण प्रेमाने त्याला काही-बाही खिलवायचे. त्यांच्या तोंडून ' बेटा ', अशी हाक ऐकताना त्यालाही छान वाटायचं. ट्रकमध्ये माल भरायला वेळ असला म्हणजे तो चाचांशी गप्पा मारत बसायचा. त्यांची दोघांची छान दोस्ती झाली होती. शफीबरोबर बेकरीच्या मागच्या दारातून उतरून अमरसिंग चाचाजींना भेटायला घरात गेला. जुन्या पद्धतीचं मोठं घर होतं ते! बाहेरची पहिली हाॅलवजा प्रशस्त खोली आणि तिच्या चारीबाजूला एक-एक खोली अशी रचना होती. अर्थात सगळ्या खोल्यांच्या दरवाजांवर पडदे असल्याने, त्यांच्या आकारमानाचा अंदाज येत नव्हता. शफीनं डावीकडच्या खोलीकडे इशारा करून त्याला आत जायला सुचवलं. चाचाजी खाटेवर पडून होते, बाजूलाच चेहरा ओढणीने झाकून, बहुधा त्यांची बायको बसली होती. अमरसिंगला आत येताना पाहून ती उठून आत जायला निघाली, पण चाचांनी तिला थांबवलं.ते जरा कष्टानेच उठून, तकियाला रेलून बसले. 'ये हमारे शफी जैसा है बेगम, आप को अंदर जाने की या परदा करने की जरूरत नहीं है |'
'क्या हो गया चचाजी आपको?' असं म्हणत अमरसिंग त्यांच्या बाजूला बसला.
' बेगम, जरा दरवाजा अच्छे से बंद करो! मुझे इससे जरूरी बात करनी है !'
'बोलिये ना चचाजी, क्या बात है?' अमरसिंगने विचारलं.
' बेटा, एक बहुत बडी जिम्मेदारी तुम्हें सौंपना चाहता हुँ |मना तो नहीं करोगे ना? मेरा पूरा भरोसा तुम्ही पर है |'
' आप कहिये तो सही ', चाचाजींना नेमकं काय सुचवायचं आहे ते त्याला लक्षात येत नव्हतं.
चाचाजींनी बोलायला सुरूवात केली. आणि अमरसिंग ते लक्ष देऊन ऐकू लागला.
'सात वर्ष झाली या गोष्टीला. त्यावेळी आमची बेकरी शंकराचार्य टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर होती. मागच्या बाजूला घर आमचं ! शफी जवळच्याच ' श्रीनगर हिंदी पाठशाला ' मध्ये नववीत होता. तिथे कृष्णाजी पंडित हिंदी आणि चित्रकला शिकवायचे. त्यांची मुलगी कस्तुरी दहावीत त्याच शाळेत शिकत होती. आमच्या कंपाउंडला लागूनच त्यांचं घर होतं. शफी आणि कस्तुरी, बरोबरच शाळेत जायचे. लहानपणापासून एकत्र राहिल्याने, सख्ख्या भावंडांसारखं प्रेम आहे एकमेकांवर. सकीना आणि राधा - कस्तुरीची आई मैत्रिणीच झाल्या होत्या एकमेकींच्या.' राधाचं नाव ऐकून सकीनाबेगम ओढणीनेच आपले डोळे टिपायला लागली. चाचाजींची एकदा तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा बोलू लागले. त्यांचाही गळा दाटून आला होता.
'महाशिवरात्रीचा दिवस होता तो. त्यादिवशी इथले स्थानिक लोक टेकडीवरच्या शिवमंदिरात आवर्जून जातात. कृष्णाजी पण राधा आणि कस्तुरीला घेऊन जाणार होता तिथे. पण का कोण जाणे कस्तुरी बिटियाला त्यादिवशी मंदिरात जायची इच्छा नव्हती. ती घरीच थांबते म्हणाली. कंटाळा आला तर शफीच्या घरी जा असं तिला सांगून ते दोघं निघाले. ' मुझे बता के गए, बिटिया का ध्यान रखना ! '
मंदिरात जायचं म्हणजे जवळ-जवळ दोनशे पायऱ्या चढायच्या आणि येताना परत तेवढ्या उतरायच्या. शिवाय गर्दीमुळे दर्शनालासुद्धा जरा वेळच लागणार! एकूण दोन तासतरी जाणारच. म्हणून जरा लगबगीनंच ते निघाले. गिर्हाईक येण्याची वाट बघत मी बेकरीत बसलो होतो. साडेबाराच्या सुमारास एकदम धमाका झाला. बम फटने की आवाज आयी और टेकडी की तरफ चारों ओर धुआँसा फैल गया | या खुदा ! हरामजाद्यांनी कसा तिथे प्रवेश मिळवला आणि दावा साधला काय माहीत ! तिकडे गेलेल्या शंभरेक जणांच्या तरी चिंधड्या उडाल्या अगदी. कृष्णाजी आणि राधा पण त्यातच संपले. टेकडी चढण्याआधी तपासणी होते आणि रजिस्टरमध्ये नाव लिहावं लागतं. तेवढाच कृष्णाजी आणि राधा तिथे गेल्याचा सबूत ! मी बेकरी पटकन बंद केली आणि सकीनाला घेऊन कस्तुरीकडे धावत गेलो. सकीनाच्या गळ्यात पडून कस्तुरीबिटिया तर बेहोश झाली. पुढे कित्येक महिने लागले तिला सावरायला. सकीनाने दिन-रात तिची सेवा केली आणि तिला माणसांत परत आणली. तिच्यासाठी नवस तर किती बोलले याचा हिसाबच नाही! 'या घटनेनंतर तिकडची सगळी वस्ती, दुकानं हटवली. तिकडे मिलिटरीची चौकी आली. दोन किलोमिटरपर्यंत प्रवेशबंदी झाली.' बेकरी बंद झाल्याने आमच्या तर पोटावर पाय आला. घर ना दार, कसे दिवस काढले आम्हालाच माहीत. लोक. बिथरलेले.दंगा-फसाद चालू झाला. हिंदूंना तर जगणं मुश्किल करून टाकलं होतं. दिसताक्षणी चिरून टाकायचे अक्षरशः.बरेचसे मिळेल त्या मार्गाने पळून गेले. त्यामुळे कस्तुरीचा कोणी रिश्तेदार इथे उरला नव्हता. बिटियाची चिंता आणि जिम्मेदारी होती. मग तिलाही बुरखा घालायला लावला. सरकार दरबारी हजार खेटे घालून इथली जागा मिळवली. इथे तिला, आम्हाला ओळखणारं कोणी नव्हतं. खुदा मुझे जो चाहे सजा दे ! पण तिच्या बचावासाठी मी माझ्या मोठा मुलगा त्या स्फोटात गेला आणि ही त्याची विधवा आहे असंच साऱ्यांना भासवलं. बिटिया बाहेर तर पडतच नाही. पण तिची खोली वेगळी आहे. तिचं जेवण ती वेगळं बनवते. सकिनाकडून सिलाही-कढाई शिकली आहे. दोघी मिळून बायकांचे कपडे शिवतात. थोडे पैसे कमावतात.'
