शनिवार, २५ जुलै, २०२६

3072. नक्की चुकतंय कोण?

     महेशचा सकाळी सकाळी फोन आला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्याला कारणही तसंच आहे आणि ते म्हणजे माझा आजवरचा अनुभव. कुठलंही संकट गळ्यापर्यंत आलं आणि त्यातून मार्ग काढणं अवघड आणि अशक्य झालं की महेशला नेमका मी आठवतो. ह्या व्यतिरिक्त वर्षभरात तो मला कधीच फोन करायचा नाही किंवा आमची भेट देखील होत नसे. ह्या बाबतीत मी त्याला एकदा हटकले असता तो मला म्हणाला होता की त्याने त्याच्या आयुष्यात काही मित्र काही ठराविक कामांसाठीच आहेत आणि मी संकटमोचक ह्या भुमिकेत आहे. ह्या त्याच्या स्पष्टिकरणावर मी निरूत्तर झालो होतो. हसावं की रडावं तेच मला कळलं नाही.
मी फोन उचलला आणि महेशला विचारले," सगळं ठीक आहे ना?
"सगळं ठीक असतं तर तुला कशाला फोन केला असता मी " समोरून महेश शांतपणे म्हणाला.
"आता कुठल्या चक्रव्यूहात अडकला आहेस तू ?" मी नाईलाजाने विचारले.
"कौटुंबिक समस्या आहे. काही कर पण मला ह्यातून सोडव." महेश काकुळतीने म्हणाला.
"समस्या काय आहे ते नीट व्यवस्थित सांग मला"
अखेर महेश मुद्द्यावर आला आणि म्हणाला मला," बाबा ऍडमिट आहेत. दोन आठवड्यांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आला होता. खुप धावपळ उडाली होती त्यावेळी. रविवारचा दिवस होता.आईचा दुपारी फोन आला. मी तातडीने माझ्या घरून ठाण्याहून निघालो. तोपर्यंत आईने शेजारच्या जोश्यांना सांगून आमच्या फॅमिली डॉक्टरना बोलवून घेतले होते. त्यांच्या सल्ल्यानुसार लगोलग बाबांना ऍडमिट केले. मी थेट हाॅस्पिटलमध्ये पोहोचलो . बाबांना डोळेभरून पाहिले तेव्हा जीवात जीव आला. सुदैवाने उपचार लगोलग सुरू झाले होते. डॉ.शी बोलणं झाल्यावर त्यांनी सांगितले की झटका सौम्य होता आणि काळजीचं काही कारण नव्हते. तपासणी केली डॉ.नी तेव्हा लक्षांत आलं की जास्त ब्लाॅकेजेस झाले नव्हते. त्यामुळे आवश्यक ती शस्त्रक्रिया करून बाबांची तब्येत दोन आठवड्यात छानपैकी सुधारली होती. फक्त ह्या पुढे पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळायला लागणार होतो. बाबांचा हेकेखोर स्वभाव माहीत आहे तुला. आईला एकटीला त्यांना सांभाळणं कठीण जाणार होतं म्हणून मी एक निर्णय घेतला आणि तो  आईबाबांना समजावून सांगितला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी बाबांना आमच्या जुन्या घरी जाऊ न देता माझ्या ठाण्याच्या घरी न्यायचं ठरवलं होतं. मधुराला देखील तसंच वाटत होते. तिने आई बाबांची नीट काळजी घ्यायची संपूर्ण जबाबदारी आनंदाने घेतली आहे.  माझं ठाण्याचे घर खुप मोठं आहे. आई बाबांची व्यवस्था स्वतंत्र खोलीत करणार होतो मी. एरवी माझ्या घरी त्यांचा वेळ जात नाही म्हणून न येणारे आईबाबा ह्या निमित्ताने माझ्या घरी येतील आणि मला आणि मधुराला त्यांची सेवा करायची संधी मिळेल ह्या आनंदात आम्ही दोघेही होतो.
पण आईबाबांनी माझ्या निर्णयाला विरोध करत त्यांच्या घरी म्हणजे दादरलाच रहाण्याचा निर्णय घेतला आणि तो माझ्यासाठी धक्कादायक होता. हाॅस्पिटलमधून घरी गेल्यावर आईला एकटीला किती त्रास होईल ह्याची कल्पना मी तिला बोलून दाखवली पण तरीही आईबाबा त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांचं आपलं एकच सांगणं की आजवर राहिलोच ना तुझ्या शिवाय तसेच ह्या पुढे देखील राहू. अरे बोलायला सोपं आहे हे. आजवर सगळं सुरळीत सुरू होते तेव्हा एकवेळ ठीक होते. पण आता तसं नाहीये हेच त्यांना समजत नाहीये. मी त्यांना खूप पध्दतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते दोघेही काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.
अशा परिस्थितीत तु चटकन् माझ्या डोळ्यांसमोर आलास. तु आईबाबांना लहानपणापासून ओळखतोस. बाबांचा हट्टी स्वभाव तुला काही नवीन नाही. त्यांच्या ह्या अशा स्वभावामुळे मी लहानपणी काय काय भोगलंय हे तुला मी नव्याने सांगण्याची गरज नाही. प्लीज काही करून आईबाबांचं मन वळवून त्यांना त्यांचा हट्ट सोडायला लाव जेणेकरून पुढच्या आठवड्यात डिस्चार्ज मिळाला की मी त्या दोघांना माझ्या घरी ठाण्याला घेऊन जाईन."
महेशने खरोखरच माझी परिस्थिती अवघड आणि अवस्था केविलवाणी करून टाकली होती येवढं मात्र नक्की होतं.  " मी येईन संध्याकाळी हाॅस्पिटलमध्ये त्यांना भेटायला. मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन तुझ्या मनासारखं होण्यासाठी." असं म्हणून मी महेशला हाॅस्पिटलचा पत्ता आणि जवळची एखादी खूण व्हाॅट्स ऍपवर पाठवायला सांगून फोन बंद केला.
महेशचा फोन ठेवला आणि आमच्या दादरच्या चाळीत कधी जाऊन पोहोचलो ते कळलंच नाही.
आमच्या दोघांचाही जन्म तिथलाच, एक घर सोडून महेशचं घर होते. घर म्हणजे तरी काय दरवाजा उघडला की समोर एक खोली आणि आतमध्ये स्वयंपाकघर आणि न्हाणीघर, लांबलचक असणाऱ्या चाळीत  तळ मजल्यावर बारा आणि पहिल्या मजल्यावर बारा जशी एकूण चोवीस कुटुंब रहात होती. लांबलचक सामाईक गॅलरी मात्र चांगलीच ऐसपैस होती. सुट्ट्‌यांमध्ये तिथेच पत्ते जाणि कॅरम मांडून बसायचो आम्ही तासंतास.
महेशचे बाबा कडक शिस्तीचे, घडयाळाच्या काट्यावर ते घर चालायचं वेळेवर दिलेलं काम किंवा अभ्यास नाहीं झाला की शिक्षा ही आपोआप झालीच म्हणून समजा, मग कधी हातावर छडी, कधी पायाचे अंगठे धरुन उभं राहायचं तर कधी एक वेळच्या जेवणाला सुट्टी. कधीतरी शिक्षेचा अतिरेक व्हायचा. आम्हाला महेशची दया यायची खरी पण त्याकाळी आम्हा मित्रांकडे त्यावर उपाय नसायचा. महेश काय किंवा त्याच धाकटा भाऊ मदन काय. दोघेही एकाच नियमाने वाढले त्या घरात. महेशची पुस्तके, शालेय वस्तू आणि कपडे मदनच्या वाट्याला यायचे. कुठल्याही खर्चाची गोष्ट निघाली की महेशच्या वडिलांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. त्यांच्या दृष्टीने सगळा खर्च अनावश्यक असायचा, दर रविवारी आमच्या क्रिकेट मॅचेस ठरलेल्या असायच्या, तेव्हा सुद्धा महेश बाबांकडून पैसे मागू शकत नव्हता, पण त्याकाळी पैशापेक्षा आम्ही सगळ्यांनी कायम मैत्री जपली, ह्यात माझाच पुढाकार असायचा. सुदैवाने बाकी सगळे मित्र माझं ऐकायचे, महेशला कधीच शाळेच्या सहलीची मजा अनुभवता आली नाही ह्याची चुटपुट कायमच लागायची आम्हाला. कुठल्याही सणाला किंवा सार्वजनिक कार्यक्रमात महेशला आम्ही वेगळं ठेवले नाही. सुदैवाने आजही महेशला ह्याची पुरेपूर जाणीव आहे ह्याचा मला अभिमान आहे. महेश कमावता होत नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्यातले सगळे निर्णय त्याच्या बाबांनीच घेतले, बाबांच्या एकछत्री अंमलाखाली ते घर होते.
