"वेळ झाला की भेटून जा..."
काकांचा एक मेसेज आला होता. कामाच्या गडबडीत तो कधी आला, हेही माझ्या लक्षात आलं नव्हतं. मेसेज दिसताच मनात एक अनामिक हुरहूर दाटून आली. मी लगेच काकांना फोन लावला.
"काका, सॉरी… मेसेज उशीरा पाहिला. काही अर्जंट आहे का? आज जरा जमणं कठीण आहे. उद्या रविवार आहे. सकाळी तुमच्या आवडीचे पोहे घेऊन येते. चालेल?"
पलीकडून काकांचा नेहमीसारखाच शांत, प्रेमळ आवाज आला.
"अगं, हो हो… आधी दम खा. तुझ्या सवडीने ये. घाई काहीच नाही. उद्या ये. निवांत कॉफी घेऊ दोघं."
"काकू कशा आहेत?"
"छान आहेत. सध्या पुन्हा जुन्या आठवणी उसवत बसली आहे."
त्यांच्या आवाजातलं हसू ओळखीचं होतं; पण त्या हसण्यात हलकीशी काळजीही दडलेली जाणवत होती.
जोग काका आणि काकू म्हणजे माझी जिवलग मैत्रीण प्रियाचे आई-बाबा. प्रियाच्या अपघाती जाण्याने त्यांच्या आयुष्याचं चक्रच बदलून गेलं. पण सर्वात मोठा आघात बसला तो काकूंना. एका रात्रीत त्यांनी जणू वर्तमान पुसून टाकलं. त्यांच्या स्मृती एका ठरावीक काळात जाऊन थांबल्या. हळूहळू त्यांचं इतर नातेवाईकांनाही ओळखणं बंद झालं.अनेक डॉक्टर, औषधोपचार, देवधर्म,सगळं करून पाहिलं; पण काहीच फरक पडला नाही.
त्या फक्त दोनच माणसांना न चुकता ओळखायच्या काका आणि मला.
फरक एवढाच होता, त्या मला माझ्या नावाने नाही, तर "प्रिया" म्हणून हाक मारायच्या. प्रत्येक वेळी "प्रिया" म्हणून आलेली ती हाक काळजावर नव्याने ओरखडा उमटवून जायची. प्रियाची आठवण ताजी व्हायची..सुरुवातीला ते स्वीकारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण हळूहळू मला जाणवलं की काकू त्यांच्या हरवलेल्या मुलीला माझ्यात शोधत होत्या. आणि मग मीही त्यांच्यासाठी "प्रिया" होऊन गेले.
माझा मुलगा अबीर तर त्यांचा लाडका नातूच झाला होता. आज त्यांच्या छोट्याशा जगात आम्ही चौघेच होतो.काका, मी, माझा नवरा आणि अबीर.
* * *
रविवारी सकाळी गरमागरम पोहे घेऊन मी काकांकडे गेले. काकांनी नेहमीप्रमाणे प्रसन्न हसून स्वागत केलं.
"वा! पोह्यांचा अप्रतिम सुगंध…"
मी हसले; पण लगेच लक्षात आलं, घरात नेहमी ऐकू येणारी काकूंची अखंड बडबड आज नव्हती.
"काकू कुठे आहेत?"
"झोपली आहे ."
मी सहज घड्याळाकडे पाहिलं. आठ वाजून गेले होते. काकू इतक्या उशिरापर्यंत झोपणं म्हणजे नक्कीच काहीतरी बिनसलं होतं. मी नजरेनेच काकांना विचारलं, "सगळं ठीक आहे ना?"
काका माझ्याकडे पाहून हळूच म्हणाले, "चल… गच्चीत जाऊ. कॉफी घेत तिथे निवांत बोलू."
कॉफीचा कप हातात घेऊन आम्ही गच्चीत बसलो.एकदम फ्रेश सकाळ होती ..तरी आज काकांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच ओझं दिसत होतं. ते बराच वेळ काहीच बोलले नाहीत.
"काका… काय झालंय?" मी हळूच विचारलं.
त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला.