'पण हे घूसखोर आता इथेही यायला लागलेत. आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री बेकरीत घुसून बरंच सामान लुटून गेले. त्यामुळे मला आता बिटियाची चिंता वाटायला लागली आहे. जवान लडकी आहे, खरंतर शादी करून सासरी जायला हवी. पण इथे कसं शक्य होणार? यहाँ की जिंदगी का तो आजकल कुछ भी भरोसा नहीं |ये आतंकवादी कहीं भी, कभी भी घर में घूसने लगे है | चार दिन पहले, रात को आए थे दो जन | बेकरी से कितना सारा खाने का सामान उठाके ले गये |अगर कस्तुरी के बारें में उन्हें पता चला, तो हमें तो जिंदा छोडेंगे ही नहीं, मगर उसके साथ क्या करेंगे, ये सोचके ही परेशान हो गया हुँ |अब उसकी रक्षा करना मेरे बस में नहीं | इसीलिए तुम्हारी मदद चाहिये | ' बोलून चाचाजींना दम लागला होता. सकीनाबेगमनी पाण्याचा ग्लास पुढे केला.
अमरसिंगला कळतच नव्हतं, त्याची काय मदत होणार?
चाचाजी म्हणाले,' बेटा, तू कस्तुरीला चंदिगढला घेऊन जा. तिला आसरा दे. मला माहित आहे, तुझी शादी झाली आहे ते. पण धर्माची बहिण मानून तिला इथून बाहेर काढ. पुढे-मागे कोणी योग्य मुलगा आढळला तर तिची शादी करून दे. पैशाची चिंता नको करू. तिच्या आई-बापाचं घर विकून आलेले थोडे पैसे आणि त्यांच्या मृत्यूनंतर सरकारने दिलेले पैसे असे पाच लाख रूपये मी सुरक्षित ठेवले आहेत. त्याला हात नाही लावला. इतनी मेहरबानी करोगे ना? ' रसूलचाचांचे डोळे भरून आले होते. चाचा असं काही सांगतील, हे अमरसिंग च्या ध्यानी-मनीही नव्हतं. तो विचारात पडला. पण हे धर्माचं पवित्र काम करायला तो तयार झाला.
चाचाजींनी मग शफीला आणि कस्तुरीलाही बोलावून घेतलं. शफी या गोष्टीला तयारच होईना. त्याच्या बहिणीसारखीच होती कस्तुरी. पण आपण तिचं रक्षण करू शकत नाही हे सत्यही त्याला जाणवत होतं. कस्तुरी तर काही न बोलता फक्त रडत होती. कशीबशी चाचांनी त्या दोघांची समजूत काढली. मग थोडी चर्चा करून त्यांनी सगळा प्लॅन बनवला. अमरसिंग संध्याकाळी ट्रक घेऊन निघणार होता. चंदिगढ पर्यंत पोचायला त्याला अठरा ते वीस तास लागणार होते. एवढा प्रवास कस्तुरीनं त्याच्याबरोबर करणं त्रासदायक आणि जोखमीचंही होतं. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी शफी आणि कस्तुरीनं विमानानं जम्मूपर्यंत जायचं ठरलं. जम्मूहून चंदिगढला जाणाऱ्या ट्रेनमध्ये कस्तुरीला बसवून, शफी श्रीनगरला परतणार होता. चंदिगढला अमरसिंग तिला घ्यायला स्टेशनवर येणार होता.
आज मंगळवार होता. अमरसिंग बुधवारी घरी पोचणार होता तर कस्तुरी गुरूवारी दुपारी. आपल्या घरच्या लोकांना हे समजवायला त्याला थोडा वेळ मिळणार होता. काय आणि कसं सांगायचं याचाच तो विचार करत होता. एवढ्यात कस्तुरी उठून आत गेली. सकिनाबेगम सगळ्यांसाठी नमकीन चाय घेऊन आली. त्यांचा चहा पिऊन होत असतानाच कस्तुरी हातात तबक घेऊन आली. तिनं शफी आणि अमरसिंगच्या मनगटाला रेशमी धागा बांधून, दोघांचं औक्षण केलं. या अनोख्या रक्षाबंधनाने सगळ्यांचेच डोळे भरून आले. आपल्या या लेकीची अशी पाठवणी करण्याच्या विचाराने सकिनाबेगम व्याकुळ झाली होती.
©प्रणिता खंडकर.
What's up.. 9833479845.
ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कथेत कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा