शनिवार, २५ जुलै, २०२६

3093. देऊळ

 त्यानं कधीच देवळात पाऊल ठेवलं नाही. दिवार चित्रपटातल्या अमिताभ बच्चनसारखा तो नेहमी देवळाच्या बाहेर बसून असंख्य भक्तगण जाता येता पहायचा. फुलांचे ताट, उदबत्ती, नारळ घेऊन येणाऱ्या अनेक भाविक लेकी सुना न्याहाळायचा. भाविकांच्या चपला सांभाळण्यासाठी त्यांचा छोटासा स्टॉल होता; तिथनं दिवसभरात तो मनुष्य स्वभावाचे हजारो कंगोरे पहात असे !
त्या दिवशी एक वृद्ध आजी चपला ठेवताना त्याच्या हातावर थरथरता हात ठेवून म्हणाली
”गजानना, मला जरा देवळाच्या दाराजवळ पोचवशील का रे?”
“आज्ये, मी हललो इथनं, तर चपला कोन सांभाळलं गं…? बरं, असू दे…चल.” म्हणत तो आला खरा, पण चालताना आजीला चक्कर आली. म्हातारीला उचलून त्यानं दुकानात आणलं… वारा घातला, पाणी दिलं, आपल्या डब्यातली झुणका भाकर दिली. म्हातारी ताजीतवानी होताच तो तिला दारापाशी पोचवून आला.
“देव तुझं भलं करो, गजानना…” आजीनं त्यालाच हात जोडले आणि त्याचं नावही गजानन पडून गेलं. त्यानं कधीच ते दुरूस्त करून स्वतःचं नाव सांगितलं नाही.
दुसरे दिवशी एक मग्रूर श्रीमंत गृहस्थ तिथं बूट ठेवून गेला.  ‘इम्पोर्टेड शूज आहेत… लक्ष ठेव’, म्हणाला. त्या बुटावर एका गिऱ्हाईकानं त्याच्या पिशवीतील फरसाण सांडलं.
नेमकं ते पुसून घेत असताना तो माणूस परतला व त्याला वेडवाकडं बोलला. पैसे न देता बूट घालून निघून गेला!
पैजणांची मंजूळ किणकिण करत एक सूनबाई एक दिवस आली. सात्विक व सुंदर सुनबाईच्या गोऱ्या पायात मोती लावलेल्या चपला होत्या. गोड आवाजात सुनबाई म्हणाली, “कसा आहेस?”
…आणि याचा दिवस कारणी लागला. तिनं घसघशीत टीप दिली. “बरंय की!” पुटपुटत त्यानं पावती फाडली. “येते हं…” अशी साखरपेरणी केलेली भाषा बोलून सूनबाई निघून गेली.
आईनं मंगळसूत्र विकून हा स्टॉल घेतला होता… संसाराला हातभार लावण्यासाठी! आहे त्यातच ती देवाला ताजी फुलं अर्पण करत असे. भक्तीभावानं हात जोडून झालेल्या चुकीसाठी चार थपडा मारून घेत असे. दारूड्या नवऱ्याचं व्यसन सुटो, म्हणून प्रार्थना करणारी!
“मानसाचा जल्म आलाय कधी नव्हं ते… त्यो दारू ढोसन्यासाटी न्हाई! करा काहीतरी याच जल्मात…” हे नवऱ्याला, मुलांना सांगणारी! पण एवढ्या उपासनेनंतर तिचं आयुष्य थोडंही सुधारलं नव्हतं..
नवरा दारू पिऊन लाथा घालायचा. एक दिवस मात्र देवीच हिच्या अंगात आली व तिनं तिरमिरीनं नवऱ्याला एकच अशी लगावली की तो भेलकांडत खाली पडला. त्याचं डोकं खाली आपटून रक्त येऊ लागलं. आईनं धावत जाऊन हळद आणून लावली! याला प्रेम म्हणायचं का राग हे त्याला कधी कळलंच नाही आणि आईचं आयुष्य न सुधारणाऱ्या देवीच्या दारात जाऊन आपण उभं रहावं असंही वाटलं नाही! 
अशीच एक संध्याकाळ आली… आरतीचा आवाज हवेत घुमत होता. शंखनाद, घंटानाद, आणि भाविकांचा आरतीचा आवाज एकत्र मिसळून एक अद्भुत लय तयार झाली होती.
त्या दिवशी त्या आवाजांनी त्याच्या मनात काही वेगळं झालं. देवळाच्या आतून कुणीतरी बोलावतंय, असं वाटू लागलं.
तेवढ्यात एक मग्रूर शेठ आला. सुटलेलं पोटं व नजरेत तुच्छता! त्यानं चपला जवळजवळ याच्याकडे भिरकावल्या. व कसलासा श्लोक म्हणत तो पुढं गेला.
