शनिवार, २५ जुलै, २०२६

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏
असं म्हणत सईने हातातली भाजीची टोपली अलगद खाली ठेवली. मी सकाळपासून सतत कामात होते. डोकं प्रचंड दुखत होतं, पण तिचं बोलणं ऐकून मी फक्त हलकंसं हसले. 😊
"किती जण येणार आहेत गं?" मी शांतपणे विचारलं.
"फक्त...सात-आठ जण असतील आणि शक्य असेल तर...तुमचं स्पेशल पनीर, दहीवडे आणि गुलाबजामही करा ना." 😇
मी तिच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर उत्साह होता, पण डोळ्यांत भीतीही दिसत होती. कदाचित मी नकार देईन अशी तिला भीती वाटत होती. पण मी नकार तरी कसा देणार?
सई माझी फक्त नणंद नव्हती. ती माझ्या लहान बहिणीसारखी होती. ❤️
लग्न होऊन मी या घरात आले तेव्हा सगळ्यात आधी तीच माझ्या खोलीत आली होती आणि म्हणाली होती.
"वहिनी, घाबरू नका... मी आहे ना तुमच्या टीममध्ये !" 🤝
तिचं ते वाक्य आजही माझ्या मनात ताजं होतं.
मी हसून म्हणाले, "ठीक आहे... तू अजिबात काळजी करू नको." 😊
हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून माझा सगळा थकवा विसरला.
🏡 घरात गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणी सुरू होत्या. बाबांची नोकरी गेली होती. मोठे दादा बाहेरगावी होते. माझा नवरा अमोल याच्या पगारावरच कसंबसं घर चालत होतं. महिन्याच्या शेवटी अनेकदा स्वतःच्या छोट्या-छोट्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागत होत्या. पण घरच्यांना कधी त्याची जाणीव होऊ दिली नाही. सई कॉलेजमध्ये शिकत होती. तिचं जग अजूनही स्वप्नं, मैत्रिणी आणि कॉलेजपुरतंच मर्यादित होतं. घरच्या अडचणी तिला माहिती होत्या, पण त्यांची तीव्रता कदाचित अजून जाणवली नव्हती.
आणि खरं सांगायचं तर... मीही तिला कधी जाणवू दिलं नव्हतं. ❤️
त्या दिवशी सकाळपासून मी सतत स्वयंपाकात गुंतले होते. दहीवडे, पनीरची भाजी, पुलाव, गुलाबजाम... सगळं प्रेमाने बनवत होते. 🍲🍛🍮
स्वयंपाकघराच्या उष्णतेने चेहरा लाल झाला होता. हात भाजले होते. पण मनात एकच विचार होता.
"सईला तिच्या मित्रांसमोर कधीही लाज वाटायला नको." ❤️
सायंकाळी संपूर्ण घर सुगंधाने भरून गेलं.
सई अधूनमधून स्वयंपाकघरात डोकावून विचारत होती.
"वहिनी... सगळं वेळेत होईल ना?"
आणि मी प्रत्येक वेळी हसून म्हणत होते.
"तू फक्त तयार हो." 😊
थोड्याच वेळात तिचे मित्र-मैत्रिणी आले. घरात हशा आणि गप्पा रंगल्या.
मी मात्र स्वयंपाकघरातच होते.
तेवढ्यात बाहेरून एका मुलीचा आवाज आला.
😏 "सई, तुमचं घर खूप साधं आहे गं... मला वाटलं होतं खूप मॉडर्न असेल."
दुसरी म्हणाली.
"आणि हा जुना सोफा... किती जुनाट दिसतो."
मी शांतपणे सगळं ऐकत होते.
सईचा आवाज मात्र थोडा मंदावला.
पण जेव्हा जेवण वाढलं.
पहिला घास तोंडात टाकताच सगळ्यांचे चेहरे बदलले. 😍
"अरे वा! इतकं अप्रतिम जेवण तर हॉटेलमध्येही मिळत नाही!" 🍽️
एक मुलगी म्हणाली—
"सई, हे तुझ्या आईने केलंय का?"
सई काही क्षण शांत राहिली...
तिने माझ्याकडे पाहिलं.
मी स्वयंपाकघराच्या दारात उभी होते.
ती हसली आणि म्हणाली—
"नाही... माझ्या वहिनीने बनवलं आहे." ❤️
सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या.
एक मुलगी आश्चर्याने म्हणाली—
"एवढं सगळं... एकटीने?"
सई अभिमानाने म्हणाली.
"हो... माझ्या वहिनी या या घराच्या सुपरवुमन आहेत." 🥹❤️
हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं.
पण तेवढ्यात एक मुलगा हसत म्हणाला—
😂 "छान आहे... लग्नानंतर तुला स्वयंपाकाची काळजीच नाही. वहिनी आहेत ना!"
सगळे हसू लागले.
पण...
यावेळी सई हसली नाही.
ती गंभीर आवाजात म्हणाली—
"नाही. माझ्या वहिनी मशीन नाहीत. तुम्ही आज जे खात आहात, त्यामागे त्यांची दिवसभराची मेहनत आहे. त्या सकाळपासून एक मिनिटही बसल्या नाहीत. आणि खरं सांगायचं तर हे घर जर कोणाच्या कष्टाने टिकून आहे, तर ते माझ्या वहिनीमुळे." ❤️
क्षणात संपूर्ण खोली शांत झाली.
पहिल्यांदाच मला तिच्या डोळ्यांत माझ्याविषयी इतका आदर दिसला. 🥹
त्या रात्री सगळे गेल्यावर मी भांडी आवरत होते.
अचानक कुणीतरी माझा हात धरला.
मी मागे वळून पाहिलं...
सई उभी होती.
तिचे डोळे पाणावले होते. 😢
"वहिनी... माफ करा."
मी आश्चर्याने विचारलं,
"कशासाठी गं?"
ती रडत म्हणाली,
"मी नेहमी माझ्याच जगात रमले. तुम्ही या घरासाठी किती करता, हे कधी समजलंच नाही. आज माझ्या मित्रांनी घराची थट्टा केली तेव्हा जाणवलं. घर महागड्या सोफ्यांनी नाही तर आपल्या माणसांच्या प्रेमाने आणि कष्टाने उभं राहतं." ❤️
माझेही डोळे भरून आले. मी तिचे गाल हातात घेत म्हणाले.
"अगं वेडाबाई... नात्यांमध्ये कधी हिशोब नसतो." 🤗
पण त्या दिवसानंतर सई खरंच बदलली.
🌅 दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले.
तर स्वयंपाकघर आधीच स्वच्छ होतं.
गॅसवर चहा उकळत होता. ☕
आणि सई ऍप्रन घालून पोळ्या लाटत होती. 🫓
मला पाहून ती हसली आणि म्हणाली.
"वहिनी... आज तुम्ही फक्त बसा. आज सुट्टी तुमची." ❤️
मी हसत विचारलं,
"तू पोळ्या करणार?"
ती मिश्कीलपणे म्हणाली—
"खराब झाल्या तर प्रेमाने खा... शेवटी मी तुमची लहान बहीण आहे ना!" 😄
त्या दिवशी आम्ही दोघींनी मिळून नाश्ता केला.
काम करताना हसलो, गप्पा मारल्या...
आणि मला जाणवलं—
❤️ नाती एका दिवसात बदलत नाहीत.
कधी-कधी फक्त एक जाणीव पुरेशी असते. 
एखाद्याला कायमचं आपलंसं करण्यासाठी. 🌸
त्या दिवसानंतर सई जेव्हा जेव्हा माहेरी यायची.
सगळ्यात आधी स्वयंपाकघरात यायची. 🏡
कधी भाजी चिरायची... 🥕
कधी चहा करायची... ☕
कधी माझ्यासोबत उशिरापर्यंत गप्पा मारायची. 😊
आणि प्रत्येक वेळी जाताना एकच वाक्य आवर्जून म्हणायची—
❤️ "वहिनी... तुम्ही फक्त या घराच्या सून नाही... या घराचा श्वास  आहात." 🥹🌺 
तुमच्या घरातही अशी वाहिनी किंवा नणंद आहे का ??

- ज्योती निंबाळकर



3099. एका वारकर्‍याची श्रीमंती..

     नोकरी निमित्त फिरतीवर असायचो. तेव्हा कंपनीच्या गाडीने महाराष्ट्राच्या आंतर भागात फिरण्याचा योग यायचा. असाच एकदा सोलापूर -जत मार्गे  कोल्हापूरकडे येत होतो. आषाढी एकादशी संपून 5 -6 दिवस झालेले होते. वारकरी मंडळी आपापल्या मार्गानी घरी परतत होती. सकाळी  सोलापूरहून लवकर निघालो होतो. सांगोला सोडलं होतं. 
भूक लागलेली होती. बरोबर दोघे assistant होते. त्यांनी सुचवलं एखाद्या ढाबा वजा टपरीवर नाष्टा-चहा चांगला मिळेल. 
9.30 चा सुमार मंडळींनी गाडी एका ढाबा वजा टपरी जवळ थांबवली. उतरलो पाय मोकळे केले आणि नाष्ट्याला काय विचारपूस केली. कांदे पोहे, उसळ पाव आणि चहा काॅफी अशी ऑर्डर दिली. 20 - 25 मिनिटे लागणार होती. ऊन खात उभे होतो. 
तेव्हढ्यात एक  60 - 65 वयाचं वारकरी जोडपं चालत चालत आमच्याच टपरी पर्यंत आलं. अंगावरचा एकही कपडा धड नाही. बाईंच्या डोक्यावर तुळस आणि खाकेत एक बोचकं. बाबांच्या डोकीवर एक बोचकं नी खांद्यावर एक भली मोठी पिशवी. पायताणं यथा तथाच बरीच दमलेली वाटत होती. टपरीच्याच बाजूला सारं सामान उतरवून ठेवत वाईच जमिनीवरच बसले. 
मी आपलं सहज कौतुकाने विचारपूस केली. मंडळी वारी वरूनच परतत होती. मी विचारलं नाष्टा करणार का? बाबांनी एकदा बाईकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. मी सहज सुचवलं बाबांनो पोटभर खाऊन घ्या. मला उगीचच वाटलं चला तेव्हढच पूण्य. 
मी बाबांना विचारलं वाटेत चालता चालता काय करता. ते म्हणाले कधी अभंग तर कधी पाडुरंगाचं नाव घेत जातो. म्हनजे अंतर कसं पार झालं उमगत नाय. मी आपली विनंती केली की एखादा अभंग ऐकवाल का ? 
बाबांनी क्षणाचा विलंब न लावता अभंगाला सुरुवात केली आणि बाईंनी टाळावर साथ दिली. खरंच वेळ कसा गेला समजलंच नाही. नाष्ट्यावर ताव मारला. त्या वारकरी जोडप्याला आग्रहानी आमच्या बरोबर बसवलं. सहज चौकशी केली की अजून यांना घरी पोहचायला किती दिवस लागतील ? तर कळले की अजून  4 - 5 दिवस. 
निरोप घेण्याची वेळ आली. आम्ही त्यांचे आणि त्यांनी आमचे आभार मानायचे सोपस्कार पार पडल्यावर निघालो. 
सहज मनात आले की यांना घरी पोचायला अजून 4 - 5 दिवस आहेत त्यांना काहीतरी मदत करूया. वारकरी बाबा आणि बाईंना थांबवलं आणि 100 रूपयांची नोट त्यांना मदत म्हणून पुढे केली. बाबांनी अदबीने मदत नाकारली. मला आश्चर्य वाटले. मला न राहवून मी विचारले का?
बाबांनी उत्तर दिलं - 
वारीला निघताना घरून एक छदाम घेतला नाही. आत्ता या क्षणालाबी खिशात छदाम नाही. पूर्ण वारी तो पांडुरंगच आम्हा जिवांची काळजी घेतो की त्यापुढे दादा तुमची ही 100 रूपयांची नोट आमच्या काय हो कामाची. 
मी अवाक झालो. क्षणभर काय react व्हावं मला सुधरंत नव्हतं. केवळ सुन्न. क्षणात मला माझी लायकी समजली, डोळ्यातून खळ्ळं आसू आले आणि मी त्या माउलीच्या पायावर डोकं ठेवलं. 
सुमारे 30 वर्षांनंतर..आज जवळपास 30 वर्षांनी ही घटना आठवली आणि सारा क्रम आणि संवादातील शब्द नी शब्द परत ताजे तवाने होउनी डोळ्यासमोर फिरू लागले. 
त्या वारकरी बाबा आणि बाईंच वय आज माझं होतं. आज माझ्याकडे सगळं आहे. घर, गाडी, उर्वरित आयुष्य बर्‍या पैकी सुखांत पार पडेल एव्हडी व्यवस्था. तरीही मला उद्याची निश्चिंती नक्कीच नाही पण मग त्या वारकरी बाबांना अंगावर धड कपडे नाहीत, धड अंथरूण पांघरूण बरोबर नाही. वेळ पडली तरी खिशात छदाम नाही. 
असं असून सुद्धा एक emergency साठी म्हणून मी पुढे केलेले 100 रुपये सुद्धा हा भला माणूस अव्हेरतो आणि प्रंचंड आत्मविश्वासानी सांगतो माझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाची काळजी तो पांडुरंगच करेल. 
त्याला आयुष्यात कसलीही पुंजी  करून ठेवावं असं नाहीं वाटलं कारणं त्याने जमवली होती पांडुरंगाच्या श्रद्धेची पुंजी होती. त्यामुळे त्याला ना उद्याची भ्रांत ना आयुष्याची चिंता. 
ती त्याची श्रीमंती पाहीली आणि नजर स्वतःकडे वळली.
 त्यानी शाश्वत श्रद्धेची नी भक्तीची पुंजी जमवली आणि मी अशाश्वत पुंजी जमवण्यात धन्यता मानत राहिलो
हे परमेश्वरा अजूनही वेळ गेलेली नाही. त्या वारकर्‍याची श्रद्धा आणि भक्ती मला सुद्धा जमवता यावी अशी बुद्धी मला दे, हीच कळकळीची प्रार्थना तुझ्या चरणी... 




3098. सर्वात मोठा हुंडा

 लग्नानंतर जेव्हा मुलगा आपल्या नवरीसह घरी पोहोचला, तेव्हा नातेवाईक आणि मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला, "काय रे, हुंड्यात काय मिळालं?"
क्षणभर मुलगा शांत राहिला. त्याच वेळी त्याच्या नवरीच्या डोळ्यातील अश्रू आणि माहेर सोडताना तिच्या मनातील वेदना त्याला दिसल्या. ते पाहून तो हळूच म्हणाला.
"आज मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस झालो आहे. कारण मला हुंड्यात पैसे, दागिने किंवा मालमत्ता मिळाली नाही...तर एका आई-वडिलांनी त्यांच्या काळजाचा तुकडा माझ्या स्वाधीन केला आहे."
ज्या मुलीला त्यांनी लहानपणापासून जपलं, प्रेम दिलं, शिक्षण दिलं, तिच्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या... ती मुलगी आज माझ्या घरी आली आहे. यापेक्षा मोठा विश्वास आणि यापेक्षा मोठी भेट कोणती असू शकते?
एका वडिलांनी आपला अभिमान दिला, एका आईने तिच्या मायेचा अंश दिला, भावाने त्याची लाडकी बहीण दिली, बहिणीने तिची जिवाभावाची मैत्रीण दिली. एका घराने त्यांचा आनंद, त्यांचे हास्य आणि त्यांचा जीव की प्राण असलेली मुलगी माझ्यावर विश्वास ठेवून दिली.
खरं तर मुलगी ही कोणती वस्तू नाही की तिच्यासोबत हुंड्याची तुलना व्हावी. ती एक संस्कारांची शिदोरी असते, प्रेमाचा सागर असते आणि दोन कुटुंबांना जोडणारा सुंदर दुवा असते.
आजही अनेक ठिकाणी हुंड्याच्या नावाखाली मुलीच्या आई-वडिलांवर अन्याय केला जातो. पण खरा पुरुष तोच, जो हुंडा नाही तर मुलीचा सन्मान स्वीकारतो. कारण पैशांची किंमत काळानुसार कमी-जास्त होते, पण एका मुलीचा विश्वास, तिचं प्रेम आणि तिचा त्याग यांची किंमत कधीच मोजता येत नाही.
मनापासून सलाम त्या प्रत्येक मुलाला, जो लग्नाला व्यवहार नाही तर दोन मनांचा आणि दोन कुटुंबांचा पवित्र संबंध मानतो. ❤️🙏
कारण जगातील सर्वात मोठा हुंडा म्हणजे पैसा नव्हे तर आई-वडिलांनी विश्वासाने दिलेली त्यांची लाडकी मुलगी असते. 💖🥺🌸

3097. पित्याचं सुख हेच तिचं ध्येय

       ती मेडिकलला शिकत होती. तिचा लहान भाऊ शाळेत जात होता. त्यांचं चौकोनी कुटुंब अशा महत्त्वाच्या वळणावर असतानाच काही कारणाने अकस्मात तिच्या वडिलांची नोकरी गेली. 
एके दिवशी ती नेहमीप्रमाणे काॅलेजला जाऊन घरी परत आली. घरी आल्यावर ती दारात सॅंडल काढत असतानाच तिला दिसलं की तिचे लाडके बाबा शून्य नजरेने आढ्याकडे बघत पलंगावर पडले होते आणि आई कोपऱ्यात बसून पदराने डोळे पुसत होती. आईने तिला गहिवरल्या आवाजात सांगितले की बाबांची नोकरी गेली. पण ती खचली नाही. ती खंबीरपणे बाबांच्या शेजारी बसली. त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली, 
"बाबा, आजपर्यंत तुम्ही मला जीवापाड सांभाळले. आता माझी पाळी आली आहे. मी दिवसरात्र एक करुन शिक्षण घेत तुम्हाला आधार देईन. माझं शिक्षण पूर्ण करुन मी खूप पैसे कमवून तुम्हाला सुखात ठेवीन. तुम्ही काळजी करु नका बाबा." आपल्या कोवळ्या मुलीचं असं परिपक्व बोलणं ऐकून तिच्या बाबांना अक्षरशः गलबलून आलं. ते म्हणाले,
"कुठे शिकलीस गं पोरी असं मोठ्या माणसासारखं बोलणं? " 
ती म्हणाली, " तुमचेच संस्कार आहेत बाबा. ही तुमचीच शिकवण आहे आणि परिस्थितीसुद्धा माणसाला खूप काही शिकवत असते. "
     मुलीच्या दिलासा देणाऱ्या बोलण्याने बाबांना एक नवी उमेद मिळाली. ते पलंगावरुन उठून पायांत चपला सरकवून दुसरी नोकरी शोधायला बाहेर पडले. बराच वेळ वणवण फिरल्यावर त्यांना कमी पगाराची नोकरी मिळाली. पण तेवढ्या पगारात त्यांच्या कुटुंबाची खूप ओढाताण व्हायला लागली. वेळेचं महत्त्व ओळखून तिने कोचिंग क्लासेसमध्ये पेपर तपासणीसाठी जायला सुरुवात केली. काही काळाने  तिने आईला हप्त्यावर शिलाई मशिन घेऊन दिली. आईसुद्धा थोडाफार संसाराला हातभार लावायला लागली. अशा प्रकारे संघर्ष करत तिचं शिक्षण सुरु होतं.तिला आखाती देशांत जाऊन प्रचंड पैसा कमवायचा होता. ते तिचं स्वप्न होतं. त्यासाठी कितीही कष्ट करायची तिची तयारी होती. तिने रात्रंदिवस अभ्यास करत एम.डी. ची पदवी मिळवली. भारतात काही वर्ष अनुभव घेऊन तिने आखाती देशांत नोकरीसाठी प्रयत्न सुरु केले. एका रिक्रूटमेंट एजंटमार्फत तिला ओमानमध्ये जाॅब मिळाला. राॅयल सल्तनत ऑफ ओमानच्या सरकारी हाॅस्पिटलमध्ये महिना तीन लाख रुपये पगार होता. तिचा आनंद गगनात मावेना. पण काही दिवसांतच तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. ओमानचा व्हिसा येत नव्हता. ती इकडं देव पाण्यात घालून बसली होती. या तगमगीच्या काळात तिची मैत्रिण तिला माझ्याकडे घेऊन आली. मी तिची जन्मपत्रिका बघून व्हिसा अंदाजे कधी येईल ते सांगितलं. तिच्या जन्मलग्नकुंडलीतील बारावं स्थान अतिशय मजबूत होतं. त्यामुळे ती परदेशी जाणार हे जवळपास निश्चित होतं. मी दिलेल्या अंदाजाच्या  आसपास तिचा व्हिसा आला. त्याबरोबर ओमानची राजधानी मस्कतचं प्लेनचं तिकीटपण आलं. मग ती प्रचंड उत्साहाने आखाताकडे रवाना झाली.
साधारण एक वर्षाने तिचा मला मेसेज आला  .......
"माझे कामाचे रुटीन व्यवस्थित चालू आहे. खूप पैसा मिळत आहे. पण कमालीच्या एकाकीपणाने मला ग्रासले आहे. इथे सोशल लाईफची वानवा आहे. कोणाचीही ओळख होणं दुरापास्तच आहे. इथली संस्कृती पूर्ण वेगळी आहे. महाराष्ट्र मंडळांचे कार्यक्रम असतात ते नावापुरतेच आणि औपचारिक. त्यामुळे माझी घुसमट होत आहे. कामावरुन घरी आल्यावर एकटेपणा अक्षरशः अंगावर येतो. सुट्टीच्या दिवशी तर वेड लागेल की काय अशी अवस्था होते. इथे चहूबाजूला फक्त अफाट वाळवंट आहे. काय करु??
प्लीज मला काहीतरी मार्ग सुचवा. " 
मी तिला रिप्लाय दिला......
" येईल त्या सुट्टीच्या दिवशी लवकर बाहेर पड. थेट शहराबाहेरच्या रस्त्याला लाग. वाळवंट कापत जाणाऱ्या हायवेवरुन भरवेगात जायला खूप मजा येते. काही वेळ ही मजा लुटल्यावर तुला तो दिसेल. तो युगानुयुगे तुझी वाट पहात वाळवंटात उभा आहे. तो तुला वाळवंटाचं सौंदर्य दाखवेल. भरारणाऱ्या वाऱ्याने वाळवंटात चितारलेल्या नैसर्गिक रांगोळ्या कशा बघायच्या ते शिकवेल.  मृगजळामागं धावण्यात काय थ्रिल असतं ते तो तुला सांगेल. मग मृगजळामागं धावून तुझी दमछाक झाल्यावर तो तुला कष्टाने साठवलेलं पाणी देईल. तेव्हा तुला पाण्याची आणि मैत्रीची किंमत कळेल. तो एकटा , एकाकी दिसत असला तरी निसर्ग त्याचा सखा आहे हे तुझ्या लक्षात येईल. आपल्या प्रत्येकाचं असंच असतं. हे अफाट विश्वच आपलं सोबती असतं. आईवडील , नवरा- मुलं , मित्र- मैत्रिणी एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपल्या सोबत असतात. तिथून पुढे आपण आणि हे विशाल ब्रम्हांड एवढंच उरतं. तेव्हा तू एकटी , एकाकी अजिबात नाहीस तर  निसर्गाचं प्रत्येक रुप तुझं सोबती आहे. निसर्गात , वाळवंटात रममाण हो. रात्री ताऱ्यांशी गुजगोष्टी कर. तुला एकटेपणा कधीच जाणवणार नाही." रिप्लाय देऊन बरेच दिवस झाले. मी माझ्या उद्योगात रमून गेलो. जवळपास सहा महिन्यांनी माझ्या पत्त्यावर एक पार्सल आलं. मी उत्सुकतेने ते उघडलं. आत एक नितांतसुंदर असं कॅक्टसचं पेंटींग होतं  आणि खाली लिहिलं होतं  ........
 " निसर्ग माझा सोबती  " .

-  जितेंद्र अभ्यंकर
     8605396156

3096.घुसमट

      सकाळ झाली होती. खिडकीतून येणारा प्रकाश खोलीत पसरत होता; पण त्या प्रकाशाला स्पर्श करूनही विवेकच्या मनात उजेड उतरला नव्हता. आरशात दिसणारा चेहरा ओळखीचा असूनही अनोळखी वाटत होता. डोळ्यांखाली खोल सावल्या, ओठांवर न उमटलेलं हसू आणि छातीत सतत धडधडणारी एक अज्ञात भीती.
तो उठला. नेहमीसारखाच. त्याला कुठेही जायचं नव्हतं. पण संजयला कंपनीत जायचं होतं. विवेकला त्याच्यासमोर खोटं खोटं हसायचं होतं. "सगळं ठीक आहे" असं सांगायचं होतं.
पण आत काहीतरी रोज थोडं थोडं तुटत चाललं होतं. कुणालाही न दिसणाऱ्या फटी मनात पडत होत्या आवाज न करता, रक्त न सांडता.
विवेक आणि संजय लहानपणापासूनचे मित्र. एकाच मातीमध्ये वाढलेले. एकाच शाळेत शिकलेले. स्वप्नंही जवळजवळ तीच. गावात पावसावर अवलंबून असलेली शेती करणारे वडील, घरात कायम तुटपुंजं उत्पन्न आणि मुलांनी शिकावं, पुढे जावं हीच आई-वडिलांची एकमेव आशा. त्या आशेच्या बळावर दोघेही शहरात आले. इंजिनिअर झाले आणि एकाच खोलीत राहू लागले.
पण शिक्षण संपून दीड वर्ष उलटलं...
संजयला नोकरी मिळाली. पगार सुरू झाला आणि त्या पगारातील निम्मी रक्कम तो अभिमानानं गावाकडे पाठवत होता.
विवेक मात्र तिथेच थांबला. नोकरी नाही, उत्पन्न नाही आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी घुसमट.
वडिलांवर अवलंबून राहण्याची लाज त्याच्या मनाला पोखरत होती. मागच्या महिन्यात खोलीचं भाडंही संजयने भरलं होतं. ते ऋण विवेकच्या छातीत दगडासारखं बसलं होतं. 
"काय रे, आज थकल्यासारखा दिसतोस?" संजयने विचारलं.
"काही नाही. झोप कमी झाली." विवेक म्हणाला.
पण शब्द गळ्यातच अडकले खरं सांगायचं होतं- मन दमलंय.
दुपारी जेवणाच्या ताटात भाजी भाकरी होती. पण जिभेला कळली नाही. आठवणी मात्र चवीनं येत होत्या अपेक्षांच्या, अपयशांच्या, "तू अजून किती?" या प्रश्नांच्या.
आयुष्य धावपट्टीसारखं धावत होतं; तो मात्र जागीच उभा होता.
बसच्या काचेतून शहर धावताना दिसत होतं. दिवे, जाहिराती, चेहऱ्यांची गर्दी. त्या गर्दीत तो अधिकच एकटा वाटला. छातीत हवा कमी पडतेय असं जाणवत होतं.
हे असंच राहणार का? हा प्रश्न पुन्हा डोकावला.
संध्याकाळी घरी आल्यावर तो खुर्चीत कोसळला. शेजारच्या खोलीत गाणी वाजत होती, पण आवाज ऐकू येत नव्हता. टेबलावर ठेवलेली प्रमाणपत्रांची फाईल परकी वाटू लागली. हाताला कंप सुटला. घुसमट संपली नव्हती. तिचा दाब मात्र वाढत होता.
आणि त्याच क्षणी, कुठून तरी मनात एक विचार अलगद डोकावला-
हे सगळं थांबवता आलं तर?
तो विचार तिथेच थांबला नाही. तो खोलवर रुजला. विवेकच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला.
खोलीत अंधार दाटला होता. दार उघडल्याचा आवाज झाला. संजय आत आला. विवेक पलंगावर बसून शून्यावर पाहत होता.
संजय : (हळूच) विवेक, आज इंटरव्ह्यू कसा गेला?
विवेक काही क्षण काहीच बोलला नाही. मग ओठ हलले.
विवेक : कसा जाणार? नेहमीसारखाच नकार घेऊन आलो...
संजय जवळ येऊन खुर्ची ओढून बसला.
संजय : नकार म्हणजे शेवट नाही रे. ती फक्त पुढच्या प्रयत्नाची सूचना असते.
विवेक : (हसण्याचा प्रयत्न) तुला बोलायला सोपं आहे. तुला नोकरी आहे. पगार आहे. गावाकडे पैसे पाठवतोस. मी काय करतो ? तुझ्या पैशावर खोलीचं भाडं देतो.
संजय : (थोडा कडक, पण प्रेमाने) असं बोलू नकोस. आपण दोघं एकत्र आलोय इथे. आज मी मदत करतोय, उद्या तू करशील. यात लाज कसली?
विवेकची नजर खाली.
विवेक : वडिलांचे कष्ट आठवतात. आईचं शांत राहणं जास्त बोचतं. कधी कधी वाटतं... मी ओझं झालोय.
संजय थोडा पुढे झुकला.
संजय : ओझं? अरे, ज्याच्यासाठी आई-बाप रोज देवाकडे प्रार्थना करतात, तो ओझं कसं असू शकतो? ते बोलत नाहीत, कारण त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे.
विवेक : (डोळे पाणावलेले) पण दीड वर्षं झालं रे... दीड वर्षं !
संजय : मला माहीत आहे. पण एवढंच म्हणजे आयुष्य नाही. आपण एकाच गावातून आलो. एकाच परिस्थितीतून. फरक एवढाच माझी वेळ थोडी लवकर आली, तुझी उशिरा येईल.
विवेक काही बोलणार, तेवढ्यात थांबतो.
विवेक : आज सकाळी एक विचार आला होता... भीतीदायक. असह्य, न सांगता येणारी.
संजय सावध झाला.
संजय : (मृदु आवाजात) कुठलाही विचार असू दे. सांग. मी ऐकतो.
विवेक खोल श्वास घेतो.
विवेक : हे सगळं थांबवावंसं वाटलं.
क्षणभर शांतता.
संजयनें विवेकच्या खांद्यावर हात ठेवला.
संजय : विवेक.. थांबवायचं असेलं - तर त्रास थांबव. स्वतःला नाही. आपण दोघं मिळून मार्ग काढू. आज नसेल, उद्या असेल. पण तू इथे हवास.
विवेकच्या डोळ्यात पाणी आलं.
विवेक : खरंच वाटतं का तुला... मी काहीतरी करू शकतो ?
संजय : (हसत) मला खात्री आहे. कारण मी तुला ओळखतो. तुझं अपयश नाही, तुझा संघर्ष जास्त आहे.
विवेक पहिल्यांदाच त्या दिवशी डोकं हलवत म्हणाला- ठीक आहे. अजून एक प्रयत्न.
खोलीत शांतता होती. पण त्या शांततेत पहिल्यांदाच आशेचा आवाज ऐकू येत होता.
OOO 
दुसरा दिवस उजाडला. विवेक झोपेतून उठला खरा, पण काल रात्रीचे विचार अजूनही त्याच्या मनात ठाण मांडून बसले होते. डोळे उघडले होते, शरीर हालचाल करत होत; मन मात्र अजूनही त्या अंधारातच अडकलेलं. संजयने काल दिलेला धीर आठवत होता, पण विचारांची दिशा काही केल्या बदलत नव्हती. आत कुठेतरी एक बोच होती
सकाळची शांतता त्याला अस्वस्थ करत होती. खोलीतल्या भिंती जणू जवळ येत आहेत, असं त्याला वाटत होतं. विचारांची गर्दी पुन्हा उसळली आजही काहीच बदलणार नाही...
तो हळूच खोलीबाहेर पडला. कुणाला न सांगता. पावलं आपोआप टेकडीकडे वळली. शहर मागे पडत गेलं; आवाज कमी होत गेले. वर चढताना श्वास जड होत होता शरीराच्या थकव्यामुळे नव्हे, तर मनावरच्या ओझ्यामुळे.
टेकडीच्या कडेला उभा राहून त्याने खाली पाहिलं. आयुष्य तिथे चालू होतं-वाहतूक, माणसं, घाई, गडबड. टेकडीवर मात्र एक वेगळीच शांतता होती. विचारांचा गुंता इतका वाढला होता की रस्त्यांवरचे जाहिरातीचे बोर्ड, फ्लेक्स यांवरचा मजकूर त्याला दिसतच नव्हता; त्यावर काळे डाग ओढल्यासारखं सगळं अस्पष्ट वाटत होतं आणि त्या शांततेत त्याचे विचार अधिकच मोठे, अधिकच दडपण आणणारे झाले.
हे सगळं इथेच थांबवता आलं तर...
हा विचार पुन्हा मनात घुसला. अंगावर काटा आला. छातीत धडधड वाढली. तो स्वतःशीच कुजबुजला.
"मी थकलोय."
तेवढ्यात थोड्या अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं. विवेक दचकला. तो तरुण ध्यान लावून बसलेला होता. डोळे मिटलेले. चेहऱ्यावर शांतता आणि समाधान. काही क्षण शब्द नव्हते- फक्त दोन श्वास, दोन अस्तित्वं एकाच जागी.
त्या चेहऱ्याकडे पाहताच विवेकला त्याच्या जवळ जावंसं वाटलं. तो थोड्या अंतरावर जाऊन बसला. काही वेळाने त्या व्यक्तीने डोळे उघडले.
अनोळखी (हळू, स्थिर
आवाजात) इथे एकट्याने बसायला, ध्यान करायला बरं वाटतं... कधी कधी.
विवेकने मान हलवली.
विवेक : शांत आहे... पण डोकं शांत होत नाही.
अनोळखी माणूस हलकंसं हसला. उपहास नव्हता त्या हसण्यात समज होती.
"असं का? अशा रम्य सकाळी इथे सगळं शांत वाटायला हवं."
जणू विवेक नकळत बोलून गेला आत साचलेलं ओसंडून बाहेर आलं.
"आयुष्य पुढे जातंय... आणि मी इथेच थांबलोय असं वाटतं. लोक म्हणतात, प्रयत्न कर. पण किती ? कधी कधी वाटतं... आपण नसलो तर सगळ्यांचं सोपं होईल. म्हणून इथे आलो.
क्षणभर शांतता पसरली. त्या अनोळखी व्यक्तीने विवेकला टेकडीच्या कडेवरून जवळ येऊन बसायला सांगितले. विवेक थोडा मागे सरकला आणि जणू विचारांनाच जागा देत खोल श्वास घेतला.
"काल मित्रानं सांगितलं
थांबवायचं असेल तर त्रास थांबव, स्वतःला नाही."
अनोळखी माणसाने त्याच्याकडे पाहिलं. नजरेत सहानुभूती होती.
"शहाणा मित्र आहे. आज मी फक्त तुझं ऐकून घेतो. नंतर मी बोलेन."
तेवढंच वाक्य पुरेसं होतं.
विवेक काही क्षण गप्प बसला. जणू कुठून सुरुवात करावी, हेच कळत नव्हतं. हाताच्या बोटांनी माती कुरतडत तो खाली पाहत राहिला. मग हळूच मान वर केली.
"मला कळत नाही", तो म्हणाला, आवाज थरथरत, "मी नेमकं कुठे चुकलो."
तो श्वास घेतो.
"लहानपणापासून एकच ऐकलं शीक, पुढे जा. वडील शेतात राबले. पावसावर अवलंबून असलेली शेती... कधी पिकायची, कधी नाही. तरी त्यांनी कधी शिकायला कमी पडू दिलं नाही. आईनं प्रत्येक वेळी माझ्या हातात पुस्तक ठेवताना डोळ्यात आशा ठेवली."
तो क्षणभर थांबतो.
"इंजिनिअर झालो. त्या दिवशी वाटलं आता सगळं बदलणार. घरातला चेहरा बदलणार. वडिलांचा थकवा कमी होणार. आईला लोकांसमोर मान उंचावता येणार."
त्याचा आवाज खाली येतो.
"पण आज दीड वर्ष झालं, काहीच बदललं नाही."
तो हसण्याचा प्रयत्न करतो ते हसू वेदनादायक.
"मित्रांना नोकऱ्या लागल्या. कुणी शहर बदललं, कुणी गाडी घेतली. माझा जिवलग मित्र... तोही पुढे गेला. मी आनंदी व्हायचा प्रयत्न केला, पण मनात सतत एक प्रश्न माझंच का नाही?"
विवेक डोळे पुसतो.
"घरी गेलो की बहीण विचारते 'तूच कसा मागे राहिलास?' ती वाईट नाही, पण शब्द बोचतात. आई-बाबा काहीच बोलत नाहीत. आणि तेच जास्त त्रासदायक आहे. त्यांचं शांत राहणं मला अपराधी बनवतं."
तो अनोळखी व्यक्तीकडे पाहतो-जणू खात्री करून घेतो की तो ऐकतोय.
"वडिलांच्या पैशावर जगतोय, ही लाज मला रोज खाऊन टाकते. मित्राकडून मदत घ्यावी लागते- खोलीचं भाडं, खर्च... मी काही करू शकत नाही, ही जाणीव सतत सोबत असते."
आवाज जड होतो.
"मी कुठेही जातो इंटरव्ह्यू, ऑफिस, लोक सगळीकडे मला माझं अपयश दिसतं. प्रमाणपत्रांवर माझंच नाव आहे, पण ते नाव कुणालाच नको आहे, असं वाटतं."
तो क्षणभर गप्प. मग शब्द ओघळतात.
"रात्री झोप येत नाही. सकाळी उठायची इच्छा नसते. डोक्यात तेच तेच विचार- आजही काही बदलणार नाही."
विवेकचा श्वास वेगवान होतो.
"आणि मग... कधी कधी असा विचार येतो- मी नसतो तर? आई-बाबांचं ओझ कमी झालं असतं. मित्रावरचं ऋण संपलं असतं. सगळं सोपं झालं असतं."
तो लगेच मान हलवतो.
"मला मरायचं नाही... पण हा त्रास थांबावा, एवढंच वाटतं. रोज स्वतःशी लढताना मी हरतोय, असं वाटतं."
डोळ्यांत पाणी.
"लोक म्हणतात- धीर धर. पण धीर किती दिवस? माणसाची ताकदही संपते."
तो खोल श्वास घेतो.
"आज इथे आलो... कारण मला कुणीतरी फक्त ऐकून घ्यावं असंच वाटत होतं. सल्ला नको, उपदेश नको. फक्त एवढंच मी वेडा नाही, हे कुणीतरी सांगावं."
विवेक थांबतो. शब्द संपतात. पण त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच थोडीशी हलकेपणाची झलक दिसते जणू ओझ्याचा एक दगड खाली ठेवला आहे.
तो हळूच म्हणतो, "इतकंच... हेच सगळं."
आणि त्या शांत टेकडीवर, ऐकणारा एक माणूस असल्यामुळे, विवेकला पहिल्यांदाच वाटतं - आज तरी मी एकटा नाही.
अनोळखी व्यक्ती काही क्षण गप्प बसली. विवेकच्या शब्दांतली वेदना अजून हवेत तरंगत होती. तो लगेच काही बोलला नाही- जणू त्या शब्दांना नीट जागा देत होता. मग हळूच म्हणाला,
"तू जे सांगितलंस... ते ऐकायला जड आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव असं वाटणं वेडेपणाचं नाही. हे थकव्याचं लक्षण आहे."
तो थोडा पुढे सरकला. आवाज स्थिर होता; डोळ्यात माया.
"आपण लहानपणापासून शिकतो-यश म्हणजे पुढे जाणं, पैसे कमावणं, जबाबदाऱ्या उचलणं. पण कुणीच आपल्याला हे शिकवत नाही की वेळ कधी कधी थांबते. आणि तेव्हा माणूस स्वतःलाच दोष देतो."
क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला,
"तू अपयशी नाहीस, तू संघर्षात आहेस आणि संघर्ष दिसत नाही, तो आत चालू असतो."
विवेकच्या डोळ्यात पाहत तो
शांतपणे म्हणाला,
"आई-बाबा शांत आहेत, कारण त्यांना तुझी धडपड दिसते. त्यांची आशा संपलेली नाहीः ते तुझ्या वेदनेवर मीठ चोळत नाहीत. कधी कधी प्रेम हे शांत असतं."
तो हलकंसं हसला.
"आणि मित्रांनी मदत केली तर ती तुझी कमजोरी नाही. आज तू घेतोयस, उद्या देशील. आयुष्याची देवाणघेवाण अशीच असते."
विवेकचा श्वास हळूहळू सावरत होता.
अनोळची व्यक्ती पुढे म्हणाली,
"तू म्हणालास, मी नसतो तर सगळ्यांचं सोपं झालं असतं. हे वाक्य म्हणायला आणि ऐकायला सोपं आहे, पण खरं नाही. तू नसशील तर त्यांच्या आयुष्यात एक पोकळी राहील जी कुठल्याही मार्गाने भरून निघत नाही."
तो थोडा वेळ खाली पाहत राहिला.
"मीही कधीकाळी इथे आलो होतो... अशाच विचारांसह. तेव्हा मला कुणीतरी एवढंच सांगितलं होतं- आज निर्णय घेऊ नकोस, आज फक्त श्वास घे. उद्याबद्दल आपण उद्या पाहू."
तो पुन्हा विवेककडे पाहतो.
"आजचा दिवस जिंकायचा आहे. फक्त आज, उद्या काय होईल ते उद्या."
मग तो थोडा सावरून बोलू लागला. शब्दांत अनुभवाची धार होती.
"जीवनात अनेक गोष्टींचं आकर्षण असतं, अनेक आवडी असतात. पण प्रत्येक आवड शेवटपर्यंत नेता येतेच असं नाही. अपेक्षेप्रमाणे सगळंच साध्य होत नाही. कधी एखादीच गोष्ट हातात येते आणि त्यातच समाधान मानून ती निष्ठेने करत राहणं हेही मोठं यश असतं."
तो स्पष्ट म्हणाला,
"आई वडिलांचा मुलगा, पत्नीचा पती, बहिणीचा भाऊ हे सगळे केंद्रबिंदू सांभाळतच जीवनाची वाटचाल करावी लागते. केंद्रबिंदूच्या बाहेर गेलं, तर जीवनातूनच बाहेर पडण्याची शक्यता वाढते."
थोडं थांबून तो पुढे म्हणाला,
"या जगात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते. तसाच तूही आहेस. प्रतिकूल परिस्थितीतून तू शिक्षण घेतलंस - ती तुझी ताकद आहे. तुझी बुद्धिमत्ता आणि कष्टाळू वृत्ती ही तुझी बलस्थानं आहेत. त्यातूनच तुझं वागणं, जनमानसातील वावर, आत्मविश्वास, संभाषणकौशल्य, निर्णयक्षमता, कोणत्याही प्रसंगात शांत राहून मार्ग काढण्याची क्षमता - हे सगळं घडवता येतं. त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो; प्रयत्नांची गरज असते."
तो सौम्य पण ठाम स्वरात म्हणाला,
"नम्रता असू दे; पण नेभळटपणा किंवा पळून जाण्याची वृत्ती नको."
शेवटी तो म्हणाला,
"मी तुला 'असं वाग' किंवा 'तसं वागू नकोस' असं सांगणार नाही. निर्णय तुझाच आहे. पण लक्षात ठेव- तुझ्या चुकीच्या निर्णयानं कदाचित तुझा प्रश्न सुटेल; पण तुझ्या घराची, कुटुंबाची फरपट होईल. निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं फक्त तुझ्याजवळ असतील आणि तेव्हाच भान सुटलं तर ती उत्तरं सापडणार नाहीत. उत्तरं बाहेर नाहीतः ती तुझ्याच आत आहेत."
तो हळूच उभा राहिला.
"आज आपण दोघं इथून परत जाऊ या. मार्ग लगेच सापडेलच असं नाही. पण चालू राहायला कारण मिळेल."
विवेक काही वेळ तिथेच बसून राहिला. शब्द संपले होते, पण त्यांचा अर्थ त्याच्या आत खोलवर उतरत होता. छातीतली घट्ट पकड सैल होत असल्याची जाणीव झाली. श्वास जड नव्हता समतोल होता. डोळ्यात पाणी होतं; पण त्या पाण्यात भीती नव्हती, पश्चात्ताप नव्हता
होती एक हलकीशी स्पष्टता.
त्याने पहिल्यांदाच ठामपणे मान हलवली. आज नाही थांबायचं, एवढंच त्याला कळलं.
तो उभा राहिला. टेकडीवरची शांतता तशीच होती.
फरक एवढाच - आता त्या शांततेत एक आश्वासक श्वास मिसळलेला होता.
वाऱ्याचा गार स्पर्श त्याच्या
आणि विवेकच्या मनात, खूप दिवसांनी, चालू राहण्याचा एक छोटासा पण ठाम विचार उगवला होता.
दोघेही टेकडीवरून हळूहळू खाली उतरू लागले.
वर येताना विवेकची पावलं ओझ्याखाली दडपलेली होती; उतरताना मात्र ती जमिनीचा स्पर्श घेत होती.
कड्यावरची ती तीव्र शांतता मागे पडत होती. समोर पायवाट होती-वळणावळणावरची, थोडी खडबडीत, पण खाली नेणारी. प्रत्येक पावलागणिक त्याच्या छातीतला ताण सैल होत गेला.
श्वास आता तुटत नव्हता; तो पुन्हा लयीत आला होता.
कपाळावरून सरकला. डोक्यातला आवाजांचा कोलाहल ओसरत गेला- जणू कुणीतरी हळूच रेडिओ बंद केला असावा. जे विचार थोड्याच वेळापूर्वी भिंतीसारखे उभे होते, ते आता ढगांसारखे विरघळत होते. "हे सगळं इथेच थांबवता आलं 
तर..." हा विचार येऊनही टिकला नाही; तो विरून गेला.
अनोळखी माणूस पुढे चालत होता.
दोघांमध्ये शब्द नव्हते पण अस्वस्थतेची जागा समजुतीने घेतली होती. विवेकला अचानक जाणवलं; आपण एकटे नाही आहोत. कदाचित मार्ग लगेच सापडणार नाही; पण चालू राहायला कारण मिळालं आहे-आजसाठी पुरेसं.
खाली उतरताना शहराचे आवाज परत येऊ लागले- दूरचे, मृदू. एखाद्या झाडावरची पानं हलली: पायवाटेवर पडलेले लहानसे दगड बाजूला सरकले. हे छोटे बदल विवेकला मोठे वाटले. कारण आत काहीतरी बदललं होतं. छातीतली घट्ट पकड सुटली होती;
मनातल्या काळ्या पटलावर प्रकाश पडू लागला होता.
पायवाट संपताना अनोळखी माणूस थांबला. विवेकही थांबला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, आभार शब्दांत नव्हते, नजरेत होते.
"आजपुरतं पुरेसं." अनोळखी हळूच म्हणाला.
विवेकने मान हलवली- या वेळी ठामपणे.
त्याला जाणवलं; या भेटीची खात्री नव्हती, पुढची भेट होईल याचीही नाही. तरीसुद्धा या माणसाने दिलेली शांत साथ कुठल्याही जवळच्या नात्यापेक्षा मोलाची होती न उपदेश, न आदेश; फक्त उपस्थिती.
"तू माझा मार्ग बदलला नाहीस, तर मला चालायची हिंमत दिलीस." विवेक म्हणाला, "आज मी इथे उभा आहे ते तुझ्या त्या शांत क्षणांमुळे", त्याच्या बोलण्यात कृतज्ञतेचा सूर उमटला.
त्याने एक पाऊल पुढे टाकले. मग आणखी एक. पाठीमागे टेकडी राहिली. मनातल्या वाईट विचारांची सावली आता त्याच्या पावलांइतकीच लहान, मागे पडलेली. त्याला कळून चुकलंः आयुष्य म्हणजे एक उडी नाही; ती एक वाट आहे- पावलोपावली चालायची.
विवेक चालत राहतो. आता तो थांबलेला नाही.

- अशोक वाळवेकर
बी३/१, 'सोनचाफा'
दामोदर विहार, हिंगणे खुर्द,
सिंहगड रोड, पुणे ४११०५१

3095. थवा पक्ष्यांचा...मानवी जीवनाचे वास्तव

  एके सकाळी एक मुलगा आपल्या आजोबांसोबत शेतात फिरायला गेला. अचानक त्याच्या नजरेस आकाशात इंग्रजी व्ही (‘V’) आकारात उडणारा पक्ष्यांचा एक मोठा थवा दिसला. मुलाने कुतूहलाने विचारले,
“आजोबा, हे पक्षी नेहमी थव्यानेच का उडतात? प्रत्येकाने आपापल्या मार्गाने उडालं तर चालणार नाही का?”
आजोबा हसले. ते म्हणाले,
“बाळा, निसर्ग कधीच विनाकारण काही करत नाही.”
ते पुढे म्हणाले,
“हे स्थलांतर करणारे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात.
ते जेव्हा ‘व्ही’ आकारात उडतात, तेव्हा सर्वात पुढचा पक्षी हवेला चिरत पुढे जातो. त्यामुळे त्याच्या मागच्या पक्ष्यांना कमी प्रतिकार सहन करावा लागतो आणि त्यांची ऊर्जा वाचते.
पण एक गोष्ट लक्षात घे. 
पुढचा पक्षी कायम पुढे राहत नाही.
तो दमला की शांतपणे मागे जातो.
आणि दुसरा पक्षी त्याची जागा घेतो.
असं करत करत.
संपूर्ण थवा एकमेकांच्या बळावर हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतो.
मुलगा आश्चर्याने ऐकत होता.
तेवढ्यात एक पक्षी थव्यापासून थोडा दूर गेला.
क्षणभर तो स्वतंत्रपणे उडत राहिला.
पण लवकरच त्याला वार्‍याचा जास्त प्रतिकार जाणवू लागला.
त्याचा वेग कमी झाला.
दिशा डळमळू लागली.
आणि काही क्षणांतच तो पुन्हा थव्यात येऊन सामील झाला.
आजोबा हसून म्हणाले,
“बघितलंस ? पंख त्याच्याकडे आधीही होते… पण ? सोबत नव्हती.”
-----------------------------
आपलं आयुष्यही असंच आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाकडे स्वतःची क्षमता असते.
पण...
जीवनाचा लांब प्रवास फक्त क्षमतेवर पूर्ण होत नाही.
त्यासाठी साथ लागते.
विश्वास लागतो.
आधार लागतो.
आणि आपली माणसं लागतात.
कुटुंब.
मित्र.
समाज.
हे आपल्या आयुष्याचे ‘थवे’ आहेत.
जेव्हा आपण थव्यात असतो.
तेव्हा कधी आपण इतरांचा भार हलका करतो.
तर, कधी इतर आपल्या थकलेल्या पंखांना बळ देतात.
म्हणूनच...
समूहातील एखादी व्यक्ती काही दिवस दिसत नसेल.
तर तिची चौकशी करायला हवी.
कदाचित ती आयुष्याच्या वार्‍याशी एकटी झुंज देत असेल.
तिला दोष द्यायला नको.
तिला पुन्हा थव्यात घेऊन यायला हवे.
कारण, नैसर्गिक नियम हाच आहे. की, 
पक्षी जसा एकटा तर उडू शकतो पण तोच थव्याने अधिक दूर, अधिक सुरक्षित आणि अधिक सक्षमपणे प्रवास करु शकतो.
माणसांचंही तसंच आहे.
एकट्याने यश मिळवता येईल पण आयुष्य जिंकण्यासाठी अखेर माणसं लागतात.
म्हणून...
कोणालाही मागे राहू द्यायला नको.
कोणाला हरवू द्यायला नको.
कारण.
जसे, एकत्र उडणारे पक्षी फक्त अंतर पार करत नाहीत तर ते एकमेकांना गंतव्यापर्यंत पोहोचवतात.
म्हणुनच जीवनाचं खरं सौंदर्य “मी” मध्ये नसतचं... ते नेहमी “आपण” मध्येच असतं.

 -@-• डॉ. शिरीष राजे.  मानसशास्रतज्ञ
        

3094. उमेद !

     १९५० च्या दशकात जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातल्या डॉ. कर्ट रिक्टर यांनी एक विचित्र पण डोळे उघडणारं संशोधन केलं.
त्यांनी काही उंदरांना पाण्यानं भरलेल्या एका मोठ्या बरणीत सोडलं. हे पाहायला की, जीव वाचवण्यासाठी हे उंदीर किती वेळ संघर्ष करतात.
निकाल अगदी साधासोपा होता. घरगुती उंदीर साधारण १५ मिनिटं पोहले आणि मग त्यांनी हार मानली. त्यांना वाटलं आता सुटका नाही, आणि ते बुडू लागले.
पण इथेच डॉ. रिक्टर यांनी एक ‘ट्विस्ट’ आणला…
उंदीर बुडण्याच्या बेतात असताना त्यांनी त्यांना पटकन बाहेर काढलं. त्यांना कोरडं केलं, थोडा वेळ विश्रांती दिली आणि पुन्हा त्याच पाण्यात सोडलं.
त्यानंतर जे घडलं,
त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.
ज्या उंदरांनी पहिल्यांदा १५ मिनिटांत हार मानली होती, तेच उंदीर आता ६० तास, म्हणजेच तब्बल अडीच दिवस न थांबता पोहत राहिले !
विचार करा, १५ मिनिटं कुठं आणि ६० तास कुठं ! त्यांच्या शरीरात अचानक कोणती शक्ती आली होती?
संशोधकांचं उत्तर होतं. ‘उमेद’ (Hope).
त्या उंदरांना आता हे ठाऊक होतं की, आपण कितीही थकलो, तरी आपल्याला वाचवायला कुणीतरी नक्की येईल. ही एक छोटीशी खात्री त्यांच्या स्नायूंना ६० तासांची ताकद देऊन गेली. 
अगदी गेल्याच आठवड्यात, जुलै २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘माइंडफुल होप’ (Mindful Hope) या संशोधनात शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, ‘आशा’ ही फक्त एक भावना नाही, तर ते एक कौशल्य आहे… जे आपण शिकू शकतो.
आजही जगभरात मानसिक आरोग्यावर काम करणारे तज्ज्ञ याच ‘रिक्टर प्रयोगा’चा दाखला देऊन सांगतात की, जेव्हा माणसाला वाटतं की पुढं मार्ग आहे, तेव्हा त्याची लढण्याची क्षमता कैक पटीनं वाढते.
आपल्या आयुष्याचंही असंच असतं… जेव्हा आपण संकटात असतो, तेव्हा आपली ताकद किती आहे यापेक्षा आपला विश्वास किती आहे, हे जास्त महत्त्वाचं ठरतं.
जर तुम्हाला ठाऊक असेल की, तुमच्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभं आहे, तर तुम्ही अशक्य वाटणारी संकटंही पार करू शकता.
तुमच्या आयुष्यातला तो ‘डॉ. रिक्टर’ कोण आहे? तो माणूस, तो मित्र किंवा ती व्यक्ती जी तुम्हाला बुडताना बाहेर काढते आणि सांगते, ‘लढ, मी आहे ना…!’ अशा व्यक्तीला शोधून आपल्या आयुष्यात जपून ठेवा. कारण जेव्हा शरीर साथ सोडतं, तेव्हा फक्त ही उमेदच आपल्याला तारून नेते.
लक्षात ठेवू या, तुम्ही किती वेळ पोहू शकता हे तुमच्या हातापायांवर नाही, तर तुमच्या डोक्यातल्या ‘आशे’वर अवलंबून असतं. तुमची उमेद जिवंत असेल, तर ६० तास काय, तुम्ही अख्खा समुद्रही पार करू शकता.
‘धीर धरी रे धीरापोटीं,
असती मोठीं फळें गोमटीं !’


3093. देऊळ

 त्यानं कधीच देवळात पाऊल ठेवलं नाही. दिवार चित्रपटातल्या अमिताभ बच्चनसारखा तो नेहमी देवळाच्या बाहेर बसून असंख्य भक्तगण जाता येता पहायचा. फुलांचे ताट, उदबत्ती, नारळ घेऊन येणाऱ्या अनेक भाविक लेकी सुना न्याहाळायचा. भाविकांच्या चपला सांभाळण्यासाठी त्यांचा छोटासा स्टॉल होता; तिथनं दिवसभरात तो मनुष्य स्वभावाचे हजारो कंगोरे पहात असे !
त्या दिवशी एक वृद्ध आजी चपला ठेवताना त्याच्या हातावर थरथरता हात ठेवून म्हणाली
”गजानना, मला जरा देवळाच्या दाराजवळ पोचवशील का रे?”
“आज्ये, मी हललो इथनं, तर चपला कोन सांभाळलं गं…? बरं, असू दे…चल.” म्हणत तो आला खरा, पण चालताना आजीला चक्कर आली. म्हातारीला उचलून त्यानं दुकानात आणलं… वारा घातला, पाणी दिलं, आपल्या डब्यातली झुणका भाकर दिली. म्हातारी ताजीतवानी होताच तो तिला दारापाशी पोचवून आला.
“देव तुझं भलं करो, गजानना…” आजीनं त्यालाच हात जोडले आणि त्याचं नावही गजानन पडून गेलं. त्यानं कधीच ते दुरूस्त करून स्वतःचं नाव सांगितलं नाही.
दुसरे दिवशी एक मग्रूर श्रीमंत गृहस्थ तिथं बूट ठेवून गेला.  ‘इम्पोर्टेड शूज आहेत… लक्ष ठेव’, म्हणाला. त्या बुटावर एका गिऱ्हाईकानं त्याच्या पिशवीतील फरसाण सांडलं.
नेमकं ते पुसून घेत असताना तो माणूस परतला व त्याला वेडवाकडं बोलला. पैसे न देता बूट घालून निघून गेला!
पैजणांची मंजूळ किणकिण करत एक सूनबाई एक दिवस आली. सात्विक व सुंदर सुनबाईच्या गोऱ्या पायात मोती लावलेल्या चपला होत्या. गोड आवाजात सुनबाई म्हणाली, “कसा आहेस?”
…आणि याचा दिवस कारणी लागला. तिनं घसघशीत टीप दिली. “बरंय की!” पुटपुटत त्यानं पावती फाडली. “येते हं…” अशी साखरपेरणी केलेली भाषा बोलून सूनबाई निघून गेली.
आईनं मंगळसूत्र विकून हा स्टॉल घेतला होता… संसाराला हातभार लावण्यासाठी! आहे त्यातच ती देवाला ताजी फुलं अर्पण करत असे. भक्तीभावानं हात जोडून झालेल्या चुकीसाठी चार थपडा मारून घेत असे. दारूड्या नवऱ्याचं व्यसन सुटो, म्हणून प्रार्थना करणारी!
“मानसाचा जल्म आलाय कधी नव्हं ते… त्यो दारू ढोसन्यासाटी न्हाई! करा काहीतरी याच जल्मात…” हे नवऱ्याला, मुलांना सांगणारी! पण एवढ्या उपासनेनंतर तिचं आयुष्य थोडंही सुधारलं नव्हतं..
नवरा दारू पिऊन लाथा घालायचा. एक दिवस मात्र देवीच हिच्या अंगात आली व तिनं तिरमिरीनं नवऱ्याला एकच अशी लगावली की तो भेलकांडत खाली पडला. त्याचं डोकं खाली आपटून रक्त येऊ लागलं. आईनं धावत जाऊन हळद आणून लावली! याला प्रेम म्हणायचं का राग हे त्याला कधी कळलंच नाही आणि आईचं आयुष्य न सुधारणाऱ्या देवीच्या दारात जाऊन आपण उभं रहावं असंही वाटलं नाही! 
अशीच एक संध्याकाळ आली… आरतीचा आवाज हवेत घुमत होता. शंखनाद, घंटानाद, आणि भाविकांचा आरतीचा आवाज एकत्र मिसळून एक अद्भुत लय तयार झाली होती.
त्या दिवशी त्या आवाजांनी त्याच्या मनात काही वेगळं झालं. देवळाच्या आतून कुणीतरी बोलावतंय, असं वाटू लागलं.
तेवढ्यात एक मग्रूर शेठ आला. सुटलेलं पोटं व नजरेत तुच्छता! त्यानं चपला जवळजवळ याच्याकडे भिरकावल्या. व कसलासा श्लोक म्हणत तो पुढं गेला.
इतकी तुच्छता का दाखवायची? मी पण माझं कामच करतोय ना? त्याचे डोळे उगीचच भरून आले. त्याने डोळे पुसले तेव्हा समोर एक छोटी मुलगी उभी होती. तिनं चपला काढल्या…
“काका, इथं ठेऊ चपला?” असं गोड आवाजात विचारलं. त्याचं मन त्या गोडव्यानं भरून आलं!
“हो बेटा, ठेव तिथं!” कधी नव्हे ते स्वत:च्या आवाजातील ओलावा त्याचा त्याला ऐकू आला.
“काका, नीट सांभाळा हं चपला… नव्या आहेत. आज पहिल्यांदा घातल्या आहेत. टाटा!” इतकं गोड माणूस बोलू शकतो, या विचारात तो पडला!
सुंदर निळा फ्रॅाक, रेशमी केसांची एक वेणी घातलेली ती गोड मुलगी उड्या मारत देवळात गेली. जाताना त्याच्या ह्रुदयाचा एक तुकडा बरोबर घेऊन गेली, असं त्याला वाटलं. ते निरागस, देवीसारखं हसू त्यानं मनात साठवून घेतलं! 
बराच वेळ वाट पाहिली, तरी ती मुलगी परत आली नव्हती. शेवटी तो उठून देवळाच्या पायरीजवळ गेला. पुजारी काकांना दोन हाका मारल्या पण त्यांना ऐकू गेलं नाही.
…आणि तो आयुष्यात प्रथमच देवळाची पायरी चढला. पुजारी काका पण त्याला पाहून आश्चर्यचकित झाले…
”काय गजानना, आलास ना शेवटी देवळात?”
“पुजारी काका, ती मुलगी… निळा फ्रॉक घातलेली, एक वेणी घातलेली… ती चपला घ्यायला परत आलीच नाही… कुठंय ती?”
“अरे, कुठलीही निळा ड्रेस घातलेली मुलगी इथं आलेली नाही. कितीही गर्दी असली तरी देवळात आलेला प्रत्येक भक्त… आस्तिक-नास्तिक… मी कधीही विसरत नाही.” पुजारी काका परत मंत्रपुष्पांजली म्हणण्यात गुंतून गेले.
“हे कसं शक्य आहे? नव्या चपला सांभाळ म्हणून सांगून गेली ती…”
तो घाईघाईने चपलांच्या स्टॅालवर परतला. त्या नव्या चपला तिथंच होत्या.
अशी कशी गायब झाली?
तो परत देवळात गेला. पुजारी काकांनी त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं.
त्यानं गाभाऱ्याकडे पाहिलं..देवीचा तेजस्वी शांत चेहरा निरांजनाच्या प्रकाशात उजळला होता. त्या चेहऱ्याकडे बघताच त्याला अपरिमित शांती जाणवली… आईकडे पाहताना जाणवे अगदी तशी! ती ऊब जाणवली… अगदी त्या मुलीनं ‘काका’ म्हणून हात मारताना जाणवली तशी!
तो एकदम थबकला…
देवी निळी साडी नेसली होती.
एक वेणी घातली होती.
त्याचे हात आपोआप एकत्र आले…
बाहेर डोळ्यातून अश्रू वाहू लागले अन् आत अज्ञात विचारांची संतत धार लागली…
देव म्हणजे या उबेचा, या जाणीवेचा क्षण…
देव म्हणजे त्या अनोळखी मुलीचं मोकळं निरागस हसू...
देव म्हणजे त्या वृद्ध आजीचा थरथरता स्पर्श…
देव म्हणजे एखाद्या तुच्छतेने पाहणाऱ्या माणसाकडेही शांतपणे पाहण्याची क्षमता…
त्या क्षणी त्याला आयुष्यातली सर्वात गहन जाणीव झाली.  तो देवळाच्या बाहेर बसलेला केवळ चपला सांभाळणारा माणूस नव्हता.
देवाच्या दारावर बसलेला एक साक्षीदार होता… निरनिराळी आयुष्यं पाहणारा…
देवाजवळ जाण्यापूर्वी आपली वर्तणूक दाखवणारे भाविक पाहणारा…
“देवळात जाण्याची वेळ आली की देवच बोलावत असतो.
पण कधी कधी योग्य वेळी देव बाहेर येऊन दर्शन देत असतो…
पळत येऊन त्यानं त्या मुलीच्या नव्या कोऱ्या चपला पादुकांसारख्या माथी लावल्या. त्या हातात घेऊन हृदयाशी घट्ट पकडल्या आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला.
आईची भक्ती आज त्याला थोडीफार कळू लागली होती.

- ज्योती रानडे

3092. विठ्ठलाचा न्याय

     संध्याकाळचे सात वाजले होते. पावसाने नुकतीच विश्रांती घेतली होती. चाळीच्या अरुंद गल्लीत चिखल साचला होता. घराघरांत दिवे लागले होते. कुठे फोडणीचा सुगंध, कुठे मुलांच्या अभ्यासाचा गोंधळ, तर कुठे टीव्हीवरच्या बातम्या. नामा मात्र आज नेहमीसारखा नव्हता. त्याची चाल मंद होती. खांदे खाली झुकले होते. हातातला डबा रिकामा होता, पण मन मात्र ओझ्याने भरलेले होते. घरात पाऊल टाकताच त्याचा सात वर्षांचा मुलगा धावत आला.
“बाबा…उद्या मला शाळेसाठी दप्तर आणशील ना?”
नामा क्षणभर थबकला. मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला; पण उत्तर दिले नाही. बायको सुमनने ते ओळखले.
“काय झालं? तब्येत बरी नाय का?”
नामा शांत बसला. बराच वेळ बोललाच नाही. शेवटी खोल श्वास घेत म्हणाला,
“उद्यापासून मी घरीच हाय.”
“का हून ?”
“कंपनी सरकारने सील केली.”
घरात क्षणात शांतता पसरली. मुलांना काही समजले नाही. पण सुमनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
“का बरं?”
“भेसळयुक्त दूध तयार होत होतं. मोठी कारवाई झाली. मालकाला अटक झाली. सगळे कामगार कामावरून कमी केले .”
सुमनच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. त्या रात्री घरात कोणी नीट जेवलं नाही. नामा छताकडे पाहत पडला होता. त्याच्या डोळ्यासमोर रोजची दृश्ये फिरत होती. मोठमोठ्या टाक्यांत पाणी मिसळले जायचे. पांढरी पावडर. रसायनांच्या बाटल्या. सुगंधी द्रव्य. क्रीमसारखा दिसणारा द्रव. सगळं मिसळलं की तयार व्हायचं “दूध”. पहिल्या दिवशी त्याने विरोध केला होता. “हे चुकीचं आहे.” मालक हसला होता. “तुला पगार हवा की प्रवचन द्यायचंय?” घरची परिस्थिती आठवली. वृद्ध आई. शाळेत शिकणारी मुलं. भाड्याचं घर. आणि नामा गप्प बसला.  त्यादिवशी पासून त्याने शेजारच्या गोठ्यातले दूध पातळ व महाग असले तरी तेच घेणे चालू केले व बायकोला बजावून सांगितले…” हेच दूध आपल्या लेकराना द्यायचे..”
नामाने रात्र जागून काढली होती पण पहाटे डोळा लागला होता. पहाटे सुमन उठली. घरात देवाजवळचा दिवा लावला. विठ्ठल-रखुमाईच्या फोटोसमोर हात जोडले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
“विठ्ठला… तूच आमचा पोशिंदा हायस, आमची कंपनी लवकर सुरू होऊ दे. आमच्या लेकरांसाठी काहीतरी कर रे बाबा ”
तिचा आवाज थरथरत होता. विठ्ठल विटेवर उभा होता. आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचे स्मित होते . तो मनात म्हणाला,
“ही लेकरं किती भोळी आहेत. स्वतःचा संसार वाचवण्यासाठी हजारो संसार उद्ध्वस्त करणाऱ्या उद्योगासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात. जर मी तिचं ऐकलं तर किती निरपराध मुलांच्या तोंडात भेसळयुक्त दूध जाईल? मग माझ्या विटेवर उभं राहण्याचा अर्थ काय?”
तेवढ्यात रखुमाई म्हणाली,
“नाथ, ती स्त्री वाईट नाही. ती संसारी आहे . आपला संसार सुखाचा व्हावा हीच तिची माफक अपेक्षा आहे. तिच्या पोरा बाळांचा घास हिसकावून घेऊ नका..”
“उघड्या डोळ्यांनी ही भेसळ बघू शकत नव्हतो म्हणून या पदावर तुकारामची  निवड केली. आता तू  असे म्हणते की, त्याला काढून टाक..”
“ नाथ, मी असे म्हणत नाही. तिला  दुसरा मार्ग दाखवा तिचा संसार वाचवा असे म्हणते.”
विठ्ठल रखूमाईकडे बघून  स्मित करत बोलले 
“मग आता तिला मार्ग दाखवायलाच हवा.”
त्या रात्री सुमनला स्वप्न पडलं. विटेवर उभा असलेला विठ्ठल तिच्यासमोर आला. तो म्हणाला,
“सुमन. तू मला कंपनी सुरू करायला सांगतेस ना. ठीक आहे ती चालू करू पण मला सांग. तुझ्या मुलाला रोज तुझ्या नवऱ्याच्या कंपनीतील दूध प्यायला देशील का?”
सुमन दचकली.
“नाय .”
“का?”
“ते इश हाय .”
“मग दुसऱ्याच्या मुलाला का?”
सुमनचा आवाज हरवला.
विठ्ठलाने सुमनचा हात धरला.
“चल माझ्या सोबत..”
क्षणात दृश्य बदलले. एका दवाखान्यात एक लहान मुलगा उपचार घेत होता. डॉक्टर आईला सांगत होते,
“अन्नातून सतत निकृष्ट पदार्थ शरीरात गेल्यामुळे प्रकृती बिघडली आहे. त्याला आतड्यांचा भयानक आजार झाला आहे ”
आई रडत होती.
दुसऱ्या ठिकाणी वृद्ध माणूस आजारी पडला होता. एका गरीब बापाने शेवटचे पैसे औषधांवर खर्च केले होते. विठ्ठल म्हणाला,
“हे कोण आहेत माहीत आहे?”
सुमनने मान हलवली.
“हेच ते लोक आहेत ज्यांनी तुमच्या कंपनीचे दूध घेतले.”
सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन गप्प होती. तिने देवाजवळ जाऊन हात जोडले.
“देवा...कंपनी सुरू होऊ दे अशी प्रार्थना मी परत कधी करणार नाही. मला योग्य मार्ग दाखवा ”
असे म्हणताच तिला जाग आली. समोर विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा होता.  विठ्ठलाला नमस्कार करून सुमन कामाला लागली.  सकाळपासून कामाच्या शोधात असणारा नामा थकून भागून मंदिराच्या बाहेर बसला होता. मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर आधारित कीर्तन चालू होते. कीर्तनकार म्हणाले,
“तुकाराम महाराज म्हणतात, सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याला सुरुवातीला कष्ट मिळतात; पण शेवटी समाधान मिळते.”
नामा मागच्या रांगेत बसला होता. प्रत्येक शब्द त्याच्या मनात उतरू लागला. कीर्तनकार पुढे म्हणाले,
“तुमच्या हाताने तयार होणारा प्रत्येक घास हा देवाला नैवेद्य आहे असे समजा. मग त्यात भेसळ कराल का?”
नामाच्या डोळ्यात पाणी आले. कार्यक्रमानंतर कीर्तनकार लोकांशी संवाद साधत होता. नामा त्याच्याकडे गेला.
“महाराज...मी चुकीच्या डेअरीत काम करत होतो. पण मला आता प्रामाणिक काम करायचं आहे.”
कीर्तनकारराने त्याच्याकडे पाहिले.
“चूक मान्य करणारा माणूस अर्धा सुधारलेलाच असतो. त्यांनी त्याला शासनाच्या कौशल्य विकास योजनेबद्दल माहिती दिली. स्वच्छ आणि सुरक्षित दुग्धप्रक्रियेचे प्रशिक्षण. 
लघुउद्योगासाठी कर्ज. स्वयंरोजगाराची संधी. याची माहिती दिली. काही महिन्यांनी...
नामाने गावातील चार शेतकऱ्यांना सोबत घेतले. शुद्ध दूध संकलन सुरू केले.
प्रत्येक कॅनवर लिहिलं होतं.
“विश्वास हेच आमचं भांडवल.”
लोक हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवू लागले.  या वर्षी आषाढी एकादशीला संपूर्ण कुटुंब पंढरपूरला आले. विठ्ठलाच्या चरणी नामाने डोके ठेवले.
“देवा... त्या दिवशी माझी नोकरी गेली म्हणून मी तुला दोष दिला. आज समजलं. तू माझी नोकरी नाही काढलीस. तू माझं पाप थांबवलंस.”
सुमन म्हणाली,
“त्या दिवशी मी चुकीची प्रार्थना केली होती. आज एकच मागणं आहे. आमच्या हातून कधीही कोणाच्या ताटात भेसळ जाऊ देऊ नकोस.”
मंदिराबाहेर एक लहान मुलगा दूध पीत होता. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं. विठ्ठल जणू मनात म्हणत होता,
“माझी पूजा फुलांनी नाही, तर प्रामाणिक घासाने होते.
जो दुसऱ्याच्या लेकराच्या तोंडात शुद्ध अन्न घालतो, तोच माझा खरा वारकरी.
भेसळ अन्नात नसतेच असे नाही; ती मनातही असते.
मन शुद्ध झाले की अन्नही शुद्ध होते, आणि अन्न शुद्ध झाले की समाज निरोगी होतो.”
त्या दिवशी नामाच्या संसाराला फक्त रोजगार मिळाला नाही, तर आत्मसन्मानही मिळाला.
कारण पोट भरायला पैसा लागतो; पण मन भरायला प्रामाणिकपणा लागतो.
आणि ज्या समाजात प्रामाणिकपणाचा घास वाढला जातो, तिथे विठ्ठलाला विटेवर उभं राहण्यासाठी वेगळं मंदिर लागत नाही. तो प्रत्येक घरात वसतो.

लेखिका सौ. कृतिका नितीन कुलकर्णी अंबरनाथ

3091. माणुसकीचा आणि खऱ्या नात्यांचा जो सातबारा

    कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाचा (सीबीएस) प्लॅटफॉर्म नंबर ३ प्रवाशांच्या कलकलाटाने आणि गाड्यांच्या हॉर्नने गजबजलेला होता. दुपारचे कोवळे ऊन सिमेंटच्या छपरावरून गाड्यांच्या पत्र्यावर पडत होते. डांबराच्या ट्रॅकवर डिझेलचा उग्र वास आणि चहाच्या टपऱ्यांमधून येणारा सुगंधी धूर एकत्र तरंगत होता. लाऊडस्पीकरवर नेहमीसारखीच घाईची अनाऊन्समेंट सुरू होती - “कृपया ध्यान द्या... कोल्हापूरहून साताऱ्यामार्गे पुण्यासाठी जाणारी दुपारी ठीक दोन वाजताची रात्रराणी एक्सप्रेस बस प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभी आहे. प्रवाशांनी त्वरित गाडीत बसावे.”
     प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ती लालपरी बस इंजिन सुरू होऊन 'धट-घट-घट' असा मोठा लयबद्ध आवाज करत होती. ड्रायव्हरच्या सीटवर ५३ वर्षांचे मारुती कदम शांतपणे बसले होते. अंगावर कडक इस्त्रीची खाकी विजार, खांद्यावर एमएसआरटीसी (MSRTC) चा लोगो असलेला कडक शर्ट आणि डोक्यावर पांढरी खाकी टोपी. ३० वर्षांच्या त्यांच्या प्रदीर्घ सेवेत मारुती कदम यांचा अख्ख्या कोल्हापूर डेपोत एकच दरारा होता—'वेळेचा पक्का माणूस'. घड्याळाचा काटा दोनवर गेला की मारुती कदम यांच्या गाडीचे चाक डेपोच्या गेटबाहेर पडणारच, हा नियम होता. त्यांच्या या कडक शिस्तीमुळे काही प्रवासी त्यांना पाठीमागे 'खडूस ड्रायव्हर'ही म्हणायचे.
घड्याळात दोन वाजायला एक मिनिट बाकी होता. कंडक्टर तात्यांनी मागच्या दारातून शेवटची बेल वाजवली—'ट्रींग-ट्रींग'. बस प्रवाशांनी पूर्णपणे गच्च भरलेली होती. मधल्या गॅलरीतही काही लोक बॅगा धरून उभी होती.
घड्याळाचा मोठा काटा बरोबर दोनवर स्थिर झाला. नेहमीच्या नियमानुसार मारुती कदम यांनी गिअर टाकायला हवा होता आणि क्लच सोडायला हवा होता. पण... आज काहीतरी अजब घडत होतं.
दोन वाजून एक मिनिट झाला. मारुती कदम यांचे हात स्टिअरिंगवरच स्थिर होते, पण त्यांचा डावा पाय क्लचवर नव्हता. दोन वाजून दोन मिनिटे झाली... दोन वाजून चार मिनिटे झाली. गाडी जागची हलली नाही.
"ओ ड्रायव्हर साहेब! काय चाललंय? दोन वाजून पाच मिनिटं झाली की वर! गाडी का नाही सोडली अजून?" बसच्या मधल्या सीटवरून पुण्याचे एक नामांकित व्यापारी, जे घड्याळाकडे पाहत होते, चिडून ओरडले.
"हो ना, सरकारी गाड्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. वेळेची काही किंमतच नाही यांना. आमची पुढे कनेक्टिंग ट्रेन सुटणार आहे पुण्यात," दुसरी एक महिला प्रवाशांना भडकावत म्हणाली.
बसच्या आत एका क्षणात प्रवाशांचा संताप अनावर झाला. लोक ओरडू लागले, काही जण खिडकीतून तोंड बाहेर काढून कंडक्टर तात्यांना जाब विचारू लागले. पण मारुती कदम पूर्णपणे शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब, गोठलेली शांतता होती. त्यांचे डोळे स्टँडच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या लांब, मोकळ्या रस्त्याकडे खिळलेले होते, जणू काही ते कोणाचा तरी शोध घेत होते.
प्रवाशांचा गोंधळ वाढल्यामुळे दोन-तीन प्रवासी थेट बसमधून खाली उतरले आणि त्यांनी प्लॅटफॉर्मच्या कोपऱ्यात असलेल्या आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयाकडे धाव घेतली.
अवघ्या दोन मिनिटांत, ५५ वर्षांचे आगार व्यवस्थापक (Depot Manager) सदानंद सावंत कडक पांढऱ्या सफारी सूटमध्ये, हातात फाईल घेऊन वेगाने प्लॅटफॉर्म नंबर ३ कडे आले. सावंत साहेब डेपोचे अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जायचे. नियमांची चौकट मोडणारा कर्मचारी त्यांना अजिबात सहन होत नसे.
"कदम!" सावंत साहेबांचा भारदस्त आवाज इंजिनच्या आवाजाला चिरत गाडीच्या केबिनमध्ये घुमला. "दोन वाजून सात मिनिटं झाली आहेत. कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस अजून प्लॅटफॉर्मवरच कशी उभी आहे? ३० वर्षांच्या सर्व्हिसमध्ये तुमचा कधी एक मिनिटही उशीर झालेला नाही, आज हा काय वेडेपणा सुरू आहे? प्रवाशांनी माझ्या केबिनमध्ये येऊन तक्रार केलीये. गाडी आत्ताच्या आत्ता डेपोबाहेर काढा, नाहीतर तुमचं निलंबन (Suspension) होईल!"
मारुती कदम यांनी आपली खाकी टोपी काढली, कपाळावरचा घाम पुसला आणि अत्यंत शांतपणे सावंत साहेबांच्या डोळ्यात पाहिले. "साहेब... फक्त दोन मिनिटं. आणखी दोनच मिनिटं गाडी थांबवा. मी शिक्षा भोगायला तयार आहे."
"असं कसं दोन मिनिटं? शासकीय गाडी कोणाच्या खाजगी कामासाठी थांबवता येत नाही, कदम! हा रेल्वेचा किंवा एसटीचा अधिकृत नियम आहे. क्लच सोडा आत्ता!" सावंत साहेब ओरडले.
तेवढ्यात, बसस्थानकाच्या मुख्य वेशीवरून एक भयानक किंकाळी आणि धापा टाकण्याचा आवाज आला.
"थांबा... ओ गाडी थांबवा... प्लीज थांबवा!"
सर्व प्रवाशांनी आणि सावंत साहेबांनी वळून पाहिले. स्टँडच्या चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून एक २२ वर्षांची मुलगी, गौरी, वेड्यासारखी धावत येत होती. तिची साधी सुती साडी एका बाजूने फाटली होती, पायात चप्पल नव्हती, आणि तिचा संपूर्ण चेहरा घामाने आणि अश्रूंनी माखलेला होता. तिच्या दोन्ही हातांमध्ये निळ्या रंगाची एक थर्माकोलची लहान आयसोलेटेड मेडिकल बॅग होती, जी तिने स्वतःच्या छातीशी एखाद्या लहान बाळासारखी घट्ट धरून ठेवली होती. ती धावताना वारंवार चिखलात घसरत होती, पण ती पुन्हा उठून बसच्या दिशेने धावत होती.
तिला पाहताच मारुती कदम यांच्या चेहऱ्यावर एक आशेचा किरण उमटला. त्यांनी स्वतः सीटवरून उठून खिडकीबाहेर हात काढला, "ये बाळा... धाव... गाडी उभी आहे!"
गौरी धावत धावत बसच्या मागच्या दारापाशी आली आणि ती पायरीवरच कोसळली. कंडक्टर तात्यांनी तिला सावरले. तिच्या हातातली ती निळी मेडिकल बॅग सुरक्षित होती. ती गाडीत चढताच तिने मारुती कदम यांच्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातून सुखाचे अश्रू वाहू लागले. तिने फक्त मान हलवून त्यांचे आभार मानले.
"तात्या! मारा बेल!" मारुती कदम मोठ्याने ओरडले. तात्यांनी खटकन दोन बेल मारल्या—'ट्रींग-ट्रींग'. मारुती कदम यांनी गिअर टाकला, क्लच सोडला आणि ती लालपरी बस दोन वाजून नऊ मिनिटांनी कोल्हापूर डेपोच्या गेटबाहेर वेगात सुसाट निघाली. सावंत साहेब प्लॅटफॉर्मवर उभे राहून त्या धुळीकडे पाहत राहिले. त्यांच्या हातातली फाईल तशीच बंद होती, पण त्यांच्या मनात संतापाचा मोठा जाळ पेटला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता. कोल्हापूर डेपोच्या मुख्य आगार व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये कमालीचा ताण होता. टेबलच्या एका बाजूला सदानंद सावंत साहेब आपल्या मोठ्या खुर्चीवर बसले होते, त्यांच्या समोर मारुती कदम यांच्या अधिकृत चौकशीची फाईल उघडी होती. केबिनमध्ये इतर दोन वरिष्ठ अधिकारी आणि युनियनचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
मारुती कदम समोर खाकी युनिफॉर्ममध्ये, मान ताठ ठेवून उभे होते.
"कदम, आज ३० वर्षांत पहिल्यांदाच तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई (Disciplinary Action) करण्यासाठी मी इथे बसलोय, याचं मला दुःख आहे," सावंत साहेबांचा आवाज कडक होता. "पण नियम सर्वांसाठी समान असतात. तुम्ही एका मुलीसाठी शासकीय बस नऊ मिनिटं का थांबवली? प्रवाशांच्या वेळेचं जे नुकसान झालं, त्याला जबाबदार कोण? जर काल हायवेवर एखादा अपघात झाला असता किंवा गाडी लेट झाल्यामुळे प्रवाशांची कनेक्टिंग ट्रेन सुटली असती, तर त्याची जबाबदारी एसटी महामंडळाने कशी घेतली असती? तुमच्याकडे याचं काय उत्तर आहे?"
मारुती कदम यांनी आपली खाकी टोपी हळूच टेबलवर ठेवली. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती.
"साहेब... नियम माणसाने माणसासाठी बनवले आहेत," मारुती कदम अत्यंत संथ आणि शांत आवाजात बोलू लागले. "पण माणसाचे श्वास वाचवणे हाच जगातील सर्वात मोठा आणि अंतिम नियम आहे, असं मला वाटतं."
"भावनिक गोष्टी करू नका, कदम! स्पष्ट सांगा, ती मुलगी कोण होती? तुमची नातेवाईक होती का? तिने तुम्हाला आधीच फोन करून गाडी थांबवायला सांगितली होती का?" सावंत साहेबांनी फाईलवर पेन ठोकला.
"नाही साहेब... ती माझी कोणीच नव्हती. मी काल दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत तिचा चेहरा कधी पाहिलाही नव्हता," मारुती कदम म्हणाले. "पण काल दुपारी दीड वाजता, जेव्हा मी डेपोच्या कॅन्टीनमध्ये चहा पीत होतो, तेव्हा साताऱ्याच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाचे मुख्य सिव्हिल सर्जन, डॉक्टर कुलकर्णी यांचा फोन डेपोच्या लँडलाईनवर आला होता. योगायोगाने तो फोन मीच उचलला."
केबिनमधील सर्व अधिकारी शांत झाले.
"डॉक्टरांनी सांगितलं की, साताऱ्यातील एका दुर्गम भागात एका गरीब शेतकऱ्याला शेतात काम करताना एका अत्यंत विषारी काळ्या नागानं दंश केला आहे. साताऱ्याच्या संपूर्ण जिल्ह्यात त्या विशिष्ट विषावरचं अँटी-व्हेनम (Anti-venom) औषध उपलब्ध नव्हतं. ते औषध फक्त पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध होतं. डॉक्टरांनी एका माणसाला पुण्यावरून ते औषध देऊन कोल्हापूरच्या गाडीने पाठवलं होतं. ती मुलगी, गौरी, ते औषध घेण्यासाठी कोल्हापूर स्टेशनवर आली होती. आणि तिला ते औषध घेऊन साताऱ्याला जाणारी दुपारी दोन वाजताची माझीच कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस पकडायची होती. कारण साताऱ्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की, जर ते औषध दुपारी साडेतीन वाजेपूर्वी साताऱ्याच्या आयसीयूमध्ये पोहोचलं नाही, तर त्या बापाचे श्वास कायमचे थांबतील."
हा या कथेतील सर्वात मोठा वास्तववादी आणि अंतःकरण पिळवटून टाकणारा मध्यांतर वळणाचा (Mid Story Twist) प्रसंग होता. केबिनमधील वातावरणातील तो कडकपणा एका क्षणात वितळायला लागला होता.
मारुती कदम यांचे डोळे कातर झाले. "साहेब... जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की जर दोन वाजताची गाडी चुकली, तर एक मुलगी आपल्या बापाचे श्वास गमावून बसेल, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर माझी स्वतःची मृत पत्नी, सखू आली रे. वीस वर्षांपूर्वी साताऱ्याच्या याच डेपोमध्ये माझी सखू वेळेवर औषध न मिळाल्यामुळे माझ्याच डोळ्यांसमोर एसटीच्या बाकावर शांत झाली होती. मी एक ड्रायव्हर असूनही माझ्या स्वतःच्या कुटुंबाला वेळेवर रुग्णालयात पोहोचवू शकलो नव्हतो, ही टोचणी मला आजही रोज रात्री झोपू देत नाही साहेब. काल जेव्हा मला समजलं की एका पाच मिनिटांच्या उशिरामुळे एका मुलीचा बाप जग सोडून जाणार आहे, तेव्हा मी ठरवलं... माझी नोकरी गेली तरी चालेल, माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली तरी चालेल, पण मी त्या नऊ मिनिटांच्या बदल्यात एका बापाला त्याचे श्वास परत मिळवून देणार."
सावंत साहेब शांत झाले. त्यांच्या हातातील पेन थरथरू लागला. त्यांनी फाईलकडे पाहिले. "पण कदम... साताऱ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्या डॉक्टरांचा फोन आला होता, त्यांचं नाव काय म्हणालात तुम्ही?"
"डॉक्टर अरविंद सावंत, साहेब..." मारुती कदम यांनी उत्तर दिले.
हे नाव ऐकताच आगार व्यवस्थापक सदानंद सावंत यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हा या कथेतील सर्वात मोठा आणि अंतिम अनपेक्षित ट्विस्ट होता. डॉक्टर अरविंद सावंत हे दुसरे कोणी नसून स्वतः सदानंद सावंत साहेबांचे सख्खे लहान भाऊ होते! आणि ज्या शेतकऱ्याला साताऱ्यात काळ्या नागाने दंश केला होता, तो शेतकरी दुसरा कोणी नसून साताऱ्याच्या गावाकडच्या जमिनीचा वाद कोर्टात लढणारा त्यांचा स्वतःचा मोठा चुलत भाऊ, आनंदराव सावंत होता!
सावंत साहेबांच्या छातीत एक भयंकर मोठी कळ उठली. ज्या भावाशी ते गेल्या दहा वर्षांपासून जमिनीच्या तुकड्यासाठी बोलत नव्हते, त्याच भावाचा जीव वाचवण्यासाठी काल एक साधा खाकी वर्दीतला ड्रायव्हर आपली नोकरी पणाला लावून कोल्हापूर डेपोत पाच मिनिटं घड्याळाच्या काट्याशी झुंज देत उभा होता. जर काल मारुती कदम यांनी कडक शासकीय नियम दाखवून दोन वाजता गाडी अचूक सोडली असती, तर आज सावंत साहेबांच्या स्वतःच्या कुटुंबाचा वंशाचा दिवा विझला असता.
सावंत साहेब खुर्चीवरून उठले. त्यांचे डोळे पूर्णपणे पाण्याने भरून आले होते. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
तेवढ्यात, कार्यालयाचा मुख्य लाकडी दरवाजा अचानक उघडला.
दाराच्या चौकटीत, पांढरा स्वच्छ कुर्ता घातलेले आनंदराव सावंत उभे होते, त्यांच्या हाताला ग्लुकोजची सुई लावलेली पट्टी अजूनही स्पष्ट दिसत होती. त्यांच्या शेजारी त्यांची मुलगी, गौरी उभी होती. साताऱ्याच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच ते थेट एसटी बस पकडून कोल्हापूर डेपोत आले होते.
आनंदराव साळुंखे यांनी आत पाऊल टाकले. त्यांनी समोर उभ्या असलेल्या मारुती कदम यांच्याकडे पाहिले आणि कोणतीही पर्वा न करता थेट पुढे जाऊन त्या खाकी वर्दीतल्या ड्रायव्हरच्या पायावर आपले डोके ठेवले.
"ड्रायव्हर माऊली... मला माफ करा. जर काल तुम्ही ती पाच मिनिटं गाडी थांबवली नसती, तर आज माझी चिता जळत असती हो. माझ्या या लेकीचं कुंकू आणि माझं जगणं तुमच्या त्या पाच मिनिटांच्या उदारतेवर जिवंत आहे," आनंदरावांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते.
गौरीनेही पुढे होऊन मारुती कदम यांचे हात जोडले. "थँक यू काका... थँक यू सो मच."
केबिनच्या बाहेर संपूर्ण कोल्हापूर डेपोचे ड्रायव्हर्स, कंडक्टर्स, वर्कशॉपचे मेकॅनिक्स आणि शेकडो प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. सुमित (तोच तरुण पत्रकार) बाहेर उभा राहून आपल्या मोबाईल कॅमेऱ्यावरून हा संपूर्ण प्रसंग सोशल मीडियावर लाईव्ह करत होता.
सावंत साहेब सावकाश चालत मारुती कदम यांच्या जवळ आले. त्यांनी जमिनीवर बसलेल्या आपल्या चुलत भावाला उठवले आणि त्याला मिठी मारली. दहा वर्षांचा तो कौटुंबिक संशयाचा आणि जमिनीचा वेढा एका सेकंदात त्या माणुसकीच्या पाझरात विरघळून गेला होता.
सावंत साहेबांनी टेबलवर असलेली ती चौकशीची फाईल घेतली, सर्वांसमोर ती फाईल मधोमध फाडून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. त्यांनी मारुती कदम यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते स्वतः कडक शिस्तीत उभे राहिले.
"ड्रायव्हर मारुती कदम साहेब!" सावंत साहेबांचा आवाज पूर्णपणे भरून आला होता. "आज या कोल्हापूर डेपोच्या इतिहासात एक नवा नियम लिहिला गेला आहे—माणसाचे श्वास वाचवणे हाच सर्वात मोठा शासकीय कायदा आहे. एमएसआरटीसी महामंडळाला तुमच्यासारख्या देवमाणसाचा सार्थ अभिमान आहे."
सावंत साहेबांनी आपले दोन्ही हात उंचावले आणि मारुती कदम यांना एक कडक, शासकीय सन्मानाचा सॅल्यूट ठोकला!
केबिनच्या बाहेर उभे असलेल्या शेकडो ड्रायव्हर्स आणि कंडक्टर्सनी आपल्या खाकी टोप्या हवेत उडवून एकच जल्लोष केला—“मारुती कदम काकांचा विजय असो... लालपरी माणुसकीचा विजय असो!” टाळ्यांचा एवढा मोठा कडकडाट झाला की, संपूर्ण बसस्थानकाचा परिसर त्या आवाजाने घुमून निघाला.
कथेचा शेवट अत्यंत भावनिक आणि संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारा ठरला.
त्या घटनेनंतर तीन महिने उलटले होते. आषाढ संपून श्रावणाची सुंदर, कोवळी बहार सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या भूमीवर पसरली होती.
आज कोल्हापूर डेपोच्या मुख्य प्लॅटफॉर्म क्रमांक ३ च्या शेजारी, जिथे ती पुणे एक्सप्रेस उभी राहायची, तिथे महाराष्ट्र शासनाच्या आणि एसटी महामंडळाच्या वतीने एक भव्य, अद्ययावत वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला होता. त्या कक्षाच्या मुख्य काचेच्या दारावर पांढऱ्या अक्षरात एक मोठी पाटी लावली गेली होती—‘मारुती-सखू आपत्कालीन औषध व जल सेवा केंद्र’.
या केंद्रात आता पुण्यातून किंवा मुंबईतून येणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन औषधांची, रक्ताची किंवा अँटी-व्हेनम उपचारांची सोय संपूर्ण जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी मोफत केली जाणार होती, जेणेकरून कोणत्याही मुलाला किंवा बापाला पाण्यासाठी किंवा औषधासाठी घड्याळाच्या काट्यासमोर लाचार व्हावे लागणार नाही.
दुपारचे ठीक दोन वाजायला एक मिनिट बाकी होता. 'कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस' बस पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मवर लागली होती. मारुती कदम आपल्या खाकी युनिफॉर्ममध्ये, चेहऱ्यावर एक अथांग समाधानी हसू ठेवून स्टिअरिंगवर बसले होते.
घड्याळाचा काटा बरोबर दोनवर गेला. कंडक्टर तात्यांनी हसून दोन बेल मारल्या. 'ट्रींग-ट्रींग'. मारुती कदम यांनी गिअर टाकला, क्लच सोडला. पण आज गाडी डेपोबाहेर पडताना प्रवाशांच्या चेहऱ्यावर कोणताही संताप नव्हता; सर्व प्रवाशांनी खिडकीबाहेर हात काढून मारुती काकांना पाहून अभिमानाने हात हलवला. खिडकीबाहेरून कोवळे सुवर्ण ऊन कोल्हापूरच्या मातीवर पडले होते, आणि त्या गजबजलेल्या बसस्थानकावर एका साध्या ड्रायव्हरच्या पाच मिनिटांच्या त्यागाने माणुसकीचा आणि खऱ्या नात्यांचा जो सातबारा महाराष्ट्राच्या भूमीवर लिहिला होता, तो आता काळाच्या अंतापर्यंत सुवर्णाक्षराने अमर झाला होता.

👇 तुम्हाला ही कथा कशी वाटली? अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
❤️ कथा आवडली असेल तर Like करा. 📢 Share करा. 
🔔 अशाच मनाला भिडणाऱ्या कथा वाचण्यासाठी Follow करा.
अस्वीकरण (Disclaimer):
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी तिचा संबंध नाही. कथेमधील सर्व पात्रे, प्रसंग आणि घटना केवळ मनोरंजनासाठी रचलेले आहेत. कोणतेही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

3090. हसण्याचा अर्थ

 गावात एक विचित्र नियम होता... जो कोणी 'सरस्वती काकूंना' न हसता पाहिल, त्याला संपूर्ण गावाकडून ११,००० रुपयांचे बक्षीस मिळेल. पण पंचवीस वर्षांत एक रुपयाही कोणी जिंकू शकले नाही. ज्या दिवशी त्यांची ही 'स्मितहास्य' (हसू) थांबली... त्या दिवशी संपूर्ण गावाचे हृदय तुटले.
सकाळचे पाच वाजले होते. सूर्य अजून पूर्णपणे उगवला नव्हता, पण सरस्वती काकू अंगणात तुळशीला पाणी घालताना गुणगुणत होत्या. जो कोणी त्यांच्या घरासमोरून जायचा... त्या हसून नक्कीच म्हणायच्या  "खुश राहा बेटा... भगवान तुझ्या घरातील दुःख दूर करोत."
गावातील एखादे मूल रडताना दिसले, तर त्या त्याला गूळ खायला द्यायच्या. एखादी सून निराश असेल, तर तिला जवळ घेऊन म्हणायच्या— "रडण्याआधी हसायला शिक... अश्रू स्वतःहून हार मानतील." हळूहळू संपूर्ण गावात एक गोष्ट प्रसिद्ध झाली— "सरस्वती काकू कधीच रडत नाहीत." लोक म्हणायचे— "त्यांच्या आयुष्यात कदाचित कधी दुःख आलेच नसेल." कोणाला काय माहित... त्यांचे हास्य जितके मोठे होते... त्यांचे दुःख त्यापेक्षाही मोठे होते.
...
एके दिवशी शहरातून एक पत्रकार गावात आला. त्याने बक्षिसाची गोष्ट ऐकली तर तो हसून म्हणाला, "कोणी माणूस पंचवीस वर्षे न रडता कसा राहू शकेल?" तो थेट सरस्वती काकूंच्या घरी पोहोचला. दिवसभर त्यांच्यासोबत राहिला. त्यांनी सर्वांना हसवले... मुलांसोबत खेळल्या... शेतात काम करणाऱ्यांसाठी भाकरी बनवल्या... संध्याकाळी मंदिरात गेल्या... पण एका क्षणासाठीही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले नाही.
पत्रकार हार मानून परत जाताना विचारले— "काकू... तुमचे गुपित काय आहे?" काकू हसल्या. "गुपित? फक्त इतकंच की मी माझं दुःख सकाळी देवाकडे सोडून येते... आणि संध्याकाळी परत घेतानाही हसून घेते."
पत्रकार निघून गेला. पण त्याच रात्री... गावात बातमी पसरली— सरस्वती काकूंच्या घरचा दरवाजा बंद आहे. सकाळपर्यंत तो उघडलाच नाही. लोक धावत गेले. दरवाजा उघडला तेव्हा काकू खाटेवर शांत झोपल्या होत्या. चेहऱ्यावर तेच हास्य होते. त्यांच्या उशाखाली एक जुना डबा ठेवला होता. डब्यात २५ लहान चिठ्ठ्या होत्या. प्रत्येक चिठ्ठीवर एक वर्ष लिहिले होते.
सरपंचांनी पहिली चिठ्ठी उघडली. त्यात लिहिले होते— "आज माझे पती गेले. संपूर्ण गाव रडत आहे. मलाही रडावेसे वाटतेय... पण माझा पाच वर्षांचा मुलगा वारंवार विचारतोय— 'आई... आता आपण काय करणार?' जर मीही तुटले... तर याला कोण सांभाळणार? म्हणून आज मी पहिल्यांदा रडण्यापेक्षा हसणे निवडले."
दुसरी चिठ्ठी— "आज माझा मुलगाही मला सोडून गेला. डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. स्मशानातून परत आल्यावर मी आरशात स्वतःला पाहिले. मला वाटले... जर आज माझे हास्य मेले... तर माझ्या मुलाची शिकवणही मरेल. तो नेहमी म्हणायचा— 'आई... तुमच्या हास्याने घरात उजेड पडतो.'"
तिसरी... चौथी... पाचवी... प्रत्येक चिठ्ठी एक नवी जखम होती. कधी आजारपण... कधी एकटेपण... कधी भूक... कधी आपणांचे जाणे... आणि प्रत्येक चिठ्ठीच्या शेवटी फक्त एक वाक्य असायचे— "आजही मी हसणे सोडले नाही... कारण कदाचित कोणाला तरी माझ्या हास्याची गरज माझ्यापेक्षा जास्त आहे."
संपूर्ण गाव रडत होते. सरपंच शेवटची चिठ्ठी उघडताना थरथरत होते. त्यात लिहिले होते— "जर ही शेवटची चिठ्ठी वाचली जात असेल... तर समजून घ्या की मी आता नाही. लोक मला नेहमी हसणारी स्त्री म्हणूनच लक्षात ठेवतील. पण माझी एक विनंती आहे... कधीही एखाद्या हसणाऱ्या माणसाला पाहून असे म्हणू नका की त्याच्या आयुष्यात दुःख नसेल. कदाचित, तो फक्त म्हणून हसत असेल जेणेकरून त्याचे अश्रू कोणाची तरी उमेद तोडणार नाहीत. जर माझ्या आठवणीत काही करायचे असेल... तर एखाद्या रडणाऱ्या माणसाला 'का रडतोयस?' असे विचारू नका. फक्त त्याच्या जवळ जाऊन बसा... कारण बऱ्याचदा 'साथ' ही शब्दांपेक्षा मोठा आधार असते."
त्या दिवशी पहिल्यांदा... सरस्वती काकू हसताना दिसल्या नाहीत. कारण त्यांचे हास्य आता त्यांच्या चेहऱ्यावर नव्हते... तर संपूर्ण गावातील लोकांच्या वागण्यात रुजले होते. काही महिन्यांनी गावाच्या प्रवेशद्वारावर एक दगड (पाटी) लावला. त्यावर लिहिले होते—
«"या गावातील सर्वात श्रीमंत स्त्री ती होती... जिच्याकडे देण्यासाठी धन नव्हते... पण प्रत्येक भेटणाऱ्याला एक स्मितहास्य नक्कीच द्यायची."»
आणि खाली एक ओळ होती—
"हसण्याचा अर्थ असा नाही की जीवनात दुःख नाही... याचा अर्थ असा आहे की माणसाने दुःखासमोर हार मानण्यास नकार दिला आहे."

3089. फुलविक्या

 सकाळचे आठ वाजले होते. बंगल्याच्या हिरव्यागार बागेत राज आणि त्याचा मित्र चहा-नाश्ता करत निवांत बसले होते.
“राजसाहेब, येऊ का मी?”
ट्रॅक पॅंट, हाफ बाह्यांचा टी-शर्ट, पायात चपला, डोक्यावर टोपी आणि जुनाट सायकलवर आलेला माणूस नम्रपणे विचारत होता.
“अरे, तू फुलविक्या ना? ये रे,” राज जरा नाईलाजानेच म्हणाला. “वीस-बावीस वर्षांनी उगवलास. शाळेत असताना होतास, तसाच दिसतोस. अजूनही फुले विकतोस का? हुशार होतास लेका. पुढे शिकलास की नाही? काय काम काढलंस?”
फुलविक्या उभाच होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी सांगण्याची उत्कंठा होती. पण राजने त्याला बसायला सांगितले नाही आणि तो काही बोलणार, तेवढ्यात राज म्हणाला,
“मित्रा, मी जरा घाईत आहे. पुढच्या आठवड्यात ये.”
चहा-नाश्ताच काय, साधं पाणीही न देता राजने त्याची बोळवण केली.
वडिलांच्या निधनानंतर शाळेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राजवर आली होती. शाळेत अनेक सुधारणा करण्याची त्याची इच्छा होती. त्यातच शाळेच्या नूतनीकरणासाठी न्यूयॉर्कस्थित माजी विद्यार्थी विकीने तब्बल एकावन्न लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती. त्या देणगीचा धनादेश स्वीकारण्याचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता होता.
कडक इस्त्रीचे कपडे आणि ब्लेझर घालून राज निघणार, तेवढ्यात त्याची मामेबहीण नेहाचा फोन आला.
“दादा, पप्पांना खूप त्रास होतोय. गाडी घेऊन लगेच ये ना. त्यांना दवाखान्यात न्यावं लागेल.”
“नेहा, मला खूप महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. तू प्लीज त्यांना रिक्षाने ने, कार्यक्रम संपला की मी लगेच येतो.”
सामाजिक प्रतिष्ठेच्या मोहापायी त्या क्षणी राजने कौटुंबिक जबाबदारीकडे पाठ फिरवली.
राज शाळेत पोहोचला तेव्हा सभागृह खचाखच भरले होते. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी तो स्वतः प्रवेशद्वाराजवळ उभा राहिला. थोड्याच वेळात एक आलिशान गाडी प्रवेशद्वाराशी येऊन थांबली. पांढरा शुभ्र शर्ट, निळी पॅंट आणि चकचकीत बूट घातलेला एक तरुण खाली उतरला. सर्वांनी त्याचे जोरदार स्वागत केले.
“मी विकीचा मित्र,” स्वागताने संकोचलेला तो तरुण नम्रपणे म्हणाला. “विकीला अचानक एका महत्त्वाच्या कामासाठी जावं लागल्याने तो कार्यक्रमाला येऊ शकला नाही. शाळेच्या प्रगतीसाठी खूप शुभेच्छा आणि हा धनादेश विकीने दिला आहे.”
कार्यक्रम यथासांग पार पडला. विकीच्या अनुपस्थितीची खंत सर्वांनाच वाटली; त्याच्या दातृत्वाचे राजने भरभरून कौतुक केले.
कार्यक्रम संपताच राज दवाखान्यात पोहोचला.
“मामा कसे आहेत? किती पैसे भरायचे?” त्याने नेहाला विचारले.
“पप्पा आता स्थिर आहेत,” नेहा म्हणाली. “दादा, त्यांचं नशीब थोर. तुझ्याशी बोलून फोन ठेवला आणि तितक्यात त्यांचा एक जुना विद्यार्थी आला. त्यानेच त्यांना दवाखान्यात आणलं आणि पंधरा हजार रुपयेही भरले. डॉक्टरांनी धोका टळल्याचं सांगितल्यावरच तो गेला.”
तेवढ्यात राजचा फोन वाजला.
फोनवर विकी होता. रिटर्न फ्लाइट पकडण्यासाठी तो मुंबईला निघाला होता.
“सर, प्रत्यक्ष भेट झाली नाही. निदान व्हिडिओ कॉलवर तरी आपले दर्शन होईल का?” राजने विचारले.
“नक्की. पाच मिनिटांत मी व्हिडिओ कॉल करतो,” विकी म्हणाला.
"नेहा ताई, सर कसे आहेत आता?" सरांना अगदी वेळेत दवाखान्यात आणणाऱ्या आणि आता अतिशय आस्थेने चौकशी करणाऱ्या सरांच्या माजी विद्यार्थ्याचा फोन नेहाने राजला दिला.
“मित्रा, तू ऐनवेळी केलेल्या मदतीमुळेच सरांची तब्येत स्थिर आहे,” राज कृतज्ञतेने म्हणाला.
“साहेब, त्यात विशेष काय? सरांसाठी काही करता आलं, हे माझं भाग्यच.”
आवाज ऐकताच राज दचकला.
“अरे, फुलविक्या ! तू दवाखान्यात ये. तुझे पंधरा हजार रुपये मी परत करतो. शिवाय एक हजार रुपये बक्षीसही देतो. तुझ्यासाठी ही रक्कम खूप मोठी असेल. ये, मी वाट पाहतो. मला एक महत्त्वाचा फोन येणार आहे.” म्हणत राजने फोन डिस्कनेक्ट केला.
तेवढ्यात राजला व्हिडिओ कॉल आला.
“विकी सर, कॅमेरा जरा नीट करा ना. तुमचा चेहरा नीट दिसत नाही” राज म्हणाला.
विकीने कॅमेरा स्वतःकडे वळवला. स्क्रीनवरचा चेहरा पाहून राज स्तब्ध झाला.
तो चेहरा दुसऱ्या कुणाचा नव्हता. तो सकाळी घरी आलेला फुलविक्या होता.
   लहानपणी फुले विकणारा तोच गरीब मुलगा. पुढे शिक्षण घेऊन न्यूयॉर्कमध्ये स्वतःचं मोठं उद्योगविश्व उभं करणारा विकी. न बोलवता घरी आलेल्या विकीला राजने ओळखले नव्हते. आदरातिथ्य न करताच त्याची बोळवण केली होती. स्वतःच्या कौतुक सोहळ्यापेक्षा सरांना दवाखान्यात नेण्यास प्राधान्य देणाऱ्या त्या दानशूराला राज म्हणाला होता, तुझे १५ हजार रुपये परत करतो, शिवाय १ हजार रुपये बक्षीसही देतो. तुझ्यासाठी नक्कीच ही खूप मोठी रक्कम असणार. राज मनोमनी शरमला, त्याला स्वतःचीच कीव आली. 
     मोठ्या देणगीदाराच्या स्वागतासाठी राज आतुर झाला होता; पण केवळ जुन्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून पूर्वीसारख्या साध्या पेहरावात स्वतःहून दारी आलेल्या त्या धनवानाला राज ओळखू शकला नव्हता. 

-दिलीप कजगांवकर, पुणे

3088. तर ती सेवा नसते...तो स्वार्थ असतो

धूळ भरलेले पाय...
पावसाने भिजलेले टाळ...
ज्ञानोबा-तुकाराम चा अखंड गजर...आणि त्या गजरात मिसळलेले सेल्फी स्टिकस आणि handicams..
कोणी ड्रोन उडवत होते.
कोणी "Day 3 of Wari Vlog" म्हणत कॅमेऱ्यासमोर बोलत होते तर कोणी वारकऱ्यांना थांबवून पुन्हा चालायला सांगत होते.
"काका... एकदा टाळ वाजवत या बाजूने या."
"मावशी... कॅमेऱ्याकडे बघून जर हरी विठ्ठल म्हणा."
"भाऊ, हा शॉट व्हायरल जाणार !"
आणि तरीही.
त्या सगळ्या गोंधळात खरे वारकरी मात्र शांतपणे विठ्ठलाच्या नावात चालत होते. त्यांना कोण बघतंय याची पर्वा नव्हती...
कारण ते फक्त एका नजरेसाठी चालत होते... विठोबाच्या.
संध्याकाळी मुक्काम झाला. एका वडाच्या झाडाखाली एक सतरा-अठरा वर्षांचा मुलगा बसला होता.
अंगावर साधा धोतर, पाय धुळीने माखलेले मात्र चेहऱ्यावर विलक्षण तेज.
एक रिल्स स्टार त्याच्याजवळ आला.
"भाऊ... तुझा लूक भारी आहे.
एक रील करू या?"
"काय होणार त्याने"
मुलगा मंद हसला.
"लाखो व्ह्यूज...?
"त्याने विठ्ठल भेटतो का?" मुलगा बोलला.
रिल्स स्टार थोडा गोंधळला.
"नाही... पण वारी जगभर पोहोचते."
मुलगा म्हणाला,
"वारी जगभर पोहोचायला हरकत नाही.
पण आधी ती स्वतःच्या मनात पोहोचली पाहिजे.
तू वारी दाखवतोयस...
की स्वतःला?"
तो प्रश्न ऐकून आजूबाजूचे काही तरुणही तिथे जमले.
रिल्स स्टार पुन्हा म्हणाला,
"मग फोटो काढणं, व्हिडिओ करणं चूक आहे का?"
मुलगा शांतपणे म्हणाला,
"चूक मोबाईलमध्ये नाही...
चूक हेतूमध्ये असते. जर कॅमेरा विठोबाला दाखवत असेल...
तर ती सेवाच आहे.
पण जर प्रत्येक फ्रेममध्ये विठोबा आणि वारीपेक्षा स्वतःचाच चेहरा मोठा दिसत असेल...तर ती सेवा नसते...तो स्वार्थ असतो."
बाजूला उभा असलेल्या एकाने विचारले "मग वारकरी आणि रिल्स स्टार यांच्यात फरक काय?"
मुलगा हसला.
"वारकरी विठ्ठलाला भेटायला निघतो.
रिल्स स्टार अल्गोरिदमला भेटायला.
वारकरी नामाचा जप मोजतो.
रिल्स स्टार लाईक्स मोजतो"
सगळे शांत झाले.
काहींच्या हातातले मोबाईल नकळत खाली आले.
रिल्स स्टारने हळू आवाजात विचारलं,
"मग मी काय करू?"
मुलगा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,
"रील बनव...
कोणी नाही म्हणत.
पण अशी बनव...
की लोक तुझ्यावर नाही...
विठोबावर प्रेम करतील.
तुझ्या चेहऱ्यामुळे नाही...
तर विठ्ठलाच्या नामामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येईल.
लक्षात ठेव...
वारी ही स्वतःला दाखवण्याची जागा नाही...
स्वतःला विसरण्याची जागा आहे."
म्हणत तो मुलगा उठला दोन पावले चालला.
मागून कोणीतरी मोठ्याने विचारलं,
"अरे... नाव तरी सांग !"
तो थांबला.
आकाशाकडे पाहिले.
ओठांवर हलकंसं स्मित उमटले.
"हवं असेल...तर 'ज्ञाना' म्हणा."
तो पुढे चालत राहिला.
क्षणातच वारकऱ्यांच्या गर्दीत तो दिसेनासा झाला.
बराच वेळ कुणीच काही बोललं नाही.
काही वृद्ध वारकऱ्यांचे डोळे मात्र पाणवले होते. कारण तेच जाणे.

3087. कृष्णस्पर्श

 'कुब्जा’ हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ती मथुरेतील कंसाची दासी. 
कुरुप, कुबड असलेली एक वृद्धा. कंसासाठी ती चंदन घेऊन जात असते. वाटेत कृष्ण भेटतो. म्हणतो, ‘सुंदरी, मला देशील चंदन ?’ 
कुणी तरी तिला प्रथमच ‘सुंदरी’ म्हणाले होते. तिने कृष्णा'ला चंदनाचा लेप लावला. कृष्ण कुणाकडून तसेच काही कसे घेईल ? त्याने कुब्जेच्या हनुवटीला धरून ती वर उचलली आणि कुब्जा खरेच सुंदर झाली.
भक्तांना हे सहजच पटते. चिकित्सकांना ही निव्वळ कल्पित कहाणी वाटते. मला या कथेतून वेगळाच आनंद मिळतो.
कुणी असुंदर असेल तर मान उंचावून कसे वावरेल ? त्यात दासी असल्याने तिला ‘तोंड वर करायचा’ अधिकार तरी कसा असेल ? 
कृष्णाने कुब्जेची हनुवटी उंचावली. तिला ताठ व्हायला शिकवले. कुरूप असो की दासी असो; मान वर करूनच जगले पाहिजे, हे भान कृष्णाने तिला दिले.
‘दिसण्या-असण्यातून’ न्यूनगंड निर्माण होऊ न देता आपणही दिमाखात जगू शकतो, हे दाखवण्याची संधी ईश्वराने किती विश्वासाने आपल्याला दिली आहे. कुब्जा सुंदर झाली की नाही हे मला ठाऊक नाही; पण मनातली असुंदरतेची जाणीव कृष्णाने दूर केली, असे मला वाटते. 
इकडे आमच्या विठुरायाने ही कंबरेवर हात ठेवून, थाटात उभे राहत हे दाखवून दिले की, सौंदर्य नाही तर औदार्य महत्त्वाचे. सौंदर्य येते आणि वयोमानाने ओसरते ही.
औदार्य अठ्ठावीस युगे टवटवीतच राहते. खूपदा भक्ती करणारे ही जेव्हा म्हणतात की, देवा-धर्माचे इतके आम्ही करतो; पण ईश्वराची कृपा काही होत नाही.
पण, पारमार्थिक साधना म्हणजे जग बदलणे नाही, तर आपला दृष्टिकोन बदलणे हे समजले की आपल्या वृत्तीच्या कुब्जेला सुंदर व्हायला वेळच लागत नाही. 
रखरखत्या उन्हात कुठून कोकीळ कुजन ऐकू आले की मनाला निवलेपण जाणवते ना ?
पहिल्या पावसाने आसमंतभर दरवळणाऱ्या मातीच्या गंधाने चित्ताला हरखून जायला होते की नाही ?
तान्हे मूल कुणाचे ही असो;  गर्दी-गोंधळात ही आपल्या कडे बघून गोड हसते तेव्हा आपल्या ही ओठांवर स्मित रेषा दरवळते की नाही ? 
आपल्याबाबत हे घडते तेव्हा निश्चित मानावे की आपल्या ला कृष्णस्पर्श झाला आहे.
अंतरीची ही निरपेक्ष संवेदनशीलता हाच कृष्णाचा साक्षात्कार.
मनातली असुंदरतेची, अपूर्णतेची जाणीव संपली की सारे सुंदरच आहे. हे जाणवते.
माझ्या कृष्णाने निर्माण केलेले काहीही असुंदर असूच शकत नाही, ही श्रद्धा दृढ असली की झाले.

3086. उंबरठा

  ऑफिसमधून कविता बाहेर पडली. आपल्या कायनेटीकवर बसता बसता मनात म्हणाली. या महिन्यात तरी ते 'चार दिवस' येऊ नयेत. गेली अठरा वर्षे आपण हेच म्हणतोय.. पण ते 'चार दिवस'पाठ सोडतं नाहीत.. आता आपला धीर सुटत चाललंय.. किती वर्षे वाट पहायची?
लग्न होऊन एकोणीस वर्षे झाली. आता एकेचालीस वर्षे संपली. घरी सासू, नणंद माहेरी आईबाबा वाट पहातायत. काही बातमी येईल म्हणूंन.. पण महिन्याचे चार दिवस पाठ सोडतं नाहीत. डॉक्टरसल्ला घेऊन झाला. उपाय करुंन झाले.. सासूबाई नवस बोलतात.. पण व्यर्थ.   गाडी घरासमोर उभी करून ती घरात आली.. वॉशरूम मध्ये गेली.. पण ती आलीच. कविता निराश झाली.. या महिन्यात सुद्धा.  पुण्याच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरु होती.. सहा महिने झाले, पण उपयोग नाही. आपण कधी आई होऊ याची शक्यता तिला वाटेना. आणि यानंतर मूल झाल्यावर त्याला मोठं कधी करणार? त्याच शिक्षण, नोकरी, लग्न.. तोपर्यंत आपण असू किंवा नसू. काहीतरी निर्णय घ्यायला हवा. निरंजनशी बोलायला हवे.. त्याची आई.. ती तर डोळे लाऊन बसलेली. तिला पण विश्वासात घयायला हवे..
रात्री जेवणे झाली. कविता बेडरूममध्ये आली.. निरंजन लॅपटॉपवर काम करत होता.. त्याच्या बाजूला कविता बसली.. एक नजर कविताकडे टाकून तो म्हणाला 
'आज चेहेरा का पडलेला?
'आज 'पाळी 'आलीच. मुंबईच्या विरचंदणी डॉक्टरची ट्रीटमेंट सुरु होती सहा महिने. पण उपयोग होत नाही. खांदे उडवून निरंजनने डोके लॅपटॉपमध्ये घातले.
'निरंजन.. नुसते खांदे उडवून नाही चालणार. काहीतरी निर्णय घयायला हवा. तुझी आई.. बहीण.. माझे आईबाबा वाट पहात आहेत.. नातवंडाची आणि आपण त्याना निराश करतोय.
"मग काय करायच म्हणतेस? उपाय तर करतोय ना..
"उपाय झाले.. गेली अनेक वर्षे उपाय करतोय.. उपयोग नाही.. आता पुढे पहायला हवे.
'काय पुढे पहायला हवे?
"माझी चाळीशी दोन वर्षांपूर्वी संपली. आणखी पाच वर्षांनी मोनॉपोज येईल. आता मूल होण्याची शक्यता नाही रे..
'मग?
'आपण मूल दत्तक घेऊया का? छानसा मुलगा. आत्ता घेतला तर आपली साठी येईल तेंव्हा तो विशीत असेल. जास्त काळ थांबून नाही चालणार. आपली वये पण वाढतायत ना? ती आपण थांबवू शकत नाही.निर्णय तातडीने घयायला हवा.
'दत्तक? पण आईला ते नाही पटणार.
', आणि तुला?
'मलाही.. पण काही इलाजच नसेल तर..
'इलाज नाही म्हणूनच. एखाद मूल असावं घरात असे प्रत्येकाला वाटतं. मला पण वाटतं ना. आयुष्य पुढे पुढे जातंय..तू पंचेचालीस क्रॉस केलीस. मी बेचाळीस. अजून वाट पहात राहिलो तर काय म्हातारपणी दत्तक घेणार? आईच पण किती आयुष्य राहिलंय. त्याना पण पाहूदे ना मूल मोठे होत असताना..
'पण दत्तक म्हणजे.. कोण कुणाच... कुणाच्या रक्ताचे असेल कोण जाणे?
'रक्त्नाचे कुणाच्या पण असुदे.. पण आपले संस्कार महत्वाचे.
'पण आईला कस सांगणार?
'सुरवातीला सांगायचेच नाही.. घरी आणल्यावर पाहूदे..
'बर. तुझा हट्टच आहे तर होउदे तूझ्या मनासारखे.
'माझा हट्ट अस म्हणू नकोस. आपल्या सर्वासाठी.
'बर.. मग कुठे शोधायचं बाळ?
'पुण्यात एक अनाथाश्रम आहे.. खुप मोठा आहे.. माझी मैत्रीण सांगत होती, तिथे बरीच मूल असतात. तिथेच जाऊ..
'पण मुलगा की मुलगी बघायची?
'मुलगा.. तुमच्या आईला.. माझ्या आईला नातूच हवा असणारं.. म्हणून मुलगा बघू.
"ठीक. शनिवारी रविवारी जाऊ..आपल्याला दोघांनाही रजा असते..
'चालेल.
कविताने आनंदाने उशीवर मान टेकली. निरंजनने गाडी काढली आणि दोघे पुण्याला पोहोचले. सकाळी दोन अनाथाश्रम पाहिले पण हवा तसा मुलगा दिसेना. दुपारनंतर एका अनाथाश्रमात एक गोरा मुलगा दिसला. तिथल्या बाईने त्याला दाखवताच तो गालातल्या गालात हसला.. कविताला तो आवडला.. तिने त्याला उचलून घेतले आणि निरंजनकडे पाहिले.. त्याला पण तो आवडला. त्याला घेऊनच कविता ऑफिसमध्ये आली. तिने तिथल्या मुख्य बाईंना विचारले..
'हा मुलगा आम्हाला द्याल का?
'देऊ शकते.. पण तुम्ही दोन ओळखी आणा. कारण आम्हाला खात्री वाटायला हवी की मुलगा योग्य घरी जातोय. नाहीतर मुलांची विक्री करणारे पण असतात. दुसऱ्या दिवशी त्यानी निरंजनचा मित्र डॉ. सुमित आणि त्याची पत्नी डॉ. माया यांना घेऊन गेले. मग व्यवस्थित फॉर्म भरून आणि सुमित आणि माया यांच्या खात्रीवरुन मुलाला कविताच्या आणि निरंजनच्या ताब्यात दिले. त्या चार महिन्याच्या बाळाला घेऊन कविता आणि निरंजन घरी आले. निरंजनाच्या आईला धक्काचं होता..तिला हे अजिबात आवडल नव्हतं. ती न बोलता आपल्या घरात निघून गेली. कविताने पण छोटया बाळाला प्रेमाने घरात घेतलं. ऑफिस मधून सहा महिने रजा घेतली. आपल्या आईला बोलावून घेतलं. तिची आई पण आली.. घरातल्या घरात बारसं केल.. नाव ठेवलं आशू.
      आशू गुणी होता. कुणा अभागी आई त्याला सोडून गेली होती कोण जाणे. पण तो कविताला त्रास देत नव्हता. रात्री व्यवस्थित झोपत होता. खातपीत होता. घरात त्याची जाग होती. कविताची नाराज सासू पण त्याला मांडीवर घेत होती. भरवत होती. निरंजनला कधी घरी जातो आणि आशूला घेतो असे वाटतं होते. त्याला सोडून ऑफिसला जाताना जीवावर येत होते. निरंजनची बहीण पण दर रविवारी भाच्याला बघायला माहेरी येत होती. आशू म्हणजे सर्वांच्या गळ्यातला ताईत झाला होता.
    कविताची रजा संपली पण आता तिला काळजी वाटतं नव्हती.. एक बाई होतीच लक्ष द्यायला. शिवाय सासूबाई पण होत्याच. आपण योग्य वेळीच निर्णय घेतला याचे तिला समाधान वाटतं होते. निरंजन सुद्धा तिला तुझ्यामुळेच आपण योग्य निर्णय घेतला, हे वारंवार सांगत होता. आशू दोन वर्षाचा झाला. वयाच्या मानाने तो मोठा वाटतं होता.. सर्व काही छान होते. आणी.
    स्वातंत्र्यदिन होता. कविताला ऑफिसमध्ये झेंडावंदनाला जायचं होत. ती सकाळी लवकर उठली आणि बाथरूममध्ये जाताजाता तिला मळमळल्या सारखे झाले आणि उलटी झाली. तिने तोंड स्वच्छ धुतले पण तिचे पेटके कमी होईनात. भिंतीला धरून धरून ती बेडपाशी आली. आज आपल्याला अचानक काय झाले तिच्या लक्षात येईना.. तिने नवऱ्याला उठविले. पित्त झाले असणारं म्हणून त्याने जेलूशीलची गोळी दिली. पण काही कमी वाटेना. तिला काही तरी चमत्कारीक वाटतं होते. निरंजनने तिला ऑफिसमध्ये सोडले आणि तो बाहेर वाट पहात गाडीत बसुन राहिला.. एक तासात ती बाहेर पडली आणि गाडी डॉ. साने यांच्या हॉस्पिटलमध्ये. डॉ. मिसेस साने यांनी तिला तपासले आणि म्हणाल्या..
'कविता.. गेली कित्येक वर्षे तू ज्या साठी आसूसली होतीस.. तेच तूझ्या पदरी येतंय... या महिन्यात पाळी होती?
'नाही बहुतेक. मी मुलगा दत्तक घेतलाय आशू.  त्याचे करता करता माझ्या लक्षातच राहत नाहीत या गोष्टी..
'अस कस.. स्त्रीने या नैसगिक क्रिया लक्षात ठेवायच्या असतात. तू युरीन दे चेकिंगला. पण माझा अंदाज चुकायचा नाही. आशूला भावंड पाठवलंय देवाने..
'काय? अरे देवा.. या वयात?
'त्यात काय? जोपर्यत पाळी येत असते. तोपर्यत दिवस राहण्याची शक्यता असतेच. तूझ्या बाबतीत फार उशिरा होतंय हे.
'पण डॉक्टर.. एवढे प्रयत्न झाले पण यश येत नव्हते म्हणून मी मुलगा दत्तक घेतला आणि आता हे?
'दत्तक मुलगा चांगल्या पायगुणाचा म्हणायचा.. त्याला पण भावंड हवं का नको? तू बाहेर युरीन सॅम्पल दे.
खात्री करूया.
कविताने लॅबमध्ये जाऊन युरीन सॅम्पल दिले आणि बाहेर बसलेल्या नवऱ्याला डॉक्टरांचे म्हणणे सांगितले.
"अग असू दे ना. आपल्याला काय कमी आहे? दोघेही नोकरी करतो. स्वतः चे घर आहे..आईला दोन नातवंडे होतील. खेळवील ती दोन मुलांना.
कविता आई होणार हे सर्वाना कळले.
     सासूबाई खूष. गेली कित्येक वर्षे ज्याची त्या वाट पहात होत्या. तेच होणार होते. कविताला बाळ व्हावे म्हणून त्यानी किती नवस बोलले होते. पूजा केल्या होत्या. निरंजन खूष होता. त्याला आपल्या अंगामासाचे बाळ हवं होते. खूष नव्हती ती कविता. तिला पुढील पेच दिसत होते. तिला आशुची काळजी वाटतं होती. त्यात करून मुलगी झाली तर बरे असे तिला वाटतं होते. म्हणजे स्पर्धा होणार नव्हती. दर महिन्याला व्यवस्थित तपासणी सुरु होती.. नऊ महिने झाले आणि कविता प्रसूत झाली.. मुलगा झाला.
     घर बेहद्द खूष झाले. कविताची सासू अनेक नवस बोलली होती. ते फेडू लागली. निरंजन बेहद्द खूष होता. आशू भांबवला होता.. हे नवीन बाळ घरात येणार.. म्हणून खूष पण झाला होता. शेजारी पाजारी हा आशूचा पायगुण बर.. अस सांगत होते. कविताची सासू पण आशुची पाठ थोपटत होती. नवीन बाळाचा बारसा हॉलमध्ये नातेवाईकांना, शेजाऱ्यांना बोलावून केला.. मुलाचे नाव ठेवले  अधीर.
========सात वर्षानंतर =====
         आशू नऊ वर्षाचा आणि अधीर  सहा वर्षाचा. दोघे भाऊ एकमेकांशिवाय रहात नसतं. आशू शाळेत जाताना अधीरला संभाळून नेई..त्याचा डबा उघडून देई. कविताला छान वाटे. असेच दोन्ही भावांचे एकमेकांवर प्रेम असावे असे तिला वाटे.. पण मोठ्यांच्या प्रेमात फरक जाणवत होता.
 आजी अधीरला जवळ घेऊन खाऊ देई आणि आशूच्या हातावर टाकी.निरंजन साफ बदलला होता.आशुचा स्कॉलरशिप निकाल लागला आणि तो तालुक्यात पहिला आला.. कविताला रिजल्ट कळला तेंव्हा ती हरकून गेली. तिने नवऱ्याला फोन केला आणि ही आनंदाची बातमी सांगितली.
तिला वाटले होते.. नवऱ्याला पण आपल्यासारखा आनंद होईल.
पण त्याने शांतपणे रिजल्ट ऐकला आणि फोन ठेवला. संध्याकाळी ती पेढे घेऊन घरी गेली, तिने आशूला सांगितले.. आजीला पेढे दे आणि नमस्कार कर. आशू नमस्कार करायला गेला तेंव्हा तिने पेढे घेतले आणि बाजूला ठेवले.. किती मार्क्स.
वगैरे काही विचारलं नाही. आशू हिरमूसला. रात्री बाबा आल्यावर त्याने बाबांना पेढे दिले..
त्याने पण पेढे शांतपणे बाजूला ठेवले. पण अधीर दुसरी पास झाला तर त्याच्या बाबांनी गुलाब जामून वाटले बिल्डिंग मध्ये.
कविताला हे जाणवत होते, ती नवऱ्याला सांगत होती..हे बरे नव्हे.. आशू आणि अधीर यात भेदभाव असता कामा नये.. पण तो होतच होता. आशू सायकल शिकत होता.. त्याने अधीरला पुढे घेतले आणि प्याडल मारत होता.. सायकल स्लिप झाली आणि दोघे पडले. अधीरच्या पोटावर सायकल पडली आणि त्यावर आशू. अधीरला खुप लागले. गुढगे फुटले.. हात मुरगूळला.. आशू वर पडल्याने त्याला काही लागले नाही... दोघांना शेजाऱ्यांनी घरी आणले. आशूला काही लागले नाही आणि अधीरला बराच मार लागला हे पाहून त्याची आजी चिडली.. काय वाट्टेल तसे आशूला बोलायला लागली..'तू मुद्दाम पाडलंस अधीरला.. तुला तो नकोच असतो.. वेगळे रक्त ना तुझे.. कोण कुणाचे कोण जाणे.. छळ आहे नुसता.. कविता नुकतीच घरी येत होती.. आशू धावत तिला सांगायला आला.. तिने आशूला जवळ घेतले आणि ती अधीरकडे गेली.. त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली.. गुढग्याला पट्टी मारून आणि गोळया घेऊन आली. रात्री निरंजन लवकर घरी आला.. त्याला बहुतेक त्याच्या आईने तिखटमीठ लाऊन सर्व सांगितले असणारं.. त्याने आशुच्या दोन थोबाडीत दिल्या. आशू रडतरडत कविताकडे आला.. कविता चिडली 
"का मारलस तू आशूला? तू त्याचा बाप आहेस म्हणून?
'मी बाप नाही त्याचा.. मी फक्त अधीरचा बाप आहे.. माझ्या मुलाला मुद्दाम पडलेलं मला आवडणार नाही.
'तू आशचा बाप नाहीस? अरे आशू शाळेत बाप म्हणून तुझं नाव लावतो.
', मला आवडत नाही ते.. कोण कुणाच्या पाप्याचे रक्त असेल कोण जाणे.. माझं नाव लावू नकोस म्हणावे..
"निरंजन.. एवढा बदललास.. का आणलं आपण आशूला? तो आपणहून आला नाही इथं.. त्याला दत्तक मुलगा म्हणून आणलंय.. त्या वेळी बरा सांगत होतास.. आपण योग्य निर्णय घेतला म्हणूंन.
"त्याला दत्तक घेण्याचा निर्णय तुझा होता.. मला नकोच होत हे पोर..
'मग पुण्याला अनाथाश्रमात कोण गेलं होत? बाप म्हणून कुणाची सही केली?
'मी केली असेल.. पण तूझ्या हट्टसाठी..
"ठीक आहे.. योग्य वेळी मी उत्तर देईन.
कविता आणि निरंजन यांच्यात अबोला आला.. जेवढ्यास तेवढे बोलणे होत होते.. ती अधीर आणि आशू यांना सारखेच खाऊ, कपडे, बूट आणायची. पण तिच्या लक्षात आले अधीरची आजी आता जास्त आपल्यकडे ओढायला लागली आहे.
          आशूला कांजण्या आल्या.. कांजण्यांनी तो फुलला.. ती त्यावर घरगुती आणि वैद्यचे उपचार करत होती. एक दिवस निरंजन चिडला 
'त्याचे इन्फेकशन अधीरला होईल.. त्याला दुसरीकडे ठेव नाहीतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिय कर.. पण अधीरला काही होता कामा नये...
 कविता चिडली 'होऊदे ना इन्फेकशन.. भावाचे भावाला होणारच.. तुला मागे कांजण्या आलेल्या, त्या मग मला नाही का आल्या?
'पण अधीरला..
'हो हो अधीरला.. तो माझाच मुलगा आहे.. मी त्याला जन्म दिलाय.. त्याची काळजी मला आहेच.. पण आशुची पण आहे कारण तो पण मुलगाच आहे माझा..
  त्या दिवसापासून अधीर आजीसोबत झोपू लागला. आजी अधीरची जास्त काळजी घेत होती.
त्यामुळे असेल पण अधीर जास्तीतजास्त वेळ आजीच्या खोलीत राहू लागला.
कविताची कुचम्बणा होत होती. केंव्हा केंव्हा तिच्या मनात यायचे.. आपण घाई केली का दत्तक घेण्याची.. पण दुसरे मन सांगत होते.. केली म्हणूनच आशु सारखा मुलगा मिळाला.
भाऊबीजेला निरंजनची बहीण सर्वाना बोलवी.. तिची छोटी मुलगी होती.. पियू.. बहीण निरंजनला ओवाळी आणि पियू या दोघांना. दरवर्षी पियू अधीरला किमती वास्तू देई आणि आशूला पेन किंवा पेन्सिल. लहान होते तेंव्हा आशुच्या हे लक्षात येत नव्हते पण आता त्याच्या लक्षात येऊ लागलेले.
या भाऊबीजेला पियूने अधीरला महागडी क्रिकेट बॅट दिली आणि आशूला बॉलपेन. आशुने अधीरच्या हातातील बॅट पाहिली... आपल्याला दिलेले पेन पाहिले आणि पेन फेकून दिले. निरंजनच्या बहिणीने हे पाहिले आणि ती आशूला मारायला धावली.
"भिकारड्या.. पेन फेकतोस..
दुसऱ्या क्षणी कविता नणंदे वर ओरडली
' खबरदार.. माझ्या मुलाला भिकारड्या म्हणालीस तर..
'तुझा मुलगा? कविता.. कोण कुठल्या बेवारशी मुलासाठी माझ्यावर चिडतेस.. दादाला सांगावे लागेल मला..
'अग जा.. दादाला सांगणारी.. अधीर व्हायच्या आधी आशुचेच लाड करायचीस ना.. माझ्या दादाचा कुलदीपक म्हणायचीस.. अधीर झाल्याबरोबर एवढी बदललीस.. या पुढे तूझ्या घरची पायरी चढणार नाही लक्षात ठेव..
अधीरला आणि आशूला घेऊन ती बाहेर पडली.
कविताला झोप येईनाशी झाली.. सासू, नवरा, नणंद सारीच बोलींनाशी झालीत.. काही तरी निर्णय घ्यायला हवा.. हे तिच्या लक्षात आले. आशु साठी तिचा जीव तडफडत होता.. या पोराला बापाचे, आजीचे प्रेम मिळतं नाही आहे.. जसजसा तो मोठा होईल तसे त्याला जास्त कळायला लागेल....
एक दिवस शाळेतून दोघेही एकदम आले. कविता रजेवर होती. आशु आईला म्हणाला..
"आई, मी तुझा मुलगा नाही काय?
तिला धक्काचं बसला..
"अरे कोण म्हणत अस? तू आमचाच मुलगा..
'अग ती शेजारची जांभळेकाकू सांगत होती... तू कविताचा मुलगा नाहीस.. तुला विकत घेतलंय तूझ्या आईबाबांनी.. अधीर त्त्यांचा मुलगा.. म्हणूंन त्याची आजी अधीरचे लाड करते.. तुझे नाही..
तिने आशूला जवळ ओढले "नाही रे बाळा.. लोक दुष्ट असतात.. काहिबाही सांगतात माझ्या बाळाला..
 एवढ्यात अधीर म्हणाला "होय आई.. मला पण रिक्षावाले मामा सांगत होते.. हा तुझा खरा भाऊ नाही म्हणूंन.. याला आश्रमातून आणलाय..
तिने अधीरला पण जवळ घेतले...
'लोक लबाड असतात माझ्या पिल्लानू.. लोकांना बरे बघवत नाही.. मी विचारते त्या जांभळे काकूंना आणि रिक्षा वाल्याला..
  मूल खेळायला गेली पण कविता खुप रडली. आपल्यामुळे आशूला अस ऐकावे लागते आणि यापुढे जास्त जास्त ऐकावे लागेल.. त्या मुळे या दोन भावात..
नको नको.. माझी मुले.. माझ्या मुलात दुरावा नको.. त्यासाठी मलाच उंबरठा ओलांडवा लागेल.
     आशु सहावीत गेला तसा तिने त्याचे नाव पुण्याच्या शाळेत घातले. आपली बदली पुण्यात करून घेतली.. पुण्यात भाडयाने लहानसा प्लॅट पाहिला.
घरी हे कुणाला माहित नव्हते.. तिने भरलेल्या बॅग पाहून निरंजन म्हणाला
'कुठे जाते आहेस काय? एवढ्या बॅगा?
", मी आशुचा हात पकडून घर सोडतेय?
"काय? डोके फिरलं का तुझं?
"डोके जाग्यावरच आहे.. निर्णय घेतलाय मी.. आशूला तुम्ही आपला मानत नाही... त्याच्यातील रक्त तुमचे नाही.. यात त्याचा काय दोष? त्याला आपण आणले नसते तर कुणी दुसऱ्याने गरजवंताने नेले असते.. पण तुमची गरज संपली कारण अधीर जन्मला.. मग काय.. गरज सरो अन वैद्य मरो.. पण मी त्याला टाकू शकत नाही कारण जसा अधीर माझा मुलगा आहे तसाच आशु पण माझाच मुलगा...
अधीर आता आजीकडेच असतो.. त्याला बाबा आहे.. आते आहे.. आशूला कोणच नाही आहे..आणि आता घरची तसेच आजूबाजूची लोक आशूला सांगायला लागली आहेत.. तू अधीरचा भाऊ नाहीस.. तुला विकत घेतलंय म्हणून.. काय परिणाम होत असेल त्याच्या मनावर? त्याने जर मला विचारले.. का घेऊन आलीस मला अनाथाश्रमातून, मी तेथेच बरा होतो.. तर काय उत्तर देऊ मी?
  निरंजन.. मी आशूला घेऊन पुण्याला शिफ्ट होतेय.. माझी बदली पुण्याला झाली आहे.. छोटे घर घेतलंय मी आम्हा दोघांपुरते.. मी या घराचा उंबरठा ओलांडतंय..
"म्हणजे कायमची चाललीस तू? आणि अधीर.. मी.. आई..
'नाही.. कायमची नाही.. येत जात असेन.. सणासुदीला येईन पण पाहुण्यासारखी... गरज असेल तेंव्हा मध्यरात्री हाक मार.. धावत येईन.. पण माझ्या आशुसाठी मला हा निर्णय घायलाच लागला..
   मी आणि आशू उद्याच पुण्याला जातोय.

 प्रदीप केळूसकर 9307521152/9422381299

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...