शनिवार, २५ जुलै, २०२६

3092. विठ्ठलाचा न्याय

     संध्याकाळचे सात वाजले होते. पावसाने नुकतीच विश्रांती घेतली होती. चाळीच्या अरुंद गल्लीत चिखल साचला होता. घराघरांत दिवे लागले होते. कुठे फोडणीचा सुगंध, कुठे मुलांच्या अभ्यासाचा गोंधळ, तर कुठे टीव्हीवरच्या बातम्या. नामा मात्र आज नेहमीसारखा नव्हता. त्याची चाल मंद होती. खांदे खाली झुकले होते. हातातला डबा रिकामा होता, पण मन मात्र ओझ्याने भरलेले होते. घरात पाऊल टाकताच त्याचा सात वर्षांचा मुलगा धावत आला.
“बाबा…उद्या मला शाळेसाठी दप्तर आणशील ना?”
नामा क्षणभर थबकला. मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला; पण उत्तर दिले नाही. बायको सुमनने ते ओळखले.
“काय झालं? तब्येत बरी नाय का?”
नामा शांत बसला. बराच वेळ बोललाच नाही. शेवटी खोल श्वास घेत म्हणाला,
“उद्यापासून मी घरीच हाय.”
“का हून ?”
“कंपनी सरकारने सील केली.”
घरात क्षणात शांतता पसरली. मुलांना काही समजले नाही. पण सुमनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
“का बरं?”
“भेसळयुक्त दूध तयार होत होतं. मोठी कारवाई झाली. मालकाला अटक झाली. सगळे कामगार कामावरून कमी केले .”
सुमनच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. त्या रात्री घरात कोणी नीट जेवलं नाही. नामा छताकडे पाहत पडला होता. त्याच्या डोळ्यासमोर रोजची दृश्ये फिरत होती. मोठमोठ्या टाक्यांत पाणी मिसळले जायचे. पांढरी पावडर. रसायनांच्या बाटल्या. सुगंधी द्रव्य. क्रीमसारखा दिसणारा द्रव. सगळं मिसळलं की तयार व्हायचं “दूध”. पहिल्या दिवशी त्याने विरोध केला होता. “हे चुकीचं आहे.” मालक हसला होता. “तुला पगार हवा की प्रवचन द्यायचंय?” घरची परिस्थिती आठवली. वृद्ध आई. शाळेत शिकणारी मुलं. भाड्याचं घर. आणि नामा गप्प बसला.  त्यादिवशी पासून त्याने शेजारच्या गोठ्यातले दूध पातळ व महाग असले तरी तेच घेणे चालू केले व बायकोला बजावून सांगितले…” हेच दूध आपल्या लेकराना द्यायचे..”
नामाने रात्र जागून काढली होती पण पहाटे डोळा लागला होता. पहाटे सुमन उठली. घरात देवाजवळचा दिवा लावला. विठ्ठल-रखुमाईच्या फोटोसमोर हात जोडले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
“विठ्ठला… तूच आमचा पोशिंदा हायस, आमची कंपनी लवकर सुरू होऊ दे. आमच्या लेकरांसाठी काहीतरी कर रे बाबा ”
तिचा आवाज थरथरत होता. विठ्ठल विटेवर उभा होता. आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचे स्मित होते . तो मनात म्हणाला,
“ही लेकरं किती भोळी आहेत. स्वतःचा संसार वाचवण्यासाठी हजारो संसार उद्ध्वस्त करणाऱ्या उद्योगासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात. जर मी तिचं ऐकलं तर किती निरपराध मुलांच्या तोंडात भेसळयुक्त दूध जाईल? मग माझ्या विटेवर उभं राहण्याचा अर्थ काय?”
तेवढ्यात रखुमाई म्हणाली,
“नाथ, ती स्त्री वाईट नाही. ती संसारी आहे . आपला संसार सुखाचा व्हावा हीच तिची माफक अपेक्षा आहे. तिच्या पोरा बाळांचा घास हिसकावून घेऊ नका..”
“उघड्या डोळ्यांनी ही भेसळ बघू शकत नव्हतो म्हणून या पदावर तुकारामची  निवड केली. आता तू  असे म्हणते की, त्याला काढून टाक..”
“ नाथ, मी असे म्हणत नाही. तिला  दुसरा मार्ग दाखवा तिचा संसार वाचवा असे म्हणते.”
विठ्ठल रखूमाईकडे बघून  स्मित करत बोलले 
“मग आता तिला मार्ग दाखवायलाच हवा.”
त्या रात्री सुमनला स्वप्न पडलं. विटेवर उभा असलेला विठ्ठल तिच्यासमोर आला. तो म्हणाला,
“सुमन. तू मला कंपनी सुरू करायला सांगतेस ना. ठीक आहे ती चालू करू पण मला सांग. तुझ्या मुलाला रोज तुझ्या नवऱ्याच्या कंपनीतील दूध प्यायला देशील का?”
सुमन दचकली.
“नाय .”
“का?”
“ते इश हाय .”
“मग दुसऱ्याच्या मुलाला का?”
सुमनचा आवाज हरवला.
विठ्ठलाने सुमनचा हात धरला.
“चल माझ्या सोबत..”
क्षणात दृश्य बदलले. एका दवाखान्यात एक लहान मुलगा उपचार घेत होता. डॉक्टर आईला सांगत होते,
“अन्नातून सतत निकृष्ट पदार्थ शरीरात गेल्यामुळे प्रकृती बिघडली आहे. त्याला आतड्यांचा भयानक आजार झाला आहे ”
आई रडत होती.
दुसऱ्या ठिकाणी वृद्ध माणूस आजारी पडला होता. एका गरीब बापाने शेवटचे पैसे औषधांवर खर्च केले होते. विठ्ठल म्हणाला,
“हे कोण आहेत माहीत आहे?”
सुमनने मान हलवली.
“हेच ते लोक आहेत ज्यांनी तुमच्या कंपनीचे दूध घेतले.”
सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन गप्प होती. तिने देवाजवळ जाऊन हात जोडले.
“देवा...कंपनी सुरू होऊ दे अशी प्रार्थना मी परत कधी करणार नाही. मला योग्य मार्ग दाखवा ”
असे म्हणताच तिला जाग आली. समोर विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा होता.  विठ्ठलाला नमस्कार करून सुमन कामाला लागली.  सकाळपासून कामाच्या शोधात असणारा नामा थकून भागून मंदिराच्या बाहेर बसला होता. मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर आधारित कीर्तन चालू होते. कीर्तनकार म्हणाले,
“तुकाराम महाराज म्हणतात, सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याला सुरुवातीला कष्ट मिळतात; पण शेवटी समाधान मिळते.”
नामा मागच्या रांगेत बसला होता. प्रत्येक शब्द त्याच्या मनात उतरू लागला. कीर्तनकार पुढे म्हणाले,
“तुमच्या हाताने तयार होणारा प्रत्येक घास हा देवाला नैवेद्य आहे असे समजा. मग त्यात भेसळ कराल का?”
नामाच्या डोळ्यात पाणी आले. कार्यक्रमानंतर कीर्तनकार लोकांशी संवाद साधत होता. नामा त्याच्याकडे गेला.
“महाराज...मी चुकीच्या डेअरीत काम करत होतो. पण मला आता प्रामाणिक काम करायचं आहे.”
कीर्तनकारराने त्याच्याकडे पाहिले.
“चूक मान्य करणारा माणूस अर्धा सुधारलेलाच असतो. त्यांनी त्याला शासनाच्या कौशल्य विकास योजनेबद्दल माहिती दिली. स्वच्छ आणि सुरक्षित दुग्धप्रक्रियेचे प्रशिक्षण. 
लघुउद्योगासाठी कर्ज. स्वयंरोजगाराची संधी. याची माहिती दिली. काही महिन्यांनी...
नामाने गावातील चार शेतकऱ्यांना सोबत घेतले. शुद्ध दूध संकलन सुरू केले.
प्रत्येक कॅनवर लिहिलं होतं.
“विश्वास हेच आमचं भांडवल.”
लोक हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवू लागले.  या वर्षी आषाढी एकादशीला संपूर्ण कुटुंब पंढरपूरला आले. विठ्ठलाच्या चरणी नामाने डोके ठेवले.
“देवा... त्या दिवशी माझी नोकरी गेली म्हणून मी तुला दोष दिला. आज समजलं. तू माझी नोकरी नाही काढलीस. तू माझं पाप थांबवलंस.”
सुमन म्हणाली,
“त्या दिवशी मी चुकीची प्रार्थना केली होती. आज एकच मागणं आहे. आमच्या हातून कधीही कोणाच्या ताटात भेसळ जाऊ देऊ नकोस.”
मंदिराबाहेर एक लहान मुलगा दूध पीत होता. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं. विठ्ठल जणू मनात म्हणत होता,
“माझी पूजा फुलांनी नाही, तर प्रामाणिक घासाने होते.
जो दुसऱ्याच्या लेकराच्या तोंडात शुद्ध अन्न घालतो, तोच माझा खरा वारकरी.
भेसळ अन्नात नसतेच असे नाही; ती मनातही असते.
मन शुद्ध झाले की अन्नही शुद्ध होते, आणि अन्न शुद्ध झाले की समाज निरोगी होतो.”
त्या दिवशी नामाच्या संसाराला फक्त रोजगार मिळाला नाही, तर आत्मसन्मानही मिळाला.
कारण पोट भरायला पैसा लागतो; पण मन भरायला प्रामाणिकपणा लागतो.
आणि ज्या समाजात प्रामाणिकपणाचा घास वाढला जातो, तिथे विठ्ठलाला विटेवर उभं राहण्यासाठी वेगळं मंदिर लागत नाही. तो प्रत्येक घरात वसतो.

लेखिका सौ. कृतिका नितीन कुलकर्णी अंबरनाथ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...