"अगं… काल रात्री अचानक खूप जुन्या आठवणी काढत होती. काही वर्षांपूर्वीचा वटपौर्णिमेचा प्रसंग तिला आठवला… आणि त्या आठवणींसोबत अनेक वर्षं मनाच्या तळाशी दडवून ठेवलेलं तीच दुःख बाहेर आलं."
"तेव्हा प्रिया अगदी लहान होती. वटपौर्णिमा होती. हिने दिवसभर उपवास केला होता. सुट्टी असल्यामुळे मी मित्रांसोबत ट्रिपला गेलो होतो. आमच्यातला एक मित्र दारू पिण्यात फार पटाईत होता. त्यानेच हट्ट करून आम्हालाही पाजली. रात्री उशिरा घरी आलो, तर ही दारात उभी होती. डोळे रडून लाल झालेले… आणि प्रिया माझी वाट बघून अर्धवट झोपली होती."
काकांचा आवाज दाटून आला.
"'कुठे गेला होतात? किती शोधलं तुम्हाला… आज वटपौर्णिमा… तुमच्यासोबत उपवास सोडायचा होता…"ती एवढंच म्हणाली. पण मी तिचं काहीच ऐकलं नाही. नशेत होतो. तिला ढकललं, काहीही वाटेल ते बोललो. प्रियूलाही रागावलो. त्या दोघी जेवल्या की उपाशी राहिल्या, याचंही भान ठेवलं नाही. मी एकटाच जेवलो आणि झोपलो."
हे सांगताना काकांनी कॉफीचा कप अलगद खाली ठेवला. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं.
"दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आलो,हिचा अबोला होता..काहीतरी विचित्र वागलो हे आठवत होतं ..डोक्याला ताण देऊन काय रात्री वागलो ते आठवलं आणि स्वतःचा तिरस्कार वाटला. हिची माफी मागितली आणि त्या दिवसानंतर आयुष्यात पुन्हा कधी दारूला हात लावला नाही. पण कसं होत ना काही चुका आपण विसरतो; पण ज्यांच्याबाबतीत त्या घडतात, ते मात्र त्या कधीच विसरत नाहीत."
ते काही क्षण गप्प बसले.
" पण मग काकू काल काही बोलल्या का तुम्हाला या विषयी?"
"काल ती म्हणाली, पुढच्या जन्मी मी नवरा होणार… आणि तुम्ही बायको. दिवसभर उपाशी राहायचं..नवऱ्यासाठी...त्याच्या दीर्घायुष्य साठी, घ्या अनुभव त्या प्रेमाचा, बायको बनून समर्पण करता येतंय का बघा...स्वतःच्या इच्छा आकांक्षा, स्वप्न...मिटवून जगता येतंय का बघा.."
काकांनी डोळे पुसले.
"हे ऐकलं… आणि माझे डोळे उघडले. तिला माझ्या दारू पिण्याचं दुःख होतच पण; दुःख याचं होतं की तिच्या प्रेमाची, तिच्या उपवासाची आणि तिच्या श्रद्धेची मी जाण ठेवली नाही."
ते क्षणभर शांत राहिले. मग मंद आवाजात म्हणाले,
"त्या रात्री मी फक्त दारू प्यायलो नव्हतो गं… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बायकोच्या मनावर आयुष्यभर न भरून येणारी जखम करून बसलो होतो. दुसऱ्या दिवशी माफी मागितली खरी; पण काही माफी स्वीकारल्या जातात… त्या विसरल्या मात्र जात नाहीत."
काकांचा आवाज थरथरला.
"मला आता याचं प्रायश्चित्त घ्यायचं आहे. ती किंवा मी मारायच्या आधी शक्य तेवढे गुंते सोडवून मोकळं होऊन जायचं आहे."
काकांच्या प्रत्येक शब्दाबरोबर माझेही डोळे भरून येत होते. स्त्रीच्या मनातल्या काही जखमा अशाच असतात. काळ पुढे सरकतो, आयुष्य बदलतं, परिस्थिती बदलते; पण काही वेदना मनाच्या तळाशी तशाच जिवंत राहतात.
मी हळूच विचारलं, "काका… काहीतरी मार्ग काढू या."