पुढे शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन आमची पुढची शैक्षणिक कारकीर्द सुरू झाली. महेशने काय व्हायचे हे त्याच्या बाबांनी आधीच ठरवलं होतं. त्याप्रमाणे वाणिज्य पद‌वीधर झाल्यावर तो चुपचाप सरकारी बँकेत कारकून म्हणून चिकटला. मी मात्र प्रचंड मेहनत करून सीए झालो, सुरवातीला एका कंपनीत उमेदवारी केली पण कालांतराने माझा स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच त्यात स्थिर झालो. बाकी सगळे मित्र देखील त्यांच्या आवडीनुसार आणि घरच्या कुवतीनुसार आवश्यक ते शिक्षण घेऊन आयुष्यात स्थिर झाले. लग्नाच्या बाबतीत मी पहिला नंबर लावला आणि मग एकेक करत सगळेच बोहल्यावर चढ़ले, महेशच्या बाबतीत सुयोग्य वधु शोधून काढली त्याच्या बाबांनी, अर्थात घरच्यांनी पसंत केलेल्या मुलीशी महेशचा विवाह झाला आणि त्याच्या बाबतीत त्याच्या वडिलांनी घेतलेला तोच शेवटचा निर्णय ठरला.
लग्नानंतर दुसऱ्याच वर्षी महेशने वेगळा संसार थाटला तो देखील बाबांच्या विरोधाला न जुमानता. त्याने शांतपणे सांगितले त्यांना की आजवर मी कमावता नसल्याने तुम्ही माइया बाबतीत घेतलेले निर्णय योग्यच आहेत असं समजून मी आयुष्य जगलो. पण आता मी कमावता झालो आहे. आतातरी माझं आयुष्य माझ्या इच्छेनुसार जगायची मला परवानगी द्या. आपल्या घरात राहून ते जमणार नाही. शिवाय आज ना उद्या मदनचे देखील लग्न होईल, सारासार विचार करून मी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया मला आशिर्वाद द्या. 
अपेक्षेप्रमाणे महेशच्या बाबांनी तो दिला नाहीच. त्याच्या आईची मात्र केविलवाणी अवस्था झाली होती. आईबाबा महेशच्या नवीन घरी गृहप्रवेश करतांना केलेल्या पुजेसाठी जाऊन आले जरूर. पण त्यानंतर मात्र एकदाही तिथे गेले नाहीत. बाबांच्या हट्टापायी महेश आणि त्याच्या बाबांमधले संबंध मात्र विनाकारण ताणले जात होते . दोन बेटांवर असल्यासारखं दोन्ही घरांचे संबंध सुरू होते.
पण सगळेच दिवस सारखे नसतात. रात्री मागून दिवस येतो. भरती मागून ओहोटी येते. ऐन उमेदीच्या काळात बांधलेले सांसारिक गडाचे बुरुज काळाच्या ओघात कधी ढासळायला लागतात ते आतल्या कडक शिस्तीच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या राजाच्या सुध्दा फार उशीरा लक्षांत येतं.
महेशच्या बाबांच्या बाबतीतही तेच झाले होते. अचानकपणे घरात शिरलेल्या आजाराने ते घर जरी मुळासकट हादरून गेले होते तरी देखील बाबांचा हेकेखोर स्वभाव किंचितही बदलला नव्हता. कमावण्याची अक्कल आल्यावर वेगळं राहण्याचा महेशने घेतलेल्या निर्णयांचा राग अजूनही बाबांच्या मनांत कायम होता. निव्वळ पैशाच्या जोरावर घरातील आपल्या स्थानाला धक्का लावला महेशने असा जो गैरसमज त्यांनी करून घेतला होता तो आजही कायम होता आणि म्हणूनच महेश करत असलेल्या विनवण्यांना त्याचे बाबा अजूनही सापत्न वागणूक देत होते. हाॅस्पिटलमधून महेशकडे रहायला जायचं हा अप्रत्यक्षपणे आपला पराभव आहे हे बाबांनी मनाशी पक्के केले होते.
अखेर संकटमोचक म्हणून महेशने मला मदतीसाठी फोन केला आणि त्याच्या बाबांची समजूत काढण्याचे अवघड शिवधनुष्य त्याने माझ्या खांद्यावर ठेवले.
दुपारची जेवणे झाली आणि मी आवरून महेशने व्हाॅट्स ऍपवर पाठवलेल्या हाॅस्पिटलच्या पत्त्यावर जाण्यासाठी कॅब बुक केली.
मी हाॅस्पिटलच्या पत्त्यावर पोहोचलो. खाली चौकशीच्या खिडकीवर चौकशी करून मी महेशच्या बाबांच्या खोलीपाशी पोहोचलो. महेश माझी वाट बघतच होता तिथल्या पॅसेज मध्ये.
मी महेशला काही विचारायच्या आधीच त्याने माझे हात पकडले आणि रडकुंडीला येत तो मला म्हणाला," काही कर पण बाबांची समजूत काढ आणि पुढच्या आठवड्यात डिस्चार्ज मिळाला की त्यांना माझ्या घरी येण्यासाठी तयार कर."
मी त्याला शांत करत म्हणालो मी त्या साठीच आलोय ना. मी बघतो काय करायचं ते. तु आता निश्चिंत रहा. त्याच्या पाठीवर हाताने थोपटत आम्ही दोघांनी बाबांच्या खोलीत प्रवेश केला.
किती वर्षांनी मी काकांना बघत होतो. शांतपणे झोपलेले होते. फार थकलेले दिसत होते चेहऱ्यावरून. शिस्तप्रिय माणसाच्या शरीरात त्या आजाराने शिस्तीत कसा काय प्रवेश केला ही खरोखरच बुचकळ्यात टाकणारी गोष्ट होती. आमच्या पावलांच्या आवाजाने त्यांची झोप चाळवली बहुतेक. खोल डोळ्यांच्या डोहात किंचित हालचाल जाणवली मला. ते बघून मी थोडासा पुढे होऊन त्यांच्या बेडजवळ आलो. ग्लानीत असून देखील काकांनी मला ओळखले. अंगावर घातलेल्या पांढऱ्या शुभ्र चादरीतून दोन्ही हात बाहेर काढून त्यांनी ते माझ्या समोर जोडले. ते बघून क्षणभर मला कससंच झालं. मी त्यांचे जोडलेले हात हातात घेऊन म्हणालो," ओळखलंत ना मला काका".
"का नाही ओळखणार. हृदय साथ देत नाहीये. पण अजून माझी दृष्टी ठणठणीत आहे. मी नुसतं तुला ओळखले नाहीये तर तु इथे का आला असशील ह्याचा अंदाज आला आहे मला".
काकांनी तर पहिल्याच चेंडूवर मला बाद केले होते. तोच धागा पकडून मी म्हणालो,"चला हे बरं झालं. उगाच नमनाला घडाभर तेल वाया नाही गेलं. थोडक्यात तुम्ही फलंदाजीला तयार आहात. हरकत नाही. मी सुद्धा टिच्चून गोलंदाजी करणार आहे."
माझं बोलणं ऐकून काका मंदपणे हसले. पुर्वीचे त्याने गडगडाटी हास्य इतिहासजमा झाले होते.
महेश कडून त्यांचा बेड काकांनी डोक्याच्या बाजूने थोडा वर करून घेतला आणि एका जाडजूड उशीला पाठ टेकवत ते मला म्हणाले,"बस माझ्या जवळ असा आणि बोल आता. कसा आहेस तू. घरी कसे आहेत सगळे."
मी जरा औषधे घेऊन येतो खाली जाऊन असं म्हणून महेश खोली बाहेर पडला. थोडक्यात मला तो इशारा होता माझी गोलंदाजी सुरू करण्याचा. काकांनाही आता मनमोकळेपणाने गप्पा मारता येणार होत्या माझ्या सोबत.
"काका भगवंताच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. महेश कडून समजले की पुढच्या आठवड्यात डिस्चार्ज मिळण्याबाबत. आज सुट्टी होती म्हणून मग आजच तुम्हाला भेटायला यायचे ठरवले.
"महेशचा आग्रह आहे की डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी त्याच्या घरी जाण्यासाठी "
"काका बरोबरच आहे त्याचं. घरी गेल्यावर देखील काही महिने पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळायला लागणार आहे. काकूंना एकट्याला कठीण जाईल म्हणून तर महेशने तसा आग्रह केला आहे."
काका मुद्द्यावर येणार ह्याची खात्री होतीच मला. पण मी देखील घरुन संभाषणाची उजळणी करून आलो होतो.
"तु तर ओळखतोसच आम्हाला लहानपणापासून. काय कमी रे त्याच्यासाठी मी. नोकरी सांभाळून अर्धवेळ नोकरी केली. शिकवण्या केल्या. स्टेशनवरून बस ने न येता चालत यायचो. तो आणि मदन दोघांसाठी मी आणि महेशच्या आईने खस्ता खाल्ल्या. मी कडक शिस्तीचा होतो पण त्या त्या वयात मुलांना धाकात ठेवणं आवश्यक असते. नाही तर मुलं हाताबाहेर जायला वेळ लागत नाही. इतकं करूनही कमवायला लागल्यावर महेशला शिंग फुटली आणि त्यानं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. आमच्या साठी तो प्रचंड मानसिक धक्का होता. आमचा नाही का झाला संसार ह्याच जागेत. थोडंसं सामान ठिकठाक ठेवून महेशचा देखील संसार सुरू झाला असता इथे. पण माझ्या आजवरच्या शिस्तबद्ध पद्धतीने जगण्याच्या चक्रातून त्याला स्वतःची सुटका करून घ्यायची होती. किती स्वप्नं बघितली होती आम्ही दोघांनीही. मुलं मोठी होऊन कमावती झाली की आईवडिलांना एक प्रकारचा आधार मिळतो रे. पण त्या आधाराचा थोडा सुध्दा आनंद मिळू दिला नाही महेशने आम्हा दोघांना. महेश पाठोपाठ मदनने देखील वेगळी वाट धरली. अशा वेळी उध्वस्त झालेले घर बघण्याचे दुर्भाग्य आमच्या नशिबी आले होते. मी लवकर सावरलो ह्या धक्क्यातून. पण महेशची आई तेव्हापासून जी गप्प गप्प झाली ती अजूनही तशीच आहे. हळूहळू एकमेकांना आधार देत जगणं आमच्या नशिबात आहे हे आम्ही दोघांनीही आपापल्या मनाला पटवून दिले आणि तिथून नवीन आयुष्याला सामोरे गेलो आम्ही. प्रत्येक दिवस आनंदात जगायचा प्रयत्न करायला सुरुवात केली आम्ही. नाटक सिनेमा हाॅटेलात जेवायला जाणं. इतकी वर्षे ज्या ज्या गोष्टींना आम्ही जाणीवपूर्वक दूर ठेवले ती प्रत्येक गोष्ट आम्ही अनुभवायला लागलो. आमचं घर हेच आता आमचं सर्वस्व होते. दोन्ही मुलांनी परकं आणि पोरकं केल्यावर ज्या घराने आम्हाला आधार दिला, समजून घेतलं आणि जमेल तितकं माया करत सांभाळून घेतलं त्याच घराला दूर सारून महेशकडे जाण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. महेशच्या आईचं देखील हेच मत आहे. आता जे काही बरं वाईट व्हायचं आहे ते माझ्या हक्काच्या घरात व्हावे येवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा कृपा करून माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू नकोस "
येवढं बोलून काका दमले. घामाघूम झाले. मी जवळच असलेल्या टाॅवेलने त्यांचा घाम पुसत त्यांना म्हणालो," काका तुम्ही सांगितलंत ते सगळं बरोबरच आहे. त्यात काही शंकाच नाही. मला मात्र आता भेदक गोलंदाजी करावी लागणार आहे येवढं मात्र खरं "
माझं बोलणं ऐकून काका हसले. मी सोबत आणलेल्या फळांच्या पिशवीतून दोन सफरचंद बाहेर काढून ती कापून त्याच्या फोडी एका डिश मध्ये ठेवून ती डिश काकांजवळ ठेवली.
काका हे खा आता हळूहळू. मघाशी येवढं बोललात. घसा सुकला असेल तुमचा "
मी आता खाता खाता  तुझं बोलणं ऐकून घेतो. येवढा मोठ्या हुद्द्यावर आहेस तू म्हणजे नक्कीच तुझं म्हणणं माझ्या गळी उतरवायचा प्रयत्न करणार तु हे ओघाने आलेच.
काकांचं बोलणं ऐकून मला हसायला आलं.
"मी बरोबर बोललो ना" 🤔 
"हो काका". शरणागती पत्करणं आवश्यक होते मला कारण तरंच माझं म्हणणं तितक्याच निर्धाराने मला काकांसमोर मांडता आले असते.
इतक्यात महेश औषधे घेऊन आत आला आणि मला खुणेनेच विचारलं त्याने. आमच्या खाणाखुणा नेमक्या काकांच्या लक्षांत आल्या आणि मग तेच महेशला म्हणाले माझी बाजू मांडून झाली. आता मला ह्याची बाजू ऐकायची आहे. तु माझ्या सोबत बसलास तरी हरकत नाही माझी. सध्या सफरचंद खाण्यासाठी आम्ही ब्रेक घेतला आहे.
सफरचंदाची फोड शांतपणे खाताना मला जे बोलायचे आहे त्याची मी उजळणी करत होतो.
सफरचंद ब्रेक सुरू असतानाच अचानक डॉक्टर राऊंडला आले. जुजबी तपासणी करून ते काकांना म्हणाले पुढच्या आठवड्यात डिस्चार्ज देतो तुम्हाला. तुमचा मुलगा म्हणत होता मला की तुम्हाला त्याच्या घरी नेणार आहे तो विश्रांतीसाठी. नशीबवान आहात तुम्ही. तुमची काळजी घेण्यासाठी उत्सुक आहे तुमचा मुलगा जे सध्याच्या कलियुगात अभावाने दिसते. मी इथे किती रुग्ण बघितले आहेत की त्यांची धनवान मुलं घरात नीट काळजी घ्यायला वेळ नाही किंवा या ना त्या कारणाने जबाबदारी टाळण्यासाठी डिस्चार्ज मिळत असूनही तो घेत नाहीत. तुमचं तसं नाहीये. लेकाकडे रहा आनंदाने आणि तब्येत परत ठणठणीत बनवा.
डॉ मला देवदूतच भासले. काकांशी बोलण्यासाठी नेमकी कुठून सुरुवात करावी ह्याचा विचार माझ्या मनात सुरू असतानाच डॉक्टर आले आणि माझं काम सोपे करून गेले.
डॉ खोलीबाहेर पडल्यावर काका माझ्याकडे बघत म्हणाले," डॉक्टरांनी पाया मजबूत खणून ठेवला आहे. तुला आता फक्त इमारत उभी करायची आहे".
"काका डॉक्टर जे बोलले ते त्यांच्या अनुभवाच्या आधारे. तुमच्या बाबतीत परिस्थिती जरी वेगळी असली तरी डॉक्टरांचं बोलणं नक्कीच विचार करायला लावणारं आहे ह्यात शंकाच नाही. तुम्ही तुमची बाजू मांडताना महेश आणि मदनला वाढवताना तुम्ही केलेला त्याग आणि खाल्लेल्या खस्ता सविस्तरपणे सांगितल्या आणि ते सगळं मला शंभर टक्के पटले. पण काका हे सगळं सुरू असताना मुलांच्या बाजूने विचार करण्याचा तुम्ही कधी प्रयत्नच केला नाही असं मला आज वाटतं. तेव्हा आम्ही लहान होतो. तुमच्या कडक शिस्तीला विरोध करण्याची हिंमत तेव्हा महेश मध्येच काय पण आम्हा मित्रांमध्ये देखील नव्हती. तुम्ही पैसे दिले नाहीत कधी मनोरंजन करायला. आपल्या सगळ्यांचीच परिस्थिती बेताची होती तेव्हा. पण त्याही परिस्थितीत आम्ही मित्रांनी महेशला कधी ह्या गोष्टीचं दुःख जाणवू दिलं नाही. आम्ही कायम एकत्रच राहिलो आजपर्यंत. तुम्ही महेश मदनला जेवढे जास्त शिस्तीत आणि धाकात ठेवत गेलात तसं तसं त्याला विरोध करायची ताकद त्या दोघांमध्ये वाढत गेली त्यांच्याही नकळत. जेव्हा विरोधाला विरोधाने उत्तर देण्याची आर्थिक ताकद त्यांच्याकडे आली तेंव्हा महेशने त्याचा वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला. आता आमचं आयुष्य आमच्या पध्दतीने जगू द्या ही खरंतर त्याची कळकळीची विनंती होती तुम्हाला. पण माझ्या शिस्तीच्या साम्राज्याला शह देण्यासाठी तो तयार झाला आहे अशी तुमची समजूत होणं साहजिकच होतं काका. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. वेगळं होण्याच्या त्यानं दिलेल्या कारणांचा त्याच्या बाजूने तुम्ही एकदा तरी विचार केला असता तर त्यातला सच्चेपणा तुम्हाला नक्कीच जाणवला असता.
काका जन्म जरी आईवडिलांनी दिला असला तरी जगण्याची पद्धत आणि रस्ता निवडण्याची मुभा देवाने बुध्दीच्या माध्यमातून प्रत्येकाला दिली आहे आणि संधी मिळाली की प्रत्येक जण निवड करत असतो.
काका श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आणि श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग जरी वेगवेगळा असला तरी त्यांचा शेवट पंढरपुरीच होतो. कारण दोन्ही पालख्या पांडुरंगाच्या दर्शनासाठीच येतात. तुम्ही आणि महेश ह्या दोन्ही पालख्यांचे प्रतिनिधी आहात. आजवर दोन्ही पालख्यांचा प्रवास अखंडपणे सुरू होता. तुमच्या पालखीचा मुक्काम काही काळासाठी वाढला तुमच्या आजारपणाच्या रुपात.  तुमच्या  पालखीला पुढच्या प्रवासाला साथ देण्यासाठी महेशची पालखी संधी शोधत आहे. असं असताना तुम्ही स्वतःहून ती संधी महेशला देणं अपेक्षित आहे. तुमच्या दोघांचा पांडुरंग एकच आहे आणि तो म्हणजे तुमच्यातील बापलेकाचे नाते. काका दोघांच्याही आसुसलेल्या डोळ्यांना त्या पांडुरंगाचे सुखद दर्शन होण्याची वेळ आता आली आहे. ती संधी तुमच्या अनाठायी हट्टापायी दवडू नका येवढीच माझी विनंती आहे तुम्हाला.  कदाचित तुम्हाला हा लहान तोंडी मोठा घास वाटला तर मला माफ करा".मी पुढे आणखी बरीच उदाहरणे देऊन काकांना माझी बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा सकारात्मक परिणाम मला काकांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांत दिसायला लागला होता.
"काका, काकू पण आता थकली आहे. तुमचं पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळायचं आहे तिला. शिवाय भाजी, किराणा आणि रोजची कामे देखील तिला करायची आहेत. न पेक्षा तब्येत सुधारत नाही तोपर्यंत तरी महेशच्या घरी रहा. त्याचं घर मोठं आहे. तुम्हाला वेगळी खोली मिळेल. तिथे टिव्ही बघत तुमचा वेळ छान जाईल. मुख्य म्हणजे काकूला विश्रांती मिळेल. महेशची बायको देखील तुम्ही तिथे येण्यासाठी उत्सुक आहे. तुमचं सगळं कौतुकाने करेल ती.
तुमच्या विरोधाची धार जरा बोथट करून मी म्हणालो आहे त्यावर गांभीर्याने विचार करा. शेवटी आपलं आयुष्य किती आहे ते आपल्याला माहीत नसतं. महेशला पांडुरंगाचे दर्शन होण्यासाठी तुम्हाला थोडं नमतं घेऊन त्याच्या पालखी सोबत जावं लागणार आहे. एकदा का तुम्हाला दादरच्या घरी नेहमीचं आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास आला की तुम्ही महेशला तसं सांगून खुशाल जा परत.
पण सध्या तुमच्या पालखीचा मुक्काम महेशच्या पालखी सोबत काही काळ तरी असणं आवश्यक आहे.
काका मी गेल्यावर माझ्या बोलण्याचा शांतपणे विचार करा. मला खात्री आहे की पुढच्या आठवड्यात डिस्चार्ज मिळाला की महेशच्या गाडीतून त्याच्या घरी जाताना तुमच्या बाजूला बसण्याची संधी तुम्ही मला नक्की द्याल. मी वाट बघीन तुमच्या निर्णयाची."
"ठीक आहे मी करीन विचार.
काका हे बोलून गेले आणि अर्धी लढाई जिंकली आहे ह्याची खात्री मला पटली.
महेशने देखील अंगठा वर उचलून त्याचा आनंद आणि उत्साह व्यक्त केला.
मी शांतपणे आणि समाधानाने घरी जायला निघालो.
मी घरी आलो खरा पण काकांना समजावण्याच्या नादात आपण काही कमी जास्त बोलून गेलो नाही ना ह्याची चुटपुट मला लागून राहिली. पुढचे दोन तीन दिवस मी शांत शांत होतो. घरी बायको मुलांच्या ते लक्षांत आलं. त्यांनी खोदून खोदून विचारल्यावर देखील मी खरं कारण सांगितले नाही. महेश कडून काहीच बातमी न आल्याने माझी धाकधूक आणि बैचेनी वाढत चालली होती. पुढचा आठवडा सुरू झाला होता. सोमवारी रात्री नुकताच माझा डोळा लागला होता आणि व्हाॅट्स ऍपवर मेसेज आल्याची घंटा वाजली. मी अधाशासारखा टेबल लॅम्प लावला. घड्याळात साडेबारा वाजत होते.  मोबाईल चालू केला. महेशचा मेसेज आला होता.
"तु अखेर जिंकलास. बाबा ठाण्याला यायला तयार झाले आहेत. मला रहावलं नाही म्हणून तुझी झोपमोड करत आहे. उद्या संध्याकाळी डिस्चार्ज देणार आहेत डॉक्टर. बाबांना तुझ्या सोबतच यायचं आहे ठाण्याला. तु पोहोच सहा वाजता. तोवर मी डिस्चार्जची सगळी प्रक्रिया पूर्ण करून ठेवतो. तु आलास की लगोलग निघू या आपण."
महेशचा मेसेज वाचून मला खरोखर रडू आलं आणि नंतर शांत झोप लागली मला.
🛌💉🩺🩻🚗.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ठरलेल्या वेळेच्या अगोदरच मी हाॅस्पिटलमध्ये पोहोचलो. महेश मला तळमजल्यावरच भेटला डिस्चार्जचं काम करताना. त्याला उभ्या उभ्या भेटून मी काकांच्या खोलीत पोहोचलो. 
"या प्रोफेसर. स्वागत आहे तुमचं."
"काय काका तुम्ही पण. चक्क मला अहो जाहो करताय."
"करायलाच पाहिजे. तुझ्या हिंमतीची दाद दिली पाहिजे खरंच. माझ्या सारख्या हट्टी आणि मी म्हणेन ती पूर्व दिशा म्हणणाऱ्या माणसाला तू सुतासारखा सरळ करत त्याच्या अंगात मुरलेल्या अहंकाराला नष्ट करण्याची किमया तु तुझ्या शब्दांच्या मदतीने केलीस. माझ्या मीपणाचे गड तुझ्या शाब्दिक तोफांनी ढासळले आणि आजवर महेश आणि मदनवर निव्वळ प्रेमापोटी केलेल्या अन्यायाची जाणीव मला करून दिलीस तू. आमच्या नात्याच्या पांडुरंगाला भेटायला मी आज किती उत्सुक आहे हे तुला सांगूनही खरं वाटणार नाही. काल रात्री महेशला जवळ घेऊन मी ओक्साबोक्शी रडलो आणि आजवर त्याच्यावर केलेल्या अन्यायाबद्दल त्याची माफी मागून मोकळा झालो. कितीतरी वेळ आम्ही दोघे एकमेकांच्या कुशीत रडत होतो. त्याच अवस्थेत मी नको नको म्हणत असतानाही न राहवून त्याने तुला मेसेज पाठवला आणि नंतर तो मला वाचूनही दाखवला". मला ते ऐकून गहिवरून आलं.
दारावर टकटक झाली. महेश आत आला आणि त्याने मला कडकडून मिठी मारली. क्षण दोन क्षण असेच गेले. मी निःशब्द होतो. भानावर आल्यावर मी महेशला म्हणालो, "नक्की चुकलं कोण आजवर ह्याचा विचार आता दोघांनीही करू नका ह्यापढे. आता फक्त नात्याच्या पांडुरंगाला शेवटपर्यंत डोळ्यांत साठवून ठेवा दोघांनीही".
"नक्कीच लक्षांत ठेवीन मी ही गोष्ट. महेश डोळे पुसत म्हणाला. निघायची वेळ झाली. सामानाची आवराआवर झाली. काकांनी वाॅर्डबाॅय सफाई कर्मचारी नर्सबाईंना आनंदाने बक्षीस दिले आणि आम्ही सावकाश पावलं टाकत खोली बाहेर येऊन लिफ्टच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

कथा समाप्त.
© सतीश बर्वे १५.०७.२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...