इतकी तुच्छता का दाखवायची? मी पण माझं कामच करतोय ना? त्याचे डोळे उगीचच भरून आले. त्याने डोळे पुसले तेव्हा समोर एक छोटी मुलगी उभी होती. तिनं चपला काढल्या…
“काका, इथं ठेऊ चपला?” असं गोड आवाजात विचारलं. त्याचं मन त्या गोडव्यानं भरून आलं!
“हो बेटा, ठेव तिथं!” कधी नव्हे ते स्वत:च्या आवाजातील ओलावा त्याचा त्याला ऐकू आला.
“काका, नीट सांभाळा हं चपला… नव्या आहेत. आज पहिल्यांदा घातल्या आहेत. टाटा!” इतकं गोड माणूस बोलू शकतो, या विचारात तो पडला!
सुंदर निळा फ्रॅाक, रेशमी केसांची एक वेणी घातलेली ती गोड मुलगी उड्या मारत देवळात गेली. जाताना त्याच्या ह्रुदयाचा एक तुकडा बरोबर घेऊन गेली, असं त्याला वाटलं. ते निरागस, देवीसारखं हसू त्यानं मनात साठवून घेतलं! 
बराच वेळ वाट पाहिली, तरी ती मुलगी परत आली नव्हती. शेवटी तो उठून देवळाच्या पायरीजवळ गेला. पुजारी काकांना दोन हाका मारल्या पण त्यांना ऐकू गेलं नाही.
…आणि तो आयुष्यात प्रथमच देवळाची पायरी चढला. पुजारी काका पण त्याला पाहून आश्चर्यचकित झाले…
”काय गजानना, आलास ना शेवटी देवळात?”
“पुजारी काका, ती मुलगी… निळा फ्रॉक घातलेली, एक वेणी घातलेली… ती चपला घ्यायला परत आलीच नाही… कुठंय ती?”
“अरे, कुठलीही निळा ड्रेस घातलेली मुलगी इथं आलेली नाही. कितीही गर्दी असली तरी देवळात आलेला प्रत्येक भक्त… आस्तिक-नास्तिक… मी कधीही विसरत नाही.” पुजारी काका परत मंत्रपुष्पांजली म्हणण्यात गुंतून गेले.
“हे कसं शक्य आहे? नव्या चपला सांभाळ म्हणून सांगून गेली ती…”
तो घाईघाईने चपलांच्या स्टॅालवर परतला. त्या नव्या चपला तिथंच होत्या.
अशी कशी गायब झाली?
तो परत देवळात गेला. पुजारी काकांनी त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं.
त्यानं गाभाऱ्याकडे पाहिलं..देवीचा तेजस्वी शांत चेहरा निरांजनाच्या प्रकाशात उजळला होता. त्या चेहऱ्याकडे बघताच त्याला अपरिमित शांती जाणवली… आईकडे पाहताना जाणवे अगदी तशी! ती ऊब जाणवली… अगदी त्या मुलीनं ‘काका’ म्हणून हात मारताना जाणवली तशी!
तो एकदम थबकला…
देवी निळी साडी नेसली होती.
एक वेणी घातली होती.
त्याचे हात आपोआप एकत्र आले…
बाहेर डोळ्यातून अश्रू वाहू लागले अन् आत अज्ञात विचारांची संतत धार लागली…
देव म्हणजे या उबेचा, या जाणीवेचा क्षण…
देव म्हणजे त्या अनोळखी मुलीचं मोकळं निरागस हसू...
देव म्हणजे त्या वृद्ध आजीचा थरथरता स्पर्श…
देव म्हणजे एखाद्या तुच्छतेने पाहणाऱ्या माणसाकडेही शांतपणे पाहण्याची क्षमता…
त्या क्षणी त्याला आयुष्यातली सर्वात गहन जाणीव झाली.  तो देवळाच्या बाहेर बसलेला केवळ चपला सांभाळणारा माणूस नव्हता.
देवाच्या दारावर बसलेला एक साक्षीदार होता… निरनिराळी आयुष्यं पाहणारा…
देवाजवळ जाण्यापूर्वी आपली वर्तणूक दाखवणारे भाविक पाहणारा…
“देवळात जाण्याची वेळ आली की देवच बोलावत असतो.
पण कधी कधी योग्य वेळी देव बाहेर येऊन दर्शन देत असतो…
पळत येऊन त्यानं त्या मुलीच्या नव्या कोऱ्या चपला पादुकांसारख्या माथी लावल्या. त्या हातात घेऊन हृदयाशी घट्ट पकडल्या आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला.
आईची भक्ती आज त्याला थोडीफार कळू लागली होती.

- ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...