शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

1401. जोडी

      त्यांचा मुलगा त्यांना सकाळपासून थोड्या थोड्या वेळाने फोन करत होता आणि आता दुपारचे दोन वाजून गेले होते, तरीही काॅन्टॅक्ट झाला नव्हता. अर्थात त्याला ह्यात फारसं काही वावगं वाटलं नव्हतं. ऑफिसच्या कामाच्या व्यापात, तसंही कुठं काय जाणवत असतं ! असाच वेळ भराभर पळत, संध्याकाळ झाली. आणि जसा सूर्य पश्चिमेला अधिकाधिक कलू लागला, त्याच्या मनातून उदास असा संधीप्रकाश दाटून येऊ लागला होता. सात वाजायला आले होते आता. त्याची ऑफिसमधून निघण्याची वेळ आली होती. पण तरीही त्याचं दिवसभरात एकदाही आई-बाबांशी बोलणं झालं नव्हतं. हे असं आत्तापर्यंत कधीच घडलं नव्हतं. आता मात्र तो चांगलाच घाबरला. त्यानं त्याच्या मोठ्या भावाला फोन लावला; पण तोही त्याच्या कामात व्यग्र होता. नेहमीप्रमाणे रात्री उशिरानं तो आई-बाबांना फोन करणार होता.  मग त्यानं बायकोला फोन लावला विचारायला, की तिला काही अंदाज आहे का? पण तीही नुकतीच ऑफिसमधून निघालेली आणि आईंच्या नी बाबांच्या ठावठिकाणाबाबत पूर्णतः अनभिज्ञ होती. तो मग तातडीनं ऑफिसातून बाहेर पडला. बायकोला पुन्हा फोन करुन त्यानं तिला डायरेक्ट आई-बाबांच्या घरीच जायला सांगितलं. ट्रेनच्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यानं ओला बुक केली आणि तो निघाला. सव्वा-दीड तासांत तो आई-बाबांच्या घरी पोहोचला. तोपर्यंत त्याची बायको येऊन, शेजारच्या काकूंकडच्या किल्लीनं दार उघडून घरीच बसलेली. त्यांच्या दोन्ही मुलांनाही, बोलावून घेतलं होतं तिनं घरून. आई-बाबा मात्र घरी नव्हते. शेजारच्या काकूंनाही काहीच कल्पना नव्हती, ते नेमके कुठे गेल्याची. आता मात्र तो कोलमडायच्याच बेतात होता. त्याची दोन्ही मुलं त्याच्याचकडे बघत बावरून बसली होती, त्यामुळं ‘बाबानं कधीच खचायचं, रडायचं नसतं’ हा बुरसट समज महत्प्रयासानं त्यानं तेवढ्यापुरता पुढं नेला. आई-बाबांना शोधायला तो घरातून बाहेर पडणारच होता. नक्की कुठे कुणास ठाऊक. पण तितक्यात त्याचा मोबाईल वाजला. तो रेल्वे पोलिसांचा फोन होता. त्यांनी तातडीनं दादरच्या स्टेशनमास्तरच्या ऑफिसात त्याला बोलावलं होतं. एव्हाना नऊ वाजून गेले होते… तो तसाच पाण्याचा घोटही न घेता, ठाण्याहून दादरसाठी निघाला. वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी शक्य होईल तेवढं धावत पळत, आत्तापर्यंत फक्त अनाऊन्समेंटमध्ये ऐकलेल्या.‘कृपया स्टेशनमास्तर के कार्यालय में पहूंचे’ मध्ये प्रत्यक्षात पोहोचला. बघतो तर त्याचे आई-बाबा दोघंही छान खुर्च्या टाकून बसलेले ! दोघांकडे बघून त्याला कम्माल हायसं वाटलं आणि तो पायातली ताकदच गेल्यासारखा, धप्प करत एका रिकाम्या खुर्चीवर ऑलमोस्ट पडलाच. तिथं उपस्थित असलेल्या एका सिनियर पोलिसानं सांगितल्याप्रमाणं त्याच्या आई-बाबांना गाडीची चेन ओढल्या प्रकरणी पकडून आणण्यात आलं होतं. हे ऐकून तर तो खुर्चीवरून कोसळायचाच बाकी होता. ज्यांनी इस्टहून वेस्टला जाण्याकरताही, कधी विदाऊट तिकिट स्टेशनचा ब्रिज वापरला नाही; अशा ह्या पापभिरु जीवांनी, चक्क ट्रेनची साखळी ओढली होती?! त्याला जाम कळेना काय चाललंय ! आई-बाबांच्या वयाकडे बघत, नुसत्या किमान दंडावर त्यांची सुटका करण्यात येत होती. तो पोलिसांचे आभार मानून, आई-बाबांना सोबत घेत बाहे पडला. टॅक्सीत तो एक शब्दही बोलला नाही दोघांशी. समोरच्या आरशातून दोनेकवेळा नजरानजर झाली त्याची बाबांशी, पण दोघांनीही लगेच टाळली होती एकमेकांची नजर. ती तिघं घरी आली, तेव्हा अकरा वाजून गेले होते. त्याची बायको भरल्या डोळ्यांनी जागेवरून उठत, त्यांच्याकडे बघू लागली. त्याची दोन्ही मुलं पळत जाऊन आजी-आजोबांना बिलगली. त्यानं आई - बाबांकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांतून दाटलेले प्रश्न, त्याच्या दोन्ही गालांवरून ओघळले मुकपणेच ! 
आईनं नेहमीप्रमाणंच त्याच्या मनात चाललेलं द्वंद्व ओळखत, त्याच्या बाबांकडे बघत, ‘बोला आता काय ते…’ असं डोळ्यांनी म्हणत, त्यांच्या गाडीला हिरवा बावटा दाखवला. अन् बाबांची गाडी हलली…
“आज मी माझं इच्छामरण नक्की करुन आलो, अरे ! डाॅक्टरांनी दोन दिवस दिले होते विचार करायला. खूप विचार करून ठरवलं आम्ही दोघांनीही आणि शेवटी सांगितलं आज जाऊन डाॅक्टरना की, वयाच्या ऐंशीव्या वर्षी मी काही केमोथेरपी घेणार नाही. वर्षभरापूर्वी डिटेक्ट झालेला माझा ‘लंग्ज कॅन्सर’, आतापावेतो गोळ्यांनी थोपवून धरला. यापुढंही गोळ्या घेऊनच त्याचा सामना करु, जमेल तसा. झेपेल तेवढा ! गोळ्यांनीही हात टेकले, की मग टेकेन म ही पाठ कायमचीच. पण केमो काही घेणार नाही. 
“हा कॅन्सर ह्या पडक्या, जुनाट बिल्डिंगमध्ये जर आलाचेय चुकून मुक्कामी, तर राहू दे की त्यालाही हवं तेवढं ! त्याला हुसकावून लावण्याच्या नादात, का उगा इमारतच जाळा? आज न् उद्या तशीही कोसळणारच आहे की ती ! 
“म्हणून मग आम्ही दोघांनीच ठरवलं की, जेवढं रेटलं जातंय तेवढं रेटायचं पण कण्हत-कुढत नाही, तर हसत, खेळत ! म्हणूनच आज डाॅक्टरांकडूनच आम्ही थेट गेलो गडकरी रंगायतनला, नाटक बघायला. वीस-पंचवीस वर्षांनी पाहिलं रे, आम्ही जोडीने नाटक ! 
“मग तलावपाळीला भेळ नी पाणीपुरी खाल्ली. कुंजविहारचा वडापाव खाल्ला दोघांत एक. येवल्यांचा अमृततुल्य चहा प्यायलो. लोकल ट्रेनने प्रवासही केला नव्हता आम्ही दोघांनी, गेल्या पंचवीस - तीस वर्षांत. सो ठरवलं की जाऊन बघूचया आज ट्रेननं. 
“मस्त CST ची दोन तिकिटं काढली नी कुठल्या स्टेशनवर उतरायचं हे न ठरवताच, बसलो ट्रेनमध्ये. माटुंग्याला तुझ्या आईनंच माझ्याशी पैज लावली. म्हणे ‘गेल्या वर्षभरात एवढे पिळपिळीत झालायत, की साखळीही ओढता येणार नाही तुमच्यानं !’. 
“मग मी ही पेटलो इरेला, नी ओढली साखळी. पण खरंच रे, नाही जमलं मला एकट्याला. मग आलीच तुझी आई नेहमीप्रमाणे मला साथ द्यायला. आम्ही दोघांनी जिवाच्या आकांताने ओरडत, साखळीला लोंबकाळून ती खेचत अखेर ट्रेन थांबवलीच ! 
“स्साला एक ऑटो कधी एका हाकेत थांबली नाही आमच्यासाठी आयुष्यात. पण आज एक अख्खी ट्रेन थांबवली आम्ही जोडीनं ! आणि जे काय अत्यानंदाने हसलोय आम्ही बघत एकमेकांकडे. एकमेकांना टाळ्या देत की काय विचारता सोय नाही. 
“मग काय, आले शिट्ट्या फुंकत पोलीस. आयुष्यात आपल्यालाही पोलीस धरुन नेतील कधी, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण साधं झुरळ मारल्यावरही, गुन्हा घडल्यासारखा चेहरा होणारे आम्ही. पण खरंच सांगतो, काकोरीला ट्रेन लुटणाऱ्या, आपल्या क्रांतिकारकांचा फिल आला बुवा ! 
“आणि मग त्या सिनियर पोलीस साहेबांनीच फोन लावला होता तुला. तू पोहोचेपर्यंत त्यांनाही सगळं खरं खरं सांगून टाकलं आम्ही. सगळं ऐकल्यावर त्यांनी विचारलं मला, ‘अजून काय टोकाची इच्छा आहे माझी?’ मी सांगितलं की. आयुष्यात एकदातरी, मोटरमनच्या केबिनमधून प्रवास करायचाय... ठाणे ते पुणे ! 
“आणि आता उद्याच आम्हाला इंटरसीटीच्या मोटरमन केबिनीत बसवून पुण्याला घेऊन जाणारेत ! मग श्रेयसमध्ये उतरू आम्ही. एक दिवस मुक्काम करू. शनिवार वाडा, सारसबाग, पर्वती करु. दुपारी एस.पी.ची बिर्याणी खाऊ, रात्री दुर्वांकुरची थाळी खाऊ. आणि परवा डेक्कन क्वीनच्या मोटरमन केबिनीत बसून परतू. 
“लग्नाची गेली बावन्न वर्ष, जे काही जगायचं म्हणून राहिलेलं. ते ‘जास्तीत जास्त’ आता, हाताशी असलेल्या ‘कमीत कमी’ महिन्यांत जगायचं ठरवलंय आम्ही…! खरंतर मी. 
“‘पण इथंही तुमची पाठ सोडणार नाही’, असं म्हणते ही ! ‘तुम्ही पुढे जाऊन जागा पकडा, मी येतेच मागोमाग’, असंही म्हणते. वेडी नाहीतर काय ! सांभाळाल ना रे तुम्ही दोघं भावंडं तुमच्या आईला? प्राणपणाने राखलंय बरं मी तिला, अन् तिनं जपलंय मला. तिला एकटीला असं मागे ठेऊन.”
त्याच्या आईनं त्याच्या बाबांच्या ओठांवर हात ठेवत, त्यांना मधेच अडवलं होतं. नी त्यांच्या केसांवरुन हात फिरवत म्हणाली,
“पाहिलंस ना. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही, कसे भरघोस केस आहेत ह्यांचे. कसे बरं दिसतील टकलू झालेले हे ! नकोच ती मेली केमो नी फेमो. आता जोडीनं जे काय महिने राहिलेयत ते जगायचं, नी जोडीनंच."
आता त्याच्या बाबांनी हात त्याच्या आईच्या ओठांवर ठेवला होता. ते दोघे एकमेकांच्या डोळ्यांत, आजूबाजूचं भान विसरून हरवले होते. तो, त्याची बायको अवाक् होऊन अवाक्षरही न काढता, सगळं ऐकत होते. पेंगुळलेल्या आपल्या लेकांना घेऊन, हळूच दार लावत ती दोघं बाहेर पडली. रिक्षात बसल्यावर दोन्ही लेकरांना मात्र कळेना की, आई तर आई. पण आज आपला बाबाही रडतोय ओक्साबोक्शी! नक्की का बरं?

-  सचिन देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...