शनिवार, २५ जुलै, २०२६

3046. पर्व

 रैना ऑफिसमधून घरी आली नेहमीप्रमाणेच, स्वतःकडच्या किल्लीने दार उघडत... पण आज घर मात्र, रोजच्यासारखं दिसलं नव्हतं तिला. साडेसात वाजून गेले होते, तरी घरी अंधारच होता. इतकंच काय तर, देवापुढचा दिवा ही लागला नव्हता. त्यामुळे ती यायच्यावेळी आसमंतात भरुन राहणारा, तो रोजचा उदबत्तीचा गंधही अनुपस्थितीत होता आज. चर्र झालं रैनाच्या काळजात. आपली बॅग बाहेरच सोफ्यावर टाकून, कशाबशा चपला काढत पायातून, रैना आतल्या खोलीत पळाली. "आई - आई" ओरडतच. तिने बेडरुमची ट्युब लावली... आणि तिला दिसली तिची आई, अंगभर पांघरुण घेऊन झोपलेली. रैना जवळ जाऊन बसली आईच्या, आणि आईच्या कपाळाला हात लावला तिने. चांगलाच ताप भरुन आला होता रमाबाईंना. 
रैनाने आईला हाताला धरुन उठवलं, नी बसवलं उशीला टेकवून. मग तिने किचनमध्ये जाऊन पाणी आणलं भांडभर, आणि ते पाजलं आईला. किंचितशी तरतरी आली रमाबाईंना, आणि त्या पलंगावरुन खाली उतरण्यासाठी बघू लागल्या. रैनाने त्यांचा खांदा दाबत त्यांना पुन्हा बसवलं, नी म्हणाली... "ताप आहे बरं का तुझ्या अंगात... आणि चांगला एक - दिड असेलसं वाटतंय. तुझ्यासाठी पटकन दोन पोळ्या करते ताज्या... आणि तुप - साखरेचा रोल करुन देते तुला. म्हणजे क्रोसिन घेता येईल. आणि तोपर्यंत खबरदार, जर पलंगावरुन खाली उतरलीस तर". रैना इतकं बोलून पटदीशी आत निघूनही गेली. 
फ्रेश होऊन, देवासमोरचा दिवा लाऊन... अर्ध्या तासाआतच रैना, एका हातात प्लेटमध्ये पोळीचे रोल घेऊन आली... आणि दुसर्‍या हातात दोन कान एकत्र पकडत, चहाचे कप. कप पलंगाच्या बाजूलाच असलेल्या स्टुलावर ठेवत, रैनाने पोळीचा रोल आईला भरवायला घेतला. "अगं कशाला?"... "चूप म्हणते ना"... अशा अर्थाच्या डोळ्यांनी केलेल्या खुणांची, दोघींत देवाण - घेवाण झाली. दोन रोल्स खाऊन, चहा पिऊन, क्रोसिन घेऊन... रमाबाई पुन्हा जरा आडव्या झाल्या. रैनाने तिच्या मोबाईलवर गाणी लावली, नी तो दिला आईकडे. आणि ती उठणार तोच रमाबाईंनी तिला हाताला धरुन थांबवलं, नी बोलल्या... 
"ते परिचय मधलं 'बीती ना बिताई रैना.. बिरहा की जाई रैना' लाव ना गं जरा". रैना हसली आईकडे बघून, नी म्हणाली... "हे बरंय... म्हणजे स्वतःच मला पकडून बसवायचं... आणि वर म्हणायचं की, जाता जातच नाहीये बाई ही रैना... चिवट कुठली"... आणि हसायला लागली ती. त्यावर रमाबाईंनी किंचितसंच हसल्यासारखं केलं. रैनाने विचारलं... "आई अचानक ताप भरलाय तुला... अशक्तपणाही आलायसं जाणवतंय. काय झालंय नक्की? सांगशील का जरा". पण तोपर्यंत चालू झालेल्या 'बीती ना बिताई रैना.. बिरहा की जाई रैना' मध्ये, हरवून गेल्या होत्या रमाबाई. गाणं संपलं... भरुन आलेले डोळे हातातल्या बोळा केलेल्या रुमालाने पुसत, रमाबाईंनी रैनाकडे पाहिलं... आणि बोलू लागल्या त्या.
https://whatsapp.com/channel/0029VaDinBXFcowDhOwBNW0y
"साल १९९०... माझं नुकतंच ग्रॅज्युएशन झालं होतं. आता दोन महिने मी नुसती उंडारणार आहे... जाॅब वगैरेचं नंतर बघेन... हे घरच्यांना ठाम सांगून ठेवलेलं मी. त्याप्रमाणेच रोज बाहेर भटकणं, सिनेमे बघणं, नाटकं बघणं वगैरे... चालू होतं माझं मैत्रीणींसोबत. आणि अशातच मला कळलं होतं की, NCPA ला गुलजारच्या चित्रपटांचा महोत्सव आहे. आम्ही सगळ्या मैत्रीणी मग बर्‍याच खटपटी - लटपटी करुन, नाना ऍडजेस्टमेंट्स करुन... गेलो होतो तो अख्खा आठवडा, गुलजार नामक ते विष अंगांमधून भिनवून घ्यायला. आणि पहिलाच दंश केला होता, गुलजारच्या 'मौसम' ने. मग आम्ही 'किनारा' पाहिला होता, 'खुशबू' पाहिला होता, 'किताब', 'नमकीन', 'इजाजत' ही पाहिले होते. आणि महोत्सवाची सांगता होती, 'परिचय' ने. भान हरपून बघत होतो आम्ही सगळ्याजणी, आणि ते गाणं सुरु झालं... 'बीती ना बिताई रैना'. जया आधी गुणगुणत असते... आणि गुलजार त्याचा तो हुकमी असा, फ्लॅशबॅकचा एक्का टाकतो आपल्या पुढ्यात. जया खिडकीत बसून गातेय... 'चाँद सी बिंदीवाली' म्हणत, संजिव कुमार तिच्या हातून गाणं घेतो. पण 'छोटी छोटी यादोंके' ला त्याला खोकल्याची ढास लागते... आणि 'पल नही जाए' म्हणत, पुन्हा जया गाणं स्वतःकडे घेते. जणू आपल्या वडिलांच्या ह्या गायकीचा वारसाच, ती अलगदपणे घेते त्यांच्याकडून... त्यांना टेकवून बसवत. हमसून हमसून रडत होते मी, आणि बाजूने एक पुरुषी आवाज आला कानावर... "अर्थ जेव्हा कळेल प्रत्येक ओळीचा... आणखीन वेड्या व्हाल. आत्ता तुम्ही रडताय, ते पडद्यावर असलेल्यांचा अभिनय भिडून. पण जेव्हा तुम्हाला गुलजार शब्दशः कळेल, तेव्हा त्याने लिहिलेलं नुसतं ऐकूनही... घळाघळा रडाल तुम्ही". अंधारात मला काही निटसा दिसला नव्हता तो, शेजारचा माणूस. आणि पिक्चर संपल्यावर बघते... तर माझ्याकडे ढुंकूनही न पाहता, तडातडा चालूच पडला होता तो. मीच मग गेले त्याच्या मागे धावत... त्याला शोधू लागले, इथे-तिथे डेस्परेटली बघत. आणि दिसला मला तो, त्या लाॅबीत भिंतीला टेकून उभा... माझ्याकडेच बघत... हसत. मीच वरमले... आपण फारच बावळटपणा केलायसं वाटून. पण तो आला माझ्याजवळ, आणि विचारलं त्याने मला की... "काॅफी प्यायला येणार? कारण गुलजार त्या गरम घोटासारखा जेव्हा आत उतरतो, तेव्हाच खरी मजा येते. तुम्ही काळजी करु नका अहो... मी सोडेन तुम्हाला नंतर, गिरगावात घरी तुमच्या. माझी आजी राहते मुगभाटात... त्यामुळे बघितलंय मी तुम्हाला. मी इथे पेडर रोडलाच रहातो". आणि मी पार चमकलेच होते, त्याला आपलं घर माहितीये कळून. तो पुन्हा हसला... नी माझा होकार गृहित धरुन, थेट चालूच पडला. मी ही गेले मग भारल्यासारखी त्याच्यामागे... मैत्रीणींबरोबर मी आलेय, हे सुद्धा विसरुन. त्याच्याबरोबर होते मग मी पुर्ण तासभर. वेड लागलेलं मला वेड. पण 'गुलजार'चं की... 'तो' उलगडून सांगणार्‍या 'त्याचं', हे मात्र कळत नव्हतं. सगळं गाणं तर समजावून सांगितलंच त्याने, पण म्हणाला की... "बरेचजण अजूनही 'चाँद के बिन दिवानी.. बिन दिवानी रतियाँ' म्हणतात. पण ते खरंतर 'चाँद की बिंदीवाली.. बिंदीवाली रतियाँ' आहे. आणि इथेच तर गुलजार वेगळा होतो, आपल्यासारख्या यःकश्चित माणसांपासून. रात्रीच्या कपाळावरची टिकली म्हणतो, हा इसम चंद्राला. म्हणजे त्या चंद्रासहीत हे ब्रम्हांड बनवणार्‍या देवालाही, सुचली असती का ही उपमा?". भरभरुन बोलत होता तो... आणि माझ्या अंगांगावर शहार्‍यांच्या माळा पेटत, विझत, पुन्हा पेटत होत्या. त्यानंतर अर्थातच त्यानेच आणलं भानावर मला... आणि त्याच्या स्कुटरवरुन घरी सोडलं. मग अशक्यच होतं माझ्यासाठी, त्याच्यापासून लांब राहणं. आम्ही रोज भेटू लागलो... एकत्र वेळ घालवू लागलो. आकंठ प्रेमात पडले होते मी त्याच्या. पण... पण कायच्या कायच मनःस्वी होता तो, आपल्याच धुंदीत जगणारा. बिझनेस मॅनेजमेंट केलं होतं त्याने त्याकाळी... आणि तरीही फॅमिली बिझनेसला लाथ मारुन, अंध मुलांच्या शाळेत शिकवायचा तो. वृद्धाश्रमांतून तिथल्या वृद्धांची, सेवा करत खपायचा. महाराष्ट्रात कुठल्याही कोपर्‍यात, नैसर्गिक आपत्ती येवो... हा पहिला धावत जायचा तिथे. बदलेल्या पतंगासारखा होता तो. आपल्या हातात भले मांजा असो, आणि पायाशी फिरकीही... आणि आपल्याला वाटतही असो की, ह्याचा कंट्रोल आपल्याच ताब्यात आहे. पण हा मात्र त्या वार्‍याशी साटंलोटं करत, स्वतःला हवं तसच बदणार... आणि... आणि स्वतःला हवं तेव्हा कटणारही. एके दिवशी माझ्याकडे येऊन, मला म्हणाला की... "आनंदवन ला चाल्लोय... खूप वर्ष प्रयत्न करत होतो... कालच तिकडून कन्फर्मेशन आलं... खूद्द बाबा आमटेंची सही आहे पत्राखाली, कॅन यू इमॅजीन?". वाहत्या झर्‍यासारखा, खळाळत होता तो माझ्या पुढ्यात. आणि मी ते वाहतं पाणी... बांध घालून अडवू नाही शकले, त्याला विचारुन की... "अरे पण माझं काय?". कदाचित त्याचं प्रेम करणंही उत्स्फुर्तच होतं. म्हणूनच त्या सहा - आठ महिन्यात, मला त्याने चुकूनही तसा स्पर्श केला नव्हता. आणि खोटं का बोलू... मी त्या स्पर्शाची वाट बघत असतांनाही. मी माझ्या आई - बाबांशीही गाठ घालून दिली होती त्याची, त्यांना पुर्ण कल्पना देत. पण दोनेक भेटींनंतरच, माझे बाबा मला बोलले होते... "हा फकिर प्रवृत्तीचा माणूस आहे... स्वतःकडे अन् स्वतःच्यांकडे हमखास दुर्लक्ष करणारा. हे असले लोक आपल्या अंगणातला, साधा प्राजक्तही वेचणार नाहीत... पण दुसर्‍यांसाठी मात्र, आपलं उभं आयुष्य वेचतील. त्यातून तू समजुतदार आहेस... जो काय निर्णय घेशील, तो मान्यच असेल आम्हाला". पण त्याच्या ह्या अशा निघून वा सोडून जाण्याने, प्रश्नच मिटला होता त्या... 'हो' की 'नको' ह्या द्वंद्वाला सामोरं जाण्याचा. मग पुढच्याच वर्षी, तुझ्या बाबांबरोबर लग्न झालं माझं. प्रचंड हुशार आणि सज्जन माणूस... पण कमालीचा अरसिक. एकदा अशीच रोमँटीक वगैरे होत, मी 'घर' पिक्चरची गाणी लावली टेप रेकाॅर्डरवर. काय गुलजारने स्वतःला उधळून टाकलंय, एकेका गाण्यात. 'आज कल पाँव जमीं पर' आणि 'तेरे बीना जीया जाएना' अगदी निग्रहाने ऐकली हो तुझ्या बाबांनी. पण 'आपकी आँखोमें कुछ' सुरु होईतो, हे चक्क झोपले अगं. मग काय मीच बसले एकटी ऐकत ते... 'लब हिले तो मोगरे के, फुल खिलते है कही'... आणि मोहरुन आठवत त्याने एकदा इराण्याच्या हाॅटेलमध्ये, चहाचा गरम घोट घशात उतरवतांना केलेली... ह्या गाण्याची विस्तृत मिमांसा. म्हणजे बघ ना कसं असतं ते... एकच गोष्ट असते... जी एकाची झोप उडवते, तर एकाला झोप आणते. हसूच आलं मला त्या दिवशी, तुझ्या बाबांना घोरतांना बघून. पण त्या हसण्याचं शेवटचं टोक पकडून... अश्रू होते उभे अगदी तयारच, डोळ्यांतून ओघळायला. हेच माझं आयुष्य असणार होतं यापुढे. आणि आता आयुष्याकडून भलत्या अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही, हे वेळीच कळून... त्याच दिवशी मी गुलजारचा त्याग केला. अजिबात ऐकला वा पाहिला नाही मी गुलजार, त्या दिवसानंतर. आणि गंमत म्हणजे तुझ्या बाबांना, हे कळलंही नाही कधीच. त्यांच्यासाठी केलेला इतका मोठा त्यागही, वायाच गेला बघ. अगं तुझं नाव 'रैना' ठेऊया म्हंटल्यावरही, ह्या माणसाने... हे असलं कसलं नाव?... आपल्यात असतं का असं नाव?... वगैरे काही विचारलं नाही मला. अगदीच सरळसोट, सरळमार्गी माणूस होते तुझे बाबा. गेल्या वर्षी ते कार्डिऍक अरेस्टने गेले... आणि पहिलं मी काय केलं असेन, तर 'बीती ना बिताई रैना' ऐकलं. खूप रडले... अगदी ओक्साबोक्शी रडले. तुझे बाबा गेल्याचा, आणि गुलजारच्या शब्दांतून 'तो' परतल्याचा... एकत्रीत सोहळा होता तो, साजरा झालेला डोळ्यांवाटे. मग गेलं वर्षभर मी तुझ्या बाबांच्या आठवणींपेक्षा, त्याच्या आठवणींवरच जगत होते. पण आज... अगदी काहीवेळानंतरच, मी पुन्हा एकदा गुलजार सोडून देणार आहे". 
इतकावेळ आईचं हे सगळं मनोगत... भरल्या डोळ्यांनी ऐकणार्‍या रैनाच्या भुवयांची, प्रश्नचिन्ह झाली. रमाबाई आपणहूनच बोलल्या मग... "कालच मला कळलं की, पाच वर्षांपुर्वीच तो गेला हे जग सोडून... आणि तुझ्यामुळेच समजलं मला हे बरं का". "माझ्यामुळे?... म्हणजे?... आणि ते कसं काय?"... रैनाने विचारलं आईला. रमाबाई बोलल्या... "तुला साद बरोबर लग्न करायचंय म्हणून सांगितलंस तू मला, दोन दिवसांपुर्वी... आणि काल रात्री त्याला, घरी घेऊन आली होतीस. सादचं पुर्ण नाव 'साद सागर जहागीरदार' आहे, हे काल समजलं मला. आणि माझ्या आयुष्यातल्या 'त्याचं' पुर्ण नाव होतं... 'सागर सदानंद जहागीरदार'. तू आतमध्ये खाण्याचं बघत असतांना... मी अगदी कसून चौकशी केली मग, सादची अन् सागरचीही. साद कडूनच कळलं की, दोन वर्ष आनंदवनात राहून त्याचा बाबा... म्हणजेच सागर परतला होता मुंबईत, वडिल गेल्या कारणाने. साद मला सगळं सांगत होता... नी माझ्या लक्षात आलं त्याच्या बोलण्यातून की, साद एका टक्क्यानेही सागरवर गेलेला नाही. प्रचंड प्रॅक्टिकल आणि कॅल्क्युलेटेड आहे साद. खूप 'नेटाने' करेल संसार तो, जरी फार 'प्रेमाने' नाही केला... अगदी तुझ्या बाबांसारखा. आणि महत्वाचं म्हणजे, मी जेव्हा त्याला गुलजारबद्दल विचारलं... तेव्हा त्याने मला इकोनाॅमिस्ट आणि भुतपुर्व ऍक्टिंग प्राईम मिनिस्टर... गुलजारीलाल नंदांबद्दल खडान् खडा सांगितलं. तेव्हाच कळलं मला की, आपली लेक सुरक्षीत हातात आहे. आणि आता सागरच राहिला नाही... तर उगीच गुलजार ऐकून, त्याला का आठवत बसू? म्हणूनच तुझी वाट बघत होते की तू येशील... नी मला ते माझं गाणं लाऊन देशील, शेवटचं मन भरुन ऐकायला. संपलंय आता गाणं... आणि संपलंय एक 'पर्व' ही, आयुष्यातलं माझ्या... 'सागर' नावाचं. तसंही मीच आपलं ते माझ्यासाठी, सुरु करुन घेतलं होतं म्हणा. कारण माझ्यासाठी सागर जरी सर्वस्व होता, तरी सागरसाठी मी एकमेवं अशी कधीच नव्हते. अगदी आमच्या गुलजारनेच म्हंटल्याप्रमाणे... फर्क था हम दोनों की मोहब्बत में.. मुझे उससे 'ही' थी, उसे मुझसे 'भी' थी".
रैना घट्ट बिलगली रमाबाईंना... खरंतर गुलजारच्याच चित्रपटातील, एका खर्‍या मीरेला.
🙏♥️
---सचिन श. देशपांडे
(Revised & Reposted) PC : Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...