रात्रीचे आठ वाजले होते. मी पाटिल हॉस्पिटलमध्ये ओपीडी पाहत होतो. जान्हवीचा फोन आला,
"अहो, तुमची ओपीडी संपायला अजून किती वेळ आहे? तुमच्या लेबरच्या पेशंटला थिक म्युकोनिअम निघाले आहे. NST वर फिटल हार्ट रेट पण ड्रॉप होतो आहे आणि हेड अजून बरेच वर आहे. लवकर या."
म्युकोनिअम निघाले म्हणजे बाळाने पोटात शी केली आहे. म्युकोनिअम आणि बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होणे हे बाळाला गर्भाशयात आॕक्सिजन कमी पडत असल्याची लक्षणे असतात. मी हातातील पेशंट संपवला आणि रस्ता ओलांडून पळत मधूकर हॉस्पिटल गाठले. परिस्थितीचा परत रिव्हू घेतला. बाळाची डिलिव्हरी अर्जंटली करणे गरजेचे होते.
मी जान्हवीला म्हटले, "तु अर्जंटली पाटिल मॕडमना बोलवून घे. मी नातेवाईकांशी बोलतो. हाऊसमन डॉक्टरपैकी कुणीतरी फोलिज कॕथेटर करा आणि एकाने अँटिबायोटीक द्या. सिस्टर सिझरची ट्रॉली लावा." डॉ अंजली पाटिल या आमच्या भुलतज्ञ आहेत. नातेवाईकांना परिस्थितीचे गांभिर्य समजावून सांगितले. बाळाच्या जिवाला धोका आहे म्हटल्यावर त्यांनी सिझरसाठी सह्या दिल्या. पेशंटला operation theatre मध्ये घेऊन बाकी तयारी सुरू झाली.
पुढील 10 मिनिटात सगळी तयारी झाली. तेवढयात पाटिल मॕडम आल्या. मी वॉश होण्यासाठी थिअटरच्या बाहेर पळालो. वॉश होताना मी केस रिव्हू करू लागलो.
26 वर्षाच्या सुप्रियाची ही पहिलीच प्रेग्नन्सी. पेशंट आमच्या जोशी हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट विद्याची भाची. माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे पुण्याच्या दुसऱ्या टोकावरून नऊ महिने मला दाखवायला येत. बाळदमा सोडला तर तिला दुसरा जुना कुठला आजार नव्हता. बाळदम्याचा सध्या काही त्रास नव्हता. तरीही "प्रोस्टोडिन (दम्यात न चालणारे इंजेक्शन) द्यायचे नाही" या खाली मी मनात दोनदा अंडरलाईन केली. नऊ महिन्यात तिचे वजन जरा वेगात वाढले होते. पायावर किंचित सुज होती. रक्तदाब बॉर्डरवर पण नॉर्मल होता. बाकी बाळाची वाढ चांगली होती. बाळाभोवती पाणी चांगले होते. दुसरा कुठला रिस्क फॕक्टर नव्हता. कळा पण बेताच्या होत्या. बाळाला डिस्ट्रेस का झाला असावा हे कळले नाही.
बाहेर वॉश होऊन थिएटरमध्ये आलो तर सगळे मॉनिटर कडे पाहत होते. मी पण पाहिले. मॉनिटर तिचे आॕक्सिजन सॕच्युरेशन 88% दाखवत होता. दुसरे मशीन मागवले. त्यावरही तेच. तिने हाताच्या बोटांना मेहंदी आणि नेलपॉलिश लावलेली होती. मी ती खरवडून काढली. तरी आॕक्सिजन सॕच्युरेशन तेवढेच होते. पायाच्या बोटाला पाहिले तरी तसेच.
"तुला दम लागतोय का?"
"नाही."
मी पाटिल मॕडमकडे पाहत विचारले, "अस्थमिक स्पाझम आहे?"
"नाही रे. व्हिज नाही. पण थोडे क्रेप्टस् आहेत. कोव्हिड तर नसेल?"
"या दिवासात शक्यता नाकारता येत नाही. असे बरेच असिंप्टोमॕटीक पेशंट येत आहेत. माझ्या परिचयाच्या एका पेशंटला फक्त जराशी अंगदुखी होती. सिटी स्कॕनवर न्युमोनिया स्कोर मात्र 25 पैकी 12 होता." मी बोललो.
"आली तेंव्हा आॕक्सिजन सॕच्युरेशन किती होते?" हाऊसमनकडे पाहत मी विचारले.
"96% होते." हाऊसमन डॉक्टर बोलल्या.
आता आमच्यासमोर धर्मसंकट होते. पेशंट संध्याकाळी इमर्जन्सी अॕडमिशनला आल्याने घेतलेला कोविड स्वॕब अजून फ्रिजमध्ये तसाच पडून होता. आईच्या रक्तात आॕक्सिजन कमी पडत असल्याने आत बाळाला आॕक्सिजन कमी पडत होता. त्याला ताबडतोब बाहेर काढणे आवश्यक होते. मधुकर हॉस्पिटल कोव्हिड हॉस्पिटल नाही. तेथे आॕपरेशनचे PPE किट उपलब्ध होते पण ते घालायला भरपुर वेळ लागतो. बाळाला आर्जंटली बाहेर काढणे गरजेचे असल्याने ते शक्य नव्हते. कोविड असताना PPE किट शिवाय आॕपरेशन केले तर आम्हाला पक्का कोविड होणार होता. तसेच अशा संशयीत कोविड पेशंटचे आॕपरेशन केले आणि नंतर तो वाढत गेला तर नातेवाईक सगळा दोष आमच्या आॕपरेशनवरच टाकणार. आॕपरेशन दरम्यानच काही तरी चुक झाली असा बोल लावणार. अशा अवस्थेत तिला कोविड हॉस्पिटलला पाठवायाचे जरी ठरवले तरी त्यात जो वेळ जाईल त्यात बाळ जाणार हे जवळपास नक्की होते. इकडे आड होता तर तिकडे विहिर!
असे प्रसंग आमच्यासमोर वारंवार येतात. त्याचा प्रचंड ताण येतो. आपल्या एका निर्णयावर एक जीव जगणार की मरणार हे ठरणार असते. थोडी रिस्क घेतली तर जीव वाचेल पण प्रयत्न फसला तर सगळा दोष आपल्या माथी येईल. मग नातेवाईकांना तोंड कसे देणार? आज काल मेडिको-लिगला केसेची भीतीही असते. पत्रकारांना टिआरपी वाढवणारी बातमी मिळते आणि आयुष्यभर कणाकणाने जमा केलेले रेप्युटेशन क्षणात नष्ट होण्याची भीती असते. एकीकडे पेशंटचा जीव तर दुसरीकडे आपले करिअर आणि आपला जीव. असा आवघड निर्णय घेताना विचार करायला पुरेसा वेळ घेण्याची मुभाही नसते. पटकन निर्णय घेतला नाही तर फार उशीर होतो.
"Covid or noncovid, we have to do it now. Lets do it & save this baby. We have no choice."
या सर्व प्रकारात आणखी पाच मिनिटे गेली होती. मी नातेवाईकांना परत बोलवून सर्व परिस्थिती समजावून सांगितली. सिझर नंतर आईला पाटिल हॉस्पिटलमध्ये आय सी यू ला शिप्ट करावे लागू शकते याची त्यांना कल्पना दिली. नातेवाईकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. एकीकडे करोना आणि दुसरीकडे आय सी यू च्या खर्चाचा विचार करून त्यांचे चेहरे पांढरे फटक पडले. पण आता जास्त वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. त्यांच्या समोर दुसरा काही पर्यायही नव्हता.
मी पटकन परत वॉश व्हायला गेलो. एकदम एक विचार डोक्यात चमकून गेला. हार्ट डिसिज तर नसेल? पण हार्ट डिसिज मध्ये लाँग स्टँडिंग हिस्टरी असते. अशी हिस्टरी नव्हती. तिला हृदयविकाराची कुठले लक्षणेही नव्हती. तिला प्रेग्नन्सीत कधी दम लागला नाही. मी तर प्रत्येक तपासणीला हार्ट तपासतो. हार्ट डिसिजचे वेगळे आवाज (मरमर) लगेच ऐकू आले असते. काय असेल? काय असेल? आॕक्सिजन सॕचुरेशन कमी का असेल? काय असेल?
मी वॉश होऊन आलो. पाटिल मॕमने पाठीतून भुल दिली. पेंटिग-ड्रेपिंग झाले. मी जेवढ्या लवकर होईल तितक्या लवकर बाळाला बाहेर काढले. बाळ पुर्णपणे शी मध्ये बरबटलेले होते. पटकन नाळ कापून बाळाच्या डॉक्टरांकडे बाळ सुपुर्द केले. मी गर्भाशयाच्या ब्लिडिंग एजेसला पटपट चिमटे लावले. तिकडून होणारा रक्तस्त्राव पुर्णपणे थांबवला. गर्भाशय लवकर आकुंचन पावण्यासाठी या स्टेजला मी भुलतज्ञांना पिटोसिन आणि मिथार्जीन हे दोन्ही औषधे सलाईनमध्ये एकत्रित टाकण्यासाठी आग्रहाने सांगतो. त्यामुळे वार सुटल्यावर गर्भाशयातून होणारा रक्तस्त्राव अगदीच कमी रहातो. तसे आजही सांगणार तेवढ्यात मनात शंकेची पाल परत चुकचुकली. हार्ट डिसिज असेल तर? मिथर्जिन तर तिच्यासाठी जिवघेणे ठरेल.
"आज फक्त पिटोसीन टाका मॕडम. मिथार्जीन नको. आणि तिला लॕसिक्स पण द्यावे असे मला वाटते." लॕसिक्स हे शरीरातील पाणी कमी करणारे इंजेक्शन असते. रक्ताचे व्हॉल्युम कमी झाले की हृदयावरचा लोड कमी होतो.
गर्भाशय अकुंचन पावण्याच्या आधी अधीरपणे प्लासेंटा म्हणजे वार ओढून काढला तर धो धो रक्तस्राव होतो. मला या पेशंटच्या हृदयावर वा फुफ्फुसावर कसलाही ताण वाढवायचा नव्हता. गर्भाशय अकुंचन पावून वार बाहेर पडायला बराच वेळ लागला. पण मी हात धरून शांत उभा राहिलो. तेवढ्यात बाहेरून बालरोगतज्ञ आत आल्या.
"बाळ चांगले आहे. Cried well on stimulation. 3.7 kg Female baby." जीव भांड्यात पडला.
शेवटी 12 मिनीटांनी वार बाहेर पडला. मग मी गर्भाशय शिवून घेतले. सिझर नंतर वार्डात परत गर्भाशय प्रसरण पाऊन रक्तस्राव होऊ नये म्हणून "हेमन्स कॉम्रेशन सुचर" घेऊन गर्भाशय बांधून टाकले. पुढील आॕपरेशन व्यवस्थित पार पडले.
डॉ पाटिल अतिशय निष्णात भुलतज्ञ आहेत. त्यांनी आॕपरेशन दरम्यान पुर्ण वेळ रक्तदाब वा हृद्याचे ठोके कमी अधिक होऊ दिले नाहीत. आॕक्सिजन लावल्यानंतर आॕक्सिजन सॕच्युरेशनही 94 ते 96% राहत होते. एकंदरीत डॉ पाटिलांनी पेशंटला उत्तम भुल दिली होती. जान्हवीने नेहमीप्रमाणे उत्तम रितीने आॕपरेशन ॲसिस्ट केले होते. सर्व छान पार पडले.
आॕपरेशन झाल्यावर आम्ही आॕक्सिजन बंद करून किती सॕच्युरेशन राहते हे पाहिले. ते परत 88-90% पर्यंत कमी झाले. काहीतरी गडबड आहे हे नक्की होते. आम्ही तिला पाटिल हॉस्पिटलमध्ये आय सी यु ला शिप्ट करायचा निर्णय घेतला. नातेवाईकांशी बोललो. त्यांना एकामागून एक धक्के बसत होते. आधी नॉर्मलचा प्रयत्न होता होता सिझर, मग कोविडची शक्यता आणि आता आय सी यु ॲडमिशन. तिच्या माहेरच्या लोकांनी डिलिव्हरी पुरते पैसे कसेबसे जमा केले होते. आता आय सी यु च्या खर्चाचा विचार करून ते हादरलेच. पण आमच्यासमोरही पर्याय नव्हता आणि त्यांच्यासमोरही पर्याय नव्हता. पेशंटला रात्रीतून शिप्ट केले. मी सोबतच गेलो.
घरी पोहाचायला रात्रीचे पावनेबारा झाले होते. आमच्या समोरील पंचवाघ आज्जींचा वाढदिवस होता. अल्पावधीत आमच्यात खुप जिव्हाळा निर्माण झाला होता. मी केक आणतो आणि बारा वाजता सरप्राईज केक कापू असे मी बापू आजोबांना प्रॉमीस केले होते. पण आम्हाला यायला उशीर घालेला पाहून तिकडे सामसूम झालेली होती. केक सोबत होता. पण त्यांना उठवावे की नाही हे कळेना. शेवटी वाजवली बेल.
"आलो." आतून लगेच बापूंचा ओळखीचा आवाज आला. बहुतेक जागेच होते. दोघे आमच्या घरी आले.
आधी केक कापला. मग जेवलो. मग कॉफी आणि गप्पा झाल्या. सर्वाना झोपायला पार दोन वाजले.
सकाळी उशीरा जाग आली. उठल्या उठल्या आय सी यु मध्ये फोन केला. रात्रभर ती आॕक्सिजनवर स्टेबल होती. मला सकाळी एक आॕपरेशन होते. मी फटाफट उरकून आॕपरेशनला गेलो. तिथून पाटिल हॉस्पिटलला गेलो.
लितिन पाटिल सरांनी तिला पाहिले होते. मी त्यांच्या केबीनमध्ये गेलो.
"गोपाळ, तिला एकतर कोविड किंवा पल्मनरी इडिमा आहे. मला पल्मनरी इडिमाच वाटतोय. HRCT, CTPA, 2D Echo, कोविड आणि कोविड लॕब करावी लागेल."
तिला फुफ्फुसाचा आणि फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांचा सिटी स्कॕन आणि हृदयाची सोनोग्राफी करावी लागणार होती. मी मनात बेरीज करायला लागलो. सर्व मिळून तपासण्यांचाच खर्च विस हजाराच्या वर जाणार होता. पण पर्याय नव्हता.
"आपण तपासण्या करून घेऊ सर."
"OK. मी कार्डिओलॉगिस्ट ईश्वर झवर सरांशी बोलतो. ते येऊन इको करतील."
तोपर्यंत माझ्या IVF ओपीडीला पेशंट आले होते. मी तिकडे जाऊन पेशंट पाहू लागलो. थोड्या वेळाने दोन पेशंटच्या मध्ये पेशंटचा भाऊ आणि पाटिल हॉस्पिटलचे हाऊसमन डॉक्टर आत आले.
"सर, HRCT आणि CTPA ला सतरा हजार लागणार आहेत. नातेवाईकांजवळ पैसे नाहीत. फक्त HRCT करून घेऊ का?"
"पण पाटिल सरांनी दोन्ही तपासणी सांगितल्या आहेत. निदानच झाले नाही तर उपचार कसे करणार." असे म्हणत मी व्हॉलेट बाहेर काढले. पँटच्या खिशात कालच्या एका आॕपरेशनचे पैसेही होते. सगळे मिळून सतरा हजार झाले. तिच्या भावासमोर मी पैसे धरले.
"नको नको सर, तुम्ही पैसे नका देऊ. मी कुठूनतरी व्यवस्था करतो. मला उद्यापर्यंतचा वेळ द्या." भावाला गहिवरून आले होते.
"अरे, तपासण्या वेळेत होणे गरजेचे आहे. आता फार विचार करू नकोस. घरच्या कुणाला काही बोलू नकोस. आधी तपासण्या करून घे. नंतर बघू."
तो नाही नाही म्हणत असताना मी जबरदस्ती त्याच्या हातात पैसे दिले आणि मी पुढील पेशंट पाहण्यात परत गढून गेलो.
दुपारी मी जेवायला घरी आल्यावर मला पाटिल सरांचा फोन आला.
"गोपाळ, सिटी वर त्यांना कोव्हिड आणि पल्मनरी इडिमा यात फार डिफरंशीट करता येत नाहीये. आपण कोव्हिड पण पाठवलय. इकोसाठी पण डॉ ईश्वर येत आहेत. बघू."
थोड्या वेळाने मला पाटिल हॉस्पिटल आय सी यु मधून फोन आला.
"सर, डॉ ईश्वर सर बोलतील...(थोड्या शांततेनंतर)...Dr Gopal Dr Ishwar here. I did her Echo. She has congenitally corrected transposition of great vessels. A very rare condition! 1 in 25000 births. Right & left ventricals have exchanged their positions. Right ventrical is weak ventrical. In her, it pumps blood in high pressure systemic circulation. Right ventrical some how managed till date. But it has finally failed due to combined stress of pregnancy & labour. She is lucky to servive this delivery. I have started her on inj lasix. With fluid depletion she should settle down."
"बाप रे!" मी इतकेच बोलू शकलो. क्षणात मला सर्व देव आठवले.
प्रेग्नन्सीमध्ये आईच्या हृदयाला दोन जिवांसाठी रक्त पंप करावे लागते. गरजेप्रमाने शुद्ध रक्त पुरवण्यात अयशस्वी ठरलेले की हृदय फेल झाले असे आम्ही म्हणतो.
हृदयाचे वरचे दोन कप्पे शरीराकडून रक्त जमा करतात आणि खालच्या दोन कप्प्यांकडे पाठवतात. खालचे कप्पे रक्त शरीराकडे पंपिंगचे काम करतात. हृदयाचा खालचा डावा कप्पा (लेफ्ट व्हेंट्रिकल) अतिशय मजबुत असतो. तो फुफ्फुस सोडून सर्व शरीराला महाधमणी(एओर्टा)तून रक्त पंप करतो. हृदयाचा खालचा उजवा कप्पा (राईट व्हेंट्रिकल) कमी मजबुत असतो. कारण त्याला फक्त फुफ्फुसाला रक्त पंप करायचे असते.
गावाकडील भाषेत सांगायचे झाले तर लेफ्ट व्हेंट्रिकल दहा हॉर्सपावरची मोटार आहे आणि राईट व्हेंट्रिकल पाच हॉर्सपावरची मोटार आहे. हृदयाच्या डाव्या बाजुला जास्त शेत(संपुर्ण शरीर) भिजवायला लागत असल्याने तिथे दहा हॉर्सपावरची मोटारच लागते. कमी शेत (फुफ्फुसे) भिजवायला पाच हॉर्सपावरची मोटार पुरते. या पेशंटमध्ये मात्र जन्मतः या मोटारींची अदलाबदली झालेली होती. निसर्गाकडून चुकून फुफ्फुसाला दहा हॉर्सपावरची मोटार आणि इतर शरीराला पाच हॉर्सपावरची मोटार जोडली होती. पाच हॉर्सपॉवरच्या मोटारीनी आजवर कसेबसे रान भिजवले होते. पण आता प्रेग्नसीत बाळाचे शेत भिजवायची वाढीव जबाबदारी तिच्या अंगावर पडली. ती सुद्धा तिने कशीबशी पार पाडली होती. पण कळा सुरू झाल्यावर रक्तदाब कमी आधिक होतो. तसेच गर्भाशयाच्या स्नायूंचा व्यायाम चालू झाल्याने त्यालाही जास्त रक्त लागते. डिलिव्हरीच्या कळांमधील हा वाढीव लोड मात्र पाचच्या मोटारीला पेलवला नाही. आता आॕक्सिजनयुक्त रक्ताने अपेक्षित रान भिजवायला ती कमी पडू लागली. तिच्या शरीरात आॕक्सिजन कमी पडू लागला. बाळालाही आॕक्सिजन कमी पडल्याने त्याचे ठोकेही कमी झाले आणि त्यामुळेच बाळाने पोटात शी पण केली होती. इतर वेळी हा आजार सहसा कुठली लक्षणे दाखवत नाही. पण हार्ट वर अती ताण पडला की ते फेल होते.
संध्याकाळी पेशंटचे रक्ताचे रिपोर्ट आल्यावर पाटिल सरांशी परत बोलणे झाले. तिचा डि डायमर(D Dimer) चा रिपोर्ट 10 पटींनी जास्त आला होता. तो कोविडमध्ये वाढत असल्याने कोविडची शक्यताही नाकारता येत नव्हती. हार्ट डिसिज आणि कोविड एकत्र असतील तर तो डेडली काँबो झाला असता. कोविडचा रिपोर्ट अजून आला नव्हता.
त्या दिवशी आॕपरेशन थिएटर मध्ये हजर असणाऱ्या सर्वांना कोविडच्या रिपोर्टची काळजी लागली होती. आॕपरेशन दरम्यान आम्हीला कुणालाही PPE किट घालता आले नव्हते. संध्याकाळी उशीरा तिचा कोविडचा रिपोर्ट आला. निगेटीव्ह होता. सर्वांना हायसे वाटले.
आता तीन दिवसात ती ब-यापैकी रिकव्हर झाली. पेशंटची आर्थिक परिस्थिती पाहून पाटिल सरांनी तिला बिलात मोठा डिस्काउंट दिला. तिला मधूकर हॉस्पिटलमध्ये बाळाकडे शिप्ट केले. दोन दिवसांनी ती आता पुर्ण बरी झाली. इकडेही बिलात तिला भरपुर डिस्काउंट दिला. मी दिलेले 17 हजार तर मी विसरून गेलो होतो. पेशंट वाचली हिच माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट होती.
या केसमध्ये आम्ही पैशाचा विचार केला नाही. ती बरी झाली पाहिजे हा एकच हट्ट केला. देवाने आमचे मागणे ऐकले याचाच प्रचंड आनंद होता. डिसचार्जच्या दिवशी नातेवाईक बिल भरून माझ्यासाठी थांबले होते. मला त्याची कल्पनाच नव्हती. त्या दुपारी मी मधूकरला वर घरात होतो. संध्याकाळी मी ओपीडीला जायला निघालो तर तिचा भाऊ मला मधुकरच्या बाहेर भेटला.
"सर. एकदा वर तिच्याकडे चला ना?"
"हो. चल की." आम्ही वर आलो.
"कशी आहेस गं? वर जाऊन भोज्याला शिवून परत आलीस. नशीबवान आहेस तु!"
"डॉक्टर तुमचे खुप खुप आभार! माझ्या बहिणीचा जीव वाचवलात तुम्ही!" भाऊ बोलला.
"करता करवता परमेश्वर! आपण केवळ निमित्त!"
भावाने मिठाईचा बॉक्स पुढे धरला. बॉक्स हातात घेताना बॉक्स खाली काही तरी आहे असे जाणवले. भावाने काहीतरी अरेंजमेंट करून तपासणीसाठी दिलेले सतरा हजार बॉक्स खाली धरलेले होते.
"घ्या सर. प्लिज घ्या. तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही." त्याला अगदी गहीवरून आले होते.
मी त्या पैशाचा विचार सोडून दिला होता. पण आता मी पैसे घेतले नसते तर त्याच्या आत्मसन्मानाला आयुष्यभरासाठी ठेच लागली असती. मी बॉक्स आणि पैसे घेतले. त्यातील पाच हजार काढून बाळाच्या हातात ठेवले आणि तेथून बाहेर पडलो. मन अगदी हलके झाले होते.
पाटिल हॉस्पिटलमधील संध्याकाळच्या ओपीडीला जाण्यासाठी गाडीत बसलो. यल्लपाने गाडी सुरू केली. बाहेर दुकानांमधील झगमगटात दिवाळीच्या खरेदीची लगबघ चालू होती. खिडकीतून बाहेत पाहताना दृष्टी परत शुन्यात गेली आणि परत सगळा घटनाक्रम एका पुढे एक डोळ्यांसमोर समोर आला.
या सगळ्या घटनाक्रमात देवाने आम्हाला वेळो वेळी सुबुद्धी दिली. त्यामुळे घेतलेले वैद्यकीय निर्णय आई आणि बाळाच्या जिवासाठी वरदान ठरले होते.
1) पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे करोनाची भीती न बाळगता तिला पुढे पाठवण्याऐवजी पटकन तिचे सिझर केले म्हणून बाळ वाचले.
2) निष्णात भुलतज्ञ डॉ अंजली पाटिलांनी आॕपरेशन दरम्यान पुर्णवेळ पेशंटचा रक्तदाब आणि हार्ट रेट स्थिर ठेवल्याने हृदयावर आणखी ताण वाढला नाही.
3) बाळाच्या डिलिव्हरी नंतर रक्तस्राव टाळण्यासाठी नेहमी दिले जाणारे मिथार्जिन हे इंजेक्शन हृदयविकारात जिवघेणे ठरते. हृदयविकारचे निदान झालेले नसतानाही हे इंजेक्शन न देण्याची बुद्धी आम्हाला झाली.
4) डिलिव्हरीनंतर लगेच हृदय फेल होण्याची दाट शक्यता असते. नेमके त्याच वेळी तिला लॕसिक्स हे औषध दिल्याने ते टळले होते.
5) तिला लगेच डॉ पाटिल सरांच्या देखरेखीखाली पाठवण्याचा निर्णय अतिशय योग्य ठरला होता. त्यांनी आय सी यु मध्ये केलेल्या उपचारांमुळेच ती वाचली. तेथे हृदयरोगतज्ञ डॉ ईश्वर झवर यांनी हृदयाच्या अगदी रेअर आजाराचे अचुक निदान केल्यामुळे पुढील उपचार आणखी सोपे झाले.
सुप्रिया या सर्व प्रसंगातून वाचली व आज घरी गेली. तिच्या वाचण्यामध्ये आम्हा सर्व डॉक्टरांचा किती रोल आहे हे माहित नाही. पण दैवी हस्तक्षेप नक्की असावा अशी माझी समजूत आहे. अशा काही केसेस रोलर कोस्टर राईड देत आयुष्यभरासाठी आठवणी मागे ठेवतात. जगणे समृद्ध करतात.
डॉ गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टीलिटी सेंटर
पाटिल हॉस्पिटल
पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा