१९७१ चे युद्ध संपले आणि जनरल माणिकशाॅ यांच्या निवृतीची वेळ जवळ येऊ लागली. त्यांना लक्षात आले की त्यांचा ड्रायव्हर श्याम सिंग अलीकडे नेहमी तणावात दिसतो. त्याच्या चमकदार चेहऱ्यावरची त्याची अस्वस्थता जनरल साहेबांनी बरोबर हेरली.
"शामसिंग, काय झालंय? तू असा उदास का दिसतोस? घरी तुझ्या म्हशीने दूध देणे बंद केले आहे का?" जनरलसाहेबांनी गमतीत विचारले.
"नाही सर, तसं काही नाही." असं बोलून श्यामसिंग गप्प राहिला. दिवस जात राहिले आणि निवृत्तीचा दिवस अधिक जवळ येऊ लागला.
एक दिवस शाम सिंग अचानक जनरल साहेबांना म्हणाला,
"सर, मला एक विनंती करायची आहे आणि ती केवळ तुम्हीच पूर्ण करू शकाल."
"श्याम सिंग, सांग तुला काय हवंय?"
"सर, मला मुदतपूर्व निवृत्ती हवी आहे. कृपया माझ्यासाठी तुम्ही तशी शिफारस करा."
"अरे पण का? घरी काही जमिनीचा खटला सुरू आहे का?तुझी सर्विस पूर्ण कर. मी तुला चांगली बढती देतो, पण सर्विस सोडू नकोस." जनरल साहेब म्हणाले.
"नाही सर. अशी काही समस्या नाही. वेगळेच कारण आहे. परंतु मी निवृत्त झाल्याशिवाय ते तुम्हाला सांगू शकत नाही."
जनरलसाहेबांनी त्याच्या म्हणण्याचा आदर केला आणि आवश्यक त्या सूचना वरती पाठवल्या. त्याप्रमाणे ड्रायव्हर श्याम सिंगच्या निवृतीची ऑर्डर आली. जनरल साहेबांनी आता शाम सिंगला विचारले "आता तुझे समाधान झाले? आता तरी तू मला कारण सांगशील?"
ड्रायव्हर शामसिंग जनरलसाहेबांच्या समोर आदरपूर्वक उभा राहिला आणि म्हणाला "सर, तुमच्या निवृत्तीनंतर इतर कोणाचीच गाडी चालवायची माझी इच्छा नाही. तुमचा ड्रायव्हर हा माझ्यासाठी जीवनातला सर्वोच्च अभिमानाचा भाग आहे आणि त्यासोबतच मी उरलेले आयुष्य घालवू इच्छितो."
फिल्ड मार्शल मोठ्याने हसले आणि म्हणाले "तू म्हणजे एक मोठा मूर्ख आहेस. तुम्ही हरियाणवी माणसे मोठी हट्टी असता."
शाम सिंगच्या निवृत्तीची ऑर्डर आलेली होती व आता त्यात काही बदल होण्यासारखा नव्हता. एक दिवस जनरल साहेबांनी शाम सिंगला विचारले
"आता निवृत्तीनंतर तू काय करणार?"
"मी काहीतरी काम शोधणार साहेब."
"गावाकडे तुझी शेती किती आहे?"
"नाही साहेब माझ्याकडे काहीच शेती नाही. मी गरीब कुटुंबातला आहे."
जनरल साहेब गप्प बसले, विचारात पडले. एक साधा छोटा माणूस केवळ दुसऱ्या कोणाचा ड्रायव्हर म्हणून राहणार नाही या एका इच्छेने आपल्या चांगल्या नोकरीचा राजीनामा देतो. या गोष्टीचा त्यांच्यावर खूप खोल परिणाम झाला. श्याम सिंग जेव्हा सोडून गावाकडे जायला निघाला तेव्हा त्यांनी श्याम सिंगच्या हातात एक पाकीट दिलं आणि त्याला सांगितलं "घरी गेल्यावर हे पाकीट उघडून बघ." श्यामसिंग ने जनरल साहेबांना सॅल्यूट केला आणि तो निघून गेला.
श्याम सिंग गावी गेला व नवीन काम शोधण्याच्या गडबडीत जनरल साहेबांनी दिलेल्या पाकिटाचा विषय पूर्ण विसरून गेला. त्याला ट्रक ड्रायव्हर म्हणून काम देखील मिळाले. एक दिवस त्याची बायको त्याला म्हणाली
"तुमचा आर्मी युनिफॉर्म कपाटात ठेवताना मला हे पाकीट त्याच्या खिशात सापडलं."
"अरेच्या, मी पूर्ण विसरूनच गेलो होतो. आणि लक्षात आलं तरी काय करणार? मला तर वाचता येत नाही. कदाचित जनरल साहेबांनी त्यांचे इच्छापत्र लिहिले असेल. मी ऐकलंय की मोठे मोठे साहेब असं करतात."
बायको म्हणाली "असू दे. पण आपण शाळेच्या गुरुजींच्या कडे जाऊ आणि हे पत्र वाचून घेऊ म्हणजे आपल्याला नेमकं काय ते कळेल."
त्याप्रमाणे दोघेही गावातल्या शाळेत गेले आणि हेडमास्तर ना ते पत्र वाचून दाखवायची विनंती केली. गुरुजींनी चष्मा लावला आणि पाकीट उघडून आतला कागद बघितला, आणि ते बघतच राहिले.
"मास्टरजी, काय झालं? तुम्ही असे गप्प का?" मास्टरजीनी विचारलं "श्यामसिंग, हे काय आहे तुला माहिती आहे?" "नाही गुरुजी. मला काहीच माहित नाही."
"अरे वेड्या, हे हस्तांतरण पत्र आहे. १९७१ च्या विजयानंतर हरियाणा सरकारने जनरल माणेक शॉ यांना २५ एकर सुपीक जमीन भेट म्हणून दिली होती. माणिकशांनी ती सर्वच्या सर्व तुझ्या नावाने हस्तांतरित केली आहे."
अशी असतात खरी मोठी माणसं ! आपल्या पराक्रमाचे बक्षीस म्हणून मिळालेली २५ एकर सुपीक जमीन त्यांनी आपल्या ड्रायव्हरला देऊन टाकली.
एवढेच नव्हे त्यांनी आपल्या निवृत्तीनंतर सर्व निवृत्तीवेतन सैनिक विधवा कल्याण निधीसाठी देऊन टाकले.
*दुसऱ्या कोणाचा असा मोठेपणा तुमच्या माहितीत आहे?*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा