शनिवार, २५ जुलै, २०२६

3034. एका 'फॉर्म्युल्याची' भन्नाट गोष्ट !

 १९५३ सालची गोष्ट आहे. एका बाजूला अमेरिकन सरकार रशियाला धडकी भरवण्यासाठी अक्राळविक्राळ 'ॲटलस' मिसाईल्स बनवण्याच्या कामात मग्न होतं, तर दुसरीकडे सॅन दिएगोमधल्या एका छोट्या लॅबमध्ये नॉर्म लार्सन नावाचा एक केमिस्ट सलग ३९ वेळा नापास होत होता.
ज्या मिसाईल्सनी अंतराळात झेप घ्यायची होती, त्यांना गंज लागण्यापासून वाचवणारा एक फॉर्म्युला लार्सन शोधत होते, पण यश काही केल्या पदरात पडत नव्हतं.
विज्ञानाची कमाल पहा...जे रसायन अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या रॉकेटसाठी बनवलं गेलं होतं, तेच आज आपल्या घराघरात पावसाळ्यात जाम झालेली कुलुपं आणि अडकलेल्या चाव्या उघडण्यासाठी वापरलं जातं!
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की छत्री आणि रेनकोटसोबतच आजकाल सुजाण बाईकस्वारांच्या बॅगेत एक निळ्या-पिवळ्या रंगाचा कॅन दिसतो, तो म्हणजे… ‘WD-40’.
‘WD-40’ या नावामागचा किस्सा मोठा रंजक आहे… ‘WD’ म्हणजे ‘Water Displacement’ आणि ‘40’ म्हणजे चाळीसावा प्रयत्न.
नॉर्म लार्सन आणि त्यांच्या टीमनं तब्बल ३९ वेळा वेगवेगळी मिश्रणं तयार केली,पण ती सगळी फेल गेली. शेवटी चाळीसाव्या प्रयत्नात त्यांना जे हवं होतं ते मिळालं आणि जगाला गंज घालवणारं एक अजब अस्त्र मिळालं. 
सुरुवातीला हे रसायन फक्त ‘रॉकेट केमिकल कंपनी’साठी बनवलं गेलं होतं. मिसाईल्सचे भाग गंजू नयेत आणि ते स्वच्छ राहावेत, हाच त्याचा मूळ उद्देश होता.
परंतु कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या लक्षात आलं की, हे रसायन तर जादूई आहे. ते चोरून आपल्या जेवणाच्या डब्यात भरून घरी नेऊ लागले. कुणाच्या घराचा दरवाजा करकरत होता, तर कुणाचं सायकलचं चाक जाम झालं होतं.
कामगारांनी घरी नेलेल्या त्या चोरट्या नमुन्यांनी इतकं भारी काम केलं की, नॉर्म लार्सन यांना आपली स्ट्रॅटेजी बदलावी लागली. विज्ञानाची ही प्रगती फक्त रॉकेटपुरती मर्यादित न ठेवता ती सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
या प्रॉडक्टचं यश पाहून अनेक कंपन्यांना त्याचा फॉर्म्युला हवा होता. पण नॉर्म लार्सन यांनी एक अजब चाल खेळली. त्यांनी ‘WD-40’चं कधीही पेटंट घेतलं नाही. पेटंट घेतलं असतं तर त्यांना त्यात काय काय वापरलंय हे जगाला सांगावं लागलं असतं आणि १७ वर्षांनंतर कुणालाही त्याची कॉपी करता आली असती.
त्याऐवजी त्यांनी हा फॉर्म्युला एक 'ट्रेड सीक्रेट' म्हणून जपून ठेवला. आजही या रसायनाचा मूळ फॉर्म्युला सॅन दिएगोमधल्या एका बँकेच्या लॉकरमध्ये अतिशय सुरक्षित ठेवलेला आहे. ‘कोका-कोला’च्या रेसिपीसारखंच हे एक असं गुपित आहे, जे जगाला माहीत असूनही कुणालाच बनवता येत नाही. 
बरं, या प्रॉडक्टच्या जाहिराती हा तर एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. परदेशात याच्या काही जाहिराती थोड्याशा ‘चावट’ किंवा द्विअर्थी ढंगानं केल्या गेल्या, ज्या बघून कुणालाही हसू येईल. परंतु त्यामागं एकच मेसेज होता. ‘जर काही अडकलं असेल, तर ते सोडवण्यासाठी आम्ही आहोतच !’
मंडळी, आज जगभरात दररोज १० लाखांहून अधिक ‘WD-40’चे कॅन विकले जातात. पावसाळ्यात जेव्हा तुमच्या गाडीचं लॉक जाम होतं किंवा खिडकीचा बिजागरी आवाज करायला लागते, तेव्हा हे चाळीसाव्या प्रयत्नात मिळालेलं यशच धावून येतं.
नाही, म्हणजे विचार करा, जर नॉर्म लार्सन ३९ व्या अपयशानंतर थांबले असते, तर आज आपल्याला पावसाळ्यात जाम झालेल्या चावीशी किती कुस्ती खेळावी लागली असती?
कधी कधी तुमचं मोठं यश हे तुमच्या ३९ अपयशांच्या अगदी पुढच्या पाऊलावर उभं असतं, नाही का?



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...