नवीन लग्न होऊन सासरी आलेली मुलगी व नवीनच नोकरीला लागलेला मनुष्य. ह्या दोघांची परिस्थिती सारखीच असते. मुलगी सासरच्या प्रत्येक माणसाला घाबरत असते. पाच वर्षाच्या दिराचीसुद्धा तिला जशी भीती वाटत असते, तद्वतच नवीन नोकरीला लागलेला मनुष्य साध्या पट्टेवाल्यालासुद्धा भिऊन असतो. आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्या मूळत: भित्रा असणाऱ्या माणसाची पंचाईत तर विचारायलाच नको. मी पण तसाच गोंधळून गेलो. पृथ्वीचा प्रलयकाळ उद्यावरच आला असल्यासारखे सर्वांचे चौकोनी चेहरे व खाली गेलेल्या माना पाहून, मला वांद्र्याच्या खाटीकखान्यातील मेंढ्यांची आठवण झाली. ऑफिसमधले कठिणात कठीण व किचकट कामसुद्धा खेळीमेळीने व प्रसन्न चेहऱ्याने करता येते, हे त्या लोकांच्या गावी सुद्धा नसावे, –नव्हतेच! अशा लोकांत रोज मी सुद्धा १० चौरस फुट जागा अडवून सुमारे सातआठ तास बसणार होतो. रोज तेच ते ठरावीक उतरलेले चेहरे व पट्टेवाल्यांच्या मरगळलेल्या हालचाली बघणार होतो.
सुमारे पंधरा दिवसांच्या अवधीत निरनिराळ्या कामाने, कारणाने माझी तेराचौदा माणसांची ओळख झाली. ह्या तेराचौदा माणसांत दोनतीन मुलीही होत्या. पण सगळ्यांचे चेहरे एरंडेल प्यायल्यासारखे. आता मला फक्त एकच आशा उरली होती आणि ती म्हणजे माझ्या शेजारी बसणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीची. मी कामावर आल्यापासून ती व्यक्ती रजेवर होती. ती व्यक्तीसुद्धा अशीच निघणार असेल तर मात्र माझ्यासारखा कमनशिबी मीच! त्यापेक्षा त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहूनच मला समाधान लाभत होते. माझ्या आसपासची आंबट चेहऱ्याची माणसे मला ‘माणसे’ वाटतच नव्हती. रावण मेल्यावर युद्धातून बचावलेले ‘राक्षसच’ इथे कामाला जुंपले आहेत असे मला वाटायचे. पण देवाला माझी दया आली. शेजारची गैरहजर व्यक्ती धुमकेतूसारखी उगवली व तिला पाहताच प्रथमदर्शनी मला ‘लंकेत बिभीषण’ सापडल्याचे समाधान वाटले. मी माझ्या जाग्यावर बसावयाच्या आतच,
Good Morning पडोसी !
अशी आमच्या मित्राने मला सलामी दिली. तितक्याच तत्परतेने मी तिला ‘प्रत्युत्तर’ दिले. त्या पहिल्या दिवशी जेवणाची सुट्टी होईपर्यंत आमचे विशेष बोलणे झाले नाही. जेवणाच्या सुट्टीत मी पलीकडच्या खोलीत गेलो. जेवणाचा डबा उघडून आज काय काय पाठवले आहे ह्याची पाहणी करत असतानाच माझ्या कानावर एक खणाणीत आवाजात म्हटलेली गाण्याची लकेर आली. ऑफिसातसुद्धा बेधडकपणे गाणे म्हणणारा हा कोण तिस्मारखाँ आहे हे पाहण्यासाठी मी वर मान केली, तो आमचे पडोसी! फारच सुरेख आवाज होता प्राण्याचा! माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य चमकलेले पाहून पडोसी म्हणाले,
‘का हो, तुम्हाला गाण्याची आवड नाही का?’
मी मान डोलवली.
‘मग छान आहे बुवा ! मला पण गाण्याचा षोक आहे ! ह्या देहाला ‘वसन्त मांजरेकर’ म्हणून संबोधतात !
‘अरे वा ! तुमचे–आमचे नाव एकच आहे की हो ! मी ‘वसन्त काळे !’
मी माझ्या देहाची ओळख करून दिली, ‘तुमचा आवाज छान आहे हो’ मी पुढे म्हणालो.
‘अहो कसला आवाज छान! Man is a singing Animal ! आणि मी माणूस आहे म्हणून मी गातो! मी कुठेही गातो. घरी गातो, लोकलमध्ये गातो आणि ऑफिसातही गातो! अहो, गाण्याशिवाय दुसरे काय सौख्य आहे माणसाला? रोजचे मानसिक व शारीरिक त्रास गाण्याशिवाय कसे काय विसरायचे?
‘अगदी खरं आहे!’ मी थोडासा हुरळून म्हणालो. कारण प्रथमदर्शनीच त्या माणसाबद्दल माझे जे अनुकूल मत झाले होते, ते फसले नव्हते.
‘त्याचं काय आहे, बरं का वसन्तराव! ह्या ऑफिसातली सर्व माणसे जनावरे आहेत. हे लोक फक्त समोर ठेवलेले टेबल व त्यावरील रंगीत कागद ओळखतात. आजुबाजूची माणसे त्यांना दिसतच नाहीत. काम करताना मजा करता येते व मजा करता करता सुद्धा काम होऊ शकते याची त्यांना कल्पनाच नाही; आणि म्हणूनच ते कामाला कंटाळतात. रविवारची ते उत्कठंतेने वाट पाहतात आणि शनिवारची अर्धी सुटी मिळताच ‘स्वर्गाचे राज्य’ मिळाल्याचा त्यांना आनंद होतो. आणि जर का शनिवारी काम जास्त पडले तर ते त्याचा राग घरी जाऊन बायकोवर काढतात. म्हणून म्हणालो की, जनावरे आहेत सगळी! प्रेमऽम की माऽऽऽर कट्याऽऽऽरऽऽ!!’
खरोखरच त्याचा आवाज फारच सुंदर होता. मी त्याला पुन: विचारले ‘तुम्ही गाणे कुठे शिकला का नाहीत? एक उत्कृष्ट कलाकार झाला असतात!’ त्याच्यावर नुसतेच ‘हूं’ करून तो पुढे म्हणाला,
‘अहो, कसली कला आणि कसला कलावंत! आम्हांला हजार उद्योग करायचे असतात. आम्हा लोकांना ‘अर्धी कोंबडी अंडे उबवायला हवी असते’ व त्याच वेळी ‘अर्धी कोंबडी मस्तपैकी खायला हवी असते!’ तेव्हा सगळ्याच गोष्टी कशा काय जमणार! मी आयुष्याकडे फार वरवर दृष्टीने पाहतो. कोणतीच गोष्ट मी मनाला लावून घेत नाही व कोणतीच गोष्ट मनावर पण घेत नाही. मौज म्हणून चार लोक पत्ते कसे खेळत असतात! डाव जिंकल्याचा विशेष आनंद नाही किंवा हरल्याचा विशेष खेद नाही. त्याचप्रमाणे अगदी मी आयुष्य ‘खेळत’ आहे खेळण्याचा कंटाळा आल्याबरोबर त्यांचा डाव जसा थांबतो तद्वत माझाही डाव मी आपण होऊन बंद करीन!’
एकंदरीत माझ्या या मित्राची मते व विचार फारच अफाट होते. आयुष्याकडे अगदी निराळ्या दृष्टिकोणाने बघणारा एक मनुष्य मला सापडला होता. आमच्या गाठीभेटी रोज घडू लागल्या. मित्रत्वाची गुंफण गुंतत होती व रोज त्याच्या अफाट स्वभावाचा नवीन पैलू माझ्या दृष्टोत्पत्तीस पडत होता. एवढ्या अल्प काळात जडलेली आमची मैत्री इतरेजनांना खुपू लागली. आम्हा दोघांपलीकडे बसणारा एक गृहस्थ मात्र हळूहळू आमच्यात रूळू लागला. एके दिवशी तो गृहस्थ कुठे दिसला नाही तेव्हा मी वसन्ताला म्हणालो,
‘कायरे वशा, हा प्राणी आज कसा उगवला नाही?’
‘अरे, ह्या सर्व लोकापैकीच तो एक ! आपल्यात जराजरा मिसळतो इतकंच! खेळीमेळीने आयुष्य जगायचं हे ह्या लोकांना माहीत नसल्यामुळे आपल्याला काहीतरी होत आहे अशी यांची भावना झालेली असते. मग त्या भावनेने ते आजारी पडतात. डॉक्टरने व्हिटॅमिन्स, बी कॉम्प्लेक्स डेफिशिअन्सी, कॅलशिअम असे मोठमोठाले शब्द ऐकवून सहा इंजक्शन्सचा कोर्स दिला म्हणजे हे टुणटुणीत होतात व मग डॉक्टरी ज्ञानाचे कौतुक करीत एक दिवस पुन: ऑफिसात येतात ! नेहमीप्रमाणे इतरांपेक्षा निराळ्या धर्तीचे उत्तर वसंतकडून आल्याचे मला समाधान वाटले. आणि मग मी असे ठरवूनच टाकले की, रोज नवीन नवीन विषय काढून आपण त्यावरची वसंतची मते ऐकायची !
पण दुसरेच दिवशी एक दारूण घटना घडली ! आमचा तो आजारी पडलेला गृहस्थ वारल्याचे वृत्त ऑफिसात येऊन धडकले. लगेच ऑफिसला अर्धा दिवस सुट्टी असल्याचे जाहीर करण्यात आले. त्या गृहस्थाचा आणि माझा जरी फारसा परिचय किंवा संभाषण घडले नव्हते तरी ती बातमी ऐकताच माझे मस्तक सुन्न झाले. कितीतरी वेळ त्याच्या त्या रिकाम्या खुर्चीकडेच मी वेड्यासारखा पाहात बसलो. मी वसंतकडे पाहिले. विषादाची छटा त्याच्या डोळ्यात काही क्षण चमकून गेली व पुन: त्याचा चेहरा पूर्ववत झाला. त्याच्या त्या वृत्तीचा मनातून निषेध करीत मी त्याच्याजवळ हळहळ व्यक्त केली. त्यावर नेहमीचेच हास्य करीत तो म्हणाला,
‘अरे, एखादा मनुष्य मेला ह्यात अपघात कसला आलाय? आपण सगळे जगत आहोत हाच ‘अपघात’ आहे. मरणे हा अपघात नसून जगणे हाच अपघात आहे! आज तो मेला, उद्या तुम्हीही मराल व पुन: आम्हाला अर्धा दिवस सुट्टी मिळेल! परवा मी मरेन! त्यात आहे काय विशेष? रोज सकाळी उठताना मी विचार करीत उठतो की, ‘अरे अजून कसे आपण मेलो नाही बुवा!’ तेव्हा दोस्त इतका हळवा व भावनाप्रधान राहू नकोस. असा जर राहिलास तर आयुष्यात निभाव लागणे मुष्कील होईल! माझ्यासारखी दृष्टी ठेव. अरे बाबा, ‘दो दिनकी जिंदगी है ऽ ऽ ऽ दो दिन का मेला ऽ ऽ!’
त्याचा इतका कठोर स्वभाव मला आवडला नाही. पण मी तो बोललेल्या विचारावर विचार करू लागलो तेव्हा माझ्या मनात आले, खरंच! हा म्हणतो ते काय खोटे आहे? –उद्या मी मरेन, ऑफिसला अशीच सुट्टी मिळेल! मी मरणार!!– माझा मृत्यू!!! मला ती कल्पनाच सहन होईना. तोच वसन्तने माझ्या पाठीवर थाप मारली.
‘दोस्त, विचार करू नकोस उगीच! उद्या तू नक्कीच मरत नाहीस!’ एवढे बोलून तो तडक बाहेर पडला व माझ्या मनातले विचार ह्याने नेमके कसे काय ओळखले ह्याचा विचार करीत मी तसाच उभा राहिलो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसात आलो तरीपण माझ्या मनावरचे खिन्नतेचे पटल दूर झाले नव्हते. वसन्त मात्र निर्विकार होता. मला पाहताच तो म्हणाला.
‘काय मौज असते पहा! मला काल लवकर जायचेच होते आणि त्यासाठी कसे काय लवकर पळावे याचा मी विचारच करीत होतो आणि अचानक सुट्टी मिळाली. देऽऽवाऽऽथोर तुझे उऽऽपऽकाऽऽरऽऽ!’
‘का एवढे काय काम होते?’ इच्छा नसताना मी प्रश्न केला.
‘अरे, त्या देशपांड्यांच्या लिलीला भेटायला जायचे होते, माहीमला!’
मी एकदम म्हणालो,
‘अरे हो, परवाच ती मला भेटली होती व ती तुला ओळखते हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. तिने पण मला तुझ्याविषयी विचारले. मी तिला सांगितले की, मी त्या प्राण्याला चांगलाच ओळखतो !’
माझे शेवटचे वाक्य ऐकताच वसन्तची चर्या बदलली. काहीतरी नवीन विचार ऐकायला मिळणार म्हणून मला बरे वाटले.
‘तू त्या लिलीला सांगितलेस की, तू मला चांगलाच ओळखतोस; पण सांग पाहू तू मला किती ओळखले आहेस?’
‘मी ऑफिसातही गातो, मनावर कोणतीही गोष्ट घेत नाही, कोणाची पर्वा करीत नाही आणि माझी थोडीशी अफाट मते आहेत, यापेक्षा अधिक माहिती काय आहे तुला? कशावरून एखादी वेळ अशी येणार नाही की, त्या वेळी मला गाणे पण सुचणार नाही? कशावरून माझ्या मनात खोलवर एखादी गोष्ट जखम करणार नाही? किंवा कशावरून माझी अफाट मते बदलणार नाहीत? बाबारे, जन्म एकत्र काढले तरी माणसाच्या मनाचा अगर स्वभावाचा पत्ता लागत नसतो.’
मी गप्प बसलो.
दुपारी जेवणाच्या सुटीत पुन: तोच विषय निघाला. वसन्त म्हणाला, ‘तूच असे समजतोस असे नाही. सगळेच लोक तसे समजतात. पण माझ्याबद्दल विचारशील तर मी असेच सांगेन की, मला जो माणूस अगदी जवळातला जवळ आहे त्याच्या स्वभावाबद्दल सुद्धा मी ग्वाही देऊ शकणार नाही. आता माझ्या हातातला हा पेरूच पाहा. याचे गुणधर्म मला जेवढे माहीत आहेत तेवढेही एखाद्या व्यक्तीचे माहीत नाहीत. हा पेरू कच्चा असताना कसा लागतो, पिकल्यावर कसा लागेल, दातात याची ‘बी’ अडकली तर कसा त्रास होतो, हे सर्व मला माहीत आहे. याचे हे गुणधर्म कोणत्याही परिस्थितीत कायम राहणारे आहेत. पण मनुष्यस्वभावाचे तसे नाही. अमुक एखाद्या काल्पनिक परिस्थितीत, आपण जिला पूर्ण ओळखतो अशी व्यक्ती, अशा तऱ्हेचे उद्गार काढील किंवा अमुक तऱ्हेनेच त्या परिस्थितीला तोंड देईल, अशी कल्पना आपण त्या व्यक्तीबद्दल करतो आणि ती व्यक्ती निराळेच काहीतरी वागते वा बोलते! आणि आपण म्हणतो, मला कल्पना नव्हती तो असे काहीतरी करील याची !’
असेच काही दिवस गेले. वसन्त अलीकडे खूपच निराळा वागत होता. त्याची खेळकर विनोदी वृत्ती कोठच्याकुठे लुप्त झाली होती व तो काहीतरी खोल विचारात गढला असल्याचे दिसत होते. पण मी त्याला त्याच्या अस्वस्थतेबद्दल हटकले नाही. हा प्राणी इतका गंभीरही होऊ शकतो याचे मला नवल वाटत होते आणि त्याला अशा काहीशा विमनस्क मन:स्थितीत पाहून नकळत मीही विमनस्क झालो होतो.
आणि एक दिवस वसंत ऑफिसाला आला नाही. एकदोघांजवळ मी त्याच्याबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांनी माझ्याकडे अशा नजरेने पाहिले की, जणू काय वसन्तची सर्व माहिती जाणणारा मीच एकमेव ! मग मी गप्प बसलो; पण दुसऱ्या दिवशीही तो आला नाही, तेव्हा मला राहवेना. मी पुन: चौकशीला आरंभ केला; पण प्रत्यक्ष माझ्याशी न बोलता त्या लोकांनी आपापसातच बोलायला सुरूवात केली—
‘काय गणपतराव, बातमी कळली ना? त्या मांजरेकर साहेबांनी शेवटी दीडदोन हजाराला ऑफिसला टांग मारली!’
‘’What a wonderful news! ’
‘अरे साला, तेच्यामंदी वंडरफुल काय बी नाय ! आमी कवाच समजूनशान बसले होते की, ये आदमी असा मजा करेलच करेल !’
‘आमचे घाटपांडे साहेब काय म्हणत आहेत?’ हेडक्लार्कच्या सलगीतल्या कारकुनाने हेडक्लार्क घाटपांड्यांना विचारले; पण घाटपांडे गप्प बसले आणि मी ओळखले की, खरा प्रकार घाटपांड्यांना माहीत असावा; पण हेडक्लार्कशी गप्पा मारण्याचे धाडस करण्यासाठी मला त्या ऑफिसात आणखी काही दिवस घालवणे प्राप्त होते. हळूहळू मला सर्व प्रकार समजला. सुमारे पंधराशे रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप वसन्तवर आला होता व तो पोलिसच्या ताब्यात होता. डोके दुखत असल्याचे निमित्त करून मी ऑफिस सोडले व एका पोलिस–अधिकाऱ्याची ओळख काढून वसन्तला भेटायला गेलो.
पोलिसच्या ताब्यात असताना सुद्धा वसन्त मनमोकळेपणाने गात होता आणि पोलिस त्याच्याकडे ‘काय निर्ढावलेला बदमाश आहे’ अशा अर्थाने पाहात होते. गजातून हात बाहेर काढून माझा हात दाबीत वसन्त म्हणाला,
‘मला वाटलंच तू येशील म्हणून!’
‘वसन्त, मी जामीन मिळवतोय! मामुली रकमेची बाब आहे’
‘मला जामीन नकोय’
वसन्त शान्त होता आणि मी मात्र माझ्यावरच आरोप आल्यासारखा गंभीर झालो होतो.
वसन्त इकडच्यातिकडच्या गप्पा सांगण्यातच गुंतला होता. स्वत:बद्दल तो काहीच बोलत नव्हता. मुलाखतीची वेळ संपत आली, तरी वसन्त स्वत:बद्दल काही सांगत नव्हता. शेवटी मी त्याला अडवले व ऑफिसातली भानगड विचारली. तेव्हा तो खो खो हसत बसला, पण माझा चेहरा पाहून तो थांबला व सांगू लागला,
‘खरं म्हणजे ती सगळी चूक घाटपांड्यांची आहे. कुठेतरी हिशेबात चूक झाली आहे म्हणा किंवा घाटपांड्यांच्या मनात काहीतरी निराळे आले म्हणा, काहीही म्हणा, पण मी ते सर्व माझ्यावर ओढून घेतले आहे ! प्रत्यक्ष चौकशी सुरू होईल तेव्हा मात्र घाटपांड्यांनी खंबीर राहायला हवं.
‘आज त्या सेवानिवृत्त होण्याच्या वयाला आलेल्या माणसाला मन अजून संसार, घरदार, मुलेबाळे यात गुंतलेले पाहून माझ्या पोटात कालवाकालव झाली. त्याच क्षणी मनात विचार आला की, ह्या माणसाला जगण्यात एवढी मजा वाटत आहे तर त्यालाच जगू दे. संसारातील सौख्याचा आनंद त्याला मनमुराद लुटू दे! बोलून चालून मी सडाफटिंग, ना आगा ना पिछा! कुणी ‘चांगला’ म्हणाल्याचा आनंद नाही, ‘वाईट’ म्हणाल्याचा खेद नाही! असेल नशीब जोरावर तर काहीच न होता सर्व सुरळीत होईल, न झाल्यास मला त्याचीही पर्वा नाही! पत्त्याचा डाव आहे, पत्त्याचा डाव!
‘पुन: सांगतो, इतका हळवा राहू नकोस. जीवनात निभाव लागायचा नाही! एक कविता केलेली ऐक,
‘जीवन सारे दोन क्षणाचे हसा तोवरी रडू नका.
व्यर्थ जिवाला नका त्रासवू बाउ कशाचा करू नका।
फुलापरी हो जीवित अपुले दुसऱ्या दिवशी हो निर्माल्य,
भीती जनाची कशास धरिता सतत उराशी ते शल्य!
कोणी कुणाला ‘बरे’ न म्हणती शिव्याशाप ते सर्वां देती,
ऐसे असता चाड तयांची का बाळगिता दिनराती।’
शिपायाने वेळ संपल्याचे सुचवले. मी डोळे पुशीत बाहेर आलो. दुसरे दिवशी ऑफिसात गेलो. एकजण दुसऱ्याला म्हणत होता,
‘बरे झाले, इथून पीडा गेली ती ! आपल्या सगळ्यांच्यात तो शोभतच नव्हता !’
मी मनाशी म्हणालो,
‘खरे आहे ! जनावरात माणूस शोभणारच नाही. जनावरं इथेच राहिली आहेत व ‘माणूस’ आपली माणुसकी दाखवायला आज ‘गजाआड’ गेलेला आहे.’
व. पु.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा