माधवराव कुलकर्णींचा फोन फारसा वाजत नसे. वाजलाच तर एखादी बँक, एखादी विमा कंपनी किंवा महिन्यातून एक-दोन वेळा मुलाचा फोन. निवृत्तीला सात वर्षे झाली होती. पत्नी शैलजा गेल्यानंतर घरातला आवाज आणखी कमी झाला होता. घरात सगळं होतं - फर्निचर, पुस्तकं, फोटो, आठवणी. फक्त माणसांची वर्दळ कमी झाली होती. माधवराव मात्र तक्रार करत बसणाऱ्यांपैकी नव्हते. सकाळी फिरणं, झाडांना पाणी घालणं, वर्तमानपत्र, एखादं पुस्तक आणि संध्याकाळी देवळापर्यंत फेरफटका. आयुष्य शांतपणे चाललं होतं. त्या दिवशी दुपारी फोन वाजला. अनोळखी नंबर.
"हॅलो!"
समोरून एका मुलीचा घाईघाईचा आवाज आला.
"आई, ऐक ना...मी पोहोचले गं."
माधवरावांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं.
"बाळा, आई नाही बोलत आहे. रॉंग नंबर लागलाय."
क्षणभर शांतता.
"अय्या ! सॉरी सॉरी, काका. चुकून लागला."
फोन कट झाला. माधवरावांनी फोन बाजूला ठेवला आणि पुन्हा पुस्तक उघडलं.
दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला पुन्हा फोन.
तोच नंबर.
"हॅलो !"
"आई..."
माधवराव खळखळून हसले.
"अगं, अजून नंबर सेव्ह केला नाहीस वाटतं."
तिकडूनही हसू आलं.
"देवा ! पुन्हा तुम्हीच?"
"हो. आणि पुन्हा रॉंग नंबर."
त्या दिवशी पहिल्यांदाच फोन ठेवताना दोघेही हसत होते.
तिसऱ्या दिवशी पुन्हा फोन. मात्र यावेळी मुलीने आधीच विचारलं,
"काका, आज नंबर बरोबर आहे ना?"
"नाही. पण आता सवय झाली आहे."
दोघेही पुन्हा हसले.
मुलीचं नाव स्नेहा. पुण्यात एका कंपनीत नोकरी. एकटी राहणारी. धावपळीच्या आयुष्यात अडकलेली. फोनवरची ती दोन-तीन मिनिटांची बोलणी कधी सवय झाली ते दोघांनाही कळलं नाही. एक दिवस स्नेहाने विचारलं,
"काका, तुम्ही दिवसभर काय करता?"
"हा प्रश्न विचारणारी तू पहिली नाहीस."
"मग उत्तर?"
"सकाळी चहा पितो. झाडांना पाणी घालतो. वर्तमानपत्र वाचतो. पुस्तक वाचतो. फिरायला जातो."
"बस्स?"
"हो."
"बोअर होत नाही?"
माधवराव काही क्षण शांत राहिले.
मग म्हणाले,
"एकटं राहणं आणि एकटेपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत गं."
फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. त्या दिवशी स्नेहाने विषय बदलला, पण ते वाक्य तिच्या मनात कुठेतरी राहिलं. हळूहळू फोनची वेळ वाढू लागली.
कधी ऑफिसमधला ताण.
कधी बॉसवरचा राग.
कधी स्वतःवरची चिडचिड.
कधी फक्त गप्पा.
माधवराव ऐकून घ्यायचे.
उपदेश फारसे करायचे नाहीत. पण योग्य वेळी एखादं वाक्य बोलायचे. आणि ते वाक्य अनेकदा स्नेहाला आठवडाभर पुरायचं. एक दिवस ती खूप अस्वस्थ होती.
"काका, मला वाटतं मी आयुष्यात खूप मागे पडते आहे."
"कोणाच्या तुलनेत?"
"सगळ्यांच्या."
माधवराव हसले.
"आपण धावतोय त्या शर्यतीत बाकीचे लोक भाग घेतलेलेच नसतात अनेकदा."
स्नेहा बराच वेळ शांत होती.
मग म्हणाली,
"तुम्ही हे सगळं इतकं सहज कसं बोलता?"
माधवरावांचं उत्तर साधं होतं.
"कारण मी तुझ्यापेक्षा जास्त चुका केल्या आहेत."
महिने गेले.
फोन आता सवय झाला होता.
एक दिवस स्नेहा अचानक म्हणाली,
"काका, मी तुम्हाला भेटायला येऊ का?"
माधवराव थोडे गोंधळले.
"मला?"
"हो, तुम्हाला."
"माझ्यात एवढं काय आहे?"
स्नेहा हसली.
"मला तेच बघायचं आहे."
पुढच्या रविवारी ती आली. दार उघडलं. समोर एक साधी, हसरी मुलगी उभी होती. खांद्यावर बॅग.
डोळ्यांत उत्सुकता. दोघे काही क्षण एकमेकांकडे बघत राहिले. आणि मग नकळत हसले. जणू अनेक वर्षांची ओळख होती. चहा झाला. गप्पा झाल्या. जुन्या फोटो अल्बम्स बाहेर आले. माधवरावांनी तरुणपणाच्या आठवणी सांगितल्या. स्नेहा पोट धरून हसत होती. वेळ कसा गेला समजलंच नाही. निघताना तिची नजर भिंतीवरच्या एका फोटोकडे गेली. माधवराव आणि त्यांची पत्नी. स्नेहाने हळूच विचारलं,
"काकू किती वर्षांपूर्वी गेल्या?"
"सात."
माधवराव शांतपणे म्हणाले.
"आणि मुलं?"
"आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत."
स्नेहाने मान हलवली. मग काही क्षण गप्प राहिली. नंतर हळू आवाजात म्हणाली,
"माझे बाबा मी दहा वर्षांची असताना गेले."
माधवराव काही बोलले नाहीत. पण अचानक अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. संध्याकाळ झाली. स्नेहा निघायला उठली. दारापाशी आली. बॅग खांद्यावर घेतली.
"ठीक आहे काका, निघते."
माधवराव हसले.
"हो. काळजी घे."
ती दोन पावलं पुढे गेली. मग अचानक थांबली. क्षणभर विचारात पडल्यासारखी झाली. आणि परत फिरली.
माधवरावांना काही कळायच्या आत, ती त्यांच्या पायांवर वाकली. ते दचकले.
"अगं! हे काय करतेस?"
स्नेहाने वर पाहिलं. तिचे डोळे ओलावले होते. ती हलकंसं हसली. आणि म्हणाली,
"निघते बाबा...!"
क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला. माधवरावांच्या डोळ्यातलं पाणी तेव्हा अडवलं गेलं नाही. कारण, काही शब्द ऐकण्यासाठी माणूस अनेक वर्षं थांबत असतो. स्नेहा निघून गेल्यानंतर बराच वेळ माधवराव दारातच उभे होते.
घर तेच होतं.
भिंती त्याच होत्या.
खिडक्या त्याच होत्या.
पण अनेक वर्षांनी घर पुन्हा रिकामं वाटत नव्हतं.
आता फोन अजूनही येतात.
स्नेहा अजूनही ऑफिसमधला राग काढते.
सल्ला घेते.
कधी फक्त विचारते,
"जेवलात का?"
आणि प्रत्येक फोनच्या शेवटी एक वाक्य ठरलेलं असतं.
"ठीक आहे बाबा... नंतर बोलते."
माधवरावांना आता एक गोष्ट नक्की कळली होती.
पहिला फोन खरंच रॉंग नंबर होता.
पण नियतीला बहुतेक बरोब्बर माणूस शोधायचा होता.
एका हरवलेल्या मुलीला बाबा मिळाले होते.
आणि एका एकाकी बापाला पुन्हा मुलगी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा