सकाळीच एक शाळकरी मुलगा आपल्या पालकांसह ओपिडीत आला होता.
वय जेमतेम पंधरा- सोळा. तक्रार फक्त सर्दी- खोकल्याची.
आई बाजूला बसलेली. वडील बाहेर मोबाईलवर बोलत होते..
काही प्रश्न विचारले- रुटिन पॅरामीटर्स तपासले पण डॉक्टर म्हणून माझी नजर त्याच्या चेहऱ्यावर कमी आणि हातावर जास्त खिळली.
मनगटापासून कोपरापर्यंत काही काळसर,जाड झालेल्या,उठून दिसणाऱ्या शिरा..
साधारण रक्त घेण्यासाठी अनेकदा सुई टोचलेल्या व्यक्तीच्या हातावर जशा दिसतात तशाच..
मी सहज विचारलं, ”बाळा, हाताला काय झालं?"
तो लगेच म्हणाला,”काही नाही डॉक्टर."
आईनंही त्याच्याकडं पाहिलं. ”हो ना, काही नाही."
पण त्या शिरा "काही नाही" म्हणण्याइतक्या साध्या नव्हत्या. मी आईला दोन मिनिटं बाहेर बसायला सांगितलं.
मुलाला विश्वासात घेतलं.. ”घाबरू नकोस. मी सहज विचारतोय."
तो शांत..
दोन-तीन प्रश्न.. काही उत्तर नाही.. शेवटी माझा ओरिजनल आवाज काढला, ”खरं सांग. नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल."
दोन सेकंद..पाच सेकंद..आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी बाहेर आलं..
”डॉक्टर..ते..मी..ना.. मी एमडी घेतो.."
त्याच्या एका वाक्यानं अंगावर काटाच आला. कारण हा एखादा गुन्हेगार नव्हता. हा एखादा अट्टल व्यसनीही नव्हता. हा या शहरातील एका चांगल्या शाळेतील,चांगल्या एरियात रहाणारा मध्यमवर्गीय घरातला एक साधा मुलगा होता साधारणत: माझ्या लहान पुतण्याच्या वयाचा, ज्याच्या हातावर फक्त शिरा काळ्या नव्हत्या तर भविष्य काळं पडत चाललं होतं..
बहुतांश सगळ्याच पालकांचा गैरसमज असतो, ”माझं मूल असं करूच शकत नाही."
याहून धोकादायक वाक्य दुसरं नाही. कारण व्यसनाधीन होणारी मुलं झोपडपट्टीत किंवा गुंडांच्या वस्तीतूनच येतात हा सर्वात मोठा भ्रम आहे..
आज व्यसन पोहोचलंय इंग्रजी माध्यमात. कॉन्व्हेंटमध्ये.
सीबीएसईमध्ये. निवासी शाळांमध्ये. ट्युशन क्लासमध्ये. स्पर्धा परीक्षांच्या वसतिगृहात आणि श्रीमंत घरांमध्येही.
ड्रग्ज विकणाऱ्याला तुमचं आडनाव, जात, धर्म, बोर्ड किंवा बँक बॅलन्स महत्त्वाचा नसतो. त्याला फक्त नवा ग्राहक हवा असतो.
कोणीही पहिल्याच दिवशी व्यसनी होत नाही.
"एकदा ट्राय कर..."
"काही होत नाही..."
"मर्द असशील तर घे..."
"सगळे घेतात..."
"ताण कमी होतो.."
या एका वाक्यानं सुरुवात होते आणि काही महिन्यांनी
मुलगा स्वतःचा राहत नाही..
शिक्षकांनो, तुम्ही फक्त मार्कशीट बघू नका. या गोष्टीही बघा जसं अचानक अभ्यासात घसरण- वर्गात झोपणं- डोळे लाल असणं- वारंवार वॉशरूमला जाणं- मित्रमंडळी अचानक बदलणं- पैशांची सतत गरज- हातावर सुईच्या खुणा, काळसर शिरा किंवा जखमा..
यापैकी एक लक्षण दिसलं तर फक्त शिक्षा करू नका...
संवाद सुरू करा.
पालकांनो,तुमच्या मुलाला मोबाईल दिला पण वेळ दिला का? त्याला बाईक दिली पण सोबत जबाबदारी दिली का?
त्याच्यासाठी महागडे शूज घेतले पण त्याच्या मित्रांची नावं माहिती आहेत का? त्याचा पासवर्ड माहीत नसला तरी चालेल पण त्याच्या मनाचा पासवर्ड माहिती असायला हवा..
विद्यार्थ्यांनो, तुम्हाला वाटतं, ”मी कंट्रोलमध्ये आहे." पण ड्रग्जमध्ये कंट्रोल नावाची गोष्ट नसते. सुरुवातीला तुम्ही ड्रग्ज वापरता नंतर ड्रग्ज तुम्हाला वापरतात..
सर्वात जबाबदारी कडी म्हणजे पोलिस प्रशासन. ड्रग्ज पकडल्याच्या बातम्या दर आठवड्याला येतात पण प्रश्न आहे ड्रग्ज विकणारा पकडला जातो. पण संपूर्ण जाळं उद्ध्वस्त का होतं नाही?
शाळा, कॉलेज, टपऱ्या, हॉस्टेल, पब, पार्टी, सोशल मीडिया इथं गुप्त देखरेख अधिक मजबूत व्हायला हवी. फक्त धाडी नव्हे प्रतिबंधात्मक यंत्रणा उभी राहायला हवी..
राजकीय नेतृत्वाला तर काय सांगायचं? प्रत्येक मतदार संघात शाळांमध्ये नियमित व्यसन जागरूकता, समुपदेशन केंद्र, पालक कार्यशाळा, क्रीडा सुविधा, मानसिक आरोग्य सेवा हवी यासाठी निधी हवा.
रस्ते आणि पूल जितके महत्त्वाचे त्याहून अधिक मुलांचं भविष्य महत्वाचंय..
आणि आपण सगळेच अजूनही "आपल्या घरातील मुलाच्या बाबतीत असं होणार नाही" या भ्रमात जगत आहोत कारण व्यसनाची सुरुवात बहुतेक वेळा एका गोळीनं एका पुडीतून किंवा एका इंजेक्शननं होत नाही ती सुरुवात होते घरातील संवाद संपल्यापासून !
- डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा