शनिवार, २५ जुलै, २०२६

3037. उभ्या रस्त्यावरचा गुरुजी

 सत्य घटनेवर आधारित
दुपारची वेळ होती. कोलकात्याच्या रस्त्यांवर नेहमीसारखीच धावपळ सुरू होती. सिग्नलवर गाड्यांच्या रांगा, हॉर्नचा आवाज, धूळ, उन्हाचा चटका आणि त्या सगळ्या गोंधळात पांढऱ्या गणवेशात एक ट्रॅफिक पोलीस आपलं कर्तव्य बजावत उभा होता. त्याचं नाव होतं प्रकाश घोष.
रोजच्या ड्युटीत त्याच्या नजरेस एक गोष्ट वारंवार पडायची. रस्त्याच्या कडेला, झाडाच्या सावलीत बसलेला एक छोटासा मुलगा. समोर फाटकी चटई, हातात वही, आणि चेहऱ्यावर त्या वयात नसावी इतकी काळजी.
तो मुलगा आणि त्याची आई रस्त्याच्या कडेलाच राहत होते.
ना पक्कं घर, ना स्थिर संसार.
आई जवळच्याच एका फूड स्टॉलवर काम करायची. दिवसभर कष्ट करून ती मुलाच्या पोटाची आणि शिक्षणाची दोन्ही जबाबदारी पेलत होती. गरीबी इतकी होती, की रात्री कुठे झोपायचं याचीही शाश्वती नसायची… पण तरी तिच्या मनात एक हट्ट जिवंत होता. 
“माझा मुलगा शिकला पाहिजे.”
तिनं त्या मुलाला सरकारी शाळेत घातलं होतं.
शाळेची बॅग होती, वही होती, पेन्सिल होती… पण घरी अभ्यास घ्यायला कुणी नव्हतं.
आणि पोटाच्या, जगण्याच्या, उन्हाच्या, पावसाच्या, रस्त्यावरच्या आयुष्याच्या हजार चिंतांमध्ये त्या मुलाचं अभ्यासातलं मन हळूहळू उडत चाललं होतं.
एक दिवस त्या मुलाच्या आईनं सिग्नलवर उभ्या असलेल्या प्रकाश घोष यांच्याशी बोलताना हळूच मन मोकळं केलं.
“साहेब… मुलगा शाळेत जातो खरी. पण अभ्यासात मन लागत नाही. मी दिवसभर कामावर असते. मला काही त्याला शिकवता येत नाही. रस्त्यावर राहून किती करणार?”
ती बोलत होती आणि तिच्या आवाजातली हतबलता प्रकाश घोष यांच्या मनाला भिडत होती.
त्या दिवशी त्यांनी काही मोठं भाषण केलं नाही.
ना फोटो काढला, ना कौतुकाची अपेक्षा ठेवली.
फक्त एवढंच म्हणाले,
“तुम्ही काळजी करू नका. मी बघतो त्याचा अभ्यास.”
दुसऱ्या दिवसापासून एक वेगळंच दृश्य दिसू लागलं.
रस्त्यावर ट्रॅफिक सांभाळणारा तो पोलीस, ड्युटीच्या फावल्या क्षणी त्या मुलाजवळ उभा राहू लागला.
मुलगा चटईवर बसायचा.
समोर वही उघडायचा.
आणि प्रकाश घोष हातात एखादी काडी घेऊन त्याला शब्द, स्पेलिंग, उच्चार, पाढे, गृहपाठ समजावून सांगायचे.
युनिफॉर्ममुळे त्यांना खाली बसणं कठीण जायचं.
म्हणून ते उभ्याउभ्याच “क्लास” घ्यायचे.
कधी ते वही तपासायचे.
कधी चुकीची स्पेलिंग दुरुस्त करायचे.
कधी त्याला पुन्हा पुन्हा वाचायला लावायचे.
कधी प्रेमानं समजवायचे,
“शिक रे… आयुष्य बदलायचं असेल तर पुस्तक सोडायचं नाही.”
रस्त्यावरून जाणारे लोक थोडा वेळ थांबून ते दृश्य पाहायचे.
एका बाजूला वेगानं धावणारं शहर…
आणि दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या कडेला उभा राहून एका गरीब मुलाचं भविष्य घडवणारा पोलीस.
त्या मुलासाठी तो ट्रॅफिक पोलीस फक्त पोलीस राहिला नव्हता.
तो त्याचा शिक्षक झाला होता.
आधार झाला होता.
“कोणी तरी माझ्यासाठी थांबतंय” ही भावना त्याच्या छोट्याशा मनाला बळ देणारी ठरत होती.
आईलाही आता धीर आला होता.
तिला वाटू लागलं - गरीबी आहे, रस्ता आहे, कष्ट आहेत. पण माझ्या मुलाच्या वाटेला आता एक चांगला माणूस मिळाला आहे.
ही गोष्ट सोशल मीडियावर पोहोचली, तेव्हा अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं.
कारण या घटनेत मोठे संवाद नव्हते…
मोठं दान नव्हतं…
मोठा गाजावाजा नव्हता…
होतं ते फक्त कर्तव्याच्या पलीकडचं माणुसकीचं पाऊल.
ट्रॅफिक पोलीस म्हणून प्रकाश घोष रोज शेकडो गाड्या थांबवत असतील…
पण त्या दिवशी त्यांनी एका मुलाचं भरकटणारं आयुष्य थांबवलं होतं.
रस्त्यावर राहणाऱ्या त्या लेकराच्या हातात त्यांनी फक्त वही दिली नाही…
तर त्याच्या भविष्यात आशेची एक रेघ ओढली.
आपण अनेकदा विचार करतो — समाजासाठी मोठं काय करता येईल?
पण खरं सांगायचं तर कधी कधी समाज बदलायला मोठ्या गोष्टी लागत नाहीतच.
एका मुलाला अभ्यासात मदत करणं,
एखाद्याच्या स्वप्नांवरचा विश्वास टिकवून ठेवणं,
“तू करू शकतोस” हे चार शब्द वेळेवर सांगणं…
इतक्यानेही आयुष्याला दिशा मिळू शकते.
प्रकाश घोष यांनी त्या मुलाला पैसा दिला नाही, बंगला दिला नाही, मोठमोठी आश्वासनं दिली नाहीत…
पण त्यांनी त्याला जे दिलं, ते त्याहून मोठं होतं
वेळ, लक्ष, आधार आणि शिक्षणावरचा विश्वास.
रस्त्यावर उभा असलेला तो पोलीस त्या दिवशी फक्त ट्रॅफिक कंट्रोल करत नव्हता.
तो एका मुलाच्या आयुष्यातली अडथळ्यांची गर्दी कमी करत होता.
आणि म्हणूनच ही कथा फक्त एका पोलीसाची नाही.
ही कथा आहे त्या प्रत्येक माणसाची,
जो आपल्या कामाच्या चौकटीपलीकडे जाऊन
एखाद्या अनोळखी जीवासाठी थांबतो.
कारण देव प्रत्येक वेळी चमत्कार करूनच मदत करत नाही.
कधी कधी तो प्रकाश घोषसारख्या माणसांच्या रूपानं
रस्त्याच्या कडेलाच उभा असतो.

सत्य घटना
कोलकात्यातील ट्रॅफिक सर्जंट प्रकाश घोष यांनी रस्त्यावर राहणाऱ्या एका लहान मुलाला ड्युटीच्या वेळात फावल्या क्षणी अभ्यासात मदत करण्यास सुरुवात केली. मुलाची आई फूड स्टॉलवर काम करत होती आणि मुलगा सरकारी शाळेत शिकत होता. मुलगा अभ्यासात मागे पडू लागल्याचं कळल्यावर प्रकाश घोष यांनी त्याचा गृहपाठ, स्पेलिंग, उच्चार आणि अभ्यास तपासण्याची जबाबदारी घेतली. ही घटना २०२२ मध्ये समोर आली आणि अनेकांच्या मनाला स्पर्शून गेली.
सौ तृप्ती देव 
भिलाई छत्तीसगड 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...