शनिवार, २५ जुलै, २०२६

3082. मेड फाॅर इच अदर

तोच होता तो.
विवेक.
बरोबर नेमक्या जागी त्यानी गाडी पार्क केली.
सावकाश पण दमदार पावलं टाकत,
तो खाली उतरला.
कडक इस्त्रीचा शर्ट.
इन केलेला.
पाॅलीश्ड शूज.
पृथ्वी व्यापून टाकणारा तो सेंटचा वास.
अगदी कुठल्या तरी बिझनेस मिटींगला
आल्यासारखा अप-टू-डेट.
अजूनही तसाच.
एक वर्षापूर्वी पाहिला होता, तसाच.
खरं म्हणजे तोच पहायला आला होता सईला.
खानदानी श्रीमंती.
बंगला, गाडी, फाॅरेन ट्रीप्स सबकुछ.
तो राजबिंडा.
तीन पिढ्यांपासून चालत आलेला,
सेटल्ड कन्स्ट्रक्शनचा बिझनेस.
तो स्वतः स्ट्रक्चरल इंजिनिअर.
सई आर्किटेक्ट.
अख्ख्या जगाला असं वाटत होतं की,
असं स्थळ शोधूनही सापडणार नाही.
सईशी तो निवांत बोलला.
त्याच्या फ्युचर प्लॅन्सविषयी.
कुठल्यातरी अगडबंब टाऊनशीपविषयी.
सगळीकडे ‘मी’ ‘माझं’.
जणू तो ‘रेमण्डस् मॅन’ होता.
‘कम्प्लीट मॅन’…!
परफेक्ट मॅन…
त्याला फक्त फोटोतली
रिकामी जागा भरायची होती.
तिनं ऑफिस जाॅईन करण्याविषयी विचारलं.
“बाय ऑल मीन्स…
पण त्याची फारशी गरज नाही.
हौस म्हणून आलीस तर हरकत नाही.”
तिचा होकार तो गृहीत धरून चालला होता.
तरीही.
तरीही सई ‘नाही’ म्हणाली.
कुठं तरी त्याचं गृहित धरणं खटकत होतं.
‘मी’, ‘माझा’ याच्या गर्दीत
‘आपण दोघं’ कुठंच ऐकू येत नव्हतं.
कॅन्व्हास आधीच भरलेला होता…
तिच्यासाठी कोपर्‍यात एवढीशी जागा होती.
तिला हवा होता मोकळ्या आभाळासारखा
रिकामा कॅन्व्हास!
दोघांना मिळून रंगाची
मनसोक्त उधळण करता येईल,असा अवकाश…
मग सलीलचं प्रपोजल आलं…
आर्टिस्ट होता तो.
स्वतःचा स्टुडिओ…
लाख रूपयाला विकलं गेलेलं त्याचं पोट्रेट…
जहांगीरमधलं दरवर्षी भरणारं त्याचं एक्झिबीशन…
या कशाविषयीही तो काहीही बोलला नाही.
त्यानं सईची चौकशी केली.
तिचे प्लॅन्स, तिची स्वप्नं…
“माझ्या स्टुडिओत भरपूर जागा आहे.
तिथंच तुझं ऑफिस सुरू करता येईल.
अर्थात तुला आवडत असेल तर…”
त्याचा सूर ‘तू अन् मी’ असा लागलेला.
रिकाम्या जागा भरा नाही…
मॅच दि पेअर…
पटलाच तो!
सलीलबरोबर हे वर्ष तरंगत गेलं…
सलील भरपूर स्पेस द्यायचा.
पण त्या स्पेसमधल्या प्रत्येक अणूरेणूत
तो जाणवायचा.
गरज लागली तर दोघं
एकमेकांच्या फिल्डमधे डोकवायचे…
तेवढ्यापुरतंच.
संध्याकाळी सहा वाजले की दुकान बंद.
दोघं… आणि फक्त ती दोघं!
अख्खं जग विसरून जायचं त्या दोघांना.
आणि ती दोघं अख्ख्या जगाला.
दोघंही आपल्या फिल्डमधे
पुढची पायरी गाठत होते.
ठरवून त्यांनी दोघांत
‘तिसरा’ आणायचं ठरवलं होतं…
तशी चाहूलही लागली होती.
म्हणूनच सेलीब्रेट करायला ती दोघं इथं,
गोव्याला आली होती…
‘ब्लू लगून रिसाॅर्ट’मध्ये.
विवेकच्या गाडीतून कोण उतरतं,
याकडे सई टक लावून बघत होती.
ती…
विवेकला साजेशीच.
भारी डिझायनर साडी.
हातात सोनेरी पर्स.
मंद सुगंधी सेंटचा शिडकावा.
एटिकेटस् सांभाळणारी.
विवेकला साजेशी…
‘मेड फाॅर इच अदर’ टाईप.
दोघं खाली उतरली.
मंद पावलं टाकत लाॅबीकडे गेली.
एकंदर ती खुष दिसत होती.
सई तिच्या रूमच्या गॅलरीतून हे पहात होती.
तिच्या कपाळावर नकळत
एक आठी उमटली…
सलील शेजारी कधी येऊन उभा राहिला,
कळलंच नाही.
“क्या हुवा?
एकदम मूड डाऊन!”
तिनं सगळं सांगून टाकलं.
“सई…
तुझा निर्णय बरोबरच होता.
पण म्हणून दुसर्‍याचा चुकीचा,
असं होत नाही…
ती मुलगी विवेकबरोबर आनंदात आहे,
याचं तुला दुःख होतंय.
तिला तशीच लाईफस्टाईल आवडत असेल.
आफ्टर ऑल तो तिचा चाॅईस असेल...
ॲन्ड शी इज एन्जाॅइंग देअर.
सेम ॲज यू आर हिअर…!”
सलील परफेक्ट बोलला.
सईला आपण का अस्वस्थ झालोय ते कळलं.
खरंच आपलं थिंकींग बदलायला हवं.
सलीलनं काॅफी मागवली.
“लेटस् विश हॅपी मॅरीड लाईफ
फाॅर मिस्टर ॲन्ड मिसेस विवेक.
ॲन्ड ऑफ कोर्स, फाॅर बोथ ऑफ अस !”
सईचा गेलेला मूड परत आला.
तिला पिसाहून हलकं वाटायला लागलं.
पिसाच्या मनोर्‍यासारखी
ती सलीलच्या खांद्यावर झुकली.
प्यार किये जा…!

- कौस्तुभ केळकर नगरवाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...