ते मंद हसले.
"मी मार्ग शोधलाय."
"काय?"
"दोन दिवसांनी वटपौर्णिमा आहे ना? त्या दिवशी सकाळी तू लवकर ये. हिला छान तयार कर. साडी, नथ, गजरा, बांगड्या… अगदी पहिल्यासारखी. पण आपण काय करणार आहोत, याची तिला काहीच कल्पना द्यायची नाही."
"आणि पुढे?"
"सविता मावशींकडून फराळ करून घेतो."
मी हसत म्हणाले, "पण करणार काय आहात, हे तरी सांगा."
काका क्षणभर शांत राहिले. मग त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता उमटली.
"सरप्राइज..योग्य वेळ आली की सगळं कळेल."
त्यांच्या आवाजात एक विलक्षण निश्चय होता. अनेक वर्षं मनात दडवून ठेवलेला पश्चात्ताप जणू आता प्रायश्चित्ताचा मार्ग शोधत होता. मला जाणवलं, यंदाची वटपौर्णिमा फक्त एक सण राहणार नव्हती; ती एका जुन्या जखमेवर प्रेमाने फुंकर घालणारा दिवस ठरणार होती.
वटपौर्णिमा उजाडली.
सकाळी लवकरच मी आवरून ,पूजा करून काकांकडे गेले.
दार उघडताच काकूंनी माझ्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाल्या, "अगं प्रिया! आज एवढी नटून-थटून का आली आहेस गं? काय विशेष?"
मी त्यांच्या जवळ जात हसून म्हणाले, "विशेष काही नाही. आज आपण जरा बाहेर जायचं आहे."
"मी? अगं, आता कुठे जाणार मी? तेही व्हीलचेअरवर बसून?"
"जाशील की आणि मी आहे ना तुझ्या सोबत."
"पण एवढं तयार कशाला व्हायचं?"
मी त्यांच्या खांद्यावर अलगद हात ठेवला.
"एकदा तरी मला माझ्या आईला मनासारखं सजवू दे."
काही क्षण त्या माझ्याकडे निरखून पाहत राहिल्या. मग अगदी लहान मुलीसारख्या हसल्या.
"बरं… होऊ दे तुझ्या मनासारखं."
मी प्रेमाने त्यांना साडी नेसवली. केसांचा नीट अंबाडा घालून त्यात मोगऱ्याचा सुगंधी गजरा माळला. हातात हिरव्या काचेच्या बांगड्या भरल्या. नाकात नथ घातली आणि कपाळावर ठसठशीत कुंकू लावलं.
सगळं झाल्यावर त्यांची व्हील चेअर आरशासमोर घेऊन गेले.
त्या काही क्षण स्वतःकडेच पाहत राहिल्या.
मग माझ्याकडे वळून हळव्या स्वरात विचारलं,
"प्रिया… मी अजूनही छान दिसते का गं?"
माझ्या डोळ्यांत नकळत पाणी आलं.
"खूप सुंदर दिसतेस गं… अगदी बाबांच्या लग्नातली शैला."
त्या गोड लाजल्या.
कित्येक दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर इतकं निरागस, निखळ हास्य उमटलं होतं.
तेवढ्यात माझ्या मोबाईलवर काकांचा मेसेज आला.
"आलात की फोन कर."
मी काकूंना व्हीलचेअरवर बसवलं आणि खाली आले. फोन लावताच काकांनी एवढंच म्हटलं,
"समोर बघ."
मी नजरेने समोर पाहिलं…
आणि मी जागीच खिळून उभी राहिले...
समोर काका उभे होते.
शुभ्र धोतर, पांढरा स्वच्छ कुर्ता, हातात पूजेचं ताट आणि चेहऱ्यावर विलक्षण शांत हास्य.
त्या क्षणी ते मला अगदी वेगळेच वाटत होते. जणू अनेक वर्षांपासून मनात दडवलेलं ओझं उतरवण्यासाठी ते आज पूर्ण तयारीनिशी उभे होते.
काकूंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरही निरागस हास्य उमटलं.
"अरे वा! आज तर अगदी नवऱ्यामुलासारखे दिसताय."
काका हसले.
"आणि तू… अजूनही तितकीच सुंदर दिसतेस."
काकू नकळत लाजल्या. माझा हात धरून हळूच म्हणाल्या,
"प्रिया… तुम्ही दोघांनी काहीतरी ठरवलंय ना?"
मीही हसले.
"मलाही काही माहिती नाही गं."
काका आमच्याजवळ आले. काही क्षण ते फक्त काकूंना पाहत राहिले. त्यांच्या नजरेत प्रेम होतं, कृतज्ञता होती आणि अनेक वर्षांपासून मनात दडवलेली खंतही होती.
मग त्यांनी शांतपणे हाक मारली...
"शैला…"
काकूंनी त्यांच्याकडे पाहिलं.
"आजपर्यंत तू प्रत्येक सुख-दुःखात माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिलीस. तुझ्या प्रेमात, तुझ्या त्यागात आणि तुझ्या निःस्वार्थ साथीत मी कायमच कमी पडलो. काल तू त्या एका वटपौर्णिमेचा प्रसंग आठवला आणि मला जाणवलं की त्या दिवशी मी फक्त तुझा उपवास मोडला नव्हता, तर तुझ्या प्रेमाचाही अपमान केला होता."
काकू हलक्या आवाजात म्हणाल्या, "अहो, राहू द्या ना ते सगळं. किती वर्षं झाली त्या गोष्टीला. चला, घरी जाऊ या."
काका मंद हसले.
"नाही शैला… आज नाही. आज मला इतक्या वर्षांपूर्वीची एक चूक सुधारायची आहे."
काकू काही बोलल्या नाहीत.
काका माझ्याकडे वळले.
"प्रिया, समोरचा वड दिसतोय ना? तिला तिथपर्यंत घेऊन चल."
काकूंनी आश्चर्याने विचारलं, "कशाला?"
काकांनी त्यांच्या डोळ्यांत पाहत उत्तर दिलं, "आज मी तुझ्यासाठी वडाला प्रदक्षिणा घालणार आहे."
"काय?"
"हो. आयुष्यभर तू माझ्यासाठी उपवास केलेस, माझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केलीस. आज एक दिवस मला तुझ्यासाठी उभं राहू दे. तुझ्या सुखासाठी, तुझ्या आरोग्यासाठी आणि तुझ्या आयुष्यासाठी देवाकडे हात जोडू दे."
काकूंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.
"अहो… कशाला हा वेडेपणा?"
काका मिश्कीलपणे हसले.
"अगं, पुढच्या जन्मी तू नवरा होणार म्हणालीस ना? मग मला आत्ताच माझं बुकिंग करून ठेवायला नको? नाहीतर माझी बायको दुसराच कुणी घेऊन गेला तर?"
काकूंनी थरथरत्या हाताने काकांचा हात हातात घेतला.
मी मात्र निःशब्द उभी होते.
आजूबाजूला वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या स्त्रिया होत्या. प्रत्येक जणी आपल्या विधीत मग्न होती. पण आमच्याकडे नकळत अनेकांच्या नजरा वळल्या होत्या. कुणालाच नेमकं काय घडत आहे, याची कल्पना नव्हती; पण त्या क्षणात काहीतरी वेगळं घडणार आहे, याची जाणीव मात्र प्रत्येकाला होत होती.
मी अलगद व्हीलचेअर वडाखाली नेऊन थांबवली.
काकांनी पूजेचं ताट हातात घेतलं. हात किंचित थरथरत होते. त्यांनी वडाच्या पारंब्यांना हळूच स्पर्श केला आणि डोळे मिटले. त्या क्षणी ते देवापुढे नव्हे, तर स्वतःच्या अंतरात्म्यासमोर उभे असल्यासारखे वाटत होते.
वडाची मनोभावे पूजा केली. मग दोरा हातात घेतला आणि वडाभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली.
काकांनी वडाभोवती पहिली प्रदक्षिणा घातली.
प्रत्येक पावलागणिक त्यांच्या चेहऱ्यावरचं ओझं जणू हलकं होत होतं. आजूबाजूला उभ्या असलेल्या अनेक स्त्रिया त्यांच्याकडे पाहत होत्या. काहींचे हात मोबाईलकडे गेले; पण त्या दोघांना त्याचं काहीच भान नव्हतं. त्या क्षणी त्यांच्या जगात फक्त ते दोघंच होते.एकमेकांसोबत उभे असलेले, अनेक वर्षांचा प्रवास एकत्र चाललेले दोन जीव.
काकूंची नजर क्षणभरही काकांवरून हटत नव्हती. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य होतं, प्रेम होतं ,आदर होता, अभिमान होता, आणि शब्दांत न मावणारा भावनांचा पूर दाटून आला होता. इतक्या वर्षांनी त्यांच्या मनातल्या एका जुन्या जखमेवर कुणीतरी अलगद हात फिरवत होतं.
प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर काका शांतपणे काकूंसमोर येऊन उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी वाकून काकूंच्या पाया स्पर्श केला.
"शैला…"
त्यांचा आवाज भरून आला होता.
"त्या दिवशी मी फक्त चुकलो नव्हतो. मी तुझ्या प्रेमाचा, तुझ्या श्रद्धेचा आणि तुझ्या मनाचा अपमान केला होता. तू मला माफ केलंस; पण मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नाही. इतकी वर्षं ही खंत मनात जपून ठेवली. आज हे ओझं तुझ्यासमोर ठेवतो. शक्य असेल तर… मला पुन्हा एकदा माफ कर."
काकूंच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. त्यांनी घाईघाईने काकांना उठवलं.
"असं नका करू हो…"
थरथरणाऱ्या हातांनी त्यांनी काकांचा चेहरा अलगद हातात घेतला.
"माझी तक्रार त्या दिवसाची नव्हती. माझी तक्रार एवढीच होती की त्या वेदनेला तुम्ही एका 'सॉरी'पुरतं विसरलात, असं मला वाटत राहिलं. पण आज कळलं… तुम्हीही ती वेदना मनाच्या सगळ्यात खोल कप्प्यात जपून ठेवली होती."
काकांनी त्यांच्या हातांवर आपले हात ठेवले. दोघेही काही क्षण न बोलता एकमेकांकडे पाहत राहिले. त्या शांततेतही शब्दांपेक्षा जास्त प्रेम होतं.
काकू हलकंसं हसल्या.
देवा हा नवरा चालेल मला… असा चुकणारा, पण स्वतःची चूक मनापासून मान्य करून ती सुधारायला धजावणारा नवरा… असाच नवरा हवा."
काकांच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळले.
आजूबाजूला उभ्या असलेल्या अनेक स्त्रियांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. माझेही डोळे धूसर झाले होते.
काकू माझ्याकडे वळल्या.
"प्रिया ,बघ… तुझे बाबा आता शहाणे झालेत."
असं म्हणत त्या मनापासून हसू लागल्या. काकाही हसले. त्या हसण्यात वर्षानुवर्षं मुरलेला ताण विरघळून गेला होता.
काका अलगद व्हीलचेअर पुढे ढकलू लागले. काही पावलं गेल्यावर काकूंनी मागे वळून मला हाक मारली.
"प्रिया… जावईबापू आणि अबीरला घेऊन घरी ये. आज आपण सगळे एकत्र फराळ करू."
"हो आई… येते."
हे शब्द माझ्या तोंडून अगदी सहज बाहेर पडले.
काका आणि काकू हळूहळू दूर जात होते. मी तिथेच उभी राहून त्यांच्याकडे पाहत राहिले.
त्या दिवशी मला जाणवलं…
प्रेम म्हणजे कधीच न चुकणं नव्हे. प्रेम म्हणजे चूक झाल्यावर, कितीही वर्षं लोटली तरी "मी चुकलो" असं म्हणण्याचं धैर्य… आणि समोरच्याने हसत "चल, आता सगळं सोडून देऊया" असं म्हणण्याचा मोठेपणा..
कदाचित म्हणूनच काही नाती सात जन्मांची असतात.
-रेश्मा डोळे (रमा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा