शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

1363. आकाशपाळणा

    शहरात राहणारा 'अजिंक्य' सुट्टीत जेव्हा नकुलला गावी घेऊन गेला तेव्हा आवर्जून  तिथल्या जत्रेतल्या पाळण्यात त्याला घेऊन बसला.आकाशपाळणा जसजसा वर जायला लागला तसतसा 'नकुल' खूप उत्साहित आणि आनंदित होत म्हणाला,"डॅडी तुम्हाला नाही भीती वाटत जशी मम्माला वाटते?".” मला आकाशपाळणा खूप आवडतो,” अजिंक्य म्हणाला. अजिंक्यला आठवलं तो, त्याचे बाबा नेहमी आकाशपाळण्यात बसत. दोघंही खूप मजा करत. आकाशपाळण्याबरोबर त्याची एक आठवण जोडलेली होती. आकाशपाळणा जेव्हा सगळ्यात उंचावर गेला आणि थांबला तेव्हा त्याने बाबांना विचारलं होतं,' बाबा आपल्याकडे खूप पैसे आहेत का? 'बाबांनी 'हो' म्हटल्यावर तो म्हणाला होता, आमचे पि.टी चे विभांडीक सर कॅन्सरने खूप आजारी आहेत त्यांना ट्रीटमेंटसाठी आपण थोडी मदत करू या का? दुसऱ्याच दिवशी बाबा त्याच्याबरोबर सरांना जाऊन भेटले आणि आर्थिक मदत केली. त्या दिवशी अजिंक्यला बाबा आकाशपाळण्यासारखा उंचउंच, उदार मनाचा वाटला.
      आकाशपाळणा खरंतर सगळ्यांच्या मनात दडलेला असतो. तो अखंड गोल फिरत असतो. उंचावर गेला की थोडा स्थिरावतो आणि मग पुन्हा खाली येतो. माणसं आपल्या हाताच्या मुठीत आपली स्वप्नं घेऊन उंचउंच जातात. आयुष्य जेव्हा आपल्याला असं प्रगतीच्या शिखरावर घेऊन जातं ना तेव्हा त्या यशाची पण स्वतःची अशी एक धुंदी असते, नशा असते. त्या शिखरावर कायमच स्थिर व्हावं अशी मनोमन आपली इच्छा असते. एवढ्या उंचावरून खालचं जग किती क्षुद्र ,किरकोळ, छोटंसं दिसतंय असं म्हणतानाच वास्तवाचं अस्तित्व आपण दुर्लक्षित करत असतो, नाकारत असतो. खरं म्हणजे आभाळाला स्पर्श करण्याची आपली मनीषा वेगाने आकाशपाळण्यासारखी आपल्याला वर घेऊन जाते. आपले पाय जमिनीवर ठरत नाहीत आणि जेव्हा त्या शिखरावरून आपण खाली येतो.आपले पाय जमीनीवर येतात तेव्हा वास्तव जीवनाची जाणीव आपल्याला जागं करते.
      आपलं जीवन या आकाशपाळण्याप्रमाणे चढ-उत्तरांनी भरलेलं आहे. जेव्हा आपण उंच जातो तेव्हा हर्षोल्लासाने ओरडतो आणि खाली आल्यावर त्या आठवणी जपून ठेवतो. कधी वाटतं सारं संपलंय तेव्हाच हा जीवनाचा आकाशपाळणा पुन्हा नव्याने झेप घेतो आपल्या आकांक्षांच्या आकाशात. जेव्हा एकेक पाळणा वर जातो तेव्हा पुढचा पाळणा खाली येतो. आयुष्यातल्या यशापयशाचा समतोल आकाशपाळणा आपल्याला जणू शिकवत असतो. एवढंच नव्हे तर त्या पाळण्यासारखंच आपलं आयुष्यही वर्तुळाकार असतं हेही सांगतं. जमीन आणि आकाश म्हणजे वास्तव -स्वप्नं यांचं जसं प्रतीक तेच ह्या आकाशपाळण्याशी जोडलं आहे जणू.उंचावर जाताना मनोधैर्य, उद्दिष्टं, प्रयत्न हे उच्च पातळीवर असतात. ते मिळवल्यानंतर, ध्येय पूर्ण झाल्यावर वास्तवाचं भान राखायला हवं , हेच जीवनरूपी आकाशपाळणा सांगतो. एकानंतर दुसरं म्हणजेच आपली टर्न येणार आहे हे एक सत्य समजावून घेण्याचा संयम यामधूनच आपल्यापर्यंत पोचतो. 
     आपण उंचावर जाऊन कितीही पैसा, प्रतिष्ठा , मानमरातब प्राप्त केला तरी सामान्यांना कमी लेखणं चुकीचं आहे हेही नकळत मनावर बिंबवतो तो आकाशपाळणाच.पाळणा असतो झोका देणारा, खाली-वर फिरवणारा . नेहमीच सुख, आनंद, उत्साह असेल असं नाही तर चिंता, काळजी, दुःख हे देखील त्यामागून येतच असते हेच जणू तो सुचवतो. पाळण्यात बसावं, आकाशाला हात लावण्याइतकं उंच पोचावं. खरंतर हात लावून बघावा कारण स्वप्नं पाहण्यात, अनुभवण्यात मजा आहे ती निराळीच.उंचावर गेल्यावर मनातली काळजी, चिंता, दुःख, अडचणी वर आकाशात सोडून द्याव्यात आणि खाली येताना ताज्या, टवटवीत हवेच्या झुळूकीबरोबर आशा, सुख, चैतन्य, उत्साह, प्रेम सारं खाली घेऊन यावं. आयुष्याचं वर्तुळ असंच तर पूर्ण होतं असतं . कारण आकाशपाळण्यासारखं असणाऱ्या आपल्या आयुष्यात आज आपण इथे असतो तर उद्या ती जागा बदलते. त्यातूनच आपण आशा बाळगतो, संयम राखतो आणि वाट पाहतो काहीतरी चांगलं होईल आपल्याही आयुष्यात. आपल्या डोळ्यातली आकाशाची स्वप्नं नक्की साकार होतील हेच सांगतो ना वर वर अगदी उंचावर झुलत असणारा आकाशपाळणा.

डॉ  स्वाती विनय गानू 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...