Mom's Luv वर या आठवड्याचा 'आईची साडी' हा विषय बघून थोडा वेळ क्षिप्राला काही सुचेना. क्षिप्रा , मॉम्स लव्हची आघाडीची लेखिका ! घर, नोकरी सांभाळून तिने लिखाण सुरू केलं आणि अल्पावधीतच लोकप्रियही झाली. कसं सुचतं गं तुला ह्या प्रश्नावर ती नेहमीच म्हणायची, आपोआप. कुठेतरी खोलवर रुजलेलं, मनातलं,अचानक लेखणीतून उतरतं असं तिला वाटायचं पण जे रुजलं नाही त्याचं काय?
क्षिप्राला मातृसुख फारसं मिळालं नाही म्हणजे तिला आई आजारीच आठवते. जेमतेम पाच वर्षांची असतांना क्षिप्राची आई वारली. बाबा, आजी आणि दादा ह्यांनी तिची फुलासारखी काळजी घेतली. मोठा भाऊ तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा. त्यामुळे क्षिप्राला पदोपदी त्याची मदत झाली. आजीही थकल्यावर ,नाही म्हणायला जरा लवकरच दादाचं लग्न ठरवण्यात आलं आणि राधिका वहिनी घरात आणण्याचं ठरलं.
राधिका वहिनी कशी असेल या excitement पेक्षा आईविना वाढलेली पोर म्हणून लाडावलेल्या क्षिप्राला घरात 'तिसरी' व्यक्ती येणार , तीही दादाजवळ ह्याचं जास्त टेन्शन होतं.
दादाच्या लग्नाचा बस्ता खरेदीला गेल्यावर पहिल्यांदाच ती राधिकाशी नीटसं बोलली. शालू घेत असताना राधिकाने आवर्जून क्षिप्राचं मत घेतलं आणि क्षिप्राला बरं वाटलं. राधिकाच्या साड्या घेऊन झाल्यावर तिने क्षिप्राला साडी घेण्याचा आग्रह केला. माझ्या पार्लरवाल्या मुलीला मी तुलाही साडी नेसव म्हणून आधीच सांगितलंय असंही ती म्हणाली मग क्षिप्रा तयार झाली. खूप साड्या पाहिल्या क्षिप्राने पण एकही तिला आवडेना. क्षिप्रा नाराज होऊन म्हणाली, "वहिनी, तू घेतलेली जांभळी साडी आहे ना, तशी बघ ना गं, कुठला प्रकार आहे तो?"
राधिकाने त्याच क्षणी ती साडी तिच्या पिशवीतून काढून क्षिप्राच्या हाती दिली आणि तिला म्हणाली, "अगं हीच राहू दे की मग तुला. मला ती मोरपंखी आवडली आहे, मी ती घेते." क्षिप्रा थोडी ओशाळली आणि म्हणाली, "नको गं, तू तुझ्या शकुनाच्या पाच साड्यांमध्ये घेतली आहेस ती. तुलाच राहू दे. मी काय लेहेंगा पण घेऊ शकते."
राधिका तिचा हात हातात घेऊन म्हणाली,"क्षिप्रा, तू आणि मी वेगळे नाही. एकमेकींची सुख दुःख आता कायम वाटून घेणार आहोत मग साडी तर किती छोटी गोष्ट आहे. आईची जागा कदाचित नाही घेऊ शकणार मी पण आईच्या प्रेमाचा उसवलेला धागा परत शिवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुझ्या दादाच्या मनात शिरण्याचा सोप्पा मार्ग मला या साडीतून मिळेल बरं का! मग नेसशील ना हीच साडी?" असं म्हणत तिने दादाकडे बघत डोळेही मिचकवले.
क्षिप्राला काय बोलावे सुचत नव्हते पण उशिरा का होईना आईची साडी आणि मायेचा पदर मिळाल्याचा आनंद तिच्या डोळ्यातून ओसंडत होता.
आजी आणि बाबाही भरल्या डोळ्यांनी हा कौतुक सोहळा बघत होते आणि दादाच्या खांद्यावर हात ठेवून बाबा म्हणाले, "आईची साडी प्रत्येक लेकीसाठी प्राणप्रिय असते मला माहित होतं पण वहिनीची साडी देखील अनमोल ठरू शकते हे मी आज पाहिलं. साडी हा एक कपडा नसून त्यात स्त्रीचं समर्पण सामावलं असतं , ते योग्य वेळी दिलं की साडीचा पदर नव्हे तर सारं आयुष्य जरतारी होतं. राधिका, तुझ्यासारखी सून मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे."
क्षिप्राच्या डोळ्यासमोरून हा प्रसंग आणि त्यानंतर वहिनीने दिलेली प्रत्येक साडी ,प्रत्येक सुख झरझर जात होतं. आज बाबाही नाहीत पण माहेर अजून ओढ लावणारंच आहे ते वहिनीमुळे. आईच्या साडीचे उसवलेले धागे वहिनीने कुशल कारागिराप्रमाणे हळुवार नाजूकपणे पूर्ववत केले ह्याची जाणीव असल्याने तिने आईच्या साडी ऐवजी वहिनीच्या साडीवर 'विजेता ब्लॉग' लिहिला !
©️®️डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर
#रक्षाबंधन
आईची जागा कोणी घेऊ शकत नसलं तरी आपली वहिनी कळतनकळत आपल्याला आईची ममता देते, हा ब्लॉग त्या सगळ्या वहिन्यांना समर्पित कारण त्यांचा कुठला स्पेशल डे नसतो ना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा