शनिवार, २५ जुलै, २०२६

3064. कॉर्सेअर

 होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या संवेदनशील भागात अमेरिकन लष्कराचं विशाल ‘AH-64 Apache’ हेलिकॉप्टर गस्त घालत होतं. पण तंत्रज्ञान आणि निसर्गाच्या या खेळात पुढच्या क्षणी काय घडेल हे सांगता येत नाही. अचानक काहीतरी बिघडलं. कदाचित तांत्रिक बिघाड झाला असेल किंवा इराणच्या ‘स्टेल्थ ड्रोन’चा हल्ला झाला असेल. काही क्षणांतच हे शक्तिशाली हेलिकॉप्टर थेट समुद्राच्या उग्र लाटांमध्ये कोसळलं. हेलिकॉप्टरमधले दोन पायलट अथांग आणि थंड समुद्राच्या पाण्यात आपल्या जीवासाठी संघर्ष करत होते. रात्र काळोखी होती आणि वारा जोरात वाहत होता. पारंपरिक पद्धतीनं बचाव जहाज किंवा हेलिकॉप्टर पाठवणं म्हणजे आणखी जीव धोक्यात घालण्यासारखं होतं.
परंतु हजारो मैल दूर अमेरिकन ५व्या ताफ्याच्या ‘Task Force 59’च्या मुख्यालयात संगणकाच्या स्क्रीनवर हालचाली सुरू होत्या.
तिथं मानवरहित, स्वयंचलित बोट– ‘Corsair’
हिला तातडीचे आदेश दिले जात होते.
मानवाविना चालणारी ही २४ फूट लांबीची बोट समुद्राच्या लाटांना चिरत पुढं निघाली. तिला डोळे नव्हते, पण अत्याधुनिक रडार आणि AI कॅमेऱ्यांच्या मदतीनं ती आजूबाजूचे निरीक्षण करत होती.
दोन तासांच्या आत, काळोख्या रात्रीत तिनं त्या अथांग सागरात मृत्यूशी झुंजणार्‍या पायलट्सचं अचूक स्थान शोधलं आणि ती त्यांच्या समोर पोहोचली. जीव वाचवण्यासाठी संघर्ष करणारे दोन्ही पायलट त्या बोटीत चढले.
Corsair नं त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणलं. संरक्षण क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच मानवी चालक नसलेल्या एका यंत्रानं मानवाचा जीव वाचवला.
परंतु या संपूर्ण अद्भुत कथेतला खरा नायक ओमानच्या समुद्रात नव्हता. तो हजारो मैल दूर अमेरिकेतील टेक्सास राज्यातील एका प्रयोगशाळेत बसला होता. त्या तरुणाचे नाव होतं-
आपल्या महाराष्ट्रातला विभव अल्तेकर!
विभवची कथा वाचताना आपल्याला ‘थॉमस अल्वा एडिसन’ किंवा ‘जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर' यांसारख्या ध्येयवेड्या संशोधकांची आठवण येते. हा तरुण महाराष्ट्रातल्या एका सामान्य भारतीय कुटुंबातून आला होता. पण त्याच्या डोळ्यांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मोठी स्वप्नं होती.
      कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्युत अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना, केवळ केबल्स आणि वायरपुरतं मर्यादित नसलेल्या, स्वतः विचार करू शकणाऱ्या तंत्रज्ञानानं विभवला आकर्षित केलं.
सप्टेंबर २०२२ मध्ये माजी नेव्ही सील कमांडो ‘डिनो मावरुकास’ यांनी एका नव्या कल्पनेला जन्म दिला— ‘Saronic Technologies’!
समुद्रात काम करू शकणारे आणि कठीण परिस्थितीत कार्य करणारे रोबोट तयार करणं हे त्यांचे ध्येय होतं. मात्र ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना एका तीक्ष्ण बुद्धिमत्तेची गरज होती. ती बुद्धिमत्ता त्यांना विभवच्या रूपानं मिळाली.
विभव या कंपनीचा सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) बनला.
रात्रंदिवस मेहनत करून, शेकडो ओळींचे कोड लिहून आणि गुंतागुंतीचे मशीन लर्निंग प्रयोग करून विभवने या Corsair ड्रोनचं ‘मेंदू’ आणि ‘हृदय’ विकसित केलं.
यापूर्वी Anduril या कंपनीत काम करताना त्यानं ऑस्ट्रेलियन नौदलाच्या ‘Ghost Shark’ ड्रोन पाणबुडी प्रकल्पातही आपलं कौशल्य दाखवलं होतं.
आज त्याच्या कामगिरीमुळे अमेरिकन नौदलानं त्याच्या कंपनीसोबत तब्बल ₹3,200 कोटी ($392 दशलक्ष) किमतीचा मोठा करार केलाय!
विभवनं तयार केलेली ही Corsair बोट म्हणजे विज्ञानाचा एक चमत्कार आहे… तिच्या रचनेकडे पाहिलं, तर विभवच्या अभियांत्रिकी कौशल्याची अचूकता आश्चर्यचकित करते:
कठोर डिझाइन:
फक्त २४ फूट लांबीची ही बोट समुद्राच्या लाटांवर ताशी ६५ किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं धावू शकते.
प्रचंड क्षमता:
अल्प वजन असूनही ती सुमारे ४५४ किलो वजन सहज वाहून नेऊ शकते. त्यामुळं जड G-सूट घातलेल्या दोन पायलट्सनाही ती सुरक्षितपणे वाहून नेऊ शकली.
स्वयंचलित दृष्टी आणि बुद्धिमत्ता:
एकदा इंधन भरल्यानंतर ती कोणत्याही मानवी मदतीशिवाय सुमारे १,८५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करू शकते आणि स्वतः निर्णय घेऊ शकते.
मानवाच्या इतिहासात युद्धं आणि आपत्ती यांनी नेहमीच अनेकांचे जीव घेतले आहेत. पण विभव अल्तेकरसारख्या भारतीय तरुणानं आपल्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यानं निसर्ग आणि युद्धाच्या कठोर वास्तवाला आव्हान दिलंय…
‘Corsair’नं वाचवलेले दोन जीव हे केवळ दोन सैनिकांचे जीव नव्हते, तर ती विज्ञानानं मानवतेला दिलेली एक सुंदर भेट होती.
जेव्हा विज्ञानाचा वापर विनाशासाठी नव्हे, तर संरक्षण आणि जीव वाचवण्यासाठी केला जातो, तेव्हा खऱ्या अर्थानं एका नव्या युगाची सुरुवात होते…
आणि विभवनं हे जगाला दाखवून दिलंय!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...